२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

 जळगाव, दि. ८ प्रतिनिधी  :- अल्माटी,कझाकस्तान येथे  ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या मान्यतेने आणि कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाच्या प्रयत्नातून आयोजित या स्पर्धेत जवळपास ३५ देशांमधून ६४० खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे.

या आशिया खंडातील महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावमधून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण देवचंद ठाकरे यांना क्षेत्र पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई, वर्ल्ड ज्युनियर आणि जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम केले आहे. भारतभरातून सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून बहुमान मिळवणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

आठ, दहा, बारा, चौदा, सोळा व अठरा अशा विविध वयोगटात स्पर्धा खेळविली जाणार असून  स्विस् लिग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यांअंती अंतिम विजेते घोषित केले जातील. भारताकडून आपले खेळाडू यात सहभागी असून पदकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रवीण देवचंद ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक,संयोजक,प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात.

या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे जिल्हा संघटनेचे व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. या त्यांच्या यशासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख,पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील,जैन स्पोर्ट्सचे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अजित घारगे,नरेंद्र पाटील,संजय पाटील,यशवंत देसले,तेजस तायडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रविण ठाकरे यांना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके,कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे,नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी बी भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण

जळगाव दि. ०५ प्रतिनिधी – जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली सेनेगल व मंजरी फाऊंडेशन राजस्थान येथील पाहुण्यांच्या हस्ते जैन हिल्स परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जैन हिल्स च्या गुरूकूल पार्किंगजवळ आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. सूक्ष्मसिंचनासह प्रगत तंत्रज्ञानातून शेती बाबतचे ज्ञान घेण्यासाठी एका विशेष ट्रेनिंग जैन हिल्सच्या गुरुकूल सुरु आहे त्यात त्यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपणावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. बी. डी. जडे, राजेश आगीवाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, अशोक चौधरी, जैन इरिगेशनचे अजय काळे, मनोहर बागुल, संजय सोन्नजे, रोहित पाटील, हर्षल कुळकर्णी उपस्थित होते.

जैन फूडपार्क मध्येसुद्धा पर्यावरण दिवस साजरा केला गेला. जैन व्हॅलीमध्ये टि.यू.व्ही.नॉर्डचे ऑडिटर गिरीश ठुसे यांच्या प्रमूख उपस्थित वृक्षारोपण झाले. यावेळी सुनील गुप्ता, बालाजी हाके, वाय. जे. पाटील, जी. आर. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. फायर सेफ्टी विभागाचे कैलास सैदांणे व सहकारी पंकज लोहार, निखिल भोळे, मनोज पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.

जागतिक पर्यावरण दिन एक विशिष्ट थीम सह साजरा केला जातो – हवामान बदलापासून ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जंगलतोडीपर्यंत तात्कालिक समस्यांना लक्ष्य करून. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण’ ही आहे. वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार पृथ्वीवरील ४० टक्के जमीन खराब झाली असून त्याचा थेट फटका जगातील निम्म्या लोकसंख्येला बसत आहे. २००० पासून दुष्काळाची संख्या आणि कालावधी २९ टक्क्यांनी वाढला आहे त्यावर तातडीची उपाययोजना न केल्यास २०५० पर्यंत जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्येवर दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो,” यासाठी वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प सहकाऱ्यांनी घेतला.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कार्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे  वृक्षारोपण पोलीस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते झाले. त्यावेळी पोलीस उप अधिक्षक (गृह) मनोज पवार, राखीव पोलीस निरिक्षक संतोष सोनवणे, ट्राॅफीक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास इंगोले, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर सोळंके, पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, राजेश वाघ, कलीम काझी, पोलीस प्रशिक्षक सोपान पाटील, संतोष सुरवाडे, आशिष चौधरी, रोहिणी विष्णू थोरात, राऊंड फाॅरेस्ट ऑफिसर सोशल फाॅरेस्ट्री, जैन इरिगेशन  सिस्टिम लि चे राजेंद्र राणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी मदन लाठी, क्लीन ग्रुप जळगावचे विशाल पाटील, रवी नेटके, डॉ महेंद्र काबरा, आदित्य तोतला आदी उपस्थित होते.

