गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत आकांक्षा, सृष्टी, आयुषी, धारणी विजयी

जळगाव दि. १४ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. इ. ६ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी, प्रथम वर्ष ते पदव्युत्तर व खुला गट अशा चार गटात हि स्पर्धा घेण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना शालेय गट अनुक्रमे रु. ५०००/-, ३०००/-, २०००/-, शालेय गट २ अनुक्रमे रु. ७०००/-, ५०००/-, ३०००/- महाविद्यालयीन व खुला गट अनुक्रमे रु. १००००/-, ७०००/- व ५०००/- रकमेची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातून ३१७ विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर ४ मिनिटांचे व्हिडीओ तयार करून पाठविले होते.

सर्व व्हिडिओंचे दोन स्तरावर परीक्षण करण्यात आले. त्यातून अंतिम मूल्यांकनासाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम विजयी प्रथम तीन स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येणार असून अंतिम मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अंतिम निकाल खालीलप्रमाणे –

शालेय गट १ – प्रथम – आकांक्षा वानोळे (श्री वारणा विद्यालय, वारणानगर), द्वितीय – दिव्या जवळे (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पुरजळ जि. हिंगोली), तृतीय – कार्तिक प्रमोद जैन (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)

शालेय गट २ – प्रथम – सृष्टी थोरात (एस. जी. श्रॉफ ज्यू. कॉलेज, नंदुरबार), द्वितीय – दिती दवे (एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विलेपार्ले), तृतीय – कस्तुरी पाटील (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)

महाविद्यालय गट – प्रथम -आयुषी केनिया (सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात), द्वितीय – निशांक दुबे (के. जी. जोशी कॉलेज ऑफ आर्टस्, ठाणे), तृतीय – कावेरी लांडगे (जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, नागपूर)

खुला गट – धारणी एस. के. (तामिळनाडू), श्रीश्रेष्ठ नायर (मुंबई), गौरव चव्हाण (वर्धा)

सर्व यशस्वी स्पर्धकांचे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी अभिनंदन केले असून स्पर्धकांनी विविध विषयांवर मांडलेले विचार अभ्यासपूर्ण आहेत. महात्मा गांधीजींच्या विचारांचा अवलंब नवीन पिढी करीत आहे हे आशादायी असून पद्मश्री भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उद्देश सफल होत असल्याचे समाधान वाटते असेही त्यांनी म्हटले आहे.

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची रतनजी टाटा यांना श्रद्धांजली

राष्ट्रभक्त आणि राष्ट्रनेते असही ज्यांच्याविषयी आदरपूर्वक म्हणता येईल अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाने आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. उद्योजकीय जगतात त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा अनमोल आहेच, दानशूरता म्हटल्यानंतर टाटा हेच नाव अग्रक्रमाने डोळ्यासमोर येते. केवळ टाटा गृपलाच जागतिक स्तरावर त्यांनी नामांकित केल अस नाही तर त्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर हे लक्षात येईल की त्यांनी आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या पटलावर भूषणावह केलं. टाटा गृपची पुनर्रचना त्यांच्या हातून झाली, जागतिक स्तरावर उद्योजक म्हणून कीर्ती संपादन करताना अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी ब्रिटिश स्टील कंपनी विकत घेतली. जग्वार, रेंज रोव्हर बँडसह टेटली टी कंपनीही विकत घेतली. ब्रिटिश उद्योजकीय संस्कृतीतील हे आयकॉनिक ब्रँड समजले जातात. भारतावर दिडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या देशातल्या या नामांकीत कंपन्या विकत घेऊन जणू टाटा यांनी भारतीयांच्या हृदयावर गुलामगिरीचा जो डाग कोरला गेला होता, जो आघात झाला होता तो पुसून काढण्याच काम टाटा यांनी केल.

आमचे वडील श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी नेहमी आदरणीय जे.आर.डी. टाटा यांना उद्योजकिय क्षेत्रात  गुरुस्थानी मानलं. टाटा गृप व्यवसायाकडे विश्वस्त या दृष्टीने पाहतो तोच विचार एक संस्कार या नात्याने आमच्या वडीलांनी उचलला आणि आज आम्ही कृषी क्षेत्रात जे काम करतो आहे त्या परिवर्तनामागे तीच  दृष्टी आहे.

