असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली : अनिल नौरिया

जळगाव, दि.२३ (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी असहयोग आंदोलन आणि सविनय कायदेभंगाद्वारे सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली. त्यामुळेच ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा मोठा लढा उभारला गेला, असे विचार अनिल नौरिया यांनी व्यक्त केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वक्ते अनिल नौरिया, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रशासकीय विभागाच्या प्रमुख अंबिका जैन, प्राचार्या डॉ. गौरी राणे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच नौरिया यांनी असहयोग आंदोलन व सविनय कायदेभंग यातील फरक समजावून सांगितला. आपल्या न्याय व हक्काची मागणी अहिंसेच्या मार्गानेच केली पाहिजे याचा गांधीजींचा अट्टाहास असायचा. यासाठी महात्मा गांधीजी आंदोलन करण्यासाठी पूर्व तयारी करून घेत असत. कुणाला काय जबाबदारी द्यायची हे ठरलेले असे. अगदी जिल्ह्याची, व्यक्तीची निवड करतांना विशिष्ट निकषांवर केली जात असे. यात अहिंसा, स्वदेशीचा वापर, बलिदान देण्याची तयारी, हिंदु मुस्लिम एकता, सामाजिक सौहार्दता याचा समावेश असे. स्पृश्य, अस्पृश्य हा भेद नसावा इत्यादीबाबत महात्मा गांधी सजगतेने त्याची चाचणी स्वतः घेत असत असेही त्यांनी सांगितले. याच आधारावर गुजरातमधील बारडोली, खेडा आणि आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर या जिल्ह्यांचा विचार करण्यात आला होता. १९१९ च्या असहकार आंदोलनानंतरच सर्व भारतीय खुलेपणाने स्वातंत्र्याची मागणी करू लागले. याच काळात कला, साहित्याची देखील भरपूर निर्मिती झाली. याबाबतचे उदाहरणे सांगत त्यांनी महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनाचे एक एक पदर उलगडून सांगितले.

आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘गांधी होंगे कही भारत में’ गाण्याची ध्वनिफीत वाजविली गेली. यावेळी डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या गौरी राणे यांनी देखील संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. झाला यांनी केले. १९२४ पर्यंत हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने असहयोग आंदोलन या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या तीन व्याख्यान व वक्ते याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले तर आभार चंद्रशेखर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास बेंडाळे महाविद्यालयाचे उप-प्राचार्य विजय पाटील, प्राध्यापक, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन व सहकारी यांची उपस्थिती होती.

नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी – अजित जैन

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –  जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष  भवरलाल जैन ऊर्फ मोठेभाऊ यांच्या जयंतीनिमित्त १४ डिसेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या काळात जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास पन्नास प्रकारची पीके उभी करण्यात आली आहेत. ही पीके पाहण्यासाठी देश व राज्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून या कृषी महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी केले आहे.

अजित जैन पुढे म्हणाले की, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) व हवामान बदल (क्लायमेंट चेंज) या दोन समस्यांचा शेतकऱ्यांना आता वारंवार सामना करावा लागतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही होत आहे. हे नुकसान कसे टाळावे आणि त्यासाठी उत्पादन पद्धती बदल करून कोणती नवीन तंत्रे वापरावीत या संबंधीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे म्हणून आधुनिक पद्धतीने पीके उभी केली आहेत. ती शेतकऱ्यांना समक्ष पाहता येतील. ‘बघितले की विश्वास बसतो’ असे म्हणतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात उभी असलेली ही पीके स्वत: पाहणे गरजेचे आहे.

कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कांद्यामध्ये केळी बागेची उभारणी, गादीवाफ्यावर आधाराने व बिन आधाराची कागोमी जातीच्या टोमॅटोची लागवड, मिरची, पपई यांची सीडलिंग लावून केलेली लागवड, हळदीचे पीक, ठिबकवर गहू, भात यांची लागवड, उसाला वरून मॉड्यूलर स्प्रिंकलरद्वारे पाणी, सौर पंपांच्या सहाय्याने पिकांना सिंचन, पॉलिहाऊस मधील बंदिस्त व नियंत्रित वातावरणात केळी, आंबा, संत्री, मोसंबी या फळझाडांची लागवड, सघन व अतिसघन पद्धतीने उभ्या केलेल्या फळबागा (उदा सीताफळ, पेरू, चिकू, आंबा, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज वगैरे) या बरोबरच गादीवाफा, मल्चिंग, डबल लॅटरल, फर्टिगेशन ही सर्व तंत्रे शेतकऱ्यांना येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कृषी महोत्सवासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नसून शेतकऱ्यांना ते मोफत पाहता येईल. तसेच टिश्यूकल्चर व अन्य तंत्राद्वारे तयार केलेली उत्कृष्ट दर्जेदार व रोगमुक्त रोपेही शेतकऱ्यांना पाहता येतील असेही अजित जैन यांनी सांगितले. तेव्हा अधिकाधिक शतेकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन महोत्सवाला सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत भेट द्यावी ही विनंती.

जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात

जळगाव दि.२३ प्रतिनिधी – शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत नाही. शेतकरी आणि शिक्षक ह्यांना नेहमी गुरूस्थानी मानले पाहिजे. कारण दोघांमुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन होत असते. प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये, विद्यालयांमध्ये शेती हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवला पाहिजे. विद्यार्थ्यांवर स्वत: शेतकरी होण्याची किंवा जे भोजन बळीराजामुळे मिळत आहे त्यामुळे त्यांचा आदर करण्याचा संस्कार आपोआप होईल. शेतकऱ्यांकडे असलेल्या ज्ञान समजून घेतले पाहिजे, सर्वात पारदर्शक व्यवहार म्हणजे शेतकऱ्यांचा आहे असे मनोगत सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.
जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर १४ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू असलेल्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषीमहोत्सवात शेतकऱ्यांशी सोनम वांगचुक यांनी संवाद साधला. २३ डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन शेतकऱ्यांचा सन्मान करुन  साजरा करण्यात आला. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांचे औक्षण आणि गांधी टोपी, तर महिला शेतकऱ्यांना रूमाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोनम वांगचुंक यांच्या समवेत जैन परिवारातील अभंग जैन, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बि. के. यादव, एस. एन. पाटील, संजय सोन्नजे, अनिल जोशी, दीपक चांदोरकर, गिरीष कुळकर्णी यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

शेतकरी दिनानिमित्त मार्गदर्शन करताना सोनम वांगचुक पुढे म्हणाले की, जैन इरिगेशन ही शेतकऱ्यांसाठी प्रभावी काम करणारी संस्था असून त्यांच्याशी जुळल्यानंतर लडाखमध्ये भेडसवणारा पाण्याचा प्रश्न आईस स्तुफा यातून दूर झाला. यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी हा विषय येण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कारण भोजन कसे तयार होते, त्यासाठी काय परिश्रम घेतले जाते, याची जाणिव निर्माण व्हावी. गणित, बायोलॉजी, मायक्रो बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, विज्ञान यासारखे विषय शेतीसाठी पूरक आहेत त्याचे ज्ञान घ्यायला हवे. शेती हा विषय महत्त्वाचा असल्याने विद्यालयात शेती केली जावी, प्रत्येक विद्यार्थी हा शेतकरी व्हावा. असे माझे स्वप्न आहे.