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा 

जळगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) – ‘जगणे सोपे असते परंतु, आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास आपणच निमंत्रण देत असतो. जगभरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने वर्षाकाठी दीड कोटी लोकांचा आणि एकट्या भारतात १५ लाख जणांचा मृत्यू होतो. आपल्याला वाचविण्यासाठी आजच तंबाखू न खाण्याचा संकल्प करू या…’ असे अत्यंत कळकळीचे आवाहन जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक नितीन विसपुते यांनी केले. जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक पार्क आणि जैन फूडपार्क यासह सर्व आस्थापनांमध्ये ३१ मे हा जागतिक धुम्रपान निषेध व तंबाखूप विरोधी दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांशी ते सुसंवाद साधत होते.

जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथील डेमो हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी कामगार कल्याण अधिकारी किशोर बोरसे यांनी प्रास्तविक करून वक्ते नितीन विसपुते यांचे परिचय करून दिला. प्लास्टिक पार्क येथील सिक्युरिटी ऑफिसर श्री. मॅथ्यू यांनी गुटखा खाल्याचे दुष्परिणाम सोदाहरण स्पष्ट केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी गार्डन विभागाचे जुने सहकारी दगडू सीताराम पाटील यांनी आपल्या व्यसनमुक्तीचे अनुभव कथन केले.

जगभर तंबाखूजन्य पदार्थ सेवन, धुम्रपान व व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. भारतामध्ये घराघरात तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात. तंबाखू व्यसनाचे मुख्य कारण म्हणजे मोठ्यांचे लहानांनी केलेले अनुकरण होय. घरात आपले वडील,आई हे तंबाखू खातात, सिगारेट पितात त्यामुळे ते अपायकारक नाही असा समज घरातील मुलांचा होतो. घरातील आपले ज्येष्ठ हे पदार्थ सेवन करतात या अनुकरणाने हे व्यसन जडते याबाबत नमूद केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने. शुक्राणूंची संख्या कमी व क्षीण होत चालली आहे, भावी पिढी ही अशक्त जन्माला येत आहे. या समस्यांना सामोरी जावे लागत आहे.

 याच श्रुंखलेत जैन फूडपार्क येथील ओनियन ट्रेनिंग हॉल येथे सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान जैन अॅग्रिपार्क, जैन फूडपार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांना देखील नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले. ‘प्रेमाची आणि झोपेची कमी’ हेच व्यसनाधिनतेचे प्रमुख कारण आहे. स्वतःवर खूप प्रेम करा. तंबाखू सोडायचा मंत्र किंवा सिम्पल फंडा त्यांनी उपस्थितांना दिला; तो असा की, प्रत्येक एक तासाला एक ग्लास पाणी प्यावे, एक तास व्यायाम करावा आणि एक तास ध्यान करावे. या गोष्टी केल्यावर कुठलेही व्यसन सहज सुटते असा आत्मविश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि वक्ते नितीन विसपुते यांचा परिचय भूमिपुत्र संपादकीय विभागाचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी समन्वयाचे काम जैन फूडपार्क येथील मानवसंसाधन विभागाचे भिकेश जोशी यांनी केले. या कार्यक्रमास एच आर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जी.आर. पाटील एस.बी. ठाकरे, सुरक्षा विभागाचे प्रमुख आनंद बलोदी यांच्यासह जैन फूड पार्क येथील शंभरहून अधिक सहकारी उपस्थित होते.

