तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् च्या निकीता पवार व लोकेश महाजन यांना रौप्य

जळगाव दि.२९ प्रतिनिधी :– तायक्वांडो असोसिएशन बिड व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ते २७ दरम्यान बिड येथे ३४ व्या कनिष्ठ (ज्युनियर) मुलं व मुली यांच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्जवलन करून करण्यात आले. यावेळी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश करा, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण बोरसे हे उपस्थित होते.

या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता.  मुलींच्या ५२ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कु. निकीता दिलीप पवार हिने रौप्य पदक प्राप्त केले. रावेर तालुका असोसिएशनचा लोकेश महाजन यानेसुद्धा रौप्यपदक पटकावले त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर जळगाव, तसेच जयेश कासार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी  विजेता

जळगाव दि.२८ प्रतिनिधी-  महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या प्रायोजकत्वातून केले होते. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे ही स्पर्धा संपन्न झाली. स्विस लिग पध्दतीने एकुण आठ डावात खेळवली गेलेल्या या स्पर्धेत  पुण्याचा श्लोक शरणार्थी अव्वल ठरला त्याला प्रथम क्रमांकाचे १५००० हजाराचे रोख पारितोषिक व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले गेले. खान्देश सेंट्रल येथे झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. राहुल महाजन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, सहसचिव अंकूश रक्ताडे, जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे,मुख्य पंच गौरव रे मुंबई, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे उपस्थित होते.
स्पर्धेत अर्थव  सोनी ठाणे याला द्वितीय क्रमांकासाठी रोख रूपये १३,००० व चषक, तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या प्रथमेश शेरला पुणे याला रूपये १०,००० व चषक, तर सौरभ महामने पुणे याला ९००० रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर दहा क्रमांकापर्यंत  एकूण ७२,००० हजाराची रोख पारितोषीके देण्यात आली.यात अनुक्रमे ओम नागनाथ लमकाने पुणे योहन बोरीचा मुंबई, ईश्वरी जगदाळे सांगली, राम विशाल परब मुंबई, साई शर्मा नागपूर, अजय परदेशी जळगाव यांचा समावेश होता. यानंतर उत्तेजनार्थ म्हणून अनुक्रमे ७,९,११,१३,१५, वयोगटाखालील सहभागी खेळाडूंना उत्तेजनार्थ पहिल्या तीन खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये ७ वर्ष वयोगटाखालील गटात शिरीष इंगोले बुलढाणा, कबिर श्रीकांत दळवी जळगाव ,शाश्वत शिवाजी देशमुख बुलढाणा, सुंदरसिंग गेहर कौर बुलढाणा यांचा समावेश होता. ९ वर्ष वयोगटाखालील अद्वित अमित अग्रवाल,युवेन गौरव जेव्हरी, आरुष सागर शिंदे, ११ वयोगटाखालील अविरत चव्हाण, आदित्य जोशी,समवेद पासबोला, 13 वर्ष वयोगटाखाली गटात निमे बन्साली, आदित्य चव्हाण, शाश्वत गुप्ता, तर 15 वर्ष वयोगटाखालील गटात हर्ष घाडगे, मानस गायकवाड, मयांग संतोष हेडा यांना विशेष उत्तेजनार्थ चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या चार विजयी खेळाडूंचा ऑगस्ट गुडगाव हरियाणा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली आहे.
डाॅ. राहुल महाजन, गौरव रे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या गौरव रे, अभिषेक जाधव, आकाश धनगर, नथ्यू सोमवंशी, प्रविण ठाकरे यांचा ही विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष  अतुल जैन आणि सचिव नंदलाल गादिया यांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे पदाधिकारी, जैन स्पोर्टस अकॅडमीचे सर्व सहकारी आणि जैन इरिगेशन मधील सहकारी यांनी सहकार्य केले.
सुत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले. आभार फारुक शेख यांनी मानले.

बॅडमिंटन तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

जळगाव दि. २८ प्रतिनिधी – जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते.  मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी प्रशांत कोल्हे  यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मनीषा भिडे व रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मंजुषा देशमुख उपस्थित होते.

अनुभूती निवासी स्कूलने “जळगाव तालुका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत २०२४-२५” मध्ये चार विजेतेपदे जिंकली. स्पर्धेत, १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात तसेच १९ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त, १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या श्रेणींमध्ये चौथे स्थान अनुभूती स्कूलने पटकावले.

