जळगांव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहे
काल व आज जळगाव संघाचा साखळी सामना परभणी यांच्या दरम्यान खेळण्यात आला. सामन्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे उपाध्यक्ष श्री एस. टी. खैरनार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
नाणेफेक जळगाव संघाने जिंकून परभणी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधारचा निर्णय योग्य ठरवीत जळगाव गोलंदाजांनी परभणी संघाला ३५.२ षटकात केवळ १२१ धावात बाद केले त्यात सम्राट राज ४० सौरभ शिंदे १८ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव संघा तर्फे जेसल पटेल ५ सौरभ सिंग ३ आणि ऋषभ कारवा यांनी २ गडी बाद केले प्रतिउत्तरात जळगांव संघाने आपले पहिला डाव ६७ षटकात ७ गडी बाद ३८२ धावावर घोषीत केला आणि २६१ धावांची महत्वपूर्ण अशी विजयी आघाडी घेतली त्यात कर्णधार वरुण देशपांडे याने शतकी खेळी करून १३१ धावा केल्या त्याला साथ देत निरज जोशी ८० आणि कुणाल फालक नाबाद ७५ धावा केल्या.
गोलंदाजीत परभणी संघा तर्फे शुभम कटारे २ मोहंमद युसूफ, सतीश बिराजदार आणि ओंकार मोहीते यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले
परभणी संघ २६१ धावांनी पिछाडीवर पडला व त्यांचा दुसरा डाव केवळ ३४.३ षटकात ७५ धावात गारद झाला त्यात पुरुषोत्तम खांडेभरद १७, सौरभ शिंदे १५ आणि एलिझा १३ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव तर्फे राहुल निंभोरे ४ सौरभ सिंग यांनी २ गडी बाद केले आणि हा सामना जळगांव संघाने एक डाव आणि १८६ धावांनी जिंकला व बोनस गुणासहित ७ गुण प्राप्त केले. ह्या सामन्यात पंच म्हणून संदिप चव्हाण व घनःश्याम चौधरी आणि गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पहिले.
विजयी संघाचे जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन व संपूर्ण कार्यकारणी मंडळाने अभिनंदन केले.
Category: Jain Irrigtion
आंतर जिल्हा मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतर जिल्हा मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलींचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता जैन स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश स्कूल मागे) आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक सर्व मुलींनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे असे जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष श्री अतुल जैन सचिव श्री अरविंद देशपांडे सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले आहे
जैन हिल्स च्या अभ्यास दौऱ्याप्रसंगी मधुमक्षिका पालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

जळगाव दि.१२ – जैन इरिगेशनच्या फळलागवड पद्धतीच्या सघन, अतिसघन लागवड तंत्रामुळे झाडांची संख्या वाढली. उत्पादनही वाढत आहे. मात्र चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी खात्रीशील नियंत्रीत वातावरणातील मातृवृक्षापासून तयार झालेली व्हायरस फ्री, रोगमुक्त रोप व कलमांची लागवड शेतकऱ्यांनी करावी. यासाठी चांगल्या नर्सरीतून रोपांची निवड करणे महत्त्वाचे आहे. एक सारखी रोपांची वाढ झाली तर फुलोरा अवस्थाही एक समान होऊन मधुमक्षिका ह्यांना परागिभवनाचे कार्य व्यवस्थीत करता येते. यातून फळधारणाही उत्तम होऊन निर्यातक्षम फळांचे उत्पादन होते. यासाठी मधुमक्षिका पालनाकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे; असे आवाहन हॉर्टिकल्चर व लसूण तज्ज्ञ आणि इस्त्राईलचे भारतातील राजदूत यअर ईशेल (Yair Eshel) यांनी केले.
जैन हिल्सच्या अभ्यास दौऱ्यात देशभरातील शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी भेट देत आहेत. आज फळबाग लागवड आणि उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिकांची भूमिका यावर इस्त्राईलचे यअर ईशेल (Yair Eshel) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, संजय सोन्नजे, अभिनव अहिरे, बी. डी. जळे, विकास बोरले, मिलींद पाटील, गोविंद पाटील उपस्थित होते.
जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर आंबा, केळी, भगवा डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्रा, सिताफळ, चिकू यासह विविध फळबाग लागवड करण्यात आली आहे. विविध प्रकारची हळद आणि आले (अद्रक) लागवड आहे. देशभरातील नामवंत कांद्याचे वाण असलेल्या ८२ च्या वर कांद्याची लागवड केली आहे. यात कांद्याच्या सीड साठी उपयुक्त असलेले मधुमक्षिकांचे परागिभवन यावर प्रात्यक्षिकांसह यअर ईशेल (Yair Eshel) यांनी मार्गदर्शन केले. कुठंलेही उत्पादन वाढीमध्ये मधुमक्षिकांचे योगदान खूप मोलाचे असते. यासाठी सुरवातीलाच चांगल्या रोपांची उत्तम नर्सरीतून निवड केली पाहिजे. त्यामुळे रोपांची एक समान वाढ होऊन उत्पादन वाढते परागीभवन करताना मधुमक्षिकांनाही अडचण येत नाही. यात एपिस मॅलिफेरा या जातीची मधमाशी महत्त्वाची आहे. एक किलोमिटर परिसरात ती काम करते. चांगल्या फळधारणेसह कांद्याच्या सीड चे उत्पादन वाढीमध्ये मधुमक्षिकांचे पालन महत्त्वाचे ठरते. शिवाय ५० किलोच्या मधुमक्षिकाच्या पेटीतून वर्षाला सुमारे ५० किलो मध ही उपलब्ध होऊ शकते. यातून शेतकऱ्यांचा मधुमक्षिपालनाचा खर्च निघतो. आणि शेतात जेसुद्धा फुलोरा येणारी जी पिके आहेत त्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन होते. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन कांदा, लसुण यासह मसाल्यांवर होणारी प्रक्रिया समजून घेतली. नियंत्रीत वातावरणात असलेली मातृवृक्षापासून रोगविरहीत, व्हायरस फ्री रोपांची निर्मिती कशी होते यासाठी टिश्यूकल्चर विभागाचीही त्यांनी पाहणी केली.
अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शनाचे भाऊंच्या उद्यानात उद्घाटन
आर्ट मेला प्रदर्शनात विद्यार्थ्याचे कलागुणांचे दर्शन – चित्रकार नितीन सोनवणे
जळगाव दि. ११ – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आर्ट मेला हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. ग्रामीण संस्कृती, शहरीकरण, महिलांचे संरक्षण यासह पर्यावरण हेच सर्व काही असे संदेश या प्रदर्शनातून मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूल च्या व्यवस्थापनाकडून मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती होते असे मनोगत प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे यांनी व्यक्त केले.
अनुभूती निवासी स्कूल चे विद्यार्थ्यांकडून वर्षभरात कलेचे विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉटरी (मातीकाम), ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे भाऊंचे उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि. ११ ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, जैन इरिगेशन चे अभंग जैन, प्राचार्य देबासिस दास, विजय जैन, कला शिक्षक प्रितम दास, प्रितोम खारा यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फित सोडून उद्घाटन करण्यात आले.
आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यवसायीक कलावंताच्या तोडीचे आहे. त्यातील प्रबोधनात्मक संदेश हे विचार प्रवर्तक आहे,अभ्यास करणारा चित्रकार म्हणून मनाला आगळी अनुभूती झाल्यासारखे वाटते असे विजय जैन म्हणाले.
अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट, पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन बघता येणार आहे. पेन्सील कलर,ॲक्रलिक,सॕरमिक्स नॕकेट राखू,वाॕटर कलर यासह विविध कलाकृती आर्ट मेला मध्ये पाहता येत आहे. आज प्रदर्शन स्थळी अनुभूती च्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह शिल्प बनविले ते सर्वांसाठी आकर्षक ठरले.
भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत म्हणजे सकाळी ५.३० ते १०.३० व संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान पाहता येईल. हा ‘आर्ट मेला’ सर्वांसाठी खुला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्कूलतर्फे आगळेवेगळे उपक्रम घेतले जातात. जळगावकरांनी आर्ट मेला अनुभवावा असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
जैन तंत्रज्ञान नफ्याची शेतीसाठी खूपच उपयुक्त – अमोस लुगोलुभी जैन हिल्स वरील अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांशी साधला संवाद
जळगाव दि.११ – जगभर शेती उपयुक्त तंत्रज्ञान व त्यावर आधारीत शेती बघितली, मात्र जैन हिल्सवरील तंत्रज्ञान वापरून विकसीत केलेली शेती ही शेतकऱ्यांसाठी खूपच नफ्याची आहे. कारण अचुक व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढल्याचे येथे उदाहरण आहे. यासाठी जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळले पाहिजे असे महत्त्वपूर्ण विधान युंगाडा येथील अर्थमंत्री अमोस लुगोलुभी यांनी केले.
जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान शेतकरी अभ्यास दौरामध्ये अमोस लुगोलुभी यांनी सहभागी झाले. आणि शेतीउपयुक्त तंत्रज्ञान समजून घेतले. याप्रसंगी त्यांसोबत युगांडा येथील मौसेम मोहुमूझा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, एस. आर. बाला उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील महिला शेतकरी अभ्यासाठी जैन हिल्स येत असल्याचे अमोस लुगोलुभी यांनी आश्चर्य व्यक्त केले. जैन हिल्सच्या संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर ८२ प्रकारच्या कांद्याची लागवड त्यांनी बघितली. लागवड पद्धतीमधील बदल, गादी वाफेचा वापर, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, ठिबक व सूक्ष्मसिंचनातून फर्टिगेशन, जैन ऑटोमेशन यातून कांदा लागवडीचे उत्पादन यावर त्यांनी प्रकाश टाकला. जैन इरिगेशनच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून कांद्या लागवड यशस्वी झाली. जैन हिल्सवरील प्रत्येक जातीचा कांदा हा एकसमान आणि त्याची आकाराने वाढही उत्तम असून ते प्रक्रिया उद्योगासाठी उपयूक्त असल्याचे ते म्हणाले. जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिकातून मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याने सकारात्मक बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समृद्ध होईल असेही युंगाडाचे अर्थमंत्री अमोस लुगोलुभी म्हणाले. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड्च्या प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन मसाल्यांवर होणारी प्रक्रिया समजून घेतली. प्लास्टीक पार्क आणि एनर्जी पार्कच्या सोलर सह भविष्यातील शेती म्हणजे फ्युचर फार्मिंग ही समजून घेतली. कमी वेळेत कमी जागेत जास्तीत जास्त व्हायरस फ्री उत्पादन कसे घेता येईल, हे त्यांनी बघितले आणि जैन इरिगेशनचे हे तंत्रज्ञान जगातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले.
अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शन भाऊंच्या उद्यानात
जळगाव दि. १० – अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून सर्जनशिलतेला चालना देण्यासाठी विविधांगी उपक्रम राबविले जातात. यात विद्यार्थी वर्षभरात कलेचे विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेत असतात. चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉटरी (मातीकाम), ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे भाऊंचे उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि. ११ ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ११ मार्च संध्याकाळी ५ वाजेला प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल.
भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरीत अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट, पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन असेल. भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत म्हणजे सकाळी ५.३० ते १०.३० व संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान पाहता येईल. हा ‘आर्ट मेला’ सर्वांसाठी खुला असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकरांनी आर्ट मेला अनुभवावा असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
जैन इरिगेशनच्या रक्तदान शिबिरात 282 बाटल्यांचे रक्तसंकलन स्व. हिरालाल जैन यांच्या 33 व्या स्मृतिदिनी उपक्रम
जळगांव 09 मार्च 23 – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या 33 व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात 282 इतक्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हिल हॉस्पीटल जळगाव या संस्थांनी रक्ताचे संकलन केले.
स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंना अभिवादन व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प घेतला आहे. कंपनीतील सहकाऱ्यांनी रक्तदान करून रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताची गरज भागवून सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे 151, जैन फूडपार्क येथे 089, अलवर प्रकल्प 03, बडोदा प्रकल्प -08, हैद्राबाद – 12, चित्तूर – 16 आणि उदमलपेठ – 03 असे रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. सर्व मिळून एकूण 282 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले.
जैन प्लास्टिक पार्क येथे सकाळी 8 वाजता कंपनीचे एमआयएस विभागाचे सहकारी मिलींद प्रदीप चौधरी यांच्या रक्तदानाने औपचारिक उद्घाटन झाले. त्याच प्रमाणे कंपनीचे दिव्यांग सहकारी अशोक अंबादास महाले यांनी रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली.
महिला रक्तदात्यांचा असाही सन्मान…
जी संस्था रक्तदान शिबीर आयोजित करते त्यांना त्याबाबत प्रमाणपत्र प्रदान केले जाते. प्लास्टिकपार्क बांभोरी येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्तसंकलन केले. काल दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला गेला त्या औचित्याने ज्या महिला सहकारी नियमीत रक्तदान करतात अशा राजश्री पाटील, डॉ. अश्विनी पाटील, अश्विनी सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी कंपनीच्यावतीने हे प्रमाणपत्र स्वीकारले. कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
सकल जैन श्री संघाची बैठक संपन्न; तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणार
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले
जळगाव (दि.९) – भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव जैन धर्मीयांतर्फे दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह दि. २, ३ व ४ एप्रिल २०२३ दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात येईल. भव्य महोत्सवाच्या नियोजनासाठी सकल जैन श्री संघाचे आधारस्तंभ सुरेशदादा जैन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समाजबांधवांची बैठक उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सर्वानुमते भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले यांची निवड करण्यात आली.
