जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी 

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात  कंपनीच्या कन्सोलिडेटेड वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ व नफा ९१ कोटी रुपये झाला आहे.  जळगाव येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.

आर्थिक निकालाची वैशिष्ट्येः

  • वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ७.० टक्क्यांनी विक्री वाढ.

  • वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचा कन्सोलिडेटेड एबिटा  (EBITDA) १६.८ % वाढला.

  • चालू आर्थिक वर्षात एकत्रित कर पश्चात नफा हा ९१ कोटी रुपयांचा दिसतो, गत वर्षांची तुलना केली असता १२०.८ कोटी रुपये इतका तोटा होता.

  • वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचे स्टॅण्डअलोन एबिटा (EBITDA) १०.३ टक्क्यांनी वाढला.

  • वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी स्टॅण्डअलोन निव्वळ नफा (PAT) ४१.२ टक्क्यांनी वाढून तो ₹५५.५ कोटी झाला.

ऑर्डर बुक: सध्या कंपनीच्या हातात एकत्रित आधारावर, १९२५ रुपये कोटीच्या ऑर्डर्स आहेत. ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादन व्यवसायाच्या ३८३ कोटी रुपयांच्या, प्लास्टिक विभागाच्या ४७१ कोटी आणि कृषी प्रक्रिया (ऍग्रो प्रोसेसिंग) विभागाच्या १०७१ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स समाविष्ट आहेत.

कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले की,“ (क्लायमेट चेंज) हवामान बदलाला भारतासह संपूर्ण जग सामोरे जात आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. विशेषत: मूल्यवर्धित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या आव्हानांना सामोरे जात कंपनीने किरकोळ व्यवसायात २५ टक्क्यांची भरीव वाढ केली आहे. कंपनीने प्रकल्प-आधारित व्यवसाय धोरणात्मकरित्या कमी केला आणि किरकोळ आणि निर्यात बाजारांवर लक्ष केंद्रीत केले ज्यामुळे चांगला नफा कमावला आहे आणि  महसूल मिश्रण (रेव्हेन्यू मिक्स) पूर्णपणे बदलले आहे. कापसासारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. 

चालू आर्थिक वर्षात पावसाळा सामान्य असेल असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.  चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण व्यवसायावर थोडा परिणाम होऊ शकतो, तथापि, आम्ही व्यवसायाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले, आम्ही किरकोळ व्यवसाय वाढवून नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.” 

-अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव

मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन

जळगाव दि.१६ (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था, व तालुकात कृषि कार्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथ यात्रेचे उद्घाटन आज जैन हिल्स येथे कृषि पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबार तडवी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

मंगळ ग्रह मंदीर संस्थानच्यावतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, अभियंता संजय पाटील, जी. एस. चौधरी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, आर. टी. पाटील, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, सुनील गोसावी, निलेश महाजन, रवींद्र बोरसे, विशाल शर्मा, आशिष चौधरी, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमाचे महत्त्व विषद केले, तर मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहीत प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधीवत पूजन केले.

शेतकऱ्यांच्या जनजागृती रथ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील १५४ गावांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे खरीप हंगाम २०२४ पूर्वी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा खरेदी केल्या जातात. त्यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यांची फसवणूक टळावी, जागृती यावी, यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबची शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध, वास्तव माहिती प्राप्त होणार आहे.

‘भारतातील ऐतिहासिक अशा देवभूमी अमळनेर येथे मंगळ ग्रहाचे मंदीर आहे. त्या मंदीरामार्फत निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं. धर्म-ज्ञान हे तर त्यांचं क्षेत्रच आहे. ते त्यांचे प्राथमिक, मुख्य काम असले तरी समाजातील वेगवेगळ्या वर्गाला जन जागृतीच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात. थेट लोकांपर्यंत जनजागृती भिडते, त्यातून एक चांगला संदेश पोहोचतो व त्यानुसार लोक मार्गक्रमण करत असतात. त्याच कडीमध्ये आपल्या मंगळ ग्रह मंदिराच्या मार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रथ काढतात. त्या रथ यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामकाजात या ज्ञानाचा वापर करतात. जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही व उत्पादनही वाढेल. या उपक्रमात अमळनेर कृषि विभागानेही मोलाची साथ दिलेली आहे. या उपक्रमास शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षापासून या सोबत शेती आणि शेतकरी तसेच जैन इरिगेशन हे जे अतूट नाते आहे या उपक्रमात जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावे. या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती व उच्च तंत्रज्ञान ही पोहोचवू. जेणे करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक असे जैन इरिगेशनचे संस्थापक आमचे वडील भवरलालजी जैन म्हणत असत. सर्व मिळून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून या…’

  • अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य – अशोक जैन

जळगाव दि.10 प्रतिनिधी – “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते. भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे. मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही! मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे.

मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात. देशभक्त आणि जागरुक नागरिक मतदान करतात व देशाच्या लोकशाहीला बलशाही करतात. आज जगामध्ये बऱ्याच घडामोडी होत आहेत. एक स्थिर सरकार भारतात निकडीचे आहे. भारत परत एकदा जगामध्ये अग्रेसर होण्याचा उंबरठ्यावर उभा आहे. गरज आहे भारत देशाला विकासीत आणि सुरक्षित करण्याची. सर्वांना एकत्र घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याची. देशभक्त आणि कर्तव्यदक्ष नेतृत्त्व म्हणजे आपला भारत देश सर्वदृष्ट्या सक्षम होणे. चला मतदान करुया!”  – श्री. अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

आगम वाचना शिबीराचा समारोप

जळगाव, दि. ७ (प्रतिनिधी) – मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे.  मानवी जीवनाला प्रकाशमान करणारे ठाणांग सूत्र आगम वाचना हे पाप प्रवृत्तीपेक्षा धर्मवृत्ती ही श्रेष्ठ असल्याची शिकवण देते आणि धर्माची ताकद वाढविते, असे आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी सांगितले. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे तिन दिवसीय जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा आज समारोप झाला. यावेळी विजय रत्नसुंदरसुरीश्वरीजी महाराज साहेब श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करत होते.

या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार यांचा हृदय सत्कार गुरूदेवांच्या सान्निध्यात यावेळी करण्यात आला. हा सत्कार जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मय जैन यांनी स्वीकारला. शाल, मोत्याचा हार असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, प्रविण सिसोदिया, स्वरूप लुंकड, दिलीप गांधी, संजय गांधी यांच्यासह कौशीक संघवी, निखील कुसमगंज, प्रमोद भाई, कानजीभाई यांनी हा सत्कार केला. यावेळी सूत्रसंचालन नितीन चोपडा, संजय गांधी यांनी केले.

 ठाणांग सूत्रांचा उपयोग कसा करावा, बुद्धीगत की हृदयगत यावर विवेचन करताना आगम वाचना मधील सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मसिद्धात होय. श्रेष्ठ भावना ही मैत्र भावना ठेवावी, श्रेष्ठ व्रत अहिंसा, श्रेष्ठ दृष्टी अनेकांत दृष्टी, श्रेष्ठ भाव उपशम भाव, श्रेष्ठ रस शांत रस याचे हृदयगत आचरण करावे बुद्धीगत नाही. कुठलीही व्यक्ती, वस्तू, परिस्थिती हे आपल्याला दु:खी करत असेल, अपमानित करित असेल तर ती माझी स्वत:ची चुक आहे पुर्वभवामधील पुण्याचा प्रभाव आहे, असेच समजावे. यासाठी धर्मबिंदू आणि धर्मरत्न हे प्रकरण वाचावे असेही महाराज साहेब सांगतात. गुरू शिष्याच्या नात्यांवर भाष्य करताना प्रभू श्रीरामासारखे गुरू शिष्याचे नाते असावे. आपल्या दृष्टीला चांगली वाटणारी गोष्ट आपल्या गुरूंना चांगली वाटेल असे नाही. आगम वाचन हे जीवनातील कोच, गाईड, कॅप्टन प्रमाणे काम करतात. सत्याचा आधार धरून जीवनात परिवर्तन करण्याचे काम हे विचार करतात. यासाठी संपूर्ण वातानुकुलित असलेल्या बसच्या ड्रायव्हरला उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात, त्याच प्रमाणे गुरूंचे कार्यही असते. दिवसभरात सहा वेळा नवकार बोलण्याने सदगती प्राप्त होईल याची गॅरंटी नाही, मात्र नवकार प्रत्यक्ष आचरणात आणल्याने सदगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे विचार परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रेयस कुमट, नरेंद्र सांडेचा, दीपक राखेचा, कमलेश बोरा, राजू कावड, सागर पाटील, अमित कोठारी, किरण जैन निबजिया, निखिल शाह, सुनील शेठ, राहुल कोठारी, महिपाल निबजिया, जीतू गांधी, कुणाल निबजिया, गौरव गांधी, नरेंद्र नानेशा,  संजय कासवा, अजय मुणोत, दीपक निबजिया आदिंनी परिश्रम घेतलेत.

