बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

जळगाव दि. २१ प्रतिनिधी – श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंच्या जन्मगावी वाकोद ला असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या इयत्ता १२ वीच्या पहिल्या बॅचचा शंभर टक्के निकाल लागला. सौरभ प्रकाश देठे ७३ टक्के गुणांसह कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर राधिका दीपक काटे ७१.८३ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक, गायत्री जगदीश भगत ६८ टक्क्यांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर न जाता, गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली. या कॉलेजमधील इयत्ता १२ वी ची यंदा पहिलीच बॅच होती. विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन,  प्राचार्या रुपाली वाघ यांच्यासह शिक्षकांनी केले आहे. बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज, वाकोदला विज्ञान शाखेसाठी इयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कॉलेजला संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य रुपाली वाघ यांनी केले आहे.

‘शिक्षण हे भवितव्याची आणि भविष्याची गुंतवणूक असते.’ या मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच वाकोदला बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सेवेत आहे. विज्ञान शाखेमध्ये करिअर करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी हे कॉलेज सर्वांगीणदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरु शकेल. यंदा पहिल्याच बॅचचे सर्वच्यासर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्याचे विशेष कौतूक आहे. ’ – अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी 

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात  कंपनीच्या कन्सोलिडेटेड वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ व नफा ९१ कोटी रुपये झाला आहे.  जळगाव येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.

आर्थिक निकालाची वैशिष्ट्येः

  • वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ७.० टक्क्यांनी विक्री वाढ.

  • वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचा कन्सोलिडेटेड एबिटा  (EBITDA) १६.८ % वाढला.

  • चालू आर्थिक वर्षात एकत्रित कर पश्चात नफा हा ९१ कोटी रुपयांचा दिसतो, गत वर्षांची तुलना केली असता १२०.८ कोटी रुपये इतका तोटा होता.

  • वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचे स्टॅण्डअलोन एबिटा (EBITDA) १०.३ टक्क्यांनी वाढला.

  • वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी स्टॅण्डअलोन निव्वळ नफा (PAT) ४१.२ टक्क्यांनी वाढून तो ₹५५.५ कोटी झाला.

ऑर्डर बुक: सध्या कंपनीच्या हातात एकत्रित आधारावर, १९२५ रुपये कोटीच्या ऑर्डर्स आहेत. ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादन व्यवसायाच्या ३८३ कोटी रुपयांच्या, प्लास्टिक विभागाच्या ४७१ कोटी आणि कृषी प्रक्रिया (ऍग्रो प्रोसेसिंग) विभागाच्या १०७१ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स समाविष्ट आहेत.

कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले की,“ (क्लायमेट चेंज) हवामान बदलाला भारतासह संपूर्ण जग सामोरे जात आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. विशेषत: मूल्यवर्धित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या आव्हानांना सामोरे जात कंपनीने किरकोळ व्यवसायात २५ टक्क्यांची भरीव वाढ केली आहे. कंपनीने प्रकल्प-आधारित व्यवसाय धोरणात्मकरित्या कमी केला आणि किरकोळ आणि निर्यात बाजारांवर लक्ष केंद्रीत केले ज्यामुळे चांगला नफा कमावला आहे आणि  महसूल मिश्रण (रेव्हेन्यू मिक्स) पूर्णपणे बदलले आहे. कापसासारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. 

चालू आर्थिक वर्षात पावसाळा सामान्य असेल असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.  चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण व्यवसायावर थोडा परिणाम होऊ शकतो, तथापि, आम्ही व्यवसायाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले, आम्ही किरकोळ व्यवसाय वाढवून नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.” 

-अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव

मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन

जळगाव दि.१६ (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था, व तालुकात कृषि कार्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथ यात्रेचे उद्घाटन आज जैन हिल्स येथे कृषि पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबार तडवी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

मंगळ ग्रह मंदीर संस्थानच्यावतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, अभियंता संजय पाटील, जी. एस. चौधरी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, आर. टी. पाटील, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, सुनील गोसावी, निलेश महाजन, रवींद्र बोरसे, विशाल शर्मा, आशिष चौधरी, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमाचे महत्त्व विषद केले, तर मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहीत प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधीवत पूजन केले.

शेतकऱ्यांच्या जनजागृती रथ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील १५४ गावांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे खरीप हंगाम २०२४ पूर्वी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा खरेदी केल्या जातात. त्यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यांची फसवणूक टळावी, जागृती यावी, यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबची शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध, वास्तव माहिती प्राप्त होणार आहे.

