महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत ‘मंदिरांचे सरकारी नियंत्रण आणि संघर्ष’ या विषयावर उद्बोधन सत्र !

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – श्री. सुनील घनवट

जळगाव – सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी है । देशभर के 4 लाख मंदिर अभी बाकी है ।’ त्यामुळे सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्याचा मंदिर परिषदेच्या माध्यमातून संकल्प करूया. मंदिरे सरकारीकरण मुक्त होण्यासाठी, तसेच प्रत्येक मंदिराचे संरक्षण होण्यासाठी मंदिर पुजारी, विश्वस्त, मंदिरांचे सदस्य, अधिवक्ते यांचे संघटन असणे आवश्यक आहे. अन्य पंथीयांना त्यांच्या प्रार्थनास्थळांतून त्यांचे धर्मगुरु धर्मशिक्षण देतात; मात्र हिंदूंना मंदिरांतून धर्मशिक्षण दिले जात नाही. मंदिर हे शक्तीकेंद्र, भक्तीकेंद्र आणि धर्मशिक्षण देणारे केंद्र असले पाहिजे. मंदिरात भाविक भक्तीभावाने दान देतात, त्यामुळे मंदिरांतील निधी राजकीय स्वार्थापोटी विकास कामांसाठी वापरला जाऊ नये. मंदिरांचे विश्वस्त, सदस्य यांचे उत्तम संघटन उभे राहिल्यास देशभरातील 4 लाख मंदिरे सरकारीकरण मुक्त होतील. हिंदु जनजागृती समितीचे कोणतेही मंदिर नाही; मात्र प्रत्येक मंदिर हे हिंदु जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी लढा देऊ, अशी घोषणा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या दुसर्‍या दिवशीच्या ‘मंदिरांचे सरकारी नियंत्रण आणि संघर्ष’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि पुणे येथील ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष श्री. सुरेश कौदरे उपस्थित होते.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे जाईल, तेव्हा मंदिरांचा विकास निश्चित ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिक राजकीय आणि न्यायव्यवस्था क्षेत्रांतील काही व्यक्ती मोठेपणासाठी विश्वस्त मंडळांमध्ये येण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मंदिरे ही व्यक्तीगत लाभासाठी नाहीत. जेव्हा मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे जाईल, तेव्हा मंदिरांचा विकास निश्चित होईल. देवापुढे येणारे धन आणि सोने-नाणे यांवर देवाचा हक्क आहे. मंदिरांविषयी खटले चालू झाल्यावर मात्र मंदिराचे लाखो रुपये अधिवक्त्यांच्या शुल्कासाठी खर्च होत आहेत. मंदिराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे परवडणारे नाही. हे रोखले नाही, तर मंदिरातील बजबजपुरी वाढत जाईल. देवापेक्षा कुणीही मोठे नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पण करून मंदिरांसाठी भारतभर फिरत आहेत. अशा प्रकारे सर्वांनी या कार्यात योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी न्यायालयात याचिका करणार !

विश्वस्तांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम केल्यास मंदिरांतील वाद मिटतील !-अधिवक्ता सुरेश कौदरे, अध्यक्ष, श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान, पुणे मंदिरांमधील पुजारी आणि विश्वस्त यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. भीमाशंकर देवस्थानमध्ये वर्ष 1980 पासून निर्माण झालेला वाद पुढे 20 वर्षे चालला. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी मंदिराचे विश्वस्त एकत्र आले. अशा प्रकारे मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्तांनी एकमेकांना विश्वासात घेऊन कार्य केल्यास वाद होणार नाहीत, असे प्रतिपादन पुणे येथील ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे यांनी केले.

  • श्री. गणेश लंके, अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, पंढरपूर मंदिरातील वैभव आणि प्रतिष्ठा वाढल्यानंतर मंदिर सरकारीकरणाचा डाव रचला जातो. पुजारी आणि विश्वस्त यांच्यातील अंतर्गत कलहामुळे मंदिरांचे सरकारीकरण होते; मात्र मंदिरांच्या सरकारीकरणानंतरही मंदिरांचे प्रश्न संपलेले नाहीत. उलट मंदिरांमध्ये विविध घोटाळे झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भक्तांच्या ताब्यात येण्यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके यांनी केले.

आपला नम्र
श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क: 7020383264)

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ !

भारतात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवण्याची आवश्यकता ! – अशोक जैन, अध्यक्ष, पद्मालय देवस्थान, जळगाव

जळगाव – मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. कोणतीही संस्था सुदृढ होणे, हे व्यवस्थापनावर अवलंबून असते; मात्र मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी कोणताही अभ्यासक्रम भारतात शिकवला जात नाही. मंदिर परिषदेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे. तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. ती पर्यटनस्थळे नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांकडे पालकत्वाच्या भावनेने पहाणे आवश्यक आहे.

विश्वस्तांनी हातात हात घालून मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यायला हवे. या दृष्टीने मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिरांविषयीचा समान कार्यक्रम निश्चित होईल, असा विश्वास जळगाव येथील श्री पद्मालय गणेश देवस्थानचे विश्वस्त, तसेच जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी व्यक्त केला. हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, पद्मालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून या ऐतिहासिक मंदिर परिषदेला प्रारंभ करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर काशी येथील ज्ञानव्यापीसाठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, देऊळगावराजा येथील श्री बालाजी देवस्थानचे श्री. विजयसिंहराजे जाधव, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते.

राज्यभरातील विविध मंदिरांचे 250 हून अधिक प्रतिनिधी या मंदिर परिषदेत सहभागी झाले आहेत. ‘मंदिर प्रतिनिधींच्या एकत्रीकरणाची आवश्यकता’, ‘पुजार्‍यांच्या अडचणी आणि उपाय’, ‘मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन’, ‘मंदिरांचे सुप्रबंधन’, ‘प्राचीन मंदिरांचा जीर्णाेद्धार, स्वच्छता, आर्थिक अडचणी’, अशा विविध विषयांवर या परिषदेत उहापोह होत आहे. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी प्रस्तावना करतांना मंदिर परिषदेचे आयोजन हिंदूंसाठी शुभकल्याणकारी घटना आहे, असे प्रतिपादन केले. या परिषदेला भाजपचे स्थानिक आमदार श्री. सुरेश भोळे हेही उपस्थित होते. या वेळी मत व्यक्त करतांना आमदार श्री. भोळे म्हणाले, ‘‘न्यायालयात भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितले जाते; मात्र शाळा, महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता शिकवली जात नाही. ही स्थिती पालटणे आवश्यक आहे.’’

मंदिरांतील धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ मंदिर विश्वस्तांचे संघटन व्हायला हवे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिकमंदिरांतील पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्ये देवस्थानाचे प्रश्न बिकट होत आहेत. मंदिरांचे अधिग्रहण करून त्यामध्ये अहिंदूंची नियुक्ती केली जात आहे. यांमुळे मंदिरांतील परंपरा नष्ट होत आहेत. मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिरांतील धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ मंदिर विश्वस्तांचे संघटन होईल, असे प्रतिपादन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले.

काशी विश्वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदु संस्कृतीरक्षणाचा लढा ! – विष्णु शंकर जैन, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी सर्वप्रथम मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. अयोध्या, मथुरा, काशी यांसह असंख्य ठिकाणी देवतांच्या मंदिरांची आणि मूर्तींची तोडफोड करून त्या ठिकाणी मशिदींची निर्मिती करण्यात आली. काशी विश्वेश्वराचे मंदिर 3 वेळा पाडण्यात आले. काशी विश्वेश्वराचे मंदिर मुक्त करावे, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण होण्याची वेळ आता दूर नाही. हिंदूंनी ही सर्व मंदिरे मुक्त करायला हवीत. काशी विश्वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदूंच्या संस्कृतीरक्षणाचा लढा आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी या वेळी केले.

सरकारी उद्योगांचे खाजगीकरण, तर मग हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती सनातन धर्माच्या विरोधात पूर्वीपासून चालू असलेल्या आघातांचे सत्र अद्यापही चालूच आहे. मंदिर केवळ देवालयच नाही, तर ते विद्यालय आहे, न्यायालय आहे, तसेच आरोग्यालयही आहे. पूर्वीच्या काळी मंदिरांद्वारे विश्वविद्यालये चालवली जात असत. त्यांतून हिंदूंना विद्या प्रदान केली जात होती. मोगल आक्रमकांनी मंदिरांचा विध्वंस करून तेथील धन लुटले, तर मंदिरे सधन असल्याने तेथील ज्ञानसंपदा चालूच राहील आणि मिशनर्‍यांच्या कॉन्वेंट शाळा चालणार नाहीत, हिंदूंना धर्मांतरीत करता येणार नाही, या उद्देशाने ब्रिटिशांनी मंदिरांतील धनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिरांच्या सरकारीकरणाला प्रारंभ केला.

