निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम

जळगाव दि,४ (प्रतिनिधी) – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला *गोल्ड मेडल* बहाल करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पदवी प्रदान सोहळा होणार आहे.
आयआयटीची प्रवेश परीक्षा परिश्रमपूर्वक  उत्तीर्ण झाल्यानंतर. शिक्षण सुरू असताना पालवीला आत्तापर्यंत इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ” *इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडेंट*” आणि *क्यूरीयस यंग ब्लड अवॉर्ड”*  सह अनेक पुरस्कार प्राप्त असून पालवी सध्या *गुडगाव दिल्ली येथील डेली ऑब्जेक्ट या आस्थापनेत “इंडस्ट्रिअल डिझाईनर” या पदावर कार्यरत आहे. पालवीचे आईवडील विजय आणि नीलिमा जैन यांचेही अभिनंदन होते आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी पालवीचे कौतुकासह अभिनंदन केले आहे.

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) : – सूक्ष्म सिंचन आणि कृषिक्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य असलेल्या कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने आज रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत दुसरी तिमाही व सहामाहिचे आर्थिक निकाल जाहीर केले. यात कंपनीचे एकूण एकत्रित उत्पन्न २,६६९.८ कोटी रुपये इतके इबिडा ३१७.५ कोटी इतका आहे.

कंपनी व उपकंपन्यामधील सूक्ष्म सिंचन विभाग, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, कृषी प्रक्रिया उत्पादने, नूतनीकरणीय ऊर्जा समाधान, उती संवर्धन, वित्तीय सेवा आणि इतर कृषी उत्पादनांच्या मिळून हे एकूण उत्पन्न आहे.

तिमाही निकालाचे वैशिष्ट्ये –  – एकत्रित उत्पन्न: ₹ १,१९२.० कोटी रुपये, इबिडा : ₹ १३८.७ कोटी रुपये

सहामाही निकालाचे वैशिष्ट्ये – एकत्रित उत्पन्न: ₹ २,६६९.८ कोटी रुपये – इबिडा : ₹ ३१७.५ कोटी रुपये

अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले की,  महाराष्ट्रासह भारतातील विस्तारित पावसामुळे जैन इरिगेशनच्या तिमाहीच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पेरणी क्षेत्राच्या वाढीमुळे उत्पादनास प्रोत्साहन मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही कॅश फ्लो सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत आणि मायक्रो इरिगेशन सिस्टिम, पाईप्स आणि टिशू कल्चर क्षेत्रांमध्ये मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच, सोलर पंप्स, मोठ्या व्यासाचे एचडीपीई पाईप्स आणि आंतरराष्ट्रीय मागणीत वाढ झाल्यामुळे सकारात्मक परिणाम साधता येईल.

अलीकडेच जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करांतर्गत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी साधने उपलब्ध करून देईल. याशिवाय, उच्च-उत्पादनक्षमता असलेल्या कॉफी शेती आणि कुफ्री फ्रायोएम बटाटा जातीसह नवीन प्रयोगातून टिशू कल्चरसाठी नवीन मागणी ही वाढेल. ह्या करारांमुळे आमच्या इतर उत्पादनांच्या मागणीत वाढ होण्यास मदत होईल.

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

 जळगाव दि. २७ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने मुंबई कस्टमवर मात करत भारतातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या टाईम्स शिल्ड क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. यात जैन इरिगेशनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुवेद पारकर ठरला होता. मुंबई येथे टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ९३ व्या वार्षिक पारितोषिक वितरणाप्रसंगी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे, प्रो. रत्नाकर शेट्टी, श्री व्यंकट (टाइम्स) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जैन इरिगेशनच्या संघाला टाईम्स शिल्ड २०२३-२४ ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाचे मयंक पारेख, शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांबवेकर, आयुष झिमरे, मयूर ढोलकिया यांनी हा सन्मान स्वीकारला. वानखेडे स्टेडियममधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लाउंजमध्ये हा समारंभ पार पडला.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कमिटीचे सदस्य अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

