अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

जळगाव दि.16 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूल भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये शिकत असलेल्या १२ राज्यातील विद्यार्थ्यानी, भारताच्या विविध राज्याच्या संस्कृती व भाषांच्या छटांमध्ये नृत्य व गायनाचे देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. नागरीकाच्या हक्क व जबाबदारीबाबत प्रबोधन करणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे स्वरूप अनुभूती शाळेच्या मूलतत्वांना ( भारतीय संस्कृती व परस्परावलंबित्व ) धरून असल्याचे मत प्रमुख पाहुण्या डॉ. प्रीती अग्रवाल यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व देशाच्या भविष्यातील गरजा याबद्दल आपले मत मांडले. भविष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन व निरंतर शिक्षणाचे महत्व डाॕ, अग्रवाल यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासीस दास, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

जळगाव दि.16 प्रतिनिधी –  माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक श्री. शरद पवार यांनी ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आज पळसखेड त्यांच्या शेतातील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जैन इरिगेशन सि.लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, रंगनाथ काळे, माजी आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डाॕ. सुधीर भोंगळे, विजयअण्णा बोराडे, ॲड. रविंद्रभैय्या पाटील, संजय गरुड, डि. के. पाटील,  जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
ना. धों. महानोर यांचे चिरंजीव डाॕ. बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, भाऊ पुंडलिक महानोर, मुली मिरा, सरला, रत्ना व नातु शशीकांत व नातवंड यांच्याशी पारिवारिक संवाद साधला. आनंदयात्री या निवासस्थानी जवळपास अर्धा तास कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.
पळसखेडचे भुमिपुत्र कविवर्य ना. धों. महानोर व वाकोदचे उद्योजक भवरलालभाऊ जैन हे दोघंही माझे सहृदयी मित्र. दोघांनी शेत, शेती, माती आणि पाणी यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य केले. दोघं आता नाहीत मात्र त्यांचे कार्य हे शाश्वत आहे. कविवर्य ना. धों. महानोरांविषयी बोलताना  साहित्य, शेती आणि फळबागांच्या धोरणांवर शरद पवार यांनी मैत्रीपूर्ण आठवणी सांगितल्या. निसर्ग जवळून बघितला तेच त्यांच्या साहित्यात उतरले. त्यामुळेच शेतीविषयी वस्तुनिष्ठ धोरणांवर ते विधान परिषदेत भाष्य करत, अशी आठवण त्यांनी सांगितली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व राजकीय माध्यमातून त्यांनी वाचा फोडल्याचे शरद पवार म्हणाले. 1980 साली जळगाव पासून जी शेतकरी दिंडी काढण्यात आली. त्याच्या आयोजनामध्ये कवी ना. धो.  महानोर यांचा पुढाकार होता. जळगाव ते नागपूर अशा निघालेल्या या दिंडीमध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, प्रा.  एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व मी स्वतः तसेच प्रल्हादभाऊ पाटील व अनेक मान्यवर नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जावा असा आग्रह कवि ना. धों. महानोर यांनी धरून विधानपरिषदेत पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, मृदसंधारण आणि बंधा-यांची साखळी उभी करण्याचा आग्रह धरला. त्यांनी  स्वतः पळसखेडे आणि वाकोदच्या परिसरात बंधा-याची साखळी उभी करून दाखवली. रोजगार हमी योजनेशी निगडित शंभर टक्के शासकीय अनुदानावरती जी फळबाग योजना 1990-91 मध्ये महाराष्ट्रात राबविण्यास प्रारंभ केला. या योजनेची मांडणी करण्यात हि कवि ना. धों. महानोरांचा पुढाकार होता. शेती, पाणी, फळबागा व वनीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला कसा होईल, हे त्यांनी आवर्जून बघितले असेही श्री. शरद पवार म्हणाले.

वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय (बीएस्सी ॲग्रीकल्चर) सुरू करावे – शरद पवार यांचा अशोक जैन यांना सल्ला

