वाढती कोरोना प्रकरणे आणि व्याजदरात झालेली वाढ या दुहेरी भीतीने आज शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स 1961 अंकांनी घसरला आहे. आज तो सुमारे 1000 अंकांनी घसरला. या चार दिवसांत बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल एकूण 14.86 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. यामुळे BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 272.53 लाख कोटी रुपयांवर आले आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 980.93 अंकांनी घसरून 59,845.29 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी 320.55 अंकांच्या घसरणीसह 17,806.80 वर बंद झाला.
या क्षेत्रांमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे
आज सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स, एसबीआय आणि बजाज फिनसर्व्ह या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. हे ३० ते ४० टक्के तुटले. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर निफ्टी पीएसयू बँक 6 टक्क्यांहून अधिक घसरली. निफ्टी मीडिया 5 टक्क्यांनी घसरला. निफ्टी मेटल 4.47 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, रिअॅल्टी आणि ऑइल अँड गॅस 3 टक्क्यांहून अधिक घसरले. निफ्टी मिडकॅप-50 व्यापक बाजारात 3.35 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, स्मॉलकॅप-50 4.66 टक्क्यांनी घसरला.
PSU बँकांमध्ये कमालीची घसरण झाली
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मोठी घसरण झाली. इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचे शेअर्स आज बीएसईवर 10 टक्क्यांपर्यंत घसरले. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पीएनबी आणि पंजाब अँड सिंध बँक यांचेही ५ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. येस बँकेच्या शेअर बी बद्दल बोलायचे झाले तर, तो आज 7.92 टक्के किंवा 1.50 रुपयांनी घसरून 17.45 वर बंद झाला आहे.
ही घसरणीची प्रमुख कारणे आहेत.
चीनमध्ये कोरोना वाढत आहे
चीनमधील कोरोनाच्या नव्या लाटेमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. चीनमध्ये संसर्गाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. ब्लूमबर्गने अलीकडेच अहवाल दिला आहे की चीनमध्ये दररोज 10 लाख कोरोना रुग्ण आणि 5,000 मृत्यू होऊ शकतात. दुसरीकडे, दुसऱ्या एका अभ्यासानुसार, कोरोनाची ही लाट चीनमध्ये 10 लाख लोकांचा बळी घेऊ शकते. कोरोनाच्या बातमीवर बाजारात गुंतवणूकदारांचा अतिरेक दिसून आला आहे.
अमेरिकन शेअर बाजारात घसरण
अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. यूएस फेडने केलेल्या आक्रमक व्याजदर वाढीच्या चिंतेने गुरुवारी रात्री अमेरिकन बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. डाऊ जोन्स 1 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्याच वेळी, नॅस्डॅक 2.18 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
जळगाव: झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या सम्मेदशिखरजीला झारखंड सरकारने नुकतेच पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. पर्यटनस्थळ जाहीर केल्याने सम्मेदशिखरजीचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सकल जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, अध्यक्ष राजेश जैन, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष ललित पारसनाथ पर्वतराज आणि मधुबन लोडाया, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ यांना जैन तीर्थस्थळ घोषित करण्यात सभाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, प्रवीण यावे, त्याठिकाणी सीआरपीएफ, पगारिया, दिलीप गांधी, स्वरूप लुंकड यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते.
पारसनाथ पर्वतराज आणि मधुबन यांना जैन तिर्थस्थळ घोषित करण्यात यावे, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन चेकपोस्ट सुरू करण्यात यावे, झाडांची होणारी अवैध कत्तल, दगडांचे उत्खनन व मधासाठी लावण्यात येणाऱ्या आगीच्या घटनांना प्रतिबंध घालावा या मागण्यांचा समावेश जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आहे.
ददेशभरातील जैन समाज बांधवांचे श्री सम्मेद शिखरजी हे अतिशय पवित्र असे तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी जैन धर्मियांच्या २४ तीर्थकरांपैकी २० तीर्थकरांचे निर्वाण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाला अतिशय महत्त्व आहे.