यावेळी प्रमूख अतिथी भारताचे माजी कसोटीपटु प्रवीण आमरे यांनी टाइम्स शील्डमधील सहा विभागांमधील कॉर्पोरेट सहभागाचे मूल्य अधोरेखित केले. माझे गुरू रमाकांत आचरेकर मला नेहमी सांगायचे की, ‘एका नोकरीमुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबाची काळजी घेतली जाऊ शकते.’ ते माझ्यासाठी खरे ठरले. मी १५ वर्षांपासून आयपीएलमध्ये सहभागी झालो असलो तरीही, मला विश्वास आहे की क्रिकेटपटूंसाठी नोकरी आवश्यक आहे, कारण ते फक्त तीन वर्षे खेळले आहेत माझ्या एअर इंडियाच्या नोकरीसाठी, मी आज आहे तसाच आहे. असे प्रवीण आमरे म्हणाले.

प्रवीण आमरे, यांनी आपल्या कारकिर्दीत खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि प्रशासक या भूमिका निभावल्या आहेत, टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे मुंबई क्रिकेटमध्ये विशेष स्थान आहे. मुंबईने ४२ वेळा रणजी जिंकली आहे, आणि टाईम्स शिल्डने क्रिकेट स्पर्धेचे यातील सहभागी खेळाडूंचे करिअर घडवण्यात अमूल्य भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेने ‘सी’ डिव्हिजनमध्ये सुरुवात केली, व मला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली त्यानंतर वासू परांजपे यांनी मला एअर इंडियाचे कर्णधारपद देऊ केले, ज्यामुळे मला स्पर्धा करणारा संघ तयार करता आला, मला अभिमान आहे की माझा हा संघ ३२ वर्षे ‘ए’ डिव्हिजन मध्ये सातत्याने खेळला आहे. जैन इरिगेशनचे संघ या स्पर्धेत चांगली प्रगती करीत आहे व त्यामुळेच त्यांचा संघ विजेता ठरला आहे. जैन इरिगेशन संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांनी भविष्यातील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

विभाग ‘ए’ चा निकाल

विभाग ‘ए’ मध्ये जैन इरिगेशन विजयी तर मुंबई कस्टम उपविजयी झालेत, यात सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून जैन इरिगेशनचा सुवेद पारकर ठरला तर  मुंबई कस्टमच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाज  ध्रुमिल मतकर ठरला, ‘ए’ विभागात सर्वाधिक जलद धावसंख्या करणारा संघ डी वाय पाटील ठरला.

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

जळगाव दि.२६ प्रतिनिधी –  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सिन्नर येथे नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत १४, १७, १९, वर्षे मुलं व मुली यांच्या विविध वजनी गटात ३४ सुवर्णपदके पटकावली. यशस्वी खेळाडूंची पुणे येथे होत असलेल्या शालेय राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे : १४ वर्षातील मुले १८ किलो आतील भुषण जितेंद्र कोळी ( एस. व्ही. पटेल स्कूल, ऐनपुर), २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ३२ ते ३५ किलो दक्ष शाम तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर), ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगाव),

१४ वर्षे आतील मुली : १८ ते २० किलो निधी गोपाळ कोळी (एस व्ही पटेल, ऐनपुर), २० ते २२ किलो स्नेहा विठ्ठल वाघ (एस व्ही पटेल ऐनपुर), २४ ते २६ मोहीनी हरिभाऊ राऊत (सावित्रीबाई फुले स्कूल,  पहुर), २६ ते २९ किलो अंकिता सुनील उबाळे (सरस्वती प्राथमिक मंदीर, शेंदूर्णी), २९ ते ३२ किलो खुशी विनोद बारी (स्वामी इंग्लिश स्कूल रावेर), साची उदय पाटील (अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल शिरसोली)

१७ वर्षे आतील मुलं : ३५ किलो आतील सोहम गिरधर कोल्हे (ऐन. एच. राका हायस्कूल, बोदवड), ३५ ते ३८ किलो सतिश सुनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय, जामनेर), ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर (यशवंत विद्यालय), ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५५ ते ५९ किलो वेदांत अनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ६८ ते ७३ किलो क्षितीज नंदकिशोर बोरसे (कै. पि. के. शिंदे पाचोरा ),  ७८ किलो वरील देवेश गजानन सोनवणे (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर)

