जळके येथे टोमॅटो पीक परिसंवादात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव, दि. १ (प्रतिनिधी) –  कागोमी टोमॅटोचे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत.  जैन इरिगेशन आणि कागोमी कंपनी ४ वर्षांपासून संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी काम करत आले आहे. शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळावे हीच तळमळ प्रत्येक सहकाऱ्याची आहे. टोमॅटो करार शेती उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन  कागोमीचे भारतातील प्रमुख मिलन चौधरी यांनी केले. जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड आणि कागोमे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व जळके येथील गजानन ठिबक यांच्या संयुक्त विद्यमाने टोमॅटो पीक  परिसंवाद आयोजला होता त्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी शरद पाटील, कृषी मंडल अधिकारी मिलिंद वाल्हे, कागोमीचे सहकारी संदीप जाधव, मनोहर देसले, जैन इरिगेशनचे करार शेती प्रमुख गौतम देसर्डा, श्रीराम पाटील, विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे, एस.एन. पाटील,  गजानन ठिबक जळकेचे संचालक पी.के. पाटील त्याच प्रमाणे सुधाकर येवले व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास पंक्रोशीतील सुमारे ४०० शेतकरी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे वितरक असलेले पी.के. पाटील हे वडिलोपार्जित शेती देखील करतात. उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते आपली शेती करतात. गत चार वर्षांपासून ते टोमॅटोची लागवड करून भरघोस उत्पादन घेत आहेत. इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम शेतकऱ्यांची शिवार फेरी झाली. टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जाऊन लागवडीची पद्धत, मल्चिंगचा तसेच आत इनलाईन ठिबक सिंचनाचा केलेला वापर इत्यादीचे अवलोकन शेतकऱ्यांनी केले. श्रीराम पाटील व करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.  पुढच्या वर्षी टोमॅटोची लागवड करायची असेल तर आदल्या वर्षापासूनच तयारी करणे श्रेयस्कर होते.

जैन इरिगेशनची टोमॅटो, पांढरा कांदा आणि हळद याची करार शेती प्रकल्पाची संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. हळदीची देखील शेतकऱ्यांनी लागवड करावी. दहा महिन्यांमध्ये क्विंटल नव्हे तर टनामध्ये हळदीचे उत्पादन घेता येते त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो असे सांगून हळद लागवड करावी असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक गजानन ठिबकचे संचालक पी के पाटील यांनी टोमॅटो लागवडीचे आपले अनुभव सांगितले. त्यात ते म्हणाले की, गेल्यावर्षी त्यांना ५८ मेट्रीक टन टोमॅटोचे उत्पादन मिळाले होते. या वर्षाची पीक परिस्थिती पाहिली असता ६० टनांहून अधिक टॉमॅटोचे उत्पादन अपेक्षीत असल्याचे ते म्हणाले. टोमॅटोचे पीक फायद्याचे कसे ठरते याबाबत सविस्तर सांगण्यात आले.

कामोमी कंपनीचे करार शेती विभागाचे सहकारी मनोहर देसले यांनी या परिसंवादात टोमॅटोची लागवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत माहितीत सांगितली. शाश्वत शेती करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. पारंपरिक पद्धतीने केलेली शेती परवडणारी ठरत नाही. पिकाची निवड, पीक पद्धती, फर्टिगेशन, ऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी महाराष्ट्र विपणण प्रमुख एस.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शरद पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. या योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल. याविषयी परिसंवादात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. सोळुंके व आभारप्रदर्शन श्रीराम पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.

‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम 

जळगाव दि.२८ प्रतिनिधी –  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’  हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे उद्या दि. २९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे. महात्मा गांधी यांचे अनेक अपरिचीत पैलू व त्यांच्याविषयी असलेले अनेक समजगैरसमज याचा शोध घेणारा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची आहे. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची आहे. निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार आहेत. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत आहेत. सदर याकार्यक्रम सर्वांसाठी खूला असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन जळगाव यांनी केले आहे.

