तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी येतील? EPFO कडून मोठे अपडेट

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्य अनेक दिवसांपासून त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. अशा ग्राहकांसाठी EPFO ​​कडून एक मोठे अपडेट प्राप्त झाले आहे. जुलैपर्यंत EPFO ​​सदस्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे पोहोचू शकतात. यासाठी वित्त मंत्रालयाकडून लवकरच अधिकृत माहिती जारी केली जाऊ शकते.

आपणास कळवू की केंद्रीय विश्वस्त मंडळ, EPFO ​​च्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेने फेब्रुवारीमध्ये FY 24 साठी 8.25% व्याजदर मंजूर केला होता, परंतु ते अद्याप वित्त मंत्रालयाकडून अधिसूचनेची प्रतीक्षा करत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, सार्वत्रिक निवडणुकांमुळे याला विलंब झाला आहे. आता हे काम जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पैसे आले आहेत हे कसे कळणार?
तुम्ही तुमच्या EPF खात्याचे पासबुक तपासत राहिल्यास, तुम्हाला कळेल की तुमचे EPF व्याजाचे पैसे आले आहेत की नाही. मिस्ड कॉल किंवा एसएमएससारख्या सुविधांद्वारे तुम्ही ईपीएफओ पोर्टलद्वारे ईपीएफ पासबुक तपासू शकता.

1. EPFO ​​पोर्टलवर पासबुक कसे तपासायचे
पायरी 1- सर्वप्रथम, EPFO ​​पोर्टल https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा. यासाठी तुम्ही तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) सक्रिय केलेला असणे आवश्यक आहे.

पायरी 2- साइट उघडल्यानंतर, ‘आमच्या सेवा’ टॅबवर जा आणि नंतर ‘कर्मचाऱ्यांसाठी’ ड्रॉप-डाउन मेनू निवडा.

पायरी 3- सेवा स्तंभाच्या खाली असलेल्या ‘सदस्य पासबुक’ वर क्लिक करा.

स्टेप 4- पुढील पेजवर तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड टाकावा लागेल. कॅप्चा प्रविष्ट करून लॉग इन करा.

स्टेप 5- लॉग इन केल्यानंतर मेंबर आयडी टाका. यानंतर तुमची ईपीएफ शिल्लक दिसेल.

2. मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ पासबुक कसे तपासायचे
तुम्ही 011- 22901406 वर मिस्ड कॉल देऊन तुमची EPF शिल्लक तपासू शकता. कॉल केल्यावर, तुम्हाला एक एसएमएस मिळेल ज्यामध्ये तुमची शिल्लक दिसून येईल. यासाठी तुम्हाला ईपीएफ खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. तुमचा पॅन आणि आधार क्रमांकासोबत तुमचा बँक खाते क्रमांक देखील तुमच्या UAN शी जोडला गेला पाहिजे.

3. एसएमएसद्वारे कसे तपासायचे?
मिस्ड कॉल सेवेप्रमाणे, तुमचे सर्व महत्त्वाचे दस्तऐवज UAN शी लिंक केले पाहिजेत, तरच तुम्ही ही सेवा वापरू शकाल. यासाठी तुम्हाला ७७३८२९९८९९ या क्रमांकावर EPFOHO UAN ENG (किंवा ENG ऐवजी तुम्हाला ज्या भाषेत संदेश हवा आहे त्याचा कोड लिहा) एसएमएस करावा लागेल.

म्हातारपणी कोणाकडून पैसे मागावे लागणार नाहीत, करोडोंचे मालक व्हाल

खासगी नोकरी करत असताना सुरुवातीपासूनच निवृत्तीचे नियोजन करणे शहाणपणाचे असते. अशा परिस्थितीत तुम्हाला गुंतवणुकीसाठी चांगला वेळ मिळतो आणि वृद्धापकाळासाठी तुम्ही तुमचा तिजोरी सहज भरू शकता. आज अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. अशा स्थितीत तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके जास्त पैसे जोडता येतील.

