भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

जळगाव, दि. 2- साधन, साध्य, सुचिता, वैश्विकवृत्ती, सेवाभाव हे संस्कार महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांचे, वैश्विकता असलेल्या विचारांवर आपण आचरण केले तर खऱ्या अर्थाने त्यांची जयंती सार्थक होईल असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधीजींची१५४ वी जयंती, लाल बहादूर शास्त्रीजींची ११९ वी जयंती व चरखा जयंती निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात काढण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर गुजरात विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, संघपती दलिचंद जैन, आमदार लता सोनवणे, सौ. स्वाती धर्माधिकारी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, महापौर जयश्री महाजन, सौ. ज्योती जैन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पंजाब फरीदकोट येथील बजीतसिंग तसेच सर्व धर्मगुरू जैन समणीजी सुधाजी, सुयोगनिधी, सुगमनिधीजी, डॉ. सुयश निधीजी, हाफिज अब्दुल रहीम नासिर पटेल, गेव दरबारी, विश्वनाथ जोशी उपस्थित होते.

लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून या अहिंसा सद्भावना शांति यात्रेची सुरुवात झाली. याप्रसंगी मान्यवारांच्याहस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. अहिंसा सद्भावना शांती यात्रेस माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखविली. यात्रेमध्ये वरील मान्यवरांसह कुलगुरू डॉ. एल. व्ही. माहेश्वरी, डॉ. सुभाष चौधरी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन परिवारातील सर्व सदस्य, शहरातील प्रशासकीय अधिकारी, मनपा नगरसेवक, लोकप्रतिनिधी, शहरातील मान्यवर, जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांसह शहरातील अनुभूती स्कूल, ए.टी. झांबरे, सेंट टेरेसा, विवेकानंद प्रतिष्ठान, आर आर विद्यालय, प. न. लुंकड कन्या विद्यालय, या. दे. पाटील, श्रीराम विद्यालय, स्वामी समर्थ, गुळवे स्कूल, ला.ना. स्कूल, आर. आर. विद्यालय यासह विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही यात्रा लालबहादूर शास्त्री टॉवरपासून निघून, म.न.पा इमारतीचे सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गाने महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. या यात्रेत गांधीजींच्या जीवनातील बदलत जाणाऱ्या वेशभुषेच्या माध्यमातून ‘मोहन ते महात्मा’ असा प्रवास दाखविणारा सुंदर चित्ररथ, तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रतिकात्मक तिरंगा यात्रेत लक्षवेधी ठरत होता. शांती यात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.

 

उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर यात्रेतील सर्व सहभागींसोबत गांधी उद्यानातील ओपन सभागृहात विश्व अहिंसा दिनानिमित्त मा. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी संबोधन केले. उद्योग, राजकारण, प्रशासन यासह सर्वच क्षेत्रात महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या विश्वस्तवृत्ती प्रमाणे आपण सर्वांनी आचरण केले पाहिजे. कार्य हे प्रादेशिक असले तरी त्याची व्याप्ती वैश्विक असावी, हा महत्त्वाचा संस्कार महात्मा गांधीजींचा आहे. दोघंही महापुरूषांचे चरित्र आजच्या काळात देखील खूप आदर्श व मार्गदर्शक ठरणारे आहे. न्याय व संविधानातसुध्दा गांधी विचार आहे. साधन व साध्य शुद्ध ठेवायला हवे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ट्रस्टशिप जपलेली आहे असे ठरेल, असे विचार माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. हा देश सांभाळायचा असेल तर प्रत्येकांशी प्रेमाने वागावे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी जैन इरिगेशनच्या माध्यमातून जय किसान हा नारा खऱ्या अर्थाने सत्यात उतरविला आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये येथे खूप मोठे कार्य होत आहे असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी भाषणामध्ये केला. आपण सर्वांनी निर्भय राहावे आणि घृणा करायची नाही. प्रेमात खूप मोठी ताकद आहे त्यामुळे आपण प्रेमाने राहावे व निर्भय बनावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

जैन समणी डॉ. सुयशनिधीजी यांनी देखील उपस्थिततांशी संवाद साधला त्यांनी अहिंसा या विषयावर प्रकाश झोत टाकला.अहिंसेचे महत्त्व सांगितले. निषेधात्मक व विधायकत्मक अहिंसेचे आचरण करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे मंचावर आगमनवेळीच श्री. अशोकभाऊ व सौ. ज्योतीभाभी जैन यांच्या हस्ते सुती हाराने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. उपस्थित सर्वांनी सर्वधर्म प्रार्थना म्हटली गेली. विवेकानंद संगित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो…’ हे भजन सादर केले. मान्यरांच्या हस्ते गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमा प्राप्त विद्यार्थ्यांना तसेच जीआरएफ प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. सुदर्शन अय्यंगार यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथ दिली. प्रास्ताविक डॉ. अश्विन झाला यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. रिती शहा यांनी आभार मानले.

