हळद पिकातून मिळेल आर्थिक समृद्धीचा मार्ग – डॉ. निर्मल बाबू

जळगाव दि.१६ – औषधी व प्रसाधन उद्योगांमध्ये हळदीला खूप महत्त्व आहे. कोरोनासारख्या काळात घसा, खोकला, कफसाठी हळद सह अन्य मसाल्यांची पदार्थ गुणकारी ठरल्याचे आपण बघितले आहेच. महाराष्ट्रातील जमिनीचा पोत पाहिला असता बेड पद्धत आणि जैन ठिबकसह, काटेकोर पाणी व खतं व्यवस्थापनातून सेलम सह अन्य लोकप्रिय हळदीच्या वाणांचे उत्पादन घेता येऊ शकते. हमी भावाच्या करार शेतीतून प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळेल असा विश्वास केरळच्या आयसीएआर आयआयएसआरचे स्पाईस संशोधन विभागाचे माजी संचालक डॉ. निर्मल बाबू यांनी व्यक्त केला.


जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त डॉ. निर्मल बाबू शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, कृषी संशोधन प्रात्यक्षिक विभागाचे संजय सोनजे यांची उपस्थिती होती. जैन इरिगेशनच्या कृषी संशोधन प्रात्यक्षिक विकास केंद्रावर देशभरातील १९ हळदीच्या जातींचे उत्पादन घेण्यात आले. यामध्ये कान्हदेशातील लोकप्रिय सेलम यासह मेघा, राजेंद्र सोनाली, राजेंद्र सोनीया, पितांबर, सिक्कीम लोकल यांचा समावेश आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन या आरोग्यादृष्ट्या महत्त्वाचा गुणधर्म असलेला घटक असतो. त्याचे प्रमाण कान्हदेशातील जास्त प्रमाणात लावली जाणारी व्हरायटी सेलम यात दिसतो. जैन हिल्स वरील संशोधन प्रात्यक्षिक केंद्रामध्ये बेड, वाफसा पद्धत, मल्चिंगचा वापर, यासह दोन ड्रीप लाईन द्वारे सिंचन दिले गेले. यातून योग्य वेळी पाण्याचा ताण देऊन फर्टिगेशन यंत्रणेद्वारे खते देता आली. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी जवळपास एकरी प्रति २२ ते २३ टन उत्पादन घेतल्याचे डॉ. निर्मला बाबू म्हणाले. उच्च दर्जाच्या हळदीला जगात खूप मागणी आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. योग्य व्यवस्थापनातून हळदीच्या कंद जवळपास एक ते दोन किलोचा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वात आधी चांगली रोपांची लागवड करावी यातून लागवडीचा खर्चही कमी होईल. त्यामुळे गुणवत्तापूर्ण रोपांचा आग्रह शेतकऱ्यांनी धरावा असे सांगत जैन हिल्स येथेही व्हायरस फ्री रोपे मागणीनुसार तयार केली जात असल्याचेही डॉ. निर्मला बाबू म्हणाले. स्मृती भ्रंश, कर्करोगसह अन्य आजारांवर हळद गुणकारी असल्याचे अनेक निष्कर्य समोर आले आहेत. यासह अन्य महत्त्वांमुळे हळद सह मसाल्यांची अन्य पिकाला जागतीक मागणी वाढत आहे. असे असताना जैन इरिगेशनच्या पांढरा कांदा करार शेतीच्या धर्तीवर करार शेती करून उत्पन्न घेऊन महाराष्ट्र मुख्य पुरवठादार म्हणून आणखी पुढे येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करीत कीडनियंत्रणासह अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळून, हळद पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहनही यावेळी डॉ. निर्मला बाबू यांनी केले.

जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

जळगाव दि.१५ – मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील वापर जैन हिल्सवरील संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर दिसत आहे. यातून हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शाश्वत शेतीचा विश्वास निर्माण होत आहे; असे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त अनिल भोकरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. अभ्यास दौरावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे, डी. एम. बऱ्हाटे, श्रीराम पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे सहकारी व शेतकरी उपस्थित होते. गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत. याठिकाणी आधुनिक शेती करीत असतांना मुख्य भेडसावणार प्रश्न म्हणजे मजुरांची टंचाई यासाठी यांत्रिकरणाचा सुरेख संगम दिसते. आगामी शेती आणि सद्यस्थितीमधील शेतीतील प्रश्न यावर येथे शाश्वत उपाय सापडतात. कोरडवाहू फळबाग लागवड, कमी जागेत कमी पाण्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढता येईल याचे प्रात्यक्षिक जैन हिल्सवर बघायला मिळते. शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर आधुनिक तंत्रज्ञानाची आणि कमी खर्चाची शाश्वत उत्पादन घेण्याची सांगड याठिकाणी दिसून येत असल्याचे अनिल भोकरे म्हणाले. तंत्रज्ञानातून किफायतशीर काटेकोर पद्धतीने शाश्वत शेतीचा मार्ग शेतकऱ्यांना गवसत आहे. माझ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत यातून शेतीवरचा वाढता खर्च कमी करून योग्य तो सकारात्मक बदलांसह कांद्याची किफायतशीर शेती कशी करावी असा संदेश या अभ्यास दौरातून मिळत आहे. या अभ्यास दौऱ्यात कृषिविभागातील अधिकारी, अभ्यासक यासह शेतकऱ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना – डॉ.व्यंकट मायंदे