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरव

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात आली. यामध्ये नाशिक विभागातून जळगाव केंद्रावर जानेवारी २०२३ मध्ये ही स्पर्धा झाली.

प्राथमिक फेरीत २२ च्यावर बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर झालीत. यात भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव या संस्थेने ‘ढ नावाची आधुनिकता’ हे बालनाट्य सादर केले. ‘ढ नावाची आधुनिकता’ या नाटकासाठी अरविंद बडगुजर यांनी उत्कृष्ट नेपथ्य केले. नाशिक विभागातून अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ट नेपथ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

नाशिक येथील परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात ७ जुलै ला हा सन्मान सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ नेपथ्यकर्मी चंद्रकांत जाडकर, जयदीप पवार, विजय साळवी, विभागीय पारितोषिक वितरण समारंभ समन्वय राजेश जाधव, मीना वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते अरविंद बडगुजर यांनी पुरस्कार स्वीकारला. अरविंद बडगुजर यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले आहे.

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

जळगाव : जैन इरिगेशनच्या जैन हिल्स, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा त्याच प्रमाणे अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून त्या त्या लोकेशनवर योग मार्गदर्शकांनी कोरोनाचे नियम पाळत योग अभ्यास करून घेतला. योग दिनाचे महत्त्व समजून घेत नियमित योग करून निरामय आरोग्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

जैन प्लास्टीक पार्क व टिश्युकल्चर पार्क : ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन आणि दोन प्राणायम हे योग करून प्रत्येक व्यक्ती निरामय जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास योगसाधक सुभाष जाखेटे यांनी व्यक्त केला. जैन प्लास्टिक पार्क व टाकरखेडा येथे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोरसे यांनी केले. प्लास्टिक पार्कचे सुमारे ६०० हून अधिक सहकारी, टिश्युकल्चर पार्क येथील महिला सहकाऱ्यांनी देखील यात हिरीरीने सहभाग घेतला होता.

जैन फूड पार्क येथे योगसाधना शिबिर : जैन व्हॅली येथे जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अ‍ॅग्री पार्क, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सुमारे १००० सहकाऱ्यांनी जैन व्हॅली येथील मसाला प्रक्रिया प्लांट जवळ योगसाधना केली. योग प्रशिक्षक सौ. ज्योती पटेल यांनी योग प्रशिक्षण दिले. ऑक्सीजनची पातळी वाढविण्यासाठी ताडासन करून घेतले. श्वसन शक्ती वाढविण्यासाठी चंद्र व सूर्य नासिका पित्त, मयूरासन, अर्धमयूरासन, प्राणायम, सुर्यनमस्कार केले. पचनशक्तीसाठी पार्श्वोस्तासन, हात व खांद्यासाठी कुक्कुटासन, शरीर लवचिक होण्यासाठी आंजनेयासन, कंबर व पाठीसाठी भुजंगासन शलभासन, तणाव कमी करण्यासाठी अर्धचक्रासन, त्रिकोणासन, गरूडासन करून घेतले. तत्पूर्वी त्यांनी योगदिनाचे शास्त्रीय व अध्यात्मिक महत्त्व ज्योती पटेल यांनी समजून सांगितले. जैन टिश्यूकल्चर पार्कच्या वरिष्ठ सहकारी सौ. अनिता यादव यांच्याहस्ते सूतीहार देऊन ज्योती पटेल यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. व्ही. आर. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रमोद करोले, बालाजी हाके, अरविंद कडू, रोशन शहा, संजय पारख, असलम देशपांडे, उदय महाजन, नितीन चोपडा यांसह इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी मानव संसाधन व कार्मिक विभागाच्या जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, आर. डी. पाटील, भिकेश जोशी व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभले तसेच ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

अनुभूती निवासी स्कूल व अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल : अनुभूती इंटरनॅशन निवासी स्कूल येथे इयत्ता 5 वी ते 12 च्या संपूर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकतेर कर्मचाऱ्यांनी योगसाधना केली. योगशिक्षीका डॉ. स्नेहल पाटील यांनी विविध योगासने करून घेतली. योग एक जीवनशैली यावर मार्गदर्शनही डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार योगदिन साजरा करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील योग दिवस साजरा झाला.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version