जैन धर्मियांचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा देणाच्या अधिसूचनेला विरोध करण्यासाठी बुधवारी जैन बांधवांतर्फे दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. झारखंड सरकारचा निषेध नोंदविला.
जैन धर्मियांचे २४ तीर्थंकरांपैकी २० तीर्थकर ज्या पवित्र भूमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यातील मधुबन, जिल्हा गिरडोह येथील महापर्वतराज श्री सम्मेदशिखरजी क्षेत्र हे झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पर्यटन क्षेत्र झाल्यानंतर या पवित्र भूमीमध्ये मांसाहार, हॉटेल व बार दारू विक्री आणि मनोरंजन अशा गोष्टी सुरु होतील की ज्या अहिंसा तत्त्वाच्या विरुद्ध असणार आहेत, असे जैन बांधवांचे म्हणणे आहे.
महावीर दिगंबर जिन चैत्यालयचे यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते.
‘चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक – अशोक जैन खान्देशातील चित्रकार प्राचार्य राजू महाजन, राजू बाविस्कर विकास मल्हारा, विजय जैन यांच्या कलाकृतींचा सहभाग
जळगाव दि. १५ – आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, पाणी, फुलं, झाडं, माणसं, समाज याचे प्रतिबिंब आपल्या विचारांवर होतात यातुन कलावंताला काहीनाकाही सकारात्मक संदेश चित्रातुन देता येतो. ‘चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे सकारात्मक संदेश देणारे आहे. कुठल्याही गावाची ओळख ही तेथील कलावंतांमुळे होते यासाठी जळगाव मधील कलावंत प्रयत्न करत असल्यानेच आम्हाला सर्वांना कलेविषयी जिव्हाळा आहे, अभिरुची आहे आणि कलावंताविषयी नितांत आदरभावना असल्याचे सांगितले.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनाच्या औचित्याने श्रद्धेय मोठ्याभाऊंना समर्पित असलेल्या ‘चार भिंती’ चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खान्देशातील चित्रकार प्राचार्य राजू महाजन, राजू बाविस्कर विकास मल्हारा, विजय जैन यांच्या कलाकृतींचा सहभाग असलेले हे प्रदर्शन पु.ना.गाडगिळ आर्ट गॕलरीमध्ये दि. 30 डिसेंबर पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाहता येईल. याप्रसंगी प्राचार्य एस. एस. राणे, कवि अशोक कोतवाल, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, अनिल जोशी, दिपक चांदोरकर, एन. ओ. चौधरी, चित्रकार जितेंद्र सुरळकर, सचिन मुसळे, शाम कुमावत, योगेश सुतार, विनोद पाटील, हर्षल पाटील यांच्यासह मान्यवर व कलारसिक उपस्थित होते. दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी प्रास्तविक शंभू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. पुढे बोलताना अशोक जैन म्हणाले की, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचे महत्त्व आपण जाणतोच, कलेचेही माणसाच्या रोजच्या जगण्यात महत्त्वाचे स्थान आहे. आपला कान्हदेश कला-साहित्य- संस्कृती संदर्भात अग्रेसर आहे. उदाहरणच द्यायचे तर अजिंठ्याच्या लेण्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. जैन इरिगेशन कंपनीच्या सहा दशकांच्या वाटचालीत शास्त्रज्ञांना- संशोधकांना-अभ्यासकांना मान-सन्मान संस्थेने दिलाच कलावंतांचाही आदर सत्कार केला. जैन हिल्सवरिल, जैन व्हॅलीतील, डिव्हाईन पार्क परिसरातील अनुभूती स्कूलच्या प्रांगणातील एकूणएक सारी रचना, तेथील वस्तू-वास्तू-शिल्प या सर्व बाबतीत एक खास अनुभव पाहणाऱ्यांना येतो. गांधीतीर्थच्या सुरवातीलाच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा भव्य पुतळा आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार सदाशिवजी साठे यांनी हा अतिशय सुंदर असा पुतळा साकार केला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या म्युझिअमच्या इमारतीलाही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्कारांनी विभूषित करण्यात आले आहे. आजच्या या चित्र प्रदर्शनीतील राजू बाविस्करचे काही चित्र गांधीतीर्थमध्ये सुशोभित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एस. एस. राणे यांनी मनोगत व्यक्त करताना कला ही जोपासता आली त्यासाठी आंतरिक प्रेरणा लागते त्यातून चित्रकाराला विचारांच्याही पलिकडेचे दिसते आणि तेच भाव त्याच्या चित्रात उमटत असतात.
दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टद्वारा जैन हिल्स, गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात साहित्य-कला पुरस्कार २०२१ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आदरणीय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात छटा मांडणाऱ्या ‘बहिणाई’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित, पद्मश्री डॉ.भालचंद्र नेमाडे, पद्मश्री कविवर्य ना.धों. महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सेवादास श्री.दलूभाऊ जैन, श्री.अशोक जैन यांची उपस्थिती होती. तसेच सोबत पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीमती संध्या नरे-पवार, श्री. वर्जेश सोलंकी, श्री. प्रवीण बांदेकर, श्री. प्रभाकर कोलते, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन आणि डॉ. भावना जैन हे उपस्थित होते.
प्रस्तुत पुस्तकास डॉ. मीनाक्षी पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृती मंडळ यांची प्रस्तावना तसेच जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अशोकभाऊ जैन यांचे मनोगत लाभले आहे. पुस्तकाचे संकलन आणि संपादन बहिणाबाई चौधरी ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांनी केले असून त्यांना ज्ञानेश्वर शेंडे यांचे साहाय्य लाभले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सजावट विजय जैन यांनी केली असून जळगावातील नामवंत प्रकाशन संस्था अथर्व पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या पुस्तकात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात तसेच त्यांच्या साहित्याविषयी वर्णन असलेल्या कविता आणि लेखांचा संग्रह संपादित करण्यात आला आहे.
जैन हिल्स येथे कस्तूरबा सभागृहात 2021 साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव, दि. 13– ज्या समाजात कला आणि साहित्य सोबत वाढत असते त्या समाजाची उत्क्रांती होत असते. आपली संस्कृती कलेमुळे समृध्द झाली. जेवढे इतर शिक्षण महत्त्वाचे आहे तितकीचे महत्त्वाची कला आहे. आर्टिस्ट होणं किंवा होऊ देणं हे महत्त्वाचे असून कला, साहित्य, चित्रकला शिल्प कला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपण समृद्ध होऊया समाजाला उत्क्रांत अवस्थेत नेण्याची क्षमता केवळ कलांमध्ये असते असे प्रतिपादन ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.
जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (कुलपवाडी-बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (आगाशी-वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे साहित्य-कला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते सन्मानपूर्ण प्रदान केला गेला. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, आकर्षक सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. याप्रसंगी डॉ. भालचंद्र नेमाडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर, संघपती दलिचंद जैन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सौ.निशा जैन, डाॕ. भावना जैन व सन्मानार्थी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते बहिणाई पुस्तक प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुस्तकाचे संपादक अशोक चौधरी, संपादन सहाय्यक ज्ञानेश्वर शेंडे, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थीत होते. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बि. जी. शेखर पाटील यांचीही उपस्थीती होती. यावेळी चौघेही पुरस्कार्थींची कार्य परिचयात्मक डॉक्युमेन्ट्री दाखविण्यात आली.
प्रास्ताविक ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. यात त्यांनी श्रध्देय भवरलालजी जैन हे कला, साहित्य आणि संस्कृती ही विश्वाची किल्ली मानत असे सांगितले. जळगाव हे कवितेचे गाव असून नामांकित कविंची मोठी परंपरा या गावाला असल्याचे ते म्हणाले.
