गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने (हुतात्मा दिनी) दरवर्षीप्रमाणे ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचारांचा प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने दि. ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी २५ दरम्यान निघणाऱ्या १२ दिवसीय सायकल यात्रेस जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हिरवी झेंडी दाखविणार असून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्राम संवाद सायकल यात्रा यावर्षी जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागातील जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातून जवळपास ५० गावांना भेटी देणार असून सुमारे ३०० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत फ्रांस, नेपाळ देशांसह भारतातील विविध राज्यातील व स्थानिक अशा ४० स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

चारित्र्य निर्माणासह महिलांसाठी विशेष कार्यक्रम
यात्रेदरम्यान विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी सापशिडी, मूल्य संवर्धनाचे खेळ, प्रश्नमंजुषा, कठपुतली खेळ या माध्यमातून चारित्र्य निर्माणाचे कार्य करणार आहे. तसेच ६ वेगवेगळया ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे तर नागरिकांसाठी दररोज पथनाट्याद्वारे प्रबोधन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यावरील प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

स्वस्थ व्यक्ती… स्वस्थ समाज या संकल्पनेनुसार निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची सांगता भारताच्या प्रतिज्ञेने होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम 

जळगाव दि.२८ प्रतिनिधी –  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’  हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे उद्या दि. २९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे. महात्मा गांधी यांचे अनेक अपरिचीत पैलू व त्यांच्याविषयी असलेले अनेक समजगैरसमज याचा शोध घेणारा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची आहे. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची आहे. निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार आहेत. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत आहेत. सदर याकार्यक्रम सर्वांसाठी खूला असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन जळगाव यांनी केले आहे.

जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जैन श्राविका मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य उद्घाटन सोहळा लाल मंदिरात नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंडळाच्या नूतन अध्यक्षा प्रतिभा जैन आणि सचिव वंदना जैन, रिता पाटणी यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारला. कार्यक्रमास अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या, तर विशेष अतिथी अपूर्वा राका, इनरव्हील क्लब जळगावचे अध्यक्षा उषा जैन यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले.

सुरुवात मंगलाचरणाने पूर्वा चांदीवाल, निकिता चांदीवाल यांनी केली. यानंतर मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रीती चांदीवाल यांनी व्यासपीठावरून आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगितला. नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतिभा जैन यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या सर्व सदस्यांचे आणि  अतिथीगनां चे आभार व्यक्त केले आणि म्हणाल्या, “हे पद केवळ जबाबदारी नसून समाजसेवेची संधी आहे. श्राविका मंडळाला अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक सादरीकरणेही झाली, ज्यामध्ये सौम्या जैन आणि कार्यकारिणीने नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदना जैन व रिता पाटणी यांच्या आभार मानले.

अशी आहे कार्यकारिणी – श्राविका मंडळाची नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षा प्रतिभा जैन, सचिव वंदना जैन आणि रीता पाटणी इतर सदस्य उज्ज्वला जैन, संगीता चांदीवाल, अलका चांदीवाल, ज्योती जैन, क्षमा बाकलीवाल रेणू पाटणी पूर्वा चांदीवाल, निकिता चांदीवाल, मोना जैन, निकिता जैन यांचा समावेश आहे.  पूर्वा आणि निकिता चांदीवाल सूत्रसंचलन केले. उज्ज्वला जैन, संगीता चांदीवाल, अलका चांदीवाल तीळगूळ दिले.  ज्योती जैन, क्षमा क्बाकलीवाल, रेणू पाटणी, प्रियांका चांदीवाल यांनी विविध खेळ खेळविलीत. सदस्यांचे स्वागत मोना जैन, निकिता जैन यांनी केले.

राजस्थानी रॅप वॉकचे आकर्षण – राजस्थानी थीममध्ये कार्यक्रमाचे आयोजन होते. राजस्थानची संस्कृती, कला आणि पारंपारिक पोशाखांचा समावेश होता.  राजस्थानी लोकसंगीत आणि नृत्यही झाले राजस्थानी रॅप वॉक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. समाजातील मान्यवर व महिलांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीने कार्यक्रम संस्मरणीय झाला.

जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

जळगाव दि.21 प्रतिनिधी – डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-3 भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. संपूर्ण भारतातून आठ संघ या स्पर्धेत होते. त्यातील  स्ट्राईकफोर्स संघाला अंतिम सामन्यात ३-२ अशा फरकाने नमवित निमाखात विजेतेपदाला ‘जैन सुप्रिमोज’ संघाने गवसणी घातली.

