शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार

जळगाव, ता. १२ : जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर- ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे. जळगावच्या जैन हिल्सवर १० सप्टेंबर रोजी झालेल्या या करारावर कंपनीतर्फे सह- व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी तर विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा.नझीर अहमद गनाई यांनी सह्या केल्या आहेत.
आधुनिक पद्धती व तंत्र वापरून विविध पिकांचे उत्कृष्टरितीने उत्पादन कसे घ्यायचे, जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या समस्यांचा प्रभावीपणे सामना कसा करायचा आणि आवश्यक तेवढीच संसाधने वापरून उत्पादन व उत्पादकता कशी वाढवायची यासंबंधीचे मार्गदर्शन करण्याबरोबरच जैन कंपनीने जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना ऊतीसंवर्धन (टिश्यूकल्चर) व जैव तंत्रज्ञानाचा (बायोटेक्नॉलॉजी) वापर करून तयार केलेले उत्कृष्ट प्रतीचे, उच्च दर्ज्याचे, रोगविरहीत व व्हायरसमुक्त लागवडीचे साहित्य पुरवायचे आहे. तसेच शेती क्षेत्रातील शाश्वतता कायम राखण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान व त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना आज भेडसावत असलेल्या समस्यांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जैन कंपनीने मार्गदर्शन करावयाचे आहे. तसे करारात नमूद केले आहे.
याप्रसंगी बोलताना जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नझीर अहमद गनाई म्हणाले की, “सफरचंद, केशर आणि काळेजिरे या पिकांच्या संशोधन व उत्पादन वाढीसंबंधी जैन इरिगेशनने आम्हांला मार्गदर्शन करावे अशी आमची अपेक्षा आहे.
सफरचंदाची जम्मू-काश्मीरची उत्पादकता हेक्टरी १० टनाची, हिमाचलची ८ ते ९ टनाची तर पश्चिमात्य देशांची ६७ टनांची आहे. आपली उत्पादकता कमी असल्याने उत्पादन खर्च वाढतो व निर्यातीला मर्यादा येतात. जैन कंपनीशी करार केल्यामुळे जे आधुनिक संशोधन व तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती उपलब्ध होणार आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यामुळे निश्चितच उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल, पाणी वापरात बचत होईल आणि विभागातील अन्नधान्य सुरक्षिततेला त्यामुळे हातभार लागून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.”

या सहकार्य करारावरती भाष्य करताना कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित जैन म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगतीसाठी होत असलेल्या या कराराचा आम्हांला अभिमान आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे परमपूज्य पिताजी भवरलाल जैन यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरीब व छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्या दिशेने संशोधन व तंत्रज्ञान विकसीत केले. ते आज देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. सिंचनासाठी लागणाऱ्या उत्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याबरोबरच स्वच्छ, शुद्ध व रोगमुक्त दर्जेदार रोपे-कलमे व लागवडीचे अन्य साहित्य आणि अचूक व परिपूर्ण शेतीसाठी (प्रिसीजन फार्मिंगसाठी) लागणारे तंत्रज्ञान आम्ही कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांना पुरविणार आहोत. त्यामुळे त्या प्रांतातील कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन शाश्वतरितीने वाढू शकेल.”

“सहकार्य कराराचा एक भाग म्हणून कृषी विद्यापीठातील विद्यार्थी व जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांना जळगाव येथे बोलावून प्रशिक्षण देण्यात येईल. विविध विषयांचे ८ ते १५ दिवसांचे कोर्सेस त्यांच्यासाठी चालविण्यात येतील. तसेच जैन इरिगेशनमधील
अनुभवी व तज्ज्ञ लोक जम्मू-काश्मीर विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना अध्यापनाद्वारे मार्गदर्शन करतील”, असेही श्री. अजित जैन म्हणाले. ठिबक सिंचनावर भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मागील वीस वर्षांपासून आम्ही जळगाव व अन्य ठिकाणी राबवित आहोत. हा प्रयोग जम्मू-काश्मीरमध्येही राबवावा. त्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू, असेही श्री. जैन यांनी कुलगुरुंना सांगितले.