१७ वर्षे आतील मुली : ३२ ते ३५ माहेश्वरी संजय धनगर (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ३५ ते ३८ किलो प्रांजली शरद धनगर (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ४२ ते ४४ किलो कोमल सुनिल गाढे (माॅडर्न इंग्लिश स्कूल, रावेर), ४९ ते ५२ किलो जागृती रविंद्र चौधरी (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ५२ ते ५५ किलो निकिता दिलीप पवार (जी. डी. बेडांळे महाविद्यालय, जळगाव)

१९ वर्षे आतील मुलं : ४५ किलो आतील दानिश रहेमान तडवी (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५५ ते ५९ किलो लोकेश सुनिल महाजन (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५९ ते ६३ किलो प्रबुद्ध समाधान तायडे (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ६८ ते ७३ वेदांत समाधान हिवराळे (विवेकानंद महाविद्यालय, जळगाव), ७३ ते ७८ किलो निलेश रामचंद्र पाटील (एम एम विद्यालय, पाचोरा), साहिल सागर बागुल (एम एम विद्यालय पाचोरा)

१९ वर्षे आतील मुली : ४० किलो आतील हर्षदा ज्ञानवंत उबाळे (इंदिराबाई ललवाणी जामनेर), ४२ किलो आतील सिमरन जितेंद्र बोरसे (जी. डी. बेडांळे महाविद्यालय जळगाव), ४२ ते ४४ किलो सायली किरण साळुंखे (सेकंडरी विद्यालय देवगाव), ४४ ते ४६ किलो वैष्णवी दत्तु धोंगडे (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ४९ ते ५२ किलो भूमिका शांताराम सोनवणे (एन एच रांका, बोदवड), ६३ ते ६८ किलो नंदिनी रमेश सोनवणे (इंदिराबाई ललवाणी विद्यालय जामनेर)

विजयी खेळाडूंना जयेश बाविस्कर, जयेश कासार, हरिभाऊ राऊत, भुषण मगरे, सुनिल मोरे, स्नेहल अट्रावलकर, पुष्पक महाजन यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तर जिवन महाजन, यश शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. सर्व यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे यांनी कौतूक केले.

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक

जळगाव दि.२५ प्रतिनिधी :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५ वजनगटात भाग घेतला. यामध्ये तीन फेरांमध्ये प्रतिस्पर्धकांनी साची पाटील हिने एकतर्फे मात दिली.

जळगाव मनपा ३२-१०, नाशिक मनपा २६-२०, नाशिक ग्रामीण २४-२० ह्यांच्यावर तिने विजय मिळविला. या विजयामुळे तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तिची निवड पुणे बालेवाडी येथे दि.२८ ते ३१ ऑक्टोबर ला  होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (एनआयएस) यांनी मार्गदर्शन केले.

तिच्या यशाबद्दल अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक

जळगाव दि.२५ प्रतिनिधी :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५ वजनगटात भाग घेतला. यामध्ये तीन फेरांमध्ये प्रतिस्पर्धकांनी साची पाटील हिने एकतर्फे मात दिली.

जळगाव मनपा ३२-१०, नाशिक मनपा २६-२०, नाशिक ग्रामीण २४-२० ह्यांच्यावर तिने विजय मिळविला. या विजयामुळे तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तिची निवड पुणे बालेवाडी येथे दि.२८ ते ३१ ऑक्टोबर ला  होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (एनआयएस) यांनी मार्गदर्शन केले.

तिच्या यशाबद्दल अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव 

मुंबई/जळगाव, २४ ऑक्टोबर (प्रतिनिधी): – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित करत बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुन इंडिया तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव करण्यात आला. काल मुंबई येथे हॉटेल फोर सिझन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, अभंग जैन यांनी स्वीकारला.