जळगाव दि.14 जैन हिल्सवरील आयोजित परिसंवादामध्ये उद्योग आणि संशोधन याची चांगली सांगड कांदा व लसूण परिषदेत घातली आहे. यामुळे कांदा व लसूण पिकांना मोठी चालना मिळेल. यांत्रिककरणाबाबत साधक बाधक चर्चा झाली ही परिषद शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बदल करणारी ठरेल असे मत अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी व्यक्त केले.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स (आयएसए, राजगुरूनगर, पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र यांच्यातर्फे जैन हिल्स येथे तिसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध विषयांवर मंथन करण्यात आले. या चर्चासत्राचा आज समारोप झाला. शास्त्रज्ञ, अभ्यासकांनी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर विविध पैलू लक्षात घेवून आपले पेपर सादरीकरण व मौखिक सादरीकरण केले. यावेळी डॉ. व्यंकट मायंदे बोलत होते. परिषदेच्या सकाळ सत्रात जैन इरिगेशनचे डॉ. डी .एन. कुलकर्णी यांनी कांदा व लसूण प्रक्रिया उद्योगाबाबत पेपर सादरीकरण केले. ते म्हणाले, कांदा व लसूण पिकात प्रक्रिया करण्यासंबंधी सकारात्मक काम सुरू आहे. हे काम अनेक भागात यशाने सुरू आहे. जैन उद्योग समूहाने यासंबंधी शेतकऱ्यांशी करार करून कांदा लागवडीसंबंधी कार्यवाही सुरू केली आहे. कांदा खरेदी व त्यावर प्रक्रिया केली जाते. मूल्यवर्धनामुळे कांदा शेतीला आधार मिळाला आहे. पांढरा कांदा करार शेती यशस्वी झाली असून, त्याचे चांगले परिणाम दिसतात. या करार शेतीसंबंधी बियाणे पुरवठा, पीक संरक्षण, निविष्ठा याबाबत त्यांनी माहिती दिली.

तसेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाड कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी ‘कांदा व लसूण पिकाची काढणी, हाताळणी आणि प्रक्रिया व त्याची साठवणूक याबाबतच्या तंत्रज्ञानावर चर्चा या परिसंवादात होत आहे. शेतकरी, शास्त्रज्ञांसाठी हा परीसंवाद निश्चित मार्गदर्शक ठरत आहे, ‘असे मत व्यक्त केले.

जैन फार्मफ्रेश फूड ली. चे सुनील गुप्ता म्हणाले, कांदा प्रक्रिया, निर्जलीकरण प्रक्रियेत प्रतवारी, स्वच्छता आदी मुद्दे महत्त्वाचे आहे. यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. जैन व्हॅली येथील कांदा प्रक्रिया केंद्रात सर्व गुणवत्ता व इतर बाबींबाबत कटाक्ष आहे. कारण गुणवत्तापूर्ण कच्चा माल असायला हवा. तसेच त्यावर प्रक्रिया करीत असतानाही स्वच्छता व इतर बाबींची काळजी घेतली जाते, असेही सुनील गुप्ता म्हणाले.

जैन इंटरनॅशनल फूड्स ली. लंडन (यु. के.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुवन शर्मा म्हणाले, कांदा व लसूण निर्जलीकरण अमेरिकेतून पुढे आले. तेथे पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांना ताजा कांदा पोचविण्यासंबंधी अडचणी आल्या. यातून कांदा व लसूणातील निर्जलीकरणासंबंधी काम सुरू झाले. १९५० ते १९७० च्या काळात कांदा व लसणाच्या प्रक्रियेतील यंत्रणा विकसित झाली. त्याचा प्रसारही झाला. कांदा प्रक्रिया उद्योग वाढला आहे. त्यात भारताचा वाटा २१ टक्के असून, लसूण प्रक्रिया उद्योगात चीनचा वाटा ९० टक्के आहे. तसेच ब्रिटनचा वाटा कांदा प्रक्रिया उद्योगात अधिक आहे. देशात हा उद्योग आणखी वाढेल, यासंबंधी संधी आहे. पांढरा कांद्यावर देशात अधिकची प्रक्रिया केली जाते, असेही शर्मा म्हणाले.

समारोपाच्या दुपारच्या तांत्रिक सत्रात व्यापार, आरोग्य आणि सामाजिक समस्या यावर चर्चा करण्यात आली. या सत्राचे अध्यक्ष जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, सह-अध्यक्ष के. बी. पाटील, आसीएआर-डीओजीआर पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राजीव बी. काळे, डॉ. जे. एच. कदम आणि डॉ.सतीशकुमार व्यासपीठावर उपस्थित होते. कांदा आणि लसूणचा प्रभाव अभ्यासातुन शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासात सुधारणा यावर डॉ. राजीव बी. काळे सादरीकरण केले. डॉ. अनिल ढाके यांनी पांढरा कांदा प्रक्रियेसाठी वापरला जातो. चांगल्या गुणवत्तेचा जाती विकसीत करून हक्काची हमी भावाची शेती करार शेतीच्या माध्यमातून जैन इरिगेशनने सुरू केली. यातुन उत्पादन वाढुन शेतकरी विश्वासु पुरवठादार झाला आहे असे सांगितले. देशांतर्गत व्यापार आणि निर्यातीची सद्यस्थिती, ईशान्य भारतात कांदा वर्गीय पिकांचा घटता वापर,कांदा पिकातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा प्रभाव, मूल्यसाखळीसाठी भौगोलिक मानांकन यासह विविध विषयांवर चर्चासत्र झाले.