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट अॅग्रीकल्चर महत्त्वाचे – डॉ. एच. पी. सिंग

 जळगाव, दि.१९ (प्रतिनिधी) – ‘मसाले पिकांच्या शाश्वत शेतीसाठी उच्च तंत्रज्ञान, शुद्ध बी-बियाणे, टिश्यूकल्चर रोपे, आधुनिक सिंचनाची व फर्टिगेशनची व्यवस्था झाली तर मसाले पिकांची शेती परवडणारी ठरेल, असा सूर तज्ज्ञांचा निघाला. तर ‘जगभरातील मसाले पिकांच्या शेतीत प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे; या स्पर्धेत अव्वल ठरायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे,’ असे विचार डॉ. एच.पी. सिंग यांनी व्यक्त केले.  यात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रिसिजन फार्मिंग, गुणवत्ता पूर्ण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मसाले पिकासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. याबाबत या राष्ट्रीय मसाले परिषदेत चर्चा करण्यात आली. यात ७ तांत्रिक सत्रे, ५६ पेपर्स, ३६ किनोट ऍड्रेस, २६ प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. दोन दिवसात तज्ञांनी केलेल्या चर्चेतून त्याचा अहवाल तयार करून शासनाकडे लवकरच पाठवून त्याची ध्येयधोरण ठरवण्याकामी मोलाची भूमिका असेल.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन फार्मफ्रेश फूड्स लि., कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), यांच्या संयुक्त विद्यमाने (मसाले व सुगंधी पिकांच्या मूल्यवर्धित साखळी व्यवस्थापन) या ‘राष्ट्रीय मसाले परिषद २०२५’ चा समारोप जैन हिल्स च्या परिश्रम हॉलमध्ये झाला. याप्रसंगी चाईचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, प्रमुख अतिथी म्हणून अॅग्रीकल्चर सायन्स टिस रिक्रूटमेंट बोर्ड दिल्लीचे सदस्य डॉ. मेजर सिंग, डॉक्टर वायएसआर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. गोपाल, माजी कुलगुरु डॉ. टी. जानकीराम, आयआयएसआरचे माजी संचालक डॉ. निर्मलबाबु, जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. अनिल ढाके उपस्थित होते.  प्रास्ताविक डॉ. निर्मलबाबु यांनी केले.  जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ बालकृष्ण यादव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. डॉ. सुब्रह्मण्यम यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. के. बी. पाटील यांनी आभार मानले.
 भारतभरातील आलेल्या तज्ज्ञांचे जैन हिल्स येथील दोन सभागृहांमध्ये तांत्रिक सादरीकरण झाले. याबाबतचा एकत्रित अहवाल या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक निर्मल कुमार यांनी सादर केला. यात बडी हांडा हॉलमधील सत्रात मसाल्यांमध्ये मूल्यवर्धितीत व्यवस्थापन यावर संशोधन पेपर सादर केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. टी. जानकीराम, सहअध्यक्ष डॉ पद्मनाभन बी, संयोजक म्हणुन डॉ. के. बी. पाटील,  सुनील गुप्ता, डॉ. टी. जाकीरीया होते.
मिरची बाजारात भारताचे जागतिक नेतृत्व यासह प्रमुख मसाल्यांची औषधी गुणधर्म यावर डॉ. टी. जाकीरीया यांनी सादरीकरण केले. वैविध्यपूर्ण वाण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि मजबूत निर्यात धोरणांद्वारे चालवलेले प्रयत्न सांगितले‌. दीर्घकालीन यशासाठी शाश्वत कृषी पद्धतींना प्राधान्य दिले पाहिजे. हवामान बदल आणि बाजारातील चढउतारांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि स्थानिक समुदायांमध्ये भागीदारी वाढवणे. शेतकऱ्यांना स्थानिक बाजारभावाच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळवून देतात त्यासाठी त्यांनी जैन इरिगेशनची करार शेती सारखे मॉडेल महत्त्वाचे ठरेल. जैन फार्म फ्रेश फुड चे सुनील गुप्ता यांनी मसाल्यांच्या संदर्भात जीएमपीएस आणि जीटीपीएस साठी गुणवत्ता आणि मानके यावर सादरीकरण केले. त्यात त्यांनी फुड सेफ्टी, पॅकिंग, क्लिनिंग सह जागतिक मानांकनासह गुणवत्ता पूर्ण उत्पादन घेता येऊ शकते. जैन व्हली स्पाईस हे मसाल्या पिकातील नैसर्गिकता जपते. सूर्यप्रकाशात किंवा खुल्या वातावरणात मिरची, हळद सह अन्य मसाल्यांची पिके वाळवू नये. त्यासाठी कंट्रोल डिहाइड्रेशन केले पाहिजे.  दीपक पारिख यांनी मसाले आणि सुगंधी पदार्थांच्या मूल्य साखळीमध्ये नाविन्यपूर्ण संशोधनावर भाष्य केले. मसाल्यांची पिके उत्पादनात भारत महत्त्वाचा देश आहे मात्र निर्यातीत आपला प्रभाव कमी होताना दिसतो आहे. मसाल्याची मूल्यवर्धित शेतीसाठी आव्हाने,दळणवळणाच्या वेळी हाताळणी, गुणवत्ता यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. यासाठी डाटा बेसचा वापर करून कृत्रिम बुध्दिमत्तेसह अन्य डिजिटल साधनांचा वापर केला पाहिजे. डॉ. बी. नीरजा प्रभाकर यांनी हळदीतील आवश्यक तेलांच्या वाढीच्या उत्पादनाच्या निष्कर्ष आणि गुणवत्तेवरील अभ्यास यावर सादरीकरण केले.
परिश्रम हॉलमध्ये मसाल्यांमध्ये उत्पादन प्रणाली आणि मूल्यवर्धन आणि दर्जेदार बियाणे, लागवड साहित्य आणि वाढीव नफ्यासाठी वनस्पती आरोग्य सेवेतील नवकल्पना या विषयावर हे सत्र झाले.
त्याचे अध्यक्ष डॉ. प्रभात कुमार, डॉ. अनिल पाटील, डॉ. विकास बोरोले आदि होते. जैन इरिगेशनचे बी. डी. जडे यांनी मसाले पिकांमध्ये ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन यांचा उपयोग, डॉ जयशंकर परिहार यांनी गुणवत्तेवरील मसाले पदार्थांच्या जीओ मेटिक या विषयावर प्रकाश झोत टाकला. तर समाधान बागूल यांनी अश्वगंधा आणि इसबगोल या औषधी वनस्पतींबाबत सादरीकरण केले. जैन इरिगेशन चे डॉ.बालकृष्ण यादव यांनी काळी मिरी उत्पादनाबाबत सांगितले. डॉ. एच. पी. सिंग, डॉ. अनिल ढाके यांच्या हस्ते तांत्रिक सत्रात सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तज्ञांचे उत्कृष्ट सादरीकरणाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यात डॉ. गोपाल के डॉ. टी जानकीराम, डॉ. नीरजा प्रभाकर, डॉ. एस एन गवाडे, डॉ. रघुवीर सिलारो, डॉ. याइर एशेल, डॉ. पंचभाई, डॉ बाळकृष्ण यादव यांचा समावेश होता.

