अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि.२० (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावला. ‘स्वतः केले मग सांगितले…’ या उक्तीप्रमाणे मतदानाचे महत्व पटवून देणे, नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जैन परिवाराने सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी आपले मतदान केले.

जैन परिवारातील सदस्यांचे मतदान एम.जे. कॉलेज जवळील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रात होते. त्यांनी मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदान करून भाग घेतला. जैन परिवारातील अशोक जैन, सौ. ज्योती जैन, आरोही जैन, अजित जैन, सौ. शोभना जैन, अतुल जैन व डॉ. भावना जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कांताई नेत्रालयाचा उपक्रम – मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

जळगाव दि.१८ प्रतिनिधी –  शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. २१ नोव्हेंबर २०२४ पुरतीच मर्यादीत असेल. सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी कांताई नेत्रालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, या संधीचा जास्तीत जास्त जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कांताई नेत्रालयातर्फे यापूर्वी महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीच्यावेळी देखील अशी सवलत देण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला होता.

सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया  कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

जळगाव/मुंबई दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने राऊट मोबाईल लि.संघावर विजय मिळवित क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कॉर्पोरेट क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजन मध्ये रोमांचकारी सामान्यात विजय मिळविला. जैन इरिगेशनचा संघ ‘ए’ डिव्हीजन मध्ये मागील वर्षी टाईम्स शिल्ड स्पर्धेचा विजयी संघ असून कॉरपोरेट स्पर्धा जिंकून जैन इरिगेशनच्या संघाने कॉर्पोरेट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.

मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामान्यात नाणेफेक राऊट मोबाईल लि. ने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या जैन इरिगेशनच्या संघाने निर्धारित २० षटकात सहा फलंदाजांच्या मोबदल्यात २१८ धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये जय बिस्टाने ५४ चेंडूमध्ये ८५ धावा कुठल्यात. यात सहा चौकार व पाच षटकारांचा आतषबाजी होती. त्याला शाश्वत जगताप ने चांगली साथ दिली. दोघांना प्रथम विकेट साठी ८.१ ओव्हर मध्ये ११३ धावांची भागिदारी रचली. त्याला आयुष झिमरने २१ चेंडूमध्ये ४५ धावा करत उत्कृष्ट साथ दिली. आयुष झिमरे ने तीन चौकार व चार षटकार खेचले. २१८ धावांचे लक्ष्य घेतलेल्या राऊंट मोबाईल लि.चा संघ  निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात २०८ धावा करु शकला.  यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. संघातील गोलंदाज प्रशांत सोलंकी यांने ३७ धावांच्या मोबादल्यात तीन फलंदाजांना महत्त्वाच्या वेळी बाद केले. जगदीश झोपे यानेसुद्धा ३४ धावांत तीन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

तत्पूर्वी सेमिफायनला मुंबई कस्टमने निर्धारित २० षटकांमध्ये केलेल्या २४४ धावांचा यशस्वी पाठलाग करत अवघ्या १८ ओव्हर मध्ये २४७ धावा करत आठ विकेटने विजय मिळविला होता. यामध्ये जय बिस्टा याने नाबाद १३५ रनांची खेळी विक्रमी ठरली. यात शाश्वत जगताप ४४ (२१ चेंडू), साईराज पाटील ३४ (१७ चेंडू), सुरज शिंदे २९ (१२ चेंडू) योगदान होते. तर गोलंदाजीमध्ये जगदीश झोपे व सोहम याने प्रत्येकी एक विकेट घेऊन विजयामध्ये मोलाची साथ दिली.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघात शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांम्वेकर, आयुष झिमरे या खेळाडूंचा सहभाग होता.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, मुंबई क्रिकेट संघाचे संयोजक मयंक पारिख, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

‘एपिक’ फोटो प्रदर्शनाची सुरवात – चित्रांचा संग्रह जळगावकरांसाठी प्रेरणादायी!

