जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

मुंबई, जळगाव दि. ३१ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा (EBITDA-इबीडा) १८०.८ कोटी रुपयांवर पोहोचला.

“यापूर्वी सांगितल्याप्रमाणे Q1FY25 चा महसूल कमी अपेक्षीत होता आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम दिसला. मुख्यतः जल जीवन मिशनच्या संस्थात्मक व्यवसायामुळे देशांतर्गत विक्री कमी झाल्यामुळे एकत्रित महसूल (उत्पन्न) सुमारे १३ टक्क्यांनी घटला. धोरणात्मक निर्णयाने ठरल्याप्रमाणे आम्ही प्रकल्प व्यवसाय कमी करत आहोत.

ऐतिहासिकदृष्ट्या, पावसाच्या काळात सूक्ष्म सिंचनासाठी व्यवसाय मंदावलेला असतो. तथापि, चांगला मान्सून आणि अलीकडील अर्थसंकल्पात कृषी, सिंचन क्षेत्र, मायक्रो, स्मॉल व मीडियम एन्टरप्रायजेस आणि कृषी-संबंधित व्यवसायांना मदत/अर्थसहाय्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मागणीचे पुनरुज्जीवन होऊन मंदावलेली मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्हाला आमच्या सर्व कार्यक्षेत्रांतील व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसाय संधींची आशा आहे. या पार्श्वभूमिवर कंपनी शाश्वत वाढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे,” असे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

योगासना स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर मॅडेल

जळगाव दि. २९ प्रतिनिधी –  जळगाव जिल्हा योगासना स्पोर्टस असोसिएशन व सोहम डीपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय योगासना स्पोर्टस चॅम्पीयनशीप २०२४-२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सब ज्युनिअयर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली, सिनिअर मुले व मुली अशा चार गटात ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ट्रॅडिशनल योगा, आर्टीस्टिक सिंगल व पेयर, रिदिमिक पेयर अशा ४ प्रकारात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयअम प्रायमरी व सेकंडरी स्कुल मधील सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

ट्रॅडिशनल योगासन या प्रकारात पाच आसने कंपलसरी व दोन आसने ऑप्शनल घ्यावी लागतात. कंपलसरी आसन प्रत्येक आसनात ४५ सेकंद स्थिरता ठेवावी लागते आणि ऑप्शनल आसणे १५ सेकंद स्थिर ठेवावे लागते. या योगा प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचा इयत्ता ६ वीतील विद्यार्थी विवेक अमोल सूर्यवंशी याने सिल्वर मॅडेल प्राप्त केले.  पारितोषिक समारंभात विजेत्यांना मु. जे. महाविद्यालयाचे  जिमखाना विभाग प्रमुख चेतन महाजन, नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर गौरव जोशी, सोहम योग व नॅचरोपॅथीचे संचालक देवानंद सोनार यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

दरम्यान या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जळगाव जिल्हा योगासना स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मोहगावकर  व मु. जे. महाविद्यालयाचे बेलोरकर उपस्थित होते. जळगाव जिल्हा योगासन स्पोटर्स असोशिएशनचे सचिव पंकज खाजबागे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. विवेक सूर्यवंशीच्या या यशामुळे संगमनेर येथे होणाऱ्या ५व्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास योग प्रशिक्षक स्मिता बुरकुल यांचे मार्गदर्शन लाभले. त्याला पुढील यशासाठी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, क्रीडा प्रशिक्षक श्वेता कोळी, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् च्या निकीता पवार व लोकेश महाजन यांना रौप्य

जळगाव दि.२९ प्रतिनिधी :– तायक्वांडो असोसिएशन बिड व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ते २७ दरम्यान बिड येथे ३४ व्या कनिष्ठ (ज्युनियर) मुलं व मुली यांच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्जवलन करून करण्यात आले. यावेळी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश करा, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण बोरसे हे उपस्थित होते.

या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता.  मुलींच्या ५२ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कु. निकीता दिलीप पवार हिने रौप्य पदक प्राप्त केले. रावेर तालुका असोसिएशनचा लोकेश महाजन यानेसुद्धा रौप्यपदक पटकावले त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर जळगाव, तसेच जयेश कासार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

रेल्वे PSU या दिवशी बोनस आणि लाभांश जाहीर करेल, स्टॉकवर लक्ष ठेवा

रेल्वे PSU RITES Ltd पुढील आठवड्यात आपल्या भागधारकांना दुहेरी भेट देऊ शकते. एक्सचेंज फाइलिंगनुसार, रेल्वे PSU RITES पुढील आठवड्यात बोनस इश्यू आणि अंतरिम लाभांश जाहीर करू शकते. एका वर्षात स्टॉक 34 टक्क्यांनी वाढला आहे.