जैन हिल्स येथे दोन दिवसांची ‘राष्ट्रीय मसाला परिषद’ सुरू

जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) – ‘मसाले व सुगंधी वनस्पती पिकांसाठी शेतकऱ्यांना सुयोग्य मशागतीची पद्धती आणि गुणवत्तेची रोपे उपलब्ध करून दिले तर या क्षेत्रात खूप मोठी प्रगती होऊ शकते. जैन इरिगेशनने याबाबतचे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे असे मोलाचे विचार प्रमुख पाहुणे डॉ संजय कुमार यांनी व्यक्त केले. १८ व १९ जानेवारी रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन फार्मफ्रेश फूड्स लि., कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), यांच्या संयुक्त विद्यमाने (मसाले व सुगंधी पिकांच्या मूल्यवर्धित साखळी व्यवस्थापन) ‘राष्ट्रीय मसाले परिषद २०२५’ जैन हिल्स येथे आयोजली आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, आयआयएसआर केरलाचे माजी संचालक डॉ. निर्मल बाबू, ग्लोबल एग्रीकल्चरल कन्सल्टंट सिइओ (इस्त्राईल) याइर इशेल, वर्ल्ड स्पाइस ऑर्गनायझेशनचे चेअरमन राजकुमार मेनन, भारत सरकारचे फलोद्यान आयुक्त डॉ. प्रभात कुमार, डॉ. संजय कुमार (चेअरमन, एएसआरबी, नवी दिल्ली), डॉ. मेजर सिंग (सदस्य, एएसआरबी, नवी दिल्ली), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वायएसआर अॅग्रिकल्चर विद्यापीठ आंध्रप्रदेशनचे कुलगुरू डॉ. गोपाल के. आदी उपस्थित होते. तसेच मसाले पीक घेणारे जिल्ह्यातील शेतकरी, संशोधक, तंत्रज्ञ, अभ्यासक यांचीही उपस्थिती होती.

