सलग तिसऱ्या आठवड्यातही भारतीय शेअर बाजारात तेजी कायम

2 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सकारात्मक तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. यावेळी बाजारात व्यापार मर्यादित राहिला असला तरी चढ-उतार कायम होते.

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारासंबंधी वाढत्या अपेक्षा, आर्थिक वर्ष 2025-26 मधील कॉर्पोरेट निकालांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता, अमेरिकी डॉलरची कमजोरी आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणारी खरेदी यामुळे बाजारातील भावना सकारात्मक राहिली. मात्र, भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि तिमाही निकालांतील मिश्र परिणाम यामुळे तेजीला मर्यादा आल्या.

विश्लेषकांच्या मते, पुढील आठवड्यात बाजार काही प्रमाणात मर्यादित रेंजमध्ये राहू शकतो, परंतु याआधीचे उच्चांक ओलांडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष मुख्यत्वे तिमाही निकाल, अमेरिका व ब्रिटनमधील मध्यवर्ती बँकांचे व्याजदरविषयी निर्णय आणि आर्थिक आकडेवारी (जसे की सेवा पीएमआय) यावर राहणार आहे.

तसेच, पहेलमा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला मिळणारा प्रतिसाद आणि अमेरिका-चीनमधील व्यापार संबंधांवरही बाजार लक्ष ठेवणार आहे. या घटनांचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो.

जियोजीत फायनान्शियल्सचे रिसर्च प्रमुख विनोद नायर म्हणाले की, तातडीच्या काळात बाजारात काही प्रमाणात सावधपणा राहू शकतो, पण मोठ्या घसरणीची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे निधन

 जळगाव : प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे मेंदू मधे रक्तस्त्राव (sub arachnid brain hemorrhage) झाल्याने दुःखद निधन झाले.
डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील, (वय वर्ष ५४) यांचे दि. ०२/०४/२०२५ रोजी  दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज हडसन ता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले,  त्या सौ. सुकन्या कुलकर्णी व अंकित पाटील यांच्या आई आहेत. त्या मु. जे. महाविद्यालय, जळगाव येथे वाणिज्य विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या. त्या जैन इरिगेशन मधील विजयसिंग लोटन पाटील यांच्या पत्नी होत

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!

जळगाव दि.०८ (प्रतिनिधी) – ‘विद्यार्थी दशेत असताना विज्ञान दिनानिमित्त प्रोजेक्ट केले जातात. अभ्यासक्रमाचा तो भाग असल्याने त्यात वेगळेपण कमी दिसते, मात्र अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रत्येक प्रोजेक्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानासोबत तंत्रज्ञानातून सोल्युशन दाखविणारे त्यांनी  रोल मॉडेल सादर केले आहे. यातून मानवतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समाजाभिमुख संशोधन पुढे येत आहे. त्यामागे विद्यार्थ्यांचा विज्ञान व तंत्रज्ञान, रोबोटिक्स, आर्टिफिशीयल इंटलीजन्सचा अभ्यासपूर्ण वापर दिसतो. खऱ्या अर्थाने विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.’ अशी प्रतिक्रिया ‘विज्ञानानुभूती विज्ञान प्रदर्शन’ बघण्यासाठी आलेल्या प्रशिक्षकांनी दिली.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचा आज समारोप झाला. त्याप्रसंगी जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे, जे. एस. जैन, आर. बी. येवले, प्रदीप भोसले, सतीश खडसे, एस. सुकुमार, जयकिसन वाधवानी, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, यु. व्ही. राव,  समन्वयक स्नेहल जोशी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात स्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश होता.

युनायटेड नेशन्सने भविष्यकालीन विकासासाठी शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals) ठरवली आहेत. ही जागतिक ध्येये शाश्वत विकासासाठी प्रोत्साहन देणारी आहेत. एकूण १७ ध्येये असून या ध्येयांसाठी १६९ विशिष्ट ध्येये आहेत. त्याच धर्तीवर अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित यासह पर्यावरणीय संज्ञा विश्लेषणासह प्रोजेक्टद्वारे उलगडून दाखविल्यात. प्रदुषण, आरोग्य, पाणी, वीज, अन्नसुरक्षितता यासह आपत्तीजन्य परिस्थीतीत मनुष्याला पूरक बाबींवर संशोधनात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला. न्युटनचा साधा नियम यापासून तर रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रोमॅकनिकल अशा विषयांच्या प्रोजेक्टस् ची मांडणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली होती. विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींचा उपयोग होतो अशा बाबींचा या प्रदर्शनात समावेश होता.  आज प्रदर्शन बघण्यासाठी विविध शाळांनी भेटी दिल्यात आणि विद्यार्थ्यांच्या इन्व्होशनला प्रोत्साहित केले.

