Author: Trading Buzz
जैन हिल्स येथे २२ एप्रिल पासून फालीचे दहावे अधिवेशन
जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) : भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच दहावे वर्ष पूर्ण केले. २२ ते २९ एप्रिल २०२४ या कालावधीत फाली १० अधिवेशनाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि., जैन हिल्स, जळगाव येथे करण्यात आले आहे. यामध्ये फालीचे १,२०० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या ९० फाली कृषी शिक्षकांसह आणि फाली १० ला सहकार्य करणाऱ्या अकरा कंपन्यांमधील ५० हून अधिक उच्चस्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापकांसह सहभागी होत आहेत.
फाली १० मध्ये सहभागी होणाऱ्या १७५ शाळांमधील हे फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या कृषी क्षेत्रातील तीन प्रमुख राज्यांमध्ये फाली सध्या कार्यरत आहे: तसेच, पुढील दहा वर्षांत किमान आणखी तीन मोठ्या राज्यांमध्ये विस्तार करण्याची फालीची योजना आहे. यावर्षी, ग्रामीण भागातील सरकारी अनुदानित शाळांमधील १५,००० पेक्षा जास्त फाली विद्यार्थ्यांनी कृषीशास्त्र, पशुधन शास्त्र, कृषी तंत्रज्ञान, ॲग्रो-एंटरप्राइज आणि ॲग्री-फायनान्स या विषयावरील परस्परसंवादी (इंटरअक्टीव) वर्गात भाग घेतला होता. सर्व मॉड्यूल्समध्ये हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे प्रॅक्टिकल करत फालीचे विद्यार्थी प्रत्येक शाळेत शेड नेटमध्ये व्यवसाय तयार करतात. ते आधुनिक शेती आणि अग्रगण्य कृषी-उद्योगांच्या ठिकाणी क्षेत्रीय भेटी देतात. वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील अनुभवी वरिष्ठांसोबत संपर्क करून अत्याधुनिक नवकल्पना विषयी माहिती मिळवतात. आणि व्यवसायाच्या नवीन योजना तयार करतात आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञाना संबंधी संशोधन करतात.
फाली मधील ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक असे म्हणतात की, “फाली ने कृषी आणि कृषी-उद्योगातील भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे आणि विद्यार्थ्यांनी कृषी आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक, व्यवसायिक आणि नेतृत्व कौशल्ये फाली मध्ये प्राप्त केली आहेत. आधुनिक आणि शाश्वत शेतीमध्ये भविष्य घडविण्यासाठी फाली मधील अनेक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाच्या शेतामध्ये सुधारित कृषी पद्धती आणि तंत्रज्ञान आणतात.”
फाली मध्ये आता ४०,००० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आहेत आणि २०३२ पर्यंत ही संख्या २,५०,००० पर्यंत वाढविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. फाली मध्ये इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि कृषी उपक्रमांसाठी सुरुवातीचा निधी (सीड फंडिंग) असे विविध सक्रिय माजी विद्यार्थी उपक्रम चालू आहेत. फाली माजी विद्यार्थी इंटर्नशिप सुविधा प्रायोजित करणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनात भरपूर गुण देतात, ९० टक्क्यांहून अधिक असे म्हणतात की फाली इंटर्न्स सामान्य कंपनी इंटर्नपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतात आणि ह्या कंपन्या फालीच्या बहुसंख्य माजी विद्यार्थी इंटर्न्सना नियुक्त करू इच्छितात. फालीचे जवळजवळ सर्व माजी विद्यार्थी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात आणि ६०% पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाच्या शेतीमध्ये सुधारणा करत असताना मुख्यत्वे विज्ञान, अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतात. फालीचा ग्रामीण भारतात गेल्या दहा वर्षांपासून प्रभाव आहे, कृषी आणि कृषी-उद्योग पुढील पिढीसाठी आकर्षक बनवणे, आवश्यक ग्रामीण-शहरी कनेक्शन निर्माण करणे आणि ग्रामीण भारतातील फाली कार्यक्रमात जलद वाढ होण्यासाठी फी च्या माध्यमातून महसूल मिळविणे या उद्देशाने या वर्षी फाली टीमने इंग्रजी माध्यमाच्या तीन प्रमुख शहरी शाळांमध्ये फाली e+ ची चाचणी घेतली आहे.