जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

जळगाव दि.१५ प्रतिनिधी – कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जातो. त्यातही प्रत्यक्ष अनुभूती देणारे जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार हे जगातील एकमेव कृषिमहोत्सव आहे. एकाच छताखाली जमिनीच्या मशागती पासून ते काढणी पर्यंत, काढणी पश्चात विक्री व्यवस्था, जल व मृद संधारण, अत्याधुनिक ठिबक सिंचन, फर्टिगेशन पद्धती, जैन ऑटोमेशन, रोपांची निर्मिती व लागवड प्रक्रिया, फ्युचर फार्मिंग म्हणजेच भविष्यातील शेतील, स्मार्ट अॅग्रीकल्चर याबाबत समजेल. शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या या महोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने यावे, तंत्रज्ञान बघावे ते आत्मसात करावे आणि प्रसारीत करावे जेणे करून उत्पादकता वाढविता येईल. आधुनिक शेतीचा अवलंब करुन सकारात्मक बदल घडविता येतो असे हॉर्टिकल्चर फलोद्यान माजी आयुक्त तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)चे माजी डी.जी.जी डॉ.एच.पी.सिंह  यांनी केले.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या सोबत सौ. बिमला सिंग, जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ.  बि. के. यादव, कृषी संशोधन विभागाचे संजय सोन्नजे उपस्थित होते.

हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफल, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापर यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. शाश्वत निर्यातक्षम उत्पादन केल्यामुळे योग्य भाव कसा मिळेल यासाठी फक्त मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष सल्ला त्यासाठी तज्ज्ञांची सुयोग्य मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. येथील तंत्रज्ञान पहावे, अनुभवावे, आपल्याजवळील काही संशोधणात्मक अनुभव असतील ते एकमेकांना सांगावे व गावांगावामध्ये जावून त्याचा प्रसार करावे असे आवाहनही डॉ. एच. पि. सिंग यांनी केले.

या कृषिमहोत्ससाठी मसाले पिकांचे प्रात्यक्षिक आहे. त्यात हिंग, लवंग, जायफळ, तेजपान, कापूर, कढीपत्ता, दालचिनी, मिरी, आले, हळद, लसुण, कांदा, मिरची, जिरे, धने यांचा समावेश आहे. यामध्ये १९ प्रकाराचे हळद, सात प्रकारचे लसूण आपल्याला पाहता येतील. कमी जागेत, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल यासाठी हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी चैतन्यदायी ठरेल.

हायटेक शेतीचा नवा हुंकार – जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

जळगाव दि. १४ (प्रतिनिधी) – शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’  पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत.  ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाधारित शेतीची कास धरली तरच चैतन्याचे व भरघोस उत्पन्नाचे मोठे संचित  शेतकऱ्यांच्या हाती लागेल हे त्रिवार सत्य आहे. या महोत्सवाची आधुनिक तंत्रज्ञान आणि नवचैतन्य ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे.  १४ जानेवारी २०२५ पर्यंत होणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ‘संजीवन दिन’ निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिक्स इन वन ह्या संकल्पनेत ऊसाची शेती, कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व  मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेले क्षेत्र याचा समावेश आहे.  कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्या जात आहेत. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, आले, लसूण यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता व अनुभवता येणार आहे.

*कृषी महोत्सवात १२ बैलगाड्यांची संकल्पना -*

आधुनिक काळात शेतीमध्ये बैल गाडी ही संकल्पना पुसट होत चालली आहे. ग्रामीण संस्कृतिचे जतन व्हावे आणि एक चांगला संदेश जावा यासाठी या महोत्सवात १२ बैल गाड्यांची संकल्पना उभारण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात यात्रा किंवा विशिष्ट तिथीला १२ गाड्या एकमेकांना बांधून एखादी व्यक्ती त्या ओढत असते. त्या बैलगाडीवर गावातील लोक बसलेले असतात. याच संकल्पनेच्या धरतीवर आधुनिक शेतीच्या तंत्राची, ठिबक सिंचन, पाईप, पाईप फिटींग, फिल्टर्स इत्यादी बाबी, तंत्रज्ञान अशी जैन इरिगेशनची उत्पादने या गाड्यांवर पहायला मिळतील. सेल्फीसाठी “जैन हायटेक एक्स्प्रेस” कृषी रेल्वेची कलाकृतीही जैन इरिगेशनच्या कला विभागातील आर्टिस्टद्वारा उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ही जैन हायटेक फार्मिंग एक्स्प्रेस कृषी क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याचं प्रतीकच आहे.