या प्रोजेक्ट सादरीकरण – मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शाश्वता यासह पाणी, वीज, शेती अशा विविध विषयांना धरून वेगवेगळे असे ५० च्यावर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: साकारून सादर केले आहे. त्यात थ्रीडी प्रिंटर टेक्नॉलॉजी, सीएनसी प्लॉटर मशीन, रडास सिस्टिम्स्, इन्फिनिटी मिरर, फायर फायटर रोबोट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, वाईंड मील ट्री, शिलाई मशीन, एअर हॉकी, डेकोरेटिव्ह लाईट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, पीन होल कॅमेरा, स्मार्ट डोअर अलार्म, आय ब्लिंक कार कंट्रोल, न्युटनचा नियम, इकॉलॉजी पिऱ्यामीड, मानवाचा सांगाडा (ह्युमन कलेटन), मानवी शरीरातील फुफ्फुसांचे कार्य, रोबोटिक्स, ब्रेक आऊट, आरजीबी कलर मिक्सिंग, पेंटाग्राफ, रडार सिस्टिम, एअर हॉकी, पिझो इलेक्ट्रीसिटी आणि व्हर्टिकल विंड जनरेटर, वॉटर रॉकेट असे अनेक विषयांवरील अत्याधुनिक प्रकल्पांची मांडणी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारली होती.

अनुभूती रेसिडेंशीयल स्कूमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनास सुरूवात

जळगाव दि.०७ (प्रतिनिधी) – ‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे. विज्ञान हे निसर्गाची देणगी तर तंत्रज्ञान मनुष्यनिर्मित आहे. संशोधनातून शास्त्र तर आविष्कारांतून टेक्नॉलॉजीचे महत्त्व समजण्यासाठी ‘विज्ञानानुभूती विज्ञान प्रदर्शन’ मोलाचे ठरते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधून मनुष्य जीवनात शाश्वता कशी आणता येईल, याबाबत विचार केला पाहिजे; असे मनोगत यु. व्ही. राव यांनी व्यक्त केले.’

अनुभूती रेसिडेंशीयल स्कूलमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, डॉ. भावना जैन व्यासपीठावर होते. स्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता.

मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शाश्वता यासह पाणी, विज, शेती अशा विविध विषयांना धरून वेगवेगळे असे ५० च्यावर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: साकारून सादर केले आहे. त्यात न्युटनचा साधा नियम यापासून तर रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रोमॅकनिकल अशा विषयांच्या प्रोजेक्टस् ची मांडणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली आहे. विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींचा उपयोग होतो अशा बाबींचा या प्रदर्शनात समावेश केला आहे. यामध्ये थ्रीडी प्रिंटर टेक्नॉलॉजी, सीएनसी प्लॉटर मशीन, रडास सिस्टिम्स्, इन्फिनिटी मिरर, फायर फायटर रोबोट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, वाईंड मील ट्री, शिलाई मशीन, एअर हॉकी, डेकोरेटिव्ह लाईट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, पीन होल कॅमेरा, स्मार्ट डोअर अलार्म, आय ब्लिंक कार कंट्रोल, न्युटनचा नियम, इकॉलॉजी पिऱ्यामीड, मानवाचा सांगाडा (ह्युमन कलेटन), मानवी शरीरातील फुफ्फुसांचे कार्य, रोबोटिक्स, ब्रेक आऊट, आरजीबी कलर मिक्सिंग, पेंटाग्राफ, रडार सिस्टिम, एअर हॉकी, पिझो इलेक्ट्रीसिटी आणि व्हर्टिकल विंड जनरेटर, वॉटर रॉकेट असे अनेक विषयांवरील अत्याधुनिक प्रकल्पांची मांडणी अनुभूती निवासी स्कूलच्या इयत्ता ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन यांनी प्रत्येक प्रोजेक्टला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आलेला प्रयोग समजावून घेतला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अन्मय जैन याने केले.

