दि.8/4/2023 वसंतवाडी तांडा ता.जि. जळगांव या ठिकाणी गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जागतीक बंजारा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला ज्यात व्यसनाधीनता, उच्च शिक्षण, उद्योग,रोजगार या विषयी जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला सूतिहार व पूजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर प्रोजेक्टर लाउन छोट्या पडद्यावर शाब्बास गण्या हा लघुपट दाखविण्यात आला. त्यातून दारू मुळे कुटुंबातील सदस्यांना होनारा त्रास व शिक्षण सुधारणा याबाबत शुभम पवार या पी जी विद्यार्थीने विष्लेषण केले. लघुपट मधील सारांश व्यक्त केला. शुभम पवार हे 3 महिन्यापासून व्यसनमुक्ती वर काम करीत आहेत यांनी ग्रामीण भागातील युवकांना संबोधित करीत दारू, गुटखा, खर्रा याच्या सेवना मुळे होणारे दुष्परिणाम यावर आधारित चित्रफित दाखवून जाणीव करून देण्यात आले. दारूमुळे कुटूंब उद्धवस्थ झाल्याचे उदाहरणे देखील देण्यात आले. त्याचबरोबर शिक्षणांपासून वंचित घटकांना सोबत घेऊन त्यांना देखील शिक्षणांच्या प्रवाहात सहभागी करून सुशिक्षित समाज निर्माण करावा असे ग्रामस्थांना समजवून सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर गिरासे यांनी केले. तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. प्रसंगी गजमल चव्हाण, फुलसिंग पवार,ज्ञानेश्वर चव्हाण,अरुण चव्हाण,बाल गोपाळ ,युवक मित्र, ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेत.
ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन उत्साहात साजरा
जळगाव दि. ७ : महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एकत्रितरित्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.
जैन हिल्स च्या सुधिर बोस सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी ध्यानचंद पुरस्कारार्थी व भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संजय आढाव, राघव पठाडे, सुधीर भालेराव उपस्थीत होते. यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांची उपस्थिती याप्रसंगी होती. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बुद्धिबळ प्रचार-प्रसाराच्या कार्याला अधोरेखित करून ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ या पुरस्काराने श्री. अशोक जैन यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री. मकरंद वेलणकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. त्यात ते म्हणाले, बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला तयार होतील या उद्देशाने पुरस्कार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. श्री. अभिजीत कुंटे यांनी बुद्धिबळमध्ये श्री. अशोक जैन यांच्या कार्याचा आढावा सांगितला. खेळ आणि खेळाडू मोठे झाले पाहिजे या एकाच ध्येयामुळे श्री. अशोक जैन यांनी काम केले आणि करित आहे. त्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते सतत कार्य करीत आहे. आमच्यासारख्या खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहत आहेत. आज महाराष्ट्रात ११ पुरूष व ५ महिला ग्रॅंड मास्टर असून अनेक आंतरराष्ट्रीय पंच झाले आहेत. त्याचे श्रेय हे श्री. अशोक जैन यांनी केलेल्या पायाभूत कार्यात आहे असेही श्री. अभिजीत कुंटे म्हणाले. पुरस्काराला उत्तर देताना श्री. अशोक जैन यांनी लहानपणाच्या बुद्धिबळातील आठवणींना उजाळा दिला. श्री. अभिजीत कुंटे ह्यांनी आपण बुद्धिबळामध्ये कार्य करावे असे सुचविले आणि त्यातूनच पुन्हा बुद्धिबळाकडे वळलो. महाराष्ट्रात चेसिंग स्कूल, चेस लिग सुरू करावे. जेणे करून या स्पर्धात्मक उपक्रमातून चांगल्या गुणवत्तेचे खेळाडू पुढे येतील. सर्वांनी मिळून खेळ वाढविला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सह्याद्री काबीज केला आहे. आता आपण हिमालयाच्या पायथ्याशी आहोत. तोही सर करावा. अशी ही अपेक्षा बुद्धिबळ प्रेरणा दिनानिमित्त आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केली. दरम्यान ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांनी निलेप पाटील, सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी, जयेश सपकाळे, दुर्वेश कोळी, साक्षी शुक्ला, आम्रपाली खरचाणे, आदिती अलाहीत, आरूष सरोदे, मुस्कान जैन, निधी जैन, धीरज मगरे, प्रकाश पाटील, जयेश निंबाळकर या खेळाडूंसोबत एकत्रीतरित्या (सायमन्स टेनिस) एकाच वेळी बुद्धिबळ खेळले. या स्पर्धेत साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली. इंदोर येथील अखिल भारतीय स्तरावरील २००० आतील रेटिंग असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचे सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी यांनी यश प्राप्त