तालुकास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघाची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांना मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया, सह प्रशिक्षक दीपिका ठाकूर, तसेच क्रीडा शिक्षक शशिकांत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. विजयी झालेल्या संघ व निवड झालेल्या खेळाडूंचे अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास , व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यशस्वीतेसाठी मुख्य पंच किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जाझीब शेख, पुनम ठाकूर, ईशांत साळी, हमजा खान, अक्षद पगारीया, मेहर लाडके, ओम अमृतकर, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, आरोही परांजपे, चिन्मय पाटीदार, मशरुफ शेख, अर्ष शेख यांनी सहकार्य केले.

अंतिम निकाल असा

१७ वर्षांखालील मुले –  अनुभूती स्कूल  वि. वि.  रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल  स्कोअर :- (२-१)

१७ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल  वि. वि. किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल स्कोअर : – (२-१)

१९ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल  वि. वि.  जी एच रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय स्कोअर :- (२-०)

१९ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी पब्लिक स्कूल  स्कोअर :- (२-०)

राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अहमदनगरचा हर्ष घाडगे आघाडीवर

जळगाव:– (क्रीडा प्रतनिधी) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश सेंट्रल येथे आयोजित पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स यांचे  प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी  सकाळच्या  सत्रात दुसऱ्या दिवशी आघाडीवर असलेल्या पुण्याचा प्रथमेश शेरला व नंदुरबारचा जितेंद्र पाटील यांच्यात इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या डावाच्या अंतिम पर्वात ४२ चालीत प्रथमेश याने सहज विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या पटावर मात्र ठाण्याचा अथर्वसोनी व पुण्याचा श्लोक शरणार्थी यांचा पर्क डिफेन्स झाले ला डाव ३५ व्या चाली अखेर  बरोबरीत सुटला.
तिसऱ्या पटावर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक मानांकन असलेल्या मुंबईच्या राम विशाल परब यास बरोबरीत रोखले. चौथ्या पटावर मात्र पुण्याच्या ओम लमकाने याने आघाडीवर असलेल्या कोल्हापूरच्या आदित्य सावळकर यास रॉयल लो लोपेझ  पद्धतीने झालेल्या डावात बरोबरीत रोखले.
स्पर्धेच्या आजच्या सहाव्या फेरीत पुण्याच्या श्लोक शरणार्थी याने फ्रेंच किंग्स इंडियन डिफेन्स ने झालेल्या डावात  पुण्याच्याच प्रथमेश शेरला चा ३५चालीत पराभव केला. दुसऱ्या पटावर राम विशाल परब व अथर्व सोनी यांचा डाव ५५ व्या चाली अखेर फ्रेंच डिफेन्सने बरोबरीत सुटला तिसऱ्या पटावर सहाव्या फेरीत अहमदनगरच्या हॉर्स गाडगे यांनी कोल्हापूरच्या आदित्य सावळकर याचा कारोकान पद्धतीने झालेल्या डावात ३५ चालीत पराभव केला पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने अधिक मानांकन असलेल्या पुण्याच्या सौरभ महामुनी यास बरोबरीत रोखत आश्चर्याचा धक्का दिला.
आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सह सचिव अंकुश रक्ताडे यांनी आपली उपस्थिती दिली. स्पर्धेची  सातवी फेरी सकाळी साडेआठ वाजता तर अंतिम फेरी दुपारी दीड वाजता सुरुवात होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण आज संध्याकाळी सहा वाजता स्पर्धेची आठवी व अंतिम फेरी संपल्यावर लगेचच खानदेश सेंट्रल येथे होणार आहे पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड गुडगाव (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे,प्रवीण ठाकरे,अभिजीत जाधव नत्थु सोमवंशी, आकाश धनगर, अरविंद देशपांडे अभिषेक जाधव यांनी काम बघितले आहे.