लडाख मध्ये फळ, फुलांच्या वाढीसाठी जैन इरिगेशन सोबत काम करत आहे. सफरचंदासह अन्य फळबागांवर संशोधनात्मक कार्य केले जात आहे जेणे करून शेतकऱ्यांचा फायदा होईल. जगातील सर्वात गोड खुबानी लडाखमध्ये उत्पादित केली जाते त्यावरही जैन तंत्रज्ञानातून काही करता येईल का? यासाठी चर्चा सुरू आहे. कमी पाण्यात कमी खतांमध्ये उत्पन्न दूप्पट करण्याचा प्रयत्न जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनात दिसतो. या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी येऊन माहिती घ्यावी असे आवाहनही सोनम वांगचुक यांनी केले.डॉ. बी. के. यादव यांनी जैन इरिगेशन आणि सोनम वांगचुक यांच्यासोबत आईस स्तूफा ह्या संकल्पनेविषयी सांगितले. प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक चांदोरकर यांनी केले.

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

जळगाव दि. 20 प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव, शिक्षणाचा प्रवास, रमाबाईंसोबतचा विवाहप्रसंग, चवदार तळ्यासाठी केलेला महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, बाबासाहेब आणि संविधान, आम्ही भारताचे नागरिक संविधान अंगीकारत असल्याचा क्षण, बाबासाहेबांचे आर्थिक विकासाबाबात व शिक्षण आणि धर्माबाबतचे मानवता, बंधुत्व, समता यासाठी आपली कर्तव्य याबाबतचे विचार, संविधानाची महानता समानतेचा , स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा,  सांस्कृतिक व शैक्षणिकतेचा, धार्मिक स्वातंत्राचा, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, महिलांना सक्षमीकरणासाठीचे हिंदू कोड बिल यासह बाबासाहेबांचे जीवनाचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित आदर्श समाज या विषयावर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण प्रदर्शित केले.  यात नृत्य, वासुदेव, पिंगळा, भारुड, कीर्तन, पोवाडा,
 नाटिका सादर केले. विक्रम वेताळ्याच्या गोष्टीतून  बाबासाहेब आंबेडकर यांचा  प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखविला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला विभागातील विद्यार्थ्यांने बाबासाहेबाचे स्केच काढले.
छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर येथे झालेल्या फाऊंडर्स डे ची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. अनुभूती स्कूलचे संस्थापक श्रध्देय भवरलाल जैन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सह व्यवस्थापकीय संचालक  अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, रश्मी लाहोटी, अनुभूती निवासी स्कूल चे प्राचार्य देबाशिस दास यांच्यासोबत माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थीनी रागिणी झंजारे हिने मनोगत व्यक्त केले. व्यक्तीमत्व विकासात अनुभूती स्कूलचे स्थान मोलाचे आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा कुटुंबाचा सहवासात आदर्श माणुस घडविण्याचा शिकवण मिळाली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव – क्रीडा, शैक्षणिक, नृत्य यासह विविध क्षेत्रातील यशस्वी झालेल्या अनुभूती इंग्लिश मिडीयम प्रायमरी व सेकंडरी स्कूल च्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रागिणी मधुकर झंजारे, पियूष वासुदेव राणे, यश शेखर शिंदे, धनश्री दत्तात्रय झिरमारे, मुकुंद शिवदा चौधरी, अश्विनी समाधान वरसोळे, मयूरी महाले, घोषीता पाटील, प्रतिक चंद्रशेखर सपकाळे, रुद्राक्ष माळी, शैलेश दीपक गोरे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्मधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यान मालेचे हे चतुर्थ पुष्प आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असहयोग आंदोलनाचे विशेष महत्त्व आहे. २०२४ हे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहयोग आंदोलनाचे शताब्दी वर्ष असल्याने असहयोग आंदोलन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या दत्तात्रय धांडे सभागृहात करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे वक्ते मा. अनिल नौरिया गेली ४ दशके नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते नेहरु स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाचे वरिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत होते.
एक बहुआयामी अभ्यासू व्यक्तित्व  असलेल्या नौरिया यांनी दिल्ली, डर्बन, बडोदा, टोकियो, जोहान्सबर्ग, ग्वाल्हेर, हैदराबाद यासह विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके व संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. अंबिका जैन व कुलसचिव डॉ.  विनोद पाटील यांनी आयोजकांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  – एस. एस. म्हस्के