आरंभी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी स्वागतपर सुसंवाद साधला. ते म्हणाले की, जगाच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे. त्यामुळे जगात मसाले पदार्थांना मागणी वाढलेली आहे. मसाले हे अन्नपदार्थांना चविष्ठ बनवतात, शिवाय त्यांच्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. शेतकरी, सरकार, संशोधन संस्था, खासगी कंपन्या, मसाल्यांवर काम करणाऱ्या समुहास या क्षेत्रात काम करण्याची खूप मोठी संधी असल्याचे सांगून मिरी या पिकात भारत जगामध्ये अग्रणी बनू शकतो असे मत अतुल जैन यांनी व्यक्त केले. मसाले उद्योगाबाबत सरकारकडे ध्येय धोरणे ठरविताना विचार व्हावा. जैन इरिगेशने ही राष्ट्रीय मसाले परिषद आयोजित करून एकाच व्यासपीठावर सगळ्यांना आणलेले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी सिंचन, फर्टिगेशन इत्यादी तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. नावीण्यपूर्ण असे मसाल्याचे पीक शेतकऱ्यांनी घ्यावे असे आवाहन केले.

डॉ संजय कुमार भाषणात म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे मसाले पिकांच्या पद्धतीत चेहरामोहरा बदलला. मसाल्याच्या पिकांसंदर्भात आजही प्रतवारी आणि लेबलिंग केली जात नाही. पीक कोणत्या शेतातून आपल्यापर्यंत पोहोचले याची माहिती ग्राहकांना उपलब्ध नसते. मिरची आणि जिरे उत्पादनात भारत पुढे असला तरी इतर मसाल्याच्या पिकांमध्ये भारत मागेच आहे तो पुढे कसा येईल उत्पादकता कशी वाढेल याबाबत विचार करणे व त्याबद्दल प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. सुगंधी वनस्पतींच्या जाती विकसीत करून त्यात मधमाश्यांचे पालन केले तर शेतकऱ्यांना मध निर्मितीतून अधिकचे पैसे मिळविता येतील. याच प्रमाणे हिंग, केसर आणि ऑरिगॅनोची शेती करून नवे क्षेत्र आणि नवी बाजारपेठ निर्माण करायला हवी असे आवाहन संजय कुमार यांनी केले.

मसाले परिषद आयोजनात ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली ते डॉ. निर्मल बाबु यांनी ही परिषद आयोजन करण्यामागची पार्श्वभूमी भाषणातून सांगितली. बाजारपेठेत स्पर्धा करायची असेल तर उत्तम गुणवत्तेचा माल असणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने या क्षेत्रात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता व गुणवत्ता राखली जात नाही याबाबत चिंता व्यक्त केली. पुढील पाच वर्षाच्या काळात आज भारतातून मसाले पदार्थांची जितकी निर्यात होते त्याच्या दुप्पट उद्दिष्ट साध्य करायचे आहे. जगात मसाले निर्यातीच्या क्षेत्रात भारतास उत्तम संधी असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी या मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करून घ्यावे असे आवाहन केले.

मसाले पदार्थांचे उल्लेख बायबल मध्ये देखील उल्लेख आढळतो. पाच हजार वर्षांपूर्वी शेती, अन्न, शेती करण्याच्या पद्धती लोकांना ठाऊक होत्या. जगभरातील व्यक्ती अनेक मसाल्याचे पदार्थ वापरतात. मसाल्यांना जगभर मागणी असल्याने या क्षेत्रात खूप मोठी संधी असल्याचे इस्त्राईलचे लसूण पैदासकार म्हणून ख्याती असलेल्या डॉ. एअरशेल यांनी सांगितले.

मसाले उद्यागात अनेक आव्हाने आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी जगभरातील मसाला उद्योजकांनी एकाच व्यासपीठावर येण्याची आवश्यकता राजकुमार मेनन यांनी सांगितली. यासाठी एफपीबी आणि शेतकरी यांनी मिळून काम केले तर ५० हजार हून अधिक शेतकरी जुळू शकतील अशी आशा ही व्यक्त केली.

छोटे शेतकरी हे तोट्याचे नव्हे तर फायद्याचे ठरू शकतात. चांगल्या व्हरायटीचे पिके घेतले, मल्टिक्रॉपींग पद्धती हा चांगला उपाय ठरू शकतो. चांगल्या पद्धतीने शेती केली तर मसाल्याची शेती फायद्याची ठरू शकते असे डॉ. प्रभात कुमार म्हणाले. भारत देश मोठ्या प्रमाणात हिंग आयात करतो त्यासाठी काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंगाची शेती होऊ शकते या सोबत केशराची शेती देखील करता येऊ शकते.