केले. त्यामुळे त्यांचा श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, श्री. अभिजीत कुंटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री. नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकिल देशपांडे, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य तेजस तायडे, चंद्रशेखर देशमूख, प्रविण ठाकरे, रविंद्र धर्माधिकारी यांनी श्री. अशोक जैन यांचा सत्कार केला. संजय पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील यांनीही श्री. अशोक जैन यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन नंदलाल गादिया यांनी केले. चंद्रशेखर देशमुख यांनी आभार मानले. नथ्यू सोमवंशी, सोमदत्त तिवारी, आकाश धनगर, संजय काटोले, अजित घारगे, जयेश बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
जळगाव दि. ६ : महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जगभरात प्रख्यात असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या. दि.७ एप्रिल २०२३ रोजी, जैन हिल्स येथे सकाळी १० वाजता होणार आहे. बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला उद्युक्त होईल अशा बुद्धिबळ क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिंचा सन्मान करण्यासाठी ‘महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन’ दरवर्षी ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. बुद्धिबळ प्रसाराल नाविन्याची जोड देणाऱ्या मंदार वेलणकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार सोहळा होत असतो. याची सुरवात २०१७ पासून झाली आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संदीप गोहाड, संजय आढाव, राघव पठाडे यांच्या समितीने सदर पुरस्कार अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांना देण्याचे जाहीर केले. स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य असलेल्या श्री. अशोक जैन यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन आपल्या कुशल नेतृत्त्वाने महाराष्ट्रातील बुद्धिबळ क्षेत्राला एक वेगळी झळाळी मिळवून दिली. त्यामुळे हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.
जैन हिल्स येथे शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ रोजी, सकाळी १०.०० वाजता हा पुरस्कार महाराष्ट्राचे प्रथम ग्रँड मास्टर श्री. अभिजित कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री नंदलाल गादिया यांच्यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
सकल जैन श्री संघ, जळगाव च्या श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२३ तर्फे शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा २६२२ वा जन्मकल्याणक महोत्सव जळगाव मध्ये दि. १ ते ५ एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे. यामध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसा परमो धर्म नुसार प्रत्येकाला जिओ और जिने दो या थीमवर हा महोत्सव सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होईल.
वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. १ एप्रिला ला सकाळी ट्रेझर हंट प्रतियोगिता खान्देश सेंट्रल मॉलला होईल. शुद्ध नवकार मंत्र लेखन स्पर्धा के डी. वी. ओ. जैन महाजन वाडी नवी पेठ येथे होईल. यानंतर ध्वज बनाओ- सजाओ ही स्पर्धा वीतराग भवन लाल मंदिर येथे होईल. तर जैन आगम ही वक्तृत्व स्पर्धा आर. सी. बाफना स्वाध्याय भवन येथे होईल.
विश्व शांतीसाठी अहिंसा दौड
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. २ एप्रिल ला विश्व शांतीसाठी अहिंसा दौड काढण्यात येणार आहे. हजारो समाज बांधवांसह जळगावकर या दौडमध्ये सहभागी होतील. खान्देश सेंट्रल ते नवजीवन सुपर शॉप बहिणाबाई उद्यान पर्यंत ही दौड असेल. यानंतर मोबाईव जलसेवेचे लोकार्पण केले जाईल. आर.सी.बाफना स्वाध्याय भवन येथे भगवान महावीर यांचे ३४ अतिशय या विषयावर लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. कोठारी मंगल कार्यालयाला कार्निवल तर बालगंधर्व नाट्यगृहाला धार्मिक नाटीकेची प्रस्तूती केली जाणार आहे.
रांगोळी स्पर्धेसह मोटार सायकल रॅली
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दि. ३ एप्रिल ला आवश्यकता असणाऱ्यांना फळांचे वाटप जिल्हा रूग्णालयामध्ये केले जाईल. स्वाध्याय भवनला सामुहिक सामायिक होईल. त्यानंतर खान्देश सेंट्रल मॉल ते भाऊंचे उद्यान दरम्याण मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. भगवान महावीर जीवन दर्शन वर आधारीत रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांचा पुरस्काराने बालगंधर्व नाट्यगृह येथे गौरविण्यात येईल. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.