जळगाव दि.16 (प्रतिनिधी) –  जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री. शरद पवार यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी श्री. शरद पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी श्री. शरद पवार यांच्यासमवेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, आशिष भिरूड, अजय काळे, जैन इरिगेशन सिस्टीम चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॕ.अनिल ढाके, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी कृषीशिक्षणास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या तंत्रनिकेतनामुळे मोठी सोय झाल्याचे निदर्शनास आणुन दिले.
कविवर्य ना. धों. महानोर यांचे गाव असलेल्या पळसखेडा पासून वाकोदचे अंतर चार किमीचे असुन भवरलाल जैन आणि कवि ना. धों. महानोर यांची मैत्री वाकोद गावातूनच लहानपणापासून वाढीला लागली. त्यांच्या आठवणीही हे तंत्रनिकेतन पाहताना जागृत झाल्या. या आठवणींना शरद पवार साहेबांनी यावेळी उजाळा दिला. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वाकोदचा वटवृक्ष, वाघूरचे पाणी, मरुभुमीतुन बाहेर पडताना ही भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंची पुस्तके भेट दिली. वाकोदच्या या परिसरात ॲग्रिकल्चर बिएस्सी सुरू करावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपिठ उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला शरद पवार साहेबांनी यावेळी अशोक जैन यांना केला. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे गेल्या 13 वर्षांपासुन हे कृषी तंत्रनिकेतन चालविण्यात येत आहे. वाकोदच्या 108  एकर परिसरात प्रात्यक्षिसह हे तंत्रनिकेतन विस्ताराले आहे. सातत्याने कायम अ श्रेणीत, कृषि क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे कॕम्पस, उच्चविद्याविभुषित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व सुविधायुक्त वसतीगृह, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय, बीएस्सी ॲग्रीची डीग्री पूर्ण करत असताना कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम देखील एकाच प्रक्षेत्रावर असलेली राज्यातील एकमेव संस्था आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ ठाणेला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक 2023 साठी रवाना

जळगाव दि. 13 जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक साठी रवाना झाला. महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक 2023 च्या स्पर्धा दि. 15 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान ठाणे येथील दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये होणार आहे.
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मुलींच्या संघात रीत नाथांनी, गीता पंडित, संस्कृती चौधरी, इशिका शर्मा, राजश्री पाटील तसेच मुलांच्या संघात शुभम चांदसरकर, तेजम केशव, करण पाटील, जाझीब शेख, अर्श शेख, रौनक चांडक, दक्ष चव्हाण यांची निवड झाली आहे. या खेळाडूंसोबत संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महिंद्रा, सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे यांनी पुढील स्पर्धेसाठी संघाचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या आहे.

(डावीकडून) खाली बसलेले अरविंद देशपांडे, चंद्रशेखर जाखेटे, विनीत जोशी, किशोर सिंह सिसोदिया. मागील रांगेत उभे असलेले रीत नाथांनी, गीता पंडित, संस्कृती चौधरी, इशिका शर्मा, राजश्री पाटील, शुभम चांदसरकर, तेजम केशव, करण पाटील, अर्श शेख, रौनक चांडक, दक्ष चव्हाण, जाझीब शेख.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त गांधीतीर्थ प्रश्नमंजुषेचे आयोजन

जळगाव दि. १२ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा’चे दि. १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान आयोजन केले आहे. या दरम्यान ‘गांधीतीर्थ’ या जगप्रसिद्ध संग्रहालयाला भेट देणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांसाठी या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. या काळात संग्रहालय पाहिल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न अभ्यागतांना विचारण्यात येतील. तीन सलग प्रश्नांना बरोबर उत्तर देणाऱ्यास आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थला देश-विदेशातील लाखो लोकांनी आजपर्यंत भेट दिली आहे. जळगावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवीत असते. यावर्षी गांधीतीर्थ प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जळगाव शहरातील नागरिकांसह, विद्यार्थी, शाळा-महाविद्यालये यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा

जळगाव दि. ८ (प्रतिनिधी) – भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर केले. ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात तीनपटीहून अधिक म्हणजेच ३६.६ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. सध्या कंपनीच्या हातात एकूण १९२९ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात अन्न प्रक्रिया विभागाकडे १००१.३ कोटी रुपयांच्या, हायटेक अॅग्री इनपुटसकडे ४०४.१ कोटी तर प्लास्टिक विभागाकडे ५२३.६ कोटी रुपयांच्या भरभक्कम ऑर्डर्स असल्याचे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

कंपनीच्या तिमाहिच्या एकत्रीत महसुलाचा विचार केला असता गत आर्थिक वर्षात १४१६.२ कोटी रुपये होता तो या आर्थिक वर्षात २०.१ टक्क्यांनी वाढून १७०१.० कोटी रुपये झालेला आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १८०.४ कोटी रुपये तर या वर्षी ती २५.९ टक्क्यांनी वाढून २२७.१ कोटी रुपये इतकी झाली. एकत्रित कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तो ११.८ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी तिप्पट झाला आहे म्हणजेच ३६.६ कोटी रुपये इतका झालेला आहे.