आरंभी दिपक चांदोरकर यांनी पसायदान तर शेवटी राष्ट्रगित म्हटले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
साहित्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मनोगत…
स्त्रीवादाची पाळंमुळं भारतीय साहित्यात – संध्या नरे-पवार
श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारने सन्मानीत श्रीमती संध्या नरे-पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्त्रीवादी विचारांची जेव्हा ओळख झाली तेव्हा अभ्यास केला असता त्यामध्ये संत मुक्ताई, संत जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यात विज्ञानवादी दृष्टी दिसली. सर्वांच्या साहित्यात भारतीय स्त्रीवादाची पाळेमुळे मातीत रूजली आहेत. ज्या नावाने हा पुरस्कार त्या बहिणाईंच्या साहित्यात महिलांच्या अडचणींसह कणखर पणा दिसतो. मातीत पांडुरंग पाहणाऱ्या कृतीशील विचारांची रूजवात जैन हिल्स परिसरात असल्याचेही त्या म्हणाल्या.
कवितेने ओळख दिली – वर्जेश सोलंकी
कविता ही माणसाला ओळख करून देतात यासाठी अभिव्यक्त झाले पाहिजे. श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्काराने सन्मानीत केल्याने श्री. वर्जेश सोलंकी यांनी आयोजकांचे आभार मानत 1990 हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्याच वर्षापासून मी कविता लिहायला लागलो याचा आनंद व्यक्त करून स्वरचित कविता सादर केली.
साहित्यातुन दुभंगलेली मने जोडली जातात – प्रविण बांदेकर
सध्याच्या वातावरणात आपापसातील द्वेषाची, तिरस्काराची भावना वाढीला लागत असताना समाजातील दुभंगलेली मने साहित्यातुन जोडले जातात. साहित्य, संस्कृती, कला यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणा-या भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कौतुकाची, उमेदाची थाप पुरस्काराच्या रूपाने दिल्याचे त्यांनी सांगत कृतज्ञता व्यक्त केली.
चित्रातून स्वतःला व्यक्त करा – प्रभाकर कोलते
चित्रकलेतुन परमेश्वराचे रूप पाहता येते. चित्र ही बोलत नाही ती मनाने पाहायची, अनुभवयाची असतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता चित्र काढत राहिलो यातुनच आयुष्याला जीवंतपणा आला. एखादा विषय घेऊन काम करू नये त्याची नक्कल करू नका त्याचा विचार करा आणि ते चित्रातुन व्यक्त करा. त्यांचे गुरू पळशीकर सरांचा उल्लेख करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत न करता काय करावे ह्याचा विचार करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वाकोद जामनेर दि. 12 – वाकोदचे नाव जगाच्या पाठीवर पोहचवणारे खऱ्या अर्थाने गाव आदर्श करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ याप्रमाणे कृतिशील आचरण करणारे या गावाच्या भूमीत जन्माला आले हे गावचे भाग्य असल्याचे मत भूमिपुत्र तथा ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री डॉ भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी भव्य ग्रंथ पालखी व वृक्षदिंडी सोहळ्यातून भूमिपुत्राचा जन्मसोहळा वाकोदकरांनी अनुभवला.