जैन हिल्स येथे या महोत्सवानिमित्त लागवड केलेले पिके त्यांचे माहिती फलके, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सज्ज आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये नव चैतन्य फुलण्यासाठी टिश्युकल्चर, सीड, सिडलींग यांचेही तंत्र एकाच छताखाली पहावयास मिळते. या महोत्सवाला भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

जळगाव दि. ७ प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सहआयोजीत “उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२४-२५”  अनुभूती निवासी स्कूल येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान पार पडल्यात. स्पर्धेत जिल्ह्यातील ५० संघाचे  २५० खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७  व १९ वर्षे वयोगटात उर्वरित जिल्ह्यातून अनुभूती निवासी स्कूल, जळगाव व पोदार इंटरनेशनल स्कूल चाळीसगाव या शाळांचे वर्चस्व दिसून आले. अनुभती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक अमोल पाटील, विजय संकत यांच्या हस्ते झाले.  क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे, श्री जाधव सर,  विवेक अहिरे, दर्शन गवळी हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह  यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. मान्यवरांच्या हस्ते  प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित सुवर्ण, रजत आणि कास्य पदक प्रदान करण्यात आले.

विजेता खेळाडूंचे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी कौतूक केले. विजयी संघातील खेळाडूंचे या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून किशोर सिंह, सुरेश थरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपीका ठाकूर, शुभम पाटील, पूनम ठाकूर, कोनिका पाटील, ओम अमृतकर, ओवी पाटील, जयेश पवार, देवेंद्र अहिरे, श्र्लोक जगताप यांनी काम पाहिले.किशोर सिंह सिसोदिया  यांनी सूत्रसंचालन केले. दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

बॅडमिंटन स्पर्धेचा निकाल – मुलांच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), जळगावचे काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (द्वितीय), भुसावळची ताप्ती पब्लिक स्कूल (तृतीय),

मुलींच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेर (द्वितीय), किड्स गुरुकुल इंटरनेशनल स्कूल (तृतीय)

मुलांच्या १७ वर्ष वयोटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम), पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (द्वितीय), डॉ. उल्हासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ (तृतीय),

मुलींच्या १७ वर्ष वयोटात तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ (तृतीय),

मुलांच्या १९ वर्षे वयोगटात प्रताप कॉलेज, अमळनेर (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिनावल ता. रावेर (तृतीय),

मुलींच्या १९ वर्षे वयोगटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम),  प्रताप कॉलेज, अमळनेर (द्वितीय), ए. सी. एस. कॉलेज, धरणगाव (तृतीय) विजयी झालेत.