कंपनीचा गत आर्थिक वर्षातील एकल महसुल हा ८६१.७ तर ह्या वर्षी ३२.९ टक्क्यांनी वाढून ११४६ कोटी रुपये झाला. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १०९.७ कोटी तर या वर्षी ती ४३.४ टक्क्यांनी वाढून १५७.३ कोटी रुपये इतकी झाली. कंपनीच्या एकल कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तोटा ५.५ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी ५.८ पटीने वाढून २६.२ कोटी रुपये इतका झालेला आहे.

“३० जून २०२३ ला संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. या काळात कंपनीच्या एमआयएस, पाईप्स आणि टिश्यू कल्चर विभागातील उत्पादनांना चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सकारात्मक धोरणांमुळे कंपनीने वरील विभागात चांगला मार्केट शेअर मिळवला आहे. प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किंमतीत थोडी घट आणि खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन यामुळे एकत्रीत  संपूर्ण उत्पन्नात  २० टक्के आणि तिमाहीतील वाढ कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात २६ टक्के  करता आली. कंपनी संपूर्ण कर्ज कमी करणे, खेळत्या भांडवलाच्या चक्रात सुधारणा करणे आणि वाढीसह मार्जिनमध्ये पण सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. उत्पादनांत नाविन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाचे उपाय आणि वितरकांच्या जाळ्याचा विस्तार भारतात करणे यावर कंपनीचे व्यवस्थापन लक्ष केंद्रित करीत आहे. सध्याच्या आर्थिक  वर्षात आम्ही सकारात्मक वाटचाल दुसऱ्या तिमाहीत करत राहू अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी दिली. ”

 

आर्थिक वर्ष २०२३-२४ पहिल्या तिमाहीच्या एकल आर्थिक निकालाची ठळक वैशिष्ट्ये :-

  • कंपनीला प्लास्टिक विभागामध्ये किरकोळ बाजारातील चांगल्या ऑर्डर्स खास करून महाराष्ट्र, पश्चिम आणि दक्षिण भारतातील ऑर्डर्स जल जीवन मिशन (जेजेएम) उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण उत्पन्नात ३३ टक्के वाढ साध्य करता आली आहे.

  • निर्यात आणि प्रकल्प व्यवसायातील अपेक्षित घट यामुळे हायटेक कृषी विभागातील उत्पन्न जवळजवळ मागील तुलनेत सपाट म्हणजे तसेच सारखे राहिले. परंतु किरकोळ एमआयएस (२० टक्के) आणि टिश्यू कल्चर (४४ टक्के) या व्यवसाय विभागात खूप चांगली वाढ कंपनीने नोंदवली आहे कारण कंपनीने या व्यवसायांमध्ये उत्तम लक्ष केंद्रित केले आहे.

  • प्लास्टिक विभागाची कामगिरी उत्तम असून त्यामध्ये १०३ टक्के वाढ साध्य केली. जल जीवन मिशन (जेजेएम) आणि पीव्हीसी पाईप्सला असलेल्या महाराष्ट्र व पश्चिम भारतातील राज्यांमध्ये असलेल्या चांगल्या मागण्यांमुळे या विभागात उत्तम ऑर्डर्समुळे ही वाढ करता आली.

आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीच्या एकत्रित आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये :-

  • भारतातील पाईप आणि एमआयएस विभागातील चांगल्या ऑर्डर्समुळे संपूर्ण एकत्रित उत्पन्नात वाढ झाली आहे. प्लास्टिक विभागाच्या उत्तम कामगिरीमुळे जेआयएसएलला चांगला मार्जिन कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात साध्य करता आला.

  • हायटेक विभागात किरकोळ एमआयएस (२०टक्के वाढ) आणि टिश्यूकल्चर (४४ टक्के वाढ) झाली पण प्रकल्प आणि निर्यात व्यवसायांमध्ये मात्र अपेक्षित घट झाली. त्यामुळे हायटेक विभागाच्या संपूर्ण उत्पन्नात ३ टक्क्यांनी घट झाली.

  • जल जीवन मिशनला चांगला पुरवठा केल्यामुळे आणि पीव्हीसी व पीई पाईपमधील महाराष्ट्रातून असलेल्या चांगल्या ऑर्डर्समुळे ७.९ टक्के वाढ प्लास्टिक व्यवसायात नोंदवता आली.