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला; मात्र मंदिरे स्वतंत्र झालीच नाहीत. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन आज ‘सेक्युलर’ सरकारने 4 लाख मंदिरे स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतली आहेत. एकीकडे सरकारी उद्योगांचे खाजगीकरण केले जात आहे, तर मग हिंदू मंदिरांचे सरकारीकरण का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केला. आज सरकारीकरण झालेल्या शिर्डी देवस्थान, श्री तुळजाभवानी देवस्थान, श्री महालक्ष्मी देवस्थान या आणि अशा विविध मंदिरांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे मंदिरांवर सरकारचे नियंत्रण येऊ नये, यासाठी प्रत्येक मंदिराच्या प्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

आपला नम्र,
श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती (संपर्क : 7020383264)

वो जब याद आये….

सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी एका घरंदाज सुराचा अस्त झाला. भारतरत्न लता मंगेशकर यांनी या दिवशी आपल्या जीवनाची भैरवी गाऊन आपली जीवनरुपी संगीत मैफल संपविली. या गानसरस्वतीने, स्वरलतेने, गणकोकिळीने अर्थात स्वरसम्राज्ञीने अनेक दशकांपासून आपल्या सुरांचे गारुड संपूर्ण भारत वर्षातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील रसिकांवर घातलं सुगम संगीतापासून ते चित्रपट गीतांपर्यंत भक्ती गीतापासून गझल पर्यंत असा एकही सांकेतिक अविष्कार नाही जो लतादीदींनी आपल्या सुरेल गळ्यातून रसिकांपर्यंत पोहोचविला नाही लतादीदींच्या या संगतीत सेवेचे अनंत उपकार रसिकांवर आहेत त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या उपकारांची परतफेड त्यांना स्वर्ण रक्त सुमनांजलीने करण्याचा मानस स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला वाटला आणि या खानदेश कन्येच्या सांगीतिक जगावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा एक छोटासा खारीचा वाटा प्रतिष्ठानने उचलला आहे. “वो जब याद आये….” या कार्यक्रमाचे आयोजन करून. दीदींना आदरांजली वाहण्यासाठी प्रतिष्ठानचे प्रतिभावंत कलावंत मयूर पाटील, मयूर चौधरी, मानसी आळवणी, व ऐश्वर्या परदेशी रसिकांसमोर विविध गीते सादर करणार आहेत. त्यासोबतच डॉ. अपर्णा भट यांच्या विद्यार्थिनी नृत्यांजलीच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करणार आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदोर स्थित अविनाश देवळे करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ती शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर सौ जयश्री महाजन व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एम. राजकुमार यांची. या कार्यक्रमाचे रेडिओ पार्टनर म्हणून माय एफ. एम. ९४.३. चे युनिट हेड श्री. अदनान देशमुख यांची रविवार दि. ५ फेब्रुवारी या दीदींच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी ठीक ७ वाजता हा कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे. चुकवू नये अशा या कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती प्रार्थनीय आहे. चला तर दीदींप्रतीची कृतज्ञता व्यक्त करू या. स्वरनृत्य सुमनांजलीच्या माध्यमातून आपण त्यांना आदरांजली वाहूया. आपण सर्वांनी नक्की यावे आम्ही आपली वाट पाहतो आहोत.

