स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

जळगाव दि. २० (प्रतिनिधी) – भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती केली, मात्र गांधीजींच्या विचारातून भारताचे भवितव्य घडविण्याचे मूल्यवर्धित काम आणखी खूप मोठ्या स्वरूपात करायचे आहे. स्वच्छता अभियान, वाहतूक नियमांचे पालन, सूत्रबद्धतेसह काटेकोर व्यवस्थापनाद्वारे कल्पनाशक्तीतून नवीन पिढी हे शिक्षणाच्या माध्यमातून करत आहे, त्याची रूजवात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेतून झाली आहे खरं तर ही प्रतियोगिता शाळा शाळा राबवून त्याची चळवळ व्हावी, असे अध्यक्षीय भाषणात अणूशास्त्रज्ञ तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर यांनी प्रतिपादन केले.

गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता-२०२४’ पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. अनिक काकोडकर यांच्यासमवेत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी संस्कार विचार परिक्षेचे समन्वयक गिरीष कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसमवेत भाविका महाजन, नारायणी वाणी आणि खिलेश कोल्हे या विद्यार्थ्यांना पाहुण्यांसमवेत उद्घाटना प्रसंगी व्यासपीठावर येण्याचा सन्मान मिळाला. संत कबीरजींच्या ‘चदरीया झिनी रे झिनी…’चे गाणे सर्वांचे लक्ष वेधून गेले.  प्रास्ताविक व निवेदन गिरीष कुळकर्णी यांनी केले.

अशोक जैन म्हणाले की,‘राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचे पालन, पर्यावरणाचा समतोल राखणे, शेतीविषयी आवड निर्माण करणे हे विषय शिकविले गेले पाहिजे, भौतिक विज्ञानयुगात आपण भविष्यासाठी काय वाढून ठेवतो आहे याचं चिंतन केले पाहिजे, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचा स्वच्छ शाळा प्रतियोगिता हा खूप मोलाचा उपक्रम आहे. ‘जेव्हा आंतरिक आणि बाह्य दोन्ही स्वच्छता असते तेव्हा ती देवत्वाकडे जाते’ या महात्मा गांधीजींच्या विचारातून गांधी रिसर्च फाऊंडेशन कार्य करत आहे. अहिंसेला मध्यबिंदू ठेवून सामाजिक जागृतीचे माध्यम ठरत आहे. महात्मा गांधीजींच्या शिकवणीनुसार खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी ग्रामीण भागात शेती आणि शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण फ्यूचर अॅग्रीकल्चर लिडर ऑफ इंडिया अर्थात फाली उपक्रमात सहभाग घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.’

 डॉ. सुदर्शन अयंगार म्हणाले, शाळा, घर, मोहल्ला, परिसर स्वच्छ करुन, जनजागृती करून स्वच्छता मोहिम आपण राबविली. मात्र मनाची स्वच्छता म्हणजे सूक्ष्म स्वच्छता सफाई करुन संवेदनशील मनाने नवीन विश्वाची निर्मीती करावे असे आवाहन त्यांनी केले.

पुरस्कार प्राप्त शाळा

महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे स्वरुप) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी (सती), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांना देऊन गौरविले गेले.

ग्रामीण भागातील विजेते

आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज, पेठवडगाव (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, मेहरुण, ता. जि. जळगाव. (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), सोमय्या विद्यामंदिर व उच्च माध्य विद्यालय, साकरवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर आणि राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

तालुका स्तरीय विजेते – विजेते

साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज,(प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), पां. बा. मा. म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव, ता. जि. जळगाव, (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

जिल्हा स्तरीय विजेते – विजेते

एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह),भारतीय जैन संघटना माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), दयानंद आर्य कन्या विद्यालय अँड जुनिअर कॉलेज, नागपूर, ता. जि. नागपूर आणि मातोश्री अकादमी द एक्सपेरीमेंटल स्कूल, तुकुम, चंद्रपूर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह) पारितोषिके वितरण अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अशोक जैन आणि डॉ. सुदर्शन आयंगार यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आभारप्रदर्शन  चंद्रशेखर पाटील यांनी केले.