‘भारतातील ऐतिहासिक अशा देवभूमी अमळनेर येथे मंगळ ग्रहाचे मंदीर आहे. त्या मंदीरामार्फत निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं. धर्म-ज्ञान हे तर त्यांचं क्षेत्रच आहे. ते त्यांचे प्राथमिक, मुख्य काम असले तरी समाजातील वेगवेगळ्या वर्गाला जन जागृतीच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात. थेट लोकांपर्यंत जनजागृती भिडते, त्यातून एक चांगला संदेश पोहोचतो व त्यानुसार लोक मार्गक्रमण करत असतात. त्याच कडीमध्ये आपल्या मंगळ ग्रह मंदिराच्या मार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रथ काढतात. त्या रथ यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामकाजात या ज्ञानाचा वापर करतात. जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही व उत्पादनही वाढेल. या उपक्रमात अमळनेर कृषि विभागानेही मोलाची साथ दिलेली आहे. या उपक्रमास शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षापासून या सोबत शेती आणि शेतकरी तसेच जैन इरिगेशन हे जे अतूट नाते आहे या उपक्रमात जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावे. या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती व उच्च तंत्रज्ञान ही पोहोचवू. जेणे करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक असे जैन इरिगेशनचे संस्थापक आमचे वडील भवरलालजी जैन म्हणत असत. सर्व मिळून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून या…’

  • अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.

मतदान करणाऱ्यांची विनामूल्य नेत्र तपासणी – कांताई नेत्रालयाचा उपक्रम

जळगाव दि.१३ प्रतिनिधी –  जळगावातील निमखेडी रोड वरील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी दोन दिवस नेत्रतपासणी विनामूल्य केली जाणार आहे. जळगावातील जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. १३ व १४ मे या कालावधी करिता मर्यादीत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता कांताई नेत्रालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, या संधीचा जास्तीत जास्त जळगावकरांनी लाभ घ्यावा.

सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पुर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी  आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया  कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.  कांताई नेत्रालयातर्फे विनामूल्य नेत्रतपासणीसह ‘आय केअर ऑप्टीकल’ येथे चष्मा खरेदी वर दहा टक्के सवलत ही देण्यात आली. दि. १३ रोजी मतदान केल्यापश्चात अनेक मतदारांनी या संधीचा लाभ घेतला.

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य – अशोक जैन

जळगाव दि.10 प्रतिनिधी – “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते. भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे. मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही! मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे.

मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात. देशभक्त आणि जागरुक नागरिक मतदान करतात व देशाच्या लोकशाहीला बलशाही करतात. आज जगामध्ये बऱ्याच घडामोडी होत आहेत. एक स्थिर सरकार भारतात निकडीचे आहे. भारत परत एकदा जगामध्ये अग्रेसर होण्याचा उंबरठ्यावर उभा आहे. गरज आहे भारत देशाला विकासीत आणि सुरक्षित करण्याची. सर्वांना एकत्र घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याची. देशभक्त आणि कर्तव्यदक्ष नेतृत्त्व म्हणजे आपला भारत देश सर्वदृष्ट्या सक्षम होणे. चला मतदान करुया!”  – श्री. अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

जळगाव दि. ८ प्रतिनिधी –  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वनमाळी हॉलमध्ये दिनांक ४ते ६ मे दरम्यान संपन्न  झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्सचा खेळाडू नईम अन्सारी विजयी ठरला आहे.

नईम अन्सारी याने राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विश्वविजेत्या प्रशांत मोरे चा क्वार्टर फाइनलमध्ये धक्कादायक पराभव केला. प्रशांत मोरे ने पहिला सेट २५-६ असा एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सेट नईमने अनुक्रमे २५-१७, २३-१८ असा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सेमी फाइनल मधे फ़हीम क़ाज़ी याचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरीत नईम अन्सारीने प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये जैन इरिगेशनचा अभिजीत त्रिपणकर (पुणे) याचा २/१ सेट ने पराभव करुन नईम ने राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. महिला एकरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हीचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. नईम अन्सारी सैयद मोहसीन यांचे मार्गदर्शन लाभले.

नईम अन्सारी याच्या या विजयाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह जळगाव जिल्हा कॅरम असो. आणि जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे. राधेशाम कोगटा व मंज़ूर ख़ान यांनी अभिनंदन केले.

सीआयएससीई बोर्ड १२ परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा १०० टक्के निकाल

जळगाव दि. ०६ प्रतिनिधी –  दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा दास  ९२.५० टक्के प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, याशिवाय जेईई मेन्स २०२४ च्या ऑल इंडीया रँकमध्ये देबर्णा दास हिने ५६९६ रँक प्राप्त केले आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही भविष्याशी निगडीत अनुभवाधारीत शिक्षण देणारी स्कूल आहे. सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील पहिलीच शाळा आहे. परस्परांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातात. छंद जोपासत वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रमांमध्ये कौशल्य दाखवित विद्यार्थीही यश संपादित करतात. कॉमर्स शाखेत प्रथम आलेल्या तुषार कावरे याला इंग्रजीत ९४, अर्थशास्त्र ९३, अकाऊंट ९२, वाणिज्य ९८, बिजनेस स्टडी ९३ गुण मिळाले आहेत. तर विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या देबर्णा दास हिला इंग्रजीत ९२, केमिस्ट्रीत ९१, फिजीक्स ८९, बायोलॉजी ९१, गणित ९६ गुण प्राप्त झाले आहेत.