कांदा व लसूण पिकातील परिषदेत असे झाले ठराव

कांदा व लसूण विकास परिषदेच्या समारोप चर्चासत्रात व्यासपीठावर इंडियन सोसायटी ऑफ एलम्सचे अध्यक्ष डॉ. के. ई. लवांडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. विजय महाजन, डॉ. सतीश कुमार, डॉ. ए. थंगासामी, डॉ. व्ही. करूपैया आदी उपस्थित होते. कांदा व लसूण चर्चासत्रातून विविध ठराव करित संशोधनाच्यादृष्टीने शिफारसी करण्यात आल्यात. यामध्ये आधुनिक सिंचन, खत व्यवस्थापन तंत्रासह नवे वाण, सुधारित वाणांचा विकास याबाबत कार्यवाही करणार, जास्त किंवा अधिक विद्राव्य घनपदार्थ असलेल्या जातींचा वापर प्रक्रिया उद्योगात आवश्यक आहे. त्यासंबंधीची कांदा जात किंवा वाण विकसित करण्यात येईल, कांदा दरांची स्थिरता येण्यासाठी खरिपातील उत्पादन वाढीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले, जैविक रोग व किडनियंत्रण आणि अजैविक ताण व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणार असल्याचा निर्धार, कांदा साठवणुकीसाठी आधुनिक साठवण गृह उभारून काढणी नंतर होणारे नुकसान कमी करण्यात येणार, कांदा पिकात प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन उद्योजक, शेतकरी उत्पादक गटांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यांत्रिकरण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडण्यात आले. नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद गतीने करण्यासाठी निर्णयक्षम यंत्रणा मोबाईल अॅपद्ारे केली आहे, तिचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहिर करण्यात आले. जैन करार शेतीचे कांदा पिकातील मॉडेल शेतकऱ्यांना लाभदायी ठरत असून, त्या मॉडेलचा प्रसार करण्याची गरज असून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यासाठी भर देण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली.

फोटो कॅप्शन – जैन हिल्स येथे आयोजित कांदा व लसूण पिक चर्चासत्रात ठराव मांडताना व्यासपीठावर डॉ. के. ई. लवांडे, डॉ. अनिल ढाके, डॉ. विजय महाजन व मान्यवर

शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – डॉ. के. ई. लवांडे

जळगाव दि.१३– शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीचे तंत्र समजून घेऊन शास्त्रीयदृष्ट्या शेती कसण्याचा ध्यास घेतला पाहिजे. यासाठी योग्य वाण, बियाणांची निवड केली पाहिजे. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या लागवड पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. ठिबक सिंचनाचा काटेकोर व्यवस्थापनातून शास्त्रीयदृष्ट्या शेती केली तर ती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरेल, असा विश्वास दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आयएसएचे अध्यक्ष डॉ. के. ई. लवांडे यांनी व्यक्त केला.

कांदा व लसूण राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रत्यक्ष संशोधन विकास व प्रात्यक्षिक केंद्रावर क्षेत्र भेटी प्रसंगी डॉ. के. ई. लवांडे, डॉ. निरजा प्रभाकर, डॉ. ए. भगवान, डॉ. दत्तात्रय सहदेवने, डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव, के. बी. पाटील

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स (आयएसए, राजगुरूनगर, पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र यांच्यातर्फे जैन हिल्स येथे तिसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रत्यक्ष शिवार भेटीमध्ये डॉ. के. ई. लवांडे बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत तेलंगणा कृषी विद्यापीठाचे कुलुगरू डॉ. निरजा प्रभाकर, तेलंगणा कृषी विद्यापीठाचे संशोधन विभागाचे संचालक डॉ. ए. भगवान, जैन फार्मफ्रेश फूड्स लि.चे संचालक सुवन शर्मा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव, के. बी. पाटील, शेतकरी प्रतिनिधी म्हणून डॉ. दत्तात्रय सहदेवने यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते. दरम्यान प्रत्यक्ष संशोधन विकास परिक्षेत्राचा अभ्यासासाठी देशभरातून सहभागी कांदा व लसूण चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व संशोधकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपसंचालक (फलोत्पादन) डॉ. एच. पी. सिंह, एडीजी भारत सरकार डॉ. सुधाकर पांडे, एडीजी डॉ. मेजर सिंग यांनीसुद्धा संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावरील जैन हायटेक तंत्रज्ञानातून समृद्ध शेती, फळबागांमधील अतिसघन लागवड तंत्रज्ञानासह कांद्याच्या ८२ प्रकारच्या विविध जातींची लागवड बघितली. एनर्जी पार्क, टिश्यूकल्चर पार्क, जैन स्वीट ऑरेज, फ्युचर फार्मिक, भविष्यातील शेतीमध्ये एरोपोनिक, हायट्रोपोनिक, व्हर्टिकल फार्मिंग हे मॉडर्न अॅग्रीकल्चर कांदा व लसूण राष्ट्रीय चर्चासत्रातील सहभागी संशोधकांनी अभ्यासली.

