ट्रेडिंग बझ – तुम्हीही सोने खरेदीसाठी धनत्रयोदशी किंवा दिवाळी ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. या सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते. सोन्याचा पुरवठा हे त्याचे प्रमुख कारण आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, भारताला बँकांकडून पुरवल्या जाणाऱ्या सोन्यात मोठी कपात झाली आहे. म्हणजेच सणासुदीच्या काळात मागणी वाढली असली तरी भारताला गरजेपेक्षा कमी सोने मिळत आहे.
ही कटौती का झाली ? :-
रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारत ज्या दराने सोने खरेदी करत आहे त्यापेक्षा चीन आणि तुर्कीसारखे देश जास्त किंमत मोजत आहेत. अधिक नफा मिळविण्यासाठी बँकांनी सोन्याचा पुरवठा चीन आणि तुर्कीकडे वळवला आहे. गेल्या वर्षी, सोने भारतीय ग्राहकांनी $4 प्रति औंस या प्रीमियमने खरेदी केले होते. जो आता 1 ते 2 डॉलर प्रीमियमवर आला आहे. चीनचे सर्वोच्च ग्राहक भारताच्या तुलनेत $20 ते 45 चा प्रीमियम ऑफर करत आहेत. त्याच वेळी, तुर्की $ 80 चा प्रीमियम ऑफर करत आहे. यामुळेच भारतातील सोन्याची आयात 30 टक्क्यांनी घटली आहे. त्याच वेळी, तुर्कीच्या सोन्याची आयात 543 टक्क्यांनी वाढली आहे आणि हाँगकाँगमार्गे चीनमध्ये पोहोचणारे सोने ऑगस्टमध्ये 40 टक्क्यांनी वाढले आहे.
सोन्याचा साठाही कमी झाला :-
रॉयटर्सला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतातील ग्राहकांकडे 10 टक्के सोने कमी आहे. एका अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, “वर्षाच्या या वेळी दरवर्षी काही टन सोने शिल्लक होते. मात्र यावेळी ते किलोमध्ये आहे. दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरू होईल. या काळात भारतीय बाजारात सोन्याची मागणी वाढते.
आजचा भाव :-
IBJA वर दिलेल्या ताज्या दरांनुसार, मंगळवारी सोन्याच्या भावात 899 रुपयांची उसळी पाहायला मिळाली होती. दुसरीकडे, चांदीचा स्पॉट भाव 3717 रुपयांनी वाढून 61034 रुपये प्रति किलोवर बंद झाला. मंगळवारी सकाळी सोन्याचा भाव 782 रुपयांनी महागला आणि तो 51169 रुपयांवर उघडला, तर चांदी 3827 रुपयांनी महाग होऊन 61144 रुपयांवर उघडली. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51286 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. गेल्या 5 व्यापार सत्रांमध्ये सोने 1801 रुपयांनी महागले असून तो 49368 रुपयांवरून 51169 रुपयांवर पोहोचला आहे