ग्रंथपालखी घेऊन जाताना पोलीस पाटील संतोष देठे सोबत जैन इरिगेशनचे मदन लाठी, वाकोद जैन फार्म चे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत व मान्यवरग्रंथ दिंडी मध्ये सहभागी विद्यार्थी व ग्रामस्थश्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सरपंच व उपस्थित मान्यवर
वाकोद हे श्रद्धेय भवरलाल जैन यांचे जन्मगाव. याठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी, ग्रंथ पालखी भवरलालजी जैन यांची ग्रंथसंपदा ठेऊन विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढण्यात आली. बैल गाडीवर भवरलाल जैन यांची प्रतिमा ठेऊन भजनी मंडळीच्या साह्याने टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून भूमिपुत्राचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. या अभियानात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गौराई कृषी तंत्र निकेतन व विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाकोद, जैन फार्म वाकोद यांचे सर्व सभासद कर्मचारी व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रभात फेरीचे ठिकठिकाणी रांगोळया काढून पूजा करुन स्वागत करण्यात आले. माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, पोलिस पाटील संतोष देठे, शिरीन शेख यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाकोद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजच्या दिनानिमित्त गावातील नूतन व्यापारी संकुलला कर्मवीर पंढरीदादा पवार व्यापारी संकुल असे नाव देण्यात आले तर जुन्या व्यापारी संकुलला पद्मश्री डॉ. भवरलाल जैन व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरिक तुकाराम जाधव व सरपंच सौ. सरला संजय सपकाळे यांच्याहस्ते झाले तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या पुस्तकात वाकोद येथील शिरीन शेख यांचा लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल तिचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महावीर गुळेचा यांनी केले. प्राचार्य डी. आर. चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी किशोर इंगळे, डॉ. चौधरी, प्रकाश लुंकड, बाबुराव आस्कर, प्रमोद जैन, प्रदीप पाटील, मोहन देशमुख, अभय लोढा, बालु पांढरे, शेख मुस्ताक, मधुकर काटे, विजय भोसले, प्रमोद राऊत, अरूण पाटील, संजय धोबी शेख ईला शेख गुलाब, संदीप जैन, रमेश देठे यांच्यासह जैन फार्म चे सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. पंचक्रोशितील सरपंचांचा गौरव वाकोद येथे मिरवणूकीच्या समारोपाप्रसंगी वाकोदसह पंचक्रोशितील 12 गावच्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशनच्या वतीने मदन लाठी, वाकोद जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, तोंडापूर मंडळ अधिकारी एस. बी. तिर्थंकर, वाकोद तलाठी ज्ञानेश्वर घुरके, नितीन राठोड, रमेश छाजेड, महेश देशमूख, अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंडीत पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते संजय सपकाळे, संजू बनसोडे, श्रीराम पाटील, मुरलीधर शेळके, जगदीश पाटील, संजय पाटील, अनिल गायकवाड, दिलीप रदाळ, राजमल भागवत, शंकर जाधव, रामेश्वर पाटील, राजूभाऊ राजपूत यांचा शाल, श्रीफळ व ‘एक न संपणारा प्रवास ग्राम विकास’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
कांताई जैन साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार प्रभाकर कोलतेंना; बालकवी ठोमरे, बहिणाई चौधरी व ना. धों महानोर पुरस्काराचेही सन्मानपूर्ण सोहळ्यात वितरण
जळगाव, दि. 11– जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (कुलपवाडी-बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (आगाशी-वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना दि.13 डिसेंबरला, कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे सन्मानपूर्ण वितरीत करण्यात येणार आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.
साहित्य-कला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन यांच्या उपस्थितीत, साहित्यिक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली होती. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.
जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना प्रदान करण्यात येणार आहे.
परिचय
1) प्रभाकर कोलते – ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहीर ते प्रभाकर कोलते मुंबई येथील जे. जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेऊन तेथेच हाडाचे प्राध्यापक होते. प्रभाकर कोलते कला शिक्षणाविषयी आपलं मत अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट मांडतात त्यामुळेच ते कला विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. भारतीय अमूर्त कलेतील सध्याच्या नामांकित चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलतेंचे नाव अग्रस्थानी आहे. अमूर्त कलेवर भाष्य करणारे आणि लिहीणाऱ्या अतिशय दुर्मिळ जागतिक दर्जाच्या चित्रकारांमध्येही ते पुढे आहेत. भारतीय अमूर्त कलेमध्ये काम करणाऱ्या क्रियाशील पिढीमध्ये बहूतांश चित्रकारांवर प्रभाकर कोलते यांचा प्रभाव आहे. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्ततेतील अध्यात्म सांगणारा योगी चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या अनेक चित्रमालिका देशात-परदेशात गाजलेल्या आहेत.