प्रत्यक्ष शिवार भेटीप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. के. ई. लवांडे यांनी कांदा व लसूण चर्चासत्रांच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. त्यात ते म्हणाले, शेतकरी, विद्यार्थी, संशोधक, भागधारक, बिजोउत्पादक यांना एकत्रीतपणे आणून कांदा व लसूण पिकांमधील जगभरातील चांगले संशोधन समजावे यातून गुणवत्तापुर्ण कांद्याचे उत्पादन व्हावे हा उद्देश असल्याचे सांगितले. आणि तो जैन हिल्सच्या संशोधन प्रात्याक्षिक केंद्रावर लावलेल्या विविध प्रकारच्या कांदा पिकातून दिसतो. ८० ते ८२ दिवसाचे पिकपद्धती बेड पद्धत, ठिबक, रेनपोर्ट, स्प्रिंकलर, जैन ऑटोमेशन आणि न्युट्रीकेअर मधून अचूक आणि मोजूनमापून दिलेले खतांमुळे येथील कांद्याचे उत्पादन प्रति एकरी १८ ते २० टन येऊ शकते. याठिकाणी अभ्यास दौरानिमित्त शेतकऱ्यांनी यावे ते पहावं आणि या पद्धतीने शेती करावी दरामध्ये चढ उतार जरी झाले तरी उत्पादन वाढीमुळे त्याचा फायदा होईल असा विश्वास डॉ. के. ई. लवांडे यांनी व्यक्त केला.

डॉ. निरजा प्रभाकर यांनी मनोगत व्यक्त केले त्यात त्या म्हणाल्या, कांदा लागवडीसाठी व काढणीसाठी मजूरांचा खर्च वाढतो यावर उपाय म्हणून जैन हिल्सच्या संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर कांदा काढणी यंत्र, लावणी यंत्रासह विविध शेतीउपयुक्त अशी अवजारं आहेत. यासह जैन ऑटोमेशन यंत्रणेमुळे सिंचनासाठी लागणारा अतिरीक्त खर्च कमी होईल आणि विविध वाणांतून समृद्धीचा मार्ग शेतकऱ्यांना मिळेल असेही त्या म्हणाल्या.

डॉ. ए. भगवान यांनी जैन हिल्स संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर लावलेल्या फळबागेसह, कांदा लागवडीसाठी एकात्मिक स्वयंचलित यंत्रणेतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जवळपास ३० ते ४० टक्के जास्त होईल कारण वॉटर सोल्युबल खतांचा पुर्णक्षमेतेने वापर हा फर्टिगेशन यंत्रणेमुळे शक्य असल्याचे डॉ. ए. भगवान यांनी सांगितले.
शेतकरी प्रतिनिधी म्हणून अहनगरचे डॉ. दत्तात्रय सहदेवने यांनी शेतकऱ्यांच्या वतीने शिवार फेरी मिळालेल्या तंत्रज्ञानातून एकाच ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या जातींच्या कांद्याचे पीक घेता येऊ शकते असा विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले.

राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन


जळगाव दि.१२ कांदा व लसुण पिकाच्या उत्पादकतेत सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर, कीड नियंत्रणासाठी कमी खर्चात करावयाचे प्रयत्न, फर्टीगेशन यंत्रणेतून खतांचा कार्यक्षम वापर आणि मल्चिंग पेपरसह अन्य पद्धती वापरून काटेकोर व्यवस्थापनातून वाढ मिळविणे शक्य आहे. त्यासाठी नाविन्याचा तंत्रज्ञानात सातत्य असावे. यातून शाश्वत उत्पादन हाती मिळू शकते, असा सूर जळगाव जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय कांदा व लसूण चर्चासत्रात उमटला.