जळगाव नागरिक मंचच्या वतीने अशोक जैन यांनी दिले राज्यपालांना निवेदन

जळगाव : जळगाव येथे दीड दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने जळगावच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांच्या मागण्या राज्यपालांकडे केल्या. अजिंठा विश्रामगृहावर राज्यपाल नागरिकांना भेटले. याच दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी राज्यपालांची विशेष भेट घेतली.
अशोक जैन यांनी जळगाव नागरिक मंचच्या वतीने   राज्यपालांना निवेदन सादर करीत त्यात मागणी केली की, पुणे – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडोर प्रकल्पात जळगावचा समावेश करावा. हा प्रकल्प जळगाकडे विस्तारला तर दौलताबाद, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, अजिंठा लेणी, गांधीतीर्थ सुद्धा जागतिक पर्यटनाशी जोडले जातील. ग्रीनफील्ड कॅरिडाॅरमुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, शेती उत्पादने, पर्यटन, हाॅटेल्स, ट्रॅव्हल्स अशा व्यवसायांना मोठा आर्थिक लाभ होऊन रोजगार वाढू शकेल. ही बाब अशोक जैन यांनी राज्यपालांकडे स्पष्ट केली. राज्यपालांनी निवेदन स्वीकारून त्याचा पाठपुरावा केंद्रीय मंत्रालयाकडे करणार असे आश्वासन दिले. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. दरम्यान याच कॅरिडाॅरची मागणी ‘क्रेडाई’ चे पदाधिकारी तथा विकासक अनीषभाई शहा यांनीही केली.

खेलो इंडिया वुमेन्ससाठी निकीता पवारची महाराष्ट्र संघात निवड

जळगाव दि.१० प्रतिनिधी –  जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनची खेळाडू कु. निकीता दिलीप पवार हिची खेलो इंडिया वुमेन्स लिग फेज-२ आणि दुसरी अस्मिता तायक्वांडो लिग साठी  मुलींच्या ज्युनियर ५२ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

या स्पर्धा  दिंडीगुल, तामीळनाडु येथे दि. ११ ते १४ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहेत.  निकिता पवार हिने  नुकत्याच बिड येथे झालेल्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले होते. या कामगिरीवर तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे.

तिच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले.

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

जळगाव, दि. ६ (प्रतिनिधी)- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५०७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांनामधील आवश्यकता असणाऱ्यांसाठी ७५० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला.

कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३५८, फूड पार्क डिव्हाईन पार्क १०१, अलवर ०४ चित्तूर ११, बडोदा १४, हैदराबाद १९ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क येथे आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले. यामध्ये जैन प्लास्टीक पार्क मधील सहकारी संगिता खंबायत यांनी हरतालिकेचे व्रत असतानासुद्धा रक्तदान करुन महिलांना रक्तदानाविषयी प्रेरणा दिली.

प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्यूकल्चर प्लान्ट फॅक्टरी व जैन फूडमॉल या सहकाऱ्यांसाठी  प्लास्टिक पार्कच्या डेमोहॉल (ज्ञानलय), अॅग्रीपार्क, फूडपार्क, एनर्जीपार्क व डिव्हाईनपार्कच्या सहकाऱ्यांसाठी फूड पार्क येथील प्रशासकीय इमारतीच्या दवाखान्याच्या वरच्या हॉलमध्ये रक्तदानाची सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान व्यवस्था करण्यात आलेली होती. जळगाव सिव्हील हॉस्पीटल, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र, इंडीयन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्त संकलन केले.

‘रक्तदाता-एक जीवनरक्षक’ यानुसार लोकांना संकट काळात जीवनदान देणारे हे मानवतेचे पुजारी, अशा लोकांना मदत करतात की, जेथे जात, धर्म, पंथ आणि इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न होता गरजूंना जीवन प्रदान केले जाते. कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या पासून सुरु झालेल्या सामाजिक कार्यामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा कंपनीला अभिमान आहे.  सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपल्या कंपनीचे नाव जेव्हा-जेव्हा समोर येते, तेव्हा तेव्हा लौकीकार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद ठळकपणे घेतली जाते. त्यासाठी संपूर्ण जैन कुटुंबीय नेहमीच प्रयत्नशील असतात. मातृतुल्य अशा सौ. कांताई जैन यांच्या स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हे त्याचेच एक प्रतीक होय.