जळगाव दि. २० प्रतिनिधी – भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे साधन म्हणजे शेती उद्योगाकडे बघितले जाते. अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे त्याला नैसर्गिक फटका बसला की तो नैराश्याच्या गर्तेत अडकला जातो ही वस्तुस्थिती समाजात आहे. याउलट परिस्थिती जैन इरिगेशनच्या जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि चांगले मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही. हायटेक स्मार्ट शेतीचा मूलमंत्र देणाऱ्या या जैन हिल्स वरील कृषिमहोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने भेट दिली पाहिजे असे आवाहन जळगाव उपविभागाचे डाकघर अधिक्षक एस. एस. म्हस्के यांनी केले आहे.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. १४ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव आहे.  सौर कृषी पंप, वेगवेगळ्या वातावरणाला अनुसरुन पाईप, ठिबक तंत्रज्ञान, पाणी निचरा करण्याची पद्धती, फळलागवड पद्धत जी कमी जागेत जास्त उत्पन्न देणारी ठरणारी अशी अतिसघन आंबा लागवड पद्धत, त्यासोबतच हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफळ, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापरातून शाश्वत निर्यातक्षम उत्पादन कसे घेता येते हे प्रयोग येथे पाहता येत आहे.  हे फक्त प्रयोग नसून ते शेतकऱ्यांच्यासह भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. या कृषिमहोत्सवात डाक विभागाचासुद्धा स्टॉल आहे त्यालाही भेट देण्याचे आवाहन एस. एस. म्हस्के यांनी केले आहे.

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

जळगाव दि.१५ प्रतिनिधी – कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जातो. त्यातही प्रत्यक्ष अनुभूती देणारे जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार हे जगातील एकमेव कृषिमहोत्सव आहे. एकाच छताखाली जमिनीच्या मशागती पासून ते काढणी पर्यंत, काढणी पश्चात विक्री व्यवस्था, जल व मृद संधारण, अत्याधुनिक ठिबक सिंचन, फर्टिगेशन पद्धती, जैन ऑटोमेशन, रोपांची निर्मिती व लागवड प्रक्रिया, फ्युचर फार्मिंग म्हणजेच भविष्यातील शेतील, स्मार्ट अॅग्रीकल्चर याबाबत समजेल. शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या या महोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने यावे, तंत्रज्ञान बघावे ते आत्मसात करावे आणि प्रसारीत करावे जेणे करून उत्पादकता वाढविता येईल. आधुनिक शेतीचा अवलंब करुन सकारात्मक बदल घडविता येतो असे हॉर्टिकल्चर फलोद्यान माजी आयुक्त तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)चे माजी डी.जी.जी डॉ.एच.पी.सिंह  यांनी केले.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या सोबत सौ. बिमला सिंग, जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ.  बि. के. यादव, कृषी संशोधन विभागाचे संजय सोन्नजे उपस्थित होते.

हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफल, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापर यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. शाश्वत निर्यातक्षम उत्पादन केल्यामुळे योग्य भाव कसा मिळेल यासाठी फक्त मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष सल्ला त्यासाठी तज्ज्ञांची सुयोग्य मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. येथील तंत्रज्ञान पहावे, अनुभवावे, आपल्याजवळील काही संशोधणात्मक अनुभव असतील ते एकमेकांना सांगावे व गावांगावामध्ये जावून त्याचा प्रसार करावे असे आवाहनही डॉ. एच. पि. सिंग यांनी केले.

या कृषिमहोत्ससाठी मसाले पिकांचे प्रात्यक्षिक आहे. त्यात हिंग, लवंग, जायफळ, तेजपान, कापूर, कढीपत्ता, दालचिनी, मिरी, आले, हळद, लसुण, कांदा, मिरची, जिरे, धने यांचा समावेश आहे. यामध्ये १९ प्रकाराचे हळद, सात प्रकारचे लसूण आपल्याला पाहता येतील. कमी जागेत, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल यासाठी हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी चैतन्यदायी ठरेल.

