देशात इंधनाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे इंधनाचे दर दोन रुपयांनी जरी कमी झाले तरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मोठे वक्तव्य केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना, येत्या पाच वर्षात देशातून पेट्रोल संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावर बंदी घालण्यात येईल.
अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 36 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी हजर होते.
गडकरी म्हणाले की, आता विदर्भात तयार होणारे बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते 70 रुपये प्रति किलो दराने विकता येते. येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल, असे गडकरी म्हणाले. केवळ गहू, तांदूळ, मका लावून कोणताही शेतकरी आपले भविष्य बदलू शकत नाही, असे ते म्हणाले. गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा प्रदाता बनण्याची गरज आहे.
इथेनॉलमुळे 20,000 कोटी रुपयांची बचत होते :-
गडकरी म्हणाले की, इथेनॉलच्या निर्णयामुळे देशाचे 20,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील.
विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना असून त्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठ बरेच काही करू शकते.