चरखा जयंतीनिमित्त अखंड सूतकताई
महात्मा गांधी जयंती चरखा जयंती म्हणूनही साजरी केली जाते. त्यानिमित्ताने गांधीतीर्थ मधील सहकाऱ्यांनी कार्यक्रमात पुर्णवेळ चरख्यावर सुतकताई केली. याशिवाय गांधी तीर्थ येथे दिवसभर अखंड सुतकताई करण्यात आली. यामधे गांधी तीर्थ येथे भेट देणाऱ्या अभ्यागतांनी व विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला.

तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

जळगाव दि ०२- ‘मि सुद्धा खेळाडु असुन तायक्वांदो संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. तायक्वांदो खेळातील जो गैर प्रकार निदर्शनास येत आहे तो लवकरच शासकीय स्तरावर संपवू आणि खेळाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून पुढचे पाऊले उचलु’ असा विश्वास तायक्वांदो राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दुसर्‍या राजस्तरिय पंच परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी दिला.

जळगाव येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ची दुसरी राजस्तर पंच परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेसाठी राज्यातून २८ जिल्ह्यातील ३९७ पंचांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. गिरीश महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन समुहाचे संचालक श्री अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलींद दिक्षीत, तायक्वांदो फेडेरेशन चे उपाध्यक्ष श्री विनायक गायकवाड, ताम चे महासचिव मिलींद पठारे, शिव छञपती पुरस्कर्ते प्रविण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कर्रा, अजित घारगे यांची उपस्थित होते.

ना. गिरीष महाजन पुढे बोलताना म्हणाले कि मि लहानपणापासून खेळाडु आहे. आजही मि मैदानावर घाम गाळतो. माझ्याकडे क्रीडा खाते आल्यावर पहिली बैठक घेतली आणि विचारणा केली त्यात खेळाडुंची खुप प्रश्न मागे पडले होते त्यावर तात्काळ अंमलबजावणी करत २०० रुपयाचा भत्ता ४८०रु केला एन सी सी चा १० रुपयाचा भत्ता १०० केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विजेत्या खेळाडुंना २० लक्ष पासून ५० लक्षापर्यंतची बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. असे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे ते सांगत होते. पंचांनी खेळाडुवर कोणताही अन्याय न होऊ देता निष्पक्षपाती काम करावे आणि देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु पुरवावे असेही यावेळी त्यांनी नमुद केले आहे.
या सेमिनार चे आयोजन जळगाव तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री अजित घारगे यांच्या प्रयत्नातून झाले असुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश घारगे, जयेश बावीस्कर ललित पाटील, रविंद्र धर्माधिकारी, अरविंद देशपांडे, सौरभ चौबे, ॠशीकेश खारोळे, आकाश बाविस्कर, निकेतन खोडके, विष्णु झालटे, सारिपुत्त घेटे, तृप्ती तायडे, प्रिती घोडेस्वार, विशाल बेलदार, सिद्धांत पाटील, पुष्पक महाजन, जयेश कासार, श्रेयांक खेकारे, जिवन महाजन यांनी प्रयत्न केले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री दुलिचंद मेश्राम यांनी सुत्रसंचलन श्री नेताजी जाधव यांनी केले तर आभार व्यंकटेश कर्रा यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमत्त अहिंसा सद् भावना शांती यात्रेचे आयोजन