पशु रूग्णवाहिकेचे लोकार्पण, रक्तदान शिबीर
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्य चौथ्या दिवशी दि. ४ एप्रिल ला जैन ध्वज वंदन श्री. वासुपुज्यजी जैन मंदीर याठिकाणी होईल. येथूनच भव्य शोभा यात्रा-वरघोडा मिरवणूक काढण्यात येईल. रक्तदान शिबीरासह आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन बागंधर्व नाट्यगृह याठिकाणी करण्यात आले आहे. अधोरेखित करण्यासारखे म्हणजे पशू रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येईल. मुख्य समारंभा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बीजेएस चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य श्री. संजयजी सिंघी मार्गदर्शन करणार असून ‘बदलते सामाजीक परिवेश में महावीर वचनों की प्रासंगीकता’ या विषयावर ते आपले विचार मांडतील. याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन असतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संघपती श्री. दलिचंदजी जैन, माजी खासदार श्री. ईश्वरलाल ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, उद्योजिका श्रीमती नयनताराजी बाफना, माजी महापौर श्री. रमेशदादा जैन, माजी महापौर श्री. प्रदीप रायसोनी, गोसेवक श्री. अजय ललवाणी, गौतम प्रसादी लाभार्थी श्री. महेंद्र रायसोनी उपस्थीत असतील. मॉडर्न स्कूलच्या प्रांगणात सामुहिक नवकारसी चे लाभार्थी स्व. सदाबाईजी ग्यानचंदजी रायसोनी परिवार द्वारा श्री. महेंद्र रायसोनी हे असतील. यानंतर भगवान महावीर झुला उत्सव साजरा होईल.
प.पू. आचार्च श्री रामलालजी म.सा. जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी दि. ५ एप्रिल ला प.पू. १००८ आचार्य श्री. रामलालजी म.सा. यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा रूग्णालयामध्ये फळ वाटप होईल. यासह आर.सी.बाफना स्वाध्याय भवन येथे गुणानुवाद सभा होईल यात सुसानिध्य शासनदिपक प.पू. सुबाहुमुनीजी म.सा., प.पू. भुतीप्रज्ञजी म.सा. उपस्थित असतील. नवकार महामंत्र जाप ने महोत्सवाची सांगता होईल.
दरम्यान संपूर्ण महोत्सवादरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स व भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे भाग्यवर्धन पार्श्वनाथ मंदिर परिसरात भगवान महावीर यांच्या प्रतिमांची विशेष सजावट केली जाणार आहे. स्वाध्याय मंडलद्वारा निबंध स्पर्धा, जे.पी.पी. जैन महिला फाऊंडेशनद्वारा चित्रकला स्पर्धा, श्रद्धा मंडळाद्वारा कविता बनाओ स्पर्धा, सदाग्यान भक्ती मंडळद्वारा स्वरचित भजन, गायन व्हिडीओ प्रस्तूती, भारतीय जैन महिला संघटनेतर्फे भजन स्पर्धा, जैन सोशल ग्रृपतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतली जाणार आहे.
अहिंसेचा संदेश देण्यासह जगा आणि जगू द्या ही शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांचे विचार प्रत्येक माणसाच्या मनात रूजावे त्यानुसार मन:शांतीतून चांगला समाज घडावा यासाठी सर्व श्री सकल जैन संघासह जळगावकरांनी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात सहभागी व्हावे. असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती २०२३ चे अध्यक्ष विनोद ठोळे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेवेळी श्रीमती नयनतारा बाफना, राजेश जैन, ललित लोढीया, महेंद्र रायसोनी, दिलीप गांधी, स्वरूप लुंकड हे उपस्थित होते.
जळगांव: जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने ३० मार्च गुरुवार रोजी १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. सहा फेऱ्या घेण्यात आल्या या स्पर्धेत १७ वर्षातील वयोगटात जळगावच्या जयेश सपकाळे याने सहा पैकी साडेपाच गुण घेत सरस टायब्रेकच्या आधारे प्रथम क्रमांक पटकावला तर पाचोरा येथील वैभव पाटील याने साडेपाच गुण घेत दुसरा क्रमांक पटकाविला. तर तिसरा क्रमांक श्रेयस उपासनी पाच गुण घेत पटकावला.
तर मुलींच्या वयोगटात पाचोर्याची ऋतुजा बालपांडे हिने तीन गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेचे बक्षीस खेळाडूंना जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर देशमुख, नथू सोमवंशी यांच्या हस्ते देण्यात आले सदर स्पर्धा कांताई सभागृहात घेण्यात आल्या. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस तेरा वर्षे वयोगटात युग कोटेचा भुसावळ, आर्य कुमार शेवाळकर पाचोरा दुर्वेश कोळी जळगाव सोहम चौधरी भुसावळ दर्शन पाटील भुसावल यांना देण्यात आले तर अकरा वर्षे वयोगटात हिमांशू सरोदे भुसावल प्रथम नक्ष झवर जळगाव द्वितीय चरण नाईक पाचोरा नऊ वर्ष गटात रोनित बालपांडे पाचोरा रुजूल सरोदे भुसावल तर सात वर्षे वयोगटात समर्थ पोळ जळगाव यांना देण्यात आले निवड झालेले खेळाडू बुलढाणा येथे दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान होणाऱ्या १७ वर्षातील राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे,नथू सोमवंशी, परेश देशपांडे,सोमदत्त तिवारी यांनी काम पाहिले.
