२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव रंगणार जानेवारीमध्ये

जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ७ ते ११ या वेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात होणार आहे. या संगीत महोत्सवाचे यंदा आकर्षण युवा कलाकार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी दिली.

बालगंधर्व संगीत महोत्सवाची माहिती देण्याबाबत शुक्रवार दि. २९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, डॉ. अपर्णा भट, सचिव अरविंद देशपांडे व जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते. चांदोरकर म्हणाले की, दि. ३ रोजी महोत्सवाचे उद्घाटन बंगळूर येथील रेश्मा भट व रमैया भट यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे.

आगग्रस्त परिवारास जैन उद्योग समूहाकडून मदत

जळगाव, दि.२८ (प्रतिनिधी)– महामार्ग लगतच्या खेडीतील डॉ आंबेडकर नगर व भोईवाडा या भागात दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक झाली होती.  त्या आगीत प्रिती निवृत्ती गाटे ,लिलाबाई भोई, मंगलाबाई चौधरी , विकास भोई यांचे संसार उपयोगी सामान कपडे धान्य जळून खाक झाले होते.

याबाबतीत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या कडे मदतीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष्याचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पाठपुरावा करून स्फोटातील गरीब कुटुंबियांना जैन उद्योग समुहाकडून घर संसार उपयोगी सामान द्यावे अशी विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने चार कुटुंबियांना संसार उपयोगी सामान संच देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अनिल अडकमोल, जैन उद्योग समुहाचे अनिल जोशी , गायत्री सोनवणे, छोटू साबळे साधना गायकवाड, निलेश भालेराव, विकास भोई यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महात्मा गांधींच्या जीवनप्रवासावर आधारित प्रदर्शनी

जळगाव दि.२७ प्रतिनिधी – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनने बाल मोहन ते युवा मोहन या महात्मा गांधीजींच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित केलेली चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी मूल्य संस्काराच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मत शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संविधान दिनाच्या औचित्याने आजपासून भाऊंच्या उद्यानात प्रदर्शनीचे उदघाटन नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती चारुलता पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप महाजन, वसुधा महाजन, रोहन फेगडे व आदित्य सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कल्पक व नाविन्यपूर्ण पद्धतीने बनविलेले प्रदर्शन व सापशिडी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करतील असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचे सुती हार देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक व पालकांना, विद्यार्थ्यांना मूल्य संस्कार देण्यासाठी संस्थेच्यावतीने चारित्र्य निर्माण प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. यात सत्य, त्याग, समर्पण, कर्तव्य परायणता, बंधुभाव, क्षमाशीलता यासारख्या मूल्यांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंगांचा चित्रकथेच्या माध्यमातून या प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. याच जीवन मूल्यांवर आधारित सापशिडीचा खेळही तयार करण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी ५ ते ९ वेळेत भाऊंच्या उद्यानात हे प्रदर्शन खुले राहणार असून जळगावकर नागरिकांनी व  शिक्षण संस्था चालकांनी आपल्या पाल्य, विद्यार्थ्यांसह या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या शैक्षणिक संस्थांना हि प्रदर्शनी व सापशिडीच्या माध्यमातून मूल्य संस्कार उपक्रम राबवावयाचा असेल त्यांनी गिरीश कुलकर्णी (समन्वयक, परीक्षा विभाग) यांचेशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे. या प्रसंगी विश्वजित पाटील, सुरेश पाटील, मुकेश पाटील यांचेसह नागरिक उपस्थित होते.

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम


जळगाव दि.२५ प्रतिनिधी – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला  विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे गुजरातचे कार्यकारी संचालक आणि राज्य प्रमुख संजीब कुमार बेहरा हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. निरमा विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. करसन पटेल यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
शिक्षण सुरू असताना पालवीला आत्तापर्यंत इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडेंट” आणि क्यूरीयस यंग ब्लड अवॉर्ड”  सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून पालवी सध्या गुडगाव दिल्ली येथील डेली ऑब्जेक्ट या आस्थापनेत “इंडस्ट्रिअल डिझाईनर” या पदावर कार्यरत आहे. जैन इरिगेशच्या कलाविभागातील विजय जैन व सौ. नीलिमा जैन यांची पालवी कन्या असून तिच्यासह पालकांचेह कौतूक होत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी पालवीचे कौतुक करून तिच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तथा दहावी पुमसे राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत क्युरोगी या प्रकारात पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला तर रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला व तृतीय क्रमांक अमरावती जिल्हा तर पुमसे याप्रकारात पालघर जिल्हा प्रथम क्रमांक, द्वितीय रत्नागिरी, तृतीय सब मुंबई यांनी पटकाविले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलांमध्ये ठाण्याचा शक्ती दाभाडे तर मुलींमध्ये दुर्वा गुरव विजयी ठरलेत.