विशाखापट्टणम् येथील एसथ्री स्पोर्टस एरिना येथे  डेक्कन प्रिमियर कॅरम लीग स्पर्धा दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान संपन्न झाली. जैन इरिगेशनच्या ‘जैन सुप्रिमोज’ संघात कर्णधार संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, गौतम भोई, कु. एम. एस. के. हरिका, झैयद अहमद, नईम अन्यारी, रहिम खान, संघ व्यवस्थापक सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. तीन दिवसांमध्ये १६५ सामने खेळविली गेलीत. या सीझनमध्ये १२ लाखांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केले गेले. जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोजने डेक्कन प्रीमियर लिगमध्ये उत्कृष्ठ कौशल्य आणि टीमवर्क दाखवून प्रथम स्थान मिळवले. रोष पारितोषिक व भला मोठ्या चषकाने जैन सुप्रिमोज संघाचा सन्मान करण्यात आला. विजयी संघाचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन,  सहव्यवस्थापकीय संचालक व जैन सुप्रिमोज संघाचे संघमालक अतुल जैन,  जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी कौतूक केले आहे.

डेक्कन प्रीमियर कॅरम लीग (DPCL) सीझन-३ चे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कॅरम खेळातील अपवादात्मक प्रतिभा ओळखून डेक्कन प्रीमियर लिगचे अध्यक्ष डॉ. नीरज कुमार संपथी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस व्ही. डी. नारायण उपस्थित होते. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस भारती नारायण, आंध्रप्रदेश राज्य कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस एस. के. अब्दुल जलील यांनी स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून काम पाहिले. मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहित केले. विजेत्यांसाठी, अव्वल खेळाडू आणि संघांना संपूर्ण लीगमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित केले.  जैन सुप्रिमो संघाने प्रथम, द्वितीय स्ट्राइक फोर्स, नव्याभारती स्ट्रायकर्सने तिसरा क्रमांक पटकावला. चार्मी-नार चॅलेंजर्सने अव्वल चार संघांना मागे टाकत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट अॅग्रीकल्चर महत्त्वाचे – डॉ. एच. पी. सिंग