विजय खेळाडूंचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जळगाव येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थीनी सई अनिल जोशी हिची २ ते ८ एप्रिल दरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे आयोजित वुमन एशिया कप सॉफ्टबॉल चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सई जोशी ही या स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन फक्त पाच मुलींची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगावच्या सई जोशीसह स्वप्नाली वायदंडे (कोल्हापूर), ऐश्वर्या बोडके (पुणे), श्रद्धा जाधव (लातूर), ऐश्वर्या भास्करन (मुंबई) यांचा समावेश आहे. सई जोशी हिने यापूर्वी चीन, तैवान येथील स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून आतापर्यंत अनेक वेळा राज्य, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सुवर्ण, सिल्व्हर आणि ब्राँझ मेडल मिळविले आहेत. गत वर्षी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्काराने सई जोशी ला सन्मानित करण्यात आले होते. सई जोशी ही जैन इरिगेशन सिस्टिम्स च्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी व जळगाव जनता बँकेच्या अधिकारी नीलम जोशी यांची कन्या आहे. तिच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
जळगाव दि.२५ – जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकतेच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मराठी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी (दि.२३ मार्च) झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. खान्देशासह महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री क्षेत्र पद्मालय देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जामुळे करता येईल.
पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, जगातील हे एकमेव असे मंदिर आह पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे ज्या संस्कृतमध्ये कमळाचे घर असा अर्थ आहे. या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते. येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे. मंदिरात एकाच व्यासपीठावर डाव्या उजव्या सोंडेचे गणपती आहे.जगात केवळ पद्मालय येथे श्रींच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे. सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे या मंदिराचा जिर्नोद्धार त्यांनी केला असून, गणेश पूराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी ईश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मीती असल्याचेही सांगण्यात येते. येथे ४४० कि.ग्रा. वजनाचा एक भला मोठा घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. याच परिसरात भिमकुंडही आहे.
सदर देवस्थानास ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू होते. आणि त्यास अखेर यश येऊन ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. याकामी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांचा ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यास अत्यंत मोलाचा वाटा व सहभाग आहे, ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती पुर्तता करण्यासाठी ग्रीन स्टोन इंजिनीअरींगच्या आर. एस. महाजन यांनी परिश्रम घेतले आहे.
अनेक वर्षांपासून श्री. गणपती मंदिर देवस्थान पद्मालयला ‘ब’ दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांनी ‘ब’ दर्जा मिळाला आहे. ही आनंददायी बाब आहे. आता लवकरच या परिसरात नियोजीत असलेल्या कामांना वेग देऊन ती पुर्ण होतील व मंदिर आणी परिसराचा विकास होईल. यामुळे या ऐतिहासीक देवस्थानाचा विकास होऊन येणाऱ्या भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल अशी खात्री आहे.
श्री.अशोक जैन , अध्यक्ष, श्री गणपती मंदिर देवस्थान , पद्मालय,
जळगाव दि.२५ : – कंपनी सेक्रेटरीच्या प्रोफेशनल आणि एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅमच्या डिसेंबर २०२२ ला घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कंपनी सेक्रेटरीच्या औरंगाबाद विभागाचे भारतीय कंपनी सेक्रेटरीच्या विभागातील सात विद्यार्थी ही प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना कंपनी सेक्रेटरी म्हणून मान्यता मिळाली आहे. रितू मंडोरे, शुभांगी महाले, आदित्य शर्मा, जागृती देशमुख, युगल पांढरीया, मानसी केसवानी आणि प्रतिक छाजेड यांचा यात समावेश आहे. यापैकी रितू मंडोरे जळगावातील जैन इरिगेशनचे ज्येष्ठ सहकारी प्रविण मंडोरे यांची कन्या आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या यशाबद्दल तीचे अभिनंदन केले आहे.
