महत्त्वाचे; म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या कमाईवर कसा आणि किती कर भरावा लागतो ?

ट्रेडिंग बझ – म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर भरावा लागतो. तुम्ही फंडातून किती आणि किती पैसे काढले यावर कर दायित्व अवलंबून असते. हा भांडवली नफा कर आहे म्हणून, गुंतवणूक करण्यापूर्वी आणि युनिट्सची पूर्तता करण्यापूर्वी, एखाद्याने कर दायित्वाबद्दल देखील जाणून घेतले पाहिजे. अर्थसंकल्प (बजेट 2023) येणार आहे. अर्थसंकल्पात भांडवली नफा करात काही प्रमाणात सवलत मिळू शकेल, अशी आशा सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि उद्योगांना आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कराच्या कक्षेत येतो. गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) द्यावे लागतात. म्युच्युअल फंड (डिव्हिडेंट) लाभांशाच्या बाबतीतही लाभांश वितरण कर (DDT) लागू होतो आणि TDS (Tax Deduction at Source) फंडानुसार कापला जातो.

म्युच्युअल फंडावर STCG, LTCG :-
बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के. निगम म्हणतात, म्युच्युअल फंडातील कर दायित्व तुम्ही कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली आहे जसे की इक्विटी, कर्ज, सोने आणि विक्री करण्यापूर्वी किती काळासाठी. जर तुम्ही इक्विटी फंडामध्ये अल्प मुदतीसाठी म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 15% दराने कर भरावा लागेल. कॉर्पोरेशन म्हणते, जर तुम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त म्हणजे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल आणि तुमचा 1 लाख रुपयांपेक्षा कमी भांडवली नफा असेल, तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, जर तुमचा भांडवली नफा रु 1 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचे कर दायित्व 10% असेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही डेट फंड किंवा इतर फंडांमध्ये अल्प मुदतीसाठी म्हणजेच 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागेल.

इंडेक्सेशन बेनिफिटवर देखील कर :-
AK निगम म्हणतात, जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी म्हणजेच 3 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% दराने कर भरावा लागेल. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभ उपलब्ध आहे. याचा अर्थ, गुंतवणुकीच्या कालावधीत तुमच्या गुंतवणुकीसोबत चलनवाढ समायोजित केली जाते. यामुळे, तुमचा निव्वळ भांडवली नफा कमी होतो आणि तुम्हाला कमी झालेल्या रकमेवर कर भरावा लागतो. याचा अर्थ आता चलनवाढीचा दर जास्त असेल तर इंडेक्सेशनचा फायदाही जास्त होईल आणि निव्वळ भांडवली नफा कमी होईल.

DDT चे दायित्व देखील :-
तज्ञांचे म्हणणे आहे की, म्युच्युअल फंड योजनांवर गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या लाभांशावर (डिव्हिडंड) करदायित्वही असते. अर्थसंकल्प 2020 मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार, लाभांशातून मिळणारे उत्पन्न गुंतवणूकदारांच्या करपात्र उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जाते आणि त्याच्या कर स्लॅबनुसार कर आकारला जातो. यापूर्वी गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश करमुक्त होता

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

जळगाव दि. 8 – आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सव जैन हिल्स येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. यावेळी पारंपारिक वेशभूषेत श्रावक-श्राविकांच्या मधुर भक्तिगीतांसह पूज्य आचार्य जयमलजी म. सा. यांच्या नामाचा जयजयकार करण्यात आला. प्रवचन, मंगलाचरण, स्वागतगीत, भक्तिसंगीत, महामांगलिकने आचार्य जयमलजी म.सा. यांचे स्मरण करत गुरूगायनाने भव्यातिभव्य तिनदिवसीय जन्मोत्सवाचा समारोप झाला.

एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवाप्रसंगी जळगाव संघपती दलिचंदजी जैन, अ.भा. श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अशोक जैन, नयनताराजी बाफना, कस्तूरचंदजी बाफना, शंकरलालजी कांकरिया, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, अजित जैन, अजय ललवाणी, नवरतन बोखाडीया, गौतमचंद कोठारी, जळगावनगरीच्या महापौर जयश्री महाजन, सुशिल बाफना, कांतीलाल कोठारी, सुरेंद्र लुंकड, विजय चोरडिया, विजयराज कोटेचा, अजय राखेचा यांच्यासह जळगाव, धुळे, नंदूरबार, चेन्नई, सिकंदराबाद, मारवाड रायचूर, गुवाहटी, नागोर, जोधपूर, अमरावती, बडनेरा, बोलाराम, म्हैसूर, बेंगलुरू, इरोड, इलकल, इंदौर, सुरत, अहमदाबाद, मारवाड पाली, ब्यावर, सेलम, तिरूतन्नी, गंगावती, तिरूवल्लूर सह संपूर्ण भारतभरातील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन, अंहिसा रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाप्रसंगी जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प. पू. श्री पार्श्वचंद्रजी म. सा, एस. एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्रजी म. सा, विद्याभिलाषि जयेंद्रमुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखरमुनिजी म.सा., मौनसाधक श्री. जयधुरंधरमुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलशमुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा ठाणा 7 यांच्यासह समणी प्रमुखा श्री. निधीजीसह ठाणा 6 हे विराजमान होते. त्यांचा उपस्थीतीत पूज्य श्री. जयमलजी म.सा. यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मुख्य प्रवचनामध्ये तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म. सा. यांनी भगवान महावीर यांच्या मार्गावर चालण्यासाठी वीर कुणाला म्हणावे हे सांगितले. कोणतेही कठिणातील कठिण कार्य सहज सोपे करण्यासाठी विरता महत्त्वाची आहे. संकल्प महत्वाचा असून घेतलेल्या संकल्पावर कृतिशीलपणे आचरण करणे तसे जगणे महत्त्वाचे आहे यासाठी आचार्य पूज्य श्री.जयमलजी म.सा. याचे जीवनकार्य अभ्यासणे त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात संस्कारित करणे म्हणजे आचार्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गस्थ होणे होय. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी अनेक यशाची मंत्रे शिकविणारी पुस्तके, व्याख्याने आहे. ती अभ्यासणेही महत्वाचे आहे, मात्र आपल्या आचार्यांच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले तर त्यांनी संघर्ष काळातही समयसूचकतेने घेतलेले निर्णय, त्यावर ठामपणे जगणे हे प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे. हीच प्रेरणा घेऊन संकल्पमय जीवनाचा मार्ग अवलंबने, आदर्श विचार करून जगणे हीच पूज्य आचार्यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे स्मरण करणे होय.

जैन समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी यांनी शासक आणि प्रजा यांचा आचरण व्यवहार भाष्य केले. शासक जसे आचरण करेल तसे आचरण प्रजेमध्ये दिसते यासाठी आचार्यांनी अनेक शासक राज्यांना आपल्या प्रभूवाणीने हिंसा, व्यसनांपासून परावृत्त केले. धर्माला श्रद्धेने जोडले तर बौध्दिक विकास करता येतो तो आचार्यांच्या संस्कारात दिसतो. हा विचार करून प्रत्येकाने विशेषत: युवापिढीने नैराश्यातून आत्महत्येसह सर्वप्रकाराच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. हाच साधूवाद आचार्यांच्या जन्मोत्सवानिमित्त असल्याचे डॉ. सुयश निधीजी यांनी सांगितले.

जैन समणी श्रुत निधीजी यांनी आचार्यांच्या जन्मोत्सवाच्या तारिख आठ असल्याने आचार्यांना सांगितलेल्या आठ चमत्कारिक मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने मनातील वैराग्य भावना जागृत होते यातूनच संयमी होता येते संयमी होऊन मार्गस्थ होणे थोडे कठिण मात्र आचार्यांचा साधुवाद सोबत असल्याने त्यावर सहज चालता येते.

