विठूनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी

जळगाव, दि. १६ (प्रतिनिधी) –  अनुभूती स्कूल, जळगांव येथे दि. १६ जुलै २०२४ मंगळवार रोजी  दींडीसह आषाढी एकादशी आनंदात साजरी करण्यात आली. एकादशीच्या आदल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री कासार, भावना शिंदे, योगिता सुर्वे, हर्षा वाणी यांनी केले होते. यात विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी’ या सुंदर भजनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यही सादर केले.

यानंतर शालेय परिसरात विठूनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या भक्तीमय वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी पाऊलीवर ताल धरत दिंडीत सहभाग घेतला. मैदानावर रिंगण सोहळा रंगला. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ या जयघोषाने कार्यक्रम उत्साहात पार पडला. यासाठी अरविंद बडगुजर, ज्ञानेश्वर सोनवणे सर व भुषण खैरनार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने शिक्षणासमोरील आव्हाने विषयावर चर्चासत्र

जळगाव: येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने भारतातील शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात तरुण शांती सेनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भार्गव, गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी संचालक डॉ. लीला वसारिया, सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनचे व्याख्याता डॉ. विकास मणियार व हॅडलबर्ग विद्यापीठ जर्मनीच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. गीता धर्मपाल सहभागी होणार आहेत. चर्चासत्राचे संचालन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार करणार आहेत.
भारतातील शिक्षण क्षेत्रासमोर आगामी काळात येणाऱ्या संभाव्य आव्हानांसोबतच त्यावरील उपाय योजनांबाबत चर्चासत्रात खुली चर्चा करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५.३० वेळात गांधीतीर्थ, जैन हिल्स येथे आयोजित या चर्चासत्रात शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मान्यवरांसह उपस्थितांनाही चर्चेत सहभागी करून घेण्यात येणार असून त्यांचे शंका समाधान करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमी प्रथम विजेते

जळगाव दि.१५ प्रतिनिधी : –  जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत  ११ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते ठरलेत. तर ८ सुवर्ण, ४ रौप्यपदक पटकावत रावेर तालुका द्वितीय, ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन पाचोरा संघ तृतीय क्रमांकाने विजयी ठरलेत.

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. १४) जुलै ला जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त विशाल बेलदार यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, महेश घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर स्पर्धा या अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल शिरसोली रोड जळगाव येथे इलेक्ट्रॉनिक  स्कोरीग सिस्टीम वर जागतिक तायक्वांडो संघटनेच्या नियमांचे पालन करुन घेण्यात आली. स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची १९ ते २१ जुलै रोजी चंद्रपूर येथे  कॅडेट राज्य स्पर्धेसाठी तसेच २५ ते २७ जुलै रोजी बीड येथे होणार असलेल्या ज्युनियर मुलं व मुली यांच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही स्पर्धा या इलेक्ट्रॉनिक स्कोरीग सिस्टीम वर घेण्यात आली. पंच म्हणून निलेश पाटील, यश शिंदे, अमोल जाधव, जयेश बाविस्कर यांनी काम पाहिले, स्पर्धा यशस्वीतेसाठी पुष्पक महाजन, दानीश तडवी, दर्शन कानवडे आदींनी सहकार्य केले.

स्पर्धेतील कॅडेट सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे मुले :  अर्थव सोनार ( रावेर ), सोहम कोल्हे (बोदवड), निल सोनवणे (पाचोरा), मयुर पाटील (जळगाव), ईशांत चौधरी (पहुर), अमर शिवलकर (रावेर)

मुली : आराध्या पाल (बोदवड ), स्वाती चौधरी (पहुर), ज्ञानेश्वरी दिक्षित (रावेर), हर्षदा गायकवाड (रावेर), कोमल गाढे (जळगाव), समृद्धी कुकरेजा (जळगाव), रेवती देशमुख (पाचोरा)

ज्युनियर मुलं : ४५ किलो (सतिश क्षिरसागर) पहूर,  ४८ किलो ( साई निळे ) रावेर, ५१ किलो (सिद्धांत घेटे) रावेर, ५५ किलो (अनिरुद्ध महाजन) जळगाव, ५९ किलो (लोकेश महाजन) रावेर, ६३ किलो (प्रबुद्ध तायडे) रावेर, क्षितीज बोरसे (पाचोरा)

