कोलंबो स्टॉक एक्स्चेंज, गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या शेअर बाजारातील व्यवहार आठवडाभरासाठी बंद राहणार आहेत. श्रीलंका सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकात ही घोषणा केली. गुंतवणूकदारांना बाजाराबद्दल अधिक स्पष्टता आणि समज निर्माण करण्याची संधी देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार कोलंबो स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यात म्हटले आहे.
या घोषणेचा अर्थ असा आहे की 18 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत कोलंबो स्टॉक एक्सचेंजमधील व्यवहार तात्पुरते बंद केले जातील. एक दिवस आधी, कोलंबो स्टॉक एक्सचेंजच्या संचालक मंडळाने एसईसीला तात्पुरते व्यापार बंद करण्याची विनंती केली होती. यासाठी श्रीलंकेतील सद्यस्थितीचा हवाला देण्यात आला.
गेल्या काही आठवड्यांपासून श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकट आणि त्यानंतरची राजकीय अस्थिरता लक्षात घेऊन एसईसीने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत इंधन आणि दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आवश्यक असलेल्या परकीय चलनाचाही तीव्र तुटवडा आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, श्रीलंकन सरकारने परदेशी कर्जाची परतफेड पुढे ढकलली आहे. आर्थिक संकट अधिक गडद झाल्यामुळे देशभरात सरकारविरोधी आंदोलनेही तीव्र झाली आहेत. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.