जळगाव दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शन पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये आज दि. १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आयोजीत केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत सोडून व दीपप्रज्वलनाद्वारे झाले. याप्रसंगी शकुंतला चावला, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, तुषार बुंदे, सौ. अश्विनी बुंदे, जैन इरिगेशनचे जगदिश चावला, योगेश संधानशिवे, मायरा लोटवाला यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या प्रदर्शनित मायरा लोटवाला यांच्या अनोख्या दोन म्युरल पेटिंग बघता येतील.

 या प्रदर्शनातन ४१ समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव आदी विविध विषयांचा समावेश आहे. जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या सोबतचे क्षण, आठवणी, उत्कृष्ट नमुन्याद्वारे प्रदर्शनात बघता येईल. प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक आहे. यामध्ये तुषार बुंदे विश्वासाने, “जग छान गोष्टींनी भरलेले आहे; ते टिपण्यासाठी तुम्हाला फक्त दृष्टी हवी आहे.” सह्याद्रीच्या खडबडीत निसर्गचित्रांपासून ते जैवविविधतेवरच्या पुस्तकापर्यंत सर्व काही त्यांच्या लेन्सने पाहिले आहे. आयुष्याने त्याला वेगवेगळ्या दिशेने खेचले असले तरी, फोटोग्राफीची त्याची आवड मोबाईल कॅमेऱ्यांच्या साधेपणामुळे जोपासली गेली. हृदयस्पर्शी दृष्टींसह सामान्य क्षणांना दृश्य कथांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

“एक चित्र स्मृती बनते.” क्षणभंगुर क्षणांना भावनांमध्ये बदलून, तो जे पाहतो ते जगाला दाखवण्यासाठी जगदीश चावला यांने आपले जीवन समर्पित केले आहे. शब्द जरी मनाशी बोलत असले तरी जगदीशचे फोटो आत्म्याशी बोलतात, ज्या भावनांकडे जास्त दुर्लक्ष केले जाते. त्याचे कार्य आपल्याला केवळ चित्रच नव्हे तर त्यामागील हृदयाचे ठोके पाहण्यासाठी आमंत्रित करते. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले आहे. कलात्मक अभिव्यक्ती या दोन्ही कलाकारांच्या भावनांमधून जळगाकरांनी प्रदर्शनी पाहता येईल. ज्येष्ठ छायाचित्रकार ईश्वर राणा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी मनिष शहा, देवेंद्र पाटील, योगेश सोनार, दिनेश थोरवे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. नितीन चोपडा यांनी सुत्रसंचालन  केले.

“इपिक” फोटो प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी): शहरातील पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शनाचं आयोजन आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव इत्यादी विविध विषयांचा समावेश आहे. येथे प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक असाच ठरणार आहे. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले असणार आहे. कलात्मक अभिव्यक्ती आणि या दोन्ही कलाकारांच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी जळगाकरांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक तुषार बुंदे व जगदीश चावला यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिक सेवादास दलुभाऊंनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि. १३ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होत आहे. निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. आज १३ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर मतदार संघात जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य सेवादास दलिचंद जैन (वय ९४ वर्षे) यांच्या गृहमतदानाने या मोहीमेस आरंभ झाला.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने मतदानाचा टक्का वाढवावा त्यादृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाची मोहीम १३ व १४ नोव्हेंबर दरम्यान राबविली जात आहे. मतदारांनी येत्या २० रोजी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असेही आवाहन करण्यात आले.