७५० जणांनी घेतला मिष्टान्नाचा लाभ – सौ. कांताई यांच्या स्मृतिदिनानिमित्त बालसुधार गृह, जय जलाराम गायत्री मंदीर, बाबा हरदासराम, शिवकॉलनीतील बालकश्रम, सिंधीकॉलनीतील अंध शाळा, सावखेडा येथील मातोश्री वृद्धाश्रम त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दीपस्तंभ फाउंडेशनचे विद्यार्थी यांना मिष्टान्न भोजन दिले गेले. त्यात मिक्स व्हेज, चवळीची भाजी, मसाले भात, पुरी, कचोरी आणि गोड पदार्थ असा मेनु होता. जैन इरिगेशनच्या राजाभोज विभागातील सहकाऱ्यांनी भोजन वाटप केले.

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा चे शाश्वत व श्रावणी प्रथम

जळगाव : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर शालेय जिल्हास्तरीय चौदा वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली व संध्याकाळी सात फेऱ्यानंतर नंतर स्पर्धेचा समारोप झाला. आंतर शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची श्रावणी संतोष अलाहित  गुरुकुल इंग्लिश स्कूल प्रथम  मुलांमध्ये पाचोर्‍याच शाश्वत राहुल संघवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक स्पर्धेत प्रथम ५ आलेल्या मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देण्यात आली तसेच या प्रथम पाच व मुलं आणि मुलींची निवड विभागीय  पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली  विजय खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मीनल थोरात व राजेंद्र आल्हाद यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली
स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे तर सहकार्य करणारे संजय पाटील, नथू सोमवंशी, आदींनी काम बघितले
 १४ वर्ष वयोगट बुद्धिबळ अंतिम निकाल प्रथम पाच मुली
श्रावणी संतोष अलाहेत गुरुकुल इंग्लिश स्कूल पाचोरा
अवंती अमित महाजन पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव ऋतुजा राहुल बालपांडे गो से  हायस्कूल पाचोरा पाचोरा
मुदीता महेश लाड चावरा इंटरनॅशनल स्कूल चोपडा
ग्रंथी किशोर पटेल पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर
१४ वर्ष वयोगट बुद्धिबळ अंतिम निकाल प्रथम पाच मुले
शाश्वत राहुल  संघवी निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा
तिलक सुरज सरोदे, पोदार इंटरनॅशनल स्कूल अकलूज ता यावल
संग्राम चक्रधर रितापुरे द वर्ल्ड स्कूल भुसावल
तन्मय प्रकाश पाटील डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय चाळीसगाव
हिमांशू जगदीश नेहेते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अकलूज तालुका यावल

राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

जळगाव  दि. ३ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शिरसोली  या पाचोरा महामार्गाच्या दूतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. दि. ३१ ऑगस्ट ला रा. म.मा.क्र.753J की.मी ४.००ते ७.०० ह्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आले. आतापर्यंत २००० हून अधिक विविध जातींच्या झाडाच्या रोपांची लागवड महामार्गाच्या दूतर्फा करण्यात आले. अजून या परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहेत.

डीव्हाइन पार्क ते जैन हिल्स गेट समोरील परिसरात मान्यवराच्या हस्ते वृक्ष पूजन व वृक्षारोपणाचे फलक अनावरण करण्यात आले. शिरसोली ते श्रीकृष्ण लॉन्स पर्यंत महामार्गाच्या दूतर्फा हे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी मनुष्यबळ व तांत्रीक सहाय्य हे जैन इरिगेशनतर्फे उपलब्ध करुन देण्यात आले.करंज, कांचन, निम, चिंच या प्रजातीची रोपे लागवड करण्यात आली आहेत ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के., कृषी विभागाचे संजय सोन्नजे, जयंत सरोदे, अजय काळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील,  राजेश आगीवाल, संजय ठाकरे, सुरक्षा विभागाचे डी. एन चौधरी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर सोन्ने, विक्रम अस्वार, मयूर गिरासे, अकाउंट विभागाचे प्रदीप गुजराथी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नितीन सोनजे व सामाजिक वनीकरण व वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिणी थोरात, अजय रायसिंग, हरिष थोरात, प्रकाश बारी व इतर सहकारी उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षारोपण यशस्वी करण्यात आले. राजेंद्र राणे यांनी आभार मानले.