हायटेक शेतीचा नवा हुंकार – जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

जळगाव दि. १४ (प्रतिनिधी) – शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’  पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत.  ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाधारित शेतीची कास धरली तरच चैतन्याचे व भरघोस उत्पन्नाचे मोठे संचित  शेतकऱ्यांच्या हाती लागेल हे त्रिवार सत्य आहे. या महोत्सवाची आधुनिक तंत्रज्ञान आणि नवचैतन्य ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे.  १४ जानेवारी २०२५ पर्यंत होणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ‘संजीवन दिन’ निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिक्स इन वन ह्या संकल्पनेत ऊसाची शेती, कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व  मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेले क्षेत्र याचा समावेश आहे.  कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्या जात आहेत. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, आले, लसूण यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता व अनुभवता येणार आहे.

*कृषी महोत्सवात १२ बैलगाड्यांची संकल्पना -*

आधुनिक काळात शेतीमध्ये बैल गाडी ही संकल्पना पुसट होत चालली आहे. ग्रामीण संस्कृतिचे जतन व्हावे आणि एक चांगला संदेश जावा यासाठी या महोत्सवात १२ बैल गाड्यांची संकल्पना उभारण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात यात्रा किंवा विशिष्ट तिथीला १२ गाड्या एकमेकांना बांधून एखादी व्यक्ती त्या ओढत असते. त्या बैलगाडीवर गावातील लोक बसलेले असतात. याच संकल्पनेच्या धरतीवर आधुनिक शेतीच्या तंत्राची, ठिबक सिंचन, पाईप, पाईप फिटींग, फिल्टर्स इत्यादी बाबी, तंत्रज्ञान अशी जैन इरिगेशनची उत्पादने या गाड्यांवर पहायला मिळतील. सेल्फीसाठी “जैन हायटेक एक्स्प्रेस” कृषी रेल्वेची कलाकृतीही जैन इरिगेशनच्या कला विभागातील आर्टिस्टद्वारा उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ही जैन हायटेक फार्मिंग एक्स्प्रेस कृषी क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याचं प्रतीकच आहे.

जैन हिल्स येथे या महोत्सवानिमित्त लागवड केलेले पिके त्यांचे माहिती फलके, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सज्ज आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये नव चैतन्य फुलण्यासाठी टिश्युकल्चर, सीड, सिडलींग यांचेही तंत्र एकाच छताखाली पहावयास मिळते. या महोत्सवाला भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

जळगाव, दि.  १३ (प्रतिनिधी) – ‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व मातीला सजीव ठेवावे असे आवाहन कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि अंकुर सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांच्या नेरी पळसखेडे रस्त्यावरील शेतात तुर पीक परिसंवाद व शिवार फेरी कार्यक्रम आयोजण्यात आला होता. कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील (लोहारा) हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, माजी प्रकल्प संचालक (आत्मा) अनिल भोकरे, अनिल चौधरी, दिलीप खोडपे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह  मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन आणि बळीराजाचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