रवंजे येथे जि.प मराठी शाळेत वृक्षारोपण व संवर्धन उत्साहात

जळगाव दि. २७ प्रतिनिधी –  गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रवंजे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन पुरस्कृत शिक्षण सप्ताह व वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला. जिल्हा परिषद मराठी शाळा व गौरीशंकर माध्यमिक विद्यालय येथे विविध प्रकारची 150 झाडे विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त वन अधीकारी तथा सल्लागार वन वन्यजीव व पर्यावरण  विभाग जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेड  राजेंद्र राणे होते. सोबत बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव आधार माळी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका केंद्रप्रमुख श्रीमती मनीषा सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावात इको क्लबची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात श्रीमती सोनवणे मॅडम केंद्रप्रमुख आणि राजेंद्रा राणे  यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, आणि वृक्ष संवर्धनाची गरज याबद्दल त्यांनी महत्वपूर्ण प्रतिपादन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने “एक मूल, एक झाड” आणि “एक पेड माँ के नाम” या शासनाच्या धोरणानुसार वृक्ष संवर्धन करावे व ग्रामस्थांनी त्यांच्या शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधीकारी प्रशांत सूर्यवंशी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते मुकेश भालेराव, पंकज चौधरी, प्रदीप देशमुख, आणि संदीप तायडे यांनी परिश्रम घेतले.

राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा अजय परदेशी आघाडीवर

जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या तिसऱ्या फेरीत धक्कादायक निकालांची नोंद करण्यात आली त्यात पहिल्या बोर्डवर स्पर्धेचा प्रथम मानांकित खेळाडू सोलापूरचा मानस गायकवाड फिडे मानांकन (२०४४ )यास मुंबईच्या ओम  गाडा (१७७३) याने किंग्स इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात ४८ चालीत पराभव केला.
दुसऱ्या पटावर पुण्याचा द्वितीयमानांकित प्रथमेश शेरला (१९७८)याने इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या चुरशीच्या सामन्यात  कोल्हापूरच्या रवींद्र निकम यांचा १२२ पराभव केला. तिसऱ्या पटावर श्लोक शरणार्थी याने इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात पुण्याच्या किरण पंडितराव यांचा २९  चालीत  पराभव केला चौथ्या पटावर पुण्याचा ओम नमकाने व मुंबईचा सौमिल  गोगटे यांचा निमजोवीच पद्धतीने झालेल्या डाव छत्तीसव्या चाली अखेर बरोबरीत सुटला.
स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पुण्याच्या प्रथमेश शिरला याने पुण्याच्या आदित्य जोशीचा पराभव केला तर दुसऱ्या पटावर पुण्याच्या श्लोक शरणार्थी आणि अहमदनगरच्या आशिष चौधरीचा पराभव केला तर तिसऱ्या पटावर राम विशाल परब मुंबई याने नंदुरबारच्या जितेंद्र पाटील यांचा पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या पुण्याचा  अविरत चव्हाण (१८८९)याचा पराभव केला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश मॉल येथे आयोजित
एच टू इ पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या
राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत एकूण  १६३ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवलेला असून ८० च्या वर फिडे मानांकित खेळाडू  विविध जिल्ह्यातून सहभागी झालेले आहेत. स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे प्रवीण ठाकरे अभिजीत वैष्णव आकाश धनगर अरविंद देशपांडे अभिषेक जाधव हे काम बघत आहे स्पर्धेची पाचवी फेरी सकाळी नऊ तीस वाजता होईल

इनर व्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासह नेत्रतपासणी

जळगाव दि.२५ प्रतिनिधी –  इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जिल्हापेठमधील सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच नेत्रतपासणी करुन विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली.

इनर व्हील क्लब जळगावतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत १४० वह्या व १२० रजिस्टर वाटप करण्यात आले. हा उपक्रम सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल जिल्हापेठ येथे राबविण्यात आला. ह्या उपक्रमाला नगरसेवक अमर जैन यांचे सहकार्य लाभले. ह्या वह्यांसह शैक्षणिक साहित्याचा जवळपास ५५ विद्यार्थ्यांना लाभ झाला.

डॉ. शीतल अग्रवाल यांनी २४० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली. डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबतही संवाद साधला. शिवाय मुलांनी व्यक्तिगत स्वच्छता करुन आरोग्य चांगले कसे ठेवता येईल यावर देखील त्यांनी संवाद साधला.

हया प्रसंगी क्लब अध्यक्षा सौ उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, साधना गांधी, संध्या महाजन, शैला कोचर, डॉ. मयुरी पवार, रितु कोगटा, आबेदा काझी, कंचन कांकरिया, तनुजा मोरे आदी सदस्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे यांनी आभार मानले.

बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आमदार सौ. मधुभाभी जैन

जळगाव, दि. २५ प्रतिनिधी – ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले पाहिजे हे डोळसपणे बघावे लागते. बुध्दिबळ हा खेळ सुद्धा आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवितो. आत्मचिंतन करुन भविष्यातील लढाईची रणनिती आखण्यासाठी मदत करतो. सृजनशील विचारांना चालना बुध्दिबळ खेळातून मिळते.’ असे मार्गदर्शन माजी आमदार सौ. मधुभाभी जैन यांनी केले.

एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे आज (दि. २५) पासून २८ जुलै २०२४ दरम्यान केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अध्यक्ष म्हणून माजी आमदार सौ. मधुभाभी जैन बोलत होत्या. प्रमूख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, सचिव नंदलाल गादिया, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसिडेंट-मिडीया अनिल जोशी, चिफ ऑरबिटर गौतम रे उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. सौ. मधुभाभी जैन आणि रविंद्र नाईक यांनी बुध्दिबळ पटावर चाल करुन स्पर्धेला सुरवात केली.

 नंदलाल गादिया यांनी जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनने राबवित असलेल्या उपक्रमांविषयी प्रास्ताविकात सांगितले.  असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सानिया तडवी व आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी बुध्दिबळ स्पर्धेला शुभेच्छा देताना सांगितले की, ‘जैन स्पोर्टस अकॅडमी व जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनद्वारे आयोजीत फिडे मानांकित स्पर्धेमुळे बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन मिळेल. राज्यातून आलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा मोलाची आहेच मात्र जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ती पोषक ठरेल.’

जैन इरीगेशन सिस्टीम्स लि, जैन स्पोर्ट्स अकॅडमी व खान्देश सेंट्रल यांच्या सहकार्यातून झालेल्या राज्य वरिष्ठ खुल्या गटासाठी राज्यातून १६२ बुद्धिबळ पटूंनी सहभाग घेतला. स्विस लिग पध्दतीने खेळल्या गेल्या या स्पर्धेत आज दोन डाव खेळले गेले. सोलापूरची सृश्रीती विकास मोरे या अंध खेळाडूंने सहभाग घेऊन सर्वांची मने जिंकली. तर जळगावचा कबीर श्रीकांत तडवी या सहा वर्षाच्या चिमूकल्याने सौ. मधुभाभी जैन यांच्या वजरीला मागे घेण्यास भाग पाडले. ७३ वर्षाचे वयस्क खेळाडूंनी आपला अनुभव अजमावला.

जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शकील देशपांडे, सहसचिव चंद्रशेखर देशमुख, कार्यकारणी सदस्य तेजस तायडे, रविंद्र दशपुत्रे, विवेक दाणी आदी उपस्थित होते. बुध्दिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे, जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकारी यावेळी उपस्थित होते. अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर देशमूख यांनी आभार मानले.

जैन हिल्सवर ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ चर्चासत्र

जळगाव दि.२१ प्रतिनिधी – शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाचा प्रादुर्भाव व धोका वाढताना दिसत आहे. केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाने फिलपीन्स, इंडोनिशीया, चिन, ऑस्ट्रेलिया, होंडूरस, कोलंबिया, तैवान, इस्त्राईल, नेपाळ, पाकिस्तान यासह अनेक देशातील केळी बागा उध्वस्त केल्या आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन घटत आहे. म्हणून या रोगाला कसे ओळखाचे, आपल्या परिसरात रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय करायचे व रोग व्यवस्थापन कसे करावे, जेणे करुन भविष्यात केळी पीक शाश्वत राहिल; यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), नवी दिल्ली, ICAR-राष्ट्रीय  केळी संशोधन केंद्र ,(NRCB) त्रिची यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्या सहकार्याने ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्रात शास्त्रज्ञांसह प्रयोगशील शेतकऱ्यांनी विचार मंथन केले.