भविष्याचे वेध घेत असताना शैक्षणिक अभ्यासक्रमासह आपल्यातील सूप्त कलागुणांना जोपासून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलचे संचालक मंडळ, श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, सौ. निशा अनिल जैन, देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

“श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकाल राखला. याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन! निसर्गरम्य वातावरण, स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची ताकद अनुभूतीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. नुकतेच एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली आणि एज्युकेशन टुडे बेंगलूर या देशातील शिक्षण क्षेत्रात नामांकित रेटिंग एजन्सींनी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक तर संपूर्ण भारतामध्ये अग्रस्थानी नामांकित केले आहे.” – श्री. अतुल जैन, अध्यक्ष, अनुभूती निवासी स्कूल

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

जळगाव दि.५ प्रतिनिधी – धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील श्री महामंडलेश्वर स्वामी लोकेशानंद महाराज सेवाश्रम या ठिकाणी पाच दिवशीय निवासी युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन  गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच डॉ. विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, सामाजिक कार्यकर्ते रतीलाल पाटील, संजय चौधरी, सुनिल चव्हाण, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करण्यात आले. स्वागत गीताने उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शिबीराच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि क्षमता विकासासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असते. विद्यार्थ्यांमध्ये मध्ये नैतीक मुल्यांची रुजवणूक करने, महात्मा गांधीजींच्या  विचारांचे संस्कार युवा पिढी होऊन,  गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर राष्ट्राची निर्मिती योगदान प्रत्येक युवकाने द्यावे, हाच या मागचा उद्देश असतो.

या प्रसंगी सरपंच डॉ.विजय पाटील यांनी विद्यार्थींशी संवाद साधला व शिबीरासाठी शुभेच्छा दिल्यात तसेच ज्येष्ट गांधीयन अब्दुल भाई यांनी श्रम संस्काराचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते गिरीष कुळकर्णी यांनी युवकांची जबाबदारी काय शिबीरातून काय शिकाल व्यक्तीमत्त्व कसे घडवावे या विषयी सोदाहरण मार्गदर्शन केले. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, मंदिर सेवेकरी किसन अंबोरे आणि शिबिरार्थी उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम अस्वार यांनी आभार मानले.

जैन हिल्स येथे फालीच्या १० व्या संम्मेलनाचा समारोप* 

जळगाव, दि. २९ (प्रतिनिधी)– ‘शेतीत नावीण्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळवू शकता. २०४७ पर्यंत भारत विकसीत देश बनेल व त्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत मोलाची भूमिका बजावेल.’ भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यातील समारोपाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बँरी, ज्या कंपन्यांनी या कार्यक्रमास सहयोग दिला त्या कंपनीचे प्रतिनिधी अजय तुरकने, सुचेत माळी(रॅलीज इंडिया), डॉ. शविंदर कुमार (महेंद्रा), मयूर राजवाडे, अजिंक्य तांदळे (यूपीएल), जयंत चॅटर्जी, प्रवीण कासट आणि राजकुमार (स्टार अॅग्री), डॉ. समीर मुरली, गौतम पात्रो (गोदरेज अॅग्रोव्हेट), डॉ. दिलीप चौधरी (अमूल) आणि जैन इरिगेशनचे डॉ. बी.के. यादव, डॉ. प्रकाश पंचभाई यांची उपस्थिती होती.

फालीच्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना अनिल जैन म्हणाले की, शेती क्षेत्रात खूप मूल्यवर्धन करण्याची संधी आहे. शेतीतून सर्वांना अन्न-धान्य प्राप्त होते परंतु सौंदर्य प्रसादने जरी बनवायचे असतील तरी त्यासाठी फळे, फुले लागत असतात. शेतीमध्ये प्रामाणिक कार्य केले तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास निर्माण करत भविष्यात तुम्हाला शेती संदर्भात काही मार्गदर्शन लागले तर जैन इरिगेशनचे तज्ज्ञ सहकार्य करतील. फालीच्या माध्यमातून तुम्ही शेतीमध्ये काम कराल ही सकारात्मक गोष्ट असल्याचे ते म्हणाले. यावेळी फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी सुसंवाद साधला. त्यांनी दहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्याच्या भाषणाचा अनुवाद फालीच्या मॅनेजर रोहिणी घाडगे यांनी केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हर्ष नौटियाल यांनी केले.