 जळगाव, दि.१९ (प्रतिनिधी) – ‘मसाले पिकांच्या शाश्वत शेतीसाठी उच्च तंत्रज्ञान, शुद्ध बी-बियाणे, टिश्यूकल्चर रोपे, आधुनिक सिंचनाची व फर्टिगेशनची व्यवस्था झाली तर मसाले पिकांची शेती परवडणारी ठरेल, असा सूर तज्ज्ञांचा निघाला. तर ‘जगभरातील मसाले पिकांच्या शेतीत प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे; या स्पर्धेत अव्वल ठरायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे,’ असे विचार डॉ. एच.पी. सिंग यांनी व्यक्त केले.  यात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रिसिजन फार्मिंग, गुणवत्ता पूर्ण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मसाले पिकासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. याबाबत या राष्ट्रीय मसाले परिषदेत चर्चा करण्यात आली. यात ७ तांत्रिक सत्रे, ५६ पेपर्स, ३६ किनोट ऍड्रेस, २६ प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. दोन दिवसात तज्ञांनी केलेल्या चर्चेतून त्याचा अहवाल तयार करून शासनाकडे लवकरच पाठवून त्याची ध्येयधोरण ठरवण्याकामी मोलाची भूमिका असेल.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन फार्मफ्रेश फूड्स लि., कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), यांच्या संयुक्त विद्यमाने (मसाले व सुगंधी पिकांच्या मूल्यवर्धित साखळी व्यवस्थापन) या ‘राष्ट्रीय मसाले परिषद २०२५’ चा समारोप जैन हिल्स च्या परिश्रम हॉलमध्ये झाला. याप्रसंगी चाईचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, प्रमुख अतिथी म्हणून अॅग्रीकल्चर सायन्स टिस रिक्रूटमेंट बोर्ड दिल्लीचे सदस्य डॉ. मेजर सिंग, डॉक्टर वायएसआर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. गोपाल, माजी कुलगुरु डॉ. टी. जानकीराम, आयआयएसआरचे माजी संचालक डॉ. निर्मलबाबु, जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. अनिल ढाके उपस्थित होते.  प्रास्ताविक डॉ. निर्मलबाबु यांनी केले.  जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ बालकृष्ण यादव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. डॉ. सुब्रह्मण्यम यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. के. बी. पाटील यांनी आभार मानले.
 भारतभरातील आलेल्या तज्ज्ञांचे जैन हिल्स येथील दोन सभागृहांमध्ये तांत्रिक सादरीकरण झाले. याबाबतचा एकत्रित अहवाल या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक निर्मल कुमार यांनी सादर केला. यात बडी हांडा हॉलमधील सत्रात मसाल्यांमध्ये मूल्यवर्धितीत व्यवस्थापन यावर संशोधन पेपर सादर केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. टी. जानकीराम, सहअध्यक्ष डॉ पद्मनाभन बी, संयोजक म्हणुन डॉ. के. बी. पाटील,  सुनील गुप्ता, डॉ. टी. जाकीरीया होते.
मिरची बाजारात भारताचे जागतिक नेतृत्व यासह प्रमुख मसाल्यांची औषधी गुणधर्म यावर डॉ. टी. जाकीरीया यांनी सादरीकरण केले. वैविध्यपूर्ण वाण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि मजबूत निर्यात धोरणांद्वारे चालवलेले प्रयत्न सांगितले‌. दीर्घकालीन यशासाठी शाश्वत कृषी पद्धतींना प्राधान्य दिले पाहिजे. हवामान बदल आणि बाजारातील चढउतारांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि स्थानिक समुदायांमध्ये भागीदारी वाढवणे. शेतकऱ्यांना स्थानिक बाजारभावाच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळवून देतात त्यासाठी त्यांनी जैन इरिगेशनची करार शेती सारखे मॉडेल महत्त्वाचे ठरेल. जैन फार्म फ्रेश फुड चे सुनील गुप्ता यांनी मसाल्यांच्या संदर्भात जीएमपीएस आणि जीटीपीएस साठी गुणवत्ता आणि मानके यावर सादरीकरण केले. त्यात त्यांनी फुड सेफ्टी, पॅकिंग, क्लिनिंग सह जागतिक मानांकनासह गुणवत्ता पूर्ण उत्पादन घेता येऊ शकते. जैन व्हली स्पाईस हे मसाल्या पिकातील नैसर्गिकता जपते. सूर्यप्रकाशात किंवा खुल्या वातावरणात मिरची, हळद सह अन्य मसाल्यांची पिके वाळवू नये. त्यासाठी कंट्रोल डिहाइड्रेशन केले पाहिजे.  दीपक पारिख यांनी मसाले आणि सुगंधी पदार्थांच्या मूल्य साखळीमध्ये नाविन्यपूर्ण संशोधनावर भाष्य केले. मसाल्यांची पिके उत्पादनात भारत महत्त्वाचा देश आहे मात्र निर्यातीत आपला प्रभाव कमी होताना दिसतो आहे. मसाल्याची मूल्यवर्धित शेतीसाठी आव्हाने,दळणवळणाच्या वेळी हाताळणी, गुणवत्ता यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. यासाठी डाटा बेसचा वापर करून कृत्रिम बुध्दिमत्तेसह अन्य डिजिटल साधनांचा वापर केला पाहिजे. डॉ. बी. नीरजा प्रभाकर यांनी हळदीतील आवश्यक तेलांच्या वाढीच्या उत्पादनाच्या निष्कर्ष आणि गुणवत्तेवरील अभ्यास यावर सादरीकरण केले.
परिश्रम हॉलमध्ये मसाल्यांमध्ये उत्पादन प्रणाली आणि मूल्यवर्धन आणि दर्जेदार बियाणे, लागवड साहित्य आणि वाढीव नफ्यासाठी वनस्पती आरोग्य सेवेतील नवकल्पना या विषयावर हे सत्र झाले.
त्याचे अध्यक्ष डॉ. प्रभात कुमार, डॉ. अनिल पाटील, डॉ. विकास बोरोले आदि होते. जैन इरिगेशनचे बी. डी. जडे यांनी मसाले पिकांमध्ये ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन यांचा उपयोग, डॉ जयशंकर परिहार यांनी गुणवत्तेवरील मसाले पदार्थांच्या जीओ मेटिक या विषयावर प्रकाश झोत टाकला. तर समाधान बागूल यांनी अश्वगंधा आणि इसबगोल या औषधी वनस्पतींबाबत सादरीकरण केले. जैन इरिगेशन चे डॉ.बालकृष्ण यादव यांनी काळी मिरी उत्पादनाबाबत सांगितले. डॉ. एच. पी. सिंग, डॉ. अनिल ढाके यांच्या हस्ते तांत्रिक सत्रात सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तज्ञांचे उत्कृष्ट सादरीकरणाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यात डॉ. गोपाल के डॉ. टी जानकीराम, डॉ. नीरजा प्रभाकर, डॉ. एस एन गवाडे, डॉ. रघुवीर सिलारो, डॉ. याइर एशेल, डॉ. पंचभाई, डॉ बाळकृष्ण यादव यांचा समावेश होता.