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

जळगाव :- निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न
झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात
साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी., बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव
करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिविल सेर्विसेसचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभव स्वीकारला व स्पर्धेतील
उपविजेतेपद पटकाविले.
जैन इरिगेशनच्या महिला संघानेही उत्कृष्ठ अशी कामगिरी करतांना साखळी फेरीत बी.एस.एन.एल. आणि रिझर्व
बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत मात्र पेट्रोलियम
स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभूत होऊन चतुर्थ क्रमांक पटकावला.
पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या संदीप दिवेने अनेक नामवंत खेळाडूंचा पराभव करून ६वा क्रमांक प्राप्त
केला. ह्या गटात पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या योगेश परदेशीने अंतिम सामन्यात त्याच्याच संघाच्या के. श्रीनिवासचा
सरळ दोन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
पुरुष वयस्करगटाच्या राष्ट्रीय एकेरी स्पर्धेत जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने तेलंगाना आणि सिविल
सेर्विसेसच्या खेळाडूंचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीत कर्नाटकच्या के.ई. सुरेश
कुमारचा व उपांत्यफेरीत तामिळनाडूच्या ई. महीमईराजचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या शांतीलाल जीतिया याचा २५-२० आणि १६-१३ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी अखिल भारतीय कैरम
फेडेरेशनच्या महासचिव सौ.भारती नारायण, आंतरराष्ट्रीय कैरम महासंघाचे सचिव श्री. व्ही.डी.नारायण,तेलंगाना
कैरम असो.चे सर्वश्री संतोषकुमार,नीरज संपथी, प्रविणकुमार जी, नव्याभारती ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका
सौ. इंदिरा संतोषकुमार व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जैन इरिगेशनच्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, संचालक
श्री.अतुल जैन आणि प्रशासकीय क्रीडाधिकारी श्री.अरविंद देशपांडे व सर्व सहकार्यांनी आणि जळगाव जिल्ह्यातील
सर्व कैरम व क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे.

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची  मुलगी कु. धनश्री अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

जळगाव, दि.२७ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वीचा यंदाही १०० टक्के निकाल लागला. यात कु. धनश्री दत्तात्रय जिरेमाळी-प्रथम (९५.४०%), चि. मुकूंद सदाशिव चौधरी – द्वितीय  (९५.००%) व कु. अश्विनी समाधान हरसोडे-तृतीय  (९३.८० %), चि. आयूष दीपक जैन – चतुर्थ (९३.४०), कु. पायल सचिन सोनवणे – पाचवा (९२.००) उत्तीर्ण झालेत.

गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी अभिनंदन केले.  सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. २७ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी ९० टक्केच्यावर, १८ विद्यार्थी ८० टक्केच्यावर तर तीन विद्यार्थ्यांनी ७५ च्यावर गुणप्राप्त केले.

“अभ्यासाप्रती निष्ठा, सातत्याने केलेला अभ्यास यातून शंभर टक्के यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. परिस्थीती कशीही असो मात्र दूरदृष्टी महत्त्वाची आहे आणि हि अनुभूतीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतूक आहे.” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीचे यश – शाळेत प्रथम आलेली कु. धनश्री हिचे वडील जैन फार्मफ्रेश फूड्स लिच्या ओनियन विभागात काम करतात तसेच शिवणकामासाठी हातभार लावतात तर आई पुर्णवेळ शिवणकाम करून घराचा उदर निर्वाहासाठी मदत करतात. “भवरलालजी जैन यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या स्कूलमध्ये मुलगी संस्कारीत होत असून कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली.

एकलपालक असलेल्या मुकूंदचे यश – स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुकूंद चौधरी याची आई एकलपालक असून जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चरमध्ये काम करुन त्या आपल्या आई-वडीलांसह मुलांची जबाबदारी सांभाळतात. कटलरी साहित्य विक्री करणाऱ्या पित्याची मुलगी अश्विनी – रेल्वेमध्ये खेळणे विकणे व दारोदार कटलरीचे साहित्य विक्री करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी अश्विनीचा तृतीय क्रमांक आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत आयुष आणि पायलचे यश – आयुष जैन ह्याचे वडील दाणाबाजारात अगरबत्ती विक्री करतात तर आई शिवणकाम करते. पायल सोनवणेच्या वडीलांचा हरिविठ्ठलनगरमध्ये पानटपरीचा व्यवसाय आहे.  एकूणच सर्व विद्यार्थी हे प्रतिकूल परिस्थिती असताना, आई-वडील मेहनत करुन उदरनिर्वाह करुन या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पाठबळ दिल्याने ते घवघवीत यश संपादन करु शकले.