विशेष पुरस्काराने सन्मान झालेल्या शाळा

मातोश्री माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, के ई एस कन्या शाळा, पांढरकवडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव. श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, फेस, ता. शहादा, जि. नंदुरबार जनता हायस्कुल, साकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव श्री रामेश्वर विद्यालय, वारी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग वाय. एम. खान उर्दू हायस्कुल, भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, संभाजीनगर, ता. जि. संभाजीनगर. राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुल्हे-पानाचे, ता. भुसावळ, जि. जळगाव. वल्लभ विद्या मंदिर, पाडळदा, ता. शहादा, जि. नंदुरबार, आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, नरके’ज पन्हाळा पब्लिक स्कुल व ज्यू. कॉलेज, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, प. न. लुंकड कन्या शाळा, जळगाव, ता. जि. जळगाव. जीवन विकास विद्यालय, देवग्राम, ता. नरखेड, जि.- नागपुर न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय, बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव. कृषक विद्यालय, कोटगाव, ता. नागभीड, जि. चंद्रपूर, शिवाजी विद्यालय, अंचरवाडी, ता. चिखली, जि. बुलडाणा. चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय, शेरेवाडी, ता. जि. सातारा नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व जुनियर कॉलेज, जळगाव, ता. जि. जळगाव. श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, लातूर, ता. जि. लातूर. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला कै. पी. के. शिंदे माध्यमिक विदयालय, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव. श्री तुळजा भवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर, ता. जि. धाराशिव पी. आर. हायस्कूल, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव मातोश्री उच्च प्राथमिक शाळा, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव, रॉयल पब्लिक स्कुल, भंडारा, ता. जि. भंडारा या शाळां पैकी प्रातिनिधीक २० शाळांचा विशेष सन्मानचिन्हाने सन्मान केला गेला.

महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व – डॉ. प्रभा रविशंकर

जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) – परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबत आयुष्यभर सावलीसारखे राहिले. या २५ वर्षांच्या काळात त्यांनी लेखन केलेल्या डायरीतून महात्मा गांधींच्या जीवनातील महत्त्वाच्या नोंदी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख घटनांबाबत संदर्भ आजही बघायला मिळतात याबाबतची माहिती एस.एन.डी.टी युनिव्हर्सिटीच्या इतिसाहाच्या प्रोफेसर तथा जीआरएफ रेसिडेंशिअल फेलो डॉ. प्रभा रविशंकर यांनी उपस्थितांना सांगितली.  ‘महादेव देसाई अ कंप्लेट सेक्रेटरीयट’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे डॉ. सुदर्शन आयंगार, अंबिका जैन आणि डीन डॉ. गीता धर्मपाल यांची उपस्थिती होती. आरंभी डॉ. प्रभा रविशंकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा परिचय गीता धर्मपाल यांनी करून दिला.

डॉ. प्रभा यांनी महादेवभाई देसाई यांच्याबाबत सांगितले की, त्यांचे बहुआयामी व्यक्तीत्व होते. त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते, भाषेवर प्रभुत्व होते ते चांगले भाषांतरकार होते. त्यांच्या लेखनात फारच अचूकता असे, इतकी अचूकता स्वल्पविरामाची चूक होत नसे. महात्मा गांधीजी आणि त्यांच्या संबंधाबाबत अनेक प्रसंगही त्यांनी श्रोत्यांसमोर सांगितले. १९१७ ते १९४२ अशी २५ वर्षे त्यांनी महात्मा गांधीजींची समर्पित सेवा केली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कसे महत्त्वपूर्ण होते याबाबतचा त्यांचा पैलू त्यांनी सांगितला.

चंपारण सत्याग्रहाचा प्रसंग आणि पुरीच्या जगन्नाथ मंदिरात महादेवभाई देसाईंनी जाणे या दोन कारणांमुळे झालेले त्यांच्यातील मनमुटाव या प्रसंगाबाबतही त्यांनी उपस्थितांना सांगितले. महादेवभाई एक मल्टी टॅलेंट व्यक्तीमत्व होते. ते मुगल गार्डन मधील एक गुलाब होय असे वर्णन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले. यावेळी नाट्यकर्मी रमेश भोळे, डॉ. प्रभा यांचे पती रविशंकर, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, पीडी, पीजी डिप्लोमाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुदर्शन आयंगार यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले.

