फाली १० व्या संम्मेलनाचा २५ एप्रिलपासून दुसरा टप्पा

जळगाव दि.२४ (प्रतिनिधी)-  भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमांतर्गत पहिला टप्पा २२ व २३ एप्रिलला यशस्वी झाला. आता २५ व २६ एप्रिल २०२४ दरम्यान दुसरा टप्पा जैन हिल्स येथे संपन्न होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांचा व त्यांच्या समवेत ५० फालीच्या शिक्षकांचा सहभाग राहणार असल्याचे कळविले आहे.

फाली संम्मेलनाचे हे दहावे वर्ष असून जैन इरिगेशनसह, गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचा सहयोग लाभलेला आहे. या वर्षापासून मध्यप्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच सहभाग झाला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य काही कंपन्यांकडून फालीला सौजन्य प्राप्त होणार आहे. असोसिएशन फॉर फालीचे बोर्ड मेंबर्स (सदस्य) त्यासाठी पाठपुरावा करत आहेत असे फालीचे चेअरपर्सन, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी २५ एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत क्षेत्र भेटी होतील. यात टिश्यू कल्चर लॅब, यूएचडीपी (अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्टेशन) फ्रूट डेमो प्लॉटला, फळ प्रक्रिया आणि कांदा निर्जलीकरण प्लांट, टिश्यू कल्चर पार्क आणि फ्युचर फार्मिंगला भेट देऊन आल्यावर सुप्रसिद्ध “खोज गांधीजी की” या एकमेव अद्वितीय दृक-श्राव्य संग्रहालयास विद्यार्थ्यांची भेट होईल. त्यातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचे जीवन आणि कार्य अनुभवता येऊ शकेल. जैन हिल्स येथील ठिबक सिंचन प्रात्यक्षिक व परिश्रम येथे विद्यार्थ्यांची भेट ठरलेली आहे. दुपार सत्रात सहभागी कंपन्यांचे अधिकारी व प्रयोगशील शेतकरी या दरम्यान गट चर्चा होईल. सायंकाळी ७.०० नंतर फालीचे विद्यार्थी प्रयोगशील विकसीत शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी विद्यार्थ्यांचे बिझनेस प्लॅन सादरीकरण होईल. दुपारी आकाश मैदानावर विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले जाणार असून त्यातून परीक्षक विजेत्यांची निवड करतील. या दोन्ही  प्रकारात विजेत्या ठरलेल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येऊन समापन होईल.

फालीच्या पहिल्या सत्राचा पारितोषिक देऊन समारोप

जळगाव दि.२३ (प्रतिनिधी) – ‘भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान आणि (फाली) भविष्यातील शेती नायकांची आवश्यता आहे. आपण दररोज भोजन करतो त्या शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाने कृतज्ञतेचा नमस्कार करायला हवे असे मोलाचे विचार जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले. फालीच्या पहिल्या सत्रातील बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन व इन्होंव्हेशन प्रेझन्टेशन विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी सुसंवाद साधताना तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पुण्य, पैसा आणि आशीर्वाद हे शेती व शेतीशी संबंधीत व्यवसाय केल्याने मिळतात, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचा रस्ता अडविण्यापेक्षा पाणी अडवा, कुणाची जिरविण्यापेक्षा पाणी जिरवा, तिसरी गोष्ट म्हणजे कुणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा त्यामुळे पर्यावरण आणि पर्यायाने सर्वांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतील. शेतीला व्यापार व्यवसाय या दृष्टीने बघावे म्हणते शाश्वत शेती करू शकाल. यावेळी जितके अन्न आवश्यक असेल तितकेच घेईल, अन्न वाया घालविणार नाही याची शपथही अतुल जैन यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर नॅन्सी बॅरी यांच्यासह फालीसाठी सहयोग करणाऱ्या ११ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अधिवेशनची आज पहिल्या सत्राचा समारोप झाला. यावेळी अतुल जैन बोलत होते.  जैन हिल्सच्या आकाश मैदानावर कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थित नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन, बिझनेस प्लॅनचे सादरीकरणामधील विजेत्यांना टीशर्ट, चषक, मेडल देऊन गौरविण्यात आले. अॅग्रीकल्चर एज्युकेटरचासुद्धा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महेंद्रा कंपनीचे दीपक ललवाणी, प्रॉम्प्ट कंपनीचे नरेश पाटील, ध्रुव वाघेला, आयटीसीचे सहयोग तिवारी, शैलेंद्रसिंग, स्टार अॅग्रीचे निवेश जैन,  इमरान कांचवाला, यूपीएल कंपनीचे अविनाश ठाकरे, योगेश धांडे, गोदरेज अॅग्रोवेटचे विनोद चौधरी, डॉ. आकाश, अमूलचे परेश पाटील, मौलिक कांबळे, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, किशोर रवाळे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी तर भाषा अनुवाद रोहिणी घाडगे यांनी केले. फालीच्या १० वर्षे वाटचालीबाबत व पुढील योजनांबाबत फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांनी उपस्थितांशी इंग्रजीतून संवाद साधला.

बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन विजेते  – हर्बल न्युट्रिशियस रागी, नवमहाराष्ट्र विद्यालय पंधरे पुणे (प्रथम), कार्बन फार्मिंग – एफ एम खंडेलवाल हायस्कूल शिरूड जि धुळे (द्वितीय),  ॲग्रिमजदूर मोबाईल ॲल्पिकेशन – सी एम राईस  गव्हर्नमेंट हायर सेकडरी स्कूल शिवाजी नगर इंदौर मध्यप्रदेश, (तृतीय), जन औषधी सुविधा सॅनेटरी नॅपकीन- बी. डी. आदर्श विद्यालय केलवड जि. नागपूर (चौथा), यलो ॲण्ड ब्यु स्टिकी ट्रॅप्स ( परशुराम नाईक विद्यालय बोरगावमंजू जि. अकोला (पाचवा) क्रमांकाचे विजेते ठरले.

नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन विजेते – मल्टीपर्पज फार्मिंग- न्यू इंग्लिश स्कूल फॉर मलकापूर जि. कोल्हापूर (प्रथम), सायकल स्प्रेईंग इक्विपमेंट- आचार्य गजाननराव गरुड सेकंडरी स्कूल शेंदुर्णी जि. जळगाव (द्वितीय), ऑटोमेटिक इरिगेशन सिस्टिम्स- जयदीप रेसिडेन्शीयल कळंब जि. यवतमाळ (तृतीय), फल्टीलायझर ॲप्लिकेटर – श्रीमती अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय वरेधरना जि. नाशिक (चौथा), सोलार पॅनल स्प्रेईंग मशीन- पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव बसवंत ज़ि. नाशिक (पाचवा) क्रमांकाने विजयी झाले.

विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन व बिझनेस प्लॅन सादरीकरण – दुपारच्या सत्रात जैन हिल्स येथे विद्यार्थ्यांनी बिझनेस प्लॅन व इंहोव्हेशन सादरीकरण केले. यात  भुईमूग शेंगा सोलणी यंत्र –  (नवजीवन सेकंडरी आश्रम स्कूल आंबा तांडा), इंहोव्हेटिव्ह फार्म मल्टी पर्पज मॉडेल – (गुरु दयाल सिंग राठोड सेकंडरी आश्रम स्कूल गराडा), सायकल स्प्रे इक्विपमेंट- (आचार्य गजाननराव गरुड सेकंडरी स्कूल शेंदुर्णी), फॉर्म सिक्युरिटी अलार्म-(राणीदानजी जैन सेकंडरी आणि श्रीमती कांताबाई जैन हायर सेकंडरी स्कूल वाकोद),  फर्टीलायझर एप्लीकेटर मॉडेल-(जनता विद्यालय चाटोरी), सोलर व्हेजिटेबल ड्रायर- (वसंतराव नाईक सेकंडरी आश्रम स्कूल तेलवाडी),  शेंगदाणा काढणी यंत्र- (स्वामी प्रणव आनंद सरस्वती हायस्कूल कालीमठ), फर्टीलायझर स्प्रेडर (श्रीमती राधाबाई शिंदे हायस्कूल हस्ता), फर्टीलायझर एप्लीकेटर (अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय), मल्टीपर्पज फार्म मशीन, लाईव्ह सेविंग स्टिक(छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय खेडगाव), सोलर पॅनल स्प्रेईंग मशीन (पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव बसवंत), अॅग्रीकल्चर मल्टीपर्पज इम्प्लिमेंट श्रीराम विद्यालय, मल्टीपर्पज एग्रीकल्चर बायसिकल (प्रकाश हायस्कूल मालेगाव), सोलार फेन्सिंग सिस्टीम (न्यू इंग्लिश हायस्कूल मोहपा), इलेक्ट्रिक कल्टीवेटर-(म्युन्सिपल हायस्कूल कलमेश्वर), मल्टीपर्पज कल्टीवेटर, सोलर वॉटर पंप, मॉडर्न ओनियन स्टोरेज (पीएम रुईकर ट्रस्ट हायस्कूल नांजा), व्हेंटिलेटर ओनियन स्ट्रक्चर (माणिकराव पांडे विद्यालय फालेगाव), फळ आणि भाजीपाला ड्रायर (राजापूर हायस्कूल राजापूर), एक हॅचरी मशीन, काजू हार्वेस्टर, झिरो बजेट शेण गोळा करण्याचे यंत्र, हॅन्डविडर, फर्टीलायझर डिस्ट्रीब्यूटर, शेवगा शेंग काढणी यंत्र, सीड डिबलर मशीन, फार्मस्टिक, सायकल होल, ऑटोमॅटिक ट्रॅक्टर अशा सुमारे ५८ मॉडेल्सची मांडणी जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर करण्यात आली होती.

