जळगाव : शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यानी त्यांचे ई केवायसी प्रमाणीकरण केलेले नाही अशा लाभार्थ्यांकरीता प्रमाणीकरण पुर्ण करण्यास दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थी शेतक-यांना ई केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
ज्या लाभार्थी शेतक-यांचा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न केलेला असेल अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर मधील ई केवायसी या टॅब मधुन ओटीपी द्वारे लाभार्थ्यांना स्वतः ई केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. तसेच ई केवायसी करतांना काही तांत्रिक अडचण येत असल्यास लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन सीएससी बायोमॅट्रिक पध्दतीने प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15/- मात्र निश्चित करण्यात आला आहे. तरी जिल्हयातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत आपले e-KYC प्रमाणीकरण पूर्ण करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.