संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

जळगाव दि.२८ प्रतिनिधी –  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’  हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आले. महात्मा गांधी अनेक समज गैरसमज, अनेक माहीत नसलेल्या गोष्टी उलगडून सांगणारी, महात्मा गांधीजींचा शोध घेणा-या एक सुंदर संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. प्रदिप जोशी, अनिष शहा, स्वरुप लुंकड, अनिल कांकरिया, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. राधेश्याम चौधरी, सर्व सेवा समितीचे रत्नाकर पांडे, अँड.जमिल देशपांडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे शब्दगंध दिवाळी अंक देऊन सन्मानित केले गेले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे  कार्यक्रमाच्या मध्यांतरात उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम सादर झाला.
‘वंदे मातरम्’ने सुरवात झाली. सत्य अहिंसेची शिकवण देणारे..मानवतेचा प्रकाश दिसतो, सत्याग्रही नव नगर निघाले हि कविता सादर केले. भेटी लागे जीवा.. सावळे सुंदर रूप मनोहर..विठ्ठल नामाचा रे टाहो.. या रचना वरूण नेवे यांनी सादर केले. ‘मै तो मेरी पास में हे’ आणि ‘वैष्णव जन तो तेने’ हा गांधीजींना प्रिय अभंग सुदिप्ता सरकार यांनी सादर केला. ‘दे दे हमें आझादी साबरमती के संत… रघुपति राघव राजाराम पतीत पावन सिताराम.. ही रचना श्रध्दा कुलकर्णी यांनी सादर केली. अवघा रंग एक झाला.. अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम.. ही रचना अंजली धुमाड यांनी सादर केली.
शंभू पाटील यांनी निवेदनामध्ये महात्मा गांधीजींचे शिक्षण, आफ्रिकेतील रेल्वेमध्ये घडलेला प्रसंग, स्वालंबनासाठी गांधीजींचा सत्याग्रह, स्वराज्याची संकल्पना, विनोबा आणि गांधी यांनी दिलेला एकतेचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी याच्यातील पुणे करार यासह गांधीजींचा जीवनप्रवास उलगडून दाखविला.
या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची होती. निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार होते. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन च्या महिला सहकारी यांनी सुतकताई केली.

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने (हुतात्मा दिनी) दरवर्षीप्रमाणे ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचारांचा प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने दि. ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी २५ दरम्यान निघणाऱ्या १२ दिवसीय सायकल यात्रेस जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हिरवी झेंडी दाखविणार असून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्राम संवाद सायकल यात्रा यावर्षी जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागातील जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातून जवळपास ५० गावांना भेटी देणार असून सुमारे ३०० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत फ्रांस, नेपाळ देशांसह भारतातील विविध राज्यातील व स्थानिक अशा ४० स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

चारित्र्य निर्माणासह महिलांसाठी विशेष कार्यक्रम
यात्रेदरम्यान विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी सापशिडी, मूल्य संवर्धनाचे खेळ, प्रश्नमंजुषा, कठपुतली खेळ या माध्यमातून चारित्र्य निर्माणाचे कार्य करणार आहे. तसेच ६ वेगवेगळया ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे तर नागरिकांसाठी दररोज पथनाट्याद्वारे प्रबोधन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यावरील प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

स्वस्थ व्यक्ती… स्वस्थ समाज या संकल्पनेनुसार निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची सांगता भारताच्या प्रतिज्ञेने होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम 

जळगाव दि.२८ प्रतिनिधी –  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’  हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे उद्या दि. २९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे. महात्मा गांधी यांचे अनेक अपरिचीत पैलू व त्यांच्याविषयी असलेले अनेक समजगैरसमज याचा शोध घेणारा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची आहे. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची आहे. निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार आहेत. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत आहेत. सदर याकार्यक्रम सर्वांसाठी खूला असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन जळगाव यांनी केले आहे.

महात्मा गांधींच्या जीवनप्रवासावर आधारित प्रदर्शनी

जळगाव दि.२७ प्रतिनिधी – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनने बाल मोहन ते युवा मोहन या महात्मा गांधीजींच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित केलेली चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी मूल्य संस्काराच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मत शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संविधान दिनाच्या औचित्याने आजपासून भाऊंच्या उद्यानात प्रदर्शनीचे उदघाटन नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती चारुलता पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप महाजन, वसुधा महाजन, रोहन फेगडे व आदित्य सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कल्पक व नाविन्यपूर्ण पद्धतीने बनविलेले प्रदर्शन व सापशिडी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करतील असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचे सुती हार देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक व पालकांना, विद्यार्थ्यांना मूल्य संस्कार देण्यासाठी संस्थेच्यावतीने चारित्र्य निर्माण प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. यात सत्य, त्याग, समर्पण, कर्तव्य परायणता, बंधुभाव, क्षमाशीलता यासारख्या मूल्यांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंगांचा चित्रकथेच्या माध्यमातून या प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. याच जीवन मूल्यांवर आधारित सापशिडीचा खेळही तयार करण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी ५ ते ९ वेळेत भाऊंच्या उद्यानात हे प्रदर्शन खुले राहणार असून जळगावकर नागरिकांनी व  शिक्षण संस्था चालकांनी आपल्या पाल्य, विद्यार्थ्यांसह या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या शैक्षणिक संस्थांना हि प्रदर्शनी व सापशिडीच्या माध्यमातून मूल्य संस्कार उपक्रम राबवावयाचा असेल त्यांनी गिरीश कुलकर्णी (समन्वयक, परीक्षा विभाग) यांचेशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे. या प्रसंगी विश्वजित पाटील, सुरेश पाटील, मुकेश पाटील यांचेसह नागरिक उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत आकांक्षा, सृष्टी, आयुषी, धारणी विजयी