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण

जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त व गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. जळगाव शहरातील शिक्षक, पालक व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनने मागील वर्षी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता मूल्याची रुजुवात व्हावी तसेच समाजात स्वच्छता विषयाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी शाळांनी वर्षभर कोणते उपक्रम राबवावे याबाबत एक मार्गदर्शिका देण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाचा सहभाग तसेच राबविलेल्या उपक्रमांची परिणामकारकता, सातत्य यावर मूल्यांकन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील ८० तालुक्यातील १६३ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. नोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यातील स्वयंमूल्यांकनावर आधारित अहमदनगर, अकोला, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, पुणे, रत्नागिरी, संभाजीनगर, सातारा, सिंधुदुर्ग, यवतमाळ या १९ जिल्ह्यातील २९ तालुक्यातील ४१ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. या सर्व शाळांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या टीमने प्रत्यक्ष भेट दिली.
जैन हिल्सवरील गांधी तीर्थाच्या कस्तुरबा सभागृहात दुपारी ३ वाजता हा सोहळा होणार आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेस रु. एक लाखाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शाळेस रु. एकावन्न हजार, एकतीस हजार व एकवीस हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच अंतिम मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या शाळांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना

जळगाव दि. १७ (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींचे मूल्य जीवनात अनुसरा, सत्य, निष्ठा आणि परिश्रम यावर विश्वास ठेवा आणि ग्राम विकासात आपले मोलाचे योगदान करा.’ असे आवाहन प्रो. लीला वसारिया यांनी विद्यार्थ्यांना केले. गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास आज जैन हिल्स येथे एका छोटेखानी कार्यक्रमात आरंभ झाला. त्यावेळी त्या उद्घाटक म्हणून उपस्थितांशी संवाद साधत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर अशोक भार्गव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदर्शन आयंगार आणि सौ. अंबिका जैन उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी अनिलेश जगदाळे यांनी साने गुरुजींची रचना ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…’ सादर केली. या अभ्यासक्रम आरंभ उद्घाटन आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. सामान्यपणे पाहुणे व मान्यवरांच्याहस्ते एक समयी प्रज्ज्वलीत करण्याची रिती आहे. पाहुण्यांसह या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात दीपक देण्यात आला होता व ज्योतीने ज्योत पेटवून अनेक दिवे प्रज्ज्वलीत झाले. यावेळी ‘ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो…’ या गाण्याचे मंद स्वर भारलेले वातावरण निर्माण करून गेले. आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाबाबतची पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे डॉ. आश्विन झाला यांनी माहिती देऊन संस्थेचा परिचय करून दिला.

कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे अशोक भार्गव यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. प्रगती साध्य करणाऱ्या जपानच्या कौटुंबीक आणि एकटेपणाने जगणाऱ्यांच्या समस्या सांगितल्या. कामाच्या तणावात तरुण लग्न न करता एकटे राहणे पसंत करतात व त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होत आहे एका वेगळ्याच प्रश्नांना जपान सामोरी जात आहे. अशा वेळी महात्मा गांधीजींचे तत्त्व उपयुक्त ठरतात असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व अनुभवाचा सुयोग्य वापर करून प्रगतीमध्ये आपला वाटा उचलावा असे सांगितले. भार्गव यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात ‘आसमां पे हे खुदा और जमी पे हम….’ आजच्या परिस्थितीचे वास्तव सांगणारे गाणे म्हटले. यावेळी सुदर्शन आयंगार आणि अंबिका जैन यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान!

जळगाव दि.१६ प्रतिनिधी –  मुलांचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वर्तमानातील बालपण आपण हरवित आहोत. सामाजिकस्तरावर स्थैर्य न ठेवता सरकार, समाज आणि शिक्षणातील बाजारीकरणामुळे सर्वच जण अस्वस्थ आहेत. शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक, पालक सर्वच जण वैचारिकदृष्ट्या तणावात आहेत. त्यामुळे शिक्षणाकडे फक्त नोकरी, व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता चारित्र्यशील आणि कुशल समाजाची निर्मितीचे साधन म्हणून शिक्षणाकडे बघितले पाहिजे. शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान आपल्या समोर असल्याचा सूर उमटला. त्यावर उपाय हा की, प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे त्यादृष्टीने ज्यानेत्याने महत्त्वाची भूमिका निभवावी, असे विचार गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘भारत में शिक्षा की चुनौतियाँ’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तूरबा सभागृहात झालेल्या चर्चासत्रात तरुण शांती सेनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भार्गव, गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी संचालक डॉ. लीला वसारिया, सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनचे व्याख्याता डॉ. विकास मणियार व हॅडलबर्ग विद्यापीठ जर्मनीच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. गीता धर्मपाल सहभागी झालेत. चर्चासत्राचे संचालन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अयंगार यांनी केले. शहरातील संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी खुल्या चर्चासत्रात प्रश्नोत्तराद्वारे सहभाग घेतला.

