अनुभूती इंग्लिश स्कूलच्या पहिल्या इयत्तेतील शिशूंचे स्वागत

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लीश मीडियम स्कूलची स्थापना केली. या शैक्षणिक वर्षातील पहिल्या इयत्तेतील शिशुंची शाळा सुरू झाली. पारंपरिक पोषाख घातलेल्या वाद्य शहनाईच्या मंगलमय स्वरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक विद्यार्थ्याला गोड खाऊ, फुल देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात साजरा केला गेला. सर्व शिक्षकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा जवळ फुग्यांनी आकर्षक सजावट केली होती. शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे तिलक लावून औक्षण केले. वर्ग खोल्या छान सजवून, विविध रंगी फुगे, कार्टुन्स लावून सुशोभित केल्या होत्या. शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळ्या काढून आवार सुशोभित करण्यात आला होता. आरंभी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी लाहोटी यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले. आयोजित स्वागताचा कार्यक्रम स्कूलच्या हॉलमध्ये आयोजला होता. यावेळी पालकांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत आपल्या मुलांचे या शाळेत उत्तम भवितव्य घडेल यासाठी जैन परिवाराचे ऋण व्यक्त करण्यात आले. शाळेत सिनियर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युनिअर्सचे गाणे, नृत्य, एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून स्वागत केले. सूत्रसंचालन पल्लवी साळुंखे, हर्षा वाणी यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा संगिता पाटील सांगितली व आभरप्रदर्शन मनिषा मल्हारा यांनी केले.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेनुसार पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत व्हावे या नुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज दाडकर, रुपाली वाघ, अरविंद बडगुजर, सीमा गगवाणी, ज्ञानेश्वर सोनवणे, कोमल सलामपुरिया, योगिता सुर्वे, राजश्री कासार, भूषण खैरनार, मधु लुल्ला,पूजा पाटील, लिन्ता चौधरी,  उज्ज्वला तळेले, सुकिर्ती भालेराव यांचा सहभाग होता.

अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती 

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) – ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. अनुभूती निवासी स्कूलमध्ये “शरण संकुल” या नृत्य नाट्यांतर्गत वचननृत्य, मल्लखांब, मल्लीहग्गा या  रंजक कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशन व अनुभूती स्कूलच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, स्कूलचे प्राचार्य देबाशिस दास उपस्थित होते.

आरंभी श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उपस्थित उपरोक्त मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.  संगीत, वचन नृत्य, नाट्य या सोबतच चित्त थरारक मल्लखांब तसेच मल्लीहाग्गा यांच्या प्रात्यक्षिकांमुळे १३ जूनची सायंकाळ उपस्थितांसाठी समृद्ध झाली. श्री. तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ यांच्या अखत्यारीत असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील १२० हून अधिक विद्यार्थी – विद्यार्थीनींनी सांस्कृतिक समृद्धी व कलात्मक उत्कृष्टतेने परिपूर्ण असे अनोखे सादरीकरण केले. आरंभी ‘यक्षगान’ झाले. हा उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यांचा एक प्रसिद्ध कला प्रकार आहे. ही नृत्य आधारित कला सुरुवातीला स्थानिक शैलीत होती, परंतु नंतर ती विविध प्रकारांमध्ये मिसळली गेली. गाणे, नृत्य, वेशभूषा, भाषण आणि वाद्ये या पाच भागांचा समावेश असलेली ही कला नवरसावर आधारित आहे.

यक्ष, गंधर्व, किन्नर, किंपुरुष यांसारख्या वेशभूषा, चंदे वाजवण्याचे सूर, भगवतांचे गायन, दानवांच्या चेहऱ्यावरील हावभाव इत्यादींमुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची अनोखी ताकद या कार्यक्रमात आहे. डॉ. के शिवराम कारंथजी यांनी या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. मल्लखांब हा भारतातील सर्वात प्राचीन सांप्रदायिक खेळांपैकी एक आहे. १२ व्या शतकातील चालुक्य समत सोमदेव यांच्या ‘मनसोल्लासा’ या ग्रंथात या खेळाचा उल्लेख आहे. १९ व्या शतकात मराठा पेशव्यांच्या दरबारातील राजे पुरोहित श्रीगुरु दादा देवधर बालभट्ट यांनी हे मल्लखांब सर्वप्रथम सुरू केले. पुढे मराठी माणसांनी त्याला अधिक प्रसिद्धी दिली. मल्लीहाग्गा हा मल्लखांब प्रमाणे कसरतीचा प्रकार आहे मल्लीहाग्गा म्हणजे वरून टांगलेली दोरी. त्या दोरीवर चढून विविध आसने, चित्तथरारक कसरती सादर होतात.