यावेळी जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यप्रवर प.पु. श्री पार्श्वचंद्र जी म.सा द्वारा महाप्रभावी महा मांगलीकसुद्धा देत आशिर्वाद दिला. यानंतर सामूहिक तेले तप प्रत्याख्यानासह गौतम प्रसादी लाभ हजारो श्रावक-श्राविकांनी घेतला. आचार्यश्री यांचा पुढील चार्तुमासाची विनंती रायचूर, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरू, येथील श्रावक-श्राविकांनी केली आहे.

श्री. रेवतमलजी नाहर यांनी मनोगतामध्ये संयम, साधना आणि आस्था यांचा संगम जैन हिल्सवर आचार्यांच्या जन्मोत्सवाच्या आयोजनात दिसत असल्याचे कौतूक केले. ऑल इंडिया जे. पी.पी. जैन महिला फाऊंडेनच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता कांकरिया यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संघपती दलिचंद ओसवाल यांनी केले. आभार स्वरूपकुमार लुंकड यांनी मानले. सूत्रसंचालन चंदन भंडारी, जोधपूर यांनी केले. सदाग्यान भक्तिमंडल आणि जे. पी. पी. संगीत मंडल यांनी भक्तिगीते सादर केली. यशस्वीतेसाठी जळगाव जैन समाजातील विविध मंडळांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

दानविरांचा सन्मान

आचार्य पूज्य श्री. जयमलजी म.सा. जन्मोत्सवाचे यशस्वी आयोजन, व्यवस्था केल्याबद्दल संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अजित जैन, सौ. निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन व संपूर्ण चोरडिया परिवाराचा जय जापकलश, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. चोरडीया परिवाराचे मानपत्र पूष्पा भंडारी यांनी वाचले. शंकरलालजी कांकरिया व परिवाराला प्रदान केलेल्या मानपत्राचे वाचन अपुर्वा राका यांनी केले. अजय ललवाणी व परिवाराला प्रदान करण्यात आलेले मानपत्राचे वाचन अनिल कोठारी यांनी केले. राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहर यांचा सत्कार ईश्वरबाबुजी ललवाणी यांनी केला. जे. पी. पी. अंहिसा पुरस्काराने ममता कांकरिया यांचा सन्मान करण्यात आला.

अभिनव शाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपतीची आरती

रेहान अलीकडून शाळेला विठ्ठल-रूक्मिणीची पाषाणातील प्रतिमा भेट

“भारतात अनेक जाती-धर्म आहेत. पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा हा भारतीयत्वाचा आहे. मुस्लिम विद्यार्थी आयान याने उत्सवासाठी गणेशाची मूर्ती देऊन तोच धागा बळकट केला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केले.

अभिनव विद्यालयात आयान खान या विद्यार्थ्याने दिलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाची आरती आज श्री. राऊत यांच्या हस्ते झाली. आज शिक्षकदिनानिमित्ताने शिक्षक दिनानिमित्त रेहान अली रजाक अली सय्यद याच्या पालकांनी शाळेस दगडी पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली .

श्री. राऊत यांनी आयान खान पठाण व रेहान अली रजा अली सय्यद यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक संतोष सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष श्याम भाऊ कोगटा उपाध्यक्ष संजय बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोद बियाणी, मुख्याध्यापक हेमंत पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

मुस्लिम समाजात अल्लाहचे रूप निरंकारी आहे. त्यामुळे मूर्ती हा प्रकार निषिद्ध आहे. हिंदू धर्मात प्रत्येक देवादिकाची मूर्ती आहे. अगदी दोन टोकांच्या या धर्म पद्धतीला संवेदनशीलतेचा आनंद देणारी वेगळी बातमी समोर आली. शाळेचे मूळ माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेची अभिनव माध्यमिक शाळा आहे. धर्माची भिंत श्रद्धा आणि लोकसहभागात आडवी येत नाही अशा सहिष्णु वृत्तीचा आदर्श नववीतील अवघ्या १५ वर्षांच्या आयन मझहर खान पठाण या विद्यार्थ्याने घालून दिला. पोलिसांच्या शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा गणेश मंडळात जाऊन सद्भावना आरती करायला हवी.