2) संध्या नरे-पवार – श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी संध्या नरे-पवार यांची निवड झाली. मुक्तपत्रकार व संधोधनपर लेखनामध्ये त्यांचे साहित्य आहे. आदिवासी स्त्रीयांविषयी संवेदनशील वास्तव मांडून अमानवी प्रथांवर प्रखड भाष्य करणारे ‘डाकीण’, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या पुस्तकांसह त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
3) प्रवीण दशरथ बांदेकर – सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज येथे इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांनी कविता, कादंबरी, ललित, समीक्षा आदी लेखन केले असून कविता संग्रह – ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं…’, ‘चिनभिन’, कादंबऱ्या – ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘इंडियन अॅनिमल फार्म’, ललित लेख संग्रह – ‘घुंगुरकाठी’, ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’, बालसाहित्य- ‘चिंटू चुळबुळे’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे.
4) वर्जेश सोलंकी – वर्जेश सोलंकी हे आगाशी ह्या लहानशा खेड्यात वास्तव्यास असून महाविद्यालय जीवनापासून काव्यलेखनाला त्यांनी सुरूवात केली. वर्जेश ईश्वरलाल सोलंकींच्या ‘कविता’, ‘ततपप’, ‘वेरविखेर’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध, ‘दीडदमडीना’ (ललितगद्य), ‘पेरूगन मुरूगन’ (लघुकांदबरी), ‘वृद्धशतक’ व ‘अनेक एक’ (कवी कमल वोरा ह्यांच्या गुजराती कवितांचा मराठी अनुवाद), ‘हुसैनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ (कथासंग्रह) इत्यादी साहित्य प्रकाशित असून अनेक कविता व कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
जळगाव दि,10 (प्रतिनिधी )– भारतीय संस्कृती ही तर्कसंगत बांधिलकीच्या तीन स्तंभांवर उभी आहे, या भारतीय संस्कृतीत परंपरेसह भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्यानंतरची 75 वर्षाच्या प्रगतीची उजळणी करणाऱ्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ ही नाटिका अनुभूती स्कूलच्या 200 विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रत्येक क्षण उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना रोमांचकारीचा अनूभव दिला.
अनुभूती निवासी स्कूलचा आजादी का अमृत महोत्सव या थीमवर आधारित ‘फाउंडर्स डे’ हा अनुभूती स्कूल चे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित असतो तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. दीपप्रज्वनाने सांस्कृतिक कार्यक्रमासह नाटिकेला सुरवात झाली. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डाॕ. सुभाष चौधरी, गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डाॕ.भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत 12 वी मध्ये भारतातुन तृतीय रँक प्राप्त करणाऱ्या कु. रूतिका अरूण देवडा, आत्मन अशोक जैन यांचा तर दहावीत प्रथम आलेल्या कु. देबर्णा दास, दक्ष जतिन हरिया यांचा गौरव करण्यात आला. ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षक अरूण गोपाल यांनी गणिताचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील यशस्वी, आदित्य, सार्थक हे विद्यार्थी सचित्र पेटिंग करीत होते. आरंभी ‘द फ्युजन हाॕबी’ सादर झाले. यातुन देशभक्तीचा जागर झाला. त्यानंतर भरतनाट्यम्, भांगडा नृत्य यासह भारतीय संस्कृतीमधील नृत्यांची झलक विद्यार्थ्यांनी सादर केली. योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण केले. ‘आजादी का अमृत महोत्सव’ नाटिकेचे लिखाण ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. नाटिकमध्ये भारतीय परंपरा, इतिहासासह स्वांतत्र्यानंतरच्या 75 वर्षातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, संविधानाची निर्मिती, संस्थानांचे विलीनीकरण, हरित क्रांती, धवल क्रांती, ठिबक सिंचनात श्रध्देय भवरलाल जैन यांनी घडवून आणलेली क्रांती, संशोधनात्मक प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल विद्यार्थ्यांनी नाटिकेतून सादर केले. देशातील उद्योग विश्वातील भरारी, अवकाश संशोधनात भारताचे यश तर कोव्हिड सारख्या आपत्तींत भारतीयांचे व्हॕक्सीन संदर्भातील संशोधन पर्यंतचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांनी उलगडला. सुत्रसंचालन राधिका सोनी, अंजली अग्रवाल, अनुष्का महाजन, सिध्देश मल्लावार यांनी केले. अन्नदाता सुखी तर आपण सुखी – कुलगुरू डाॕ. विजय माहेश्वरी भवरलालजी जैन यांच्याकडे दुरदृष्टी होती. ते व्हिजनरी होते. त्यातूनच त्यांनी अन्नदाता सुखी तर आपण सुखी यासाठी जैन इरिगेशनच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न केले. चांगल्या दर्जाचे शिक्षण, अनुभव, इंटिर्गेड लर्निंग या दृष्टीने अनुभूती स्कूलची निर्मिती केली. यश प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न मनापासून केले पाहिजे. व्यक्तीमत्व बदलविणारे शिक्षण पाहिजे, लढणे आणि जिंकणे यातील फरक शिकविणारे शिक्षण अनुभूती स्कूलमध्ये भवरलालजी जैन यांनी उपलब्ध करून दिले.
(जळगाव) के सी ई चे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगावची विद्यार्थिनी सोनल वाल्मीक हटकर हीची नुकत्याच श्री.वैष्णव विद्यापीठ,विश्वविद्यालय, इंदौर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली सोनल हटकर ही बास्केटबॉलची एन.आय.एस. सर्टिफाईड प्रशिक्षक ,राष्ट्रीय पंच व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी परीक्षा देखील उत्तीर्ण आहे व गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व विविध खेळात करीत आहे सोनल हटकर च्या निवडीबद्दल जैन इरिगेशन चे चेअरमन अशोक जैन, जैन स्पोर्ट्स चे अध्यक्ष अतुल जैन शा.शि.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, विभाग प्रमुख डॉ. निलेश जोशी प्रा. प्रवीण कोल्हे प्रा.यशवंत देसले, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर प्रा. डॉ. रणजीत पाटील, फारुक शेख तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी,जैन स्पोर्ट्सचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील सर्व प्रशिक्षक व खेळाडु वर्ग यांनी अभिनंदन केले
भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ, व संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे असून भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात यावर्षीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
महोत्सवाची सुरुवात दि. ६ जानेवारी रोजी उद्गाटन समारंभानंतर प्रथम सत्रात तरुण, उदयोन्मुख आणि आश्वासक असे कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड ने होणार आहे. द्वितीय सत्र तरूण व आश्वासक व बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे सौरव व गौरव मिश्रा यांच्या कथक जुगलबंदिने संपन्न होणार आहे. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान करतील. द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील. तृतीय दिनाचे प्रथम सत्र सहगायनाने संपन्न होणार आहे. शास्त्रीय व उप-शास्त्रीय सहगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील मुंबई चे गायक व गुरु पं. डॉ. राम देशपांडे, व त्यांचा मुलगा गंधार देशपांडे. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील. बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून ही मैफल सजवणार आहेत पद्मभूषण व ग्रॅमी ऍवार्ड विजेते पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा) पं. सलील भट (सात्विक वीणा) व अथर्व भट (गिटार) यांच्या सहवादनाने एकविसावा महोत्सव संपन्न होणार आहे.
तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून या महोत्सवाच्या तीनही दिवसांचे सुत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी दिप्ती भागवत करणार आहेत. तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, तसेच विविध प्रायोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ दीपिका चांदोरकर, विश्वस्त अशोकभाऊ जैन, रमेशदादा जैन, दत्ता सोमण, प्रा. शरदचंद्र छापेकर, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे व डॉ. अपर्णा भट यांनी केले आहे. प्रवेशिकेसाठी रसिकांनी दीपिका चांदोरकर भ्रमणध्वनी – ९८२३०७७२७७ किंवा ०२५७-२२२७७२२ वर संपर्क करावा अशी विनंती प्रतिष्ठानाने केलेली आहे.