शरण संकुल हा नृत्य नाटिकेतून अक्कम महादेवी,अल्लामप्रभू, बसवण्णा किंवा बसवेश्वर यांचे जीवन दर्शन घडविणारा आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला गेला. यावेळी अतुल जैन यांनी कलाकार व त्यांच्या शिक्षकांचा सत्कार केला. दीड तासाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने कलाअनुभूती घेतली.

मदन लाठी यांचे जागतिक रक्तदाता दिवशी ८८ वे रक्तदान

१४ जुन हा दिवस “जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून साजरा केला जातो , या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे आयोजित केले होते . त्यात प्रथम जिल्हाधिकारी आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे अध्यक्ष आदरणीय श्री आयुष प्रसाद सरांनी , इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष श्री गंनी मेनन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी श्री मदन रामनाथ लाठी यांनी आज आपले ८८वे रक्तदान केले
रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.

दर तीन महिन्यांनंतर डॉ च्या सल्ल्यानुसार करणारे एक नियमित रक्तदाते आहेत.
दिनांक १५ मार्च २०२४ रोजी मदन लाठी यांनी आपले ८७ वे रक्तदान पुर्ण केले. बऱ्याच दिवसांपासून ते दर तीन महिन्यांनंतर नियमित रक्तदान डॉ च्या सल्ल्यानुसार नियमित करीत आहे.

मागील रक्तदान केलेला दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस १२ डिसेंबर २०२३ सर्वांचे प्रेरणा स्थान असलेले & जैन उद्योग समुहाचे संस्थपाक आदरणीय मोठे भाऊ ( कै भवरलाल जैन ) चा ८६ वा वाढदिवस & जैन इर्रीगेशन चे सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान हा एक योग योगच म्हणावा लागेल.

आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले असून त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे याना & इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले असून त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते त्यात माहेश्वरी युवा संघटना, महाराष्ट्र & विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला होता २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनादिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते

१ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविन्द सरांचा ७६ वा वाढदिवस & मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान पुण्यात पिंपरी चिंचवड येथील शासकीय वाय सि एम मध्ये केले होते त्यावेळी राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी मदन लाठी यांचे उपक्रमाबद्दल मेल द्वारे अभिनंदन केले होते
२०१९ मध्ये आपल्या देशाचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन सर आणि महाराष्ट्र शासनाचे /राज्यातील विविध सचीव यांनी सुध्दा या उपक्रमाबद्दल अभिनंदन केलेले होते आणि करत आहेत.
असे विविध प्रसंगीं मदन लाठी रक्तदान करी असून वयाच्या ६५ वर्षापर्यंत आणि डॉ च्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत

शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी):–  भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतिलालजी जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार ११ जून २०२४ रोजी मुंबई येथील ताज लॅण्डस् एंड वांद्रे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यात जे.बी.  प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अॅप्रिसिएशन’ने गौरविण्यात आले.

ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम रहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जे.बी. प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ठ कार्य करणाऱ्या (महिला विभाग) श्रीमती शकुंतला कांतिलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे. त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न  प्लास्टिक  इंडिया  या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरवान्वित केले. योगा योगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जे.बी. प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरविण्यात आले. लघु आणि मध्यम उद्योग या विभागांतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगिरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन, वडील कांतिलालजी जैन तसेच  कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जे.बी. प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजींग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके


मुंबई/जळगाव दि. ०७ (प्रतिनिधी) – जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून 2021-22 व 2022-23 अशा दोन वर्षांसाठीचे प्लेक्स कौन्सिलचे एकूण सहा निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष अतिथी  म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते. यावेळी  प्लेक्स कौन्सिलचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, व्हॉईस चेअरमन विक्रम भदूरीया आणि उद्योजक  एम ,पी तापडिया या  मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा ग्रँड नेस्को सेंटर मुंबई येथे संपन्न झाला.
कृषी व कृषीपूरक उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत 2021-22 या वर्षासाठी जैन ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.  2022-23 या वर्षासाठी ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते  जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. एम. बऱ्हाटे, डॉ. कल्याणी मोहरीर, अतिन त्यागी आणि नरेंद्र पाटील यांनी कंपनीच्यावतीने हे पुरस्कार स्वीकारले.