शहरातील रुस्तुमजी इंटरनॅशनल स्कूल, भगिरथ हायस्कूल, सेंट टेरेसा स्कूल, आयडीएल इंग्लिश मिडीयम स्कूल, वर्ल्ड स्कूल भुसावळच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी हजेरी लावली. संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांनी अनुभूती सायन्स व टेक्नॉलॉजी मिट व अनुभूती सायन्स क्विज स्पर्धेतसुद्धा सहभाग नोंदविला.

आज प्रदर्शन बघण्याची संधी – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स व आर्टिफिशीयल तंत्रज्ञानासह स्वत: साकार केलेल्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, इंजिनेअरिंग आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी वर आधारीत अत्याधुनिक विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. उद्या दि. ८ जानेवारी ला सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत शहरातील स्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी समन्वयक स्नेहल जोशी ९३०९९१८१७८ यांच्याशी संपर्क साधवा असेही आवाहन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूमध्ये माझे शहर माझी जबाबदारी’ स्वच्छता अभियान

जळगाव दि.०६ (प्रतिनिधी) – जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर या संकल्पनेस मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. आपण जिथे राहतो, काम करतो तो परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच असते. मी कचरा करणार नाही आणि इतरांनाही कचरा करून देणार नाही या विषयी जागरुकता ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा असे आवाहन जळगाव महानगर पालिकेचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशन, एस.डी. फाउंडेशन आणि पर्यावरणदूत यांच्या संयुक्तविद्यमाने अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल येथे ‘माझे शहर माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी सुसंवाद साधला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या रश्मी लाहोटी, या अभियानाची ज्यांची संकल्पना आहे ते पर्यावरणदूत सुहास दुसाने, ज्येष्ठ नागरिक सुधाकर दुसाने, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी उपस्थित होते.

भारतात स्वच्छ शहर म्हणून मध्यप्रदेशातील इंदौर या शहराची ओळख निर्माण झाली आहे. इंदौरप्रमाणे आपल्या जळगाव शहराला देखील सुंदर आणि हरित शहर करण्याची आपली स्वतःची जबाबदारी आहे असे प्रकाश पाटील यांनी उपस्थितांना आवाहन केले.

आरंभी शाळेच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सकाळ सत्राची शाळा असल्याने सकाळी साडेनऊ वाजता पर्यावरण जागृती प्रभात फेरी काढण्यात आली. यात स्कूलच्या शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनींचा सहभाग होता. यावेळी सहाव्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी जनजागृती करणारी नाटिका सादर केली. पाचव्या इयत्तेचा विद्यार्थी अर्पित कासार याने स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त केले. शिक्षिका पुनम पाटील यांनी स्वच्छतेबाबत स्वरचित कविता सादर केली.

सुहास दुसाने यांनी ‘माझे शहर माझी जबाबदारी’ बाबत उपस्थितांना माहिती सांगितली. शहर हे घर आहे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे, मी उघड्यावर कचरा टाकणार नाही, कचरा जाळणार नाही,या अभियानात मी स्वतः आणि परिसरातील नागरिकांचा समावेश करून घेईल, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार नाही. वृक्षारोपण करण्याची जबाबदारी स्वीकारेन याबाबत सविस्तर सांगितले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी सुधीर पाटील, पर्यावरणदूत मदन लाठी आणि जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी साळुंखे आणि पर्यावरणदूत डिस्ट्रीक आयकॉन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी मदन लाठी यांनी केले.

विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार!

मुंबई दि.४ प्रतिनिधी –  जैन इरिगेशनचे चित्रकार श्री. विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६४ व्या वार्षिक प्रदर्शनात प्रमाणपत्र व रोख रुपये ५२, ५०० (रुपये बावन्न हजार पाचशे) रेखा व रंगकला विभागात पारितोषिक प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विकास मल्हारा यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,  मा. अॅड राहुल सुधा सुरेश नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), मा. श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील (मंत्री-उच्च व तंंत्र शिक्षण), मा. अॅड आशिष मिनल बाबाजी शेलार (मंत्री-सांस्कृतिक कार्य), मा. श्री. इंद्रनिल अनिता मनोहर नाईक (मंत्री- राज्यमंत्री उच्च व तंंत्र शिक्षण), मा. श्री. अरविंद आशालता गणपत सावंत (लोकसभा सदस्य), श्री. बी वेणुगोपाल रेड्डी (भा.प्र.से, अप्पर मुख्य सचिव-उच्च व तंत्र शिक्षण), डॉ. संतोष संज्ञा भास्कर श्रीरसागर (संचालक-कला संचालनालय) महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५.३० वा. संपन्न झाला. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ४ ते १० दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांनी विकासचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून विकास मल्हारा यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटीचे गोल्ड’, ‘आर्ट सोसायटी आॅफ इंडिया’, ‘टगोर अॅवार्ड’ व इंडिया आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटी िदल्ली असेही अॅवार्डस प्राप्त झाले आहेत.
_____________________