संपूर्ण भारतातून राष्ट्रीयस्तरावर प्रोफेशनल परीक्षेत १४.२२ टक्के विद्यार्थी मॉड्युल एक पास झाले, १४ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले आणि १३.८५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल ३ पास झाले आहेत. कोलकत्ताच्या चिराग अगरवालने पहिली रँक मिळवली आहे. म्हणजेच तो प्रोफेशनल परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम आला आहे. एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅम परीक्षेत ९.०५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल १ पास झाले आणि १२.३२ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले. कोलकत्ताच्याच किंजल अजमेराने भारतीयस्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे.
जळगाव, दि. २४ : शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मोहिमेत सहभागी होत महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी आज शिरसोली रोड परिसर, कृष्णा लॉंन परिसर, गणपती मंदिर परिसर व जकात नाक्याचा श्वास मोकळा केला. रस्त्याच्या शेजारी साचलेला प्लास्टिक, जैविक कचरा असा सुमारे ८ टन कचरा संकलित केला. त्यामुळे या परिसराचे रूप पालटले. चार तासांच्या या मोहिमेत १०० हून अधिक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यस्थापन महाविद्यालयाने जळगाव शहरातील विविध अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याचा कृतिशील उपक्रम राबवण्याचा वज्रनिर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने शिरसोली रोड परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला. सकाळी दहा वाजता रायसोनी महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांनी ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ ही जनजागृती फेरी काढली. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते या फेरीचा प्रारंभ झाला. या अनुषंगाने शिरसोली रोडवर हि फेरी निघाली. जळगाव शहर स्वच्छतेचे आवाहन करत ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ असा संदेश जनजागृती फेरीतून देण्यात आला. त्यानंतर शिरसोली रोड परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. येथील परिसरात कित्येक दिवसांपासून कचरा साचल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती.
पुढील काळात स्वच्छतेचे महत्त्व जपत शिरसोली रोडसह जळगाव शहरातील विविध भागाच्या संवर्धनाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वसिम पटेल, प्रा. राहुल त्रिवेदी व गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, हेमंत बेलसरे हे या उपक्रमावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.
आयुक्त्तांची तत्परता…
विद्यार्थी, स्वयंसेवकांच्या स्वच्छतेनंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या उपक्रमाच्या समन्वयकांनी जळगाव शहराच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना संपर्क साधला असता, डॉ. विद्या गायकवाड यांनी तत्काळ तिथे कचरा गाडीच्या सहाय्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावली.
जळगांव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहे काल व आज जळगांव संघाचा अंतिम साखळी सामना पि डी सी ए पुणे यांच्या विरुद्ध खेळण्यात आला. एम.सी. ए च्या सर्वोच्च समिती सदस्य श्री सुशील शेवाळे यांचा सत्कार सचिव श्री अरविंद देशपांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यानंतर अरविंद देशपांडे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली पी डी सी ए पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु पुणे संघा हा निर्णय जळगावच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला व पुणे संघ केवळ २०.५षटकात सर्व गडी बाद ८५ धावा करू शकला, त्यात सुधाकर भोईटे २८ व सुजित उबाळे २० आणि संकेत हांडे यांनी १० धावा केल्या गोलंदाजीत जळगांव संघातर्फे शुभम शर्मा व ऋषभ कारवा यांनी प्रत्येकी तीन आणि जेसल पटेल यांनी दोन गडी बाद केले. प्रतिउत्तरात जळगांव संघाने ५५.२ षटकात सर्व गडी बाद ३१३ धावा केल्या त्यात तनेश जैन ८४ शुभम शर्मा ६४ आणि साहिल गायकर यांनी ४६ धावा केल्या आणि जळगांव संघाने पुणे संघावर २२८ धावांची महत्वपूर्ण विजयी आघाडी घेतली. पुणे संघातर्फे गोलंदाजीत योगेश चव्हाण तिन व गौरव जोटशी आणि अमित पवार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. २२८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पुणे संघाचा दुसरा डाव केवळ ३४.३ षटकात फक्त १४२ धावात गारद झाला. गोलंदाजीत जळगाव संघातर्फे राहूल निमभोरे पाच जगदीश झोपे तिन जेसल पटेल आणि ऋषभ कारवा प्रत्येकी एक गडी बाद केले आणि हा सामना जळगांव संघाने एक डाव ८६ धावांनी जिंकला व बोनस गुणा सहित सात गुण कमवीत आपल्या गटात दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरला व अव्वल साखळी फेरीसाठी पात्र ठरला आहे ह्या सामन्यात पंच म्हणून घनःश्याम चौधरी आणि संतोष बडगुजार व गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पाहिले. विजयी संघाचे जलगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व संपूर्ण कार्यकारणी मंडळाने अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत