जळगावचे माजी अध्यक्ष श्री. दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी देवाज्ञा

नमस्कार !

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान चे विश्वस्त व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जळगावचे माजी अध्यक्ष श्री. दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी सकाळी ५.३० वाजता देवाज्ञा झाली. त्यांनी देहदानाचा संकल्प केला असल्याने त्यांचा देह आजच सकाळी १०.३० वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, साकेगाव येथे देह सुपूर्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुली सौ. दीपिका चांदोरकर व सौ. अनघा देशपांडे असून तीन जावई नातवंडे, नातसुना, पणतु व पणत्या आहेत.

दीपक चांदोरकर.

‘खान्देश रन’ मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले


सुरक्षा विभागातील महेंद्र राजपूत 10 कि.मी.मध्ये तृतीय, वयस्क वयोगटात भीमराव अवताडे द्वितीय


जळगाव, दि. 04 – जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे तब्बल 1000 हून अधिक सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी 3, 5, 10, 21 कि.मी. मॅरेथॉन रन यशस्वीपणे पूर्ण केली. हजारो धावपटूंमधून 10 कि.मी. पुरूष गटात जैन इरिगेशनमधील सुरक्षा विभागातील सहकारी महेंद्र राजपूत तृतीय क्रमांकाने विजेता ठरला. तसेच वयस्क वयोगटात टाकरखेडा येथील सुरक्षा विभागातील सहकारी भीमराव अवताडे यांनी 10 कि.मी.मध्ये द्वितीय क्रमांकाने विजेते ठरले. त्यांना खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी, सन्मानचिन्ह यासह पाच हजाराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
‘खान्देश रन’च्या 6 व्या मॅरेथॉनची पहाटे 5.30 वाजता सुरूवात झाली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश चोरडिया यांनी 21 कि.मी. मॅरेथॉन रन ला हिरवी झेंडी दाखविली. यानंतर पोलीस अधिक्षक एम राजकूमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी. डी. बच्छाव, मनोज शिंदे, मनोज अडवाणी, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांनी प्रत्येक मॅरेथॉन रनच्या धावपटूंचा उत्साह वाढविला.


जैन परिवारातील अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मन जैन यांनी प्रत्यक्ष खान्देश रनमध्ये सहभाग घेतला. जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क, टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा, जैन एग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूड पार्क, डिव्हाईन पार्क मधील सहकारी, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती स्कूल प्रायमरी, अनुभूती स्कूल सेकंडरी मधील विद्यार्थी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकारी, जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्साहाने खान्देश रन महोत्सवात सहभाग घेतला. यात वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.
जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहरी जाऊ नये, त्याचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सजग होत, निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी, यासाठी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सहकाऱ्यांना कान्हदेश रन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.