या चर्चासत्राचा रविवारी (ता.12) दुसरा दिवस होता. शास्त्रज्ञ, अभ्यासकांनी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर विविध पैलू लक्षात घेवून आपले पेपर सादरीकरण व मौखिक सादरीकरण केले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स (आयएसए, राजगुरूनगर, पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र यांच्यातर्फे जैन हिल्स येथे तिसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध विषयांवर मंथन झाले.
रविवारच्या पहिल्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख होते. राजगुरूनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. ए. थंगासामी यांनी कांदा व लसूण पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनावर पेपर सादर केला. ते म्हणाले, खरीप, उशिराचा खरीप व रब्बीमधील कांदा पिकास अन्नद्रव्यांची वेगवेगळ्या प्रमाणात मात्रा हवी असते. त्यासंबंधी कांदा व लसूण संशोधन केंद्राने शिफारसी केल्या आहेत. कांदा बियाणे रोपण, पुर्नलागवड आणि वाढीच्या काळात हे अन्नद्रव्य व्यवस्थापन व्हायला हवे. पाण्यात विरखळणारी अन्नद्रव्ये व इतर माध्यमातून उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये आहेत. त्यात जमिनीची स्थिती महत्त्वाची असते, असे ते म्हणाले. जैन इरिगेशन सिस्टीम्सचे कृषीतज्ज्ञ डॉ. पी. सोमण यांनी कांदा पाणी व्यवस्थापनाची माहिती दिली. ते म्हणाले, सूक्ष्मसिंचनाच्या मदतीने पीक उत्पादन वाढले आहे. पाण्याची काटकसर करणेही त्यात शक्य झाले आहे. तुषार व ठिबक सिंचन कांदा पिकासाठी लाभदायी आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील शेतकऱ्यांची केस स्टडीही त्यांनी सादर केली. सूक्ष्मसिंचन प्रणालीची वितरण क्षमता (डीस्चार्ज) किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण यातून किती पाणी दिले जाते, हे लक्षात येते. त्याच्या नोंदी असायला हव्यात. कांद्याच्या १०० दिवसांच्या काळात ५०० मिलीमीटर पाणी देणे आवश्यक आहे. अतिपाण्याचा वापर टाळण्यासाठीदेखील यंत्रणा उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.
दिल्ली येथील कृषी अनुसंधान परिषदेतील भाजीपाला विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भूपाल सिंह यांनी कांदा बिजोत्पादनातील आव्हाने याबाबत पेपर सादर केला. ते म्हणाले, कांदा बिजोत्पादनात बियाण्याची शुद्धता महत्त्वाची असते. एकाच जातीच्या किंवा वाणाचे बिजोत्पादन घेताना दोन प्रक्षेत्रातील अंतर ७०० मीटरवर हवे आहे. यामुळे बियाण्याची शुद्धता जोपासता येते. शुद्धता जोपासण्यासाठी वाण निवडही महत्त्वाची असते. आयएआरआय नवी दिल्ली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ विश्वनाथ यांनीही कांदा व लसूण बी निर्मीतीमधील आव्हाणे यावर संशोधनात्मक मार्गदर्शन केले. या उपक्रमात बियाणे उत्पादक कंपन्यांनीची भूमिका व इतर मुद्दे त्यांनी विषद केले. ज्ञानेश्वर मदने, संदीपकुमार दत्ता, टी. एल. भुतिया, आर. लाहा, विजय महाजन, एस. एम. गावंडे, एम. एम. देशमुख, एस. आर. भोपळे, ए. डी. वराडे, बी. जे. पटले, कृषितज्ज्ञ बी. डी. जडे, ए. आर. पिंपळे, डी. एस. फाड, एस. बी. वडतकर, एन. बी. झांजड, एन. के. हिडू, गणेश चौधरी, हनुमान राम, राहुल देव, बी. एम. पांडेय, ए. पटनायक, लक्ष्मीकांत, व्ही. सुचित्रा, ए. भागवान, बी. निरजा प्रभाकर, सईड अली, बी. के. दुबे, चंदन तिवारी, पी. के. गुप्ता, अनिता कुमारी, विणा जोशी आदींनी मौखिक सादरीकरण केले. यामध्ये सेंद्रीय शेती, ड्रीप इरिगेशन, विद्रांव्य खतांचा प्रभावी वापर, खरिप कांदा उत्पादन याविषयांवर चर्चा करण्यात आले. सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना संशोधकांना पाऊनतासाचा वेळ दिला होता. बिजोउत्पादन समस्या व त्यावरील उपाय योजना यावर मंथन झाले. कृषि निवष्ठा कंपनी बियाणे उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांनी या सत्रात सहभाग घेतला. पोस्टर स्पर्धेचा निकाल चर्चासत्राच्या समारोपावेळी जाहिर केला जाणार आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सायकल यात्रेचा समारोप

ग्राम संवाद सायकल यात्रा समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम : डॉ. के. बी. पाटील

जळगाव दि.११ – महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच काम गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद सायकल यात्रेने केले आहे. सायकल यात्रा हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून यात्रेच्या संपर्कात येणाऱ्या व सहभागी असणाऱ्या सर्वांसाठी ती लाभदायक आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाची संख्या वाढली पाहिजे असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, प्रा. डॉ. अश्विन झाला व यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी उपस्थितीत होते.


समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. के. बी. पाटील पुढे म्हणाले की, सध्या समाज माध्यमातून गांधीजींबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. सायकल यात्रेने याबाबत केलेली जागरूकता महत्वाची ठरते. सर्व सायकल यात्रींचे त्यांनी अभिनंदन केले व आपण केलेले कार्य नक्कीच परिवर्तन घडवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात अरमान आंगरा यांच्या प्रार्थना व भजनाने झाली. त्यानंतर सायकल यात्रेचे सादरीकरण करण्यात आले. सायकल यात्रेत सुरेश पाटील, विश्वजीत पाटील, श्रीराम खलसे, मारिया सिसिलिया, विशाल टेकावडे, आकाश थिटे, सुभाष कासदेकर, अमनकुमार वर्मा, काळूभाई मायडा, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, भिका पाटील, धनराज पाटील, वाल्मिक सैंदाणे यांचा सहभाग होता. यात्रेत सहभागींपैकी शिवाजी कोकणे, पार्थ सारथी, नीर झाला , राकेश शइकिया, शुभम पवार, डॉ. निर्मला झाला, मयूर गिरासे, आचल चौधरी यांनी अनुभव कथन केले. या यात्रेमुळे स्वतःशी, निसर्गाशी व जनतेशी संवाद साधता आला. खान्देशी लोकांचे प्रेम, येथील संस्कृती, आदरातिथ्य व खाद्य पदार्थ यांनी आम्हास आनंद दिल्याचेही त्यांनी म्हटले. व्यसनाधीनतेची वाढती समस्या तसेच शाळांमधील शिक्षण व स्वच्छता याबाबत विशेष कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अब्दुलभाई यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागींना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. डॉ. निर्मला झाला यांनी आभार मानले. गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, नितीन चोपडा, संतोष भिंताडे, हेमंत बेलसरे, चंद्रशेखर पाटील, अशोक चौधरी, तुषार बुंदे, योगेश संधानशीवे यांची उपस्थिती होती.

कांदा, लसूण याविषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचा जैन हिल्सला आरंभ;
स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कारांने शेतकऱ्यांचा गौरव

शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे काम करावे – अनिल जैन

जळगाव दि. 11– कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केला.
‘कांदा, लसूण व्यवस्थापन, शाश्वत उत्पादन व मूल्य साखळीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच व्यापार.’ याविषयावर तिसऱ्या राष्ट्रीय परिसंवाद जैन हिल्सवरील गांधीतीर्थच्या, कस्तुरबा सभागृह येथे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनिल जैन बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून एकरी सर्वाेच्च उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. आकर्षक सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, साडी आणि २१ हजाराचा धनादेश असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., आय सी ए आर, कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर, पुणे, इंडियन सोसायटी ऑफ एलियम, राजगुरूनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या परिषेदचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून १४ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत जगभरातील कांदा व लसूण शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित आहेत.


परिषदेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, आयएसए अध्यक्ष डॉ. के. ई. लवांडे, डॉ. एच. पी. सिंग, डॉ. एस. एन. पुरी, डॉ. विजय महाजन, डॉ. मेजर सिंग, डॉ. सुधाकर पांडे, डॉ. ए. जे. गुप्ता, डॉ. पी. के. गुप्ता, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. निरजा प्रभाकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी अनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, शेत, शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा धर्मापेक्षाही मोठी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पांढरा कांदामध्ये संशोधन करून त्याचे उत्पादन वाढविले. करार शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जैन इरिगेशनच्या माध्यमातून मिळवून दिला. व्यवसाय वृद्धीमध्ये शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांची मोलाची भागीदारी असून शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कंपनी आहे. समाजाचा कणा असलेला शेतकऱ्याला संशोधन तंत्रज्ञान सहज सोप्या पध्दतीने प्राप्त व्हावे हाच कुठल्याही संशोधनाचा उद्देश असावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शास्त्रज्ञांनी नवीन जातींवर संशोधन करावे यासाठी जैन इरिगेशन सर्वतोपरी प्रोत्साहन देईल असेही ते म्हणाले. विज्ञान तंत्रज्ञानासोबत शेतकऱ्यांची भागिदारी हेच कंपनीचे यश आहे. अल्पभुधारक आदिवासी शेतकरी विक्रमी १७ ते १८ टन एकरी पांढरा कांद्याचे उत्पादन घेत आहे. यातून ८० लाखाच्यावर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणले आहेत. कांदा निर्जलीकरणातून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त करता येते हे कंपनीने दाखवून दिले. आजही ५० टक्के लोक कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. यात सकारात्मक बदल झाले तर समृद्धीच्या मार्ग गवसेल यासाठी सर्व शास्त्रज्ञ, विद्यापिठे, सरकारे आणि कृषि उद्योजक यांनी एकत्रिपणे कार्य केले पाहिजे असेही आवाहन यावेळी अनिल जैन यांनी उपस्थितांना केले.
प्रास्ताविक डॉ. के. ई. लवांडे यांनी केले. त्यात ते म्हणाले, भवरलालजी जैन यांनी अवघ्या सात हजार रूपयांच्या भांडवलावर आज १२ हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध केला. जलपुर्नभरण, मृदसंधारण, ठिबक सिंचन, सौर ऊर्जा व जैवतंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखविला. या नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या जैन इरिगेशनला ही परिषद सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
डॉ. मेजर सिंग यांनी कांदा साठवण या मार्गदर्शन केले. प्रत्येक पिकांमध्ये हायब्रीड आहे मात्र कांदा व लसुणमध्ये नाही त्यावर संशोधन व्हावे असी इच्छा व्यक्त करीत जागतिक मागणीनुसार निर्यातीच्या दृष्टीने मानांकन पाळून साठवणूक केंद्र तयार केले पाहिजे असे मनाेगत डॉ. मेजर सिंग यांनी व्यक्त केले.
डॉ. सुधाकर पांडे यांनी कांदा पिकाची उत्पादकता कशी वाढता येईल यावर प्रकाश टाकला. चांगल्या दर्जाचे बी जे निर्यातीसह प्रक्रिया उद्योगालाही पुरक असेल त्यावर संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. भारतीय कांद्याची जी चव आहे ती अमेरिकेसह युरोपीयन कांदाची नाही असेही ते यावेळी म्हणाले.