जयपूर येथील जयश्री पेरीवाल इंटरनॅशनल स्कूलमधील फाली e+ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी फाली ९ अधिवेशनात भाग घेतला होता, त्यावेळी असे दिसून आले कि त्यांना शेतीबद्दल आणि ग्रामीण भारतातील लोकांबद्दल फारशी माहिती नाहीये. एका वर्षात १३० दशलक्ष टिश्यू कल्चरच्या रोपांच्या उत्पादनासाठी जैन इरिगेशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ते फालीच्या अधिवेशनामध्ये खूपच जास्त प्रभावित झाले. हे हुशार, अस्सल शहरी विद्यार्थी फाली ९ अधिवेशनातील स्पर्धांमध्ये ग्रामीण फाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्यावसायिक योजना आणि कृषी तंत्रज्ञानातील नवकल्पनांच्या गुणवत्तेने खूप जास्त प्रभावित झाले. यावर्षी फाली e+ मध्ये भाग घेतल्यानंतर वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून अनुभवी कृषी व्यवसायिक आणि कृषी-उद्योजकांतच्या संपर्कात आल्यामुळे तसेच फाली e+ बुकलेटमधून हायड्रोपोनिक्सपासून ते स्ट्रॉबेरी व्हॅल्यू चेन (मूल्य साखळी) ते कृषी उद्योजकतेमधील आर्थिक व्यवस्थापन आणि निधीचा विचारपूर्वक वापर अशा सर्व बाबींमधील अत्याधुनिक नवकल्पनांबद्दल माहिती मिळाल्यामुळे हेच शहरी विद्यार्थी पूर्वीपेक्षा अधिक उत्साही दिसत होते, आणि या वर्षी, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, फाली १० कन्व्हेन्शन मध्ये बिझनेस प्लॅन आणि अॅग्रो टेक इनोव्हेशन स्पर्धांमध्ये, हेच शहरी विद्यार्थी ग्रामीण शालेय स्तरावरील बिझनेस प्लॅन स्पर्धेतील आणि अॅग्रो टेक इनोव्हेशन स्पर्धांमधील विजेत्या उच्च गुणवत्ताधारक ग्रामीण फाली विद्यार्थ्यांसोबत स्पर्धांमध्ये भाग घेतील.
फाली १० मध्ये अकरा अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि वित्तीय संस्थांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा आहे; ज्यामध्ये जैन इरिगेशन, गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट, एचडीएफसी बँक आणि समुन्नती यांचा समावेश आहे. तसेच २०२४ / २५ ह्या आर्थिक वर्षामध्ये एसबीआय आणि अन्य काही कंपन्या फालीला समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहेत. असोसिएशन फॉर फालीचे बोर्ड मेंबर्स (सदस्य) त्यासाठी अधिकचा पाठपुरावा करत आहेत. जैन इरिगेशनचे व्हाईस चेअर सीईओ अनिल जैन म्हणतात, शेतकरी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे व्यवसाय निर्माण करण्यासाठी आम्हाला ग्रामीण आणि शहरी यामध्ये संपर्क साखळी निर्माण करावी लागेल. नादीर गोदरेज म्हणतात की फाली मधील तरुणांना शेती आणि शेती व्यवसाय हे त्यांच्या जीवनाचे कार्य म्हणून करण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले पाहिजे. त्यासाठी आपण फाली माजी विद्यार्थी कार्यक्रम, विशेषत: इंटर्नशिप्स या पुढे ही सुरूच ठेवले पाहिजेत.
यूपीएलचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ म्हणतात की हे युवा नायक भारतीय शेतीतील उत्पादकता सुधारतील आणि हवामान बदलाच्या आव्हानांना योग्य रीतीने सामोरे जातील. नॅन्सी बॅरी म्हणतात की या तरुणांमध्ये धगधगती शक्ती आहे; आपण ती योग्य मार्गाने वापरात ठेवू या. २०१४ पासून फालीचे महाव्यवस्थापक हर्ष नौटियाल यांनी फालीच्या विशेष कामांची माहिती दिली. आम्हाला आमच्या फाली आणि फाली e+ कार्यक्रमांमधील आशयपूर्ण माहितीमध्ये, तसेच ती दूरवर पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा करत राहण्याची गरज आहे आणि भारतीय शेतीमध्ये चांगले परिवर्तन घडवून आणण्यासाठी अधिकाधीक फाली माजी विद्यार्थ्यांची पाठराखण केली पाहिजे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत २०३२ पर्यंत अडीच लाख फाली माजी विद्यार्थी तयार करणे ही एक खूपच लहान संख्या आहे. पण भारतीय शेतीचा कायापालट करणारे नायक म्हणून ही संख्या खूप मोठी आहे.
आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवप्रित्यर्थ भरगच्च कार्यक्रम
भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ
जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन
जळगाव दि. १४ प्रतिनिधी – जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा दिनानिमित्त १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. ‘आगीपासून सुरक्षितता सुनिश्चत करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या’ या संदेशासह वेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आज आग विझविण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्रीशमन जवानांना जैन इरिगेशनच्या अग्रीशमन विभागाच्या सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जैन व्हॅली मध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अग्नीशमन दलाचे सहकारी, वरिष्ट सहकारांसह सुनील गुप्ता, जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, वाय. जे. पाटील यांच्यासह फायर सेफ्टी विभागाचे अधिकारी कैलास सैदांणे, निखिल भोळे, हेमकांत पाटील, जे. जे. पाटील, देवेंद्र पाटील, मनोज पाटील, प्रविण पाटील, महेंद्रसिंग पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या सप्ताहाअंतर्गत कंपनीच्या आस्थापनांमधील प्रत्येक विभागात आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याबाबतच्या वापराबाबत प्रात्यक्षिकांसहीत माहिती सादर करण्यात येत आहे. या प्रशिक्षण उपक्रमाचा सहकाऱ्यांकडून लाभ घेतला जात आहे. ज्वलनशील पदार्थ सुव्यवस्थीत ठिकाणी ठेऊन अपघात होवू नये हिच खरी आपल्यातर्फे शहीदांना श्रद्धांजली ठरू शकते असे मार्गदर्शन करण्यात आले.
अग्रीशमन दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली..
जैन फूडपार्कच्या जैन व्हॅली येथे अग्नीशमन दिवस साजरा झाला. १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्टस्टीकेन मालवाहतूक जहाज, व्हिक्टोरिया डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे स्फोटक पदार्थ वाहून आणणारे जाहजास अचानक आग लागली होती, या जहाजात युद्ध सामुग्री स्फोटक पदार्थ, कापसाच्या गाठी आदी साहित्यमध्ये आग लागली होती. ही आग विझवीताना मुंबई अग्नीशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते, त्यांचा स्मरणार्थ संपूर्ण देशात भारत सरकारच्या आदेशानुसार अग्नीशमन सेवा दिवस व सप्ताह साजरा राबविण्यात येतो. त्यानिमित्त जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये अग्नीशमन दिवस व सप्ताह निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याचे प्रात्यक्षिक माहिती सादर करुन, त्यावेळी आग विझवण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्नीशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
आगम वाचना शिबीराचा समारोप
जळगाव, दि. ७ (प्रतिनिधी) – मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे. मानवी जीवनाला प्रकाशमान करणारे ठाणांग सूत्र आगम वाचना हे पाप प्रवृत्तीपेक्षा धर्मवृत्ती ही श्रेष्ठ असल्याची शिकवण देते आणि धर्माची ताकद वाढविते, असे आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी सांगितले. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे तिन दिवसीय जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा आज समारोप झाला. यावेळी विजय रत्नसुंदरसुरीश्वरीजी महाराज साहेब श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार यांचा हृदय सत्कार गुरूदेवांच्या सान्निध्यात यावेळी करण्यात आला. हा सत्कार जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मय जैन यांनी स्वीकारला. शाल, मोत्याचा हार असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, प्रविण सिसोदिया, स्वरूप लुंकड, दिलीप गांधी, संजय गांधी यांच्यासह कौशीक संघवी, निखील कुसमगंज, प्रमोद भाई, कानजीभाई यांनी हा सत्कार केला. यावेळी सूत्रसंचालन नितीन चोपडा, संजय गांधी यांनी केले.