व्यवहार साध्य करत असताना एक यशस्वी, दानशूर व्यक्ती म्हणूनही आपण नावारुपाला येतो हे जरी खरे असले तरी कोणत्याही प्रकारची तडजोड न करताही स्वतःच्या कंपनीला आणि आपल्या देशाला गाैरवास्पद कार्य करून भूषणावह ठरता येते यासाठी आदरणीय टाटांची नोंद भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. – अशोक भवरलाल जैन, अध्यक्ष – जैन इरिगेशन सिस्टिम्स ली

जळगांव

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

जळगाव दि. ७ प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सहआयोजीत “उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२४-२५”  अनुभूती निवासी स्कूल येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान पार पडल्यात. स्पर्धेत जिल्ह्यातील ५० संघाचे  २५० खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७  व १९ वर्षे वयोगटात उर्वरित जिल्ह्यातून अनुभूती निवासी स्कूल, जळगाव व पोदार इंटरनेशनल स्कूल चाळीसगाव या शाळांचे वर्चस्व दिसून आले. अनुभती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक अमोल पाटील, विजय संकत यांच्या हस्ते झाले.  क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे, श्री जाधव सर,  विवेक अहिरे, दर्शन गवळी हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह  यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. मान्यवरांच्या हस्ते  प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित सुवर्ण, रजत आणि कास्य पदक प्रदान करण्यात आले.

विजेता खेळाडूंचे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी कौतूक केले. विजयी संघातील खेळाडूंचे या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून किशोर सिंह, सुरेश थरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपीका ठाकूर, शुभम पाटील, पूनम ठाकूर, कोनिका पाटील, ओम अमृतकर, ओवी पाटील, जयेश पवार, देवेंद्र अहिरे, श्र्लोक जगताप यांनी काम पाहिले.किशोर सिंह सिसोदिया  यांनी सूत्रसंचालन केले. दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

बॅडमिंटन स्पर्धेचा निकाल – मुलांच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), जळगावचे काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (द्वितीय), भुसावळची ताप्ती पब्लिक स्कूल (तृतीय),

मुलींच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेर (द्वितीय), किड्स गुरुकुल इंटरनेशनल स्कूल (तृतीय)

मुलांच्या १७ वर्ष वयोटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम), पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (द्वितीय), डॉ. उल्हासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ (तृतीय),

मुलींच्या १७ वर्ष वयोटात तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ (तृतीय),

मुलांच्या १९ वर्षे वयोगटात प्रताप कॉलेज, अमळनेर (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिनावल ता. रावेर (तृतीय),

मुलींच्या १९ वर्षे वयोगटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम),  प्रताप कॉलेज, अमळनेर (द्वितीय), ए. सी. एस. कॉलेज, धरणगाव (तृतीय) विजयी झालेत.

अनिल जैन यांना डी.वाय.पाटील कृषी व तांत्रीक विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

कोल्हापूर/जळगाव दि. ७ प्रतिनिधी – कृषी व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व मोलाच्या योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक व जैन फार्मफ्रेश फूड्स ली चे अध्यक्ष अनिल जैन यांना येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाच्या वतीने आयोजित दिमाखदार सोहळ्यात आज डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) (ऑनॉरिस कॉसा) ही पदवी प्रदान करण्यात आली.

विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान दीक्षांत समारंभात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. के प्रथापन, रजिस्ट्रार डॉ. खोत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.

याचवेळी अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना पत्रकारितेतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल डी. लिट ही पदवी प्रदान करण्यात आली.

सन २०२१ मध्ये स्थापन झालेले डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रीक विद्यापीठ हे देशातील पहिले मान्यताप्राप्त खासगी विद्यापीठ आहे. या कार्यक्रमात सन्मानदर्शक पदव्यांसोबत ६६३ हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्यात. डॉ संजय पाटील यांनी उभारलेल्या या विद्यापीठात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .

१९८६ मध्ये अनिल जैन हे वाणिज्य आणि कायद्याची पदवी घेऊन, कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. जो त्यांचे वडील पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी दोन दशकांपूर्वी सुरू केला होता. त्याच वेळी भारतात राहून श्री जैन यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल याचा अभ्यास केला.

जैन इरिगेशनने भारतातील सर्वात वेगवान विकास साधला, जिथे पुढील ८ ते १० वर्षांमध्ये, ती दरवर्षी तिची उलाढाल दुप्पट करत होती. गेल्या तीन दशकांनी जैन इरिगेशनला सूक्ष्म सिंचनात जागतिक अग्रेसर बनवले आहे. एक बहुराष्ट्रीय कंपनी भारताच्या अंतर्भागातून येणाऱ्या उदयोन्मुख बाजारपेठांमधून निर्माण झाली. यामुळे आधुनिक शेतीकडे भरपूर भांडवल आकर्षित होण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे भारतीय फलोत्पादन आणि शेतीमध्ये एक लवचिक क्रांती घडून आली आहे.

शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान आणि शाश्वत उपाय दिल्यास ते प्रगती साधू शकतात, त्यामुळे समृद्धी आणि सन्मान मिळवण्यास मदत होते. ‘शेतकऱ्यांना उद्योजक मानणे’ हा त्यांचा मूळ विचार आहे. भारतीय शेतीमध्ये उत्पादकता सुधारण्यासाठी जागतिक तंत्रज्ञान आणि उपाय आणणे ही त्यांची खरी आवड आहे जैन इरिगेशनने सुरू केलेल्या सतत नवनवीन शोधांमधून जैन इरिगेशनने सुरुवातीपासून जवळपास १ कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन बदलण्यास मदत केली आहे. दरवर्षी जैन इरिगेशन कंपनी जळगावमध्ये सुमारे एक लाख शेतकऱ्यांना आमंत्रीत करते. जिथे ते शेती करण्याचे नवीन आणि नाविन्यपूर्ण मार्ग शिकतात. जैन इरिगेशन केवळ शेतकऱ्यांना जागतिक दर्जाची उपकरणे पुरवत नाही तर त्यांचे काही उत्पादन परत विकत घेते आणि जागतिक दर्जाची अन्न उत्पादने बनवते, संपूर्ण कृषी मूल्य साखळी तयार करते. सध्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ची उलाढाल जवळपास ७ हजार कोटींहून अधिक रुपयांची असून १० हजार सहकारी कार्यरत आहेत. अनिल जैन हे एक अनुभवी व्यावसायिक असून त्यांना ४० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते आपल्या वडिलांचे “सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे” या ध्येय दृष्टीने कार्य करत आहेत.

अनिल जैन यांना कौटुंबिक मूल्यांची, सर्व भागधारकांसाठी आणि मोठ्या समाजासाठी मूल्य निर्माण करण्याची तीव्र इच्छा आहे, शेतकऱ्यांसाठी सतत काम करणे, शेतकऱ्यांना प्रथम स्थान देणे आणि त्यांच्या कार्याच्या माध्यमातून भारताचा ब्रँड मजबूत करण्यात मदत करणे.. राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करून अन्न आणि पाणी सुरक्षेकडे नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहणे असा त्यांचा ध्यास आहे.

श्री अनिल जैन हे सध्या खालील विविध संस्थांवर कार्यरत आहेत :

अध्यक्ष – असोसिएशन फॉर फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया, मुंबई

संचालक – PAPSAC-HBS (खाजगी आणि सार्वजनिक वैज्ञानिक, शैक्षणिक आणि ग्राहक अन्न धोरण गट – हार्वर्ड बिझनेस स्कूल), यूएसए

संचालक – सस्टेनेबल ॲग्रो-कमर्शियल फायनान्स लिमिटेड, मुंबई

संचालक – गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव

सदस्य – भारत-इस्रायल सीईओ फोरम, दिल्ली

सदस्य – CII – राष्ट्रीय कृषी परिषद, दिल्ली

सदस्य – CII – राष्ट्रीय अन्न परिषद, दिल्ली

गव्हर्नर मंडळाचे सदस्य – IIT-जोधपूर

सुकाणू समिती सदस्य – कृषी व्यवसायात सामायिक मूल्य निर्माण करा – कृती मंच, मुंबई

कोट

शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कार्याचा गौरव

शेती आणि शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून जैन इरिगेशन गेल्या सहा दशकापासून काम करत आहे, शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आम्ही नवनवीन प्रयोग सातत्याने करीत आहोतच, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य हाच सर्वात मोठा बहुमान आहे ही भावना भवरलाल जैन यांची होती तीच भावना आज माझी होती, ही पदवी सर्व शेतकरी बांधव आणि सहकारी यांच्यावतीने स्वीकारताना मनस्वी आनंद झाला म्हणून ही पदवी त्यांनाच समर्पित करित आहे.

– अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव

आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता राखता येते – अशोक जैन

जळगाव दि. 4  प्रतिनिधी – महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक  वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल, प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष कृतीशील आचरणात आणावे, यातून महात्मा गांधीजींना अपेक्षित रामराज्याच्या संकल्पनेतील भारत व जग घडविता येईल असे प्रतिपादन  इंडोनियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अगुस इंद्रा उदयन यांनी केले.

जैन हिल्स येथील गांधीतीर्थ च्या कस्तुरबा सभागृह गांधी रिसर्च फाऊंडेशन व जय हिंद लोकचळवळच्या तीन दिवसीय ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, जय हिंद चे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जय हिंद महिला मंच च्या अध्यक्षा सौ. दुर्गा तांबे, सचिव नामदेव गुंजाळ आदी उपस्थीत होते. या परिषदेमध्ये राज्यभरातून 250 युवक व युवतींनी सहभाग घेतला आहे.

जागतिक शांतेसाठी महात्मा गांधीजींचे विचार हे आजही संयुक्तीक आहे. जगात शांतता प्रस्तापित करायची असेल तर गांधीजींच्या विचारांची गरज आहे.  गांधी विचार हा मानवतेचा असून त्यासाठी पक्ष जात प्रांत महत्त्वाचा नाही, इंडोनिशीयामध्ये असतानाही माझ्या जीवनात गांधीजींच्या विचारांनी परिवर्तन घडविले आणि बाली येथे साधना आश्रम सुरु झाले. यातून ग्रामीण जीवनात सुद्धा यशस्वी होता येते याचे उदाहरण होता आले असे ते म्हणाले.

आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता राखता येते – अशोक जैन

समाजात जे संशोधन, सामर्थ्य आहे, त्याचा वापर विधायक कार्यासाठी केला पाहिजे. सामाजिक भिती दूर झाली पाहिजे, महात्मा गांधीजींच्या उन्नत विचारांवर आचरण केले पाहिजे, ‘मेरी भावना’ ही प्रार्थना रोज म्हणून त्यादृष्टीने जगता आले पाहिजे. एकादश व्रत हे प्रभावी असून ते समाजातील भिती दूर करते. आपण आर्थिक समृद्ध झालो मात्र मानसीकदृष्ट्या समृद्ध झालो नाही, मानवतेबाबत आपली उपलब्धता काय याचा विचार आपण करत नाही. भौतिक प्रगती कितीही केली तरी आत्मीक शांती झाल्याशिवाय सामाजीक शांतता राखता येणार नाही, त्यामुळेच विश्वशांती ऐवजी व्यक्तीगत शांतीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर व्रतस्थपणे चालले पाहिजे, असे सांगत महात्मा गांधीजींच्या विचारांतून प्रेरित होऊन, ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे श्रद्धेय भवरलालजी जैन जगले त्यांच्या विचारातूनच गांधी विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे सुरु असल्याचे जैन इरिगेशन  सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले. सदृढ समाज निर्मितीसाठी गांधी विचारांवर आधारित तरुणांना संघटित करण्याचे विधायक कार्य जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होत आहे.  मोलाच्या या कार्यातून संघटित, ग्रामविकासाठी प्रेरणासुद्धा मिळत आहे.

प्रास्ताविक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले, त्यात त्यांनी जय हिंद चळवळी बाबत सांगितले. वाईट गोष्टींचा समाजात प्रसार होतो मात्र चांगल्या बाबींसाठी पुढाकार तरुण घेत नाही अशी स्थिती असतानाही जय हिंद चळवळीच्या माध्यमातून आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा गांधीजींच्या तत्वांवर प्रेम केले पाहिजे, अहिंसा हे प्रभावी शस्त्र नैतिक नेतृत्वातून प्रभावीपणे वापरले पाहिजे. जात, धर्म, भेद न मानता स्वत: ला  बदले पाहिजे, यातून जग बदलेल हा विचार देणारे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गांधी तीर्थ हे प्रत्येक युवकासाठी प्रेरणास्थान आहे. असे ते म्हणाले. अशोक जैन,  अगुस इंद्रा उदयन, डॉ. सुदर्शन अय्यंगार  यांचा स्मृती चिन्हाद्वारे जय हिंद तर्फे सन्मान करण्यात आला. परिचय उत्कर्षा रुपवते यांनी केले. सूत्रसंचालन  कपिल डोके यांनी केले. आभार प्रा. गणेश गुंजाळ यांनी मानले.