*लोकशाही बळकटीसाठी उत्तम पर्याय- दलिचंद जैन*

येत्या २० रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्ध, दिव्यांग यांना मतदान कसे करता येईल याबाबत संभ्रम होता परंतु, निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्तुत्य निर्णयामुळे वयोवृद्ध, दिव्यांग बांधवांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही बाब म्हणजे लोकशाही बळकटीसाठी उचलेले उत्तम पाऊल होय. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो असे दलिचंद जैन म्हणाले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचे उद्घाटन

जळगाव दि.१० प्रतिनिधी – शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर-२०२४ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, संस्थेच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांची उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात डॉ. अनिल काकोडकर पुढे म्हणाले कि, समाजाची आर्थिक उन्नती होत असताना दिसत असले तरी सामाजिक समस्या संपलेल्या नाहीत. सामाजिक विषमता वाढतच आहे व तेच मानसिक अशांतीचे मूळ आहे. काही गोष्टी आम्ही मिळवल्या असल्यात तरी खूप काही गमावलेले आहे. त्यासाठीच येथे उपस्थित युवकांनी संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आताचा काळ अनुकूल असून महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेला अहिंसामुक्त, निर्भय भारत निर्माण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सहभागी शिबिरार्थींनी रघुपति राघव राजाराम भजन सादर केले. डॉ. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी शिबिराची आवश्यकता प्रतिपादित करतांना देशासाठी वेळ देणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे सांगितले. आपले जीवन समाजासाठी व देशासाठी असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजातील समस्यांना उत्तर शोधण्याची क्षमता युवकांमध्ये असून त्यासाठी बंडखोरवृत्ती वाढली पाहिजे असे ते म्हणाले. शिबिरातून जाण्यापूर्वी आपल्यातील अवगुण शोधून त्यांना दूर सारा, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शुभेच्छा देताना समाजाप्रती कटिबद्ध होण्यासाठी सिद्ध व्हा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार नितीन चोपडा यांनी केले. या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिरात भारताच्या १८ राज्यासह नेपाळमधील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

१२ दिवसीय या निवासी शिबिरात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची गांधी कथा, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांचे ‘पदाशिवाय नेतृत्व’, ‘आपण आणि आपले संविधान’ विषयावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ‘आयुष्यासाठी शिक्षण’ विषयावर डॉ. गीता धर्मपाल, ‘युवक आणि नेतृत्व’ विषयावर दीपक मिश्रा, ‘नेतृत्वाचे उदाहरण’ विषयावर गिरीश कुलकर्णी, ‘चरखा आणि रेषा’ विषयावर भरत मूर्ती, ‘लवचिक समुदायाच्या दिशेने’ विषयावर कल्याण व शोबिता, ‘संघर्ष परिवर्तन व सामाजिक विश्लेषण’ विषयावर डॉ. अश्विन व डॉ. निर्मला झाला यांचे तर ‘गांधीजींचे तत्वज्ञान राजकारण व सत्याचे अनुसरण’ विषयावर बरुण मित्रा यांचे सत्र होणार आहे. तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल जैन यासह विविध मान्यवरांशी शिबिरार्थी संवाद साधणार आहेत. तसेच फराझ खान, कवी संदीप द्विवेदी, अतिन त्यागी यांचे विशेष सत्र होणार आहे. शिबिरात म्युझियम भेट, पीस वॉक, पीस गेम, विविध विषयांवर चर्चासत्र, भारत कि संतान, गोशाळा, शेती व नर्सरी काम इ. गोष्टी होणार आहेत.

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस अॅकडमी यांच्या सहकार्यातून दि. ८ ते १० नोव्हेंबर असा तीन दिवस हा सेमिनार राहणार आहे.

जैन हिल्सच्या सुबिर बोस हॉल येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे केरळचे आंतरराष्ट्रीय पंच व जागतिक शिस्त पालन समितीचे सदस्य एम. एस. गोपाकुमार यांची विशेष मार्गदर्शनासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात बुद्धिबळ विषयातील विविध नियम, नियमावली यावर मुख्यत्वे करुन प्रकाश टाकण्यात येणार आहे.