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी


आज केंद्र सरकारने मांडलेलं बजेट शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी चांगलं बजेट आहे. असं मी म्हणेन. शेतकऱ्यांसाठी सप्तर्षी च्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी सर्व योजनांचा विनीयोग करायचा ठरवले आणि फायदा घ्यायचा ठरवला तर शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याची माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. आपण कुठे काय करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासोबतच पायाभुत सुविधांसाठी खूप मोठा पैसा सरकारने दिला आहे. पायाभूत सुविधा म्हटल्या म्हणजे त्यात रेल्वेचे जाळं, महामार्ग, पोर्ट, विमानतळे आले, त्यानंतर भुयारी बोगदे आले, ब्रिजेज आले. यामुळे दळणवळण चांगले होणार आहे. परंतू यातून रोजगार निर्मिती मोठ्याप्रमाणात आताही झालेली आहे आणि पुढेही जास्त प्रमाणात होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेचा समावेश यामध्ये केला आहे. संपूर्ण भारतात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.
जलजीवन हर घर पेयजल देण्याचं जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून पाहिले आणि त्यावर त्यांनी सातत्याने काम करणे सुरू केले आहे. याविषयाचा सर्व नागरिकांना फायदा होतो आहे. हे आम्ही या क्षेत्रात असल्याने दिसून येतो आहे. आणि याच भावनेतून त्यांनी या योजनेचे बजेट 60 हजार कोटींवरून 70 हजार कोटींवर नेले ही मोठी बाब आहे. यामुळे प्लास्टिक उद्योगालाही चांगले दिवस येणार आणि त्यासह शेतकऱ्यांना, नागरिकांना पेयजल मिळेल हे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यासोबत शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन सारख्या विविध योजनांना गतिमान करण्यासाठी जास्त तरतूद केली आहे.
डिजीटल अॅग्रिकल्चर ही कन्सेप्ट सरकारने आणण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे ही चांगली बाब आहे. यात आमच्या कंपनीनेसुद्धा सुरुवात केलेली आहे. अॅग्रीटेक किंवा डिजिटल इन अॅग्रिकल्चर हे शेतकरी आत्मसात करायला लागले आहेत. सध्या निवडक शेतकरी याचा उपयोग करत असून पुढील काळात ही संख्या वाढेल. यामुळे उत्पादन क्षमता वाढून भारताचे नाव या क्षेत्रात अधिक उंचीवर जाईल.
सोबतच हरित क्रांती ही फक्त शेतीमध्येच आतापर्यंत बोलली जात होती परंतु यापुढे ती वाहनांमध्ये येणार आहे. इंधन आतापर्यंत कोळशापासून वेगवेगळ्या माध्यमांपासून बनत होते परंतु सोलरला त्यांनी हरित ऊर्जेत घेतलेले आहे. त्या सोबतच हायड्रोजनचे फ्युएलवर बसेस, ट्रक्स धावणार आहेत. बॅटरी ऑपरेटेड कार्स येत आहेत. इंधनाबाबत एक मोठेपाऊल भारताने उचलले आहे. जगाच्या पाठीवर भारत जगाच्या बरोबर सर्व क्षेत्रात येत आहे. त्यासाठी भारताचे शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, उद्योजक जोमाने कामाला लागलेले आहेत. ह्या वर्षाचे बजेट खूप चांगल्या पद्धतीने सरकारने सादर केलेले आहे. सगळ्यांच्या जीवनात फायदा होणार आहे. सर्व सामान्यांसाठी जे काही टॅक्स बेनिफीट दिलेले आहेत अपेक्षेपेक्षा कमी आहेत परंतु त्यांनी काही तरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून जास्त देण्याचा प्रयत्न केला असता तर मध्यमवर्गीय , नोकरदार, सर्वसामान्य वर्ग अजून आनंदी झाला असता.

  • अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव

आसोदा सार्वजनिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

1985-86 च्या 10 वीचे विद्यार्थी भेटले तब्बल 36 वर्षांनी!

जळगाव दि 29 (प्रतिनिधी) – आसोदा येथील सार्वजनिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या 1985-86 च्या दहावी बॅच स्नेहसंमेलन आसोदा येथील रविंद्र कोल्हे यांच्या शेतात उत्साहात पार पडले. व्यासपीठावर डी. यू. भोळे, डी. सी. भोळे, पी. एच. चिरमाडे सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. डी. राणे सर उपस्थित होते. शाळेचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी तब्बल 36 वर्षांनी पुन्हा भेटले. आपल्या जिवलग मित्र मैत्रिणी व शिक्षक सर्वांच्या चेहर्‍यावर आनंदाचे उधाण आले होते.

“माझे प्रिय विद्यार्थी हो, तुम्ही पन्नाशी पार केलीय आणि आम्ही पंच्याहत्तरी! दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला आज जगण्याचा एक मंत्र देतो, तुम्ही आज पासून आहार निम्मे करा, दुप्पट आनंद वाढवणे, तीन पट चालण्याचा क्रम ठेवा, मन मोकळे करत रहा, सतत भले करत रहा..” असा मोलाचा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. डी. राणे यांनी दिला. यावेळी डी. यू. भोळे सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या खोड्या, व्रात्यपणा आणि गमतीजमती सांगितल्या. यावेळी प्रमोद पाटील, श्यामकांत वाणी, चंद्रकांत पाटील, प्रवीण भोळे, ज्योत्स्ना भोळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आरंभी आपसातील परिचय व स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन दिलीप ब-हाटे यांनी केले, सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले.
चौकट
आम्ही कुठेही असलो, कर्मभूमी, जन्मभूमी असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा गावचे आम्ही आहोत हा अभिमान आहे. या स्नेहसंमेलनास 40 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या जोडीदारासह उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा आजपासून

जळगाव दि.29 – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजेला गांधी तिर्थ येथून ) गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे”ची आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात होणार असून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्राम संवाद सायकल यात्रा १३ दिवस चालणार असून जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक अशा ३० स्वयंसेवकांचा सहभाग निश्चित झाला आहे. ९ वर्षाचा नीर झाला व ७८ वर्षीय अब्दुलभाई तसेच अमेरिकेतील मारिया यांचा यात्रेत समावेश असणार आहे.

यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. तसेच निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा, व्याख्यान, खेळ, नाट्य व पपेट शोचा वापर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची सांगता प्रतिज्ञेने होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्याचे
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे आवाहन

जळगाव– राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विचारांद्वारे भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. व्यक्ती निर्माणातुन राष्ट्र निर्माणाची संकल्पना साकारीत सर्वोदयाचा विचार त्यांनी समस्त जगातला दिला. ३० जानेवारी १९४८ रोजी सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा व मानवतेच्या संदेशाला मानवंदना देण्यासाठी भारतात हा दिवस “हुतात्मा दिन” म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध संस्था, कार्यालये, प्रतिष्ठानांनी व नागरिकांनी उद्या सोमवार दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी दोन मिनिटांचे मौन पाळून राष्ट्रपित्याला श्रद्धांजली द्यावी असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल

जळगाव दि.28 जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् ॲकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या मुलं-मुलीचा संघाने 192 गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकाविले. 80 गुणांसह रत्नागिरी द्वितीय, 72 गुणांसह कोल्हापूर तृतीय, 56 गुणांसह जळगाव जिल्हा चतूर्थ क्रमांकाने विजयी ठरलेत. उत्कृष्ट खेळाडू बिड जिल्ह्याची नयन बारगजे, पुणे जिल्ह्याचा ओम बोरसे यांना सन्मानित करण्यात आले.
तीन दिवस झालेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरणाप्रसंगी अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ.निशा अनिल जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे पुणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खोकावाला जळगाव, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील रायगड, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे,सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अरविंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. निशा जैन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून प्रोत्साहीत केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश घारगे, जयेश बाविस्कर यांच्यासह जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच जैन स्पोटर्स ॲकॕडमीचे सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
सुत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले.

तायक्वांडो स्पर्धा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम द्वारे सेन्सर्सवर घेण्यात आली. यात राज्यभरातुन २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

तायक्वांडो स्पर्धेचा निकाल
मुलं – 55 किलो वजनात आयुष ओहल, पुणे, सुवर्ण पदक, क्रिश बोहर, ठाणे, सिल्व्हर, प्रतिक माळी, सांगली, अभिषेक चौघुले कोल्हापूर ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं – 63 किलो वजनात किरण मंदादे औरंगाबाद सुवर्ण पदक, कृष्णा मिश्रा पुणे सिल्व्हर, यश खराटे मुंबई, अंश गुंडाळे ब्राॅन्झ पदक मिळविले.
मुलं – 73 किलो वजनात जयेश पवार जळगाव सुवर्ण पदक, अमयदेव फुलेर पुणे सिल्व्हर, प्रज्वल दभाळे धुळे, ओम भगतकर यवतमाळ ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं – 78 किलो वजनात अभिषेक सुकाळे पुणे सुवर्ण, ऋतिक कोतकर जळगाव सिल्व्हर, राज रसल रत्नागरी, करण जावळे औरंगाबाद ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं- 78 किलो वजनाच्या वरती अमय सावंत रत्नागिरी सुवर्ण, रोशन वंजाळे पुणे सिल्व्हर, अभिजीत थोरात अहमदनगर, साई वरे ठाणे ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 42 किलो वजनातील वैभवी मेनकुदळे पुणे सुवर्ण, आकांक्षा दर्ड अहमनगर सिल्व्हर, अमृता मंडवे रत्नागिरी, रोशनी चटारे चंद्रपूर ब्रान्झ पदक मिळाले.
मुली – 44 किलो वजनातील तनिषा शिवहरी पुणे सुवर्ण, मयूरी कदम रत्नागिरी सिल्व्हर, दर्शना म्हात्रे मुंबई, साहयता यादव मुंबई ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 46 किलो वजनातील साक्षी पाटील पुणे सुवर्ण, गायत्री शेलार रत्नागिरी सिल्व्हर, श्वेता सावंत उस्मानाबाद, श्रद्धा रमावत अमरावती ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 63 किलो वजनातील सिद्धी बेंडाळे पुणे सुवर्ण, सुहानी धनल कोल्हापूर सिल्व्हर, समृद्धी सांगळे औरंगाबाद, युगा मेश्राम गोंदिया, ब्रान्झ पदक मिळविले.