जैन हिल्स येथे दोन दिवसांची ‘राष्ट्रीय मसाला परिषद’ सुरू

जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) – ‘मसाले व सुगंधी वनस्पती पिकांसाठी शेतकऱ्यांना सुयोग्य मशागतीची पद्धती आणि गुणवत्तेची रोपे उपलब्ध करून दिले तर या क्षेत्रात खूप मोठी प्रगती होऊ शकते. जैन इरिगेशनने याबाबतचे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे असे मोलाचे विचार प्रमुख पाहुणे डॉ संजय कुमार यांनी व्यक्त केले. १८ व १९ जानेवारी रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन फार्मफ्रेश फूड्स लि., कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), यांच्या संयुक्त विद्यमाने (मसाले व सुगंधी पिकांच्या मूल्यवर्धित साखळी व्यवस्थापन) ‘राष्ट्रीय मसाले परिषद २०२५’ जैन हिल्स येथे आयोजली आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, आयआयएसआर केरलाचे माजी संचालक डॉ. निर्मल बाबू, ग्लोबल एग्रीकल्चरल कन्सल्टंट सिइओ (इस्त्राईल) याइर इशेल, वर्ल्ड स्पाइस ऑर्गनायझेशनचे चेअरमन राजकुमार मेनन, भारत सरकारचे फलोद्यान आयुक्त डॉ. प्रभात कुमार, डॉ. संजय कुमार (चेअरमन, एएसआरबी, नवी दिल्ली), डॉ. मेजर सिंग (सदस्य, एएसआरबी, नवी दिल्ली), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वायएसआर अॅग्रिकल्चर विद्यापीठ आंध्रप्रदेशनचे कुलगुरू डॉ. गोपाल के. आदी उपस्थित होते. तसेच मसाले पीक घेणारे जिल्ह्यातील शेतकरी, संशोधक, तंत्रज्ञ, अभ्यासक यांचीही उपस्थिती होती.

आरंभी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी स्वागतपर सुसंवाद साधला. ते म्हणाले की, जगाच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे. त्यामुळे जगात मसाले पदार्थांना मागणी वाढलेली आहे. मसाले हे अन्नपदार्थांना चविष्ठ बनवतात, शिवाय त्यांच्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. शेतकरी, सरकार, संशोधन संस्था, खासगी कंपन्या, मसाल्यांवर काम करणाऱ्या समुहास या क्षेत्रात काम करण्याची खूप मोठी संधी असल्याचे सांगून मिरी या पिकात भारत जगामध्ये अग्रणी बनू शकतो असे मत अतुल जैन यांनी व्यक्त केले. मसाले उद्योगाबाबत सरकारकडे ध्येय धोरणे ठरविताना विचार व्हावा. जैन इरिगेशने ही राष्ट्रीय मसाले परिषद आयोजित करून एकाच व्यासपीठावर सगळ्यांना आणलेले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी सिंचन, फर्टिगेशन इत्यादी तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. नावीण्यपूर्ण असे मसाल्याचे पीक शेतकऱ्यांनी घ्यावे असे आवाहन केले.

डॉ संजय कुमार भाषणात म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे मसाले पिकांच्या पद्धतीत चेहरामोहरा बदलला. मसाल्याच्या पिकांसंदर्भात आजही प्रतवारी आणि लेबलिंग केली जात नाही. पीक कोणत्या शेतातून आपल्यापर्यंत पोहोचले याची माहिती ग्राहकांना उपलब्ध नसते. मिरची आणि जिरे उत्पादनात भारत पुढे असला तरी इतर मसाल्याच्या पिकांमध्ये भारत मागेच आहे तो पुढे कसा येईल उत्पादकता कशी वाढेल याबाबत विचार करणे व त्याबद्दल प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. सुगंधी वनस्पतींच्या जाती विकसीत करून त्यात मधमाश्यांचे पालन केले तर शेतकऱ्यांना मध निर्मितीतून अधिकचे पैसे मिळविता येतील. याच प्रमाणे हिंग, केसर आणि ऑरिगॅनोची शेती करून नवे क्षेत्र आणि नवी बाजारपेठ निर्माण करायला हवी असे आवाहन संजय कुमार यांनी केले.

मसाले परिषद आयोजनात ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली ते डॉ. निर्मल बाबु यांनी ही परिषद आयोजन करण्यामागची पार्श्वभूमी भाषणातून सांगितली. बाजारपेठेत स्पर्धा करायची असेल तर उत्तम गुणवत्तेचा माल असणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने या क्षेत्रात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता व गुणवत्ता राखली जात नाही याबाबत चिंता व्यक्त केली. पुढील पाच वर्षाच्या काळात आज भारतातून मसाले पदार्थांची जितकी निर्यात होते त्याच्या दुप्पट उद्दिष्ट साध्य करायचे आहे. जगात मसाले निर्यातीच्या क्षेत्रात भारतास उत्तम संधी असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी या मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करून घ्यावे असे आवाहन केले.