 

RITES: 31 जुलै रोजी मंडळाची बैठक

RITES लिमिटेडने एक्सचेंजेसना कळवले आहे की बोनस शेअर्सच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी ते बुधवारी (31 जुलै) बोर्ड बैठक घेणार आहेत. कंपनीने यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये बोनस शेअर्सची घोषणा केली होती. याशिवाय कंपनी आपले तिमाही निकाल जाहीर करेल. ते आर्थिक वर्ष 2025 पूर्वी अंतरिम लाभांशाचाही विचार करेल आणि मंजूर झाल्यानंतर हे शेअर्स शेअरधारकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय जारी केले जातील आणि म्हणून त्यांना फ्री शेअर्स असेही म्हणतात. जे गुंतवणूकदार मुदतीपूर्वी शेअर्स खरेदी करतात तेच बोनस शेअर्ससाठी पात्र असतील. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक्स-डेटला किंवा नंतर शेअर्स खरेदी केले तर तो बोनस शेअर्स मिळवण्यास पात्र असणारsha नाही.

 

RITES: समभाग 2 आठवड्यात 14% घसरले

२६ जुलै रोजी रेल्वे पीएसयूचे शेअर्स १.२५ टक्क्यांच्या घसरणीसह ६६७ रुपयांवर बंद झाले. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 826.15 आणि निम्न 432.65 आहे. गेल्या 2 आठवड्यात स्टॉक 14 टक्क्यांनी घसरला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 33 टक्के आणि गेल्या एका वर्षात 34 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षांत स्टॉक 160 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी  विजेता

जळगाव दि.२८ प्रतिनिधी-  महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या प्रायोजकत्वातून केले होते. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे ही स्पर्धा संपन्न झाली. स्विस लिग पध्दतीने एकुण आठ डावात खेळवली गेलेल्या या स्पर्धेत  पुण्याचा श्लोक शरणार्थी अव्वल ठरला त्याला प्रथम क्रमांकाचे १५००० हजाराचे रोख पारितोषिक व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले गेले. खान्देश सेंट्रल येथे झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. राहुल महाजन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, सहसचिव अंकूश रक्ताडे, जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे,मुख्य पंच गौरव रे मुंबई, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे उपस्थित होते.
स्पर्धेत अर्थव  सोनी ठाणे याला द्वितीय क्रमांकासाठी रोख रूपये १३,००० व चषक, तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या प्रथमेश शेरला पुणे याला रूपये १०,००० व चषक, तर सौरभ महामने पुणे याला ९००० रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर दहा क्रमांकापर्यंत  एकूण ७२,००० हजाराची रोख पारितोषीके देण्यात आली.यात अनुक्रमे ओम नागनाथ लमकाने पुणे योहन बोरीचा मुंबई, ईश्वरी जगदाळे सांगली, राम विशाल परब मुंबई, साई शर्मा नागपूर, अजय परदेशी जळगाव यांचा समावेश होता. यानंतर उत्तेजनार्थ म्हणून अनुक्रमे ७,९,११,१३,१५, वयोगटाखालील सहभागी खेळाडूंना उत्तेजनार्थ पहिल्या तीन खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये ७ वर्ष वयोगटाखालील गटात शिरीष इंगोले बुलढाणा, कबिर श्रीकांत दळवी जळगाव ,शाश्वत शिवाजी देशमुख बुलढाणा, सुंदरसिंग गेहर कौर बुलढाणा यांचा समावेश होता. ९ वर्ष वयोगटाखालील अद्वित अमित अग्रवाल,युवेन गौरव जेव्हरी, आरुष सागर शिंदे, ११ वयोगटाखालील अविरत चव्हाण, आदित्य जोशी,समवेद पासबोला, 13 वर्ष वयोगटाखाली गटात निमे बन्साली, आदित्य चव्हाण, शाश्वत गुप्ता, तर 15 वर्ष वयोगटाखालील गटात हर्ष घाडगे, मानस गायकवाड, मयांग संतोष हेडा यांना विशेष उत्तेजनार्थ चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या चार विजयी खेळाडूंचा ऑगस्ट गुडगाव हरियाणा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली आहे.
डाॅ. राहुल महाजन, गौरव रे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या गौरव रे, अभिषेक जाधव, आकाश धनगर, नथ्यू सोमवंशी, प्रविण ठाकरे यांचा ही विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष  अतुल जैन आणि सचिव नंदलाल गादिया यांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे पदाधिकारी, जैन स्पोर्टस अकॅडमीचे सर्व सहकारी आणि जैन इरिगेशन मधील सहकारी यांनी सहकार्य केले.
सुत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले. आभार फारुक शेख यांनी मानले.