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

जळगाव दि. २१ प्रतिनिधी – श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंच्या जन्मगावी वाकोद ला असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या इयत्ता १२ वीच्या पहिल्या बॅचचा शंभर टक्के निकाल लागला. सौरभ प्रकाश देठे ७३ टक्के गुणांसह कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर राधिका दीपक काटे ७१.८३ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक, गायत्री जगदीश भगत ६८ टक्क्यांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर न जाता, गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली. या कॉलेजमधील इयत्ता १२ वी ची यंदा पहिलीच बॅच होती. विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन,  प्राचार्या रुपाली वाघ यांच्यासह शिक्षकांनी केले आहे. बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज, वाकोदला विज्ञान शाखेसाठी इयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कॉलेजला संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य रुपाली वाघ यांनी केले आहे.

‘शिक्षण हे भवितव्याची आणि भविष्याची गुंतवणूक असते.’ या मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच वाकोदला बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सेवेत आहे. विज्ञान शाखेमध्ये करिअर करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी हे कॉलेज सर्वांगीणदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरु शकेल. यंदा पहिल्याच बॅचचे सर्वच्यासर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्याचे विशेष कौतूक आहे. ’ – अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी 

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात  कंपनीच्या कन्सोलिडेटेड वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ व नफा ९१ कोटी रुपये झाला आहे.  जळगाव येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.

आर्थिक निकालाची वैशिष्ट्येः

  • वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ७.० टक्क्यांनी विक्री वाढ.

  • वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचा कन्सोलिडेटेड एबिटा  (EBITDA) १६.८ % वाढला.

  • चालू आर्थिक वर्षात एकत्रित कर पश्चात नफा हा ९१ कोटी रुपयांचा दिसतो, गत वर्षांची तुलना केली असता १२०.८ कोटी रुपये इतका तोटा होता.

  • वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचे स्टॅण्डअलोन एबिटा (EBITDA) १०.३ टक्क्यांनी वाढला.

  • वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी स्टॅण्डअलोन निव्वळ नफा (PAT) ४१.२ टक्क्यांनी वाढून तो ₹५५.५ कोटी झाला.

ऑर्डर बुक: सध्या कंपनीच्या हातात एकत्रित आधारावर, १९२५ रुपये कोटीच्या ऑर्डर्स आहेत. ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादन व्यवसायाच्या ३८३ कोटी रुपयांच्या, प्लास्टिक विभागाच्या ४७१ कोटी आणि कृषी प्रक्रिया (ऍग्रो प्रोसेसिंग) विभागाच्या १०७१ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स समाविष्ट आहेत.

कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले की,“ (क्लायमेट चेंज) हवामान बदलाला भारतासह संपूर्ण जग सामोरे जात आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. विशेषत: मूल्यवर्धित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या आव्हानांना सामोरे जात कंपनीने किरकोळ व्यवसायात २५ टक्क्यांची भरीव वाढ केली आहे. कंपनीने प्रकल्प-आधारित व्यवसाय धोरणात्मकरित्या कमी केला आणि किरकोळ आणि निर्यात बाजारांवर लक्ष केंद्रीत केले ज्यामुळे चांगला नफा कमावला आहे आणि  महसूल मिश्रण (रेव्हेन्यू मिक्स) पूर्णपणे बदलले आहे. कापसासारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. 

चालू आर्थिक वर्षात पावसाळा सामान्य असेल असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.  चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण व्यवसायावर थोडा परिणाम होऊ शकतो, तथापि, आम्ही व्यवसायाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले, आम्ही किरकोळ व्यवसाय वाढवून नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.” 

-अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव

मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन

जळगाव दि.१६ (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था, व तालुकात कृषि कार्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथ यात्रेचे उद्घाटन आज जैन हिल्स येथे कृषि पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबार तडवी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

मंगळ ग्रह मंदीर संस्थानच्यावतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, अभियंता संजय पाटील, जी. एस. चौधरी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, आर. टी. पाटील, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, सुनील गोसावी, निलेश महाजन, रवींद्र बोरसे, विशाल शर्मा, आशिष चौधरी, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमाचे महत्त्व विषद केले, तर मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहीत प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधीवत पूजन केले.

शेतकऱ्यांच्या जनजागृती रथ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील १५४ गावांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे खरीप हंगाम २०२४ पूर्वी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा खरेदी केल्या जातात. त्यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यांची फसवणूक टळावी, जागृती यावी, यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबची शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध, वास्तव माहिती प्राप्त होणार आहे.

‘भारतातील ऐतिहासिक अशा देवभूमी अमळनेर येथे मंगळ ग्रहाचे मंदीर आहे. त्या मंदीरामार्फत निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं. धर्म-ज्ञान हे तर त्यांचं क्षेत्रच आहे. ते त्यांचे प्राथमिक, मुख्य काम असले तरी समाजातील वेगवेगळ्या वर्गाला जन जागृतीच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात. थेट लोकांपर्यंत जनजागृती भिडते, त्यातून एक चांगला संदेश पोहोचतो व त्यानुसार लोक मार्गक्रमण करत असतात. त्याच कडीमध्ये आपल्या मंगळ ग्रह मंदिराच्या मार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रथ काढतात. त्या रथ यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामकाजात या ज्ञानाचा वापर करतात. जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही व उत्पादनही वाढेल. या उपक्रमात अमळनेर कृषि विभागानेही मोलाची साथ दिलेली आहे. या उपक्रमास शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षापासून या सोबत शेती आणि शेतकरी तसेच जैन इरिगेशन हे जे अतूट नाते आहे या उपक्रमात जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावे. या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती व उच्च तंत्रज्ञान ही पोहोचवू. जेणे करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक असे जैन इरिगेशनचे संस्थापक आमचे वडील भवरलालजी जैन म्हणत असत. सर्व मिळून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून या…’

  • अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.

मतदान करणाऱ्यांची विनामूल्य नेत्र तपासणी – कांताई नेत्रालयाचा उपक्रम

जळगाव दि.१३ प्रतिनिधी –  जळगावातील निमखेडी रोड वरील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी दोन दिवस नेत्रतपासणी विनामूल्य केली जाणार आहे. जळगावातील जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. १३ व १४ मे या कालावधी करिता मर्यादीत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता कांताई नेत्रालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, या संधीचा जास्तीत जास्त जळगावकरांनी लाभ घ्यावा.

सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पुर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी  आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया  कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.  कांताई नेत्रालयातर्फे विनामूल्य नेत्रतपासणीसह ‘आय केअर ऑप्टीकल’ येथे चष्मा खरेदी वर दहा टक्के सवलत ही देण्यात आली. दि. १३ रोजी मतदान केल्यापश्चात अनेक मतदारांनी या संधीचा लाभ घेतला.

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य – अशोक जैन

जळगाव दि.10 प्रतिनिधी – “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते. भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे. मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही! मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे.

मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात. देशभक्त आणि जागरुक नागरिक मतदान करतात व देशाच्या लोकशाहीला बलशाही करतात. आज जगामध्ये बऱ्याच घडामोडी होत आहेत. एक स्थिर सरकार भारतात निकडीचे आहे. भारत परत एकदा जगामध्ये अग्रेसर होण्याचा उंबरठ्यावर उभा आहे. गरज आहे भारत देशाला विकासीत आणि सुरक्षित करण्याची. सर्वांना एकत्र घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याची. देशभक्त आणि कर्तव्यदक्ष नेतृत्त्व म्हणजे आपला भारत देश सर्वदृष्ट्या सक्षम होणे. चला मतदान करुया!”  – श्री. अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version