जळगाव दि.३० – महात्मा गांधी यांच्या जन्म दिवस विश्व अहिंसा दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सालाबादाप्रमाणे अहिंसा सदभावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधीजींची१५४ वी जयंती व लाल बहादूर शास्त्रीजींची ११९ वी जयंती निमित्ताने आयोजित अहिंसा सद् भावना शांती यात्रा २ आॕक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टाॕवरपासून निघून सरदार वल्लभभाई पटेल टाॕवर म.न.पा. मार्गे पंडीत जवाहरलाल नेहरू चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गाने महात्मा गांधी उद्यानात यात्रा पोहचेल. त्यानंतर महात्मा गांधी उद्यानात विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी प्रमुख वक्ते म्हणून संबोधन करतील तर अध्यक्ष म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डाॕ. सुदर्शन अय्यंगार असतील ते यावेळी उपस्थितीतांना अहिंसेची शपथ देतील. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अहिंसा सद् भावना यात्रेत सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

जळगाव दि. २९  – भारतातील कृषिक्षेत्राला भविष्य असून जवळपास १२ कोटी हून अधिक शेतकरी योगदान देत आहे. यातील ८० लाखाच्यावर शेतकऱ्यांपर्यत कंपनीचे तंत्रज्ञान, उत्पादने पोहचलेले आहे. येणाऱ्या काळात शाश्वत शेतीसाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि क्रांती अनुसंधान आणि विकास घडवून आणायचा आहे. त्यासाठी पाणी बचतीसह हवामानातील बदलांवर तग धरणारे आधुनिक उच्च कृषि तंत्रज्ञान देशातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायचे आहे. यासाठी नवीन व्यवसाय मॉडेल विकसीत करू असा आत्मविश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनिल जैन बोलत होते. बांभोरी येथील प्लास्टिक पार्कच्या प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणावर झालेल्या सभेच्या व्यासपीठावर अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, सहव्यवस्थापकिय संचालक व चिफ फायनन्शिअल ऑफिसर अतुल जैन, संचालक डी. आर. मेहता, डॉ. एच. पी. सिंग, घनश्याम दास तसेच जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य दलिचंद जैन आणि जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन उपस्थित होते. तसेच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कंपनीचे अन्य संचालक व सेक्रेटरी ए. व्ही. घोडगावकर व ऑडिटर्स उपस्थित होते.

सुरवातीला गत वर्षात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सभेचे कामकाज सुरू केले. आरंभी सभेतील महत्त्वाच्या विषयांना सर्वांनूमते मंजूरी देण्यात आली. त्यानंतर डी. आर मेहता यांनी संचालक मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यात ते म्हणाले, ‘जैन इरिगेशन कंपनीने विज्ञानासोबत कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविले आहे. जागितक कठीण परिस्थितीही भागधारक, सहकारी, वितरक, बॅंक व हितचिंतक कंपनीच्या पाठीशी एकजूटीने उभे राहिले. सर्वांच्या सहकार्य आणि विश्वासामुळे पूर्वीपेक्षाही कंपनी अधिक प्रगती करेल असा विश्वास डी. आर. मेहता यांनी व्यक्त केला.’

अनिल जैन यांनी कंपनीचा ताळेबंद सादर केला. आव्हानात्मक परिस्थितीत ही कंपनीने ऑपरेटिंग लिव्हरेज वाढवणे, खर्चाचे योग्य व्यवस्थापनामुळे एकत्रित महसूलात २६ टक्क्यांची वाढ झालेली आहे. कंपनीच्या स्तरावर व जागतिक स्तरावर कंपनीची आर्थिक वाटचाल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील शाश्वत भविष्यासाठी पाण्याची बचत महत्त्वाची आहे यासाठी कंपनीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवे उत्पादन विकसीत केले आहे याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. ‘हवामानातील बदल हे शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे त्याला उत्तर फक्त जैन तंत्रज्ञान आहे’ असेही अनिल जैन म्हणाले. सिंगापूर येथील टेमासेकच्या रिव्हूलिस कंपनी सोबत आंतरराष्ट्रीय एकत्रिकरणामुळे २६०० कोटी रूपयांचे कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे, असा विश्वास अनिल जैन यांनी व्यक्त केला.