तुम्हाला दूरवर डोंगरावर कुणाची तरी वाट पाहणारं छोटंसं गाव या चित्रात दिसेल किंवा गवताचं प्रचंड कुरणही. बर्फातून चाललेली वाट न्याहाळता येईल तर कळत-नकळत  विस्थापित होत जाणारा निसर्ग दिसेल!
मनातल्या मनात स्वतःशी तुम्ही बोलू लागता तोवर ही चित्रंही तुमच्याशी संवाद साधू लागतात. चित्रातील रेषा आशयाला संपन्न करते.रेषा वर्तमानाचा धागा चिवटपणे जोडतात, स्मृतीचा बंध-अनुबंध घट्ट धरून ठेवतात.
चित्राशी आत्मीयतेचे नाते विणले जाते, चित्र जणू ‘चित्तरकथा’ सांगू पाहतं. बीज अंकुरावे आणि  बालतरु व्हावे इतकी सहज असते ही प्रक्रिया!
स्वच्छंदी फुलपाखरासारखी मुक्त शैली मला जाणवते. ‘स्वमग्नता’ हासुद्धा या चित्राचा स्थायीभाव. शैली मात्र बदलत राहणारी. या चित्रात तोचतोचपणा नसतो, वेगळा आशय, निराळी अभिव्यक्ती प्रतिबिंबित होते.  प्रयोगशीलता हा त्यांच्या व्यक्ततेचा ठाशीव गुण, चांगलं स्वीकारण्याची राजहंसी वृत्ती विकासजींच्या गुणग्राही स्वभावात आहे.
रंगांचे जाणवणारे अनेकविध कवडसे, हे सुंदर भावविश्व तुमच्याशी संवाद साधू पाहतं. या चित्रातील रंगांना स्पर्श करून पहा, क्षणार्धात जिवंतपणा जाणवेल. रंगातील ‘तलमता’ही सुकोमलतेने जपली आहे, या रंगजाणिवा हृदयाचा ठाव घेतात. चित्रांची ही श्रीमंती मला विकासजींच्या स्टुडिओत जाणवली.
शांत स्वभाव, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची मनापासून आवड आहे.
विकासजी एक मनस्वी कलावंत आहेत. त्यांच्या चित्रातील सहजता, नाविण्यपूर्णता आणि नितांत सुंदर प्रयोगशीलता मला महत्त्वाची वाटते.

विकासजींचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

— शरद तरडे,
 प्रख्यात अमूर्त चित्रकार, पुणे
_________________

  झरोख्यातून डोकावणारा अवकाश आणि प्रकाश या दोन मध्ये जेव्हा संवाद साधला जातो तेव्हा चित्राची निर्मिती होते असे चित्रावरून दिसतं चित्रातलं जडत्व हे आकार रूप घेत असतं आणि त्या आकारांमध्ये खेळताना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चा वेगळ्या दृष्टिकोनाने  पाहण्याचा आणि अनुभवण्याचा एक योग विकासाच्या चित्रातून येतो या जडत्वालाही रंगवताना विकास स्वाभिमानाने कुठेतरी आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आयुष्यात नकळत पाहण्यात आलेल्या गोष्टी जेव्हा आकाररूपी चित्रातून येतात तेव्हा ते चित्र प्रगल्भ होतं आणि प्रगल्भ झालेल्या चित्राला चौकटीत बसवताना मर्यादे पलीकडे पाहण्याची दृष्टी लागते. चित्र घडत जातं घडत असताना फक्त आणि फक्त अवकाश आपल्यासमोर प्रतिबिंब निर्माण करतात. सहस्ता आणि सजगता हा चित्राचा मूळ भाव आहे. आणि हाच या चित्राचा मूळ गाभा आहे.