आगम वाचना शिबीराचा समारोप

जळगाव, दि. ७ (प्रतिनिधी) – मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे.  मानवी जीवनाला प्रकाशमान करणारे ठाणांग सूत्र आगम वाचना हे पाप प्रवृत्तीपेक्षा धर्मवृत्ती ही श्रेष्ठ असल्याची शिकवण देते आणि धर्माची ताकद वाढविते, असे आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी सांगितले. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे तिन दिवसीय जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा आज समारोप झाला. यावेळी विजय रत्नसुंदरसुरीश्वरीजी महाराज साहेब श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करत होते.

या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार यांचा हृदय सत्कार गुरूदेवांच्या सान्निध्यात यावेळी करण्यात आला. हा सत्कार जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मय जैन यांनी स्वीकारला. शाल, मोत्याचा हार असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, प्रविण सिसोदिया, स्वरूप लुंकड, दिलीप गांधी, संजय गांधी यांच्यासह कौशीक संघवी, निखील कुसमगंज, प्रमोद भाई, कानजीभाई यांनी हा सत्कार केला. यावेळी सूत्रसंचालन नितीन चोपडा, संजय गांधी यांनी केले.

 ठाणांग सूत्रांचा उपयोग कसा करावा, बुद्धीगत की हृदयगत यावर विवेचन करताना आगम वाचना मधील सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मसिद्धात होय. श्रेष्ठ भावना ही मैत्र भावना ठेवावी, श्रेष्ठ व्रत अहिंसा, श्रेष्ठ दृष्टी अनेकांत दृष्टी, श्रेष्ठ भाव उपशम भाव, श्रेष्ठ रस शांत रस याचे हृदयगत आचरण करावे बुद्धीगत नाही. कुठलीही व्यक्ती, वस्तू, परिस्थिती हे आपल्याला दु:खी करत असेल, अपमानित करित असेल तर ती माझी स्वत:ची चुक आहे पुर्वभवामधील पुण्याचा प्रभाव आहे, असेच समजावे. यासाठी धर्मबिंदू आणि धर्मरत्न हे प्रकरण वाचावे असेही महाराज साहेब सांगतात. गुरू शिष्याच्या नात्यांवर भाष्य करताना प्रभू श्रीरामासारखे गुरू शिष्याचे नाते असावे. आपल्या दृष्टीला चांगली वाटणारी गोष्ट आपल्या गुरूंना चांगली वाटेल असे नाही. आगम वाचन हे जीवनातील कोच, गाईड, कॅप्टन प्रमाणे काम करतात. सत्याचा आधार धरून जीवनात परिवर्तन करण्याचे काम हे विचार करतात. यासाठी संपूर्ण वातानुकुलित असलेल्या बसच्या ड्रायव्हरला उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात, त्याच प्रमाणे गुरूंचे कार्यही असते. दिवसभरात सहा वेळा नवकार बोलण्याने सदगती प्राप्त होईल याची गॅरंटी नाही, मात्र नवकार प्रत्यक्ष आचरणात आणल्याने सदगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे विचार परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रेयस कुमट, नरेंद्र सांडेचा, दीपक राखेचा, कमलेश बोरा, राजू कावड, सागर पाटील, अमित कोठारी, किरण जैन निबजिया, निखिल शाह, सुनील शेठ, राहुल कोठारी, महिपाल निबजिया, जीतू गांधी, कुणाल निबजिया, गौरव गांधी, नरेंद्र नानेशा,  संजय कासवा, अजय मुणोत, दीपक निबजिया आदिंनी परिश्रम घेतलेत.

जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ 

जळगाव दि.५ (प्रतिनिधी) – आगम वाचना मुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी केले. जैन हिल्स येथे आयोजित आगम वाचना शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या औपचारिक उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथे होणारे हे सहावे शिबीर असून यात चारशेहून अधिक श्रावक-श्राविका सहभागी झालेले आहेत.