गत तीन वर्षाच्या आव्हानात्मक काळात सामाजिक आणि आरोग्य विषयक काळजी याबद्दल कंपनी व कंपनीच्या सेवाभावी संस्था गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले गेले आणि राबिविले जात आहेत असे आवर्जून सांगितले. सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला. यावेळी अनुभूती निवासी स्कूल व रायसोनी कॉलेजचे विद्यार्थ्यांनी कंपनीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेच्या कामकाजाचा अनुभूव घेतला. मुंबई येथून स्क्रुटनीझर अम्रिता नौटियाल ह्या देखील उपस्थित होत्या.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव दि.25– गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंतीच्यानिमित्ताने ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ या गांधीजींचे जीवन कार्य व भारतीय स्वातंत्र्य या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज शहरातील अनुभूती शाळेत प्राथमिक चाचणी घेण्यात आली. वस्तुनिष्ठ स्वरूपातील ४५ प्रश्नांची हि लेखी परीक्षा होती. यासाठी ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. शाळांमधील सर्वाधिक गुण मिळविणा-या दोन पात्र विद्यार्थ्यांची दुसऱ्या मौखिक फेरीसाठी निवड करण्यात आली. दि. १ ऑक्टोबर ला कांताई सभागृहात दुपारी ३ वाजता हि मौखिक फेरी होईल. यातील पाच संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम फेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. मौखिक फेऱ्यांवेळी उपस्थितांनाही प्रश्न विचारण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नितीन चोपडा, निलेश पाटील, तुषार बुंदे, शुभम पवार, नितीन मघडे, आचल चौधरी, जयश्री देशमुख, आकाश थिटे, तन्मय मंडल, योगेश देसाई यांनी सहकार्य केले.

दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेली विद्यार्थी
कुंदन भदाणे, कार्तिक साळुंखे (स्वामी समर्थ विद्यालय), दिव्या गोसावी, हेमंत निकम (या. दे. पाटील विद्यालय), रितीशा देवरे, कृष्णगिरी गोसावी (ए. टी. झांबरे विद्यालय), पूजा शर्मा, दृष्टी महाजन (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), कृपाली पाटील, सोहम पाटील (का. ऊ. कोल्हे विद्यालय), नकुल पाटील, धनश्री वखरे (ब. गो. शानबाग विद्यालय), अथर्व लाड, श्रद्धा महाजन (सेंट टेरेसा), दिव्यांशी पात्रा, अर्णव चौधरी (काशिनाथ पलोड), तेजस्विनी पाटील, अंजली पाटील (प. न. लुंकड कन्या शाळा), मयुरी सोनवणे, रुपाली भोई (पी. के. गुळवे विद्यालय)

गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

जळगाव दि. २०– ग्रामविकासामध्ये ग्रामपंचायतीचे महत्त्व खूप आहे त्याचे अधिकार समजून घेताना सरपंचांनी आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या समजून घेतले पाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करता येऊ शकतो यासाठी रचनात्मक कार्य केले पाहिजे, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सुरू असलेल्या यशदाच्या सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीर सरपंचांनी मोलाचे मार्गदर्शक ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले.

यशदा प्रशिक्षण केंद्रातर्फे सुरू दि.20 ते 23 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या निवासी सरपंच प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अनिकेत पाटील बोलत होते. दीप्रज्वलनाने सुरवात झाले. अनिकेत पाटील यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, यशदा सत्र समन्वयक कल्पना पाटील, यशदा प्रविण प्रशिक्षक अशोक पाटील, पीआरटीसी खरोदा सेवानिवृत्त प्राचार्य रमेश चौधरी उपस्थित होते.

जागतिक संघटना युनोने शाश्वत विकासासाठी १७ संकल्पांसह २०३० पर्यंत कार्य करण्याचे ठरविले असून यात १९४ देशांनी सहभाग घेतला आहे. त्या संकल्पना, ध्येयांविषयी जनजागृतीसाठी भारताने नऊ विकासात्मक संकल्पनांवर काम सुरू केले असून यातील कमीत कमी तीन संकल्पांवर कृतिशील काम करून गावागावांमध्ये विकासगंगा पोहचविण्याचे ध्येय निश्चिती केले आहे. यानुसार पुणे यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ शेड्डी, सत्रसंचालक दत्तात्रय पोहरे यांच्या मार्गदर्शनानुसार गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चाळिसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, चोपडा या तालुक्यातील सुमारे ३० च्यावर सरपंचांनी सहभाग घेतला. गांधीजींचा विचार हा ग्रामविकासाच महत्त्वाचा केंद्र आहे त्यानुसार हे प्रशिक्षण प्रासंगिक असल्याचे नितीन चोपडा यांनी सांगितले. आज रमेश चौधरी यांनी ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामसभेसह सर्वसभा, ग्रामपंचायत पंचाग, दफ्तरांच्या नोंदी १ ते ३३ नमुने यावर मार्गदर्शन केले. अशोक पाटील यांनी लेखासंहिता, अंदाजपत्रक, लेखा परिक्षण, आर्थिक नियोजन, ताळेबंद यासह महत्त्वाच्या नोंदी यावर मार्गदर्शन केले. कल्पना पाटील यांनी खेळ दोन पाऊल पुढे दोन पाऊल मागे यातून रंजकपद्धतीने एसडीजी थीमने गावातील वंचित घटकांना सोबत घेऊन शाश्वत विकास कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले. प्रस्तावना व आभार कल्पना पाटील यांनी मानले.