मनाला प्रसन्न करणारी ही बातमी सुरू होते अभिनव शाळेतून. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे शाळेतील सण-उत्सव बंदच होते. त्यामुळे मुले-मुली कलागुण दर्शनापासून लांब होते. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच निर्बंध हटविले आणि गणेशोत्सवाला दुपटीने उत्साहाचे भरते आले. यावर्षीही शाळेत गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. पूर्वी शाळेतील शिक्षक आणि मुले-मुली वर्गणी करून उत्सव साजरा करीत. यावर्षी मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी वर्गणी न घेता शिक्षक-पालक-विद्यार्थी सहभागातून उत्सव साजरा करायचे ठरविले. अगदी मूर्तीपासून तर पूजेचे व सजावट साहित्य ज्याला जमेल त्यांनी द्यावे असे ठरले.

इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका सौ. निता पाटील यांनी वर्गातील मुला-मुलींना उत्सवाची संकल्पना सांगितली. गणेशाची मूर्ती कोण देणार असे विचारले. त्यावर आयान खान पठाण म्हणाला, ‘मैम मी मूर्ती देतो !’ सौ. पाटील यांनीही होकार दिला. हिंदुंच्या सर्वाधिक उत्साह व जल्लोषाच्या उत्सवाला गणेशाची मूर्ती मुस्लिम विद्यार्थी देत होता. संवेदनशीलता येथेच आहे. पण ती येथे संपत नाही.

आयानने वडील मझहर खान पठाण व अम्मीला शाळेतील संकल्पना सांगितली. आयानने गणेशाची मूर्ती द्यायचा शब्द दिला आहे, तो मान्य करून ते सुद्धा मूर्ती द्यायला तयार झाले. धर्मसंस्काराचा कोणताही कडवट संस्कार पठाण कुटुंबाला आडवा आला नाही. विषयाची संवेदनशीलता अजून पुढे आहे.

शाळेत गणेशाची मूर्ती द्यायची तर ती आणावी लागेल. मझहर खान यांचे नातेवाईक (काका सासरे) अयुबखान ताजखान पठाण हे जळगाव येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार चंदुलाल रसवंतीवाले यांच्याकडे गेली २०/२२ वर्षे वेगवेगळ्या देवादिकांच्या मूर्तीचे आणि त्यावर रंगकाम करीत आहेत. आयान खानला गणेशाची मूर्ती हवी हे कळल्यानंतर त्यांनी गणेशाची आकर्षक मूर्ती तयार करून दिली. कलाकाराच्या समोरही कोणत्याही भिंती नसतात हे सिद्ध झाले. आज आयान खान याने शाळेत गणेशाची मूर्ती आणली. त्याच मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. गणेशाच्या मिरवणुकीत शाळेतील मुलींचे लेझिम पथक होते. अभिनव विद्यालयातील अनेक उपक्रम जळगावकरांचे लक्ष वेधून घेतात.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