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेचे जळगावात थाटात उद्घाटन

राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशे हून अधिक खेळाडूंचा जळगाव सामना सुरू

जळगाव दि.27 प्रतिनिधी : ३२ व्या राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आज दि २७ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन संपन्न झाले. राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
दि. 28 पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षपदी जैन इरिगेशन सिस्टीमच्या मिडीया विभागाचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, ताम चे महासचिव तथा सहसचिव तायक्वांडो फेडरेशन आॕफ इंडियाचे मिलिंद पठारे, तामचे उपाध्यक्ष प्रा.डाॕ.अविनाश बारगजे, जैन स्पोटर्स ॲकॕडमीचे अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, ताम सदस्य व्यकंटेश कररा, यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, महेश घारगे, जयेश बाविस्कर, अमोल थोरात, रविंद्र धर्माधिकारी यांनी केले.


जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देताना पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले की, जग अत्याधुनिक होत असताना तायक्वांडो स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येत असून जळगाव सारख्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याचा आनंद पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी व्यक्त केला.
प्रास्तविक विक प्रा.डाॕ.अविनाश बारगजे यांनी केले. सुत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. आभार व्यंकटेश कररा यांनी मानले.

ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट 2.0’ उपक्रम

ई-नोमिनिशनसह अन्य समस्यांवर संपन्न झाली कार्यशाळा

जळगाव दि.27 प्रतिनिधी – कर्मचारी भविष्य निधी संगठन श्रम एवं रोजगार मंत्रालय भारत सरकारतर्फे ‘निधी आपके निकट 2.0’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. हे औपचारिक उद्घाटन दिल्ली येथील मुख्य कार्यालयातुन आॕनलाईन पध्दतीने झाले. याप्रसंगी जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत अवगत केले गेले. कार्यशाळेमध्ये ई-नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ संबंधित बदलत असलेल्या नियमावली व घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेप्रसंगी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य श्री. प्रभाकर बाणासुरे, जैन इरीगेशन सिस्टीम लि.चे श्री. चंद्रकांत नाईक, लघुउद्योग भारतीचे नाशिक विभागाचे सचिव श्री. समिर साने, जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयाचे प्रवर्तक अधिकारी श्री. रमण पवार उपस्थित झाले. नाशिक येथील क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त श्री. अनिलकुमार प्रितम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, उपभोक्ता, सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. वाढीव पेंशन याविषयी सेवाविनृत्त कर्मचाऱ्यांनी कायदेदृष्ट्या झालेल्या बदलांविषयी प्रश्नोत्तर स्वरूपात चर्चा केली. यात त्यांचे शंकांचे निरसन श्री. प्रभाकर बाणासुरे यांनी केले. त्यात त्यांनी ईपीएस-1995 या कायद्याविषयी सविस्तर बारकावे सांगितले. 2014 मध्ये वाढीव पेंशन अंशदानाविषयी कायदेविषयक मार्गदर्शन केले. प्रत्येकाने नविन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे कुठेलेही ईपीएफशी संबंधित फाॅर्म हे आॕनलाईनच भरले जातात, यासाठी निधी आपके निकट 2.0 हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो. भविष्यातील आर्थिक सुरक्षितेसाठी पेंशनधारकांची कर्तव्य त्यांच्यात जनजागृती संबंधी माहिती दिली. सोशल माध्यमांतुन येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन शंकांचे निरसन करण्याचे आवाहन श्री. प्रभाकर बाणासुरे यांनी केले. यामध्ये ई-नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन, एम्पालाॅयर आणि एम्पाॅलय यांनी भरावयाची माहिती, कामगाराच्या मृत्यूपश्चात वारसाला मिळणारा लाभ त्यासाठी करावी लागणाऱ्या महत्त्वाच्या नोंदीविषयी सांगितले. उपस्थितीत आस्थापनांचे प्रतिनिधि यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत व शंका समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण पवार यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी जिल्हा भविष्य निधी संगठन कार्यालयातील अधिकारी शाम दुबे, सोपान विभांडीक, योगेश मदनकर व कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version