जळगांव जिल्हा ११ व १३ वर्षाआतील मुला – मुलींची जिल्हा बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धाचे उद्या दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन

विजेत्यांची निवड राज्य स्पर्धेसाठी होणार

जळगांव: नागपुर येथे दि २ ते ४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान होणाऱ्या १३ वर्ष वयोगटातील मुले व मुली राज्य निवड बुध्दिबळ स्पर्धेत आयोजन केले आहे तसेच ११ वर्षाआतील राज्य स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहेत.

राज्य स्पर्धेसाठी AICF चे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे या स्पर्धेकरिता जिल्हा बुध्दिबळ संघटनेतर्फे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन उद्या रविवार दि १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ,जिल्हा पेठ जळगांव येथे खेळाडुची बुध्दिबळ निवड चाचणी ठेवली असुन यामध्ये ११ व १३ वर्ष वयोगटात प्रथम २ मुले व २ मुली यांची निवड करून त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय नागपूर व रत्नागिरी येथे होणाऱ्या बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.

३ ते ५ क्रमांकाच्या खेळाडूंना मुले व मुली गटात मेडल देउन गौरविण्यात येईल. या स्पर्धेत बक्षीस स्वरूपात राज्य स्पर्धेची प्रवेश फी व चषक देण्यात येईल. या स्पर्धेत फक्त जळगांव जिल्हातील खेळाडु खेळू शकतात. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी खेळाडूंनी प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जळगांव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादीया व पदाधिकारी यांनी केले आहे.

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी)– भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना खुद्द महात्मा गांधीजींनी एक सायकल भेट दिलेली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जाज्वल्य आठवण व संदर्भ म्हणून जळगाव येथील गांधीतीर्थ बघणाऱ्या अभ्यागतांसाठी ही सायकल खूप मोलाची ठरेल यात शंका नाही.


स्वातंत्र्य सेनानी प्रभुदयालजी यांच्या पत्नी तथा माजी आमदार श्रीमती कमला साहनी आणि त्यांची मुलगी अमिया रूंगठा यांनी ही सायकल महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या सांगण्यावरून सायकल गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री. सुभाष साळुंखे यांच्याकडे दिली व आज सकाळी ती सायकल जळगाव येथे आणली गेली. महात्मा गांधीजींच्या परिस स्पर्शाने आठवणींचे सोने झालेली ही सायकल गांधी तीर्थमध्ये लवकरच संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
असा आहे सायकलीचा इतिहास…
स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधीजींच्या वक्तृत्वाने अबालवृद्ध भारावले जात. त्यातील जोगिया उदयपूर निवासी स्वातंत्र्यता सेनानी स्व. प्रभूदयाल विद्यार्थी यांची स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोलाची भूमिका होती. 1935 मध्ये ते केवळ 10 वर्षांचे असताना महात्मा गांधीजींचे शिष्य ठक्करबाप्पा यांच्यासोबत ते गांधीजींना सेवाग्राम येथे प्रथम भेटले. त्यावेळी महात्मा गांधींनी कस्तुरबा यांना प्रभुदयाल यांचा परिचय देताना म्हणाले होते की, हा तुझा सहावा मुलगा आहे. पुढील 14 वर्षे त्यांनी सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यामधे सहभाग घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रभूदयालजी यांना आपल्या गावी जावून जनसेवा करण्यासाठी गांधीजींनी प्रोत्साहीत केले. या कार्यात त्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी त्यांनी जी सायकल भेट दिली, ती हीच सायकल आहे. महात्मा गांधींकडून भेट म्हणून मिळालेली ही सायकल सुरुवातीला सेवाग्राममधे वापरली गेली. नंतर ही सेवाग्रामहून प्रभुदयालजी विद्यार्थींसोबत त्यांच्या उत्तरप्रदेशातील जोगिया गावी आली. तेथे स्वातंत्र्यानंतर जमिन कमाल मर्यादा कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जमिन वितरण आणि तत्सम इतर सामाजिक व रचनात्मक कार्यासाठी हीचा त्यांनी वापर केला. त्यांच्या याच कार्यामुळे ते ‘पूर्वांचलचे गांधी’ म्हणून ओळखले जायचे. याच सायकलवर फिरून त्यांनी 5 वेळा तेथे आमदारही झाले. महात्मा गांधी आणि प्रभुदयाल विद्यार्थी यांची हीच विरासत असलेली सायकल स्वरुपात गांधी तीर्थ येथील संग्राहलयात संरक्षित करण्यात येणार आहे.
सायकल म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा स्मृतिसुगंध- अशोक जैन
महात्मा गांधीजींच्या स्मृतिंचा सुगंध असलेल्या या सायकलीचे गांधीतीर्थ येथील अस्तित्व सुयोग्य असेच ठरणार आहे. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी या सायकलीबाबत सांगितले असता या सायकलीबाबत उत्कंठा लागलेली होती. स्वातंत्र्य सैनिक प्रभुदयालजी यांच्या परिवाराने ही सायकल गांधीतीर्थला सुपुर्द केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया गांधीतीर्थचे विश्वस्त अशोक जैन यांनी दिली.