ठाणांग सूत्रांचा उपयोग कसा करावा, बुद्धीगत की हृदयगत यावर विवेचन करताना आगम वाचना मधील सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मसिद्धात होय. श्रेष्ठ भावना ही मैत्र भावना ठेवावी, श्रेष्ठ व्रत अहिंसा, श्रेष्ठ दृष्टी अनेकांत दृष्टी, श्रेष्ठ भाव उपशम भाव, श्रेष्ठ रस शांत रस याचे हृदयगत आचरण करावे बुद्धीगत नाही. कुठलीही व्यक्ती, वस्तू, परिस्थिती हे आपल्याला दु:खी करत असेल, अपमानित करित असेल तर ती माझी स्वत:ची चुक आहे पुर्वभवामधील पुण्याचा प्रभाव आहे, असेच समजावे. यासाठी धर्मबिंदू आणि धर्मरत्न हे प्रकरण वाचावे असेही महाराज साहेब सांगतात. गुरू शिष्याच्या नात्यांवर भाष्य करताना प्रभू श्रीरामासारखे गुरू शिष्याचे नाते असावे. आपल्या दृष्टीला चांगली वाटणारी गोष्ट आपल्या गुरूंना चांगली वाटेल असे नाही. आगम वाचन हे जीवनातील कोच, गाईड, कॅप्टन प्रमाणे काम करतात. सत्याचा आधार धरून जीवनात परिवर्तन करण्याचे काम हे विचार करतात. यासाठी संपूर्ण वातानुकुलित असलेल्या बसच्या ड्रायव्हरला उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात, त्याच प्रमाणे गुरूंचे कार्यही असते. दिवसभरात सहा वेळा नवकार बोलण्याने सदगती प्राप्त होईल याची गॅरंटी नाही, मात्र नवकार प्रत्यक्ष आचरणात आणल्याने सदगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे विचार परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रेयस कुमट, नरेंद्र सांडेचा, दीपक राखेचा, कमलेश बोरा, राजू कावड, सागर पाटील, अमित कोठारी, किरण जैन निबजिया, निखिल शाह, सुनील शेठ, राहुल कोठारी, महिपाल निबजिया, जीतू गांधी, कुणाल निबजिया, गौरव गांधी, नरेंद्र नानेशा, संजय कासवा, अजय मुणोत, दीपक निबजिया आदिंनी परिश्रम घेतलेत.
ठाणांग सूत्र आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार- प.पू.विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.
जळगाव, दि. ६ (प्रतिनिधी) – ‘ठाणांग सूत्र’ आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार आलेला आहे. आपण वाचन संस्कार जपले पाहिजे, असे आवाहन आचार्यभगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी केले. ‘संपर्क’, ‘सहवास’, ‘सान्निध्य’ आणि ‘संबंध,’ ‘प्रेम’, ‘प्रेरणा,’ आणि ‘प्रोत्साहन’ संकल्पना ‘ठाणांग सूत्र’ आगम वाचना शिबीरात सरस्वती लब्धप्रसाद, विपुल साहित्य सर्जक, पद्मभूषण पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी अत्यंत सोप्या भाषेत श्रावक – श्राविकांना समजावून सांगितल्या. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा दुसरा दिवस होता. या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार आहे. या सहाव्या शिबिरात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यासह विविध प्रांतातील चारशेहून अधिक श्रावक-श्राविकांचा सहभाग आहे.
सकाळ सत्रात संयम बहुल, संवर बहुल आणि समाधी बहुल या विषयावर विवेचन केले. एखाद्या गोष्टीवर अमल करायचाच नसेल तर न करण्याचे हजार बहाणे असतात. हे आपल्याला करायचेच असा पक्का संकल्प असेल तर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करण्याशिवाय राहत नाही. त्यासाठी हरिभद्र सुरीश्वरजी महाराजांची त्रिसुत्री उपस्थितांना सांगितली. उत्तम कार्य करायचे असेल तर ते दीर्घकाळ करावे, निरंतर सातत्याने करावे तिसरी गोष्ट म्हणजे निष्ठेने करावे हा मोलाचा संदेश महाराज साहेबांनी दिला.
दुसऱ्या सत्रात आगम वाचना विशेष असून जे उत्तम विचार आचारणाचे प्रेरणास्थान असल्याचे विवेचन केले. संतानी सांगितलेल्या साधनेच्या मार्गावर चालणे म्हणजे साधक होय. कठिण परिस्थितीतही भूमिका मजबूत असावी ती कमजोर झाली तर पापांवर नियंत्रण मिळविण्याच्या क्रियेला स्पिडब्रेकर लागल्याशिवाय राहत नाही. परमेश्वराला सुखाचा विरोध आहे तर आनंद स्वरूप सुखाची अपेक्षा आहे त्यात स्वाधिन म्हणजे आनंद पराधिन म्हणजे सूख तर आत्मसंचित म्हणजे आनंद स्वरूप होय. अंतर्यामी, अंत:करण, अंर्तमूख होऊन कुठल्याही कार्यात धर्माची आठवण ठेवली पाहिजे. शिक्षणाचा चांगला सदुपयोग केला तरच आपण खरे विद्यार्थी, धनाचा विनयशिलतेने उपयोग केला तर आपण खरे व्यापारी, मुनींनी दिलेल्या धर्मउपदेशानुसार राग, द्वेष, स्वाद, लोभ दूर ठेवून सदाचरणी बना असा संदेश परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी दिला.