 *बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन विजेते* 

ॲग्रीकल्चरल वेस्ट इको फ्रेंडली बेस्ट, शारदा पवार विद्यानिकेतन शारदानगर, पुणे (प्रथम), डीओसी ट्रेझर-जनता गर्ल हायस्कूल शेंदुरजन घाट जि. अमरावती (द्वितीय), काऊ डंग प्रोडक्ट- सोमेश्वर विद्यालय मुढाळे जि. पुणे (तृतीय), पर्पल सेलिब्रेशन- श्री विठ्ठल माध्यमिक अँड ज्युनियर कॉलेज भिकोबानगर जि. पुणे (चौथा), व्हेजिटेबल डीहायड्रेशन (नूतन माध्यमिक विद्यालय किनगावराजा जि. बुलढाणा (पाचवा) असे विजेते ठरले व त्यांचा गौरव मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.

*नाविन्यपूर्ण इंनोव्हेशन विजेते*

सेफ्टी स्टिक – महात्मा गांधी विद्यालय आष्टा जि. सांगली (प्रथम), स्मार्ट ॲग्री स्प्रेअर- दानोली हायस्कूल दानोली जि. कोल्हापूर (द्वितीय), स्टार्टर चेंबर फॉर बिगिनर्स अँड ऑफ सिझन क्रॉप्स- जयश्री पेरिवाल इंटरनॅशनल हायस्कूल जयपूर (राजस्थान) (तृतीय), एआय बेस्ड सोलार इन्सेक्ट ट्रॅप ॲण्ड फार्म प्रॉटेक्शन सिस्टीम फॉर ॲनिमल- महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगावमाळी जि. बुलढाणा (चौथा), रेन पाईप (एचडीपीई) रॅपर- आदिवासी विकास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खजरी जि. गोंदिया (पाचवा) असे विजेते ठरले.

*संवाद, पत्रकार परिषद*

शालेय जीवनापासूनच शेती करणे कसे फायद्याचा, उत्तम व्यवसाय आहे हे समजावून देणे प्रत्यक्ष अनुभव देण्याचे काम फलीला माध्यमातून केले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून केले जात आहे. या दहा वर्षात चाळीस हजार विद्यार्थ्यां पर्यंत फालीचे काम पोहोचले आहे. या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील १७५ शाळांच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. भविष्यात २०३२ पर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे अशी माहिती फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दिली. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला. फालीचे माजी विद्यार्थ्यांनी फालीमुळे आपली प्रगती कशी झाली याबाबत अनुभव कथन केले. रोहिणी घाडगे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. पत्रकार परिषदेचे संचालन व आभार प्रदर्शन जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांनी केले. 

फाली संमेलनाचा २९ एप्रिलला समारोप

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी)– ‘प्रचंड मेहनत, उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून मनापासून केलेली शेती खूप फायदाची ठरते.’ असा सूर शेतकरी संवादात निघाला. फाली १० व्या संमेलनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी फालीच्या विद्यार्थांनी प्रगतशील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. या संवाद कार्यक्रमास ललीत चौधरी, पंकज चौधरी (वड्री), ज्ञानेश्वर हिवराळे (मांगलवाडी), अनिकेत भागवत पाटील( पिंपळगाव खुर्द. जामनेर), प्रणव महाजन (ऐनपूर),  बाळू माणिक अहिरे (आमोदा) हे शेतकरी सहभागी झाले होते.
या संवाद कार्यक्रमात जैन इरिगेशन,युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले होते त्यांच्याशी देखील फाली विद्यार्थ्यांनी मुक्तपणे संवाद साधला. फाली संमेलनात तिसऱ्या टप्यातील सकाळ सत्रात विद्यार्थ्यांनी विविध शेती प्रयोग, प्रकल्पांना भेटी दिल्या. दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम, जैन हिल्स येथे गट चर्चा झाली. यात ११ गट आणि तितकेच विषय चर्चेसाठी निवडले गेले होते. 
फाली १० व्या संमेलनाचा आज समारोप – २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी फालीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे अभय पारनेरकर, स्टार अॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, कार्बन क्रेडीटवर काम करणारी संस्था ‘वराह’ चे सीईओ मधुर जैन तसेच युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.  
सकाळ सत्रात विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे बिझनेस प्लॅन सादर होतील तर दुपार सत्रात जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले जातील. विविध प्रकारच्या या नावीण्यपूर्ण  इंहोव्हेशनचे परीक्षण करून  पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येऊन फाली संम्मेलनाचा समारोप होईल.  
जॉईन Trading Buzz
Exit mobile version