जळगाव येथील आकाश प्रांगण, जैन हिल्स स्थित ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ सकाळी झाला. सर्वात आधी सेवार्थी चोरडिया-जैन परिवाराच्यावतीने अशोक जैन यांनी ‘ठाणांग सूत्र’ ग्रंथ आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्याकडे सुपुर्त करून अर्पण केला. ते वाचन करण्याची विनंती केली. कार्यक्रम स्थळी या ग्रंथाची स्थापना झाली. भवरलाल आणि कांताबाई जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य सेवादास दलुभाऊ जैन, अशोक जैन, अभंग अजित जैन आणि अजय ललवाणी, स्वरुप लुंकड यांच्याहस्ते मंगलदीप प्रज्ज्वलन करण्यात येऊन याच वेळी आगम पोथीचेही विमोचन करण्यात आले. जैन हिल्स येथील आयोजिलेले हे सहावे आगम वाचना शिबीर आहे. यापूर्वी बडनगर गुजरात (२०१८), शिवपूर, गुजरात (२०१९), इंदूर, मध्यप्रदेश (२०१९), भायखाळा मुंबई महाराष्ट्र (२०२०) आणि आंमली अहमदाबाद-गुजरात (२०२२) असे पाच शिबीरे संपन्न झाले आहेत. जैन हिल्स येथे हे शिबीर आयोजनामागची भूमिका अशोक जैन यांनी आपल्या भाषणातून श्रावक-श्राविकांपुढे मांडली. उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. गायक सुजल शाह यांनी भक्तीगीते सादर केली. कार्यक्रम संपन्नतेसाठी संजय गांधी, देवांग दोशी, किरण जैन, अमित कोठारी आदींनी परिश्रम घेतले.

आगम वाचना प्रवेशात आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी ‘ठाणांग सूत्र’ मध्ये सांगितलेल्या १० सुखांबाबत सांगितले. यातील पहिले सुख हे ‘आरोग्य’ आणि दहावे सुख हे ‘मोक्ष’ सांगण्यात आले आहे. तीन दिवसांच्य वाचनात सकाळी ९ ते १२ आणि तद् नंतर गौराई प्रसादालयात सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.  दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रात वाचन आणि त्याचे निरुपण समजावून सांगण्यात येत आहे.

सकाळ सत्रात आचार्य भगवंत म्हणाले की, ‘आरोग्य’, ‘वेळ’, ‘सम्यक दर्शन’ आणि ‘उपसमभाव’ या विषयी सविस्तर विवेचन केले गेले. ‘संपत्ती’ की ‘आरोग्य’ तुम्ही कुणाला प्राधान्य द्याल? ‘ठाणांग सूत्र’मध्ये आरोग्य या सुखाला पहिले स्थान दिले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. कुपथ्य व अतिप्रवृत्ती यामुळे आरोग्य बिघडते. तुमचे वडील जे खात नव्हते ते आजची पुढी खाते. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. वेळेचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. वेळेच्या बाबत प्रमाद आणि आळस करत असतो. निंदा करू नये असे आगम मध्ये सांगितले आहे परंतु निंदा करतो त्याला प्रमाण म्हणतात. मंदिरात जाऊन देवाची स्तुती करावी असे सांगण्यात आले आहे परंतु मंदिरात न जाणे, स्तुती न करणे याला आळस म्हटले जाते. भोजन, मोबाईल, टिव्ही बघण्यात आपला अनमोल वेळ आपण व्यर्थ घालवत असतो. मिळालेला मानवजन्म अनमोल आहे वेळेच्या सदुपयोग करायला हवा असे आवाहन देखील करण्यात आले.

आगम वाचना दुपारच्या सत्रात आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज साहेबांनी क्रोध, इर्षा, कृतघ्नता आणि मिथ्या अभिनिवेश या बाबींवर ‘ठाणांग सूत्र’ आगममध्ये सांगितलेल्या बाबींवर भाष्य केले. अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबीलिटी या दोन शब्दांची सुंदर फोड करून सांगण्यात आली. जिथे अधिकार आला तिथे जबाबदारी येते. जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे सांगून ज्या कुटुंबात प्रभावशाली विचार येत नाहीत ते कुटुंब कधीही प्रभावशाली बनत नाही. बोलणे किंवा खाणे असो रसनेवर नियंत्रण मिळविले तर सर्व बाबींवर नियंत्रण मिळविले असे समजा याविषयी विचारमंथन करून खुद्द आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी उपस्थितांना प्रश्न विचारले ज्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांना पुस्तक भेट दिले गेले. जैन हिल्स येथील निसर्गरम्य स्थळी शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची जयंती साजरी