जळगाव दि.29 प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय अन्नधान्य साठवणूक विभागातर्फे व गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास 200 च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा उपस्थितीत सर्वांनी घेतली.
जैवविविधता जपता यावी यासाठी हरित शहर ही संकल्पना घेऊन गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सहकार्यातून वृक्षसंवर्धनाचा एक सृजनशील उपक्रम सूरू केला आहे. यात ठिकठिकाणी झाडे लावून त्याचे संवर्धनाची जबाबदारी लोकसहभागातून जळगावकर घेत आहे. वृक्षारोपणाचा उपक्रमात महाराष्ट्र राज्य वखार महामंडाळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभागाचे साठा अधिक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) के. एन. पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. राज्य वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, शालीग्राम राणे, देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, मराठी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाणी, शासकीय अन्नधान्य साठवणूक विभागाचे ज्यूनिअर साठा अधिक्षक एम. आर. ढाके, भांडारपाल ए. आर. मेढे, अव्वल महसुल कारकून अयाज शेख उपस्थित होते.
यावेळी सुधीर पाटील यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमाविषयी सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षलागवडीसह संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी विजयकुमार वाणी यांनी आपल्या जीवनात झाडांना खूप महत्त्व असून ऑक्सिजन देणारे झाडे किती मौल्यवान असतात हे सांगत ती जोपासली गेली पाहिजे असे आवाहन केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनसह जैन इरिगेशनतर्फे झाडे लावण्यासाठी सहकार्य केले जाईल असे अनिल जोशी म्हणाले. यशस्वीतेसाठी शासकीय अन्नधान्य विभागातील निलेश पाटील, योगेश पाटील, धनराज बाविस्कर, विकास चौधरी, आकाश चौधरी, सतिष पाटील, पवन चौधरी यांनी सहकार्य केले.

यशवंतनगरमधील श्री. गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव दि. 27 –रामानंदनगर स्टाॕपजवळील यशवंतनगरमधील श्री. गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी नुकतीच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सागर गलु चौधरी, उपाध्यक्षपदी ऋषिकेश बालकृष्ण पाटील, सचिवपदी पराग रोहिदास राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी श्री. गणेश मित्र मंडळाचे अकरावे वर्ष असून आठ फुट उंच गणरायाची मूर्ति स्थापन केली जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान सामाजिक संदेशात्मक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजनही मंडळातर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये वृक्षसंवर्धन व बेटी बचाव बेटी पढाओ यावर संदेशात्मक आरस करण्याचा मानस मंडळाच्या कार्यकारिणीत व्यक्त करण्यात आला आहे.

Sagar Chaudhari
Mukesh Borole
Parag Rane
Rushikesh Patil

नविन कार्यकारिणीमध्ये सल्लागारपदी मुकेश तुकाराम बोरोले, खजिनदार म्हणून परेश नारखेडे तर सदस्य म्हणून भुषण नेहेते, अंकित चव्हाण, चेतन नारखेडे, निखील चव्हाण, मनिष बोंडे, देवेश अकोलकर, वैभव अकोलकर, योगेश चौधरी, सिद्धेश कासार, पवन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा

जळगाव दि.26 – संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक… पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा… हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर… ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद… ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या फुगडीसह… विदेशी नागरीक डॅनियल हदाद (इस्त्राईल) यासह मान्यवरांनी, अनुभूती स्कूलचे विद्यार्थ्यांनी, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्यांवर नृत्यांसह ठेका धरत आनंद द्विगणीत केला. जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.

जैन कृषि संशोधन केंद्राच्या ध्यानमंदिरापासून मिरवणूकीस सुरवात झाली. श्रद्धाज्योत या श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाधीस्थळी बैलांच्या मिरवणूकीने प्रदक्षिणा घातली व वंदन केले. त्यानंतर श्रद्धाधाम, सरस्वती पॉईंट मार्ग सवाद्य मिरवणू्क काढण्यात आली होती. मुख्य सोहळा जैन हिल्स हेली पॅड येथील मैदानावर झाला. यावेळी व्यासपीठावर अणूशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, महात्मा गांधीजींचे पणतू श्री. तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, श्री. राजा मयूर, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. एम. पी. मथाई यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