म्युच्युअल फंड एसआयपी ही त्यापैकी एक योजना आहे. बाजारपेठेशी जोडलेली असूनही ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवण्याच्या तुलनेत, जोखीम काहीशी कमी असते. तसेच, एखाद्याला दीर्घकाळात रुपयाच्या सरासरी खर्चाचा लाभ मिळतो. SIP चा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. अशा परिस्थितीत, या योजनेच्या मदतीने, गुंतवणूकदारांची संपत्ती निर्मिती जलद होते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फक्त 2000 रुपयांपासून सुरू करून SIP द्वारे करोडो रुपये जोडू शकता.

काय करावे ते जाणून घ्या
जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नोकरीसोबतच त्यातही गुंतवणूक सुरू करावी लागेल. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला सेवानिवृत्ती फंड तयार करण्यासाठी 35 वर्षे मिळतील कारण तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक कराल. याशिवाय, जलद पैसे कमवण्यासाठी, तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे तुम्हाला दरवर्षी गुंतवणुकीच्या रकमेवर 10 टक्के टॉप-अप करावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 2000 रुपये गुंतवायला सुरुवात केली तर तुम्हाला एका वर्षासाठी 2000 रुपये जमा करावे लागतील आणि पुढील वर्षी रक्कम 10% ने वाढवावी लागेल. अशाप्रकारे तुमचा पगार वर्षानुवर्षे वाढत असताना तुम्हाला गुंतवलेल्या रकमेत दरवर्षी १० टक्के वाढ करावी लागेल.

उदाहरणासह समजून घ्या

समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी 2000 रुपयांची SIP सुरू केली. सुरू केल्यानंतर, तुम्हाला या खात्यात संपूर्ण वर्षभर फक्त 2,000 रुपये जमा करावे लागतील. पुढील वर्षी 2000 च्या 10 टक्के म्हणजेच 200 रुपये वाढवावे लागतील. अशा प्रकारे, पुढील वर्षी ही एसआयपी रु. 2,200 असेल. पुढील वर्षी तुम्हाला 2,200 रुपयांच्या 10 टक्के दराने 220 रुपये वाढवावे लागतील, अशा स्थितीत तुमची एसआयपी 2,420 रुपये होईल. अशाप्रकारे, दरवर्षी तुम्हाला सध्याच्या रकमेत 10 टक्के वाढ करावी लागेल आणि 60 वर्षे हे सतत करावे लागेल.

अशा प्रकारे ₹ 3,55,33,879 जोडले जातील
तुम्ही 2000 रुपयांपासून सुरू होणाऱ्या SIP मध्ये 10 टक्के वार्षिक टॉप-अप करून 35 वर्षे गुंतवणूक केल्यास, तुमची एकूण गुंतवणूक रु. 65,04,585 होईल. 12 टक्के सरासरी परतावा पाहिल्यास, तुम्हाला फक्त व्याजातून 2,90,29,294 रुपये मिळतील. गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह, तुमच्याकडे ३५ वर्षांनंतर एकूण ३,५५,३३,८७९ रुपये असतील. जर तुम्हाला या गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज मिळाले तर नफा जवळपास दुप्पट होईल आणि तुम्हाला एकूण 6,70,24,212 रुपये होतील.

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा

जळगाव दि. २१ (प्रतिनिधी) –  जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व  आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर हीच खरी संपत्ती होय. कितीही संपत्ती कमावली व आपले शरीर स्वास्थ उत्तम नसेल तर त्या संपत्तीची किंमत शून्य असते. या विचारातून आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी, नियमित योग आणि व्यायामास प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. जैन इरिगेशनतर्फे दरवर्षाप्रमाणे ‘जागतीक योग दिवसा’च्या औचित्याने जनजागृती करण्यात आली. यात नियमित योग करण्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