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन जैन इरिगेशनचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे  अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे तसेच उपाध्यक्ष दुलीचद मेश्राम, कोषाध्यक्ष वेंकटेश करा तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, रविंद्र धर्माधिकारी, महेश घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

२८ विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेत यात १४ मुले व १४ मुली सुवर्णपदक विजेते यांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी  महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

सुवर्णपदक विजेते खेळाडू मुले:  १) १६ किलो आतील सार्थक गमरे ( रत्नागिरी ) २) १८ किलो आतील श्लोक बांदल ( पुणे ) ३) २१ किलो आतील यथार्थ कांबे ( अमरावती ) ४) २३ किलो आतील रूद्र जाधव ( मुंबई ) ५) २५ किलो आतील ध्रुव वारूडकर ( अमरावती ) ६) २७ किलो आतील सोहम वडासकर ( अमरावती ) ७) २९ किलो आतील सोहम खामकर ( रत्नागिरी ) ८) ३२ किलो आतील ध्रुवराज शिंदे ( पुणे ) ९) ३५ किलो आतील शक्ती दाभाडे ( ठाणे ) १०) ३८ किलो आतील मंथन आंबेकर ( रत्नागिरी ) ११) ४१ किलो आतील आदित्य नाहक ( सब-मुंबई) १२) ४४ किलो आतील सार्थक कोलते ( छत्रपती संभाजी नगर) १३) ५० किलो आतील यश चौहान ( पुणे ) १४) ६० किलो आतील अर्थव मुरकुटे ( पुणे )

सुवर्णपदक विजेत्या मुली १) १४ किलो आतील प्रिशा कलवणकर ( मुंबई ) २) १६ किलो आतील अदिरा कुलकर्णी ( छत्रपती संभाजी नगर) ३) १८ किलो आतील अंतरा कश्यप ( मुंबई ) ४) २० किलो आतील दुर्वा गुरव ( मुंबई ) ५) २२ किलो आतील आर्या होले ( पुणे ) ६) २४ किलो आतील स्वाती भोसले ( अहिल्या नगर ) ७) २६ किलो आतील श्रिया पाडवे ( मुंबई ) ८) २९ किलो आतील सिद्धी मिसाळ ( बिड ) ९) ३२ किलो आतील स्वरा येवले ( पुणे ) १०) ३५ किलो आतील स्वाती जैस्वाल (रायगड) ११) ३८ किलो आतील नभा यावलकर ( अमरावती ) १२) ४१ किलो आतील अनन्या काळे (अमरावती) १३) ४७ किलो आतील ईश्वरी रोडे (अहिल्यानगर) १४) ५७ किलो आतील ज्ञानेश्वरी गाभने (अमरावती) या सर्व खेळाडूंची हरियाणा (पंचकुला ) येथे होणार असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजेत्यांचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, प्रविण बोरसे, निरज बोरसे, खजिनदार व्यंकटेश करा, सदस्य अजित घारगे, सतिष खेमसकर तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, ललित पाटील, सुरेश खैरनार, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे, महेश घारगे आदींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्यात. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, पुष्पक महाजन, दानिश तडवी, लोकेश महाजन, दिनेश , ऋशिकुमार खारोळे, जयेश कासार, विष्णू झाल्टे, निकेतन खोडके, निकिता पवार, सिमरन बोरसे आदिचे सहकार्य लाभले.

अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि.२० (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावला. ‘स्वतः केले मग सांगितले…’ या उक्तीप्रमाणे मतदानाचे महत्व पटवून देणे, नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जैन परिवाराने सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी आपले मतदान केले.

जैन परिवारातील सदस्यांचे मतदान एम.जे. कॉलेज जवळील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रात होते. त्यांनी मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदान करून भाग घेतला. जैन परिवारातील अशोक जैन, सौ. ज्योती जैन, आरोही जैन, अजित जैन, सौ. शोभना जैन, अतुल जैन व डॉ. भावना जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कांताई नेत्रालयाचा उपक्रम – मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

जळगाव दि.१८ प्रतिनिधी –  शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. २१ नोव्हेंबर २०२४ पुरतीच मर्यादीत असेल. सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी कांताई नेत्रालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, या संधीचा जास्तीत जास्त जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कांताई नेत्रालयातर्फे यापूर्वी महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीच्यावेळी देखील अशी सवलत देण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला होता.

सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया  कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

जळगाव/मुंबई दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने राऊट मोबाईल लि.संघावर विजय मिळवित क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कॉर्पोरेट क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजन मध्ये रोमांचकारी सामान्यात विजय मिळविला. जैन इरिगेशनचा संघ ‘ए’ डिव्हीजन मध्ये मागील वर्षी टाईम्स शिल्ड स्पर्धेचा विजयी संघ असून कॉरपोरेट स्पर्धा जिंकून जैन इरिगेशनच्या संघाने कॉर्पोरेट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.

मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामान्यात नाणेफेक राऊट मोबाईल लि. ने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या जैन इरिगेशनच्या संघाने निर्धारित २० षटकात सहा फलंदाजांच्या मोबदल्यात २१८ धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये जय बिस्टाने ५४ चेंडूमध्ये ८५ धावा कुठल्यात. यात सहा चौकार व पाच षटकारांचा आतषबाजी होती. त्याला शाश्वत जगताप ने चांगली साथ दिली. दोघांना प्रथम विकेट साठी ८.१ ओव्हर मध्ये ११३ धावांची भागिदारी रचली. त्याला आयुष झिमरने २१ चेंडूमध्ये ४५ धावा करत उत्कृष्ट साथ दिली. आयुष झिमरे ने तीन चौकार व चार षटकार खेचले. २१८ धावांचे लक्ष्य घेतलेल्या राऊंट मोबाईल लि.चा संघ  निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात २०८ धावा करु शकला.  यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. संघातील गोलंदाज प्रशांत सोलंकी यांने ३७ धावांच्या मोबादल्यात तीन फलंदाजांना महत्त्वाच्या वेळी बाद केले. जगदीश झोपे यानेसुद्धा ३४ धावांत तीन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

तत्पूर्वी सेमिफायनला मुंबई कस्टमने निर्धारित २० षटकांमध्ये केलेल्या २४४ धावांचा यशस्वी पाठलाग करत अवघ्या १८ ओव्हर मध्ये २४७ धावा करत आठ विकेटने विजय मिळविला होता. यामध्ये जय बिस्टा याने नाबाद १३५ रनांची खेळी विक्रमी ठरली. यात शाश्वत जगताप ४४ (२१ चेंडू), साईराज पाटील ३४ (१७ चेंडू), सुरज शिंदे २९ (१२ चेंडू) योगदान होते. तर गोलंदाजीमध्ये जगदीश झोपे व सोहम याने प्रत्येकी एक विकेट घेऊन विजयामध्ये मोलाची साथ दिली.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघात शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांम्वेकर, आयुष झिमरे या खेळाडूंचा सहभाग होता.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, मुंबई क्रिकेट संघाचे संयोजक मयंक पारिख, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

‘एपिक’ फोटो प्रदर्शनाची सुरवात – चित्रांचा संग्रह जळगावकरांसाठी प्रेरणादायी!

जळगाव दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शन पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये आज दि. १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आयोजीत केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत सोडून व दीपप्रज्वलनाद्वारे झाले. याप्रसंगी शकुंतला चावला, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, तुषार बुंदे, सौ. अश्विनी बुंदे, जैन इरिगेशनचे जगदिश चावला, योगेश संधानशिवे, मायरा लोटवाला यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या प्रदर्शनित मायरा लोटवाला यांच्या अनोख्या दोन म्युरल पेटिंग बघता येतील.

 या प्रदर्शनातन ४१ समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव आदी विविध विषयांचा समावेश आहे. जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या सोबतचे क्षण, आठवणी, उत्कृष्ट नमुन्याद्वारे प्रदर्शनात बघता येईल. प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक आहे. यामध्ये तुषार बुंदे विश्वासाने, “जग छान गोष्टींनी भरलेले आहे; ते टिपण्यासाठी तुम्हाला फक्त दृष्टी हवी आहे.” सह्याद्रीच्या खडबडीत निसर्गचित्रांपासून ते जैवविविधतेवरच्या पुस्तकापर्यंत सर्व काही त्यांच्या लेन्सने पाहिले आहे. आयुष्याने त्याला वेगवेगळ्या दिशेने खेचले असले तरी, फोटोग्राफीची त्याची आवड मोबाईल कॅमेऱ्यांच्या साधेपणामुळे जोपासली गेली. हृदयस्पर्शी दृष्टींसह सामान्य क्षणांना दृश्य कथांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

“एक चित्र स्मृती बनते.” क्षणभंगुर क्षणांना भावनांमध्ये बदलून, तो जे पाहतो ते जगाला दाखवण्यासाठी जगदीश चावला यांने आपले जीवन समर्पित केले आहे. शब्द जरी मनाशी बोलत असले तरी जगदीशचे फोटो आत्म्याशी बोलतात, ज्या भावनांकडे जास्त दुर्लक्ष केले जाते. त्याचे कार्य आपल्याला केवळ चित्रच नव्हे तर त्यामागील हृदयाचे ठोके पाहण्यासाठी आमंत्रित करते. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले आहे. कलात्मक अभिव्यक्ती या दोन्ही कलाकारांच्या भावनांमधून जळगाकरांनी प्रदर्शनी पाहता येईल. ज्येष्ठ छायाचित्रकार ईश्वर राणा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी मनिष शहा, देवेंद्र पाटील, योगेश सोनार, दिनेश थोरवे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. नितीन चोपडा यांनी सुत्रसंचालन  केले.

“इपिक” फोटो प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी): शहरातील पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शनाचं आयोजन आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव इत्यादी विविध विषयांचा समावेश आहे. येथे प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक असाच ठरणार आहे. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले असणार आहे. कलात्मक अभिव्यक्ती आणि या दोन्ही कलाकारांच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी जळगाकरांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक तुषार बुंदे व जगदीश चावला यांनी केले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version