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव

नवी दिल्ली/ जळगाव,  दि. २ (विशेष प्रतिनिधी) – जळगाव शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील बांभोरी ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चौपदरी पुर्णत: कॉन्क्रीटचा करावा. त्यानंतर तो शहराच्या संबंधीत यंत्रणेकडे हस्तांतरीत करावा. तसेच या महामार्गावर बांभोरीजवळ गिरणा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प अहवाल तातडीने तयार करुन सादर करावा; अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या संबंधित यंत्रणेस दि. २७ ऑगस्टला दिल्यात. नितीन गडकरी यांनी जळगाव येथील मान्यवर नागरिकांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून रस्त्यांचे विविध प्रस्ताव मान्य करण्यासंदर्भात सहमती दर्शविली आहे. जळगाव येथील नागरिकांचे हे शिष्टमंडळ जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या नेतृत्त्वात  नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी गेले होते.

दरम्यान अतुल जैन यांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्या संपर्क करून शिष्टमंडळ व नितीन गडकरी यांच्यातील झालेल्या चर्चेची माहिती दिली.तसेच खासदार स्मिता वाघ यांची आज नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक असून जळगाव संदर्भातील महामार्गाच्या विविध विषयांवर धोरणात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येऊन शहर विकासाच्या विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी जळगाव नागरिक मंच स्थापन केला आहे. या मंचने ज्येष्ठ पत्रकार तथा एनएचईपीचे संचालक उदय निरगूडकर यांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या प्रत्यक्ष भेटी संदर्भात विनंती केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील महामार्गाशी संबंधीत समस्यांचे सविस्तर टिपण अशोक जैन यांच्या मार्गदर्शनात तयार करून उदय निरगुडकर यांच्याकडे पाठविले होते. त्यांच्या मध्यस्थीने नितीन गडकरींची भेटीची वेळ निश्चित झाली. या अनुषंगाने अतुल जैन यांनी जळगावच्या शिष्टमंडळासह दि. २७ ऑगस्टला नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

 जळगावच्या शिष्टमंडळात क्रेडाई संघटनेच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष अनिष शहा, कोगटा उद्योग समूहाचे संचालक प्रेम कोगटा, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक चौधरी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मल्टिमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुशील नवाल, पत्रकार दिलीप तिवारी यांचा समावेश होता.

अतुल जैन यांच्यासह शिष्टमंडळातील इतरांनी नितीन गडकरी यांना जळगाव शहरातील महामार्गाची सध्याची दुरावस्था, त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, वाढलेल्या अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या जळगाव प्रकल्प अधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा याविषयी सविस्तर माहिती दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे सध्यस्तिथीतील रेंगाळलेले काम धुळे, पाळधी, तरसोद या ठिकाणी थांबलेले वळण महामार्गाचे काम, तसेच गिरणा नदीवरील प्रस्तावित पुलाचे न सुरू झालेले बांधकाम या विषयी वस्तुस्थिती दर्शक माहिती दिली. अतुल जैन यांनी नितीन गडकरी यांना आग्रह केला की, ‘जळगाव शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटकरण करताना ते थेट पाळधी बायपास ते तरसोद बायपास असे शहरातून करावे. हे काम करताना बांभोरी जवळ गिरणा नदीवर नवा पूलाचे बांधकाम करावे.’ यावर नितीन गडकरी ही म्हणाले की, ‘जळगावची ही गंभीर समस्या मला माहिती आहे त्यामुळे शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटीकरण नक्कीच करु तसेच नव्या पुलाच्या बांधकामासाठी कार्यवाही करु.’ हे सांगत असतानाच नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईल वर कॉल करुन योग्य त्या सूचना दिल्यात.