जळगाव दि. १४ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. इ. ६ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी, प्रथम वर्ष ते पदव्युत्तर व खुला गट अशा चार गटात हि स्पर्धा घेण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना शालेय गट अनुक्रमे रु. ५०००/-, ३०००/-, २०००/-, शालेय गट २ अनुक्रमे रु. ७०००/-, ५०००/-, ३०००/- महाविद्यालयीन व खुला गट अनुक्रमे रु. १००००/-, ७०००/- व ५०००/- रकमेची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातून ३१७ विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर ४ मिनिटांचे व्हिडीओ तयार करून पाठविले होते.

सर्व व्हिडिओंचे दोन स्तरावर परीक्षण करण्यात आले. त्यातून अंतिम मूल्यांकनासाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम विजयी प्रथम तीन स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येणार असून अंतिम मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अंतिम निकाल खालीलप्रमाणे –

शालेय गट १ – प्रथम – आकांक्षा वानोळे (श्री वारणा विद्यालय, वारणानगर), द्वितीय – दिव्या जवळे (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पुरजळ जि. हिंगोली), तृतीय – कार्तिक प्रमोद जैन (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)

शालेय गट २ – प्रथम – सृष्टी थोरात (एस. जी. श्रॉफ ज्यू. कॉलेज, नंदुरबार), द्वितीय – दिती दवे (एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विलेपार्ले), तृतीय – कस्तुरी पाटील (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)

महाविद्यालय गट – प्रथम -आयुषी केनिया (सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात), द्वितीय – निशांक दुबे (के. जी. जोशी कॉलेज ऑफ आर्टस्, ठाणे), तृतीय – कावेरी लांडगे (जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, नागपूर)

खुला गट – धारणी एस. के. (तामिळनाडू), श्रीश्रेष्ठ नायर (मुंबई), गौरव चव्हाण (वर्धा)

सर्व यशस्वी स्पर्धकांचे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी अभिनंदन केले असून स्पर्धकांनी विविध विषयांवर मांडलेले विचार अभ्यासपूर्ण आहेत. महात्मा गांधीजींच्या विचारांचा अवलंब नवीन पिढी करीत आहे हे आशादायी असून पद्मश्री भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उद्देश सफल होत असल्याचे समाधान वाटते असेही त्यांनी म्हटले आहे.

शब्दाने नाही, तर कृतीने जगा – अब्दुलभाई

जळगाव दि.२ प्रतिनिधी  –  आपआपसातील जात, पात धर्म भेद न पाळण्याचा संकल्प करा, प्रतिज्ञा ही फक्त म्हणायची नसते ती प्रत्यक्ष कृतीत आणायची असते. येत्या दिवाळीत आपण उपेक्षीत घटकातील सदस्यांना आपल्या घरी बोलावून त्यांना आनंदात सहभागी करुन घ्या असे आवाहनही ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, स्पर्धेचे परिक्षक सुदिप्ता सरकार, रश्मी कुरंभट्टी, पदमजा नेवे व गांधी रिसर्च फाऊंडनच्या ग्राम विकासाचे सुधीर पाटील उपस्थित होते. परिक्षकांच्या वतीने सुदिप्ता सरकार व पदमजा नेवे यांनी स्पर्धेचे निकष मनोगतातून व्यक्त केले.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्ती व महापुरुषांचे विचार पोहचावेत या उद्देशाने ही स्पर्धा घेतली गेली. शहर व ग्रामीण मिळून २१ शालेय संघांनी सहभाग नोंदविला. यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि  १५००/- ची रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह, व प्रशस्ती पत्रक देण्यात आले.
ग्रामीण गटात प्रथम विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, सावखेडा, द्वितीय अनुभूती निवासी स्कूल, तृतीय एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा,उत्तेजनार्थ ब.गो. शानबाग विद्यालय सावखेडा तर जळगाव शहर गटात प्रथम ओरियन इंग्लिश मिडीअम सीबीएससी, द्वितीय शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय, तृतीय ए टी झांबरे विद्यालय, उत्तेजनार्थ बालविश्व इंग्लिश मिडीअम स्कूल यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक प्रदान करण्यात आले. गिरीष कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, शालीग्राम राणे, चंद्रशेखर पाटील,  योगेश संधानसिवे, तुषार हरिमकर, विश्वजीत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार, चंद्रकांत चौधरी यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज भक्तामर की अमर गाथा संगीत नाटकाचे आयोजन

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ६.०० वाजता ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की, रंगभूमीवर १०० कलावंत  भक्तामर स्तोत्रातील देवत्व आणि चमत्कारी शक्ती जिवंत करतील, ज्यामुळे आमची श्रद्धा अधिक दृढ होईल आणि जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी केले आहे.

भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते  मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली आहे.  *भक्तामर की अमर गाथा* (संगीत नाटक) कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. जास्तीतजास्त संख्येने परिवारासह या कार्यक्रमाची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) –  महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले आहे. अहिंसा सद्भावना शांती यात्रेसह देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात समस्त जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

अहिंसा सद्भावना शांती यात्रा ही लालबहादूर शास्त्री टॉवर पासून आरंभ होऊन नेहरू चौक – शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचेल. या यात्रेत जिल्हा पालक मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे(राजूमामा), आ. लताताई सोनवणे, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री अंकित, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, डॉ. भरत अमळकर, जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन या मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी उद्यानातील सर्व उपस्थितांना अहिंसा शपथ देण्यात येईल. महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे.

गांधी जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जळगाव तालुक्यातील शाळांसाठी शहरी व ग्रामीण गटात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे सकाळी १० वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी संघांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येईल. आपला जन्मदिवस हा चरखा जयंती म्हणून साजरा व्हावा असे महात्मा गांधीजींनी म्हटल्यानुसार हा दिवस चरखा जयंती म्हणूनही साजरा केला जातो. चरखा जयंतीच्या निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी तीर्थ येथे सकाळी ८.०० ते रात्री ८.०० दरम्यान अखंड सुत कताई करण्यात येणार आहे. संस्थेचे सहकारी सुत कताई करतील, यामधे चरखा चालवू इच्छिणारे वा शिकणेसाठी पण सहभागी होता येणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये जळगावकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

जळगाव दि.२८ प्रतिनिधी  –  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही व यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि  १५००/- ची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

जळगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळांसाठी गांधी तीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात होईल. स्पर्धा संपल्यानंतर तेथेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसह यशस्वी शाळांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शाळांनी भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले, असून त्यासाठी दि.३० सप्टेंबर पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३०६२३३०) किंवा गिरीश कुळकर्णी यांच्याशी (९८२३३३४०८४) संपर्क साधावा असे प्रसिद्धी  पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट तर्फे आज चौधरी वाड्यात कार्यक्रम

जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) –  बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता  १४४ वी जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी खामगाव जि. बुलडाणा येथील साहित्यिक प्रा. देवबा शिवाजी पाटील, चाळीसगावच्या सौ. कामिनी अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, समस्त चौधरी परिवार, साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील  विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास येण्याचे करावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

कान्हदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात सन्मानाचे स्थान आहे. बहिणाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या, काव्यातील साधेपणा, सोपी अन् हृदयाला भिडणारी भाषा, भावनांमध्ये प्रांजळपणा, शब्दाआड रुजलेला माणूसकीचा ओलावा, निसर्ग, पशु-पक्षी, शेती माती आणि कष्टांवर अतुट प्रेमामुळे त्यांच्या कविता अगदी सहजरीत्या बालपणापासूनच घराघरात पाठ्यपुस्तकांद्वारे, गाण्याच्या माध्यमातून पोहोचली.

प्रमुख पाहुणे प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगाव, जि. बुलढाणा, सुप्रसिद्ध साहित्यिक, आजपर्यंत एकूण ५९ पुस्तके प्रकाशित, विषय – धार्मिक स्तोत्रे, संत साहित्य, काव्यसंग्रह, देशभक्ती, विज्ञान, निसर्ग, कथासंग्रह, शैक्षणिक, युवांसाठी लेखसंग्रह, सामाजिक वैचारिक लेखसंग्रह, शालोपयोगी साहित्य, बालकुमार कादंबरी, कथासंग्रह इ. असून अनेक मानाचे (६)  साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात विशेष सन्मान म्हणजे साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या ग्रंथावर समीक्षा ग्रंथ ही प्रकाशित झाली आहेत तसेच त्यांच्या काव्यसंग्रहांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते साहित्य कुंज या नियतकालिकाचे संपादक आहेत. साहित्य कुंज या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी अनेक काव्य-लेख-कथा स्पर्धांचे व विद्यार्थी साहित्य मेळाव्यांचे आयोजन केले आहे. ते खामगाव येथे उन्मेष नावाचे वाचनालय ही चालवितात. प्रमुख पाहुण्यांसोबत चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका, निवेदक सौ. कामिनी सुनिल अमृतकर या देखील उपस्थित असतील. या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन “माह्यी माय सरसोती!” याचे ही आयोजन केले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी आवाहन केले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version