जळगाव दि. 24 प्रतिनिधी– कान्हदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जरी निरीक्षक होत्या मात्र त्यांच्या साहित्यातून त्या ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही विद्यापीठाची गरज नसते तर जीवनातील व्यवहारज्ञानातून माणूसकीचा मार्ग आपल्याला मिळतो, हाच माणूसकीचा मार्ग बहिणाईंच्या साहित्यात दिसतो. बहिणाई निसर्गाशी संवाद साधतात आणि पृथ्वीच्या आरशात स्वर्ग पाहतात हे तत्वज्ञान पुढील पिढीला माणुसकीला मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.
जुने जळगावमधील चौधरीवाड्यातील बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची 142 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी बहिणाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, खापर पणतू देवेश चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, ज्ञानेश्वर शेंडे, विजय जैन, हर्षल पाटील, अशोक चौधरी उपस्थित होते. सुदर्शन अय्यंगार व पद्माबाई चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन करण्यात आले. यावेळी मुंबईच्या निशा कोल्हे, आदिती त्रिवेदी, रिती शहा, देवेंद्र पाटील यांच्यासह चौधरी वाड्यातील परिवारातील सदस्यांनी बहिणाईंना अभिवादन केले.
पुढे बोलताना सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, अकबर बादशाह यांच्या काळातील कवि रहिम यांच्या साहित्याचा कवयित्री बहिणाईंच्या मायबोली ओव्यांमध्ये सारांश दिसतो. बहिणाईंच्या साहित्याचा तौलनिक अभ्यास विद्यार्थ्यांसह उपस्थितीत साहित्यप्रेमींसमोर उदाहरणांसह मांडला. साहित्य हे प्रवाही असते. बहिणाईंच्या साहित्यामध्ये शेतकरी महिला, तिच्या जीवनातील व्यथा दिसतात. निसर्गाशी एकरूप होऊनच आपल्याला स्वर्ग मिळतो यातूनच परमेश्वराची प्राप्ती होते. यासाठी बहिणाईंच्या ‘माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमधी उगवत’ या ओवींचा दाखला त्यांनी दिला. ज्ञान पुस्तकात नाही तर जीवनात आलेल्या अनुभवात, निरीक्षणातून विकसीत होत जाते अशा साहित्यातून बहिणाई या ज्ञानी, विचारवंत ठरतात असे प्रतिपादन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.
अनुभूती निवासी स्कूलचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेखक, साहित्यिकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे साहित्य अभ्यासले. यावेळी त्यांना मराठी शिक्षक हर्षल पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजय जैन यांनी बहिणाईंच्या साहित्यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी बहिणाईंच्या कविता सादर केला. मनपा शिक्षिका पुष्पा साळवे यांनी बहिणाईंवर स्व:लिखीत कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना ज्ञानेश्वर शेंडे यांनी केली. अशोक चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेंद्र पाटील, ललित हिवाळे, प्रशांत पाटील, दिनेश थोरवे यांनी सहकार्य केले.

जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची होणार घट

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, आणि टेमासेक-मालकीच्या रीवूलीस पीटीई लिमिटेड., सिंगापूर यांनी जैन इंटरनॅशनल ट्रेडिंग बी.व्ही. (जैन इरिगेशनची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी) आणि रीवूलीस यांच्यात निश्चित व्यवहारिक करार केला आहे. जैन इरिगेशनचा इंटरनॅशनल इरिगेशन बिझनेस (“आय.आय.बी.”) यापुढे रीवूलीसमध्ये विलीन करून जागतिक सिंचन आणि हवामान महासत्ता तयार केली जाईल, जी जगातील सगळ्यात मोठी दुसऱ्या क्रमांकाची असेल आणि ज्याचा महसूल ७५० दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयात 5800 कोटी) इतका असेल. या रोखी आणि स्टॉक व्यवहारातून पुढील गोष्टी साध्य होतील.

या व्यवहारात रोख रकमेचा उपयोग जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज ४५% ने कमी करण्यासाठी केला जाईल, ज्याद्वारे जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची घट होण्यास मदत होणार आहे. ज्यात २२५ दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयांत 1757 कोटी) पर्यंतच्या सर्व पुनर्रचित विदेशी बॉन्डचा आणि आय.आय.बी. समाविष्ट असलेल्या विदेशी ऑपरेटिंग कंपन्यांच्या संपूर्ण कर्जाचा समावेश आहे. विलीन झालेल्या संस्थेत जैन इंटरनॅशनल बिझनेस २२% ची भागीदारी कायम ठेवेल आणि राहीलेली ७८% टेमासेक कडे असेल. जैन इरिगेशनने बॉण्डधारक व आय.आय.बी कर्जदारांना दिलेली २,२७५ कोटी रुपयांची कॉर्पोरेट हमी देखील सोडवण्याची संधी जैन इरिगेशनला मिळेल. विलीन झालेल्या संस्थेसोबत जैन इरिगेशनचा दीर्घकालीन पुरवठा करार असेल. यामुळे महसूल आणि नफा वाढण्यास मदत होईल. विलीन झालेली संस्था प्रख्यात जैन ब्रँड्सचा वापर आणि प्रचार लक्षणीय उपस्थिती, मागणी, मूल्य असलेल्या मार्केट्समध्ये सुरू ठेवेल. प्रशासनाच्या दृष्टीने, कंपनीच्या संचालक मंडळावर जैन इरिगेशनचे प्रतिनिधी संचालक व निरीक्षक असतील आणि सूक्ष्म सिंचनातील त्यांच्या कौशल्याचा उपयोग कंपनीच्या वाढीस मदतीचा ठरेल. जागतिक सिंचनक्षेत्रात जैन इरिगेशन संभाव्य भावी मूल्य निर्मिती राखून ठेवेल. तसेच जैन इरिगेशन जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिंचन बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतीय व्यवसायात आणखी सुधारणा करेल. यातून व्यवसायाचा विस्तार होऊन नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल. या कराराद्वारे अलीकडील पुनर्गठनात आर्थिक संघटनांशी सहमती केल्यानुसार भारतीय व्यवसायाच्या ताळेबंदावरील कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.

विलीगीकरणाची ठळक वैशिष्ट्ये – ७५० दशलक्ष यु. एस. डॉलर्स महसूल असणाऱ्या या एकत्रिकरणाचा मार्केट विस्तार सहा महाद्वीप व ३५ देशांमध्ये नावीन्यता, डिजिटल तंत्रज्ञान व शाश्वता यावर आधारित असेल. जागतिक गुंतवणूक कंपनी टेमासेकने यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रीव्युलीस मधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले आणि मार्च २०२२ मध्ये पूर्ण मालकी स्वीकारली.
हा व्यवहार म्हणजे आंतराष्ट्रीय आणि भारताच्या ताळेबंदातील कर्ज लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी (डीलिव्हरेजिंग ऑफ बॅलेन्सशीट) आणि वेगाने वाढणाऱ्या भारतातील व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याच्या जैन इरिगेशनच्या प्रयत्नातील दुसरा टप्पा आहे.

“शाश्वत आणि प्रभावी हाय-टेक कृषी व्यवसाय निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आमच्या मूल्यांशी मिळतीजुळती मूल्ये जपणाऱ्या टेमासेक या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गुंतवणूक कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की, रीवूलीस सोबतच्या विलीनीकरणामुळे जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज होईल. भौगोलिक पाऊलखुणा, आमच्या विस्तारीत सेवा आणि उत्पादने, तसेच तांत्रिक आणि सूक्ष्म सिंचनातील कौशल्यांची जोड लाभली आहे. यामुळे पर्यावरण बदल आणि अन्न सुरक्षा आव्हानांना शाश्वत उपायांसह तोंड देण्यास, तसेच उत्पादकांसाठी पाणी कार्यक्षमता आणि उत्पादकतेसाठीच्या महत्त्वपूर्ण ज्ञान हस्तांतरणासाठी आपण सक्षम होऊ. या मूल्यवर्धित दीर्घकालीन संबंधांमुळे कृषी आणि अन्न परिसंस्थेमध्ये अर्थपूर्ण सकारात्मक प्रभाव निर्माण होईल, अशी आम्हाला अशा आहे. तसेच, टेमासेक सोबत आम्ही भावी अन्न आणि शेतीसंबंधी इएसजी, हाय-टेक कृषी इनपुट, तंत्रज्ञानातील नाविन्यता, तसेच अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या फायद्यासाठीच्या उपायांसह संयुक्तपणे सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी उत्सुक आहोत.” – अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