मसाले पदार्थांचे उल्लेख बायबल मध्ये देखील उल्लेख आढळतो. पाच हजार वर्षांपूर्वी शेती, अन्न, शेती करण्याच्या पद्धती लोकांना ठाऊक होत्या. जगभरातील व्यक्ती अनेक मसाल्याचे पदार्थ वापरतात. मसाल्यांना जगभर मागणी असल्याने या क्षेत्रात खूप मोठी संधी असल्याचे इस्त्राईलचे लसूण पैदासकार म्हणून ख्याती असलेल्या डॉ. एअरशेल यांनी सांगितले.

मसाले उद्यागात अनेक आव्हाने आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी जगभरातील मसाला उद्योजकांनी एकाच व्यासपीठावर येण्याची आवश्यकता राजकुमार मेनन यांनी सांगितली. यासाठी एफपीबी आणि शेतकरी यांनी मिळून काम केले तर ५० हजार हून अधिक शेतकरी जुळू शकतील अशी आशा ही व्यक्त केली.

छोटे शेतकरी हे तोट्याचे नव्हे तर फायद्याचे ठरू शकतात. चांगल्या व्हरायटीचे पिके घेतले, मल्टिक्रॉपींग पद्धती हा चांगला उपाय ठरू शकतो. चांगल्या पद्धतीने शेती केली तर मसाल्याची शेती फायद्याची ठरू शकते असे डॉ. प्रभात कुमार म्हणाले. भारत देश मोठ्या प्रमाणात हिंग आयात करतो त्यासाठी काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंगाची शेती होऊ शकते या सोबत केशराची शेती देखील करता येऊ शकते.

राष्ट्रीय पातळीवरील मसाले विषयावरील परिषद घेऊन दोन दिवसांचे विचार मंथन घडून येईल, त्याबद्दल जैन इरिगेशनचे विशेष आभार व्यक्त करून मिरची, हळद, आले, मीरी इत्यादीमध्ये चांगले काम करण्याची संधी आहे. या सोबतच लेमनग्रास, सॅण्डलवूड ऑईल असे प्रक्रिया उद्योग शेतकरी उभारू शकतात. त्यासाठी वायगाव हळदीचे उदाहरण सांगितले. येथील हळदीला जिओटॅग मिळाला असून बाबा रामदेव यांच्या उद्योगासाठी बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ हे गाव तेथील पद्धती निर्माण झाली आहे असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.

मसाले म्हणजे कल्चर हेरिटेज आहे तसेच अर्थकारणामध्ये देखील अत्यंत मोलाची भूमिका बजावते. शेतकऱ्यांनी समूह शेतीचा प्रयोग करून आर्थिक दृष्टीने सक्षमतेकडे वाटचाल करावी असे डॉ. गोपाल म्हणाले. आले. हिरवी मिरची, हळद इत्यादी वाळल्यानंतर मसाले म्हणून अंतर्भाव होतो. अशी संभ्रम अवस्था नसावी याबाबत डॉ. मेजर सिंग म्हणाले.  यावेळी व्यासपीठाच्या मान्यवरांच्याहस्ते ‘ज्ञानमंथन – २५’ आणि ‘स्पाईसेस हॅण्डबुक’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुब्रह्मण्यम आणि डॉ. मोनिका भावसार यांनी तर आभारप्रदर्शन गोपाल लाल यांनी केले. या उद्घाटन सत्रानंतर दिवसभर तांत्रिक चर्चासत्रे झाली. उद्या रविवारी १९ रोजी या राष्ट्रीय मसाला परिषदेचा समारोप होईल.

मसाले पिकाच्या जागतिक स्तरावरील व्यापारास पाच हजार वर्षांपूर्वी सुरवात झाली. अमेरिका, ब्राझील, लंडन व भारत यामध्ये व्यापाराची कशी साखळी निर्माण होत गेली आणि भारत जगाच्या पाठीवर मसाले उत्पादक देश म्हणून नावा रुपाला आला हे सांगितले. परंतु भविष्यात मोठ्या संधी आहे जर उत्पादकांनी जमिनीचे आरोग्य, फवारणीचे वेळापत्रक व सेंद्रिय पद्धतीने उत्पादन हे जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे असे जैन फार्मफ्रेशचे मुख्य व्यवस्थापक सुवन शर्मा (लंडन) यांनी मांडले.

