महा. क्रिकेट असो. आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेची फायनल पश्चिम बंगाल व महाराष्ट्र संघात

जळगाव दि. २२ प्रतिनिधी –  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर  दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरू आहे. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघाला नमवत महाराष्ट्र संघाने फायनलमध्ये दिमाखात धडक मारली. उद्या (दि. २३) दुपारी १.३० वाजता दोघांमध्ये अंतिम सामना होईल. तत्पुर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी तामिळनाडू विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९.३० वाजता  सामना खेळविला जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ च्या आजच्या दिवसाची सुरवात त्रिपुरा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात खेळविला गेलेल्या सामन्याने झाली. तामिळनाडूने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्रिपुरा  बिनबाद ३९ धावा असताना सातव्या षटकात पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती न घेतल्याने सामना थांबवून दोघंही संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यानंतर दुपारी पश्चिम बंगाल विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात अंतिम सामना रंगला.

महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगालच्या मिता पॉल ३५ धावा व कशिश अग्रवाल १९ या सलामीच्या खेळाडूंनी चांगली सुरवात करून दिली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजी कोळमडल्याने निर्धारीत २० षटकात सर्वबाद १०९ धावा बंगालला करता आल्यात. महाराष्ट्राकडून उत्कृष्ट गोलंदाजी मुक्ता मगरे हिने केली. तिने ४ षटकात ४ विकेट घेऊन बंगालचे कंबरडे मोडले. तिला अनुजा पाटील, ईशिता खळे, आदित्य गायकवाड प्रत्येकी १ विकेट साथ मिळाली. प्रत्युत्तरात महाराष्ट्र संघाची सुरवात धडाकेबाज झाली. मात्र संघाच्या २२ धावांच्या स्कोरवर किरण नवगिरे १० धावा करून आऊट झाली. यानंतर शिवाली शिंदे १९ धावा, तेजल हसबनिस ३१ धावा, अनुजा पाटील १९ धावा आणि मोक्याच्या क्षणी मुक्ता मगरे हिने नाबाद २२ धावांची खेळी करून महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्र संघाने १९.२ षटकांत ४ विकेटच्या मोबदल्यात ११३ धावा केल्यात व बंगालवर ६ विकेटने मोठा विजय प्राप्त केला. ४ विकेट घेणाऱ्या व २२ धावांची उपयुक्त खेळी करणाऱ्या मुक्ता मगरे हिला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. जैन परिवाराच्या सदस्या सौ. शोभना अजित जैन यांच्याहस्ते मुक्ता मगरे हिला चषक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष रेखा गोडबोले, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते पद्मश्री सतिश आळेकर (पुणे) यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी सुमती लांडे (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सिताराम सावंत (इटकी ता. सांगोला, सातारा) यांना जाहिर झाला आहे. ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.

साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. शोभा नाईक, सौ. ज्योती जैन हे ऑनलाईन उपस्थित होते. तर सदस्य ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. सुरवातीला कविवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यीक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.

जैन इरिगेशनचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई पुरस्कार, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बिजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी नाटक, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ हा व्दिवार्षिक पुरस्कार असून २ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे याचे स्वरूप असेल. पहिल्या पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार, दुसरा जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा तिसरा पुरस्कार प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते सतिश आळेकर यांना जाहिर करण्यात आला आहे.

‘कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्याकडून सृजनशील लिखाणाचे कार्य घडावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन इरिगेशनतर्फे सुरूच असते. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे ‘कला-साहित्य पुरस्कार’ जाहिर करताना आनंद होत आहे.’ – अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन

पुरस्कार प्राप्त साहित्यीकांचा परिचय – 1-सतिश आळेकर –  ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहिर झाला ते सतिश आळेकर यांनी पुण्याच्या ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे काम केले आहे. याशिवाय रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी काम केले आहे. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ‘ओळख’, ‘काळोख’ या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. सतीश आळेकर यांनी ‘चिंटू’, चिंटू-२, ‘व्हेंटिलेटर’, भाई,भाई-२, मी शिवाजी पार्क, अय्या, चि व चि सौ कां, राजवाडे अँड सन्स, स्माईल प्लिज, हाय वे, देऊळ बंद, जाऊंद्याना बाळासाहेब इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. रंगभूमीप्रमाणेच ‘जैत रे जैत’ चित्रपटाची पटकथा, ‘देखो मगर प्यार से’ ही दूरदर्शन मालिका, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. रंगभूमीवरील कारकीर्द आणि नाट्यकृतींचा आढावा घेणारे ‘गगनिका’ हे आत्मकथन चर्चेत आहे.