अशोक जैन यांनी पोळा फोडण्याच्या सोहळ्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. सालदार अविनाश गोपाल यांनी पोळा फोडण्याचा मान मिळविला. सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला. जैन परिवारातील सर्वात लहान सदस्य अर्थम अथांग जैन याच्याहस्ते सुद्धा घास भरविण्यात आला. भव्य अशा व्यासपीठावर सप्तधान्याची रास, शेती उपयोगी अवजारांचे पूजन अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

भूमिपुत्रांचा सत्कार

जैन कृषि संशोधन विकास केंद्रातील विविध ठिकाणांवर 25 च्यावर बैल जोड्या आहेत. त्यांच्यासाठी 35 च्यावर सालदार गडी शेती-मातीत राबत असतात. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व जैन परिवाराच्या हस्ते सर्व सालदारांचा परिवारासह सत्कार व संसारोपयोगी साहित्य भेट सन्मानाने देऊन गौरव करण्यात आला.

‘भारतीय संस्कृती, कृषी सांस्कृतिक वैभवाचा जैन हिल्स परिसरात मला अनुभव आला. प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया डॅनियल हदाद यांनी दिली.’

‘ऋषभराजाला ऊर्जास्वरूपात आजही शेतीमध्ये स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शेतीमध्ये ऋषभराजाला अनन्य साधारण महत्त्व त्याचमुळे प्राप्त झालेले आहे. पोळ्याच्या दिवशी ऋषभराजाचे पूजन त्याच्या कष्टाप्रती केलेला सन्मानच ठरतो अशी भावना डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.’

‘डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी भवरलालजी जैन यांची आठवण काढत पोळा सणात लोकसंस्कृती जोडली याचे नाविन्य जपत त्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्याचे सुरू केले ही कृषी संस्कृती पुढच्या पिढीनेही जपली आहे याचा आनंद आहे. पोळा हा सण कान्हदेशात सांस्कृतिक मूल्य जोपासणारा ठरलेला आहे असेही ते म्हणाले.’

‘सण-उत्सव वर्षभर येत असतात मात्र बळिराजा आणि त्याच्यासोबत राबणाऱ्या सर्जा-राजाचा कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा बंधूभाव जोपासणारा वाटतो. गत 25 वर्षापासून हा सण जैन हिल्सला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन म्हणाले.’

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले शेतकरी बांधव हे त्यांच्या परिवारासह उपस्थितीत होते. या पोळा सणाच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनच्या सर्व विभागातील सर्व सहकारी प्रयत्न केले. या कार्यक्रमात सहकारी हे परिवारासह उपस्थिती होते. यासह अनुभूती निवासी स्कूलमधील 200 हून अधिक विद्यार्थी, गांधी तीर्थ येथे देशभरातून अभ्यासक्रमासाठी आलेले विद्यार्थीही उपस्थितीत होते.

जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’

जळगाव दि. 25– जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’ या स्पर्धेला सुरूवात झाली. कांताई सभागृह येथे कॕरम स्पर्धेचे कॕरम खेळून उद्घाटन झाले. उद्घाटनाप्रसंगी जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे विजय मोहरील, अनिल जोशी, आंतरराष्ट्रीय कॕरमपटू आयेशा खान, माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे यांच्यासह सर्व सहभागी शाळांचे क्रीडाशिक्षकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पंधरा शालेय संघातील एकूण 75 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात मुलींमध्ये विद्या इंग्लिश स्कूलचे, मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूलचे वर्चस्व राहिले.
उद्या दि. 26 होणाऱ्या मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामान्यात दुर्गेश्वरी धोंगडे विरूध्द श्रावणी मोरे (दोघंही विद्या इंग्लिश स्कूल), दुसरा उपांत्य सामन्यात पुर्वा भुतडा (विद्या इंग्लिश स्कूल) विरुध्द पुर्वी भावसार (अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी) यांच्या दरम्यान सामना रंगेल. तसेच मुलांच्या उपउपांत्य फेरीत अँग्लो उर्दू हायस्कूलचे तीन खेळाडू, रायसोनी पब्लिक स्कूल व अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरीचे प्रत्येकी दोन खेळाडू आणि सेंट लाॕरेंस हायस्कूलचा एक खेळाडू यांनी प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर अंतिम फेरीचे सामने होतील. विजेत्या स्पर्धक व शाळांना जैन चँलेंज चषक व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल. पारितोषिक वितरण समारंभ कांताई सभागृह येथे उद्या दि. 25 ला दुपारी 2 वाजता व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष यूसफ मकरा, महाराष्ट्र कॕरम असोशिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान व जळगाव जिल्हा कॕरम असोसिएशनचे सचिव नितीन बर्डे यांच्या उपस्थिती होईल. सय्यद मोहसीन, आयशा खान, योगेश धोंगडे, सय्यद जुबेर यांनी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आणि स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