भारतात प्लास्टिक उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. या क्षेत्रात अजून प्रगती करायची असेल तर संशोधन आणि विकास कार्यावर भर देणे आवश्यक आहे. महाविद्यालय, युनिर्व्हसिटीमध्ये प्लास्टिक विषयक अभ्यासक्रम सुरू करणे उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले, प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे 1955 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे 1991 पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.

कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय मोठेभाऊ अर्थात भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, “गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनच्या कार्याला अधोरेखित करून 1991 पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान असल्याचे मी मानतो.” –  अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

 जळगाव, दि. ८ प्रतिनिधी  :- अल्माटी,कझाकस्तान येथे  ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या मान्यतेने आणि कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाच्या प्रयत्नातून आयोजित या स्पर्धेत जवळपास ३५ देशांमधून ६४० खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे.

या आशिया खंडातील महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावमधून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण देवचंद ठाकरे यांना क्षेत्र पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई, वर्ल्ड ज्युनियर आणि जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम केले आहे. भारतभरातून सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून बहुमान मिळवणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

आठ, दहा, बारा, चौदा, सोळा व अठरा अशा विविध वयोगटात स्पर्धा खेळविली जाणार असून  स्विस् लिग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यांअंती अंतिम विजेते घोषित केले जातील. भारताकडून आपले खेळाडू यात सहभागी असून पदकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रवीण देवचंद ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक,संयोजक,प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात.

या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे जिल्हा संघटनेचे व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. या त्यांच्या यशासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख,पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील,जैन स्पोर्ट्सचे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अजित घारगे,नरेंद्र पाटील,संजय पाटील,यशवंत देसले,तेजस तायडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रविण ठाकरे यांना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके,कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे,नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी बी भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण

जळगाव दि. ०५ प्रतिनिधी – जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली सेनेगल व मंजरी फाऊंडेशन राजस्थान येथील पाहुण्यांच्या हस्ते जैन हिल्स परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जैन हिल्स च्या गुरूकूल पार्किंगजवळ आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. सूक्ष्मसिंचनासह प्रगत तंत्रज्ञानातून शेती बाबतचे ज्ञान घेण्यासाठी एका विशेष ट्रेनिंग जैन हिल्सच्या गुरुकूल सुरु आहे त्यात त्यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपणावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. बी. डी. जडे, राजेश आगीवाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, अशोक चौधरी, जैन इरिगेशनचे अजय काळे, मनोहर बागुल, संजय सोन्नजे, रोहित पाटील, हर्षल कुळकर्णी उपस्थित होते.

जैन फूडपार्क मध्येसुद्धा पर्यावरण दिवस साजरा केला गेला. जैन व्हॅलीमध्ये टि.यू.व्ही.नॉर्डचे ऑडिटर गिरीश ठुसे यांच्या प्रमूख उपस्थित वृक्षारोपण झाले. यावेळी सुनील गुप्ता, बालाजी हाके, वाय. जे. पाटील, जी. आर. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. फायर सेफ्टी विभागाचे कैलास सैदांणे व सहकारी पंकज लोहार, निखिल भोळे, मनोज पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.

जागतिक पर्यावरण दिन एक विशिष्ट थीम सह साजरा केला जातो – हवामान बदलापासून ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जंगलतोडीपर्यंत तात्कालिक समस्यांना लक्ष्य करून. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण’ ही आहे. वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार पृथ्वीवरील ४० टक्के जमीन खराब झाली असून त्याचा थेट फटका जगातील निम्म्या लोकसंख्येला बसत आहे. २००० पासून दुष्काळाची संख्या आणि कालावधी २९ टक्क्यांनी वाढला आहे त्यावर तातडीची उपाययोजना न केल्यास २०५० पर्यंत जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्येवर दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो,” यासाठी वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प सहकाऱ्यांनी घेतला.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कार्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे  वृक्षारोपण पोलीस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते झाले. त्यावेळी पोलीस उप अधिक्षक (गृह) मनोज पवार, राखीव पोलीस निरिक्षक संतोष सोनवणे, ट्राॅफीक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास इंगोले, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर सोळंके, पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, राजेश वाघ, कलीम काझी, पोलीस प्रशिक्षक सोपान पाटील, संतोष सुरवाडे, आशिष चौधरी, रोहिणी विष्णू थोरात, राऊंड फाॅरेस्ट ऑफिसर सोशल फाॅरेस्ट्री, जैन इरिगेशन  सिस्टिम लि चे राजेंद्र राणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी मदन लाठी, क्लीन ग्रुप जळगावचे विशाल पाटील, रवी नेटके, डॉ महेंद्र काबरा, आदित्य तोतला आदी उपस्थित होते.