2) सुमती लांडे –  साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सुमती लांडे यांचे कमळकाचा, वाहेत अंतर, कमळकाचा: कावप्रत्यय कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. साहित्य क्षेत्रात कवयत्री, लेखिका,संपादक, प्रकाशक, ग्रंथ प्रसारक, ग्रंथ वितरक म्हणून सुमती लांडेचे कार्य आहे. शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रंथप्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. सुमती लांडे यांनी स्त्री वाद, स्त्री-पुरूष नातेसंबंध, वाड्मयीन चळवळी आणि दृष्टीकोन, पुरूष आकलनातला-अनुभवातला यांचे संपादन केले आहे.

3) सिताराम जगन्नाथ सावंत – इटकी ता. सांगोला जि. सातारा येथील रहिवाशी सिताराम सावंत रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. ‘नामदार’, ‘लगीन’, ‘देशोधडी’, ‘भुई भुई ठाव दे’ अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कादंबरी, ‘काव्यार्य’ संपादन व ‘पांढर’ आणि ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रहाने सिताराम सावंत यांनी मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवले आहे. शेतकरी, शिक्षक आणि लेखक हा प्रवास करताना शेतमालकांचे जमिनीचे ‘काळीज’ हातांमधून गेल्यानंतर त्यांच्या मनांचा तीव्रकोमल कोलाहल टिपणारी ‘भुई भुई ठाव दे’ कादंबरी व ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रह सध्या मराठी विश्वात बहुचर्चित आहे. स्वतः अभियंता अर्हताप्राप्त असणाऱ्या या लेखकाने कठोर विचार करून आणि विवेकाची नीट मशागत करून ‘स्थावरजंगम’ विषयावर कादंबरीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.

4) अशोक कोतवाल – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य राहिलेले अशोक कोतवाल (जळगाव) यांचे ‘मौनातील पडझड’, ‘कुणीच कसे बोलत नाही’, ‘नुसताच गलबता’, ‘खांदे सुजलेले दिवस’, हे कवितासंग्रह तर ‘प्रार्थनेची घंटा’, ‘सावलीचं घड्याळ’, ‘दालगंडोरी’ हे ललित लेखसंग्रह, ‘घेऊ या गिरकी’ हे बालकविता यासह पुणे सुविद्या प्रकाशनाचे ‘खानदेशचे काव्यविश्व’  हे संपादन केले आहे. यातील ‘प्रार्थनेची घंटा’, ‘झडीचा पाऊस’, ‘दालगंडोरी’ ह्या साहित्यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे.

विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी)  – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क नसून गुरुवार, दि. २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत ऐनवेळी सहभाग दिला जाणार नाही यांची शाळांनी नोंद घ्यावी अशी माहिती गांधी रिसर्च फाऊंडेशन संस्थेच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून एका शाळॆतून एकच प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी शाळांनी मराठी वा हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर करणे अपेक्षित असून चित्रपटातील गीते स्वीकारले जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचा कालावधी दिलेला असेल. संघातील विद्यार्थ्यांची संख्या वाद्य वादकांसह जास्तीत जास्त १२ असावी. गीत सादर करतांना पारंपरिक वाद्यांचा वापर अपेक्षित असून पाश्चात्य वाद्यांना परवानगी नाही. सहभाग नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत स्वतंत्र कागदावर संपूर्ण गीत, गीतकार व अन्य माहिती देणे अनिवार्य आहे.
सहभागी संघातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या संघांना अनुक्रमे रु. ११ हजार, ७ हजार, ५ हजार व उत्तेजनार्थ रु. २ हजाराची तीन रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात स्पर्धा घेण्यात येईल व स्पर्धेनंतर तेथेच स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. सहभागी संघांनी सकाळी ७ वाजता आयोजित *अहिंसा सद्भावना शांती यात्रेत* सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. आपल्या शाळेच्या संघाची नोंदणी करण्यासाठी व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ या भ्रमध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात कळविले आहे.

राज्य क्रिकेट पंचाच्या पॅनेलमध्ये जळगावचा वरूण देशपांडे

जळगाव दि. २० प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंच परिक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. संपुर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे क्रिकेटच्या राज्य पंचांच्या पॅनेलमध्ये वरूणचा समावेश करण्यात आला.

वरूण देशपांडे यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस टी (बापू) खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी व सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे वरुण चे वडील अरविंद देशपांडे हे जळगाव जिल्हातील क्रिकेटचे प्रथम अधिकृत पंच आहेत. त्यानंतर जळगावचे संदीप गांगुर्डे हे दुसरे तर वरुण देशपांडे हा जिल्ह्याचा तिसरा अधिकृत पंच म्हणून जबाबदारी स्वीकारेल.

येवला येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्तीत वाकोद विद्यालयाचे यश

जळगाव दि. २० प्रतिनिधी – राणिदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील मुले यात आनंद गोपाल सोनेत हा ४४ वजन गटातुुन प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाला. या यशामुळे आनंद सोनेत ची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.

येवला येथील भाऊलाल लोणारी क्रीडा संकुल येथे आज दि. २० रोजी संपन्न झालेल्या नाशिक विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातून स्पर्धेक आले होते. आनंद सोनेत याने तीन राऊंडमध्ये सहा स्पर्धेकांना चित करत विजय मिळवला. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह दि. शेंदुर्णी एज्युकेशन को. ऑप सोसायटीत लिमिटेड, शेंदुर्णी संस्थेचे चेअरमन संजय गरूड, सचिव सतिश काशीद, सहसचिव दीपकराव गरूड, ज्येष्ठ संचालिका उज्ज्वला काशीद, वसतिगृह सचिव कैलासराव देशमुख, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विजयी खेळाडूंचे पालक गोपाल सोनेत, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, क्रिडा शिक्षक के. एम. पाटील, ए. ए. पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून विजयी खेळाडूंचे कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

जळगाव दि. २० प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथील मैदानावर सुरू आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी असुन आतापर्यंत पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र संघ पोहचला असून नेट रनरेटही चांगला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. दि.१५ ते २३ सप्टेंबर दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा चौथा दिवस होता.

आजच्या पहिल्या सामन्यात पश्चिम बंगाल विजयी – चौथा दिवसाचा पहिला सामना त्रिपुरा विरूद्ध बंगाल असा खेळविण्यात आला. त्रिपुरा संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पश्चिम बंगाल संघाने निर्धारित २० षटकांत झुमिया खातून ३६ (३७ चेंडू) धावा च्या मदतीने ८ गडी गमावून १११ धावा केल्यात. त्रिपुरा तर्फे हिना हिने सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्रिपुरा संघाने ११२ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजी करताना रिजू सहा हिच्या नाबाद ४३ धाव वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. त्रिपुरा संघ ५ गडी बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता येईल. बंगाल संघ ८ धावांनी विजयी झाला. ह्या सामन्यात ३६ धावा व २ बळी घेणारी झुनिया खातून ही सामनावीर ठरली. अनुभूती निवासी स्कूलचे व्यवस्थापक विक्रांत जाधव यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन तिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्राचा तामिळनाडूवर ६६ धावांनी विजय – आजचा दुसरा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात खेळला गेला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यात किरण नवगिरे ३८ (२५ चेंडू) धावा, कर्णधार तेजल हसनबनीस ३० (३१ चेंडू), अनुजा पाटील २३ (१४ चेंडू), आदिती गायकवाड २१ (२६ चेंडू) नाबाद यांच्या योगदानामुळे निर्धारिती २० षटकांत ६ गडींच्या मोबदल्यात १२५ धावा केल्यात. १२६ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या तामिळनाडू संघाची सुरवात अडखळत झाली. अर्शी चौधरी १२, सबरिना १९ यांनी महाराष्ट्र संघाच्या आक्रमक गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाजींनी अपेक्ष प्रमाणे कामगिरी न केल्याने तामिळनाडूचा संघ १८ व्या षटकात फक्त ५९ धावांमध्ये गारद झाला. महाराष्ट्र संघातर्फे श्रद्धा, भक्ती, ईशिता यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर रसिका, अदिती गायकवाड, अनुजा पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ऑलऑउंटर कामगिरी करणाऱ्या अनुजा पाटील हि सामनावीर ठरली. तिला जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, पंच संदिप जारे, अनिल सोनवणे उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन केले.

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

जळगाव डाक विभागातील कर्मचारी व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे बॅडमिंटन खेळाडू अतुल प्रकाश ठाकूर यांची डाक विभागातर्फे नागपुर येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

त्यांना जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील संघ रायपूर (छत्तीसगड) येथे नोव्हेंबर 2023 मध्ये होणार्‍या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होईल. त्यांच्या यशाबद्दल डाक विभागाचे अधीक्षक एस. एस. म्हस्के, सहाय्यक अधीक्षक एम. एस. जगदाळे व सर्व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

जळगाव दि.१९ (प्रतिनिधी)– आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन  प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३  यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, भडगाव, चोपडा, दोंडाईचा, धुळे, अकोला, बुलढाणा, खामगाव, मालेगाव, अमरावती या शहरा मधून २२४ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा क्रिडा संघ चे अध्यक्ष श्री रजनीकांत कोठारी जी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर श्री मनोज आडवाणी जी,  शिल्पा इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर चे श्री राजकुमार मुनोत, श्यामली मॅट्रेस चे  श्री चंद्रकांत चौधरी व जळगाव जिल्ह्याचे पहिले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू  श्री सुनिल  रोकडे तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सहसचिव श्री तनुज शर्मा, सदस्य श्री शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत कीर्ती मुनोत, अतुल देशपांडे, वलीद शेख, सुफियान शेख, साद मलिक, दीपिका ठाकूर , अतुल ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी, उपविजयी व  उत्तेनार्थ खेळाडूंना बक्षीस म्हणून रू.८५०००/- चे रोख रक्कम,  मेडल, प्रमाणपत्र व श्यामली मॅट्रेस कडून गिफ्ट देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे – ११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – विहान राहुल बागड
उपविजयी –  प्रथम पराग नहाटा
उत्तेजनार्थ – आरव अमित दुडवे आणि कौस्तुभ संदेश पाटील

११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –   ओवी अमोल पाटील
उपविजयी – श्रावणी विकास खैरनार
उत्तेजनार्थ – अद्विता संतोष पटोंड आणि ज्ञानेश्वरी अनिल पवार

१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – रुद्र प्रेमसिंग राठोड
उपविजयी – हिमांशु प्रशांत चौधरी
उत्तेजनार्थ – जनक रवी अग्रवाल आणि सहील शाम लाड

१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – तनिषा अनिल साळुंखे
उपविजयी – ओवी अमोल पाटील
उत्तेजनार्थ – अनीका अमित चौधरी आणि श्रावणी विकास खैरनार

१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अंशुल रविकांत जाधव
उपविजयी – प्रीतम राजेंद्र जैन
उत्तेजनार्थ – ऋतुराज सतीश देशमुख आणि आयुष गजानन कुलकर्णी

१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – रुखमनी भटेजा
उपविजयी – श्रवरी संतोष पतोंड
उत्तेजनार्थ – तनिषा अनिल साळुंखे आणि अनन्या पुरुषोत्तम बोरनारे

१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – प्रीतम राजेंद्र जैन आणि चाणक्य महेश सूर्यवंशी
उपविजयी – ऋषी छोटू मोरे आणि देवेंद्र पंकज पटेल
उत्तेजनार्थ – हिमांशू प्रशांत चौधरी आणि सिद्धेश अनिल पवार

खान मोहम्मद हमजा आणि देशराज कीर्ती मनोज

१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उपविजयी –  उजेर रियाज देशपांडे
उत्तेजनार्थ – अर्णव निलेश निंबाळकर आणि दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –  आनंदी देशमुख
उपविजयी – स्वरा निलेश पाटील
उत्तेजनार्थ – जानवी संजय पाटील  आणि रुक्मणी भाटेजा

१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – उजेर देशपांडे
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उत्तेजनार्थ – देवेंद्र हरिचंद्र कोळी आणि अर्श रहीम शेख

१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील
उपविजयी – मोहित भोजवानी आणि जैद नावेद देशमुख
उत्तेजनार्थ – अर्णव निलेश निंबाळकर आणि केशव संजय वर्मा व
रौनक नितीन चांडक आणि देव देविदास वेद

पुरुष एकेरी
विजयी – चिराग गौतम शहा
उपविजयी – देवेश चंद्रकांत पाटील
उत्तेजनार्थ – घनश्याम प्रमोद पाटील व उमेर रियाज देशपांडे

महिला एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील
उपविजयी – गीता अखिलेश पंडित
उत्तेजनार्थ – आनंदी देशमुख व मनाली महिपाल बोरा

पुरुष दुहेरी
विजयी – उमर रियाज देशपांडे आणि निखिल प्रवीण मराठे
उपविजयी – वलीद फैजल शेख आणि देवेश चंद्रकांत पाटील
उत्तेजनार्थ – वेद विजयबाहेती आणि चिराग गौतम शहा

अर्श रहीम शेख आणि तुषार उपाध्ये

३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – तनुज शर्मा
उपविजयी – सचिन विष्णु बस्ते
उत्तेजनार्थ – विनायक बालदी व तुषार उपाध्ये

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – विनायक बालदी आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – अतुल ठाकूर आणि सचिन विष्णू बसते
उत्तेजनार्थ -डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा

अमोल प्रताप सिंग पाटील आणि सुभाष तोतला

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – मनाली अमित चौधरी आणि कीर्ती मोतीलाल मुनोत
उत्तेजनार्थ – संदीप कुमार पाटील आणि शितल अविनाश भोसले

विनायक बालदी आणि प्रज्ञा राजपूत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून वलिद शेख, सुफियान शेख, साद मलिक, ओजस सोनवणे, देवेश पाटील, गीता पंडित, शुभम चांदसरकर, देव वेद, प्रणेश गांधी, करण पाटील, अर्श शेख, रौनक चांडक यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत दिपिका ठाकूर, मो. हमजा खान,  पुनम ठाकूर, राखी ठाकूर, सुमिती ठाकूर,  फाल्गुनी पवार, कोनीका पाटील, कृष्णन घुमलकर, ईशांत साडी, ओम अमृतकर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी  प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया  व गीता पंडीत यांनी केले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती व हॉटेल प्रेसिडेंट चे मालक श्री मनोज आडवाणी यांनी केले व  शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यांचे निकाल

जळगाव दि. १९ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे सुरू आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी असुन आतापर्यंत पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर कायम आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे.

आजच्या सामन्यांचे निकाल – स्पर्धेतील चौथा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात काल (दि.१८) ला सुरू होता.  महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करत निर्धारित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्यात. तामिळनाडूने १.२ षटकात बिनबाद ५ धावा केला त्यावेळी सामना पावसामुळे थांबविण्यात आला. उर्वरित सामना त्याच षटकापासून सुरू करण्यात आला.  १०० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या तामिळनाडू संघाच्या फलंदाजांनी आपल्या नावे केला. शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात तामिळनाडूच्या निरंजना नागराजन ४७ (४५ चेंडू) धावा नाबाद करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामनाविरचा पुरस्कारही निरंजना नागराजन हिला प्राप्त झाला.   शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली पाटील (व्हॉलीबॉल) यांच्याहस्ते सामनाविर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रविंद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन उपस्थित होते.  मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन यांनी केले.

पश्चिम बंगालचा तिसरा विजयी – आजच्या पहिल्या सामना महाराष्ट्र विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. बंगालने निर्धारित २० षटकांत कशिश अग्रवाल ५४ (४१ चेंडू) धावा केल्यात तिला ब्रिस्टी माजही ४१ (४२ चेंडू) धावा साथ दिली. प्रणा पॉल हिने २७ धावांची उपयुक्त खेळी करून धावगती वाढवली. बंगालने निर्धारित २० षटकांत ४ गडी  गमावून १४५ केल्यात. १४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाला किरण नवगिरे ४० (४८ चेंडू) धावा व ईश्वरी सावकार ३३ (४१ चेंडू) धावा यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघं ही बाद झाल्यावर महाराष्ट्र संघाची धावगती मंदावली. शिवाली शिंदे २८ हिने आक्रमक खेळ करित धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु तिला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. महाराष्ट्र संघ निर्धारित २० षटकात ७ गडींच्या मोबदल्यात १२७ धावा करू शकला. बंगाल संघ १८ धावांनी विजयी झाला. सामनावीरचा पुरस्कार बंगालच्या कशिश अग्रवाल हिला देण्यात आला. सामनावीर पुरस्कार अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रविंद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन केले.

आजच्या शेवट्या सामन्यात तामिळनाडू २३ धावांनी विजयी – आज च्या दिवसाचा शेवटा सामना त्रिपुरा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून तामिळनाडूने प्रथम फलंदाजी केली. २० षटकात ८ गडी गमावून ११३ धावा तामिळनाडूने केल्यात. यात आर्शी चौधरी २८ धावा, नेत्रा आणि अनुषा प्रत्येकी १९ धावांचे योगदान दिले. त्रिपुरा संघाने ११४ धावांचे लक्ष्य समोर ठेऊन फलंदाजी करण्यास सुरवात केली. परंतु ठरावीक अंतराने गडी बाद होत गेल्याने त्यांना निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून ९० धावाच करता आल्यात. हिना १७ तर  शिवली हिने नाबाद राहत ३३ धावांचे योगदान दिले. तामिळनाडूचा संघ २३ धावांनी जिंकला.

तामिळनाडूनची एल. नेत्रा हिने ऑलराऊंडरची महत्त्वपुर्ण भुमिका निभावत १९ धाव व २ गडी बाद केल्याने तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. सामानावीर पुरस्कार जैन इरिगेशनच्या व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा साझीद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेत. यावेळी अरविंद देशपांडे, मुश्ताक अली उपस्थित होते. सुत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

जळगाव दि. १८ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येत आहे. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी झाले असुन पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर आला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे.  प्रत्येक सामना हा चुरशीचा होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ च्या दोन दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर कालपासून या स्पर्धेला सुरवात झाली. काल (दि.१७) ला महाराष्ट्र विरूद्ध त्रिपूरा व तामिळनाडू विरूद्ध बंगाल यांच्यात १४ षटकांचा सामना खेळविण्यात आला. यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली व निर्धारित १४ षटकांत २ गडी बाद ८१ धावा केल्यात. यात ईश्वरी सावकार ४१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.  तिला शिवाली शिंदे १०, तेजल हसबनीस १८, अनुजा पाटील ७ यांनी साथ दिली. त्रिपूरा राज्याच्या संघाकडून हिना ला एकमेव गडी बाद करता आला. प्रतिउत्तरात त्रिपूराचा संघ १४ षटकात केवळ ७३ धावा करू शकला. अशाप्रकारे महाराष्ट्र संघ ८ धावांनी विजयी झाला. या सामन्यात ईश्वरी सावकार ही सामनावीर ठरली.

तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात अर्बना हिने सर्वाधिक २३ धावांसह निर्धारित १३ षटकांत ५ गडी गमावून ६८ धावा  तामिळनाडू ला करता आल्यात. पश्चिम बंगालने हा सामना ११ व्या षटकात ३ गडींच्या मोबदल्यात ७३ धावा करून ७ गडी राखून जिंकला. सामनाविर म्हणून बंगालच्या मिता पॉल (३८ धावा) गौरव करण्यात आला.

आज (दि.१८)ला झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात त्रिपूरा विरूद्ध पश्चिम बंगाल यात त्रिपूरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू बंगालच्या संघाने उत्कृष्ठ गोलंदाजी करताना त्रिपूरा संघाला १३ व्या षटकात गारद केले. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना बंगाल संघाने १० षटकातच केवळ १ गडीच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज पार केले. मिता पॉल हिने नाबाद १८ धावांचे योगदान देऊन बंगालचा विजय साकार केला. सामनाविरचा पुरस्कार बंगालची श्रोयोसी हिला ३ गडी  बाद केल्याने देण्यात आला. सामनावीरांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गिता धरमपाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

दरम्यान आजचा दुसरा व स्पर्धेतील चौथा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात सुरू असून महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करत निर्धारित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्यात. तामिळनाडूने १.२ षटकात बिनबाद ५ धावा केला असून सामना पावसामुळे थांबविण्यात आला.

संपुर्ण स्पर्धेत आतापर्यंत पश्चिम बंगाल ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांवर असलेल्या महाराष्ट्र व चौथ्या क्रमांवर असलेल्या तामिळनाडू यांच्या सामना पावसामुळे थांबविण्यात आला होता. त्रिपुराने दोघंही सामने गमाविल्यामुळे त्यांना अजून एकही गुण प्राप्त करता आला नाही.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version