ट्रेडिंग बझ –T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे होणार आहे. जेतेपदाच्या सामन्यापूर्वी आयसीसीने अंतिम सामन्याच्या खेळण्याच्या स्थितीत काही बदल केले आहेत. रविवारी होणाऱ्या या महान सामन्यावर पावसाचा धोका आहे. अशा परिस्थितीत हवामान लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने राखीव दिवसासाठी (14 नोव्हेंबर) अतिरिक्त वेळेत वाढ केली आहे.आयसीसीच्या निवेदनानुसार, इव्हेंट टेक्निकल कमिटीने (ETC) निर्णय घेतला आहे की, सामना पूर्ण करण्यासाठी आणि निकाल मिळविण्यासाठी अधिक वेळ लागल्यास राखीव दिवसाची अतिरिक्त खेळण्याची वेळ दोन ते चार तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
लीग सामन्यांमध्ये सामन्याच्या निकालासाठी किमान 5 षटके खेळणे आवश्यक असते, तर बाद फेरीत, किमान 10 षटकांच्या खेळानंतरच सामन्याचा निकाल लावणे शक्य होते. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, नियोजित सामन्याच्या दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या दरम्यान, आवश्यक षटके देखील कापली जातील, परंतु निर्धारित दिवशी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर सामना राखीव दिवशी जाईल.
सध्या मेलबर्नमध्ये रविवारी पावसाची 95 टक्के शक्यता असून, 25 मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याचे म्हणणे आहे, ‘पावसाची शक्यता खूप जास्त आहे (सुमारे 100 टक्के). मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता खूप जास्त आहे.’ दुर्दैवाने सोमवारच्या सामन्याच्या ‘राखीव दिवसा’मध्येही पाच ते दहा मिमी पाऊस पडण्याची 95 टक्के शक्यता आहे. अंतिम फेरीसाठी स्पर्धेचे नियम असे की प्रत्येक संघाने बाद फेरीच्या सामन्यात किमान 10 षटके खेळली पाहिजेत. जर दोन्ही दिवस पावसाने खेळ केला नाही तर इंग्लंड आणि पाकिस्तानला ट्रॉफी वाटून घ्यावी लागेल.