या परिषदेमध्ये डॉ. के.बी. पाटील, डॉ. जितेंद्र कदम, डॉ. अभेगौडा, डॉ. बी.के., माजी कुलगुरू डॉ. टी. जानकिरामन, डॉ. मनिष दास, डॉ. विजय महाजन, डॉ. विजयन, डॉ. पी.के. गुप्ता, डॉ. बशीर, डॉ. अब्बास, डॉ. वेणुगोपाल, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. विकास बोरोले, हे उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल ढाके, डॉ.बी.के, डॉ. के.बी. पाटील, डॉ. सुमेरसिंग, योगेश पटेल, राहुल भारंबे, गोविंद पाटील आणि मोहन चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा – डॉ. महेश्वर रेड्डी

जळगाव दि.१७ प्रतिनिधी –  विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र, श्वान पथक, वायरलेस, पोलीस बॅण्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर  अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या पर्सोनेल विभागाचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट सी. एस. नाईक, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते. त्यासोबत शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, रामानंदचे राहुल गुंजाळ, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड, शहर पोलीस स्टेशनचे अनिल भवारी, मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, पीएसआय राजेश वाघ यांच्यासह अधिकारी व पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र प्रदर्शना ७००० च्यावर विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलीसांशी संवाद साधला आणि शस्त्रां संबंधित माहिती समजून घेतली. हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून जळगावकरांसाठी आयोजित केला जातो. शस्त्र प्रदर्शनातून पोलीस दलाची ओळख झाली. शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पोलीस दलातील अत्याधुनिक शस्त्रसामग्री, उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलातील जबाबदाऱ्या आणि संधींबाबत उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना बीडीएस विभागातील प्रकाश महाजन, नरेंद्र ठाकूर, आशिफ पिंजारी, पंकज सोनवणे, रामदास साळुंखे, राखीव पोलीस दलातील आशिष चौधरी, दीपक पाटील, संतोष सुरवाडे, सुभाष धिरबस्सी, अजित तडवी यांच्यासह क्युआरटी टीम, आरसी प्लाटुन नं.७ मधील कर्मचाऱ्यांनी शस्त्रांविषयी माहिती समजून सांगितली. पोलीस बँड पथकाने विशेष सादरीकरण यावेळी केले.

डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले,”पोलिस दलातील सेवा ही केवळ नोकरी नाही, ती समाजसेवेचे एक मोठे साधन आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून यासाठी स्वतःला तयार करावे.” मोबाईलच्या अतिवापरापासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवावे, तसेच सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. “खोट्या कॉल्सना बळी पडू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटांमधून पोलिसांविषयी जी चुकीची प्रतिमा निर्माण होते, ती बदलण्याचे आवाहन करताना डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले, पोलिसांचे खरे काम काय आहे, हे समजून घ्या. पोलिस दल समाजासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

संदीप कुमार गावित व अशोक नखाते यांनीही मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी छोटा पोलीस होऊन मुलांनी पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन केले. विराज कावडिया यांनी उपक्रमाविषयी युवाशक्ती व भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशन यांची भूमिका विशद केली. अरविंद वानखेडे यांनी सायबर क्राईम यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस व शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आभार मानले. सुत्रसंचालन वायरलेस विभागातील अमित माळी यांनी केले. शहर वाहतुक पोलीस दलातील मेघना जोशी, शितल पाटील, वैशाली बाविस्कर, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, सौरभ कुलकर्णी, योगेश कोळी, केवलनाथ, ओम खाचणे, अंजिक्य सपकाळे, रोहन कोळी, मंदार फालक यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.

या शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

नुतन मराठा, नंदिनीबाई बेंडाळे विद्यालय, मू.जे. महाविद्यालय, ला.ना. शाळा मधील एनसीसीचे विद्यार्थी, का.ऊ. कोल्हे महाविद्यालय, भगिरथ स्कूल, ओरियन सीबीएससी व स्टेट बोर्ड, प्रगती स्कूल, पुष्पावती खुशाल गुळवे विद्यालय, न्यु इंग्लीश स्कूल, विद्या इंग्लिश मिडीयम, मनपा शाळा नं. १० ऊर्दू स्कूल, विवेकानंद स्कूल या शाळांसह सुमारे ७००० विद्यार्थ्यांनी दिवसभरात प्रदर्शनीला भेट दिली.

हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली

जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.मधील सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मोटार सायकल रॅली ला हिरवी झेंडी दाखविली. पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरातून निघालेली मोटार सायकल रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, नेरी नाका, अंजिठा चौफुली, ईच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक मार्ग पोलीस मुख्यालय येथे समारोप झाला. हेल्मेट परिधान करून आमदार सुरेश भोळे, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सह अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन हेल्मेट वापरा विषयी मोटार सायकल रॅलीतून जनजागृती केली.

पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाच्या माध्यमातून भवरलालजी जैन यांनी जग बदलण्याचे कार्य केले –  डॉ. पार्थ घोष

जळगाव दि. १५ प्रतिनिधी – ‘परिसंस्थेमध्ये (इको सिस्टिम्स्) जगात बदल घडविण्याची शक्ती आहे. आज जगाला याच गोष्टींची आवश्यकता आहे. जैन हिल्स येथे श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून इको सिस्टिम्स विकसीत केली. पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाचे केलेले कार्य पाहून मी थक्क झालो.’ असे गौरोद्गार आंतरराष्ट्रीय पातळीवरील नीति सल्लागार, रणनीतिकार, मॅनेजमेंट गुरू डॉ. पार्थ घोष यांनी काढले. गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने ‘भाऊंचा कट्टा’ या उपक्रमांतर्गत कस्तुरबा सभागृह जैन हिल्स येथे कार्यक्रम आयोजला होता. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन हे व्यासपीठावर तर शहरातील गणमान्य श्रोते समोर उपस्थित होते.

श्रद्धेय मोठ्याभाऊंनी जैन हिल्स येथील इको सिस्टिम्स् चे कार्य उभारत असताना हॅण्ड, हार्ट आणि हेड या ३ ‘एच’ चा चपखल उपयोग करून घेतलेला दिसत आहे. प्रेरणा, स्थिरीकरण, सक्रियीकरण, अंतर्ज्ञान, संश्लेषण, नाविण्यपूर्ण वेगळेपण आणि शिक्षण या सात गोष्टींची जोड देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे हे प्रकर्षाने जाणवते. शेती हे क्षेत्र औद्योगिक व आर्थिक उन्नतीचे हृदय आहे. यावर जैन इरिगेशनच्या माध्यमातून भवरलाल जैन यांनी मोठे कार्य केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत परिवर्तन घडवून आणले. असे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅनेजमेंट गुरू डॉ. पार्थ घोष यांनी व्यक्त केले.

   ‘why is a philosophical base key to creating sustainable enterprise’ या विषयावर शहरातील निमंत्रीत व्यक्तींसाठी ‘भाऊंचा कट्टा’ या उपक्रमात जागतिक किर्तीचे व्यक्तीमत्त्व डॉ. पार्थ घोष यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आरंभी दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. आरंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुब्रम्हण्यम यांनी तर आभार प्रदर्शन अतुल जैन यांनी केले.

डॉ. पार्थ घोष यांनी समाजातील अलीकडच्या परिस्थितीवर भाष्य केले. भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातील फरकांना बाजूला ठेवून, सर्व समावेशी विकासाचे मॉडेल विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी जपानच्या काही गावांचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की, तिथे लोक पर्यावरणीय दृष्टिकोनातून आणि सामाजिक एकत्रितपणाने काम करतात, ज्यामुळे त्या गावांना शाश्वततेची भावना वाढीला लागते याबाबत सोदाहरण स्पष्ट केले.

भवरलाल जैन यांची दूरदृष्टी प्रेरणादायी

डॉ. पार्थ घोष यांनी श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टी संदर्भात विवेचन केले.पर्यावरणपूरक उद्योगाची निर्मिती करून सर्वसमावेश स्थिरता आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये प्रेरणा, स्थिरता, क्रियाशीलता, उभारणी, संश्लेषण, शिक्षण याचा समावेश दिसतो. तो चिरंतर आहे. त्यासाठी त्यांनी खालील मुद्दांवर विवेचन केले.

प्रेरणादायी : प्रेरणादायी दूरदृष्टी  ठेऊन जी कर्मचारी आणि स्टेकहोल्डर्सना एकत्र आणते.

स्थिरता : सकारात्मक दृष्टी आणि मूल्ये हे कठीण वेळेतसुद्धा स्थिरता प्रदान करतात.

क्रियाशील : निरंतर क्रियाशील राहिले पाहिजे. ती नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.

उभारणी : नवीन कल्पनांची उभारणी केली आणि सहकाऱ्यांकडूनही करुन घेतली.

संश्लेषण : विविध घटकांना एकत्र आणून एक सुसंगत अशी कार्यसंस्कृती विकसीत केली.

शिक्षक :  शिक्षक म्हणून काम करणे म्हणजे काय तर निरंतर शिकण्याची आणि सुधारण्याची संस्कृती निर्माण करणे हे येथील वातावरणात दिसते. कृषि क्षेत्राला संशोधनात्मक दृष्ट्या कायम प्रगत करत राहण्याचा संस्कार भवरलाल जैन यांनी दिला.