डॉ. लीला वसारिया यांनी मुलींचे शिक्षण व रोजगाराची निर्मितीतील त्यांचे स्थान यावर  भाष्य केले. २१ ते २८ वयोगटातील मुलींना रोजगाराच्या दृष्टीने शिक्षण मिळत नाही आणि शिक्षण मिळाले तरी कौटुंबिक जबाबदारांमुळे त्याचा उपयोग पाहिजे तेवढा करता येत नाही. अशोक भार्गव यांनी सांगितले की, मुलं हे नैसर्गिकदृष्ट्या शिकतात. त्यांचा मेंदू हा प्रत्येक गोष्ट  आत्मसात करत असतो. परंतु बालपणातच आपण त्यांच्यातील कुतुहल, प्रयोगशीलता, सृजनशिलता ह्या तीन गोष्टी हिरावून घेतो. त्यामुळे अवघा दोन टक्के समाज हा सृजनशील आणि सक्षम बनू शकतो. मिरर न्यूरॉन आणि महात्मा गांधी न्यूरॉन या दोन संकल्पनाही त्यांनी सोदाहरण सांगितल्या. डॉ. विकास मणियार म्हणाले, शिक्षणाचा कोणाला फायदा होतो, त्याचा उद्देश काय, शिक्षण देणारं कोण आहे या तीन प्रश्नांचा आधार घेत आजच्या शिक्षण व्यवस्थेतील राजकारण त्यांनी सांगितले. यात सरकार, समाज आणि बाजार यावर निर्भर असलेल्या शिक्षण पद्धतीचा ऊहापोह ही त्यांनी केला. समाजात समानता निर्माण होणारे शिक्षण असावे असे ही ते म्हणाले.

प्रो. डॉ. गीता धरमपाल यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे शिक्षण हवे.  आध्यात्मिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करणारे शिक्षण हेच खरे विकसीत शिक्षणाचे लक्षण आहे. भारतीय शिक्षण पद्धती आणि यूरोपीयन शिक्षण पद्धतीचा भेद त्यांनी उलगडून सांगितला. डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी तलाठी, ग्रामसेवक या पदासाठी पीएचडी धारकांचे अर्ज येणे  हे समाज स्वास्थाचे उदाहरण नव्हे असे सांगून शिक्षीत हे संस्कारशील असतीलच असे नाही तर अशिक्षीतसुद्धा संस्कारी असू शकतात. सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले. गिरीष कुळकर्णी यांनी आभार मानले.

डॉ. प्रभा रवि शंकर यांचे उद्या व्याख्यान – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कस्तूरबा सभागृह येथे उद्या दि. १८ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान डॉ. प्रभा रवि शंकर यांचे व्याख्यान आजोजित केले आहे. महादेवभाई देसाई एक परिपूर्ण स्वीय सहाय्यक या विषयावर ते मार्गदर्शन करतील. महादेवभाई देसाई हे महात्मा गांधींचे स्वीय सचिव आणि जवळचे मदतनीस होते. १९१७ ते १९४२ अशी २५ वर्षे त्यांनी महात्मा गांधीजींची समर्पित सेवा केली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. डॉ. प्रभा रवि शंकर या योगदानाविषयी आणि त्यांच्या आयुष्यातील बारीकसारीक पैलूंविषयी भाष्य करतील. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन यांनी केले.

विठूनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी

जळगाव, दि. १६ (प्रतिनिधी) –  अनुभूती स्कूल, जळगांव येथे दि. १६ जुलै २०२४ मंगळवार रोजी  दींडीसह आषाढी एकादशी आनंदात साजरी करण्यात आली. एकादशीच्या आदल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री कासार, भावना शिंदे, योगिता सुर्वे, हर्षा वाणी यांनी केले होते. यात विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी’ या सुंदर भजनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यही सादर केले.