मुली : ४२ किलो (सिमरन बोरसे) जळगाव, ४४ किलो (देवयानी पाटील ) जळगाव, ४६ किलो (नाव्या वराडे) चाळीसगाव, ४९ किलो (वैष्णवी सातव) जळगाव, ५२ किलो (निकीता पवार) जळगाव, ५५ किलो (जागृती चौधरी) पहूर, ५९ किलो (ऋतुजा पाटील) पाचोरा, ६३ किलो (श्रावणी मोरे) जळगाव, ६८ किलो (स्पर्श मोहिते) जळगाव

सदर खेळाडूंना जयेश बाविस्कर (जळगाव), हरीभाऊ राऊत (पहुर), सुनील मोरे (पाचोरा), जिवन महाजन (रावेर), जयेश कासार (रावेर), शुभम शेटे (चाळीसगाव) याचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन यांनी कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न 

जळगाव दि.१५ प्रतिनिधी :-  जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे  खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.००  वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली.

जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी  जिल्हा संघात या खेळाडूंची निवड झाली. राज्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड हरियाणा मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुणवंत कासार प्रथम, तसीन तडवी द्वितीय, प्रशांत कासार तृतीय, अजय परदेशी चतुर्थ यांची निवड झाली.

जिल्ह्यातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फीडे आरबीटर अभिषेक जाधव, सीनिअर अर्बिटर परेश देशपांडे, नॅशनल अर्बिटर नथू सोमवंशी, फीड अर्बिटर आकाश धनगर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम केले. शकील देशपांडे, रवी दशपुत्रे, तेजस तायडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला.

नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पारितोषिके देण्यात आलीत. चंद्रशेखर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दि.२५ ते २८ जुलै २०२४ जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंव्यतिरिक्त अधिकाधिक संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

जळगाव, दि.७ प्रतिनिधी –  जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर, संत सावता नगर परिसर, चंदु अण्णानगर, कांताई नेत्रालय, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, शिवम नगर मित्र मंडळ यांचे सौजन्याने वनहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वेस्टर्न रेल्वे सुरत रेल्वे गेट क्रॉसींग समोरुन निमखेडी रोडने १००० हून अधिक निंब, वड, पिंपळ, करंज, बहुळा, कदम, चिंच, जांभूळ यासह स्थानिक मातीत वाढणारी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात मनपा आरोग्य अधिकारी तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, सौ. मनिषा उदय पाटील यांच्याहस्ते झाड लावून झाली. यावेळी सामाजिक वनिकरण विभागाच्या रोहिणी सोनार, राजेंद्र राणे, वन विभागाच्या अश्विनी ठाकरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक, सौ. संगिता नाईक, अॅड. सुनील खैरनार, जे. एम. तापडिया, अनिल जोशी, संजय ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, डॉ. नितीन विसपूते, हरित सेनेचे प्रविण पाटील, शिवमनगरचे अनिल पाटील व सहकारी, वसंत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. ‘एक दिवस वसुंधरेसाठी देऊया, झाडे लावून,  झाडे जगवूया’ या संकल्पातून जैन इरिगेशनने हा उपक्रमासाठी विशेष सहकार्य उपलब्ध करुन दिले. श्रीनाथजी हाउसिंग सोसायटी मधील हरिष लुंकड, गिरीष लुंकड, विजय तिवारी, मनोज देशमुख, स्वाती देशमुख यांच्यासह लहान मुलांनी व जैन इरिगेशनचे आर. एस. पाटील, संजय साळी, देवेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला. मालधक्क्यावरील हमाल बंधूंनीही वृक्षारोपणात सहभाग घेत सावलीसाठी झाडे लावली.

सी. एस. नाईक यांनी सांगितले की, ‘जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वृक्षारोपण मोहिमेला विशेष मार्गदर्शन केले असून त्यांच्याच सहकार्यातून आज वृक्षारोपण केले जात आहे. विद्यार्थ्यांसह आपण प्रत्येकाने उरलेले पाणी फेकून न देता एखाद्या झाडाला टाकले तर ती सहज वाढतील. आणि वाढलेले तापमान नियंत्रणात आणण्यास मदत करतील आणि आपले भविष्य सुकर करतील. प्रत्येकाने फक्त फोटो काढण्यापूरते झाडे लावू नये ती जगवली पाहिजे.’