जैन हिल्सस्थित कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून  केंद्र सरकारचे माजी उद्यान आयुक्त व कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख वक्ते राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोग) डॉ. आर. थंगवेलु, माजी संचालक डॉ. बी. पद्मनाथन, बिहारच्या डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठमधील वनस्पती रोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. सिंग, जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षीक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, डॉ. बिरपाल सिंग, प्रयोगशील शेतकरी धिरेंद्रभाई देसाई, प्रेमानंद महाजन उपस्थित होते. तर पॅनल चर्चेत मान्यवरांसह डॉ. ललित महात्मा, डॉ. बी. के. यादव, किशोर चौधरी, प्रफुल्ल महाजन, विशाल अग्रवाल, गोपाल पाटील खामनी, विनायक पाटील, किशोर महाजन, संतोष लचेटा, हरदिपसिंग सोलंकी, निखील ढाके, कमलाकर पाटील, पवन पाटील, रितेश परदेशी, गम्पाशेठ चौधरी, रविंद्र पाटील, विशाल पाटील, सुनील पाटील, सुधाकर पाटील, अमित पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झालेत. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राची सुरवात झाली. शाल, सूतीहार, गांधीजींची प्रतिमा देऊन मान्यवरांचे स्वागत झाले. प्रास्ताविक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. जळगाव, धुळे, बुऱ्हाणपूर, बडवाणी, नर्मदानगर या जिल्हांसह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सहभागाबाबत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उद्घाटन सत्रात डॉ. आर. थंगवेलू म्हणाले, क्लायमेंट चेंजमुळे फ्युजारीयम विल्ट, टीआर-४ वाढतांना दिसत आहे. आवश्यक काळजी घेतली गेली नाही तर त्याचे पुढील काही वर्षात विपरीत परिणाम दिसतील. यासाठी सामूहिक पद्धतीने नियोजन करुन फ्युजारीयम विल्ट वर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी माती परिक्षण, रोपांची गुणवत्ता, रोगमुक्त रोपं व कंद लागवड, पीक पद्धतीत बदल, शेतातून बाहेर जाताना किंवा शेतात येताना पायातील बुट सॅनिटायईजेशन केले पाहिजे, असे उपाय योजनांसह त्यांनी सादरीकरण केले. फ्युजारीयमचे लक्षणं, त्याचा प्रवास कसा होतो हेही त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या सांगितले.

कुरबान तडवी म्हणाले, संपूर्ण देशाच्या  तुलनेने महाराष्ट्रात विल्ट या रोगाचा शिरकाव कमी किंबहूना नसल्यागत आहे मात्र आपण धोकादायक स्थिती आहोत कारण सर्वात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यातून होते. त्यासाठी काळजीसुद्धा सर्वात जास्त आपण घेतली पाहिजे.

डॉ. एच. पी. सिंग म्हणाले, केळी पीक हे आरोग्यदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जीवनदायी पीक आहे. त्यामुळे त्याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे. इतिहासाकडे डोकावलो तर केळीत बदल होताना दिसतात. नवनवीन तंत्रज्ञानाने आपण शेती करत असलो तरी नवीन समस्याही निर्माण होत आहेत ही वस्तूस्थिती आहे. मात्र त्यावर वेळीच अटकाव केला तर भविष्य सुकर होते. फ्युजारीयम वर कायम स्वरुपी सोल्युशन अजूनही नाही त्यामुळे केळी पिकावर एक प्रकारे कोराना व्हायरस सारखा तो काम करत आहे. सक्तीने नाही तर सामूहिक शक्तीने प्रतिबंधात्मक उपाय करुन नियंत्रण ठेवता येईल. यासाठी संशोधक, वैज्ञानिक, शेतकरी आणि जैन इरिगेशन सारख्या संस्थांनी सामाजिक स्तरावर चळवळ प्रमाणे काम केले पाहिजे. उन्हाळ्यात जमीन नांगरुन पडू देण्यासह जनजागृतीवर भर दिला पाहिजे. विषाणू आहे तेथेच त्याला संपवले पाहिजे त्याचे पुढे संक्रमण होऊ देऊ नये असेही त्यांनी सुचविले.

डॉ. एस. के. सिंग यांनी तांत्रिक सत्रात सांगितले की, फ्युजारीयमुळे जगातील एकूण उत्पादनापैकी सध्या १५ टक्के केळी प्रभावीत झाली आहे. २०४० पर्यंत ती ४० टक्क्यांपर्यंत होईल. १० मिलीयन डॉलरमध्ये त्याचे नुकसानाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. इस्त्राईल, ओमान, पाकिस्तान, टर्की यासह १३ देशांमध्ये विल्टचे प्रमाण वाढले आहे. जगातील १३६ देशात केळीची शेती होते. त्यातील २४ देशांना थोड्याफार प्रमाणात का होईना या विषाणूंमुळे प्रभावीत केले आहे. भारतात महाराष्ट्र सोडले तर जवळपास कमी जास्त प्रमाणात फ्युजारीयम विल्ट अॅक्टीव्ह आहे तो एका शेतात जवळपास ५० वर्षांपर्यंत राहू शकतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधन सुरु असून लवकरच फ्युजीकॉन्ट व नो टू विल्ट  टेक्नोलॉजी आयसीआर तयार करेल असाही विश्वास त्यांनी शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.