प्रश्वास म्हणजे हृदयाची विश्रांती होय – सुभाष जाखेटे

योग ही आजच्या धकधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये अतिशय आवश्यक साधना आहे. योगाद्वारे  शरीर आणि मनाचे ताणतणाव दूर होऊन आपला श्वास दीर्घ होतो त्यामुळे मन:शांती सोबत हृदयालासुद्धा विश्रांती मिळते. प्राणायाम आणि ध्यान करताना हाताच्या मुद्रेला महत्त्वाचे स्थान आहे. अंगठा हे परमतत्वाचे त्याच्या बाजूला असलेली तर्जनी आत्मतत्वाचे प्रतिक असते. परमतत्त्वाखाली लीन करणं आणि रज तम जस गुणाचे ती बोटे सोडून देणे या मुद्रेला अतिशय महत्त्व आहे असे सांगत सुभाष जाखेटे यांनी प्लास्टीक पार्क मधील सहकाऱ्याकडून योगसाधना करुन घेतल्यात. अंगूलीमुद्रा, ओमकारसह बिहार स्कूल ऑफ योगाचे त्रिकुट मुद्रा (टिटिके)  ही आसने करुन घेतली. खांदा, मान, पाठीचा कणा यासाठी नियमित करता येणारी योगाअभ्यासही समजून सांगितला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनीही नियमीत योग करण्याचा संकल्प केला. यावेळी जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक यांच्या उपस्थित हा योगाभ्यास झाला. याप्रसंगी डॉ. राजकुमार जैन, आर.एस. पाटील, युवराज धनगर, अनिल जैन यांच्यासह मानव संसाधन विभागातील सहकारी उपस्थित होते.

जैन फूडपार्कमध्ये ११०० सहकाऱ्यांनी केला योगाभ्यास…

‘कंपनीत काम करणारा माझा प्रत्येक सहकारी सृदृढ असावा त्याला व्यसने नसावीत ही भावना कंपनीचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांची होती. चांगल्या हृदयासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आपण दररोज किमान अर्धा तास योग करावा.’ असे आवाहन योग शिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांनी केले. जैन अॅग्रिपार्क, जैन फूड पार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांसाठी सकाळी ८ वाजता जागतिक योग दिवसाच्यानिमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला त्याप्रसंगी त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधला.

आरंभी बायो एनर्जी विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री राणे यांच्याहस्ते योगशिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांचे स्वागत केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कंपनीचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी केले. सहकाऱ्यांशी प्रात्यक्षिक साधत सूर्य नमस्कार, झुंबा, सूक्ष्म व्यायाम, प्राणायम, योग्य पद्धतीने ओमकारचा करावयाचा उच्चार या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. टिश्युकल्चर लॅबमधील महिला सहकारी देखील हिरीरीने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुमारे ११०० सहकाऱ्यांनी योगाभ्यास करून घेतला. महिला सहकाऱ्यांना वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने कार्यक्रमात शुभेच्छा ही देण्यात आल्या. यावेळी योग विषयक शंकांचे समाधानही करून घेतले. जी.आर. पाटील, राजेश आगीवाल, एस.बी. ठाकरे, भिकेश जोशी, वैभव चौधरी, अजय काबरा, धीरज जोशी, सुचेत जैन, दिनेश चौधरी, बी.एम. खंबायत यांनी परिश्रम घेतले.

जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) – ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच रामकृष्ण हरी, आदी शक्ती मुक्ताबाई की जय हा जय घोष…’ यामुळे जैन हिल्स येथील व्हीआयपी गेटचा परिसर भक्तीमय झाला नाही तर नवलच! हा प्रसंग आहे श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेशद्वारा संचालित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीच्या स्वागताचा!

गेल्या दोन दशकांहून अधिक वर्षांपासून श्रीराम मंदिर संस्थानच्या पंढरीसाठी निघालेल्या पायी  पालखी, वारीचे स्वागत पौर्णिमेच्या नियोजित दिवशी करण्यात येते. रितीरिवाजानुसार जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे जैन परिवारातील सौ. ज्योती अशोक जैन, सौ. निशा अनिल जैन, सौ. शोभना अजित जैन तसेच  अथांग व सौ. अंबिका जैन यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन परिवारातील सदस्यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा केली. त्यानंतर सुलभा जोशी, मानव संसाधन विभागाचे पी. एस. नाईक, जी आर पाटील, एस. बी, ठाकरे, राजेश आगीवाल, सिक्युरिटी विभागाचे प्रमुख आनंद बलौदी,  आर. डी. पाटील, एम.पी बागुल, संजय सोनजे, अजय काळे, जीआरएफचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार, समन्वयक उदय महाजन, डॉ. आश्विन झाला, अब्दुलभाई, गिरीश कुळकर्णी यांच्यासह जैन हिल्स येथील सुमारे ४०० स्त्री-पुरुष सहकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. मेहरुणच्या शिवाजी उद्यानातील संत मुक्ताबाई मंदिरात पुजेचा मान जैन इरिगेशनला दिला जातो. यावर्षी कंपनीच्यावतीने सहकारी अनिल जोशी यांच्याहस्ते ही पूजा केली गेली.