डॉ. एच. पी. सिंग यांनी शेतकऱ्यांच्या फायदासाठी भाजीपाल्यांमध्ये ज्याप्रमाणे हायब्रीड चे संशोधन समोर आले त्याप्रमाणे कांदा व लसूण मध्येही यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. टिश्यूकल्चरमध्ये केळी पिकातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे हेच टिश्यूकल्चर तंत्रज्ञान कांदा पिकातही आणता येईल का यासाठी संशोधनात्मक प्रयत्न केले पाहिजे असेही डॉ. एच. पी. सिंग म्हणाले.
डॉ. एस. एन. पुरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन मार्गदर्शन करताना कांदावर परदेशातून कीड आणि रोगांचे आक्रमण होत आहे. याकडे लक्ष वेधले. यासंबंधी आपल्याला जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. कांदातील टीएएसएस वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधन करणाऱ्या संस्थामध्ये समन्वय असावा असेही डॉ. एस. एन. पुरी म्हणाले.
दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना म्हटली. सुत्रसंचालन डॉ. राजीव काळे यांनी केले. डॉ. विजय महाजन यांनी आभार मानले.
जैन फार्मफ्रेश फुड्सचा स्क्रोल ऑफ ओनर्स आणि अवार्ड ऑफ एक्सलेंस ने गौरव
नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च फाउंडेशन यांना ओनर्स पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. जैन फार्मफ्रेश फुड्स लिमिटेड यांचा स्क्रोल ऑफ ओनर्स आणि अॅवार्ड ऑफ एक्सलेंसने गौरव करण्यात आले. हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार डॉ. एच. पी. सिंग, डॉ. के. ई. लवांडे, डॉ. एस. एन पुरी यांच्या मान्यवरांच्याहस्ते जैन फार्मफ्रेश फुडूस कंपनीच्या वतीने अनिल जैन, डॉ. अनिल ढाके, गौतम देसर्डा, रोशन शहा, संजय पारख, सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील यांनी स्वीकारला. जैन फार्मफ्रेश फूडस लि. चे कार्य अधोरेखित करत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि उच्च तंत्रज्ञान पोहचविणे, करार शेतीच्या माध्यमातून हमी भाव देऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये सहभागी झाल्याने हा सन्मान करण्यात आला.
स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार
(वर्ष – २०१९-२० चे विजेते) – प्रकाश बाबुलाल चौबे यांच्या वतिने त्यांचे बंधू वासुदेव नारायण चौबे, (नशिराबाद ता. जि. जळगाव) यांनी हा पुरस्कार स्वीकारला., अंबालाल परशुराम पाटील (दामळदा ता.शहादा, जिल्हा नंदुरबार), संतोष लालसिंग पवार, (दिवडिया ता. पानसेमल, जि.बडवाणी मध्यप्रदेश) शरद काशिनाथ पाटील (अंजनविहिरे ता. शिंदखेडा जि. धुळे,
(वर्ष- २०२०-२१ चे विजेते) – शेख साजिद शेख सत्तार (कर्जोद ता. रावेर जि. जळगाव.), नंदकिशोर भालचंद्र भामरे (लोणखेडी ता. साक्री जि. धुळे), राहुल गोकुळ पाटील (डाबीयाखेडा ता. नेपानगर जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश), दीपक राजाराम पाटील (होळ ता. जि नंदुरबार)
(वर्ष- २०२१-२२ चे विजेते) – रमेश भुरिया वास्कले (निसरपूर ता. पानसेमल जि.बडवाणी, मध्यप्रदेश), विजय युवराज महाडिक (विटनेर ता. जळगाव), भरत कांतीलाल पाटील (तळवे ता. तळोदा जि. नंदुरबार), शांताराम भीमराव शेलार (ऐंचाळे ता. साक्री जि.धुळे) ह्या शेतकर्‍यांचा सपत्नीक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन जैन फार्मफ्रेश फुड्स लि.चे पांढरा कांदा व अन्य पिकांचे करार शेती प्रमुख गौतम देसर्डा यांनी केले.
कमलसिंग पावरा यांनी डॉ. एस. एन. पुरी आणि अनिल जैन यांना धनुष्यबाण भेट दिले. स्व. सौ कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कारार्थ २०१२ चे रावेर तालुक्यातील आहेरवाडी येथील रविंद्र शामराव पाटील यांनी प्रति एकर २७ मेट्रिक टन कांदा पिकविले त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने विश्वनाथ गोकुळ साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्राम संवाद सायकल यात्रेचा आज समारोप

जळगाव दि. १० महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (३० जानेवारी) सुरु झालेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्राम संवाद सायकल यात्रेचा उद्या शनिवार, दि. ११ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता गांधीतीर्थ येथे समारोप होणार आहे. समारोप सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सल्लागार डाॅ. के. बी. पाटील यांची उपस्थिती लाभणार असुन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. अशोकभाऊ जैन अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सायकल यात्रेतील सहभागी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

म्हसावद, एरंडोल, कासोदा, पारोळा, तामसवाडी, गुढे, मेहुणबारे, चाळीसगाव, नगरदेवळा, पाचोरा, शेंदुर्णी, विटनेर असा प्रवास करुन हि यात्रा गांधीतीर्थ येथे पोहोचणार आहे. गांधीजींच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासह भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषा, प्रदर्शनी, विविध खेळ, पपेट शो (बाहुल्यांचा खेळ), सामाजिक समस्यांवर जागरुकता करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आदींद्वारे या यात्रेने हजारो विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला. अमेरिकेसह महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू, गुजरात राज्यातील ५० यात्रींनी या सायकल यात्रेत सहभाग नोंदवला तर २३ जणांनी ती पुर्ण केली.

पहिल्या आंतर शालेय जैन चॅलेंज लिग फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलां मध्ये सेंट अलायसिस कॉन्व्हेंट स्कूल भुसावल तर १७ वर्षा खालील मुलांमध्ये डी.एल.हिंदी हायस्कूल भुसावल व मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जळगाव विजय.

ऑगस्ट महिन्यापासून अनुभूती रेसिडेन्सी स्कूल येथे पहिल्या आंतर शालेय जैन चॅलेंज फुटबॉल लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ९ फेब्रुवारी २०२३ रोजी या स्पर्धेचे अंतिम सामने खेळविण्यात आले. अंतिम सामन्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टम लिमिट चे अभंग जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अरविंद देशपांडे व रवी धर्माधिकारी मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांच्या शुभ हस्ते उपविजयी, विजयी संघाना व उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.


१४ वर्षाखालील मुले
एकुण संघ -१९
लीग स्पर्धा सामने -४०+सेमी फायनल २ व १ अंतिम सामना असे एकूण ४३ सामने खेळण्यात आले
एकुण गोल -९३
सेंट अलायसिस स्कूल भुसावल वि. वि. अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्सी स्कूल शिरसोली ३-०.
उत्कृष्ट गोल रक्षक – सेंट अलांसिस स्कूल भुसावल चा *मनीष नन्नवरे
उत्कृष्ट डिफेंडर-सेंट ऑलॉसीस स्कूल भुसावल चा ट्राय रॉबर्ट
बेस्ट स्कोरर-अनुभूती रेसिडेन्सीयल स्कूलचा आयुष भोर यांनी या स्पर्धेत एकूण ७ गोल केले होते.
स्पर्धेच्या उत्कृष्ट खेळाडू अंजुमन जामनेर उर्दू हायस्कूल चा अरहान खान हा ठरला.