शैक्षणिक क्षेत्रातील बदलांची गरज

 डॉ. पार्थ घोष यांनी शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदलांची आवश्यकता अधोरेखित केली. आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याबाबत त्यांनी सांगितले. याच जोडीला महाविद्यालयीन स्तरावर शाश्वत विकासासाठी उद्योजकीय शिक्षणाचा समावेश करण्यात यावा आणि जागतिक बदल घडविणारी पर्यावरण पद्धती (इको सिस्टिम) उभारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच सामाजिक मूल्य आणि शाश्वतेला प्राधान्य देऊन नैतिकेतून विकास साधता येऊ शकतो याबाबत देखील त्यांनी प्रकाश झोत टाकला. उपस्थितांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

जैन इरिगेशनचा आयसीएआर-सीआयएसएच, अॅग्रीइनोव्हेट इंडिया यांचा  सामंजस्य करार

जळगाव, १ जानेवारी २०२५- (प्रतिनिधी):- जैन इरिगेशन जळगाव व भारतीय कृषी अनुसंधान (ICAR),  सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टीकल्चर रिसर्च लखनौ(CISH) आणि अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, यांच्यात जैन केळीच्या टिश्यू कल्चर रोपांमध्ये फ्युसारीयम विल्ट रोगाला प्रतिकार करणाऱ्या तंत्रज्ञानासाठीचा सामंजस्य करार (एमओयु) नुकताच करण्यात आला. या करारावर डॉ. टी, दामोदरन, संचालक सीआयएसएच लखनौ, डॉ. प्रवीण मलीक, सीईओ, अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांनी डॉ. व्ही. बी. पटेल, उपमहासंचालक भारतीय कृषी अनुसंधान, डॉ. बालकृष्ण यादव, डॉ. के. बी. पाटील, डॉ. अनिल ढाके यांच्यासह २०० प्रगतीशील केळी बागायतदारांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार सोहळा पार पडला.

टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती करत असतानांच्या प्रकियेतच बायोइम्युनायझेशन करण्याचे तंत्रज्ञान आय़सीएआर, सीआयएसएच, लखनौ यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे प्रतिकारक रोपांची निर्मिती होऊन ती रोप फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालू शकतील. रोपांच्या प्रायमरी व सेकंडरी हार्डनिंगमध्येसुद्धा बायोइम्युनायझेशन करण्यात येणार आहे.

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन म्हणाले की, ‘भारतात  फ्युसारियम विल्ट रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात व आंतरराष्ट्रीय सतरावर जे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते स्वीकारून केळी उत्पादकांना सशक्त व प्रतीकारक रोपांची निर्मिती व पुरवठा करण्याचे आमचे धोरण आहे. आयसीएआर सोबतचा तंत्रज्ञान हस्तांतराचा हा करार म्हणजे केळीला सुरक्षित ठेवण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे.’ डॉ. व्ही. बी. पटेल यांनी ‘या तंत्रज्ञानाने केळी उत्पादकांना फायदा होईल’ असे म्हटले तर डॉ. टी दामोदरन यांनी ‘हे तंत्रज्ञान कसे काम करते यावर मार्गदर्शन केले. जैन इरिगेशन ही देशामधील अग्रगण्य कंपनी असल्याने या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होईल.’

डॉ. प्रविण मलीक यांनी या तंत्रज्ञानाने केळीची शेती कशी शाश्वत करता येईल असे म्हटले तर डॉ. के. बी. पाटील यांनी प्रत्येक गावाच्या,  जिल्हा तसेच राज्याच्या सीमेवर टायर बाथ, फुट बाथ ही संकल्पना राबवून वाहनांच्या चाकाद्वारे किंवा मजूरांच्या पायातील बूट चप्पलद्वारे या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अपरिहार्य असल्याचे सांगितले. बायोइम्युनायझेशन तंत्रज्ञानामुळे फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालता येईल व रोगाच्या  व्यवस्थापनासाठी मदत होईल.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस वॉक होता. जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात परमानंदाची संकल्पना विस्ताराने मांडत त्याचा मानवी जीवनाशी संबंध उलगडण्यात आला.

साडे तीन किलोमीटरच्या या वॉकमध्ये अध्यात्मिक व योगशास्त्रीय पंचकोशातील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोषाची तोंड ओळख करून देण्यात आली. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची कार्यपद्धती त्यांचे जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. आनंद मिळविण्यासाठी अष्टांग योग व दासबोधात समर्थ रामदासांनी मांडलेली नवविधाभक्ती कशी उपयुक्त ठरते यावरही प्रकाश टाकण्यात आला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधल्या पाहिजेत, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, आपल्या कामातील आनंद मिळविला पाहिजे, आपल्या सोबत इतरांनाही आनंद घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे  असे आवाहनही गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी यांनी केले. संस्था पीस वॉक, नेचर वॉक, बर्ड वॉचचे नियमितपणे व वेगवेगळ्या प्रसंगी आयोजन करीत असते. डॉ. अश्विन झाला यांनी पंचमहाभूतांचे मानवी जीवनाशी संबंध व त्याचे महत्त्व थोडक्यात विशद केले. या पीस वॉकमध्ये ५५ स्त्री-पुरुष व मुलांचा सहभाग होता.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version