दरम्यान ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी वृक्षारोपण उपक्रमास मनपास्तरावर पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. झाडांची निगा राखली जावी यासाठी १०० ट्रि गार्ड स्वत: लावणार असल्याचे जाहिर केले. राजेंद्र राणे, वसंत पाटील, प्रविण पाटील, डॉ. नितीन विसपूते, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन झाडे जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

जळगाव दि.7 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त  ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील एकमेव स्कूल सुरू केली.  अनुभूती स्कूलशी जुळवून घेत आपल्यातील कलागुणांना आत्मविश्वासपूर्वक सादर केले. नवनिर्मिती, उत्कृष्टतेसाठी, स्वागतार्ह काय याची समज होऊन नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. भारतीय संस्कृतीत विविधता आहे. भाषा, पंथ, संस्कृती, सांस्कृतिक वारसा यातून भारतीय मूल्यशिक्षणाचे दर्शन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातुन झाले.

सतरा वर्षापासून सुरु असलेल्या स्कूलच्या स्थापना दिनाच्या औचित्याने ‘फ्रेशर्स डे ’ ची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या डॉ. भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची  प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘भिती ही यशाची पहिली पायरी बनविली पाहिजे कारण भितीमुळे आपण चांगले करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे हवे आहे ते मिळेलच असे नाही त्यामुळे क्रोध करून काहीही फायदा नाही. स्विकार करणे शिकले पाहिजे. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा विचार करू नये यातूनच स्पर्धेच्या युगात यशस्वी होऊ शकतो.’

सुरवातीला स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले.  ‘छमक छमक घुमर घुमर’ … या गीतावर राजस्थानचे पारंपारिक नृत्यातून संस्कृतीचे दर्शन घडविले.  उडिसाचे कांचीविजय नाट्य सादर झाले. यात राजा पुरूषोत्तम देव यांच्या संघर्षाची कहाणी विद्यार्थ्यांनी उलगडुन दाखविली. युध्दानंतरच्या परिणामांची परिस्थितीही दाखविली.  माणिक यांच्याकडून प्रभू जगन्नाथाने प्यायलेले पाणी, राजकुमारी पद्मावतीचा विवाहाचा प्रसंग  हूबेहूब सादर केले. ‘जय जगन्नाथ हमे रहने अपने चरनो मे हे भजन’,

‘सर देशा तू जननी भारत देशा’ हे देशभक्तीपर गीत, अनूभुतीचे विस दिवस यावर अथर्व कांबळे याने व्यक्त केलेले मनोगत, तामिळनाळुचे त्रिवृदा नृत्य, रामायणातील विश्वामित्रा, गुरू वशिष्ट यांची श्रीराम लक्ष्मण यांची भेट हा क्षण, भगवान श्रीकृष्णाच्या गीतावर नृत्य सादर केले. मेरी चौकट मे… राम भजन, मिमिक्री, मेरी माँ.. तेरे जैसा यार कहॉ.. हे गीत गायन, तबला वादन, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत भाषण अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलीत. मणिपूरच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् झाले.

दरवर्षी स्कूलचा स्थापना दिन व फेशर्स डे साजरा केला जातो. यादिवशी स्कूलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलची शैक्षणिक जीवनमूल्यांची ओळख झालेली असते. अनुभूती स्कूल निवासी असल्याने विद्यार्थी येथील वातावरणाशी एकरूप होतात. हा आनंदोत्सव म्हणजे फेशर्स डे यात विद्यार्थ्यांनी धम्माल केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन क्रीश संघवी, वर्धनी अग्रवाल यांनी केले.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न

जळगाव, दि. ५ प्रतिनिधी : –  ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर इनर व्हिल क्लबच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. रितु कोगटा, सचिव डॉ. मयूरी पवार, नवनियुक्त अध्यक्ष सौ. उषा जैन, सचिव निशिता रंगलानी उपस्थित होत्या. मान्यवर उपस्थितांसह माजी अध्यक्ष नुतन कक्कड, संगिता घोडगावकर, मिनिल लाठी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले.

उषा जैन अध्यक्ष पदासाठी तर सचिवपदासाठी निशिता रंगलानी यांना बॅज पिनिंग पदाधिकारींच्या उपस्थित झाले. २०२४-२०२५ करिता निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा सौ. उषा जैन यांनी केली. कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसी रंजन शहा, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य दिप्ती अग्रवाल, साधना गांधी,  ज्योत्स्ना रायसोनी, संध्या महाजन, शैला कोचर, सल्लागार नुतन कक्कड, निता जैन यांची निवड करण्यात आली. निशा जैन यांच्यासह अध्यक्ष, सचिवांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.  डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. दिप्ती अग्रवाल, निकिता मयूर अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले.. डॉ. रितु कोगटा यांनी मागील दोन वर्षात इनर व्हील क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा घेत नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. डॉ. मयुरी पवार, निशिता रंगलानी यांनीही मनोगत व्यक्त केले. इनर व्हिल क्लबचा लोगो आलेल्या पदाधिकारी व पाहुण्यांच्या वाहनांवर लावण्यात आला.

सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने काम करा- सौ. निशा जैन

आपण समाजाकडून भरपूर घेत असतो ते सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने सर्वसामान्यांना परत केले पाहिजे. नाविन्यता व कल्पकतेतून इनर व्हिल क्लबच्या उद्दिष्ट्यांची पेरणी समाजात करायची आहे. ही जबाबदारी विद्यमान अध्यक्ष उषा जैन यांच्यासह महिलांच्या टिमवर्कच्या माध्यमातून यशस्वी करतील व मैत्रभावनेतून प्रत्येक उपक्रम राबविला जाईल, अशा शुभेच्छा प्रमुख अतिथी म्हणून अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी  दिल्यात.

इनरव्हिल क्लब ऑफ जळगावचा सौ. निशा जैन यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा

जळगाव, दि.४ (प्रतिनिधी) –  इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा शुक्रवार सकाळी ११.०० वाजता हॉटेल नैवेद्य, काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

क्लबच्या अध्यक्षपदी सौ. उषा जैन यांची तर सचिवपदी निशिता रंगलानी यांची वर्ष २०२४-२५ करिता निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीची सोहळ्यात घोषणा करण्यात येणार आहे.

आयोजित पदग्रहण कार्यक्रमात अध्यक्ष व सचिव यांच्यासह नूतन कार्यकारिणी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत, असे मावळते अध्यक्ष डॉ. रितु कोगटा व सेक्रेटरी डॉ. मयुरी पवार  यांनी कळवले आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धेत शुभम पाटील ला तिहेरी मुकुट

जळगाव दि.२ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धा-२०२४ या स्पर्धा दि. २९ ते ३०  जुन दरम्यान झाल्यात. जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा तालुक्यांमधून १८३ खेळाडूंचा सहभाग घेतला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, शिल्पा फर्निचरचे किर्ती मुनोत, आर्य मल्टीपर्पज फाउंडेशनचे डॉ. तुषार उपाध्ये व मुख्य पंच चेतना शाह उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन झाले. जिल्हातील बॅडमिंटन प्रशिक्षकांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा अजिंक्यपदचे चषक, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्र प्रदान केले गेले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

११ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – मुकुंदा मनीष चौधरी

उपविजयी –  नमित प्रशांत मगर

११ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी –   तवस्मी वरून मोहता

उपविजयी – रुषा राहुल झोपे

१३ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – अन्मय अमोल जोशी

उपविजयी – मयंक आनंद गाडेकर

१३ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तवस्मी वरून मोहता

उपविजयी – यशश्री राजकुमार मुनोत

१५ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – देवदत्त नितीन अहिरे

उपविजयी – अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

१५ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तनिषा अनिल साळुंखे

उपविजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

उपविजयी – रोहित किशोर सोनवणे आणि शांतनु शैलेश फालक

१५ वर्षा आतील मुली दुहेरी

विजयी – कुहू मयूर शर्मा आणि वैष्णवी शैलेंद्र पाटील

उपविजयी – सयुरी अमित राजपूत आणि स्वरा योगेंद्र नेहेते

१७ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – हेमराज अशोक लवांगे

उपविजयी – दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी –  पूर्वा किशोर पाटील

उपविजयी – ओवी अमोल पाटील

१७ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी –  आर्य महेश गोला आणि हमझा साजिद खान

उपविजयी – ह्रिदय विशाल पिपारीया आणि मिहीर राजेश कुलकर्णी

१९ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – तेजम केशव

उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – पूर्वा किशोर पाटील

उपविजयी – स्वरा निलेश पाटील

पुरुष एकेरी

विजयी – शुभम मुरलीधर पाटील

उपविजयी – तेजम केशव

महिला एकेरी

विजयी – राजश्री संदीप पाटील

उपविजयी – स्वरा निलेश पाटील

पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि शुभम मुरलीधर पाटील

उपविजयी – शेखर सतीश सोनवणे आणि मंदार मुकुंद कासार

३५ वर्षावरील पुरुष एकेरी

विजयी – सचिन विष्णू बस्ते

उपविजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया

उपविजयी – डॉ. अमित राजपुत आणि समीर सुनील रोकडे

 ३५ वर्षावरील मिश्र दुहेरी

विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया

उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि डॉ. तुषार गणेश उपाध्ये

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून अर्श शेख, देवेंद्र कोळी, मशरूक शेख, तेजम केशव, शुभम जितेंद्र चांदसरकर, देवेंद्र कोळी, जाजीब शेख, दिपिका ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात सुफयान शेख, करण पाटील, देव वेद, मयंक चांडक, पुनम ठाकूर, अक्षय हुंडीवाले,  प्रणेश गांधी, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.  सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, मनोज आडवाणी यांनी केले.

केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु – अभिषेक देव

जळगाव दि.०२ (प्रतिनिधी) – ‘केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. गत वर्षाची भारताची केळी निर्यात २९०.९ मिलीयन डॉलर्स होती. केळीची निर्यात एक बिलीयनच्यावर कशी होईल, याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जैन हिल्स येथे झालेल्या अपेडा केळी उत्पादक व निर्यातदार यांच्यासमवेत बैठकीत झाली. यासाठी पायाभूत सुविधांसह फ्रुटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्डस्टोअरेज, शेतातून पॅकहाऊस पर्यंत सुरक्षीत, जलद व कमी किंमतीत वाहतूक सुविधा निर्माण करण्याविषयी सुद्धा चर्चा झाली. जळगाव जिल्हा हा प्रमुख केळी उत्पादकांपैकी एक असून या परिसरात बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे. यातून ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होतो; त्यादृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टर पैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे, यासाठी विशेष अहवाल तयार करुन स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’ असे आश्वासन अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले.

अॅग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथोरिटी (अपेडा) व  जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे कस्तुरबा सभागृह येथे आयोजित ‘बनाना ग्रोवर्स अॅण्ड एक्सपोटर्स मीट २०२४-२५’ मध्ये प्रमुुख अतिथी म्हणून अभिषेक देव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशू, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदारांपैकी आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत आरंभी दीपप्रज्वलन झाले. केळी उत्पादक असोसिएशनच्यावतीने डि.के. महाजन, वसंतराव महाजन, सचिन पाटील, ललित पाटील, संजीव देशमुख, संतोष लाचेरा, प्रेमानंद महाजन, दिगेंद्रसिंग भरुच यांच्याहस्ते अभिषेक देव यांचा सत्कार करण्यात आला. केळीचे झाड असलेली ट्रॉफी, शाल, सूतीहार असे सम्मानाचे स्वरुप होते.

अभिषेक देव बोलताना पुढे म्हणाले की, ‘आपण शेतात उत्पादन करतो ते गुणवत्तापूर्ण आहे का? त्यासाठी काय केले पाहिजे, आपण काय खातोय ते कुठून उत्पादन झाले आहे हे खाणाऱ्याला समजले पाहिजे. ग्लोबल गॅप, जैन गॅप तंत्रज्ञान त्यासाठी उपयुक्त ठरू पहात आहे. फ्रुट केअर मॅनेजमेंट, क्लिनींग, उत्पादन क्षमता वाढविणे, आंतरराष्ट्रीय मानांकानप्रमाणे निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रयत्न करणे, ज्या अॅसेट आहेत त्या पुर्ण क्षमतेने उपयोग करणे. जैन इरिगेशन ही केळी उत्पादकांसह फळ-भाजीपाला निर्यात करू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अॅसेट आहे. अचूक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. इराण, इराक सह आखाती देशांसह रशिया, युरोप व अन्य देशात केळी निर्यातीला मोठी संधी आहे. त्यासाठी ब्रॅंडीग महत्त्वाचे आहे.’

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘वडील भवरलालजी जैन यांनी गांधी तीर्थ निर्माण केले गांधीजींनी ग्रामीण भारतात भविष्य बघितले. गांधीजींच्या या विचारांचा माझ्या वडिलांवर प्रभाव राहिला आहे. ‘ग्रामीण विकास घडला तर भारत विकास साध्य करेल’ हे त्यांचे विचार जैन इरिगेशन आपल्या कृतीतून साध्य करित आहे. अल्पभुधारक शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा, यासाठी केळीवर संशोधन करुन १९९४ ला टिश्यूकल्चर तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले. जोडीला ठिबक सिंचन, फर्टिगेशन, प्रिसीजन फार्मिंग, क्रॉप केअर अग्रेसर काम केले आहे. यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादन होऊ लागली.  शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणि अधिकच्या उत्पादनामुळे सुबत्ता आली. तीस वर्षातील हा बदल म्हणजे खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव म्हणता येईल. केळी हे आरोग्य, रोजगार, विदेशी चलन मिळविण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण रोपांची व निर्यातक्षम वाणाची उपलब्ध हा महत्त्वाचा भाग आहे सोबत मूल्यवर्धन साखळीतील प्रत्येकाची सकारात्मक दृष्टी निर्यात वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरते.’