“जगभरातील सिंचन बाजारपेठांच्या वाढत्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या अर्थव्यवस्था आणि समर्पित, वैविध्यपूर्ण कर्मचारी पाया यांचा लाभ घेत असताना, आमच्या उत्पादक समुदायासाठी आणि एकत्रित व्यावसायिक भागीदारांप्रती असलेल्या सर्व वचनबद्धता पाळण्याची आणि त्या आणखी मजबूत करण्याची आम्ही खात्री करू. आमचे सर्व ग्राहक यापुढेही यशस्वी होतील आणि त्यांना विस्तारीत सेवा आणि उत्पादने, आघाडीचे औद्योगिक ब्रँड, विस्तारित उत्पादन क्षमता, अग्रगण्य सिंचन सेवा व्यवसायांच्या समर्थनाचा लाभ मिळत राहील, याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे. रीवूलीस कंपनीने विलीनीकरणापूर्वी चार कंपन्यांच्या संयोजनाचे प्रतिनिधित्व केले होते. या विलीनीकरणाद्वारे, जैन इरिगेशनच्या पोर्टफोलिओमधील आणखी अनेक कंपन्या जोडल्या जातील. यामुळे जगभरातील व्यवसाय एकत्र येऊन, असे जागतिक स्तरावर असे एकत्रीकरण साधण्याची आमची भूमिका अधिक मजबूत होऊन आर्थिक पाया सक्षम असलेली कंपनी निर्माण होईल. रीवूलीसच्या सर्व कर्मचाऱ्यांसह, मी जैन यू.एस.ए., ए.व्ही.आय, आय.डी.सी., आणि नानदानजैन च्या जागतिक संघांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मला खात्री आहे की आम्हा सर्वांनाच या संयुक्त संघाच्या प्रदीर्घ अनुभव, निरंतर वचनबद्धता, आणि समर्पणाचा फायदा होईल.” – रिचर्ड क्लाफोल्झ, सीईओ, रीवूलीस

एकत्रीत कंपनी म्हणजे रीवूलिस आणि जैन इरिगेशनच्या दीर्घकालीन आणि उद्देशावर आधारित कंपनी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे व्हिजन प्रतिबिंबित करते. जी कृषी सिंचनाच्या परिवर्तनाचे नेतृत्व करेल. ही कंपनी सुलभता, नावीन्यता, आणि शाश्वतता यांच्या मदतीने जागतिक स्तरावरील उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांद्वारे आधुनिक सिंचन उपाययोजना आणि डिजिटल शेतीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यात नेतृत्व करेल.

ग्राहकांद्वारे प्रेरित: कंपनीचे २५ कारखाने आणि ३,३०० कर्मचारी यांच्या मदतीने सहा खंड आणि पस्तीस देशांमध्ये अतुलनीय मार्केट कव्हरेज असेल. रिव्हुलिस, जैन, नानदान जैन आणि युरोड्रिप या ब्रँड्सवर प्रत्येक हंगामात अवलंबून असणाऱ्या उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांना कंपनी पूर्णपणे समर्थन देत राहील.

इनोव्हेशनद्वारे प्रेरित: उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांना D5000 PC, Amnon, T-Tape, Chapin, Ro-Drip, Top, Excel, Compact, 5035 आणि Mamkad यासारख्या विश्वासार्ह उद्योग ब्रँडचा समावेश असलेल्या विस्तृत उत्पादन आणि सेवा श्रुंखलेचा फायदा होईल. आठ दशकांचे संशोधन, विकास, आणि उत्पादन अभियांत्रिकीचे शाश्वत आणि नावीन्यपूर्ण एकत्रीकरण करून जागतिक उत्पादकांच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण केल्या जातील.

डिजिटलद्वारे प्रेरित: जैन लॉजिक, मॅन्ना, आणि रीलव्ह्यू सारख्या डिजिटल शेती सेवांमुले, ही कंपनी सर्वात व्यापक व्यावसायिक व्याप्ती असणारी एक कणखर एजी-टेक सोल्यूशन देणारी कंपनी म्हणून उदयास ऐल. विस्तृत डिजिटल फार्मिंग सोल्यूशन्समुळे उत्पादकांना त्यांचे सिंचन कार्य प्रत्यक्ष वेळी पूर्ण करता येईल. तसेच उत्पादन वाढवून आणि कृषी निविष्ठा कमी करता येतील. यामुळे त्यांच्या उपजीविकेत सुधार होऊन जमिनींचे संरक्षण होईल.

शाश्वततेने प्रेरित: सूक्ष्म सिंचनाच्या जलसंधारण आणि मृदा संरक्षणाच्या ज्ञात फायद्यांपलीकडे, कंपनी आपला उद्देशपूर्ण ESG प्रवास सुरू ठेवेल. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, कंपनी मूर्त स्वरूपातील कार्बन उत्सर्जन लक्ष्यांसाठी वचनबद्ध असेल आणि उत्पादकांना आणि व्यावसायिक भागीदारांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि कार्बन साठा वाढविण्यासाठी मदत करण्यासाठी जागतिक कार्यक्रम सुरू करेल. कंपनीचे उद्दिष्ट केवळ उत्पादकांसाठी सूक्ष्म सिंचन सुलभता आणि या ग्रहाचे पोषण करणे एवढेच नसून, सर्वांसाठी अधिक शाश्वत आणि हवामान संवेदनक्षम भविष्य निर्माण करणे देखील आहे.