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा 

जळगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) – ‘जगणे सोपे असते परंतु, आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास आपणच निमंत्रण देत असतो. जगभरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने वर्षाकाठी दीड कोटी लोकांचा आणि एकट्या भारतात १५ लाख जणांचा मृत्यू होतो. आपल्याला वाचविण्यासाठी आजच तंबाखू न खाण्याचा संकल्प करू या…’ असे अत्यंत कळकळीचे आवाहन जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक नितीन विसपुते यांनी केले. जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक पार्क आणि जैन फूडपार्क यासह सर्व आस्थापनांमध्ये ३१ मे हा जागतिक धुम्रपान निषेध व तंबाखूप विरोधी दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांशी ते सुसंवाद साधत होते.

जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथील डेमो हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी कामगार कल्याण अधिकारी किशोर बोरसे यांनी प्रास्तविक करून वक्ते नितीन विसपुते यांचे परिचय करून दिला. प्लास्टिक पार्क येथील सिक्युरिटी ऑफिसर श्री. मॅथ्यू यांनी गुटखा खाल्याचे दुष्परिणाम सोदाहरण स्पष्ट केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी गार्डन विभागाचे जुने सहकारी दगडू सीताराम पाटील यांनी आपल्या व्यसनमुक्तीचे अनुभव कथन केले.

जगभर तंबाखूजन्य पदार्थ सेवन, धुम्रपान व व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. भारतामध्ये घराघरात तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात. तंबाखू व्यसनाचे मुख्य कारण म्हणजे मोठ्यांचे लहानांनी केलेले अनुकरण होय. घरात आपले वडील,आई हे तंबाखू खातात, सिगारेट पितात त्यामुळे ते अपायकारक नाही असा समज घरातील मुलांचा होतो. घरातील आपले ज्येष्ठ हे पदार्थ सेवन करतात या अनुकरणाने हे व्यसन जडते याबाबत नमूद केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने. शुक्राणूंची संख्या कमी व क्षीण होत चालली आहे, भावी पिढी ही अशक्त जन्माला येत आहे. या समस्यांना सामोरी जावे लागत आहे.

 याच श्रुंखलेत जैन फूडपार्क येथील ओनियन ट्रेनिंग हॉल येथे सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान जैन अॅग्रिपार्क, जैन फूडपार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांना देखील नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले. ‘प्रेमाची आणि झोपेची कमी’ हेच व्यसनाधिनतेचे प्रमुख कारण आहे. स्वतःवर खूप प्रेम करा. तंबाखू सोडायचा मंत्र किंवा सिम्पल फंडा त्यांनी उपस्थितांना दिला; तो असा की, प्रत्येक एक तासाला एक ग्लास पाणी प्यावे, एक तास व्यायाम करावा आणि एक तास ध्यान करावे. या गोष्टी केल्यावर कुठलेही व्यसन सहज सुटते असा आत्मविश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि वक्ते नितीन विसपुते यांचा परिचय भूमिपुत्र संपादकीय विभागाचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी समन्वयाचे काम जैन फूडपार्क येथील मानवसंसाधन विभागाचे भिकेश जोशी यांनी केले. या कार्यक्रमास एच आर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जी.आर. पाटील एस.बी. ठाकरे, सुरक्षा विभागाचे प्रमुख आनंद बलोदी यांच्यासह जैन फूड पार्क येथील शंभरहून अधिक सहकारी उपस्थित होते.