केळी निर्यात वाढविण्यासाठी केळीसाठी स्वतंत्र केळी मिशन कार्यक्रम आखण्यात यावा

विनिता सुधांशू यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ‘महाराष्ट्रातील शेतकरी हा तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अग्रस्थानी आहे. त्यातून उत्पन्न वाढीसाठी ते प्रयत्न करतात जैन इरिगेशन सारख्या संस्था उच्च तंत्रज्ञानातुन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे कार्य करत आहे. अपेडाचे कार्य विस्तारीत असून ७०० च्यावर उत्पादनांमध्ये निर्यातीसंबंधित कार्य सुरू असते. केळीमध्ये गेल्या दहा वर्षात निर्यातीचा वाटा वाढला आहे. निर्यातीचा वाटा अजून वाढविण्यासाठी शेतकरी, निर्यातदार आणि जैन इरिगेशनचे सहकार्य अपेक्षित आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निर्यात वाढविण्यासाठी शेतकरी, निर्यातदार, शासन व औद्योगिक संस्था यांच्यातील सुसंवाद वाढावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

शेतकरी व निर्यातदारांशी मुक्त संवाद

केंद्र सरकारने निर्यात वाढीसाठी धोरणात्मक दृष्टीने काय केले पाहिजे, त्यासाठी प्रश्नोत्तर स्वरुपात मुक्त संवाद शेतकरी व निर्यातदारांशी अभिषेक देव यांच्यासह अपेडाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यात शेतकऱ्यांनी निर्यातीसंबंधित तांत्रिक माहिती सहज उपलब्ध व्हावी, शेतकऱ्यांना प्रशिक्षीत केले पाहिजे, फ्रुटकेअर मॅनेजमेंट, पॅकिंग हाऊस, केळी उत्पादक परिसर व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होईल त्याठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कोल्ड स्टोअरची उभारणी, फ्रुट केअरला लागणाऱ्या साहित्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सबसिडी, करपा निर्मूलनाच्यादृष्टीने फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी अनुदानाची योजना पुन्हा सुरु करावी, केळीला आधारभूत किंमत एमएसपी जाहीर करावे अशा प्राथमिक स्तरावर सूचना शेतकऱ्यांनी दिल्या. निर्यातदारांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, चिनशी निर्यातीबाबत धोरण शिथिल करावे, इराण, इराक व आखाती देशांमध्ये आर्थिक व्यवहार मध्ये बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणावी, आठ दिवसांची केळी २० दिवसांवर जाण्यासाठी ग्रॅण्डनैन पेक्षा नवीन जातींवर संशोधन केले पाहिजे, नवीन मार्केटसाठी शासनस्तरावर सहकार्य व्हावे, रशिया, युरोप मध्ये निर्यात करायची असेल तर स्थानिक पातळीवर कोल्ड स्टोअर, स्कॅनर्स उपलब्ध करुन द्यावे, रेल्वे स्टेशनवर कंटेनर लोडींग व प्लगींगची व्यवस्था करावी, गुणवत्तेसाठी पॅकिंगमध्ये तंत्रज्ञान आणले तर केळीचा दर्जा सुधारेल अशा सूचना केल्या. अपेडाच्यावतीने प्रशांत वाघमारे, प्रिन्स त्रिपाठी एन एचबी,  एश्वर्य गुप्ता उपस्थित होते.  बऱ्हाणपूर, बडवाणी, नंदुरबार, जळगाव मधील साधारण ३०० केळी उत्पादक उपस्थित होते. प्रामुख्याने आशिष अग्रवाल, राजेंद्र पाटील, भागवत पाटील, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल, विशाल महाजन, भागवत महाजन, उमेश महाजन, बि. ओ. पाटील, अनिल पाटील, निर्यातदार अमीर करीमी, प्रशांत धारपुरे, युवराज शिंदे, महेश ढोके, शफी शेख, रविंद्र जाधव, अनिल परदेशी, प्रमोद निर्मळ, डॉ. अझहर पठाण यांचे सह २० निर्यातदार उपस्थीत होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. के. बी. पाटील यांनी केले. सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले गेले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version