यानंतर शालेय परिसरात विठूनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या भक्तीमय वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी पाऊलीवर ताल धरत दिंडीत सहभाग घेतला. मैदानावर रिंगण सोहळा रंगला. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ या जयघोषाने कार्यक्रम उत्साहात पार पडला. यासाठी अरविंद बडगुजर, ज्ञानेश्वर सोनवणे सर व भुषण खैरनार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने शिक्षणासमोरील आव्हाने विषयावर चर्चासत्र

जळगाव: येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने भारतातील शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात तरुण शांती सेनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भार्गव, गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी संचालक डॉ. लीला वसारिया, सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनचे व्याख्याता डॉ. विकास मणियार व हॅडलबर्ग विद्यापीठ जर्मनीच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. गीता धर्मपाल सहभागी होणार आहेत. चर्चासत्राचे संचालन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार करणार आहेत.
भारतातील शिक्षण क्षेत्रासमोर आगामी काळात येणाऱ्या संभाव्य आव्हानांसोबतच त्यावरील उपाय योजनांबाबत चर्चासत्रात खुली चर्चा करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते ५.३० वेळात गांधीतीर्थ, जैन हिल्स येथे आयोजित या चर्चासत्रात शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मान्यवरांसह उपस्थितांनाही चर्चेत सहभागी करून घेण्यात येणार असून त्यांचे शंका समाधान करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमी प्रथम विजेते

जळगाव दि.१५ प्रतिनिधी : –  जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत  ११ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते ठरलेत. तर ८ सुवर्ण, ४ रौप्यपदक पटकावत रावेर तालुका द्वितीय, ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन पाचोरा संघ तृतीय क्रमांकाने विजयी ठरलेत.

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. १४) जुलै ला जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त विशाल बेलदार यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, महेश घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर स्पर्धा या अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल शिरसोली रोड जळगाव येथे इलेक्ट्रॉनिक  स्कोरीग सिस्टीम वर जागतिक तायक्वांडो संघटनेच्या नियमांचे पालन करुन घेण्यात आली. स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची १९ ते २१ जुलै रोजी चंद्रपूर येथे  कॅडेट राज्य स्पर्धेसाठी तसेच २५ ते २७ जुलै रोजी बीड येथे होणार असलेल्या ज्युनियर मुलं व मुली यांच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही स्पर्धा या इलेक्ट्रॉनिक स्कोरीग सिस्टीम वर घेण्यात आली. पंच म्हणून निलेश पाटील, यश शिंदे, अमोल जाधव, जयेश बाविस्कर यांनी काम पाहिले, स्पर्धा यशस्वीतेसाठी पुष्पक महाजन, दानीश तडवी, दर्शन कानवडे आदींनी सहकार्य केले.

स्पर्धेतील कॅडेट सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे मुले :  अर्थव सोनार ( रावेर ), सोहम कोल्हे (बोदवड), निल सोनवणे (पाचोरा), मयुर पाटील (जळगाव), ईशांत चौधरी (पहुर), अमर शिवलकर (रावेर)

मुली : आराध्या पाल (बोदवड ), स्वाती चौधरी (पहुर), ज्ञानेश्वरी दिक्षित (रावेर), हर्षदा गायकवाड (रावेर), कोमल गाढे (जळगाव), समृद्धी कुकरेजा (जळगाव), रेवती देशमुख (पाचोरा)

ज्युनियर मुलं : ४५ किलो (सतिश क्षिरसागर) पहूर,  ४८ किलो ( साई निळे ) रावेर, ५१ किलो (सिद्धांत घेटे) रावेर, ५५ किलो (अनिरुद्ध महाजन) जळगाव, ५९ किलो (लोकेश महाजन) रावेर, ६३ किलो (प्रबुद्ध तायडे) रावेर, क्षितीज बोरसे (पाचोरा)

मुली : ४२ किलो (सिमरन बोरसे) जळगाव, ४४ किलो (देवयानी पाटील ) जळगाव, ४६ किलो (नाव्या वराडे) चाळीसगाव, ४९ किलो (वैष्णवी सातव) जळगाव, ५२ किलो (निकीता पवार) जळगाव, ५५ किलो (जागृती चौधरी) पहूर, ५९ किलो (ऋतुजा पाटील) पाचोरा, ६३ किलो (श्रावणी मोरे) जळगाव, ६८ किलो (स्पर्श मोहिते) जळगाव

सदर खेळाडूंना जयेश बाविस्कर (जळगाव), हरीभाऊ राऊत (पहुर), सुनील मोरे (पाचोरा), जिवन महाजन (रावेर), जयेश कासार (रावेर), शुभम शेटे (चाळीसगाव) याचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन यांनी कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न 

जळगाव दि.१५ प्रतिनिधी :-  जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे  खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.००  वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली.

जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी  जिल्हा संघात या खेळाडूंची निवड झाली. राज्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड हरियाणा मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुणवंत कासार प्रथम, तसीन तडवी द्वितीय, प्रशांत कासार तृतीय, अजय परदेशी चतुर्थ यांची निवड झाली.

जिल्ह्यातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फीडे आरबीटर अभिषेक जाधव, सीनिअर अर्बिटर परेश देशपांडे, नॅशनल अर्बिटर नथू सोमवंशी, फीड अर्बिटर आकाश धनगर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम केले. शकील देशपांडे, रवी दशपुत्रे, तेजस तायडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला.

नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पारितोषिके देण्यात आलीत. चंद्रशेखर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दि.२५ ते २८ जुलै २०२४ जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंव्यतिरिक्त अधिकाधिक संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

जळगाव, दि.७ प्रतिनिधी –  जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर, संत सावता नगर परिसर, चंदु अण्णानगर, कांताई नेत्रालय, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, शिवम नगर मित्र मंडळ यांचे सौजन्याने वनहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वेस्टर्न रेल्वे सुरत रेल्वे गेट क्रॉसींग समोरुन निमखेडी रोडने १००० हून अधिक निंब, वड, पिंपळ, करंज, बहुळा, कदम, चिंच, जांभूळ यासह स्थानिक मातीत वाढणारी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात मनपा आरोग्य अधिकारी तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, सौ. मनिषा उदय पाटील यांच्याहस्ते झाड लावून झाली. यावेळी सामाजिक वनिकरण विभागाच्या रोहिणी सोनार, राजेंद्र राणे, वन विभागाच्या अश्विनी ठाकरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक, सौ. संगिता नाईक, अॅड. सुनील खैरनार, जे. एम. तापडिया, अनिल जोशी, संजय ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, डॉ. नितीन विसपूते, हरित सेनेचे प्रविण पाटील, शिवमनगरचे अनिल पाटील व सहकारी, वसंत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. ‘एक दिवस वसुंधरेसाठी देऊया, झाडे लावून,  झाडे जगवूया’ या संकल्पातून जैन इरिगेशनने हा उपक्रमासाठी विशेष सहकार्य उपलब्ध करुन दिले. श्रीनाथजी हाउसिंग सोसायटी मधील हरिष लुंकड, गिरीष लुंकड, विजय तिवारी, मनोज देशमुख, स्वाती देशमुख यांच्यासह लहान मुलांनी व जैन इरिगेशनचे आर. एस. पाटील, संजय साळी, देवेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला. मालधक्क्यावरील हमाल बंधूंनीही वृक्षारोपणात सहभाग घेत सावलीसाठी झाडे लावली.

सी. एस. नाईक यांनी सांगितले की, ‘जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वृक्षारोपण मोहिमेला विशेष मार्गदर्शन केले असून त्यांच्याच सहकार्यातून आज वृक्षारोपण केले जात आहे. विद्यार्थ्यांसह आपण प्रत्येकाने उरलेले पाणी फेकून न देता एखाद्या झाडाला टाकले तर ती सहज वाढतील. आणि वाढलेले तापमान नियंत्रणात आणण्यास मदत करतील आणि आपले भविष्य सुकर करतील. प्रत्येकाने फक्त फोटो काढण्यापूरते झाडे लावू नये ती जगवली पाहिजे.’

दरम्यान ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी वृक्षारोपण उपक्रमास मनपास्तरावर पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. झाडांची निगा राखली जावी यासाठी १०० ट्रि गार्ड स्वत: लावणार असल्याचे जाहिर केले. राजेंद्र राणे, वसंत पाटील, प्रविण पाटील, डॉ. नितीन विसपूते, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन झाडे जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version