नितीन गडकरी यांच्या सोबत झालेल्या चर्चेपुर्वी जळगावच्या शिष्टमंडळाशी त्यांचे  स्वीयसहाय्यक अमोल बिराजदार-पाटील यांनी जळगावच्या महामार्ग विषयक समस्यांबाबत सविस्तर चर्चा करुन तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सविस्तर टीपण तयार करून नितीन गडकरी यांना माहिती दिली होती त्यामुळेच नितीन गडकरींनी जळगावच्या प्रश्नांवर मुद्देसुद कार्यवाहीच्या तातडीने सूचना दिल्या. शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांच्यासमोर मांडलेल्या सूचना आणि त्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आदेश असे…

मांडलेला मुद्दा १. – धुळे ते तरसोद बायपासचे काम रेंगाळले आहे. त्यावरील धुळे, पाळधी आणि तरसोदजवळील वळण महामार्गाचे काम थांबलेले आहे. जर वळण महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास जळगाव शहरातील वाहतुकीचे अनेक प्रश्न सुटतील.

नितीन गडकरी – संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, धुळे-जळगाव महामार्गाचे काम जर ठेकेदार वेळेत करीत नसेल आणि त्यात संबंधिताला आर्थिक अडचणी असतील तर त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि नव्या ठेकेदाराला हे काम द्या.

मांडलेला मुद्दा २. – जळगाव शहरातील महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असून अपघातांची संख्या वाढून त्यात मनुष्यहानी होत आहे. या महामार्गाचा विस्तार करुन त्याची उंची वाढवून दोन्ही बाजूस एलईडी पथदीप लावावेत, मोठ्या आकारातील गटारीचे बांधकाम करावे.

नितीन गडकरी – संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, ‘पाळधी ते तरसोद या महामार्गावर जळगाव शहरातील मार्गाचे काम हे चौपदरी क्रॉन्क्रीट करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. जळगाव शहरातील सध्याच्या महामार्गाविषयी प्रचंड तक्रारी आहेत. मी स्वतः जळगाव दौऱ्यावर गेलो तेव्हा त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरी कॉन्क्रीटीकरण करणे आवश्यक असून त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. जळगाव शहरातील सुरक्षीत आणि टिकाऊ असा महामार्ग दुरुस्त करून तो संबंधीत यंत्रणेच्या ताब्यात देणे ही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणची जबाबदारी आहे.

मांडलेला मुद्दा ३. – पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडॉर मंजूर झालेला आहे. या प्रकल्पात जळगावाचा समावेश करावा. त्याचे कार्यक्षेत्र जळगावपर्यंत वाढवावे. तसे केल्यास जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय तसेच शेतीमाल व प्रक्रिया उत्पादन थेट इतर जिल्ह्यात व राज्यात पोहोचविणे शक्य होईल. जळगाव परिसरातील पर्यटन, हॉटेल, खासगी वाहतुक सेवा, दळणवळण सेवा वाढीस प्रोत्साहन मिळेल. भुसावळ येथील रेल्वेचा ड्रायपोर्ट आणि जळगाव विमानतळातील विस्तारणाऱ्या सुविधा यामुळे लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन मिळून रोजगाराच्या संधी वाढतील.

नितीन गडकरी – संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा सहभाग वाढविण्याची सूचना नक्कीच विचार करण्यासारखी आहे. या संदर्भात लवकरात लवकर प्राथमिक सर्व्हे करावा. अजिंठा जवळील वन विभागाच्या जमीनीचा काही भाग यात अडथळा आणू शकतो का ते तपासावे. जर वनविभागाचा काहीही अडथळा नसला तर ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करण्याचा निक्कीच विचार करता येईल. ती बाब तपासून मला अवगत करावी.