जळगावचे कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना’फायनेक्स्ट- २०२२’ मध्ये पुरस्कार

जळगाव दि. 12 प्रतिनिधी– मध्यप्रदेशातील भोपाळ येथील यशस्विनी शिक्षा संस्थानच्या ” फायनेक्स्ट ॲवॉर्ड ॲण्ड इंटरनॅशनल एक्जीबीशन ऑफ मिनी आर्टवर्क-२०२२” मध्ये मानाचा श्री. एस. के. बाकरे इंटरनॅशनल ॲवॉर्ड जळगाव जिल्ह्यातील चित्रकार राजू बाविस्कर यांना तर जैन इरिगेशनमधील कला विभागातील सहकारी विजय जैन यांना ‘हायली रेकेमेंडेड ॲवॉर्ड’ जाहीर झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रदर्शनात जैन इरिगेशनमधील कला विभागातील सहकारी विकास मल्हारा आणि आनंद पाटील यांचे पेंटिंग्जसुध्दा प्रदर्शित करण्यात आली आहेत.


राजू बाविस्कर यांच्या चित्रांची ललित कला अकादमीने दखल घेतली असून त्यांच्या चित्रांना बॉम्बे आर्ट सोसायटी, ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी, कॅम्लिन आणि साऊथ सेंट्रल झोन यांचे पुरस्कार मिळाले आहेत.
विजय जैन यांच्या चित्रांची दोन वेळा ललित कला अकादमी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, टागोर नॅशनल प्रदर्शन, भारत भवन, राज्य कला संचालनालय मुंबई यांनी दखल घेतली असून ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटी चा २०२२ चा पुरस्कार मिळाला आहे.
देश विदशातून आलेल्या शेकडो पेंटिंग्ज, शिल्प, ड्रॉइंग, ग्राफिक्स आणि फोटोज् मधून निवडक कलाकृती मधून १४ कलाकृतींना गौरवण्यात आले आहे.
२१ सप्टेंबर पर्यंत इंदोर मधील कॅनेरिज फाइन आर्ट गॅलरी मधे चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळा १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडणार आहे.
खानदेशातील चित्रकलेतील या कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक जैन, परिवर्तनचे अध्यक्ष श्री शंभू पाटील यांच्यासह कलाक्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चित्रकारांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. व्ही. आर. कुलकर्णी यांचे वृध्दापकाळाने ठाणे येथे निधन

जळगाव दि.11 प्रतिनिधी – धरणगाव येथील प्रतिथयश , नामांकित फॅमिली डॉक्टर व्ही. आर. कुलकर्णी ( वय 89 ) यांचे वृध्दापकाळाने ठाणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ठाणे येथील विवेक व अतुल कुलकर्णी ही दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते ओरियन शाळेतील शिक्षिका धनश्री नांदेडकर यांचे वडील तर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी चंद्रवदन नांदेडकर यांचे सासरे होत.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version