आरंभी  निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. आयोजकांतर्फे पाहुण्यांचे स्वागत केले गेले. जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, जैन इरिगेशनचे वितरक ऍग्रो जंक्शनचे संचालक आणि प्रगतशील शेतकरी दिनेश पाटील हे आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवलंबत असतात. या तुरीच्या शेतात सुयोग्य पिकाचे वाण, दोन झाडांचे अंतर, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाचे व्यवस्थापन याविषयी सांगितले. पाण्याचे व खताचे चांगले व्यवस्थापन करावे आणि भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला, शेतकऱ्यांनी बाजारात जे विकले जाईल ते पिकवावे. बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांची निवड करून लागवड करावी. त्यासाठी उच्च कृषितंत्रज्ञान, ठिबक सिंचन, खते, मोबाईलसारखे तंत्रज्ञान वापरून गुणवत्तेचे भरघोस उत्पादन घ्यावे व जिल्ह्याला समृद्ध करावे. जिल्ह्यात साडेपाच हेक्टरवर कापूस लावला जातो. त्यात कडधान्य उडिद, मूग, तूर या पिकांना प्राधान्य द्यावे. याच सोबत जळगाव जिल्हा ठिबक सिंचनाचा अवलंब करणारा महाराष्ट्रातील एक नंबरचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, इथला शेतकरी सर्वात जास्त रासायनिक खतांचा वापर करतो. या सगळ्यांहून भूजल पातळी खूप खाली गेली आहे. भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे. या तिन्ही गोष्टी चिंतनीय आहे. प्रशासन म्हणून त्यावर योग्य ते काम सुरू आहे परंतु याबाबत शेतकऱ्यांनी ही सजगता ठेवायला हवी असे आवाहनही त्यांनी केले. जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे,  अंकुर सीड्स प्रा. लि. नागपूरचे सर व्यवस्थापक अमोल शिरसाठ आणि तुर पैदासकार नरेंद्र सावरकर आणि  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी मार्गदर्शन केले.

अंकुर सीड्स प्रा. लि. नागपूरचे सर व्यवस्थापक अमोल शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. कपाशी आणि त्यात तूर पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते. कपाशिसाठी कंपनीने मोठ्या बोंडाचे संशोधन केले आहे.  कंपनीने विकसित केलेल्या विविध वाणांची माहिती त्यांनी सांगितली.

जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेती करण्या आधी शेतकऱ्यांनी फ्रेम वर्क करायला हवे. तूर लागवड करण्याआधी आपण हेक्टरी किती उत्पादन घेऊ शकतो हे ठरविले पाहिजे. उत्पादन वाढीसाठी पिकाची ओळख करून घ्या. तुरीला सावत्र वागणूक देऊ नका, जमिनीच्या पोतनुसार रोपांचे अंतर ठरवावे. ठिबक सिंचन, फांद्यांची, शेंगांची संख्या इत्यादी विषयी काळजी घ्यावी. दाणा मोठा, चकाकी असलेली गुणवत्तेची तूर पिकवयची असेल तर न्युट्रिशनकडे संपूर्ण लक्ष द्यावे. गादी वाफा, ठिबक सिंचन, मलचिंग इत्यादीचां चपखल वापर व्हावा. फर्टीगेशन सुयोग्य पद्धतीने व्हायला हवे. गादी वाफा कसे, किती लांबी रुंदीचे असावे, दोन गादीवाफे यातील अंतर याबाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. १० बाय सव्वा या अंतराने २५ एकरावर तुरीची लागवड केली आहे. तीन वेळा शेंडे खुडल्यामुळे फांद्यांची संख्या वाढली. एकरी सरासरी दाणे संख्या वाढून भरघोस उत्पादन घेता येते. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.

अंकुर सीडचे तुर पिकपैदासकार नरेंद्र सावरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना त्रिसूत्री सांगितली. यात पहिलं सूत्र म्हणजे झाडांची संख्या आणि त्याचे व्यवस्थापन नीट करायला हवे, दुसरे महत्त्वाचे सूत्र आहे की पीक संरक्षणाकडे चांगले लक्ष द्यावे आणि तिसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे वेळोवेळी तज्ञांनी सांगितल्यानुसार बुरशीनाशकांच्या फवारण्या करणे आवश्यक आहे. चारू या तूर पिकाच्या वाणाबद्दल माहिती आणि त्यांचे वैशिष्ट्ये देखील त्यांनी सांगितले. खान्देश, विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या पसंतीचे वाण ठरले आहे. शेतकरी तुरीचे भरघोस उत्पादन घेत आहेत.