  • भारतातील भाज्या निर्जलीकरण व्यवसायाने ९.८ टक्क्यांची आणि विदेशातील कृषी विभागात झालेल्या ७.६ टक्के वाढ साध्य केली. अंतिम गतवर्षी फळ प्रक्रिया विभागाने मात्र वजा वाढ एकत्रित निकालात नोंदवली. याचे कारण म्हणजे कच्च्या मालाची अनुपलब्धता असल्याने पक्का माल शिल्लक राहीला नाही.

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरव

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात आली. यामध्ये नाशिक विभागातून जळगाव केंद्रावर जानेवारी २०२३ मध्ये ही स्पर्धा झाली.

प्राथमिक फेरीत २२ च्यावर बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर झालीत. यात भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव या संस्थेने ‘ढ नावाची आधुनिकता’ हे बालनाट्य सादर केले. ‘ढ नावाची आधुनिकता’ या नाटकासाठी अरविंद बडगुजर यांनी उत्कृष्ट नेपथ्य केले. नाशिक विभागातून अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ट नेपथ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

नाशिक येथील परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात ७ जुलै ला हा सन्मान सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ नेपथ्यकर्मी चंद्रकांत जाडकर, जयदीप पवार, विजय साळवी, विभागीय पारितोषिक वितरण समारंभ समन्वय राजेश जाधव, मीना वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते अरविंद बडगुजर यांनी पुरस्कार स्वीकारला. अरविंद बडगुजर यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले आहे.

कविवर्य ना. धों . महानोर यांच्यावर पळसखेड येथे ४ ऑगस्टला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, दि ३ (प्रतिनिधी) – निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर दिनांक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात पळसखेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील त्यांच्या शेतात ‘सुलोचना बाग’ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुप्रसिद्ध कवीवर्य पद्मश्री महानोर दादा यांचे पुणे येथे दि. ३ ऑगस्ट रोजी औषधोपचार दरम्यान रुबी  हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांचे पश्चात दोन मुलं, तीन मुली, सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना महानोर यांचे दुःखद निधन झाले होते.

जेष्ठ कवीवर्य, पद्मश्री ना.धो. महानोर यांना भावपुर्ण श्रद्धांजली – अशोकभाऊ जैन

जळगाव : महाराष्ट्राचे निसर्गकवी म्हणून ख्यातीप्राप्त असलेले प्रगतीशील शेतकरी तथा पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित  ना.धों.महानोर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी 8.30 वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाप्रती जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती अशोकभाऊ जैन यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख असल्याचे अशोकभाऊ जैन यांनी म्हटले आहे . पद्मश्री ना.धो. महानोर यांनी दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केले होते.   ते पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जात होते. तसेच हायटेक ऍग्री कल्चर शेतीचे ते पुरस्कर्ते होते. आमच्या परिवाराचे जेष्ठ सदस्य असलेल्या महानोर दादांना  आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली – अशोक जैन भवरलाल अँड कांताबाई जैन परिवार, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, गांधी रिसर्च फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट  व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमीटेडचे सहकारी.

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन


जळगाव दि.२९ जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट क्लब यांची सभा दि.२८ जुलै ला संपन्न झाली. यामध्ये येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये स्व. किरण दहाव स्मृती टी-२० व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले. ही स्पर्धा अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर घेण्यात येईल. ही सभा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांच्या उपस्थितीत पार पाडली. या सभेत क्लब प्रतिनिधी, खेळाडू यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उत्कृष्ट प्रतिसाद दिला. अरविंद देशपांडे यांनी सभेची सुरुवातीला सर्वाचे स्वागत करित परिचय करून दिला. अविनाश लाठी यांनी येणाऱ्या क्रिकेट मौसमात घेण्यात येणाऱ्या स्व. किरण दहाड स्मृती टि-२० क्रिकेट स्पर्धा व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा याबाबत चर्चा करण्यात आली. विजेता व उपविजेता यांना चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. स्वराज रेडीयन्स चे संचालक तेजल पाटील यांनी विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफी देण्याची घोषणा केली. अशपाक शेख यांनी मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना वैयक्तिक पारितोषिके देण्याचे प्रायोजित केले. तर पंकज महाजन यांनी प्रत्येक सामनावीर खेळाडूस ट्रॉफी देण्याचे जाहीर केले आहे. सामन्यासाठी लागणारे चेंडू साठी अविनाश लाठी यांनी अंशतः अनुदान देण्याचे जाहिर केले. ही स्पर्धा साधारणत: २ ते ३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येतील. संघाचा सहभाग हा दि. १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे हे सर्व ऑन लाईन करण्यात

जॉईन Trading Buzz
Exit mobile version