‘श्रुत संजीवन’ ह्या जैन आगम आधारीत पुस्तकाचे विमोचन – आचार्य पद्म सुरीश्वर म. सा. यांनी दुर्मिळ जैन ग्रंथ लिपीबध्द केले आहे. गुरुदेव यांच्या शिष्य परिवाराने श्रुतसंजीवन पुस्तकाचे निर्माण केले. या पहिल्या अंकाची निर्मिती धुळे संघाने केलेली आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, संदीप भाई, मनोज भाई (सौदी अरेबिया), श्रेयस कुमट, नितीन चोपडा, अमित कोठारी, केतन भाई यांच्याहस्ते ‘श्रुत संजीवन’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.तसेच या आगम वाचना शिबीराचा समारोप, अंतिम दिवस उद्या दि.७ एप्रिल ला आहे.
जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ
जळगाव दि.५ (प्रतिनिधी) – आगम वाचना मुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी केले. जैन हिल्स येथे आयोजित आगम वाचना शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या औपचारिक उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथे होणारे हे सहावे शिबीर असून यात चारशेहून अधिक श्रावक-श्राविका सहभागी झालेले आहेत.
जळगाव येथील आकाश प्रांगण, जैन हिल्स स्थित ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ सकाळी झाला. सर्वात आधी सेवार्थी चोरडिया-जैन परिवाराच्यावतीने अशोक जैन यांनी ‘ठाणांग सूत्र’ ग्रंथ आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्याकडे सुपुर्त करून अर्पण केला. ते वाचन करण्याची विनंती केली. कार्यक्रम स्थळी या ग्रंथाची स्थापना झाली. भवरलाल आणि कांताबाई जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य सेवादास दलुभाऊ जैन, अशोक जैन, अभंग अजित जैन आणि अजय ललवाणी, स्वरुप लुंकड यांच्याहस्ते मंगलदीप प्रज्ज्वलन करण्यात येऊन याच वेळी आगम पोथीचेही विमोचन करण्यात आले. जैन हिल्स येथील आयोजिलेले हे सहावे आगम वाचना शिबीर आहे. यापूर्वी बडनगर गुजरात (२०१८), शिवपूर, गुजरात (२०१९), इंदूर, मध्यप्रदेश (२०१९), भायखाळा मुंबई महाराष्ट्र (२०२०) आणि आंमली अहमदाबाद-गुजरात (२०२२) असे पाच शिबीरे संपन्न झाले आहेत. जैन हिल्स येथे हे शिबीर आयोजनामागची भूमिका अशोक जैन यांनी आपल्या भाषणातून श्रावक-श्राविकांपुढे मांडली. उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. गायक सुजल शाह यांनी भक्तीगीते सादर केली. कार्यक्रम संपन्नतेसाठी संजय गांधी, देवांग दोशी, किरण जैन, अमित कोठारी आदींनी परिश्रम घेतले.
आगम वाचना प्रवेशात आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी ‘ठाणांग सूत्र’ मध्ये सांगितलेल्या १० सुखांबाबत सांगितले. यातील पहिले सुख हे ‘आरोग्य’ आणि दहावे सुख हे ‘मोक्ष’ सांगण्यात आले आहे. तीन दिवसांच्य वाचनात सकाळी ९ ते १२ आणि तद् नंतर गौराई प्रसादालयात सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रात वाचन आणि त्याचे निरुपण समजावून सांगण्यात येत आहे.