‘भक्तामर की अमर गाथा’ संगीत नाटकाने जिंकले जळगावकरांचे मन

जळगाव, दि.२ (प्रतिनिधी) – ‘कर्म की भाषा को समझो, क्या पता हम सब की तकदीर बना दे…’ असा संदेश देणारी आदिनाथ भगवान यांची कथा आणि भक्तामर स्तोत्र पठण केल्याने प्राप्त होणारे लाभ अत्यंत प्रभावीपणे सादर करून जळगावकरांचे मन जिंकले. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हिलिंग सेंटरच्या कलाकारांनी २ ऑक्टोबरच्या सायंकाळी वेगळी अनुभूती दिली.
भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मनाली मुनोत लिखित ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर झाली.  रंगभूमीवर १०० कलावंत  ‘भक्तामर स्तोत्रातील’ देवत्व आणि चमत्कारी शक्ती यांची प्रभावीपणे सादरीकरण केली. दैनंदिन जीवनातील प्रसंग, चिंता, समस्या व भक्तामर स्तोत्रातील कोणती गाथा पठण करावी हे संगीत आणि नाट्याभिनयाच्या सहाय्याने जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले होते.
भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते  मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली.
यावेळी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या कार्यपरिचयाची  ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. विश्वस्त अशोक जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या स्नेहल चोरडिया, सीमा सेठीया आणि सुजाता शिंगवी तसेच नाटिकेच्या लेखिका मनाली मुनोत तसेच पद्माजी चंगेरिया यांचा सन्मान करण्यात आला. जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी केले.
सेवादास दलुभाऊ जैन, जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन,सचिव सुलेखा लुंकड तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन,ज्योति जैन, निशा जैन, शोभना जैन आणि डॉ. भावना जैन यांच्यासह राजकुमार सेठीया, प्रदीप मुथा, दिलीप गांधी,स्वरुप लुंकड, कस्तुरचंद बाफना, यांच्यासह छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह स्त्री – पुरुष पूर्ण भरला होता तर काही श्रोत्यांनी बाहेरच्या मंडपात मोठ्या स्क्रिनवर या नाटिकेचा आनंद घेतला.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेत जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, दि.2(प्रतिनिधी) –  चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवूया असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

 महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले होते. लाल बहादूर शास्त्री टॉवर येथे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी  डाॅ. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. ही यात्रा नेहरू चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत डाॅ. सुदर्शन अय्यंगार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, दिल्ली विद्यापीठाचे पुलिन नायक, डाॅ. भरत अमळकर, माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्योती जैन, डाॅ. गीता धरमपाल आदी मान्यवर उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डाॅ. शेखर रायसोनी, राजेंद्र मयूर, अनिश शहा, शिरीष बर्वे, अमर जैन, डाॅ. राजेश पाटील, उपायुक्त अविनाश गांगुर्डे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, एजाज मलिक, विनोद देशमूख, दीपक सूर्यवंशी, विष्णु भंगाळे, शिवराम पाटील, प्रवीण पगारीया, शोभना जैन, निशा जैन, डाॅ. भावना जैन यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य शहरातील  विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेचा समारोप महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन झाले. महात्मा गांधी उद्यानातील सभेची सुरुवात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आरंभी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो.. हे भजन म्हटले. यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहिंसेची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

डाॅ. सुदर्शन अय्यंगार  म्हणाले की, महात्मा गांधीजी हे देशासाठी जगले म्हणून ते आजही स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या 78 वर्षाच्या आयुष्यात 178 उपवास केले. समाज, राष्ट्रासाठी उपवास करताना आपल्यापेक्षा लहानांनी चुक केली असेल तर ती पालक म्हणून स्वीकारली व त्याचे प्रायाश्चित केले. आपल्या आयुष्यातील अनमोल असे 8 वर्षे त्यांनी कारागृहात घालविली. आजही महात्मा गांधीजींचे विचार, मुल्ये यावर आचरण केले जाते याबाबत गोष्टी स्वरूपात डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चुक ही व्यक्ती, परिवार, समाजात आर्थिक व्यवहारात, राजनैतिक व्यवहारात यासह कुठल्याही क्षेत्रात होऊ शकते. ती लहान असो किंवा मोठी असो त्याचे परिमार्जन हे स्विकृती, पश्चाताप आणि त्याचे प्रायश्चीत या तिनही गोष्टी केल्यानेच मनुष्याच्या चरित्र्यात सुधारणा होईल. यातून व्यक्तीमत्व घडेल आणि राजकिय नेतृत्त्व चारित्र्य संपन्न होईल असा संदेशही डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

या शाळांचा सहभाग – यात्रेमध्ये आनंदीबाई जोशी, जिजामाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडीत नेहरू, स्वामी विवेकानंद, सानेगुरुजी, भगतसिंग, डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते. विदेशी विद्यार्थीही सहभागी होते. बैलगाडीवर चरखा सूतकताई हे आकर्षण ठरले  होते. यात्रेत पुष्पावती गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, नंदिनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीअम स्कूल, के के उर्दू हायस्कूल, ए टी झांबरे विद्यालय, सेंट टेरेसा इंग्लिश मिडीअम, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कूल, यादव देवचंद पाटील, हरिजन छात्रालय या शाळांसह जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक व खेळाडूंसह यात्रेत सहभाग घेतला.

जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज भक्तामर की अमर गाथा संगीत नाटकाचे आयोजन

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ६.०० वाजता ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की, रंगभूमीवर १०० कलावंत  भक्तामर स्तोत्रातील देवत्व आणि चमत्कारी शक्ती जिवंत करतील, ज्यामुळे आमची श्रद्धा अधिक दृढ होईल आणि जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी केले आहे.

भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते  मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली आहे.  *भक्तामर की अमर गाथा* (संगीत नाटक) कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. जास्तीतजास्त संख्येने परिवारासह या कार्यक्रमाची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत

जळगाव दि. ४ प्रतिनिधी –  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित स्व. ॲड. बबनभाऊ बाहेती  यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१ वयोगटाखालील मूलं एकेरी चाचणी निवड अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा झाली. अॅड. रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने पुरुष एकेरीतील सर्व विजेत्या खेळाडूंसाठी रोख पारितोषिके देण्यात आलीत.पारितोषीक वितरणाप्रसंगी ॲड. रोहन बाहेती, अरविंद देशपांडे,  ॲड. रवींद्र कुळकर्णी, रोहित  कोगटा, अरुण गावंडे  उपस्थित होते.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रथम आलेल्या जैन स्पोर्टस अॅकडमीचे सय्यद मोहसीन यांनी ३००० रोख पारोतोषिकाने, नईम अन्सारी द्वितीय याला २००० हजार रुपये रोख, तृतीय आलेल्या अताउल्लाह खान ( प्लाझा क्रीडा संस्था) व चतुर्थ आलेल्या  हबीब शेख ( एकता क्रीडा मंडळ) यांना १५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शाहरुख शेख  पिंप्राळा हुडको, रईस शेख  तमन्ना क्रीडा संस्था, नदीम शेख  बिजली क्रीडा संस्था, मुबश्शिर सय्यद प्लाझा क्रीडा संस्था हे सुद्धा विजयी झालेत. विजयी झालेल्या खेळाडूंची मुंबई येथे दि. १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ५८व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.

याच स्पर्धेतून दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईला होणाऱ्या १८ व २१ वर्ष वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता यश धोंगडे, देवेंद्र शिर्के, हुझेफा शेख, उम्मेहानी खान, दुर्गेश्वरी धोंगडे आणि दानिश शेख यांची जळगाव जिल्हा संघात निवड  झाली आहे. स्पर्धेचे प्रमुख महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, प्रमुख पंच अब्दुल क़य्यूम ख़ान व शेखर नार्वरिया यानी काम पाहीले. जळगाव जिल्हा कॅरम संघटनेचे शाम कोगटा व नितिन बरडे यानी सर्व विजयी खेळाडूंचे  कौतूक केले

विठूनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी

जळगाव, दि. १६ (प्रतिनिधी) –  अनुभूती स्कूल, जळगांव येथे दि. १६ जुलै २०२४ मंगळवार रोजी  दींडीसह आषाढी एकादशी आनंदात साजरी करण्यात आली. एकादशीच्या आदल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री कासार, भावना शिंदे, योगिता सुर्वे, हर्षा वाणी यांनी केले होते. यात विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी’ या सुंदर भजनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यही सादर केले.

यानंतर शालेय परिसरात विठूनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या भक्तीमय वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी पाऊलीवर ताल धरत दिंडीत सहभाग घेतला. मैदानावर रिंगण सोहळा रंगला. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ या जयघोषाने कार्यक्रम उत्साहात पार पडला. यासाठी अरविंद बडगुजर, ज्ञानेश्वर सोनवणे सर व भुषण खैरनार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता.