राष्ट्रीय पातळीवरील मसाले विषयावरील परिषद घेऊन दोन दिवसांचे विचार मंथन घडून येईल, त्याबद्दल जैन इरिगेशनचे विशेष आभार व्यक्त करून मिरची, हळद, आले, मीरी इत्यादीमध्ये चांगले काम करण्याची संधी आहे. या सोबतच लेमनग्रास, सॅण्डलवूड ऑईल असे प्रक्रिया उद्योग शेतकरी उभारू शकतात. त्यासाठी वायगाव हळदीचे उदाहरण सांगितले. येथील हळदीला जिओटॅग मिळाला असून बाबा रामदेव यांच्या उद्योगासाठी बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ हे गाव तेथील पद्धती निर्माण झाली आहे असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.

मसाले म्हणजे कल्चर हेरिटेज आहे तसेच अर्थकारणामध्ये देखील अत्यंत मोलाची भूमिका बजावते. शेतकऱ्यांनी समूह शेतीचा प्रयोग करून आर्थिक दृष्टीने सक्षमतेकडे वाटचाल करावी असे डॉ. गोपाल म्हणाले. आले. हिरवी मिरची, हळद इत्यादी वाळल्यानंतर मसाले म्हणून अंतर्भाव होतो. अशी संभ्रम अवस्था नसावी याबाबत डॉ. मेजर सिंग म्हणाले.  यावेळी व्यासपीठाच्या मान्यवरांच्याहस्ते ‘ज्ञानमंथन – २५’ आणि ‘स्पाईसेस हॅण्डबुक’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुब्रह्मण्यम आणि डॉ. मोनिका भावसार यांनी तर आभारप्रदर्शन गोपाल लाल यांनी केले. या उद्घाटन सत्रानंतर दिवसभर तांत्रिक चर्चासत्रे झाली. उद्या रविवारी १९ रोजी या राष्ट्रीय मसाला परिषदेचा समारोप होईल.

मसाले पिकाच्या जागतिक स्तरावरील व्यापारास पाच हजार वर्षांपूर्वी सुरवात झाली. अमेरिका, ब्राझील, लंडन व भारत यामध्ये व्यापाराची कशी साखळी निर्माण होत गेली आणि भारत जगाच्या पाठीवर मसाले उत्पादक देश म्हणून नावा रुपाला आला हे सांगितले. परंतु भविष्यात मोठ्या संधी आहे जर उत्पादकांनी जमिनीचे आरोग्य, फवारणीचे वेळापत्रक व सेंद्रिय पद्धतीने उत्पादन हे जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे असे जैन फार्मफ्रेशचे मुख्य व्यवस्थापक सुवन शर्मा (लंडन) यांनी मांडले.

या परिषदेमध्ये डॉ. के.बी. पाटील, डॉ. जितेंद्र कदम, डॉ. अभेगौडा, डॉ. बी.के., माजी कुलगुरू डॉ. टी. जानकिरामन, डॉ. मनिष दास, डॉ. विजय महाजन, डॉ. विजयन, डॉ. पी.के. गुप्ता, डॉ. बशीर, डॉ. अब्बास, डॉ. वेणुगोपाल, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. विकास बोरोले, हे उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल ढाके, डॉ.बी.के, डॉ. के.बी. पाटील, डॉ. सुमेरसिंग, योगेश पटेल, राहुल भारंबे, गोविंद पाटील आणि मोहन चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

जैन इरिगेशनचा आयसीएआर-सीआयएसएच, अॅग्रीइनोव्हेट इंडिया यांचा  सामंजस्य करार

जळगाव, १ जानेवारी २०२५- (प्रतिनिधी):- जैन इरिगेशन जळगाव व भारतीय कृषी अनुसंधान (ICAR),  सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टीकल्चर रिसर्च लखनौ(CISH) आणि अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, यांच्यात जैन केळीच्या टिश्यू कल्चर रोपांमध्ये फ्युसारीयम विल्ट रोगाला प्रतिकार करणाऱ्या तंत्रज्ञानासाठीचा सामंजस्य करार (एमओयु) नुकताच करण्यात आला. या करारावर डॉ. टी, दामोदरन, संचालक सीआयएसएच लखनौ, डॉ. प्रवीण मलीक, सीईओ, अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांनी डॉ. व्ही. बी. पटेल, उपमहासंचालक भारतीय कृषी अनुसंधान, डॉ. बालकृष्ण यादव, डॉ. के. बी. पाटील, डॉ. अनिल ढाके यांच्यासह २०० प्रगतीशील केळी बागायतदारांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार सोहळा पार पडला.

टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती करत असतानांच्या प्रकियेतच बायोइम्युनायझेशन करण्याचे तंत्रज्ञान आय़सीएआर, सीआयएसएच, लखनौ यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे प्रतिकारक रोपांची निर्मिती होऊन ती रोप फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालू शकतील. रोपांच्या प्रायमरी व सेकंडरी हार्डनिंगमध्येसुद्धा बायोइम्युनायझेशन करण्यात येणार आहे.

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन म्हणाले की, ‘भारतात  फ्युसारियम विल्ट रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात व आंतरराष्ट्रीय सतरावर जे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते स्वीकारून केळी उत्पादकांना सशक्त व प्रतीकारक रोपांची निर्मिती व पुरवठा करण्याचे आमचे धोरण आहे. आयसीएआर सोबतचा तंत्रज्ञान हस्तांतराचा हा करार म्हणजे केळीला सुरक्षित ठेवण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे.’ डॉ. व्ही. बी. पटेल यांनी ‘या तंत्रज्ञानाने केळी उत्पादकांना फायदा होईल’ असे म्हटले तर डॉ. टी दामोदरन यांनी ‘हे तंत्रज्ञान कसे काम करते यावर मार्गदर्शन केले. जैन इरिगेशन ही देशामधील अग्रगण्य कंपनी असल्याने या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होईल.’

डॉ. प्रविण मलीक यांनी या तंत्रज्ञानाने केळीची शेती कशी शाश्वत करता येईल असे म्हटले तर डॉ. के. बी. पाटील यांनी प्रत्येक गावाच्या,  जिल्हा तसेच राज्याच्या सीमेवर टायर बाथ, फुट बाथ ही संकल्पना राबवून वाहनांच्या चाकाद्वारे किंवा मजूरांच्या पायातील बूट चप्पलद्वारे या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अपरिहार्य असल्याचे सांगितले. बायोइम्युनायझेशन तंत्रज्ञानामुळे फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालता येईल व रोगाच्या  व्यवस्थापनासाठी मदत होईल.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस वॉक होता. जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात परमानंदाची संकल्पना विस्ताराने मांडत त्याचा मानवी जीवनाशी संबंध उलगडण्यात आला.

साडे तीन किलोमीटरच्या या वॉकमध्ये अध्यात्मिक व योगशास्त्रीय पंचकोशातील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोषाची तोंड ओळख करून देण्यात आली. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची कार्यपद्धती त्यांचे जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. आनंद मिळविण्यासाठी अष्टांग योग व दासबोधात समर्थ रामदासांनी मांडलेली नवविधाभक्ती कशी उपयुक्त ठरते यावरही प्रकाश टाकण्यात आला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधल्या पाहिजेत, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, आपल्या कामातील आनंद मिळविला पाहिजे, आपल्या सोबत इतरांनाही आनंद घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे  असे आवाहनही गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी यांनी केले. संस्था पीस वॉक, नेचर वॉक, बर्ड वॉचचे नियमितपणे व वेगवेगळ्या प्रसंगी आयोजन करीत असते. डॉ. अश्विन झाला यांनी पंचमहाभूतांचे मानवी जीवनाशी संबंध व त्याचे महत्त्व थोडक्यात विशद केले. या पीस वॉकमध्ये ५५ स्त्री-पुरुष व मुलांचा सहभाग होता.

असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली : अनिल नौरिया

जळगाव, दि.२३ (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी असहयोग आंदोलन आणि सविनय कायदेभंगाद्वारे सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली. त्यामुळेच ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा मोठा लढा उभारला गेला, असे विचार अनिल नौरिया यांनी व्यक्त केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वक्ते अनिल नौरिया, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रशासकीय विभागाच्या प्रमुख अंबिका जैन, प्राचार्या डॉ. गौरी राणे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच नौरिया यांनी असहयोग आंदोलन व सविनय कायदेभंग यातील फरक समजावून सांगितला. आपल्या न्याय व हक्काची मागणी अहिंसेच्या मार्गानेच केली पाहिजे याचा गांधीजींचा अट्टाहास असायचा. यासाठी महात्मा गांधीजी आंदोलन करण्यासाठी पूर्व तयारी करून घेत असत. कुणाला काय जबाबदारी द्यायची हे ठरलेले असे. अगदी जिल्ह्याची, व्यक्तीची निवड करतांना विशिष्ट निकषांवर केली जात असे. यात अहिंसा, स्वदेशीचा वापर, बलिदान देण्याची तयारी, हिंदु मुस्लिम एकता, सामाजिक सौहार्दता याचा समावेश असे. स्पृश्य, अस्पृश्य हा भेद नसावा इत्यादीबाबत महात्मा गांधी सजगतेने त्याची चाचणी स्वतः घेत असत असेही त्यांनी सांगितले. याच आधारावर गुजरातमधील बारडोली, खेडा आणि आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर या जिल्ह्यांचा विचार करण्यात आला होता. १९१९ च्या असहकार आंदोलनानंतरच सर्व भारतीय खुलेपणाने स्वातंत्र्याची मागणी करू लागले. याच काळात कला, साहित्याची देखील भरपूर निर्मिती झाली. याबाबतचे उदाहरणे सांगत त्यांनी महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनाचे एक एक पदर उलगडून सांगितले.

आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘गांधी होंगे कही भारत में’ गाण्याची ध्वनिफीत वाजविली गेली. यावेळी डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या गौरी राणे यांनी देखील संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. झाला यांनी केले. १९२४ पर्यंत हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने असहयोग आंदोलन या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या तीन व्याख्यान व वक्ते याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले तर आभार चंद्रशेखर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास बेंडाळे महाविद्यालयाचे उप-प्राचार्य विजय पाटील, प्राध्यापक, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन व सहकारी यांची उपस्थिती होती.

नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी – अजित जैन

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –  जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष  भवरलाल जैन ऊर्फ मोठेभाऊ यांच्या जयंतीनिमित्त १४ डिसेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या काळात जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास पन्नास प्रकारची पीके उभी करण्यात आली आहेत. ही पीके पाहण्यासाठी देश व राज्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून या कृषी महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी केले आहे.

अजित जैन पुढे म्हणाले की, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) व हवामान बदल (क्लायमेंट चेंज) या दोन समस्यांचा शेतकऱ्यांना आता वारंवार सामना करावा लागतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही होत आहे. हे नुकसान कसे टाळावे आणि त्यासाठी उत्पादन पद्धती बदल करून कोणती नवीन तंत्रे वापरावीत या संबंधीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे म्हणून आधुनिक पद्धतीने पीके उभी केली आहेत. ती शेतकऱ्यांना समक्ष पाहता येतील. ‘बघितले की विश्वास बसतो’ असे म्हणतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात उभी असलेली ही पीके स्वत: पाहणे गरजेचे आहे.

कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कांद्यामध्ये केळी बागेची उभारणी, गादीवाफ्यावर आधाराने व बिन आधाराची कागोमी जातीच्या टोमॅटोची लागवड, मिरची, पपई यांची सीडलिंग लावून केलेली लागवड, हळदीचे पीक, ठिबकवर गहू, भात यांची लागवड, उसाला वरून मॉड्यूलर स्प्रिंकलरद्वारे पाणी, सौर पंपांच्या सहाय्याने पिकांना सिंचन, पॉलिहाऊस मधील बंदिस्त व नियंत्रित वातावरणात केळी, आंबा, संत्री, मोसंबी या फळझाडांची लागवड, सघन व अतिसघन पद्धतीने उभ्या केलेल्या फळबागा (उदा सीताफळ, पेरू, चिकू, आंबा, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज वगैरे) या बरोबरच गादीवाफा, मल्चिंग, डबल लॅटरल, फर्टिगेशन ही सर्व तंत्रे शेतकऱ्यांना येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कृषी महोत्सवासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नसून शेतकऱ्यांना ते मोफत पाहता येईल. तसेच टिश्यूकल्चर व अन्य तंत्राद्वारे तयार केलेली उत्कृष्ट दर्जेदार व रोगमुक्त रोपेही शेतकऱ्यांना पाहता येतील असेही अजित जैन यांनी सांगितले. तेव्हा अधिकाधिक शतेकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन महोत्सवाला सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत भेट द्यावी ही विनंती.

जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात

जळगाव दि.२३ प्रतिनिधी – शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत नाही. शेतकरी आणि शिक्षक ह्यांना नेहमी गुरूस्थानी मानले पाहिजे. कारण दोघांमुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन होत असते. प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये, विद्यालयांमध्ये शेती हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवला पाहिजे. विद्यार्थ्यांवर स्वत: शेतकरी होण्याची किंवा जे भोजन बळीराजामुळे मिळत आहे त्यामुळे त्यांचा आदर करण्याचा संस्कार आपोआप होईल. शेतकऱ्यांकडे असलेल्या ज्ञान समजून घेतले पाहिजे, सर्वात पारदर्शक व्यवहार म्हणजे शेतकऱ्यांचा आहे असे मनोगत सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.
जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर १४ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू असलेल्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषीमहोत्सवात शेतकऱ्यांशी सोनम वांगचुक यांनी संवाद साधला. २३ डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन शेतकऱ्यांचा सन्मान करुन  साजरा करण्यात आला. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांचे औक्षण आणि गांधी टोपी, तर महिला शेतकऱ्यांना रूमाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोनम वांगचुंक यांच्या समवेत जैन परिवारातील अभंग जैन, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बि. के. यादव, एस. एन. पाटील, संजय सोन्नजे, अनिल जोशी, दीपक चांदोरकर, गिरीष कुळकर्णी यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

शेतकरी दिनानिमित्त मार्गदर्शन करताना सोनम वांगचुक पुढे म्हणाले की, जैन इरिगेशन ही शेतकऱ्यांसाठी प्रभावी काम करणारी संस्था असून त्यांच्याशी जुळल्यानंतर लडाखमध्ये भेडसवणारा पाण्याचा प्रश्न आईस स्तुफा यातून दूर झाला. यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी हा विषय येण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कारण भोजन कसे तयार होते, त्यासाठी काय परिश्रम घेतले जाते, याची जाणिव निर्माण व्हावी. गणित, बायोलॉजी, मायक्रो बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, विज्ञान यासारखे विषय शेतीसाठी पूरक आहेत त्याचे ज्ञान घ्यायला हवे. शेती हा विषय महत्त्वाचा असल्याने विद्यालयात शेती केली जावी, प्रत्येक विद्यार्थी हा शेतकरी व्हावा. असे माझे स्वप्न आहे.

लडाख मध्ये फळ, फुलांच्या वाढीसाठी जैन इरिगेशन सोबत काम करत आहे. सफरचंदासह अन्य फळबागांवर संशोधनात्मक कार्य केले जात आहे जेणे करून शेतकऱ्यांचा फायदा होईल. जगातील सर्वात गोड खुबानी लडाखमध्ये उत्पादित केली जाते त्यावरही जैन तंत्रज्ञानातून काही करता येईल का? यासाठी चर्चा सुरू आहे. कमी पाण्यात कमी खतांमध्ये उत्पन्न दूप्पट करण्याचा प्रयत्न जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनात दिसतो. या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी येऊन माहिती घ्यावी असे आवाहनही सोनम वांगचुक यांनी केले.डॉ. बी. के. यादव यांनी जैन इरिगेशन आणि सोनम वांगचुक यांच्यासोबत आईस स्तूफा ह्या संकल्पनेविषयी सांगितले. प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक चांदोरकर यांनी केले.

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  – एस. एस. म्हस्के

जळगाव दि. २० प्रतिनिधी – भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे साधन म्हणजे शेती उद्योगाकडे बघितले जाते. अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे त्याला नैसर्गिक फटका बसला की तो नैराश्याच्या गर्तेत अडकला जातो ही वस्तुस्थिती समाजात आहे. याउलट परिस्थिती जैन इरिगेशनच्या जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि चांगले मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही. हायटेक स्मार्ट शेतीचा मूलमंत्र देणाऱ्या या जैन हिल्स वरील कृषिमहोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने भेट दिली पाहिजे असे आवाहन जळगाव उपविभागाचे डाकघर अधिक्षक एस. एस. म्हस्के यांनी केले आहे.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. १४ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव आहे.  सौर कृषी पंप, वेगवेगळ्या वातावरणाला अनुसरुन पाईप, ठिबक तंत्रज्ञान, पाणी निचरा करण्याची पद्धती, फळलागवड पद्धत जी कमी जागेत जास्त उत्पन्न देणारी ठरणारी अशी अतिसघन आंबा लागवड पद्धत, त्यासोबतच हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफळ, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापरातून शाश्वत निर्यातक्षम उत्पादन कसे घेता येते हे प्रयोग येथे पाहता येत आहे.  हे फक्त प्रयोग नसून ते शेतकऱ्यांच्यासह भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. या कृषिमहोत्सवात डाक विभागाचासुद्धा स्टॉल आहे त्यालाही भेट देण्याचे आवाहन एस. एस. म्हस्के यांनी केले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version