‘भक्तामर की अमर गाथा’ संगीत नाटकाने जिंकले जळगावकरांचे मन

जळगाव, दि.२ (प्रतिनिधी) – ‘कर्म की भाषा को समझो, क्या पता हम सब की तकदीर बना दे…’ असा संदेश देणारी आदिनाथ भगवान यांची कथा आणि भक्तामर स्तोत्र पठण केल्याने प्राप्त होणारे लाभ अत्यंत प्रभावीपणे सादर करून जळगावकरांचे मन जिंकले. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हिलिंग सेंटरच्या कलाकारांनी २ ऑक्टोबरच्या सायंकाळी वेगळी अनुभूती दिली.
भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मनाली मुनोत लिखित ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर झाली.  रंगभूमीवर १०० कलावंत  ‘भक्तामर स्तोत्रातील’ देवत्व आणि चमत्कारी शक्ती यांची प्रभावीपणे सादरीकरण केली. दैनंदिन जीवनातील प्रसंग, चिंता, समस्या व भक्तामर स्तोत्रातील कोणती गाथा पठण करावी हे संगीत आणि नाट्याभिनयाच्या सहाय्याने जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले होते.
भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते  मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली.
यावेळी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या कार्यपरिचयाची  ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. विश्वस्त अशोक जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या स्नेहल चोरडिया, सीमा सेठीया आणि सुजाता शिंगवी तसेच नाटिकेच्या लेखिका मनाली मुनोत तसेच पद्माजी चंगेरिया यांचा सन्मान करण्यात आला. जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी केले.
सेवादास दलुभाऊ जैन, जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन,सचिव सुलेखा लुंकड तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन,ज्योति जैन, निशा जैन, शोभना जैन आणि डॉ. भावना जैन यांच्यासह राजकुमार सेठीया, प्रदीप मुथा, दिलीप गांधी,स्वरुप लुंकड, कस्तुरचंद बाफना, यांच्यासह छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह स्त्री – पुरुष पूर्ण भरला होता तर काही श्रोत्यांनी बाहेरच्या मंडपात मोठ्या स्क्रिनवर या नाटिकेचा आनंद घेतला.

शब्दाने नाही, तर कृतीने जगा – अब्दुलभाई

जळगाव दि.२ प्रतिनिधी  –  आपआपसातील जात, पात धर्म भेद न पाळण्याचा संकल्प करा, प्रतिज्ञा ही फक्त म्हणायची नसते ती प्रत्यक्ष कृतीत आणायची असते. येत्या दिवाळीत आपण उपेक्षीत घटकातील सदस्यांना आपल्या घरी बोलावून त्यांना आनंदात सहभागी करुन घ्या असे आवाहनही ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, स्पर्धेचे परिक्षक सुदिप्ता सरकार, रश्मी कुरंभट्टी, पदमजा नेवे व गांधी रिसर्च फाऊंडनच्या ग्राम विकासाचे सुधीर पाटील उपस्थित होते. परिक्षकांच्या वतीने सुदिप्ता सरकार व पदमजा नेवे यांनी स्पर्धेचे निकष मनोगतातून व्यक्त केले.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्ती व महापुरुषांचे विचार पोहचावेत या उद्देशाने ही स्पर्धा घेतली गेली. शहर व ग्रामीण मिळून २१ शालेय संघांनी सहभाग नोंदविला. यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि  १५००/- ची रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह, व प्रशस्ती पत्रक देण्यात आले.
ग्रामीण गटात प्रथम विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, सावखेडा, द्वितीय अनुभूती निवासी स्कूल, तृतीय एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा,उत्तेजनार्थ ब.गो. शानबाग विद्यालय सावखेडा तर जळगाव शहर गटात प्रथम ओरियन इंग्लिश मिडीअम सीबीएससी, द्वितीय शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय, तृतीय ए टी झांबरे विद्यालय, उत्तेजनार्थ बालविश्व इंग्लिश मिडीअम स्कूल यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक प्रदान करण्यात आले. गिरीष कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, शालीग्राम राणे, चंद्रशेखर पाटील,  योगेश संधानसिवे, तुषार हरिमकर, विश्वजीत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार, चंद्रकांत चौधरी यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेत जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, दि.2(प्रतिनिधी) –  चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवूया असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

 महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले होते. लाल बहादूर शास्त्री टॉवर येथे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी  डाॅ. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. ही यात्रा नेहरू चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत डाॅ. सुदर्शन अय्यंगार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, दिल्ली विद्यापीठाचे पुलिन नायक, डाॅ. भरत अमळकर, माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्योती जैन, डाॅ. गीता धरमपाल आदी मान्यवर उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डाॅ. शेखर रायसोनी, राजेंद्र मयूर, अनिश शहा, शिरीष बर्वे, अमर जैन, डाॅ. राजेश पाटील, उपायुक्त अविनाश गांगुर्डे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, एजाज मलिक, विनोद देशमूख, दीपक सूर्यवंशी, विष्णु भंगाळे, शिवराम पाटील, प्रवीण पगारीया, शोभना जैन, निशा जैन, डाॅ. भावना जैन यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य शहरातील  विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेचा समारोप महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन झाले. महात्मा गांधी उद्यानातील सभेची सुरुवात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आरंभी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो.. हे भजन म्हटले. यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहिंसेची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