दादावाडी जैन मंदिराच्या सभागृहात झालेल्या समाजबांधवांच्या सभेला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, साै. रत्नाभाभी जैन, श्रीमती नयनतारा बाफना, राजेश श्रावगी जैन, ललीत लाेडाया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, विजय चाेरडिया, प्रदीप मुथा, दिलीप गांधी, भारती रायसाेनी, स्वरुप लुंकड, राजकुमार सेठिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमूते विनाेद ठाेले यांची भगवान कल्याणक महोत्सवाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महोत्सव ऐतिहासिक यशस्वी होण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन केल्या जातील.
‘भारतात जैन समाजात श्री संघीय कार्यासाठी जळगावचे नाव सुप्रसिध्द आहे. पूर्वजांनी घेतलेल्या अथक सांघिक परिश्रमामुळे हे शक्य झाले. तीच आदर्श परंपरा जोपासल्यास समाजात एकता, सलोखा कायम ठेवत आपला आदर्श देशातील सर्व श्री संघ घेतील. सर्वांनी एकदिलाने सहकार्य करूया, जन्मकल्याणक मनवू या असे आवाहन करत युवकांनी आपआपसात उत्तम समन्वय साधत समाज कार्यात आपले योगदान द्यावे, त्यायाेगे जैन दर्शन, धर्माची सेवा करण्याचे आवाहन सभाध्यक्ष सुरेशदादा जैन यांनी केले. याप्रसंगी अशाेक जैन, प्रदीप मुथा यांनीही मार्गदर्शन केले. सभेस अनिश शहा, अतुल सतिषदादा जैन, पारस रांका, अमर जैन, विजया मलारा, पुष्पलता बनवट, जयेश कामानी, विजय चाेपडा, विजय सांड, विजय खिवसरा, किशाेर भंडारी, धमेंद्र जैन, अजय राखेचा, निता जैन, आनंद चांदीवाल, चंद्रकांता मुथा, निलिमा रेदासनी, नम्रता सेठिया, सुलेखा लुंकड, स्नेहलता सेठिया, नलिनी जैन, पियुष संघवी, नरेंद्र बंब, संजय रेदासनी, विशाल चाेरडिया, नितीन चोपडा, अजित काेठारी, प्रविण पगारीया, रिकेश गांधी, ज्याेती काेटेचा, ललिता चाेरडिया, ज्याेती ललवाणी, प्रशांत पारख, किशाेर भंडारी, मनिष लुंकड, सुधीर बांझल, सचिन चाेरडिया, अपुर्वा राका, श्रेयस कुमट, अनिल पगारीया, उदय कर्नावट आदि कार्यकर्ते उपस्थित हाेते. यांच्यासह समाजातील सर्व महिला मंडळ, युवा मंडळ, विविध मंडळांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थीत होते. सभेचे सूत्रसंचलन स्वरूप लुंकड यांनी केले.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
भगवान महावीरांनी ‘अहिंसा’ हा दिव्य-संदेश जगाला प्रखरपणे दिला व त्याकाळी विविध अनाकलनीय रुढी, परंपरा त्यांनी हद्दपार केल्या. मानवी जीवन अधिक सुकर करत त्यांनी माेक्ष प्राप्तीसाठी मार्ग दाखविला. वर्तमानात महात्मा गांधींनी ‘अहिंसा’ हे महान तत्व केद्रस्थानी ठेवत भारत या विशालकाय देशाला पारतंत्राच्या जाेखडातून मुक्त केले व स्वतंत्रता मिळवून दिली. हाच महत्वाचा संदेश विविध कार्यक्रमांतून देण्याचा मानस नवनियुक्त अध्यक्ष विनोद ठोले यांनी व्यक्त केला.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव दि. २, ३ व ४ एप्रिल असा तीन दिवस असेल. मुख्य कार्यक्रम दी. ४ रोजी होईल. शोभायात्रा (वरघोडा), समाज प्रबोधनपर विविध स्पर्धा, सामाजीक संदेशपर नाटिका, भगवान महावीरांच्या जीवनावर प्रसिद्ध वक्ता तर्फे भाषण, प्रभूंचे जीवन दर्शन, रक्तदान, आराेग्य सेवा जागृती आदी कार्यक्रमांसह समाजातील महिला व लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल अशा प्रबाेधनपर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व युवा मंडळ, महिला मंडळ व सकल जैन श्री संघाचा सिंहाचा वाटा असतो.
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
जळगाव दि. ४ – नॅशनल सेफ्टी कौन्सीलच्या ‘हमारा लक्ष शून्य हानी’ या थीमच्या आधारे जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. दि.४ ते १० मार्च दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा केला जाईल. याची सुरवात आज सामूहिक सुरक्षेची शपथ घेऊन झाली.