डॉ. पद्मानाथन यांनी सादरीकरणातून केळीच्या मुळांच्या आरोग्याबाबत सांगितले. फ्युजारीयम टाळण्यासाठी कोणकोणती पीकांनंतर केळीची लागवड केली पाहिजे हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.  डॉ. के. बी. पाटील यांनी फ्युजारीयम व्यवस्थापनावर चर्चेत सहभाग घेतला. रोगग्रस्त झाडाला तण नाशकाचे इंजेक्शन देऊन तेथेच मारावे व त्यावर भूसा टाकून झाड बागेत जागेवरच जाळावे. रोगग्रस्त झाड दिसताच क्षणी त्याला कंटेन्टमेंट करण्यासाठी बाजूच्या आठ झाडांना दोरी बांधावी जेणे करून रोगग्रस्त झाडा जवळ मजूर किंवा कुणीही जाऊ शकणार नाही. फार्म फूट बाथ करणे, अवजारे, मजूरांची बूट व चपला, दळणवळणाची साधने सॅनेटाईज केले पाहिजे, जैविक नियंत्रण करणे, गादीवाफा पद्धत वापरली पाहिजे, ड्रिप वापरावे, केक, निम केकसह संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करुन बाग सशक्त ठेवणे, प्रत्येक गावाच्या वेशीवर फूट बाथ व टायर बाथ म्हणजे निर्जतूकीकरण करण्याची सुविधा निर्माण करणे गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात रोगाचा शिरकाव होणार नाही. यासाठी सामूहिक खबरदारीचे उपाय करणे. फिलिपिन्स मधील शास्त्रज्ञांचा दाखला देत फ्युजारीयम एक वर्षात १०० कि.मी. चा प्रवास करतो त्यामुळे त्याची भयानकता लक्षात येत असून केळीची शेती शाश्वत ठेवायची असेल तर आताच प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. सकारात्मक मानसिकतेतून आपले शेत, गाव, शहर, जिल्हा आणि नंतर व्यापकस्तरावर बागा सुरक्षितेच्या दृष्टिने प्रयत्न केले पाहिजेत. चर्चासत्र यशस्वितेसाठी जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहुल भारंबे, तुषार पाटील, मोहन चौधरी, योगेश पटेल, सतिष राजपूत, शुभम पाटील, जयदीप अझहर, संजय पाटीदार यांच्यासह अॅग्रोनॉमिस्ट यांनी सहकार्य केले.

स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

जळगाव दि. २० (प्रतिनिधी) – भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती केली, मात्र गांधीजींच्या विचारातून भारताचे भवितव्य घडविण्याचे मूल्यवर्धित काम आणखी खूप मोठ्या स्वरूपात करायचे आहे. स्वच्छता अभियान, वाहतूक नियमांचे पालन, सूत्रबद्धतेसह काटेकोर व्यवस्थापनाद्वारे कल्पनाशक्तीतून नवीन पिढी हे शिक्षणाच्या माध्यमातून करत आहे, त्याची रूजवात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेतून झाली आहे खरं तर ही प्रतियोगिता शाळा शाळा राबवून त्याची चळवळ व्हावी, असे अध्यक्षीय भाषणात अणूशास्त्रज्ञ तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर यांनी प्रतिपादन केले.

गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता-२०२४’ पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. अनिक काकोडकर यांच्यासमवेत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी संस्कार विचार परिक्षेचे समन्वयक गिरीष कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसमवेत भाविका महाजन, नारायणी वाणी आणि खिलेश कोल्हे या विद्यार्थ्यांना पाहुण्यांसमवेत उद्घाटना प्रसंगी व्यासपीठावर येण्याचा सन्मान मिळाला. संत कबीरजींच्या ‘चदरीया झिनी रे झिनी…’चे गाणे सर्वांचे लक्ष वेधून गेले.  प्रास्ताविक व निवेदन गिरीष कुळकर्णी यांनी केले.