हुरुन रिपोर्ट हा 1998 मध्ये लंडनमध्ये स्थापन केलेला एक अग्रगण्य संशोधन, लक्झरी प्रकाशन आणि कार्यक्रम गट आहे. यांचे भारत, चीन, फ्रान्स, UK, USA, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आणि लक्झेंबर्गमध्ये काम सुरू आहे. अनस जुनैद यांच्या नेतृत्वाखाली २०१२ पासून हुरुन इंडियाचे काम सुरू आहे. भारतातील पारदर्शक संपत्ती निर्मिती, नव कल्पनांची निर्मिती, परोपकाराच्या गोष्टींना प्रोत्साहन, पिढ्यानपिढ्या व्यवसाय सांभाळून त्याचा वारसा पुढे जाणाऱ्या परिवारांना शोधून त्यांचा गौरव करण्याची संकल्पना सुरू केली आहे. या द्वारे बार्कलेज-हुरून इंडिया फॅमिली बिझनेस लिस्ट ही भारतातील प्रमुख कुटुंब-स्वामित्व असलेल्या उद्योग आणि उद्योजकांच्या यादीत समाविष्ट करते. आपल्या व्यवसायाची उत्कृष्टता, नवकल्पना आणि दीर्घकालीन यशासाठीची प्रतिबद्धता या प्रमुख गोष्टींचा विचार करून उद्योजकांची यादी केली जाते.

बार्कलेज पीएलसी- ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय सार्वत्रिक बँक आहे., जिचे मुख्यालय लंडन , इंग्लंड येथे आहे. बार्कलेज ही संस्था  40 हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, 80,000 हून अधिक लोकांना रोजगार देते. एकूण मालमत्तेनुसार युरोपमधील पाचव्या क्रमांकाची ही बँक आहे. २ कोटी ग्राहक असलेली कॉर्पोरेट आणि खाजगी बँकिंग फ्रँचायझी आहे. या बँकेकडे आघाडीची गुंतवणूक, मजबूत, विशेषज्ञ यूएस ग्राहक असलेली वैविध्यपूर्ण बँक म्हणून पाहिले जाते.

बार्कलेज-हुरुन पुरस्कार समारंभाने भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या कुटुंबांचा गौरव केला. त्या सर्व कुटुंबीयांचा पिढ्यानपिढ्या व्यवसायात सातत्य राखण्यात आणि त्यांच्या लवचिकतेसाठी यश, अनुकूलनक्षमता, आणि त्यांची मूळ मूल्ये आणि परंपरांवर खरे राहून दीर्घकालीन दृष्टी ठेवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात बजाज ग्रुपचे बजाज कुटुंब, यूपीएल ग्रुपचे श्रॉफ कुटुंब, पिरामल ग्रुपचे पिरामल कुटुंब, पारले प्रोडक्ट्सचे चौहान कुटुंब, मुथुट फायनान्सचे जॉर्ज मुथुट कुंटुंबीय, आयनॉक्सचे जैन कुटुंबिय व आदी इतर कुटुंबांचाही सन्मान करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडची स्थापना महात्मा गांधीजींच्या विचारांचे पुरस्कर्ते, गांधी तीर्थचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी केली. त्यांचा वारसा सुपुत्र अशोक, अनिल, अजित आणि अतुल जैन हे समर्थपणे पुढे चालवत आहेत, जैन इरिगेशनला नव्या उंचीवर नेत आहेत. १९६३ मध्ये भवरलालजी जैन यांनी अवघ्या ७००० रुपयांची गुंतवणूक करून जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडची स्थापना केली. या कंपनीचे मूळ ग्रामीण भारतात आहे व कंपनीचा कार्यविस्तार  १२६ देशांमध्ये  झालेला आहे. कृषी, पाणी आणि पर्यावरण यात मूल्यवर्धन साखळी असलेली उत्पादने आणि सेवा जैन इरिगेशन समृद्धपणे एकाच छताखाली उपलब्ध करून शेतकऱ्यांना आणि भागधारकांना लाभ देते. जैन कुटुंबाने जैन इरिगेशनच्या माध्यमातून सुमारे ४० वर्षांच्या सतत नवनवीन शोधानंतर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगभरातील शेती पद्धती कमालीच्या बदलल्या आहेत आणि त्यात सकारात्मक परिवर्तन झालेले आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या जैन इरिगेशनमध्ये तिसरी पिढी देखील कार्यरत झालेली आहे. त्यावरून सातत्याने शेतकऱ्यांची सेवा करण्याचे व्रत, ही वचनबद्धता यातून दिसून येते. येथे केले जाणारे सर्व प्रयत्न शेतकऱ्यांचे जगात चांगले स्थान बनवणे, आपली पृथ्वी आणि अन्नाचे भविष्य यांची सुरक्षा करणे हे उद्देश आहे. भारतात, जिथे ग्रामीण लोकसंख्येकडे शतकानुशतके दुर्लक्ष झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी जैन परिवाराने समृद्धी आणण्यासाठी परिवर्तनात्मक उपाय केले आहेत. या उपायांनी ग्रामीण शेतमजूर आणि शेतकरी यांनी संपूर्ण गावांना सावकारी कर्ज आणि गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नपूर्वक सातत्याने मदत केलेली आहे.

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

जळगाव, दि. १९ (क्रीडा प्रतिनिधी) – ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि. १९ व २० ऑक्टोबर असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस अॅकडेमी द्वारा करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF अॅडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी अशोक जैन म्हणाले की, अशा प्रकारच्या सेमीनारचे बुद्धिबळाच्या विकासासाठी, सक्षम व कुशल आरबीटर व कोचेस साठीचे महत्त्व विषद केले. चेस इन स्कूलचे महत्त्व विषद करून आरबीटर व कोचे यांनी सेमीनारचा फायदा घ्यावा व या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे अपडेट करावे असा मोलाचा सल्ला दिला.

चिफ फॅकल्टी इंटरनॅशनल आरबीटर वसंत बी. एच. व आय.ए. नितीन शेणवी, पुणे यांचे स्वागत आय.ए. प्रवीण ठाकरे व आकाश धनगर यांनी केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले.  महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटका, पश्चिम बंगाल इ. विविध राज्यांमधून एकुण ८० चेस आरबीटर व कोचेस यात सहभागी झालेले आहेत. जळगावमधून नथू सोमवंशी, भरत आमले व आकाश धनगर यांनी सहभाग नोंदवला. या सेमीनारसाठी जैन इरिगेशन प्रायोजकत्व लाभले.

सचीव नंदलाल गादिया यांनी सूत्रसंचलन केले व सर्वांचे आभार मानले. भारतात तरुण व उद्योन्मुख खेळाडूंच्या आशादायी कामगोरी मुळे होणाऱ्या बुद्धीबळ या खेळाचा झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अशा प्रकारच्या सेमीनारचा आवश्यकता आहे.


बुद्धीबळ आरबीटरची क्षमता व कौशल्य वाढवणे, सुक्ष्म नियमांची माहिती देणे, तांत्रिक कौशल्य सुधारणा, टुर्नामेंटचे स्टॅंडर्डायझेशन (मानकीकरण) करणे, सहयोग वाढवणे, भविष्यातील नेते विकसीत करणे, बुद्धीबळ Ecosystem (परिसंस्था) वाढवणे, एकूण बुद्धीबळ पायाभूत सुविधा मजबूत करणे इत्यादी उद्दीष्ट या सेमीनारने साधले जातील सेमीनारच्या यशस्वीतेसाठी रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत आकांक्षा, सृष्टी, आयुषी, धारणी विजयी

जळगाव दि. १४ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. इ. ६ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी, प्रथम वर्ष ते पदव्युत्तर व खुला गट अशा चार गटात हि स्पर्धा घेण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना शालेय गट अनुक्रमे रु. ५०००/-, ३०००/-, २०००/-, शालेय गट २ अनुक्रमे रु. ७०००/-, ५०००/-, ३०००/- महाविद्यालयीन व खुला गट अनुक्रमे रु. १००००/-, ७०००/- व ५०००/- रकमेची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातून ३१७ विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर ४ मिनिटांचे व्हिडीओ तयार करून पाठविले होते.