प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांनीही अनुभव कथन केले. कापूस व तुरीच्या लागवडीचा खर्च व मिळणारे उत्पादन यासाठीचे आर्थिक गणित मांडले. तुरीच्या लागवडीमुळे कसे फायद्याच्या गोष्टी सांगितल्या. दालमील असोसिएशनचे सचिव दिनेश राठी यांनी सांगितले की, जळगाव एमआयडीसीमध्ये १०० हून अधिक दालमील आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल उपलब्ध व्हावा. दाळ करण्यासाठी ज्या गुणवत्तेचा माल हवा तसा पुरविला तर आर्थिक दृष्ट्या ते योग्य ठरेल असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक गजानन मारकड, भूषण कोठावदे (भाजीपाला विभाग)  प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तीर्थराज इंगळे यांनी केले.

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स  डे’ उत्साहात संपन्न

जळगाव दि. 10 (प्रतिनिधी) –  ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली.
भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित ‘फाउंडर्स डे’ च्या सुरवातीला अनुभुती बालनिकेतनच चिमुकल्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. सुशील अत्रे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,  जैन परिवारातील जेष्ठ सदस्य गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांचे सह  सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, अंबिका जैन यांची उपस्थिती होती.
भारतीय सांस्कृतिक वारसा जपणारी आणि जागतिक दृष्टीवर आधारित अद्वितीय अशी अनुभूती निवासी शाळा आहे. यातील विद्यार्थ्यानी तबला, बासरी, गिटार या वाद्यांवर फ्युजन सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन झाले. त्यांच्या सोबत 2016 व  2018 चे विद्यार्थी उपस्थित होते. अनुभुती स्कुल ही शाळा नसुन एक कुटुंब आहे असे माजी विद्यार्थी आकांक्षा असनारे व तुषार कावरे यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक मुल्यावर सचित्र पेटिंग साकारले.
आरंभी म्युझिकल योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. गीत गायन आणि नृत्यामध्ये रुढीपरंपरा मानणा-या आजीला मनविणारी नाटिका जी कौटुंबिक मूल्यांची उलगडा करत होती. ती विद्यार्थ्यांनी सादर केली. नात्यातील प्रेम, भावना आणि विश्वास यातुन अधोरेखित झाले. शेतकरी कुटुंबातील कथा नाटिकेतुन सांगितले. त्यानंतर पारंपारिक नृत्य सादर करून एकात्मकतेचा जागर केला. याप्रसंगी अनुभुतीमधील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांविषयी सांगितले. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी अर्थव कांबळे, हीतेशी बनोथ, अरिन देशपांडे, अलेफिया शकिर, क्रीश संघवी, वरधिने अग्रवाल, अवियुक्त जैन यांनी सुत्रसंचालन केले.
हे विश्वच आपले कुटुंब – ॲड. सुशील अत्रे
आपले कुटुंब हे फक्त आजी आजोबा,आई वडील, भाऊ बहिण किंवा नातेवाईकांपुरते मर्यादित आपण केले आहे. मात्र संत ज्ञानेश्वर यांनी 12 व्या शतकात हे विश्वची माझे घर मानावे हा संस्कार दिला. वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार आपले वर्तन असावे. पृथ्वीवरील प्रत्येक घटक म्हणजे पशु-पक्षी, फुलं-झाडं, पर्यावरणातील प्रत्येक भाग आपलं कुटुंब मानलं पाहिजे. कुटुंब आणि कुटुंबाचे मूल्य याबाबत प्राईस आणि व्हॅल्यु ही संकल्पना ॲड. सुशील अत्रे यांनी समजून सांगितले जी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध नसते तीची किंमत त्याच वेळी समजते. घरातील आजी आजोबा, नाना नानी रक्ताच्या नातलगाकडून कौटुंबिक मूल्य पुढील पिढीला संस्कारीत करते.
जॉईन Trading Buzz
Exit mobile version