बॅडमिंटन तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

जळगाव दि. २८ प्रतिनिधी – जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते.  मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी प्रशांत कोल्हे  यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मनीषा भिडे व रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मंजुषा देशमुख उपस्थित होते.

अनुभूती निवासी स्कूलने “जळगाव तालुका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत २०२४-२५” मध्ये चार विजेतेपदे जिंकली. स्पर्धेत, १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात तसेच १९ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त, १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या श्रेणींमध्ये चौथे स्थान अनुभूती स्कूलने पटकावले.

तालुकास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघाची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांना मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया, सह प्रशिक्षक दीपिका ठाकूर, तसेच क्रीडा शिक्षक शशिकांत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. विजयी झालेल्या संघ व निवड झालेल्या खेळाडूंचे अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास , व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यशस्वीतेसाठी मुख्य पंच किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जाझीब शेख, पुनम ठाकूर, ईशांत साळी, हमजा खान, अक्षद पगारीया, मेहर लाडके, ओम अमृतकर, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, आरोही परांजपे, चिन्मय पाटीदार, मशरुफ शेख, अर्ष शेख यांनी सहकार्य केले.

अंतिम निकाल असा

१७ वर्षांखालील मुले –  अनुभूती स्कूल  वि. वि.  रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल  स्कोअर :- (२-१)

१७ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल  वि. वि. किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल स्कोअर : – (२-१)

१९ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल  वि. वि.  जी एच रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय स्कोअर :- (२-०)

१९ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी पब्लिक स्कूल  स्कोअर :- (२-०)

राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अहमदनगरचा हर्ष घाडगे आघाडीवर

जळगाव:– (क्रीडा प्रतनिधी) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश सेंट्रल येथे आयोजित पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स यांचे  प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी  सकाळच्या  सत्रात दुसऱ्या दिवशी आघाडीवर असलेल्या पुण्याचा प्रथमेश शेरला व नंदुरबारचा जितेंद्र पाटील यांच्यात इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या डावाच्या अंतिम पर्वात ४२ चालीत प्रथमेश याने सहज विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या पटावर मात्र ठाण्याचा अथर्वसोनी व पुण्याचा श्लोक शरणार्थी यांचा पर्क डिफेन्स झाले ला डाव ३५ व्या चाली अखेर  बरोबरीत सुटला.
तिसऱ्या पटावर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक मानांकन असलेल्या मुंबईच्या राम विशाल परब यास बरोबरीत रोखले. चौथ्या पटावर मात्र पुण्याच्या ओम लमकाने याने आघाडीवर असलेल्या कोल्हापूरच्या आदित्य सावळकर यास रॉयल लो लोपेझ  पद्धतीने झालेल्या डावात बरोबरीत रोखले.
स्पर्धेच्या आजच्या सहाव्या फेरीत पुण्याच्या श्लोक शरणार्थी याने फ्रेंच किंग्स इंडियन डिफेन्स ने झालेल्या डावात  पुण्याच्याच प्रथमेश शेरला चा ३५चालीत पराभव केला. दुसऱ्या पटावर राम विशाल परब व अथर्व सोनी यांचा डाव ५५ व्या चाली अखेर फ्रेंच डिफेन्सने बरोबरीत सुटला तिसऱ्या पटावर सहाव्या फेरीत अहमदनगरच्या हॉर्स गाडगे यांनी कोल्हापूरच्या आदित्य सावळकर याचा कारोकान पद्धतीने झालेल्या डावात ३५ चालीत पराभव केला पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने अधिक मानांकन असलेल्या पुण्याच्या सौरभ महामुनी यास बरोबरीत रोखत आश्चर्याचा धक्का दिला.
आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सह सचिव अंकुश रक्ताडे यांनी आपली उपस्थिती दिली. स्पर्धेची  सातवी फेरी सकाळी साडेआठ वाजता तर अंतिम फेरी दुपारी दीड वाजता सुरुवात होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण आज संध्याकाळी सहा वाजता स्पर्धेची आठवी व अंतिम फेरी संपल्यावर लगेचच खानदेश सेंट्रल येथे होणार आहे पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड गुडगाव (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे,प्रवीण ठाकरे,अभिजीत जाधव नत्थु सोमवंशी, आकाश धनगर, अरविंद देशपांडे अभिषेक जाधव यांनी काम बघितले आहे.