वरील सर्व मुद्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळास सांगितले की, ‘जळगावच्या मागण्यांविषयी मी स्वतः सहमत आहे. जळगाव जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय, लघुउद्योग शेतमाल आणि प्रक्रिया माल वाहतुकीसाठी ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉर नक्कीच उपयुक्त ठरु शकेल. महामार्गाशी संबंधित शहरातील मार्गाचे चौपदरी क्रॉन्क्रीटीकरण तसेच बांभोरी जवळचा पुल नव्याने बांधणे यावर लगेच प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देत आहे. वळण रस्त्यांची कामे लवकर करण्यासाठी संबंधित विभागास आदेश देत आहे.’ चर्चेनंतर शिष्टमंडळातील अतुल जैन यांनी जळगावकर नागरिकांच्या वतीने आभार मानले.

 

आज खासदार स्मिता वाघ यांच्याशी चर्चा – जळगाव शहरात महामार्गावर या आठवड्यात दोन महिला आणि एका वृद्धाचा बळी गेल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांना नागरिकांच्या रोषाला सामोरा जावे लागले आहे. त्यांच्यावर टिकाही होत आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनीही मोर्चे काढले आहेत. या विषयी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी खासदार स्मिता वाघ यांना दिल्लीत नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच जळगाव शहरातील महानगराशी संबंधित विषयांबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. दरम्यान खासदार स्मिता वाघ या आज दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.

जैन हिल्स वर पोळा उत्साहात

जळगाव दि.२  (प्रतिनिधी) – आदिवासी पारंपारिक देवदानी होळी नृत्य… शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट… संबळ वाद्यावर सालदारांचे नृत्य… सनई-चौघाड्यांच्या वाद्यासह.. सर्जा-राजा म्हणजे कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक ही जैन हिल्सवरील पोळाचे पारंपारिक महत्त्व अधोरेखित करीत होती. या पोळा उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह भुमिपुत्रांनी ठेका धरला. वृषभ राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा मिळवून हॅट्रीक साधली. त्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी प्रथमत: अशोक जैन  व सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पुजन करण्यात आले. जैनहिल्स येथील श्रद्धा ज्योत या श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ येथे ही मिरवणूक पोहोचून तेथे भाऊंच्या स्मृतिंना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सवाद्य मिरवणूक हेलीपॅडच्या मैदानात रवाना झाली. याप्रसंगी संघपती दलिचंद जैन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, राजेंद्र मयूर, डॉ. शेखर रायसोनी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, सामाजिक कार्यकर्ते युसूफ मकरा,  सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, अॅड. जमिल देशपांडे, स्वरुप लुंकड, पारस राका, ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील, माजी नगरसेवक अमर जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची उपस्थिती होती. जैन हिल्सवर गत २८ वर्षांपासून साजरा होणाऱ्या पोळ्याच्या क्षणचित्रांचे छायाचित्रे असलेल्या पार्श्वभूमिवर सजावट केलेले भव्य मंडप व व्यासपीठ उभारण्यात आले होते.

‘यांत्रिकीकरण कितीही होवो परंतु भारतीय शेतीमध्ये वृषभ म्हणजे बैलांशिवाय शेती शक्य नाही. वृषभाचे महत्त्व यापुढेही अबाधित राहणार आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी २८ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करणे सुरू केले. नव्या पिढीच्या प्रतिनिधींना ही भारतीय कृषि संस्कृती अनुभवता यावी, त्याचे महत्त्व समजावे या हेतुने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा उत्सव पाहण्यासाठी बोलावले जाते. बैल पोळा असे म्हणण्याऐवजी हा ‘वृषभ पूजन दिवस’ या अर्थाने रुढ व्हावा.’ असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते सालदारगडींचा सपत्नीक सन्मान – जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साईटवर चालते. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंनी सुरू केली आहे. त्यात कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, जेआरसी वैजनाथ साईट, जैन सोसायटी शिरसोली यांचा समावेश आहे. २८ सालदार गडी आणि ३० हून अधिक बैलजोडी काळ्या मातीमध्ये राबत असते. त्या सर्व सालदारगडींचा भेटवस्तु देऊन सपत्नीक गौरव करण्यात येतो. पोळ्याच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, विजयसिंग पाटील, डॉ. कल्याणी मोहरीर, प्रो. गीता धरमपाल आदी मान्यवरांच्याहस्ते गौरव झाला. किशोर कुळकर्णी व संजय सोनजे यांनी सूत्रसंचालन केले.