डाॅ. सुदर्शन अय्यंगार  म्हणाले की, महात्मा गांधीजी हे देशासाठी जगले म्हणून ते आजही स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या 78 वर्षाच्या आयुष्यात 178 उपवास केले. समाज, राष्ट्रासाठी उपवास करताना आपल्यापेक्षा लहानांनी चुक केली असेल तर ती पालक म्हणून स्वीकारली व त्याचे प्रायाश्चित केले. आपल्या आयुष्यातील अनमोल असे 8 वर्षे त्यांनी कारागृहात घालविली. आजही महात्मा गांधीजींचे विचार, मुल्ये यावर आचरण केले जाते याबाबत गोष्टी स्वरूपात डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चुक ही व्यक्ती, परिवार, समाजात आर्थिक व्यवहारात, राजनैतिक व्यवहारात यासह कुठल्याही क्षेत्रात होऊ शकते. ती लहान असो किंवा मोठी असो त्याचे परिमार्जन हे स्विकृती, पश्चाताप आणि त्याचे प्रायश्चीत या तिनही गोष्टी केल्यानेच मनुष्याच्या चरित्र्यात सुधारणा होईल. यातून व्यक्तीमत्व घडेल आणि राजकिय नेतृत्त्व चारित्र्य संपन्न होईल असा संदेशही डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

या शाळांचा सहभाग – यात्रेमध्ये आनंदीबाई जोशी, जिजामाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडीत नेहरू, स्वामी विवेकानंद, सानेगुरुजी, भगतसिंग, डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते. विदेशी विद्यार्थीही सहभागी होते. बैलगाडीवर चरखा सूतकताई हे आकर्षण ठरले  होते. यात्रेत पुष्पावती गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, नंदिनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीअम स्कूल, के के उर्दू हायस्कूल, ए टी झांबरे विद्यालय, सेंट टेरेसा इंग्लिश मिडीअम, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कूल, यादव देवचंद पाटील, हरिजन छात्रालय या शाळांसह जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक व खेळाडूंसह यात्रेत सहभाग घेतला.

जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज भक्तामर की अमर गाथा संगीत नाटकाचे आयोजन

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ६.०० वाजता ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की, रंगभूमीवर १०० कलावंत  भक्तामर स्तोत्रातील देवत्व आणि चमत्कारी शक्ती जिवंत करतील, ज्यामुळे आमची श्रद्धा अधिक दृढ होईल आणि जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी केले आहे.

भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते  मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली आहे.  *भक्तामर की अमर गाथा* (संगीत नाटक) कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. जास्तीतजास्त संख्येने परिवारासह या कार्यक्रमाची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) –  महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले आहे. अहिंसा सद्भावना शांती यात्रेसह देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात समस्त जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

अहिंसा सद्भावना शांती यात्रा ही लालबहादूर शास्त्री टॉवर पासून आरंभ होऊन नेहरू चौक – शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचेल. या यात्रेत जिल्हा पालक मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे(राजूमामा), आ. लताताई सोनवणे, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री अंकित, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, डॉ. भरत अमळकर, जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन या मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी उद्यानातील सर्व उपस्थितांना अहिंसा शपथ देण्यात येईल. महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे.

गांधी जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जळगाव तालुक्यातील शाळांसाठी शहरी व ग्रामीण गटात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे सकाळी १० वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी संघांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येईल. आपला जन्मदिवस हा चरखा जयंती म्हणून साजरा व्हावा असे महात्मा गांधीजींनी म्हटल्यानुसार हा दिवस चरखा जयंती म्हणूनही साजरा केला जातो. चरखा जयंतीच्या निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी तीर्थ येथे सकाळी ८.०० ते रात्री ८.०० दरम्यान अखंड सुत कताई करण्यात येणार आहे. संस्थेचे सहकारी सुत कताई करतील, यामधे चरखा चालवू इच्छिणारे वा शिकणेसाठी पण सहभागी होता येणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये जळगावकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version