अशोक जैन म्हणाले की,‘राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचे पालन, पर्यावरणाचा समतोल राखणे, शेतीविषयी आवड निर्माण करणे हे विषय शिकविले गेले पाहिजे, भौतिक विज्ञानयुगात आपण भविष्यासाठी काय वाढून ठेवतो आहे याचं चिंतन केले पाहिजे, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचा स्वच्छ शाळा प्रतियोगिता हा खूप मोलाचा उपक्रम आहे. ‘जेव्हा आंतरिक आणि बाह्य दोन्ही स्वच्छता असते तेव्हा ती देवत्वाकडे जाते’ या महात्मा गांधीजींच्या विचारातून गांधी रिसर्च फाऊंडेशन कार्य करत आहे. अहिंसेला मध्यबिंदू ठेवून सामाजिक जागृतीचे माध्यम ठरत आहे. महात्मा गांधीजींच्या शिकवणीनुसार खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी ग्रामीण भागात शेती आणि शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण फ्यूचर अॅग्रीकल्चर लिडर ऑफ इंडिया अर्थात फाली उपक्रमात सहभाग घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.’

 डॉ. सुदर्शन अयंगार म्हणाले, शाळा, घर, मोहल्ला, परिसर स्वच्छ करुन, जनजागृती करून स्वच्छता मोहिम आपण राबविली. मात्र मनाची स्वच्छता म्हणजे सूक्ष्म स्वच्छता सफाई करुन संवेदनशील मनाने नवीन विश्वाची निर्मीती करावे असे आवाहन त्यांनी केले.

पुरस्कार प्राप्त शाळा

महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे स्वरुप) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी (सती), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांना देऊन गौरविले गेले.

ग्रामीण भागातील विजेते

आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज, पेठवडगाव (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, मेहरुण, ता. जि. जळगाव. (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), सोमय्या विद्यामंदिर व उच्च माध्य विद्यालय, साकरवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर आणि राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

तालुका स्तरीय विजेते – विजेते

साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज,(प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), पां. बा. मा. म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव, ता. जि. जळगाव, (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

जिल्हा स्तरीय विजेते – विजेते

एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह),भारतीय जैन संघटना माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), दयानंद आर्य कन्या विद्यालय अँड जुनिअर कॉलेज, नागपूर, ता. जि. नागपूर आणि मातोश्री अकादमी द एक्सपेरीमेंटल स्कूल, तुकुम, चंद्रपूर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह) पारितोषिके वितरण अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अशोक जैन आणि डॉ. सुदर्शन आयंगार यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आभारप्रदर्शन  चंद्रशेखर पाटील यांनी केले.

विशेष पुरस्काराने सन्मान झालेल्या शाळा

मातोश्री माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, के ई एस कन्या शाळा, पांढरकवडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव. श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, फेस, ता. शहादा, जि. नंदुरबार जनता हायस्कुल, साकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव श्री रामेश्वर विद्यालय, वारी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग वाय. एम. खान उर्दू हायस्कुल, भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, संभाजीनगर, ता. जि. संभाजीनगर. राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुल्हे-पानाचे, ता. भुसावळ, जि. जळगाव. वल्लभ विद्या मंदिर, पाडळदा, ता. शहादा, जि. नंदुरबार, आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, नरके’ज पन्हाळा पब्लिक स्कुल व ज्यू. कॉलेज, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, प. न. लुंकड कन्या शाळा, जळगाव, ता. जि. जळगाव. जीवन विकास विद्यालय, देवग्राम, ता. नरखेड, जि.- नागपुर न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय, बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव. कृषक विद्यालय, कोटगाव, ता. नागभीड, जि. चंद्रपूर, शिवाजी विद्यालय, अंचरवाडी, ता. चिखली, जि. बुलडाणा. चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय, शेरेवाडी, ता. जि. सातारा नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व जुनियर कॉलेज, जळगाव, ता. जि. जळगाव. श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, लातूर, ता. जि. लातूर. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला कै. पी. के. शिंदे माध्यमिक विदयालय, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव. श्री तुळजा भवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर, ता. जि. धाराशिव पी. आर. हायस्कूल, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव मातोश्री उच्च प्राथमिक शाळा, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव, रॉयल पब्लिक स्कुल, भंडारा, ता. जि. भंडारा या शाळां पैकी प्रातिनिधीक २० शाळांचा विशेष सन्मानचिन्हाने सन्मान केला गेला.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version