 

आदिवासी नृत्य..विद्यार्थ्यांचा जल्लोष.. – डोक्यावर बांबू व मोर पीसाचा टोप.. कंबरेवर घुगंरूचा पट्टा बांधून विशिष्ट पद्धतीने मांदल, ढोलकी, तुडतुडी, थाळी, तुमळी, टिमकीवर बुध्या, बावा काली मिरक्या आदिवासी देवदानी नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शौर्यवीर ढोल पथकातील १२० युवक-युवतींचे तालबद्ध वादन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नंदिनृत्यावर अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. सालदारांनीही संबळावर नृत्याविष्कार सादर करुन आनंद व्यक्त केला. पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेतला.

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणीचे रविवारी आयोजन

जळगाव दि .३० प्रतिनिधी –  आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी  निवड चाचणीचे आयोजन आता रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०८ . ३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर  ( विद्या इंग्लिश शाळेच्या मागे )  आयोजित करण्यात आली आहे.
ज्या मुलांचा जन्म दिनांक ०१.०९.२०१० रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग खाली दिलेल्या लिंक वर https://forms.gle/rnd5WxDmLUgmdmi27 जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी ₹ १००/- भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल जन्म दाखला / आधार कार्ड सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन  यांनी केली आहे अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा

‘महिला सुरक्षा’ विषयावर चर्चासत्र  इनरव्हील क्लब जळगाव व रोटरी राॅयल्सचा संयुक्त उपक्रम

जळगाव दि. ३० (प्रतिनिधी) – ‘आपल्या मुलांना महिलांशी आदरपूर्वक वागण्याची शिकवण पालकांनी द्यावी, मुलांशी वार्तालाप वाढविणे अत्यंत आवश्यक आहे…’ असा सूर चर्चासत्रात उमटला. इनरव्हील क्लब ऑफ जळगाव व रोटरी राॅयल्स जळगाव यांच्या वतीने ‘महिला सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

प्राप्त परिस्थिती बघता अनेक ठिकाणी महिलांवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. ‘महिलांची सुरक्षा’ ही एक सामाजिक समस्या उद्भवली आहे, या समस्येवर सर्वांच्या प्रयत्नाने तातडीने मात करण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांनी केले. चर्चासत्र प्रश्न-उत्तरांच्या स्वरुपात झाले इनरव्हील क्लबतर्फे निता जैन व दिप्ती अग्रवाल व रोटरी राॅयल तर्फे गुरदीप सिंग अहलुवालिया, सचिन पटेल, डाॅ. बिंदू छाबडा व नैन लाहोरी यांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला. रोटरी राॅयल्सच्या अध्यक्षा वर्षा रंगलानी यांनी प्रश्न विचारले. या चर्चासत्रात  वक्त्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

निता जैन : अशा घटनांवर त्वरित गुन्ह नोंदवून अॅक्शन घेतली गेली पाहिजे.

दिप्ती अग्रवाल : महिलांनी संरक्षणाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.

सचिन पटेल : पालकांनी मुलांशी वार्तालाप वाढविला पाहिजे.

डाॅ. बिंदू छाबडा : पालकांनी आपल्या मुलांना महिलांशी आदरपूर्वक वागायला शिकवले पाहीजे.

नैन लाहोरी : महिलांनी नेहमी मिरपुड स्प्रे स्वत:जवळ बाळगले पाहिजे.

गुरदीप सिंग अहलूवालिया : महिला सुरक्षेच्या कायदे विषयक माहिती काही उदाहरणांसहित दिली.

कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, रोटरी रॉयल्सच्या अध्यक्षा वर्षा रंगलानी, सचिव स्नेहा ग्यानचंदानी, पिंकी मंधान तसेच दोन्ही क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version