कंपनीच्यावतीने राजाभोज खानपान विभागाचे प्रमुख विजय मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी भीमराव दांडगे व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच दिंडीची उत्तम क्षणचित्रे उपयोगात आणून कला विभागातर्फे  उत्तम अशी सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता करून दिली आहे, हे वाहन पालखी बरोबरच जाईल. या पालखीची स्थापना १७९४ला झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातीथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते.

आजच्या या स्वागताचे वैशिष्ट्य असे की, आध्यात्म आणि पायी चालण्याचे, वारीचे महत्त्व प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना समजावे यासाठी डॉ. अविनाश आचार्य स्कूल, भ.गो. शानभाग स्कूल आणि काशिनाथ पलोड हायस्कूच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग करून घेण्यात आला होता. वारकरी स्त्री-पुरुष पारंपरिक वेषात सहभागी विद्यार्थ्यांमुळे वारीला खरा अर्थ प्राप्त झाला.

अनुभूती इंग्लिश स्कूलच्या पहिल्या इयत्तेतील शिशूंचे स्वागत

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लीश मीडियम स्कूलची स्थापना केली. या शैक्षणिक वर्षातील पहिल्या इयत्तेतील शिशुंची शाळा सुरू झाली. पारंपरिक पोषाख घातलेल्या वाद्य शहनाईच्या मंगलमय स्वरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक विद्यार्थ्याला गोड खाऊ, फुल देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात साजरा केला गेला. सर्व शिक्षकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा जवळ फुग्यांनी आकर्षक सजावट केली होती. शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे तिलक लावून औक्षण केले. वर्ग खोल्या छान सजवून, विविध रंगी फुगे, कार्टुन्स लावून सुशोभित केल्या होत्या. शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळ्या काढून आवार सुशोभित करण्यात आला होता. आरंभी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी लाहोटी यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले. आयोजित स्वागताचा कार्यक्रम स्कूलच्या हॉलमध्ये आयोजला होता. यावेळी पालकांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत आपल्या मुलांचे या शाळेत उत्तम भवितव्य घडेल यासाठी जैन परिवाराचे ऋण व्यक्त करण्यात आले. शाळेत सिनियर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युनिअर्सचे गाणे, नृत्य, एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून स्वागत केले. सूत्रसंचालन पल्लवी साळुंखे, हर्षा वाणी यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा संगिता पाटील सांगितली व आभरप्रदर्शन मनिषा मल्हारा यांनी केले.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेनुसार पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत व्हावे या नुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज दाडकर, रुपाली वाघ, अरविंद बडगुजर, सीमा गगवाणी, ज्ञानेश्वर सोनवणे, कोमल सलामपुरिया, योगिता सुर्वे, राजश्री कासार, भूषण खैरनार, मधु लुल्ला,पूजा पाटील, लिन्ता चौधरी,  उज्ज्वला तळेले, सुकिर्ती भालेराव यांचा सहभाग होता.

अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती 

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) – ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. अनुभूती निवासी स्कूलमध्ये “शरण संकुल” या नृत्य नाट्यांतर्गत वचननृत्य, मल्लखांब, मल्लीहग्गा या  रंजक कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशन व अनुभूती स्कूलच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, स्कूलचे प्राचार्य देबाशिस दास उपस्थित होते.