— प्रकाश वाघमारे,
 प्रख्यात अमूर्त चित्रकार, मुंबई
_________
काला एक मुकम्मल साज़ है

उसे बजाने का अर्थ है
बीज हो जाना,
जहां सातों स्वर शुद्ध लगते हैं

साज में महाप्राण लगाओ तो
सप्तक चांद हो जाता है
और कलाकार रात्रि।

— मोहन शिंगने, प्रख्यात अमूर्त चित्रकार, अंबाला
_____________________
कृष्णधवल रंगातील या चित्रात एक सहजता आहे आणि साधेपणाही. मुक्ततेसह शांतताही! ‘छाया- प्रकाशाची नाट्यमयता’  हा या चित्रातील मुख्य गाभा आहे. चित्रातील  प्रकाशाला मृदूतेसह तरलताही आहे आणि कोवळेपणादेखील !
विकास यांच्या स्वभावाचे प्रतिबिंबच जणू अवतरलं!

— हेमंत धाने,
प्रख्यात अमूर्त चित्रकार, मुंबई

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव दि.४ प्रतिनिधी –  दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा १ ते २ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूल च्या खेळाडूंनी फाईट ९ गोल्ड,५ सिल्व्हर, ३ कांस्य, पुमसे मध्ये मुलं-मुली मिळून पहिला क्रमांक प्राप्त करत ४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश प्राप्त केले. पहिल्यांदाच एवढ्या पदकांची कमाई केल्याने अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

 

फाईटमध्ये विजयी खेळाडू म्हणून १४ वर्ष वयोगटाआतील मुलींच्या गटात ३५ किलो वजन गटात साची पाटील (सुवर्ण),४१ किलो वजनगटात समिक्षा पवार, ४७ किलो वजन गटात अनुभूती चौधरी (रौप्य), भव्या अग्रवाल, २६ किलो वजन गटात सन्निधी राकीबे (कांस्य), ३८ किलो वजन गटात चार्वी शर्मा, यादनी मोहिते विजयी ठरले. १७ वर्ष वयोगटात ४६ किलो वजन गटात भाविका पाटील (सुवर्ण), ४९ किलो वजन गटात समृद्धी कुकरेजा,५२ किलो वजनगटात दिया देशपांडे, ५९ किलो वजनगटात जानव्ही जैस्वाल, ६३ किलो वजन गटात पलक सुराणा, ६८ किलो वजन गटात अलफिया शाकिर, ६८ किलोवजन गटात अदिती कुकरेजा, ३८ किलो वजन गटात स्तूती गर्ग (रौप्य, किंजल धर्मशाली, ४६ किलोवजन गटात मुक्ती ओसवाल,५९ किलो वजन गटात शाहनी जैन विजयी झालेत.

 

पुमसे मध्ये वैयक्तीक प्रकारात १४ वर्ष वयोगटात अनुभूती चौधरी सुवर्ण, समिक्षा पवार (कांस्य) तर सांघिकमध्ये अनुभूती चौधरी, समिक्षा पवार, साची पाटील यांनी सुवर्ण पदक पटकाविले. १७ वर्ष वयोगटात वैयक्तीक प्रकारात समृद्धी कुकरेजा सुवर्ण,  दिया देशपांडे (कांस्य) तर सांघिक मध्ये समृद्धी कुकरेजा, दिया देशपांडे, पलक सुराणा यांना सुवर्ण पदक मिळाले. पुमसे प्रकारात १४ वर्ष आतील वयोगटात अनुभूती चौधरी उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. तर १७ वर्ष वयोगटात समृद्धी कुकरेजा उत्कृष्ट खेळाडू म्हणून विजयी ठरली. प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूंना जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, राज्य तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

जळके येथे टोमॅटो पीक परिसंवादात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव, दि. १ (प्रतिनिधी) –  कागोमी टोमॅटोचे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत.  जैन इरिगेशन आणि कागोमी कंपनी ४ वर्षांपासून संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी काम करत आले आहे. शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळावे हीच तळमळ प्रत्येक सहकाऱ्याची आहे. टोमॅटो करार शेती उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन  कागोमीचे भारतातील प्रमुख मिलन चौधरी यांनी केले. जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड आणि कागोमे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व जळके येथील गजानन ठिबक यांच्या संयुक्त विद्यमाने टोमॅटो पीक  परिसंवाद आयोजला होता त्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी शरद पाटील, कृषी मंडल अधिकारी मिलिंद वाल्हे, कागोमीचे सहकारी संदीप जाधव, मनोहर देसले, जैन इरिगेशनचे करार शेती प्रमुख गौतम देसर्डा, श्रीराम पाटील, विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे, एस.एन. पाटील,  गजानन ठिबक जळकेचे संचालक पी.के. पाटील त्याच प्रमाणे सुधाकर येवले व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास पंक्रोशीतील सुमारे ४०० शेतकरी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे वितरक असलेले पी.के. पाटील हे वडिलोपार्जित शेती देखील करतात. उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते आपली शेती करतात. गत चार वर्षांपासून ते टोमॅटोची लागवड करून भरघोस उत्पादन घेत आहेत. इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम शेतकऱ्यांची शिवार फेरी झाली. टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जाऊन लागवडीची पद्धत, मल्चिंगचा तसेच आत इनलाईन ठिबक सिंचनाचा केलेला वापर इत्यादीचे अवलोकन शेतकऱ्यांनी केले. श्रीराम पाटील व करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.  पुढच्या वर्षी टोमॅटोची लागवड करायची असेल तर आदल्या वर्षापासूनच तयारी करणे श्रेयस्कर होते.

जैन इरिगेशनची टोमॅटो, पांढरा कांदा आणि हळद याची करार शेती प्रकल्पाची संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. हळदीची देखील शेतकऱ्यांनी लागवड करावी. दहा महिन्यांमध्ये क्विंटल नव्हे तर टनामध्ये हळदीचे उत्पादन घेता येते त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो असे सांगून हळद लागवड करावी असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक गजानन ठिबकचे संचालक पी के पाटील यांनी टोमॅटो लागवडीचे आपले अनुभव सांगितले. त्यात ते म्हणाले की, गेल्यावर्षी त्यांना ५८ मेट्रीक टन टोमॅटोचे उत्पादन मिळाले होते. या वर्षाची पीक परिस्थिती पाहिली असता ६० टनांहून अधिक टॉमॅटोचे उत्पादन अपेक्षीत असल्याचे ते म्हणाले. टोमॅटोचे पीक फायद्याचे कसे ठरते याबाबत सविस्तर सांगण्यात आले.

कामोमी कंपनीचे करार शेती विभागाचे सहकारी मनोहर देसले यांनी या परिसंवादात टोमॅटोची लागवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत माहितीत सांगितली. शाश्वत शेती करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. पारंपरिक पद्धतीने केलेली शेती परवडणारी ठरत नाही. पिकाची निवड, पीक पद्धती, फर्टिगेशन, ऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी महाराष्ट्र विपणण प्रमुख एस.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शरद पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. या योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल. याविषयी परिसंवादात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. सोळुंके व आभारप्रदर्शन श्रीराम पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.

गांधीतीर्थ येथून ग्राम संवाद सायकल यात्रेस प्रारंभ

जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – गांधीजींचे संपूर्ण जीवन हाच एक संदेश आहे. त्यांच्या विचारांवर आपण चाललो तर भारत नक्कीच विश्व गुरू बनेल यात तीळमात्र शंका नाही असे मौलीक विचार मुख्य अतिथी सतीशचंद मेहता यांनी व्यक्त केले. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारा आयोजित ‘ग्राम संवाद सायकल यात्रे’च्या शुभारंगप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डीन गीता धर्मपाल आणि सहकारी डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.

सकाळी ठीक साडे सात वाजता गांधी तीर्थच्या अॅम्फी थिएटर येथे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व उपस्थितांनी दोन मिनीट स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. आरंभी सर्वधर्म प्रार्थना झाली. श्री लक्ष्मी आश्रम कौसाली (उत्तराखंड)च्या विद्यार्थीनींनी ‘दे दी हमें आझादी बिना खडग् बिना ढाल, साबरमतीके संत तुने करदिया कमाल’ हे गीत सादर केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी नितीन चोपडा यांनी सूत्रसंचालन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी उपस्थितांना सौहार्दपूर्ण वागणूक व देशाप्रती निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली.

उपस्थितांशी संवाद साधताना जैन इरिगेशनचे संचालक सतीश मेहता म्हणाले की, अहिंसेचा मार्ग अवलंबून स्वातंत्र्य मिळविणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश होय. इंग्रजांना सौहार्दपूर्ण भारतातून पाठवून देणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. खरे पाहिले तर आजच्या काळात महात्मा गांधीजींच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. हिंसेने काहीच हाती लागत नाही हे या जगाला पटविणे आवश्यक आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी गांधी तीर्थची निर्मिती केली असे दूरदृष्टी असलेल्या भवरलालजी जैन यांनी महात्मा गांधीजींचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे खूप मोठे काम केलेले आहे. शेती आणि शेतकऱ्यांची प्रगती झाल्याशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही या दृष्टीने श्रद्धेय भाऊंनी केलेले कार्य खूप मोलाचे ठरते. जगभरात कुठेही गेले तर महात्मा गांधीजींना ओळखले जाते. आपल्या कार्यामुळे महात्मा गांधी विश्वात प्रख्यात झाले आहेत. प्रत्येकाने महात्मा गांधीजींच्या विचारांवर चालावे हा संदेश पोहोचविण्यासाठी ही सायकल यात्रा यशस्वी होवो या शुभेच्छा श्री. मेहता यांनी दिल्या. या कार्यक्रमानंतर लगेचच सतीशचंद मेहता, अशोक जैन आणि अशोक दलवाई यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल यात्रेस प्रारंभ करण्यात आला. बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेत एकूण ४० सायकल यात्रींचा सहभाग आहे.

या वर्षी जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागातील जळगाव, चोपडा, यावल तालुक्यातून ही यात्रा मार्गस्थ होणार आहे. सुमारे ३०० कि.मी.चे एकूण सायकल प्रवासाचे अंतर असेल. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला जाईल. या सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक अशा ४० जणांचा सहभाग आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, फ्रांन्स व नेपाळ या देशातील विद्यार्थ्यांचा यात्रेत समावेश आहे.

चारित्र्य निर्माणासह महिलांसाठी विशेष कार्यक्रम – यात्रेदरम्यान विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी सापशिडी, मूल्य संवर्धनाचे खेळ, प्रश्नमंजुषा, कठपुतली खेळ या माध्यमातून चारित्र्य निर्माणाचे कार्य करणार आहे. तसेच ६ वेगवेगळया ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे तर नागरिकांसाठी दररोज पथनाट्याद्वारे प्रबोधन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यावरील प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

जैन इरिगेशनचे नऊ महिन्यांत ₹४०३०.६ कोटींचे एकूण उत्पन्न

 जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडने आज ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या आर्थिक निकालांची घोषणा केली. कंपनीने नऊ महिन्यांत एकूण ₹४०३०.६ कोटींचे उत्पन्न आणि ₹४९३.२ कोटींचा EBITDA नोंदवला. तिसऱ्या तिमाहीत, कंपनीने EBITDA मार्जिनमध्ये सुधारणांसह स्थिर कामगिरी प्रदर्शित केली. गेल्या नऊ महिन्यांत, कंपनीने भविष्यातील वाढीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी आपल्या व्यवहारातून लक्षणीय रोख रक्कम निर्माण केली आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले की, “तिसऱ्या तिमाहीत आम्ही स्थिर कामगिरी केली आहे आणि आमचे EBITDA मार्जिन सुधारले आहे. गेल्या नऊ महिन्यांत, आम्ही आमच्या व्यवहारातून लक्षणीय रोख रक्कम निर्माण केली आहे, जी आम्हाला आमच्या कर्जाची पातळी कमी करण्यात आणि आमच्या भविष्यातील वाढीसाठी गुंतवणूक करण्यात मदत करेल.

पुढील काळात कंपनी कृषी उत्पादनात वाढ, सरकारी भांडवली खर्च वाढ आणि मजबूत सेवा क्षेत्रामुळे वापरात सुधारणा होण्याची अपेक्षा करते. किरकोळ विक्री, कॅशफ्लो आणि ऑपरेटिंग मार्जिन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. जैन यांनी पुढे सांगितले की, “पाईप, सौर ऊर्जा प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय विक्री यासारख्या आमच्या प्रमुख व्यवसाय क्षेत्रांमध्ये पुढील काही तिमाहीत आम्ही मजबूत कामगिरी करू, जरी व्यापक आर्थिक वातावरण काही आव्हाने सादर करत असले तरी, आम्ही आमचे मार्जिन आणि कॅशफ्लो सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, सतत वाढीसाठी चांगल्या स्थितीत आहोत.”

जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी आणि एचडीपीई पाईप्स, प्लॅस्टिक शीट्स, कृषी प्रक्रिया उत्पादने, अक्षय ऊर्जा सोल्यूशन्स, टिश्यू कल्चर प्लांट्स, वित्तीय सेवा आणि इतर कृषी इनपुट्सच्या उत्पादनात गुंतलेली एक प्रमुख भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version