कंपनीचे सिंगापूर आणि इस्रायल, असे दोन मुख्यालये असतील आणि कंपनीचे नाव यापुढे ही रीवूलीस पीटीई लिमिटेड असेच राहील. कॉर्पोरेट ब्रँडिंगच्या उद्देशाने कंपनीला “Rivulis (In alliance with Jain International)” असे संबोधण्यात येईल. रिचर्ड क्लाफोल्झ, रिव्हुलिसचे सध्याचे सीईओ, हेच कंपनीचे नेतृत्व करत राहतील. आय.आय.बी. चे वरिष्ठ सहकारी संपूर्ण कंपनीत नेतृत्वाची भूमिका पार पाडतील, अशी अपेक्षा आहे. हा व्यवहार आवश्यक नियामक मंजूरी आणि अन्य पारंपारिक बंद अटींच्या अधीन असेल आणि २०२३ च्या सुरुवातीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गोल्डमन सॅक्स यांनी आर्थिक सल्लागार, बेकर मॅककेन्झी कायदेशीर सल्लागार आणि पी.डब्ल्यू.सी. ने JITBV चे कर आणि कामातील स्थैर्याचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

जळगाव : जैन इरिगेशनच्या जैन हिल्स, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा त्याच प्रमाणे अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून त्या त्या लोकेशनवर योग मार्गदर्शकांनी कोरोनाचे नियम पाळत योग अभ्यास करून घेतला. योग दिनाचे महत्त्व समजून घेत नियमित योग करून निरामय आरोग्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

जैन प्लास्टीक पार्क व टिश्युकल्चर पार्क : ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन आणि दोन प्राणायम हे योग करून प्रत्येक व्यक्ती निरामय जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास योगसाधक सुभाष जाखेटे यांनी व्यक्त केला. जैन प्लास्टिक पार्क व टाकरखेडा येथे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोरसे यांनी केले. प्लास्टिक पार्कचे सुमारे ६०० हून अधिक सहकारी, टिश्युकल्चर पार्क येथील महिला सहकाऱ्यांनी देखील यात हिरीरीने सहभाग घेतला होता.

जैन फूड पार्क येथे योगसाधना शिबिर : जैन व्हॅली येथे जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अ‍ॅग्री पार्क, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सुमारे १००० सहकाऱ्यांनी जैन व्हॅली येथील मसाला प्रक्रिया प्लांट जवळ योगसाधना केली. योग प्रशिक्षक सौ. ज्योती पटेल यांनी योग प्रशिक्षण दिले. ऑक्सीजनची पातळी वाढविण्यासाठी ताडासन करून घेतले. श्वसन शक्ती वाढविण्यासाठी चंद्र व सूर्य नासिका पित्त, मयूरासन, अर्धमयूरासन, प्राणायम, सुर्यनमस्कार केले. पचनशक्तीसाठी पार्श्वोस्तासन, हात व खांद्यासाठी कुक्कुटासन, शरीर लवचिक होण्यासाठी आंजनेयासन, कंबर व पाठीसाठी भुजंगासन शलभासन, तणाव कमी करण्यासाठी अर्धचक्रासन, त्रिकोणासन, गरूडासन करून घेतले. तत्पूर्वी त्यांनी योगदिनाचे शास्त्रीय व अध्यात्मिक महत्त्व ज्योती पटेल यांनी समजून सांगितले. जैन टिश्यूकल्चर पार्कच्या वरिष्ठ सहकारी सौ. अनिता यादव यांच्याहस्ते सूतीहार देऊन ज्योती पटेल यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. व्ही. आर. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रमोद करोले, बालाजी हाके, अरविंद कडू, रोशन शहा, संजय पारख, असलम देशपांडे, उदय महाजन, नितीन चोपडा यांसह इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी मानव संसाधन व कार्मिक विभागाच्या जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, आर. डी. पाटील, भिकेश जोशी व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभले तसेच ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

अनुभूती निवासी स्कूल व अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल : अनुभूती इंटरनॅशन निवासी स्कूल येथे इयत्ता 5 वी ते 12 च्या संपूर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकतेर कर्मचाऱ्यांनी योगसाधना केली. योगशिक्षीका डॉ. स्नेहल पाटील यांनी विविध योगासने करून घेतली. योग एक जीवनशैली यावर मार्गदर्शनही डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार योगदिन साजरा करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील योग दिवस साजरा झाला.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version