सर्व व्हिडिओंचे दोन स्तरावर परीक्षण करण्यात आले. त्यातून अंतिम मूल्यांकनासाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम विजयी प्रथम तीन स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येणार असून अंतिम मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अंतिम निकाल खालीलप्रमाणे –

शालेय गट १ – प्रथम – आकांक्षा वानोळे (श्री वारणा विद्यालय, वारणानगर), द्वितीय – दिव्या जवळे (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पुरजळ जि. हिंगोली), तृतीय – कार्तिक प्रमोद जैन (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)

शालेय गट २ – प्रथम – सृष्टी थोरात (एस. जी. श्रॉफ ज्यू. कॉलेज, नंदुरबार), द्वितीय – दिती दवे (एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विलेपार्ले), तृतीय – कस्तुरी पाटील (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)

महाविद्यालय गट – प्रथम -आयुषी केनिया (सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात), द्वितीय – निशांक दुबे (के. जी. जोशी कॉलेज ऑफ आर्टस्, ठाणे), तृतीय – कावेरी लांडगे (जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, नागपूर)

खुला गट – धारणी एस. के. (तामिळनाडू), श्रीश्रेष्ठ नायर (मुंबई), गौरव चव्हाण (वर्धा)

सर्व यशस्वी स्पर्धकांचे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी अभिनंदन केले असून स्पर्धकांनी विविध विषयांवर मांडलेले विचार अभ्यासपूर्ण आहेत. महात्मा गांधीजींच्या विचारांचा अवलंब नवीन पिढी करीत आहे हे आशादायी असून पद्मश्री भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उद्देश सफल होत असल्याचे समाधान वाटते असेही त्यांनी म्हटले आहे.

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची रतनजी टाटा यांना श्रद्धांजली

राष्ट्रभक्त आणि राष्ट्रनेते असही ज्यांच्याविषयी आदरपूर्वक म्हणता येईल अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाने आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. उद्योजकीय जगतात त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा अनमोल आहेच, दानशूरता म्हटल्यानंतर टाटा हेच नाव अग्रक्रमाने डोळ्यासमोर येते. केवळ टाटा गृपलाच जागतिक स्तरावर त्यांनी नामांकित केल अस नाही तर त्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर हे लक्षात येईल की त्यांनी आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या पटलावर भूषणावह केलं. टाटा गृपची पुनर्रचना त्यांच्या हातून झाली, जागतिक स्तरावर उद्योजक म्हणून कीर्ती संपादन करताना अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी ब्रिटिश स्टील कंपनी विकत घेतली. जग्वार, रेंज रोव्हर बँडसह टेटली टी कंपनीही विकत घेतली. ब्रिटिश उद्योजकीय संस्कृतीतील हे आयकॉनिक ब्रँड समजले जातात. भारतावर दिडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या देशातल्या या नामांकीत कंपन्या विकत घेऊन जणू टाटा यांनी भारतीयांच्या हृदयावर गुलामगिरीचा जो डाग कोरला गेला होता, जो आघात झाला होता तो पुसून काढण्याच काम टाटा यांनी केल.

आमचे वडील श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी नेहमी आदरणीय जे.आर.डी. टाटा यांना उद्योजकिय क्षेत्रात  गुरुस्थानी मानलं. टाटा गृप व्यवसायाकडे विश्वस्त या दृष्टीने पाहतो तोच विचार एक संस्कार या नात्याने आमच्या वडीलांनी उचलला आणि आज आम्ही कृषी क्षेत्रात जे काम करतो आहे त्या परिवर्तनामागे तीच  दृष्टी आहे.

व्यवहार साध्य करत असताना एक यशस्वी, दानशूर व्यक्ती म्हणूनही आपण नावारुपाला येतो हे जरी खरे असले तरी कोणत्याही प्रकारची तडजोड न करताही स्वतःच्या कंपनीला आणि आपल्या देशाला गाैरवास्पद कार्य करून भूषणावह ठरता येते यासाठी आदरणीय टाटांची नोंद भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. – अशोक भवरलाल जैन, अध्यक्ष – जैन इरिगेशन सिस्टिम्स ली

जळगांव

जॉईन Trading Buzz
Exit mobile version