आरंभी श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उपस्थित उपरोक्त मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.  संगीत, वचन नृत्य, नाट्य या सोबतच चित्त थरारक मल्लखांब तसेच मल्लीहाग्गा यांच्या प्रात्यक्षिकांमुळे १३ जूनची सायंकाळ उपस्थितांसाठी समृद्ध झाली. श्री. तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ यांच्या अखत्यारीत असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील १२० हून अधिक विद्यार्थी – विद्यार्थीनींनी सांस्कृतिक समृद्धी व कलात्मक उत्कृष्टतेने परिपूर्ण असे अनोखे सादरीकरण केले. आरंभी ‘यक्षगान’ झाले. हा उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यांचा एक प्रसिद्ध कला प्रकार आहे. ही नृत्य आधारित कला सुरुवातीला स्थानिक शैलीत होती, परंतु नंतर ती विविध प्रकारांमध्ये मिसळली गेली. गाणे, नृत्य, वेशभूषा, भाषण आणि वाद्ये या पाच भागांचा समावेश असलेली ही कला नवरसावर आधारित आहे.

यक्ष, गंधर्व, किन्नर, किंपुरुष यांसारख्या वेशभूषा, चंदे वाजवण्याचे सूर, भगवतांचे गायन, दानवांच्या चेहऱ्यावरील हावभाव इत्यादींमुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची अनोखी ताकद या कार्यक्रमात आहे. डॉ. के शिवराम कारंथजी यांनी या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. मल्लखांब हा भारतातील सर्वात प्राचीन सांप्रदायिक खेळांपैकी एक आहे. १२ व्या शतकातील चालुक्य समत सोमदेव यांच्या ‘मनसोल्लासा’ या ग्रंथात या खेळाचा उल्लेख आहे. १९ व्या शतकात मराठा पेशव्यांच्या दरबारातील राजे पुरोहित श्रीगुरु दादा देवधर बालभट्ट यांनी हे मल्लखांब सर्वप्रथम सुरू केले. पुढे मराठी माणसांनी त्याला अधिक प्रसिद्धी दिली. मल्लीहाग्गा हा मल्लखांब प्रमाणे कसरतीचा प्रकार आहे मल्लीहाग्गा म्हणजे वरून टांगलेली दोरी. त्या दोरीवर चढून विविध आसने, चित्तथरारक कसरती सादर होतात.

शरण संकुल हा नृत्य नाटिकेतून अक्कम महादेवी,अल्लामप्रभू, बसवण्णा किंवा बसवेश्वर यांचे जीवन दर्शन घडविणारा आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला गेला. यावेळी अतुल जैन यांनी कलाकार व त्यांच्या शिक्षकांचा सत्कार केला. दीड तासाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने कलाअनुभूती घेतली.

मदन लाठी यांचे जागतिक रक्तदाता दिवशी ८८ वे रक्तदान

१४ जुन हा दिवस “जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून साजरा केला जातो , या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे आयोजित केले होते . त्यात प्रथम जिल्हाधिकारी आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे अध्यक्ष आदरणीय श्री आयुष प्रसाद सरांनी , इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष श्री गंनी मेनन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी श्री मदन रामनाथ लाठी यांनी आज आपले ८८वे रक्तदान केले
रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.

दर तीन महिन्यांनंतर डॉ च्या सल्ल्यानुसार करणारे एक नियमित रक्तदाते आहेत.
दिनांक १५ मार्च २०२४ रोजी मदन लाठी यांनी आपले ८७ वे रक्तदान पुर्ण केले. बऱ्याच दिवसांपासून ते दर तीन महिन्यांनंतर नियमित रक्तदान डॉ च्या सल्ल्यानुसार नियमित करीत आहे.

मागील रक्तदान केलेला दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस १२ डिसेंबर २०२३ सर्वांचे प्रेरणा स्थान असलेले & जैन उद्योग समुहाचे संस्थपाक आदरणीय मोठे भाऊ ( कै भवरलाल जैन ) चा ८६ वा वाढदिवस & जैन इर्रीगेशन चे सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान हा एक योग योगच म्हणावा लागेल.

आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले असून त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे याना & इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले असून त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते त्यात माहेश्वरी युवा संघटना, महाराष्ट्र & विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला होता २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनादिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते

१ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविन्द सरांचा ७६ वा वाढदिवस & मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान पुण्यात पिंपरी चिंचवड येथील शासकीय वाय सि एम मध्ये केले होते त्यावेळी राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी मदन लाठी यांचे उपक्रमाबद्दल मेल द्वारे अभिनंदन केले होते
२०१९ मध्ये आपल्या देशाचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन सर आणि महाराष्ट्र शासनाचे /राज्यातील विविध सचीव यांनी सुध्दा या उपक्रमाबद्दल अभिनंदन केलेले होते आणि करत आहेत.
असे विविध प्रसंगीं मदन लाठी रक्तदान करी असून वयाच्या ६५ वर्षापर्यंत आणि डॉ च्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत

शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी):–  भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतिलालजी जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार ११ जून २०२४ रोजी मुंबई येथील ताज लॅण्डस् एंड वांद्रे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यात जे.बी.  प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अॅप्रिसिएशन’ने गौरविण्यात आले.

ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम रहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जे.बी. प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ठ कार्य करणाऱ्या (महिला विभाग) श्रीमती शकुंतला कांतिलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे. त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न  प्लास्टिक  इंडिया  या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरवान्वित केले. योगा योगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जे.बी. प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरविण्यात आले. लघु आणि मध्यम उद्योग या विभागांतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगिरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन, वडील कांतिलालजी जैन तसेच  कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जे.बी. प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजींग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके


मुंबई/जळगाव दि. ०७ (प्रतिनिधी) – जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून 2021-22 व 2022-23 अशा दोन वर्षांसाठीचे प्लेक्स कौन्सिलचे एकूण सहा निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष अतिथी  म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते. यावेळी  प्लेक्स कौन्सिलचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, व्हॉईस चेअरमन विक्रम भदूरीया आणि उद्योजक  एम ,पी तापडिया या  मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा ग्रँड नेस्को सेंटर मुंबई येथे संपन्न झाला.
कृषी व कृषीपूरक उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत 2021-22 या वर्षासाठी जैन ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.  2022-23 या वर्षासाठी ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते  जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. एम. बऱ्हाटे, डॉ. कल्याणी मोहरीर, अतिन त्यागी आणि नरेंद्र पाटील यांनी कंपनीच्यावतीने हे पुरस्कार स्वीकारले.

भारतात प्लास्टिक उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. या क्षेत्रात अजून प्रगती करायची असेल तर संशोधन आणि विकास कार्यावर भर देणे आवश्यक आहे. महाविद्यालय, युनिर्व्हसिटीमध्ये प्लास्टिक विषयक अभ्यासक्रम सुरू करणे उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले, प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे 1955 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे 1991 पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.

कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय मोठेभाऊ अर्थात भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, “गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनच्या कार्याला अधोरेखित करून 1991 पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान असल्याचे मी मानतो.” –  अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

 जळगाव, दि. ८ प्रतिनिधी  :- अल्माटी,कझाकस्तान येथे  ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या मान्यतेने आणि कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाच्या प्रयत्नातून आयोजित या स्पर्धेत जवळपास ३५ देशांमधून ६४० खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे.

या आशिया खंडातील महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावमधून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण देवचंद ठाकरे यांना क्षेत्र पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई, वर्ल्ड ज्युनियर आणि जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम केले आहे. भारतभरातून सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून बहुमान मिळवणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

आठ, दहा, बारा, चौदा, सोळा व अठरा अशा विविध वयोगटात स्पर्धा खेळविली जाणार असून  स्विस् लिग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यांअंती अंतिम विजेते घोषित केले जातील. भारताकडून आपले खेळाडू यात सहभागी असून पदकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रवीण देवचंद ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक,संयोजक,प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात.

या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे जिल्हा संघटनेचे व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. या त्यांच्या यशासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख,पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील,जैन स्पोर्ट्सचे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अजित घारगे,नरेंद्र पाटील,संजय पाटील,यशवंत देसले,तेजस तायडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रविण ठाकरे यांना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके,कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे,नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी बी भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version