सकाळ सत्रात आचार्य भगवंत म्हणाले की, ‘आरोग्य’, ‘वेळ’, ‘सम्यक दर्शन’ आणि ‘उपसमभाव’ या विषयी सविस्तर विवेचन केले गेले. ‘संपत्ती’ की ‘आरोग्य’ तुम्ही कुणाला प्राधान्य द्याल? ‘ठाणांग सूत्र’मध्ये आरोग्य या सुखाला पहिले स्थान दिले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. कुपथ्य व अतिप्रवृत्ती यामुळे आरोग्य बिघडते. तुमचे वडील जे खात नव्हते ते आजची पुढी खाते. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. वेळेचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. वेळेच्या बाबत प्रमाद आणि आळस करत असतो. निंदा करू नये असे आगम मध्ये सांगितले आहे परंतु निंदा करतो त्याला प्रमाण म्हणतात. मंदिरात जाऊन देवाची स्तुती करावी असे सांगण्यात आले आहे परंतु मंदिरात न जाणे, स्तुती न करणे याला आळस म्हटले जाते. भोजन, मोबाईल, टिव्ही बघण्यात आपला अनमोल वेळ आपण व्यर्थ घालवत असतो. मिळालेला मानवजन्म अनमोल आहे वेळेच्या सदुपयोग करायला हवा असे आवाहन देखील करण्यात आले.
आगम वाचना दुपारच्या सत्रात आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज साहेबांनी क्रोध, इर्षा, कृतघ्नता आणि मिथ्या अभिनिवेश या बाबींवर ‘ठाणांग सूत्र’ आगममध्ये सांगितलेल्या बाबींवर भाष्य केले. अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबीलिटी या दोन शब्दांची सुंदर फोड करून सांगण्यात आली. जिथे अधिकार आला तिथे जबाबदारी येते. जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे सांगून ज्या कुटुंबात प्रभावशाली विचार येत नाहीत ते कुटुंब कधीही प्रभावशाली बनत नाही. बोलणे किंवा खाणे असो रसनेवर नियंत्रण मिळविले तर सर्व बाबींवर नियंत्रण मिळविले असे समजा याविषयी विचारमंथन करून खुद्द आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी उपस्थितांना प्रश्न विचारले ज्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांना पुस्तक भेट दिले गेले. जैन हिल्स येथील निसर्गरम्य स्थळी शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन …
जळगाव दि. 5 एप्रिल (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यावसायिक कलावंताच्या तोडीचे आहेत. सदर प्रदर्शनात विशेषत्वाने उल्लेख करावा अशी एक रचना करण्यात आली ज्यामध्ये इयत्ता ९ चे विद्यार्थी रोहन पोतदार, चिन्मय पाटीदार आणि दिव्यांश बेद यांनी पॉटरी माध्यमातून साकारलेली ‘नो ट्री – नो बर्डस्’ (जिथे आधार संपतो, तिथे श्वासही थांबतो) ही इंस्टॉलेशन रचना विशेष उल्लेखनीय आहे. माती कामातून तयार केलेल्या पक्ष्यांना एका मृत झाडाच्या खोडाजवळ त्यात मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेनुसार आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तथाकथित विकास वाटेवरून चालत असताना माणसाने सिमेंटची जंगले तयार करत निसर्गाची आतोनात हानी केली आहे. सदर मांडणी शिल्पामध्ये मृत झालेल्या झाडाजवळ पडलेले मृत पक्षी म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आपण सर्व म्हणजेच मानवजात असा व्यापक संदेश देणारी ही कलाकृती संपूर्ण प्रदर्शनामध्ये लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांच्या निरागस भावविश्वातून प्रकट झालेली ही रचना प्रबोधनात्मक संदेश देत विचार करायला भाग पाडणारी आहे.
कॅनवास तसेच कागदावरील चित्रकला, पेस्टल रंग, स्टेन ग्लास, चारकोल-पेन्सिल अशा विविध माध्यमातून निसर्ग, शाळा, व्यक्तिचित्र, मांडणीचित्र, परिसर, संस्कृती, कल्पनाविलास यासह पर्यावरण हे सर्व काही या प्रदर्शनात सर्वांगसुंदर, सुबक पद्धतीने शाळेच्या निर्सगरम्य परिसरात मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूलच्या कला विभागातील शिक्षकांकडून, व्यवस्थापनाकडून सातत्याने मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती वर्षभर होत असते.
विविध कलांचा अभ्यास करून निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे आर्ट अॅण्ड क्राफ्ट विभाग परिसरात दि. १ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे संचालक अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, डॉ. भावना अतुल जैन, प्राचार्य देबासिस दास, कला शिक्षक प्रीतम दास, प्रितोम खारा, अनुभुती स्कूलचे शिक्षक तसेच पालक वृंद व रसिक विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या ‘भाव चित्र विश्वात’ जावून त्यांच्या विविध कलांचा ’आनंद शोध’ घेत होते. अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती या प्रदर्शनात आहेत.