संपूर्ण भारतातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, सौराष्ट्र, बिहार, दिल्ली राज्यातून निवडक असे २२ राष्ट्रीय बुद्धिबळ पंचाची निवड महासंघाद्वारे या सेमिनारसाठी केली आहे. फिडे मानांकन प्राप्त करण्यासाठी सेमिनार महत्त्वपूर्ण आहे. सेमिनार मध्ये सहभागी राष्ट्रीय बुद्धिबळ पंचाची समारोपाच्या दिवशी परिक्षा घेण्यात येईल, यात यशस्वी पंचांना फिडे पंच असे मानांकन देण्यात येईल. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनचे सचिव नंदलाल गादिया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव संजय पाटील, सदस्य रवींद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रविण  ठाकरे यांच्यासह जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस अॅकडमीच्या सहकारी यशस्वीतेसाठी सहकार्य करत आहेत.

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम

जळगाव दि,४ (प्रतिनिधी) – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला *गोल्ड मेडल* बहाल करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पदवी प्रदान सोहळा होणार आहे.
आयआयटीची प्रवेश परीक्षा परिश्रमपूर्वक  उत्तीर्ण झाल्यानंतर. शिक्षण सुरू असताना पालवीला आत्तापर्यंत इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ” *इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडेंट*” आणि *क्यूरीयस यंग ब्लड अवॉर्ड”*  सह अनेक पुरस्कार प्राप्त असून पालवी सध्या *गुडगाव दिल्ली येथील डेली ऑब्जेक्ट या आस्थापनेत “इंडस्ट्रिअल डिझाईनर” या पदावर कार्यरत आहे. पालवीचे आईवडील विजय आणि नीलिमा जैन यांचेही अभिनंदन होते आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी पालवीचे कौतुकासह अभिनंदन केले आहे.

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) : – सूक्ष्म सिंचन आणि कृषिक्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य असलेल्या कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने आज रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत दुसरी तिमाही व सहामाहिचे आर्थिक निकाल जाहीर केले. यात कंपनीचे एकूण एकत्रित उत्पन्न २,६६९.८ कोटी रुपये इतके इबिडा ३१७.५ कोटी इतका आहे.

कंपनी व उपकंपन्यामधील सूक्ष्म सिंचन विभाग, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, कृषी प्रक्रिया उत्पादने, नूतनीकरणीय ऊर्जा समाधान, उती संवर्धन, वित्तीय सेवा आणि इतर कृषी उत्पादनांच्या मिळून हे एकूण उत्पन्न आहे.

तिमाही निकालाचे वैशिष्ट्ये –  – एकत्रित उत्पन्न: ₹ १,१९२.० कोटी रुपये, इबिडा : ₹ १३८.७ कोटी रुपये

सहामाही निकालाचे वैशिष्ट्ये – एकत्रित उत्पन्न: ₹ २,६६९.८ कोटी रुपये – इबिडा : ₹ ३१७.५ कोटी रुपये

अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले की,  महाराष्ट्रासह भारतातील विस्तारित पावसामुळे जैन इरिगेशनच्या तिमाहीच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पेरणी क्षेत्राच्या वाढीमुळे उत्पादनास प्रोत्साहन मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही कॅश फ्लो सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत आणि मायक्रो इरिगेशन सिस्टिम, पाईप्स आणि टिशू कल्चर क्षेत्रांमध्ये मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच, सोलर पंप्स, मोठ्या व्यासाचे एचडीपीई पाईप्स आणि आंतरराष्ट्रीय मागणीत वाढ झाल्यामुळे सकारात्मक परिणाम साधता येईल.

अलीकडेच जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करांतर्गत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी साधने उपलब्ध करून देईल. याशिवाय, उच्च-उत्पादनक्षमता असलेल्या कॉफी शेती आणि कुफ्री फ्रायोएम बटाटा जातीसह नवीन प्रयोगातून टिशू कल्चरसाठी नवीन मागणी ही वाढेल. ह्या करारांमुळे आमच्या इतर उत्पादनांच्या मागणीत वाढ होण्यास मदत होईल.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version