जैन इरिगेशनचे वरीष्ठ सहकारी सुनिल गुप्ता यांनी सर्व सहकाऱ्यांना दैनंदिन सुरक्षेसह औद्योगिक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. आपली दैनंदिन सुरक्षा करत असताना आपत्कालीन परिस्थीतीत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. यातून दूर्घटना कमी होऊन अपघात कसे कमी होतील, यावर लक्ष दिले पाहिजे. औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करताना सुरक्षेबाबत सजग राहिले पाहिजे. वर्षभर कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सुरक्षांविषयी उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे; जेणे करून अपघात कमी होतील. जैन इरिगेशन कंपनीचा प्रत्येक सहकारी हा वाहन चालवितांना हेल्मट वापरतो हेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे कंपनीतील प्रत्येक विभागात निबंध स्पर्धा, सुरक्षा पोस्टर चित्रकला आणि नाट्य रूपांतर हे कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेनंतर बक्षीस वितरण झाले. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, संजय पारख, वाय. जे. पाटील तसेच सुरक्षा विभागातील सुरक्षा अधिकारी स्वप्नील चौधरी, कैलास सैंदाणे, अमोल पाटील व सर्व अधिकारी यांनी या सप्ताहात सुरक्षासंबंधी जनजागृती केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि च्या कंपनीच्या जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, जैन प्लास्टिक पार्क आणि टाकरखेडा टिश्यूकल्चर पार्क येथे जैन ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ४ मार्च ते १० मार्च २०२३ या आठवड्यात विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरा करण्यात केला जाईल. यानिमित्त सुरक्षा व जनजागृती प्रयत्न केला जाईल. याप्रसंगी सहकाऱ्यांनी सुरक्षेची शपथ घेतली.
विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वाढवली तर विज्ञान समजेल!
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समजूत घेताना तज्ज्ञांचा संवाद
जळगाव दि. २ – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभिनव कल्पनाद्वारे साकारलेले प्रोजेक्ट हे समाज हितासाठी उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेने केलेले प्रोजेक्ट मागील संकल्पना घेऊन त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कसे पोहचेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांना जी कल्पना येईल त्यामागील जिज्ञासा वाढवावी यातून विज्ञान आणि त्यातून निर्माण होणारे नवनवीन इनोव्हेशन समजेल, असा संवाद अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांशी तज्ज्ञांनी प्रश्नोत्तरात साधला.
राष्ट्रीय विज्ञान दिनी अनुभूती निवासी स्कूलमधील ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी मांडलेले विज्ञान मॉडेल, प्रोजेक्टचे अवलोकन करून विद्यार्थ्यांकडून ते समजावून घेतल्यानंतर जैन इरिगेशनमधील वरिष्ठ सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यामध्ये अभिजीत जोशी, जयकिसन वाधवानी, श्री. सुकूमार, आर. बी. येवले, प्रदीप भोसले यांचा सहभाग होता. यावेळी त्यांच्यासोबत अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासीस दास, शास्त्र, गणिताचे शिक्षक उपस्थित होते.
अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात. यावर्षी ३७ निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले होते. त्यातील विशेष उल्लेखनीय असे की, ड्रोन टेक्नॉलॉजी, फ्युचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स, बेसिक रोबोटिक्स, स्मार्ट इरिगेशन, ऑटो सेन्सार हॅण्ड सॅनेटायझर, लाय फाय यांचा समावेश होता. यासोबतच पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित हे प्रोजेक्ट होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्ट संबंधीत प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधला. आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे महत्त्व आहे व जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी या योगे एक व्यासपीठ मिळाले याचे कौतूक केले. विज्ञान प्रदर्शनातील प्रोजेक्ट बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनी साकारलेले हे प्रकल्प हे प्रदर्शनापूरते मर्यादित न राहता त्यांना समाजहिताचे कसे करता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. चांगली पुस्तकं, चांगली अनुभवी माणसं आणि शैक्षणिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा असतो अनुभूती निवासी स्कूलमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. जगात संशोधनात्मक दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत यावरही तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर उत्तरामागे न धावता प्रश्न आधी निट समजून घेतला पाहिजे त्याचे मनन, चिंतन केले पाहिजे त्यानंतरच समाधानकारक उत्तर मिळू शकते. जगात अनेक अशी उदाहरणे आहेत ज्यांनी चिंतन, मननातून कल्याणाचे संशोधन पुढे आणल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट व प्रदर्शनीला इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी भेट देऊन पाल्यांमधील संशोधकवृत्तीला चालना दिली. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिक वृत्तीला चालनेसाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.