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न 

जळगाव दि.१५ प्रतिनिधी :-  जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे  खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.००  वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली.

जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी  जिल्हा संघात या खेळाडूंची निवड झाली. राज्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड हरियाणा मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुणवंत कासार प्रथम, तसीन तडवी द्वितीय, प्रशांत कासार तृतीय, अजय परदेशी चतुर्थ यांची निवड झाली.

जिल्ह्यातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फीडे आरबीटर अभिषेक जाधव, सीनिअर अर्बिटर परेश देशपांडे, नॅशनल अर्बिटर नथू सोमवंशी, फीड अर्बिटर आकाश धनगर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम केले. शकील देशपांडे, रवी दशपुत्रे, तेजस तायडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला.

नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पारितोषिके देण्यात आलीत. चंद्रशेखर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दि.२५ ते २८ जुलै २०२४ जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंव्यतिरिक्त अधिकाधिक संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

जळगाव, दि.७ प्रतिनिधी –  जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर, संत सावता नगर परिसर, चंदु अण्णानगर, कांताई नेत्रालय, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, शिवम नगर मित्र मंडळ यांचे सौजन्याने वनहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वेस्टर्न रेल्वे सुरत रेल्वे गेट क्रॉसींग समोरुन निमखेडी रोडने १००० हून अधिक निंब, वड, पिंपळ, करंज, बहुळा, कदम, चिंच, जांभूळ यासह स्थानिक मातीत वाढणारी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात मनपा आरोग्य अधिकारी तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, सौ. मनिषा उदय पाटील यांच्याहस्ते झाड लावून झाली. यावेळी सामाजिक वनिकरण विभागाच्या रोहिणी सोनार, राजेंद्र राणे, वन विभागाच्या अश्विनी ठाकरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक, सौ. संगिता नाईक, अॅड. सुनील खैरनार, जे. एम. तापडिया, अनिल जोशी, संजय ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, डॉ. नितीन विसपूते, हरित सेनेचे प्रविण पाटील, शिवमनगरचे अनिल पाटील व सहकारी, वसंत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. ‘एक दिवस वसुंधरेसाठी देऊया, झाडे लावून,  झाडे जगवूया’ या संकल्पातून जैन इरिगेशनने हा उपक्रमासाठी विशेष सहकार्य उपलब्ध करुन दिले. श्रीनाथजी हाउसिंग सोसायटी मधील हरिष लुंकड, गिरीष लुंकड, विजय तिवारी, मनोज देशमुख, स्वाती देशमुख यांच्यासह लहान मुलांनी व जैन इरिगेशनचे आर. एस. पाटील, संजय साळी, देवेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला. मालधक्क्यावरील हमाल बंधूंनीही वृक्षारोपणात सहभाग घेत सावलीसाठी झाडे लावली.

सी. एस. नाईक यांनी सांगितले की, ‘जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वृक्षारोपण मोहिमेला विशेष मार्गदर्शन केले असून त्यांच्याच सहकार्यातून आज वृक्षारोपण केले जात आहे. विद्यार्थ्यांसह आपण प्रत्येकाने उरलेले पाणी फेकून न देता एखाद्या झाडाला टाकले तर ती सहज वाढतील. आणि वाढलेले तापमान नियंत्रणात आणण्यास मदत करतील आणि आपले भविष्य सुकर करतील. प्रत्येकाने फक्त फोटो काढण्यापूरते झाडे लावू नये ती जगवली पाहिजे.’

दरम्यान ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी वृक्षारोपण उपक्रमास मनपास्तरावर पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. झाडांची निगा राखली जावी यासाठी १०० ट्रि गार्ड स्वत: लावणार असल्याचे जाहिर केले. राजेंद्र राणे, वसंत पाटील, प्रविण पाटील, डॉ. नितीन विसपूते, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन झाडे जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version