रवंजे येथे जि.प मराठी शाळेत वृक्षारोपण व संवर्धन उत्साहात

जळगाव दि. २७ प्रतिनिधी –  गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रवंजे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन पुरस्कृत शिक्षण सप्ताह व वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला. जिल्हा परिषद मराठी शाळा व गौरीशंकर माध्यमिक विद्यालय येथे विविध प्रकारची 150 झाडे विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त वन अधीकारी तथा सल्लागार वन वन्यजीव व पर्यावरण  विभाग जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेड  राजेंद्र राणे होते. सोबत बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव आधार माळी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका केंद्रप्रमुख श्रीमती मनीषा सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावात इको क्लबची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात श्रीमती सोनवणे मॅडम केंद्रप्रमुख आणि राजेंद्रा राणे  यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, आणि वृक्ष संवर्धनाची गरज याबद्दल त्यांनी महत्वपूर्ण प्रतिपादन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने “एक मूल, एक झाड” आणि “एक पेड माँ के नाम” या शासनाच्या धोरणानुसार वृक्ष संवर्धन करावे व ग्रामस्थांनी त्यांच्या शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधीकारी प्रशांत सूर्यवंशी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते मुकेश भालेराव, पंकज चौधरी, प्रदीप देशमुख, आणि संदीप तायडे यांनी परिश्रम घेतले.

राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा अजय परदेशी आघाडीवर

जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या तिसऱ्या फेरीत धक्कादायक निकालांची नोंद करण्यात आली त्यात पहिल्या बोर्डवर स्पर्धेचा प्रथम मानांकित खेळाडू सोलापूरचा मानस गायकवाड फिडे मानांकन (२०४४ )यास मुंबईच्या ओम  गाडा (१७७३) याने किंग्स इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात ४८ चालीत पराभव केला.
दुसऱ्या पटावर पुण्याचा द्वितीयमानांकित प्रथमेश शेरला (१९७८)याने इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या चुरशीच्या सामन्यात  कोल्हापूरच्या रवींद्र निकम यांचा १२२ पराभव केला. तिसऱ्या पटावर श्लोक शरणार्थी याने इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात पुण्याच्या किरण पंडितराव यांचा २९  चालीत  पराभव केला चौथ्या पटावर पुण्याचा ओम नमकाने व मुंबईचा सौमिल  गोगटे यांचा निमजोवीच पद्धतीने झालेल्या डाव छत्तीसव्या चाली अखेर बरोबरीत सुटला.
स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पुण्याच्या प्रथमेश शिरला याने पुण्याच्या आदित्य जोशीचा पराभव केला तर दुसऱ्या पटावर पुण्याच्या श्लोक शरणार्थी आणि अहमदनगरच्या आशिष चौधरीचा पराभव केला तर तिसऱ्या पटावर राम विशाल परब मुंबई याने नंदुरबारच्या जितेंद्र पाटील यांचा पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या पुण्याचा  अविरत चव्हाण (१८८९)याचा पराभव केला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश मॉल येथे आयोजित
एच टू इ पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या
राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत एकूण  १६३ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवलेला असून ८० च्या वर फिडे मानांकित खेळाडू  विविध जिल्ह्यातून सहभागी झालेले आहेत. स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे प्रवीण ठाकरे अभिजीत वैष्णव आकाश धनगर अरविंद देशपांडे अभिषेक जाधव हे काम बघत आहे स्पर्धेची पाचवी फेरी सकाळी नऊ तीस वाजता होईल

इनर व्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासह नेत्रतपासणी

जळगाव दि.२५ प्रतिनिधी –  इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जिल्हापेठमधील सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच नेत्रतपासणी करुन विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली.

इनर व्हील क्लब जळगावतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत १४० वह्या व १२० रजिस्टर वाटप करण्यात आले. हा उपक्रम सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल जिल्हापेठ येथे राबविण्यात आला. ह्या उपक्रमाला नगरसेवक अमर जैन यांचे सहकार्य लाभले. ह्या वह्यांसह शैक्षणिक साहित्याचा जवळपास ५५ विद्यार्थ्यांना लाभ झाला.

डॉ. शीतल अग्रवाल यांनी २४० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली. डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबतही संवाद साधला. शिवाय मुलांनी व्यक्तिगत स्वच्छता करुन आरोग्य चांगले कसे ठेवता येईल यावर देखील त्यांनी संवाद साधला.

हया प्रसंगी क्लब अध्यक्षा सौ उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, साधना गांधी, संध्या महाजन, शैला कोचर, डॉ. मयुरी पवार, रितु कोगटा, आबेदा काझी, कंचन कांकरिया, तनुजा मोरे आदी सदस्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे यांनी आभार मानले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version