सफल प्रीमियर लीगमध्ये सफल क्रेझी फाईव्ह, सफल स्ट्रायकर्स संघ विजयी

मुंबई दि.4– मुंबई वळाला रोड येथील जे. के. नॉलेज स्पोर्टस सेंटर ट्रर्फ येथे झालेल्या सफल प्रीमीयर क्रिकेट लीगमध्ये महिला संघ सफल क्रेझी फाईव्ह व पुरूष संघ सफल स्ट्रायकर्स संघ विजयी ठरले. दोघं संघांना मान्यवरांच्या उपस्थितीत चषक देऊन गौरविण्यात आले.
सस्टेनेबल ऍग्रो-कमर्शियल फायनान्स लिमिटेड (सफल) मार्फत आयोजित केलेल्या सफल प्रीमियर लीग च्या पारतोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थितीती होती. त्यांच्यासह वित्त अधिकारी श्री. परेश शहा, क्रेडीट हेड श्री. सुमित कारखानीस, प्रशासकीय अधिकारी श्री. सुभाष अहिरे, लिगल हेड श्री. आकाश इंदुरकर, एसएमई हेड श्री. सुशांत पांडा, ऑपरेशन हेड श्री. रविराज बल्लाळ, विक्री विभागातील श्री. भास्कर चव्हाण, श्री. विनोद गांगुर्डे यांची उपस्थितीती होती. सफल प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये एकूण दोन महिला संघ व चार पुरुष संघ सहभागी झाले. यावेळी त्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट प्रतिसाद दिला. संपूर्ण स्पर्धेमध्ये महिला स्पर्धकांमधून सफल क्रेझी फाईव्ह हा महिला संघ विजेता ठरला, तसेच पुरुष संघामध्ये सफल स्ट्रायकर्स हा संघ विजेता ठरला, तर सफल लिजंड संघ हा उपविजेता घोषित करण्यात आला. पुरूष गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री. आदर्श दिवाणी (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री. आनंद गुरप्पू तर महिला गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून उत्कर्षा साबळे (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एचआर हेड विना कशेळकर ठरलेत. स्पर्धा समविचाराने, प्रेमभावाने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय श्री प्रभाकर बोबडे हे सुद्धा समाविष्ट झाले होते. सफल चे एच.आर विभाग व संपूर्ण सफल कर्मचारी यांनी प्राथमिकतेने व सकारात्मक दृष्टीकोनातून योगदान देऊन एक चांगला उपक्रम स्थापित केलेला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतूक प्रभाकर बोबडे यांनी केले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा

जळगाव दि. 3 (प्रतिनिधी)- ‘बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यामुळे सामान्य माणसाला जगण्याचे बळ, ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. माझ्या शालेय आयुष्यात बहिणाबाईंची कविता आली आणि माझे जीवनच उजळून निघाले. धरत्रीला दंडवत या  कवितेमुळे वाचनाची गोडी निर्माण झाली व आजपर्यंत प्रगती करू शकलो, साहित्य अकादमी पर्यंत पोहोचलो असे उत्स्फूर्त उद्गार सुप्रसिद्ध बाल साहित्यिक व शिरपूर येथील तहसीलदार आबा महाजन यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज बहिणाई स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यकमाच्या सुरुवातीला आबा महाजन व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात का.उ. कोल्हे विद्यालयातील विद्यार्थीनींनी व कवी प्रकाश पाटील यांनी बहिणाबाईची संसार ही कविता सादर केली. गिरीश कुळकर्णी यांनी गीता जयंती आणि बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन हा योगायोग आहे. जीवन विकासाचे तत्त्वज्ञान सांगणारी गीता आणि बहिणाबाईची कविता आपल्या आजुबाजुला घडलेल्या घटनांचा संबंध उलगडून दाखविते. बहिणाबाई यांना मिळालेली प्रज्ञा ही दैवी देणगीच होती असे मत व्यक्त केले. लेवागण बोलीवर काम करणारे साहित्यिक अरविंद नारखेडे, यांनी देखील बहिणाबाईच्या साहित्याबाबत प्रकाशझोत टाकला. लेवा गणबोली कडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कवयित्री बहिणाबाईंच्या पुण्यतिथी निमित्त “विश्व लेवा गणबोली दिन साजरा केले जातो, या भाषेचे दोन सम्मेलन झाले आता जानेवारीत तिसरे सम्मेलन होणार आहे याबाबतची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचा समारोप कवयित्री शीतल पाटील यांच्या कवितेने झाला. सूत्रसंचालन व समारोप ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेश चौधरी, प्रदीप, सोनार यांच्यासह चौधरी वाड्यातील सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास बहिणाबाईच्या नातसून पद्माबाई चौधरी, कला विभागाचे सहकारी विजय जैन, किशोर कुलकर्णी, देवेंद्र, दिनानाथ, कैलास, किरण, रंजना, कविता, शोभा, लक्ष्मी, कोकिळा, वैशाली, कोकिळा, सुनंदा, शालीनी चौधरी, हितेंद्र व विवेक चौधरी, साहित्यिक म्हणून तुषार वाघुळदे, अशोक पारधे, लिलाधर कोल्हे, पुष्पा साळवे, इश्वर राणा आदि मान्यवर उपस्थित होते.

सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल – अनिल जैन

जळगाव दि.25– शेतीच्या सातबारा पुरूषांच्या नावे असतो; मात्र शेतात सर्वाधिक काम महिला करत असतात. जेव्हा पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांचे नाव सातबारामध्ये लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरूष समानता प्रस्तापित होईल असे महत्त्वपूर्ण विचार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विकास संवाद या संस्थेचे ‘लैंगिक पहचान की चुनौती समानता के सवाल’ हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे विकास संसद आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक पहचान की चुनौती और समानता के सवाल’ या तीन दिवसीय 15 वा राष्ट्रीय संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटक म्हणून अनिल जैन बोलत होते. ही परिषद 27 नोव्हेंबर पर्यंत आहे. पुढे बोलताना अनिल जैन म्हणाले की, आज आपण ज्या जैन हिल्स, गांधीतीर्थ येथे आहोत ते निर्माण करण्यासाठी माझ्या वडिलांना श्रद्धेय भवरलालजी जैन यांना माझी आज्जी गौराई यांनी सात हजार रूपये जी संपूर्ण कुटुंबाची जमापूंजी होती ती दिली. यातून आठ हजार करोड व्यवसायाचा टप्पा गाठणारी कंपनी उभी राहिली. व्यवसायातील पहिली भागीदार आई असे भवरलालजी जैन मानायचे. त्यामुळे स्त्री-पुरूष समानतेचे बाळकडू आम्हाला आपसूक मिळाले.

विकास संवाद व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजीत 15 व्या राष्ट्रीय मीडिया संवादामध्ये मार्गदर्शन करताना जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन. व्यासपिठावर चिन्मय मिश्र, सचिन कुमार जैन.

या राष्ट्रीय संवादात देशभरातील 16 राज्यातून शंभराहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विकास संवादचे समन्वयक सचिनकुमार जैन यांनी प्रास्ताविकात विकास संवाद आणि त्यांचे कार्य याबाबत उपस्थितांना परिचय करून दिला. तर डॉ. अश्विन झाला यांनी गांधी तीर्थ व जैन हिल्स बाबतची माहिती दिली. पहिल्या सत्रात रिता भाटिया यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी गांधी विचारांच्या दृष्टीने स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या समजावून सांगितली. सुप्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांनी शब्दांच्या माध्यमातून खान्देश व जळगावची सैर घडवून दिली. पुणे येथील विचारवंत आनंद पवार यांनी ‘लैंगिक पहचान की चुनोती और समानता के सवाल’ अशा दोन भागांमध्ये आपले विचार मांडले. या तीन दिवसीय 15 व्या राष्ट्रीय मिडीया संवाद कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा समारोप गांधी तीर्थ येथील ‘खोज गांधीजी की’ ऑडिओ व्हिडीओ गाईडेड संग्राहलयाच्या अनुभूतीने झाला.

स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमतावर आज मार्गदर्शन

उद्या दि.26 नोव्हेंबर ला प्रार्थनेने सकाळचे सत्र सुरू होईल. त्यात डॉ. विश्वास पाटील ‘जगदम्बा कस्तूरबा’ यावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात दीपा सिन्हा यांचे स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमता यावर महत्त्वपूर्ण संवाद होणार आहे. अरविंद मोहन याचे ‘हजार बेटियों वाले बापू’ यावर विशेष चर्चा होईल. तर चिन्मय मिश्र हे  ‘बच्चों में लैंगिक पहचान की चुनौतियां’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या संवाद कार्यक्रमाचा समारोप रविवारी, 27 नोव्हेंबर ला होईल.

नरहर कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन घडविणारे अभिनव नाटक

जळगाव दि.25–  ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सहकार्याने बुधवार, ३० नोव्हेंबर ला संध्याकाळी ७ वा. कांताई सभागृह (नवीन बसस्थानकाजवळ) येथे सादरीकरण होईल.

स्थानिक कलाप्रेमींच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास वीस प्रयोग होत आहेत. त्यात पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर, अंबाजोगाई, सेलू, परभणी, हैदराबाद, वरोरा, नागपूर, वर्धा येथील प्रयोगानंतर जळगाव येथे पहिला प्रयोग होत आहे. दोन अंक आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे. अनेक मान्यवरांनी कौतुक केलेल्या, सकस आणि रंजक विचार-यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

अनोखे रंगमंचीय सादरीकरण

सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे ‘नरहर कुरुंदकर–एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग आहे. मुंबई आणि नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.

नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात.

जैन हिल्स येथील शेती संशोधन व विकास प्रकल्पांना राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कॅबिनेट मंत्र्यांची भेट

जळगाव, दि. 19 – “राजस्थानमध्ये जमीन व पाण्याची मुबलकता आहे त्याला जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होऊन त्यांचे उत्पन्नात वाढ करण्याची खूप मोलाची गोष्ट होऊ शकते…” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राजस्थानचे कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालन मंत्री लालचंद कटारिया यांनी दिली.

राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी, कृषी मंत्री लालचंद कटारिया, सहकार मंत्री उदयलाल आंजना, राज्य मंत्री राज्य मंत्री राजेंद्रसिंह यादव, राजाखेड़ा विधानसभा मतदार संघातील आमदार रोहित बोहरा आणि राजस्थानचे प्रशासकीय अधिकारी यांनी 18 व 19 नोव्हेंबर रोजी जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. जैन हिल्स येथील जैन उच्च कृषी तंत्रज्ञान व शेती संशोधन, विकास प्रकल्पातील फ्युचर अॅग्रीकल्चर, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक पोटॅटो उत्पादन, जैन स्वीट ऑरेंज, नियंत्रीत वातावरणात काळी मिरी उत्पादन, डाळिंब, केळी, अननस, कॉफी इत्यादीचे टिश्युकल्चर, माती विरहीत शेती, आंबा ऑर्चिड, भाऊंची सृष्टी, श्रद्धाधाम इत्यादीचा समावेश होता.

जैन हिल्स येथील टिश्युकल्चर प्रयोग शाळेत टिश्युकल्चर रोपांची राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्यासह कॅबीनेट मंत्री मान्यवरांना माहिती देताना अजित जैन, अतुल जैन व कंपनीचे अधिकारी

 

 

राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्यासह कॅबीनेट मंत्री मान्यवरांना जैन हिल्स येथील फ्युचर फार्मिंग, एरोपोनिक प्रयोगाबद्दल माहिती देताना अजित जैन व इतर मान्यवर

जैन हिल्स येथे राजस्थानच्या शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्यासह कृषी मंत्री कटारिया, सहकार मंत्री आंजना, राज्य मंत्री यादव आदी मान्यवर.

राजस्थान विधान अध्यक्ष मा. सी.पी. जोशी, कृषी व पशुसंवर्धन, मत्स्यपालन मंत्री लालचंद कटारिया व मान्यवर अतिथींचे 18 नोव्हेंबर रोजी रात्री जैन हिल्स येथे आगमन झाले. कंपनीच्यावतीने त्यांचे स्वागत उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले.

19 रोजी सकाळी भाऊंच्या सृष्टीला भेट दिली. यावेळी अजित जैन उपस्थित होते. राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कृषीमंत्री कटारिया, सहकार मंत्री आंजना, राज्य मंत्री यादव या मान्यवरांनी जैन हायटेक अॅग्री इन्स्टिट्युट अर्थात जैन उच्च कृषी तंत्रज्ञान व शेती संशोधन, विकास प्रकल्पाच्या फ्युचर फार्मिंगचे बारकाव्याने अवलोकन करून जाणून घेतले. सुरू असलेल्या शेती प्रयोगांची आस्थेने चौकशी केली. माती शिवायची भविष्यातील शेती हा प्रयोग पाहून अतिथी भारावले. जैन स्वीट ऑरेंज नर्सरी, स्वीट ऑरेंज उत्पादन क्षेत्रास त्यांनी भेट दिली. एरोपोनिक्स बटाटा प्रयोगाची देखील पाहणी केली. नियंत्रीत वातावरणात मिरी उत्पादन यशस्वीपणे करता येते हे दाखवून देणारा जैन हिल्स येथील महत्त्वाकांक्षी काळी मिरी लागवड प्रयोग सुद्धा त्यांनी पाहिला. या सर्व प्रयोग, प्रकल्पांची अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह डॉ. बी. के. यादव, के.बी. पाटील यांनी  माहिती करून दिली. ‘रिसोर्स टू रुट’ ही संकल्पनेचीही मान्यवरांना ओळख करून दिली.

उत्तम शाश्वत शेती तंत्रज्ञान शिकण्याचा राजस्थानचे कृषीमंत्री कटारिया यांचा शेतकऱ्यांना सल्ला

जैन हिल्स येथे मान्यवरांची भेट सुरू असताना राजस्थानी पेहरावातील काही शेतकरी या मान्यवरांना दिसले. आपल्या राज्याचा माणूस भेटल्यावर त्या सर्व अतिथींना आनंद वाटला व सर्व राजकीय शिष्टाचार (प्रोटोकॉल) सोडून राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी कृषीमंत्री लालचंद कटारिया, सहकार मंत्री आंजना, राज्य मंत्री यादव यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. जैन इरिगेशनचे कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञान म्हणजे संजीवनी आहे. उत्तम शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान येथून शिकून घ्या. कमी पाण्यात शेती करण्यासाठी येथील ठिबक सिंचनाचा आपल्या शेतात अवलंब करा. शेतीच्या उत्पादनात राजस्थान अग्रेसर ठरला पाहिजे असा सुसंवाद त्यांनी शेतकऱ्यांशी साधला. राजस्थान राज्यातील बांसवाडा येथील सुमारे 50 शेतकरी जैन हिल्स येथील विविध शेती संशोधनाचे प्रयोग पाहण्यासाठी आलेले आहेत.

‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या 500 जणांची नोंदणी

जळगाव, दि. 17 –  जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. त्याने मद्य, गुटखा, तंबाखू सेवन करू नये त्यांचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवलेली आहे.

त्यात वेळोवेळी सहकाऱ्यांच्या विशिष्ट वयानंतर शारिरीक तपासण्या, आरोग्य विषयक मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शिबीराचे आयोजन केले जाते. शहरातील इतर आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये कंपनीचे सहकारी हिरीरीने सहभागी होत असतात. अलीकडेच कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडीया यांचे ‘प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजले होते. या उपक्रमाचा जळगाव शहरातील व्यक्तींनाही लाभ घेता यावा यासाठी शहरात देखील डॉ. कापडीया यांचे हृदय रोगाविषयी व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला होता..

ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सजगता व सामाजिक बांधिलकीने जैन इरिगेशनचे 500 सहकाऱ्यांच्या या  खान्देश रनमध्ये सहभागी होत आहेत.

गत सहा वर्षांपासून जळगाव रनर्स ग्रुपच्या पुढाकाराने ‘खान्देश रन’ आयोजित करण्यात येत आहे. जळगावकरांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी होतो. या वर्षी 4 डिसेंबर 2022 ला खान्देश रनचे 6 वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जळगावकरांच सक्रिय पाठबळ असावं- अशोक जैन, चेअरमन जैन इरिगेशन

सर्वप्रथम कान्हदेश रनच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा, निरामय आरोग्यासाठी विविध क्रियांपैकी धावणे हे एक उत्तम माध्यम आहे, नक्कीच प्रत्येकाने ही सवय अंगिकारली पाहिजे. निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी यासाठी कान्हदेश रन च्या माध्यमातून होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत!

यावर्षीआमच्या जैन उद्योग समूहाचे जवळपास 500 सहकारी असतील, जळगाव करांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.

अशोक जैन,

अध्यक्ष

जैन इरिगेशन सिस्टिम्स ली

जळगाव.

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

जळगाव, 12 – भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाही व अर्धवर्षाचे एकल व एकत्रित निकाल जळगाव येथे 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी कंपनीच्या आर्थिक स्थिती व निकालांबाबत सुसंवाद साधला.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्धवर्षातील एकत्रित उत्पन्न 3650.4 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 3422.1 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 228.3 कोटी रुपयांनी जास्त आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 435.5 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 496.6 होता म्हणजे 61.1 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेला. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीचे एकल उत्पन्न 1607.6 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 1644.6 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 37 कोटी रुपयांनी कमी आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 166.1 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 232.8 होता म्हणजे 66.7 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेलेला दिसतो आहे

 

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकल निकालाचे वैशिष्ट्ये – 

  • या वर्षी कर्ज निराकरण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर वित्त खर्चात बचत झाल्यामुळे, उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चामुळे मार्जिनवर परिणाम झाला तरी रोख नफा सुधारला.
  • जैन उच्च कृषि तंत्रज्ञान, टिश्युकल्चर मागणी अधिक आल्याने टिश्यू कल्चर व्यवसायामुळे वाढ दिसत आहे.
  • 30 सप्टेंबर 2022 पर्यंत स्वतंत्र निव्वळ कर्ज – ₹ 2728 कोटी, 30 जून पासून किंचित वाढले. (रोख रकमेच्या जास्त वापरामुळे आणि दैनंदिन व्यवहारासाठी उपयोग वाढल्याने)
  • ऑर्डर बुक: 1785.4 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1228.6 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर  556.6 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये – 

जागतिक आव्हानात्मक परिस्थितीमुळे एकत्रित महसूल लवचिक राहिला आहे.

30 सप्टेंबर 2022 पर्यंत एकत्रित सकल कर्ज ₹ 6568 कोटी आहे. 30 जून 2022 पासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीव्र घसरण झाल्यामुळे वाढले आहे.

ऑर्डर बुक: 3017.7 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1619.2 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर 571.5 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्स त्याच प्रमाणे कृषि अन्न प्रक्रिया विभागातील 827.0 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे.

 

व्यवस्थापकिय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांचा कोट  – 

“आम्हाला आर्थिक वर्ष 2022-23 मधील दुसरी तिमाही आणि अर्धवार्षिकाचे लेखा परीक्षणा पूर्वीचे आर्थिक निकाल जाहीर करताना आनंद होत आहे. आव्हानात्मक जागतिक परिस्थिती असली तरी कंपनीची दुसरी तिमाहीचे एकत्रित उत्पन्न 1610 कोटी रूपये (कर, व्याज आणि घसारापूर्व नफा मार्जिन 10.3 टक्के) लवचिक योजनेनुसार राहिले. पहिल्या सहामाहीत एकत्रित उत्पन्न 6.7 टक्क्यांनी वाढले आहे आणि ते 3650 कोटी रुपयांवर पोहोचले. कर व्याज घसारा पूर्व मार्जिन 10.3 टक्के राहिला.

पाॅलीमरच्या किंमतीमधील अस्थिरतेमुळे मार्जिनवर विपरीत परिणाम झाला. हा परिणाम हंगामी आणि क्षणिक आहे कारण आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीत उत्पन्नाचे प्रमाण शंभरात 60 असे असते व पहिल्या सहामाहीत ते आर्थिक वर्ष 2022-23 दुसऱ्या सहामाहीत 40 असते. वाढत्या ऑर्डर्समुळे आणि स्थिर खर्च पूर्ण वर्षाच्या बेसिसवर उत्तम तऱ्हेने शोषले गेल्यामुळे मार्जिनमध्ये लवकरच सुधारणा होईल. अलीकडील महिन्यात पॉलीमरच्या किंमतीत सुधारणा झाल्यामुळे आमची उत्पादने ग्राहकांना रास्त दरात मिळतील. तिमाहीत कंपनीने कंत्राटाचा दरातील 2067.5 कोटी रूपयांचा करार ‘जल जीवन मिशन’ खाली मिळविला आहे. मार्जिनमध्ये आणि रोख  प्रवाह (Cash Flow – कॅश फ्लो) यामध्ये सुधारणा कंपनी सतत करेल व दीर्घकालीन उद्दिष्टे प्रयत्नपूर्वक साध्य केले जातील.”

‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने  जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चा दिल्ली येथे सन्मान

नवी दिल्ली, दि. 12 – भारतीय अन्न आणि कृषी परिषद (ICFA) यांच्यावतीने 9 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे देशातील सर्वात मोठे कृषी संमेलन, प्रदर्शन ‘अॅग्रोवर्ल्ड 2022’ पार पडले. त्यात अन्न प्रक्रिया श्रेणी करीता जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडला ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’ ने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. संजीव कुमार बलियान यांच्या हस्ते कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.के. यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आय ए आर आय मैदान, पुसा, नवी दिल्ली येथे भव्य प्रदर्शन आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील झाले. त्यात शाश्वत शेतीचे तंत्र, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया आणि विपणन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी परिवर्तन, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व्यापार, ई-कॉमर्सद्वारे शेतकर्‍यांचे सक्षमीकरण: एफपीओची भूमिका इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चे कार्य अधोरेखित करून अन्न प्रक्रिया श्रेणीमधून ‘इंडियन अॅग्रीबिझनेस अवॉर्डस् 2022’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणावर आंब्यावर प्रक्रिया करणारी एक नंबरची तर कांदा भाजीपाला निर्जलीकरण करणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडची ओळख आहे. या कंपनीचे वार्षिक जागतिक उत्पन्न 1600 ते 1800 कोटी रुपये आहे. तिचे मुख्य कार्यालय जळगाव (महाराष्ट्र) येथे आहे. मागील 5 वर्षात 80000 मे. टनांहून अधिक कांदयावर प्रक्रिया केली गेली. त्यासाठी 9 जिल्हे, 31 तालुके, 435 खेडे आणि 10000 हून अधिक शेतकऱ्यांकडून करार शेतीवर माल खरेदी करून प्रक्रिया केली. कंपनीने दिलेल्या तंत्रामुळे शाश्वत शेती करता येते आणि शेतकऱ्यांची उपजिविका व ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे उत्पन्न यात सुधारणा झाली,  ही सुधारणा सातत्याने होतच आहे.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचा सल्ला, उत्तम दर्जाचे बी-बियाणे, 100 हून अधिक कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन देते. शेतकऱ्यांकडून ताजे कांदे उत्तम भावात खरेदी करते. अल्पभूधारक आणि मध्यम आकाराची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना भारतात जैन गॅप अंतर्गत उत्तम शेती पद्धती (Good Agriculture Practices- गॅप) हा भारतातील कृषी क्षेत्रातील पहिला उपक्रम ही कंपनी राबवते. हा उन्नती उपक्रम जे जैन फार्म फ्रेश फुडस् संयुक्तपणे शेतकऱ्यांसोबत भागीदारीत राबवते. या उपक्रमात शेतकऱ्यांना अती सघन लागवड पद्धत (Ultra High Density Plantation-युएचडीपी) शिकवली जाते.

 

जॉईन Trading Buzz
Exit mobile version