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

जळगाव :- निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न
झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात
साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी., बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव
करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिविल सेर्विसेसचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभव स्वीकारला व स्पर्धेतील
उपविजेतेपद पटकाविले.
जैन इरिगेशनच्या महिला संघानेही उत्कृष्ठ अशी कामगिरी करतांना साखळी फेरीत बी.एस.एन.एल. आणि रिझर्व
बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत मात्र पेट्रोलियम
स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभूत होऊन चतुर्थ क्रमांक पटकावला.
पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या संदीप दिवेने अनेक नामवंत खेळाडूंचा पराभव करून ६वा क्रमांक प्राप्त
केला. ह्या गटात पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या योगेश परदेशीने अंतिम सामन्यात त्याच्याच संघाच्या के. श्रीनिवासचा
सरळ दोन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
पुरुष वयस्करगटाच्या राष्ट्रीय एकेरी स्पर्धेत जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने तेलंगाना आणि सिविल
सेर्विसेसच्या खेळाडूंचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीत कर्नाटकच्या के.ई. सुरेश
कुमारचा व उपांत्यफेरीत तामिळनाडूच्या ई. महीमईराजचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या शांतीलाल जीतिया याचा २५-२० आणि १६-१३ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी अखिल भारतीय कैरम
फेडेरेशनच्या महासचिव सौ.भारती नारायण, आंतरराष्ट्रीय कैरम महासंघाचे सचिव श्री. व्ही.डी.नारायण,तेलंगाना
कैरम असो.चे सर्वश्री संतोषकुमार,नीरज संपथी, प्रविणकुमार जी, नव्याभारती ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका
सौ. इंदिरा संतोषकुमार व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जैन इरिगेशनच्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, संचालक
श्री.अतुल जैन आणि प्रशासकीय क्रीडाधिकारी श्री.अरविंद देशपांडे व सर्व सहकार्यांनी आणि जळगाव जिल्ह्यातील
सर्व कैरम व क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे.

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची  मुलगी कु. धनश्री अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

जळगाव, दि.२७ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वीचा यंदाही १०० टक्के निकाल लागला. यात कु. धनश्री दत्तात्रय जिरेमाळी-प्रथम (९५.४०%), चि. मुकूंद सदाशिव चौधरी – द्वितीय  (९५.००%) व कु. अश्विनी समाधान हरसोडे-तृतीय  (९३.८० %), चि. आयूष दीपक जैन – चतुर्थ (९३.४०), कु. पायल सचिन सोनवणे – पाचवा (९२.००) उत्तीर्ण झालेत.

गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी अभिनंदन केले.  सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. २७ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी ९० टक्केच्यावर, १८ विद्यार्थी ८० टक्केच्यावर तर तीन विद्यार्थ्यांनी ७५ च्यावर गुणप्राप्त केले.

“अभ्यासाप्रती निष्ठा, सातत्याने केलेला अभ्यास यातून शंभर टक्के यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. परिस्थीती कशीही असो मात्र दूरदृष्टी महत्त्वाची आहे आणि हि अनुभूतीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतूक आहे.” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीचे यश – शाळेत प्रथम आलेली कु. धनश्री हिचे वडील जैन फार्मफ्रेश फूड्स लिच्या ओनियन विभागात काम करतात तसेच शिवणकामासाठी हातभार लावतात तर आई पुर्णवेळ शिवणकाम करून घराचा उदर निर्वाहासाठी मदत करतात. “भवरलालजी जैन यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या स्कूलमध्ये मुलगी संस्कारीत होत असून कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली.

एकलपालक असलेल्या मुकूंदचे यश – स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुकूंद चौधरी याची आई एकलपालक असून जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चरमध्ये काम करुन त्या आपल्या आई-वडीलांसह मुलांची जबाबदारी सांभाळतात. कटलरी साहित्य विक्री करणाऱ्या पित्याची मुलगी अश्विनी – रेल्वेमध्ये खेळणे विकणे व दारोदार कटलरीचे साहित्य विक्री करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी अश्विनीचा तृतीय क्रमांक आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत आयुष आणि पायलचे यश – आयुष जैन ह्याचे वडील दाणाबाजारात अगरबत्ती विक्री करतात तर आई शिवणकाम करते. पायल सोनवणेच्या वडीलांचा हरिविठ्ठलनगरमध्ये पानटपरीचा व्यवसाय आहे.  एकूणच सर्व विद्यार्थी हे प्रतिकूल परिस्थिती असताना, आई-वडील मेहनत करुन उदरनिर्वाह करुन या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पाठबळ दिल्याने ते घवघवीत यश संपादन करु शकले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version