जळगाव, दि. 24 (प्रतिनिधी) – जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.
कान्हदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.
जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना जाहीर झाला आहे.
बृहृन्महाराष्ट्रातील श्रेष्ठ लेखकांच्या निवड समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात.-   डॉ. भालचंद्र नेमाडे, अध्यक्ष, निवड समिती
कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहिर करताना आनंद होत आहे. – अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन
परिचय – 1) प्रभाकर कोलते – ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहीर ते प्रभाकर कोलते मुंबई येथील जे.जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेऊन तेथेच हाडाचे प्राध्यापक होते. प्रभाकर कोलते कला शिक्षणाविषयी आपलं मत अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट मांडतात त्यामुळेच ते कला विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. भारतीय अमूर्त कलेतील सध्याच्या नामांकित चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलतेंचे नाव अग्रस्थानी आहे. अमूर्त कलेवर भाष्य करणारे आणि लिहीणाऱ्या अतिशय दुर्मिळ जागतिक दर्जाच्या चित्रकारांमध्येही ते पुढे आहेत. भारतीय अमूर्त कलेमध्ये काम करणाऱ्या क्रियाशील पिढीमध्ये बहूतांश चित्रकारांवर प्रभाकर कोलते यांचा प्रभाव आहे. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्ततेतील अध्यात्म सांगणारा योगी चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या अनेक चित्रमालिका देशात-परदेशात गाजलेल्या आहेत.
2) संध्या नरे-पवार –  श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी संध्या नरे-पवार यांची निवड झाली. मुक्तपत्रकार व संधोधनपर लेखनामध्ये त्यांचे साहित्य आहे. आदिवासी स्त्रीयांविषयी संवेदनशील वास्तव मांडून अमानवी प्रथांवर प्रखड भाष्य करणारे ‘डाकीण’, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या पुस्तकांसह त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
3) प्रवीण दशरथ बांदेकर – सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज येथे इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांनी कविता, कादंबरी, ललित, समीक्षा आदी लेखन केले असून कविता संग्रह – ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं…’, ‘चिनभिन’, कादंबऱ्या – ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘इंडियन अॅनिमल फार्म’, ललित लेख संग्रह – ‘घुंगुरकाठी’,  ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’, बालसाहित्य- ‘चिंटू चुळबुळे’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे.
4) वर्जेश सोलंकी – वर्जेश सोलंकी हे आगाशी ह्या लहानशा खेड्यात वास्तव्यास असून महाविद्यालय जीवनापासून काव्यलेखनाला त्यांनी सुरूवात केली. वर्जेश ईश्वरलाल सोलंकींच्या ‘कविता’, ‘ततपप’, ‘वेरविखेर’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध, ‘दीडदमडीना’ (ललितगद्य), ‘पेरूगन मुरूगन’ (लघुकांदबरी), ‘वृद्धशतक’  व ‘अनेक एक’ (कवी कमल वोरा ह्यांच्या गुजराती कवितांचा मराठी अनुवाद), ‘हुसैनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ (कथासंग्रह) इत्यादी साहित्य प्रकाशित असून अनेक कविता व कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version