१७ वर्षाखालील मुले
एकुण -२५ संघ
लीग स्पर्धा सामने -५०+सेमी फायनल २ व १ अंतिम सामना असे एकूण ५३ सामने खेळण्यात आले
एकुण गोल -२०५
विजय – डी. एल. हिंदी स्कूल भुसावल वि.वि.अनुभूती रेसिडेन्सीयल स्कूल शिरसोली ३-२

उत्कृष्ट गोल रक्षक – अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्सी स्कूल शिरसोली च्यासिंघव- तनिष सिंघवी
उत्कृष्ट डिफेंडर-डी.एल.हिंदी स्कूल भुसावळ च्या – *सोहेल शेख
बेस्ट स्कोरर – सेंट ऑलॉसीस स्कूल भुसावल चा -ओम पाटील त्यांनी या स्पर्धेत एकूण १२ गोल केले होते.
स्पर्धेच्या उत्कृष्ट खेळाडू -अनुभूती रेसिडेन्सीयल स्कूल शिरसोली चा प्रियम सांगवी ठरला.

१७ वर्षाखालील मुली
एकुण – ८ संघ
लीग स्पर्धा सामने -१६+सेमी फायनल २ व १ अंतिम सामना असे एकूण १९ सामने खेळण्यात आले
एकुण गोल -१२
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल विजय विरुद्ध गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव २-०.
उत्कृष्ट गोलरक्षक – विद्या इंग्लिश मीडियम ची- गायत्री पाटील
उत्कृष्ट डिफेंडर -पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची स्वरूपा चिरमाडे
बेस्ट स्कोरर-पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची साक्षी आघे यांनी या स्पर्धेत एकूण गोल ५ केले.
स्पर्धेचे उत्कृष्ट खेळाडू पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची – देवांगी पाटील हा ठरली.

या स्पर्धा यशस्वीते साठी पंच म्हणून धनंजय धनगर,कौशल पवार अर्पित वानखडे,पवन सपकाळे वसीम शेख, निखिल पाटील, अमेय तळेगावकर, अरशद शेख,दीपक सस्ते,संजय कासदेकर यांनी काम पाहिले.
या संपूर्ण स्पर्धेसाठी अनुभूती स्कूल ने आपले फुटबॉल मैदान उपलब्ध करून दिले तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स ली ने ही संपूर्ण स्पर्धा प्रायोजित केली होती
सर्व उपविवजयी विजयी संघांचे तसेच वैयक्तिक बक्षिसे प्राप्त खेळाडूंचे जैन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक माननीय श्री अतुल जैन यांनी अभिनंदन केले आहे

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

जळगाव दि. ७ – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आदिवासी तांडे, पाड्या-वाड्यांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५००० लिटर क्षमतेचे ७० जलकुंभ आज लोकार्पण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून जलकुंभ वाटपाचा कार्यक्रम गांधी तीर्थच्या परिसरात झाला.


याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, जैन फार्मफ्रेश फूड्स चे संचालक अथांग जैन, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, जैन इरिगेशनचे प्रतिनिधी म्हणून मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांची उपस्थिती होती. रावेर, चोपडा, चाळिसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, यावल, जळगाव तालुक्यातील आदिवासी तांडे, पाड्या-वस्तांसह ग्रामपंचायतींना जलकुंभ लोकार्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते उपस्थितीत सरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांना जलकुंभ लोकार्पणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जलकुंभासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनकडे १०० गावांकडून नोंदणी झालेली होती आज ७० जलकुंभाचे वाटप करण्यात आले. यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या सीएसआर म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी निधीतून जलकुंभासाठी अर्थसहाय्य लाभले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनची यामागील भूमिका स्पष्ट करताना डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने भवरलालजी जैन यांनी समाजाचे विश्वस्त भावनेतून काम केले. ग्रामस्वराज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांची पुढची पिढी अशोक जैन यांच्यासह जैन परिवार करीत आहे. त्याच भावनेतून गावातील पाण्याची समस्यांवर काम करण्यासाठी जलकुंभ वाटपाचे कार्य हाती घेतले. पाण्याची समस्या मोठी असून पावसाचे पाणी वाचविले पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. शाश्वत पाण्याचे स्रोत कसे निर्माण होतील त्यासाठी जबाबदारीपुर्ण कार्य केले पाहिजे. शासनासह स्वयंसेवी संस्थांकडून असलेले कार्य कौतुकास्पद आहेच मात्र त्यांच्यावर अवलंबून न राहता नागरिक म्हणून आपणही आपल्या पुर्वजांप्रमाणे पाण्याचे संवर्धन करावे असे आवाहन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.
डॉ. पंकज आशिया यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्या ज्या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होत असते अशा गावांमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशन व जैन इरिगेशनच्या सहकार्यातून जलकुंभ वाटप करण्यात आले. जलकुंभाचे चांगल्या प्रकारे उपयोग करण्याचे आवाहन करीत जलजीवन मशिन अंतर्गत गाव पातळीवर स्वच्छता आणि पाण्याबाबत ज्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्यांनी कृतिशीलपणे कार्य केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नितीन चोपडा यांनी केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version