युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

जळगाव दि. २५ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ ला शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान तरूणींचा दहिहंडी महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. आय. रायसोनी महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल असे एकूण आठ महिलांचे गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश आहे. यासह शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक वादन करणार आहेत.

विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देणार आहेत. प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करणार आहेत. यासह लेझर शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरण होणार आहे. ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

क्रेनच्या सहाय्याने आठ दहिहंड्या उभारण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हा एकमेव तरूणींचा दहिहंडी महोत्सव आहे ज्या दहिहंडी फोडण्याचा मान फक्त आणि फक्त महिला गोविंदा पथकांना देण्यात येतो. दहिहंडी सारख्या साहसी खेळात महिलांचा सहभाग वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे. आयोजनाचे हे १६ वे वर्ष असून जळगावकर नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालगोपालांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. असे  युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत- कामिनी अमृतकर 

जळगाव दि. २४ (प्रतिनिधी) – ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे. कवितांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्यासाठी सोडलेला आहे. त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले…’ असे गौरोद्गार चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका कामिनी अमृतकर यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४४ वी जयंती साजरी झाली त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, शहरातील साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील  विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जैन इरिगेशनचे सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. आरंभी तुळशीचे रोप व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन केले गेले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त निष्णात हृदयरोगतज्ज्ञ दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  गायिका मनिषा कोल्हे यांनी ‘बहिणाबाईंच्या माझी माय सरसोती…’ या गाण्याचे सुश्राव्य संगीतासह नेहमीपेक्षा वेगळ्या चालीचे गीत सादर केले. शीतल पाटील यांनी ‘संकटाले देऊ मात..’ ही स्वतःची कविता सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजीडीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी देखील बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. यात  प्राजक्ता ढगे, नेहा पावरा, गायत्री कदम यांचा सहभाग होता. शानभाग विद्यालयाचे शिक्षक उमेश इंगळे, जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन, सौ. प्रज्ञा नांदेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

“माह्यी माय सरसोती!” पुस्तक प्रदर्शन – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित “माह्यी माय सरसोती!”  पुस्तकांच्या  प्रदर्शनाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्घाटन झाले. ज्या पत्री पेटीत सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाई चौधरीच्या कविता ठेवल्या होत्या त्या पेटीतून पाच निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांनी बहिणाबाईंचे पुस्तक बाहेर काढावे अशी जैन इरिगेशनचे ग्रंथपाल व चौधरी परिवारातील अशोक चौधरी यांची आगळी वेगळी संकल्पना होती. यात स्मिता चौधरी (चौधरी परिवारातील सदस्य), कामिनी अमृतकर (शिक्षिका), सौ. मनिषा कोल्हे (गायिका), शीतल शांताराम पाटील (साहित्यीक) आणि प्रिया चौधरी (गृहिणी) यांचा समावेश होता. आर. आर. शाळेतील कला शिक्षक स्व. सुधाकर संधानशिवे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारीत ९ ग्रंथांचे मुखपृष्ठ साकारले, त्यांच्या पुस्तकांचा संच त्यांचे सुपुत्र क्रियेटीव्ह आर्टिस्ट योगेश संधानशिवे यांनी बहिणाई स्मृति ग्रंथालयास सस्नेह भेट दिले. त्यांचा सत्कार विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन किशोर कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक अशोक चौधरी, प्रदीप पाटील, सुभाष भंगाळे, ज्ञानेश्वर सोनार यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, विजय लुल्हे त्याच प्रमाणे कैलास चौधरी, दिलीप चौधरी, प्रिया चौधरी, काजल चौधरी, कविता चौधरी, नीलिमा चौधरी समस्त चौधरी वाड्यातील सदस्य उपस्थित होते.

जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार

जळगाव, २४ ऑगस्ट (प्रतिनिधी) :–  टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून जागतिक पातळीवर ठसा उमटविणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने आता कॉफी पिकामध्ये टिश्यूकल्चर तंत्रज्ञान विकसीत केले आहे. याच श्रृखंलेत आता टिश्यूकल्चर पद्धतीने कॉफी रोपांची उपलब्धता व्यावसायीक तत्त्वावर केली जाणार आहे. यासंबंधीचा  सामंजस्य करार भारत सरकारच्या कॉफी बोर्डासोबत नुकताच करण्यात आला. याअंतर्गत रोबस्टा आणि अरेबिका कुळातील उच्च उत्पन्न देणाऱ्या कॉफीच्या सात वाणांची टिश्यूक्लचर पद्धतीने निर्मित रोपांची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसा परवाना भारत सरकारच्या कॉफी बोर्डाने जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडला बहाल केला आहे.

भारत हा जगात कॉफी उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश असून टिश्यूकल्चरच्या रोपांमुळे निर्यातक्षम उत्पादनाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी करारावेळी व्यक्त केला. या करारामुळे भारतातील कॉफी उद्योगात क्रांती घडून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल.

जैन टिश्यूकल्चर कॉफी रोपे ही गुणवत्तापूर्ण मातृवृक्षांपासून तयार केली जातात. उच्च उत्पन्न, उत्कृष्ट सुगंध गुणवत्ता आणि रोपांचा संतुलित घेर व आकार या परिमाणांवर निवडलेली असतात. टिश्यूकल्चर निर्मित कॉफी रोपे ही व्हायरस फ्री, कार्यक्षम आणि अनुवंशिकदृष्ट्या एकसारखी असतात. कॉफीच्या शाश्वत शेतीसाठी टिश्यूकल्चर रोपांची लागवड नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या जैन इरिगेशन केळी, डाळिंब आणि संत्रा यांची टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे यशस्वीरित्या तयार करून पीक शाश्वतीच्या उपायांमध्ये अग्रेसर आहे. या रोपांमुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे उत्पादन होऊन आर्थिक स्थिरता आली आहे.

भारतात सध्या जुन्या पद्धतीने कॉफी रोपांची लागवड करण्यात येते. यात दर्जेदार रोपे आणि प्रगत, तंत्रज्ञानाची उणीव जाणवते. त्यामुळे नविन विकसीत कॉफी टिश्यूकल्चर रोपांचे विविध फायदे कॉफी उत्पादकास मिळतील. यामुळे भारत व इतर देशांमध्ये कॉफी उद्योगाला निश्चित चालना मिळेल.

शेती अजूनही अनेक पातळ्यांवर अकार्यक्षम आहे. अजुनही शेतीमध्ये पारंपारिक पद्धतींचा वापर केला जात आहे. यामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स ही सतत शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अग्रेसर आहे. ही वचनबद्धता जैन इरिगेशनने हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येते. सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे या ध्येयाप्रमाणे काम सुरु असून टिश्यूकल्चर कॉफी रोपे हा जैन इरिगेशनने शेतकऱ्यांना समृद्धी देण्यासाठी तयार केलेला आणखी एक परिवर्तनकारी उपाय आहे.

“जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ला टिश्यूकल्चर निर्मित कॉफी रोपे जगासमोर आणताना अत्यंत अभिमान वाटतो आहे. रोगमुक्त, अनुवंशिकदृष्ट्या एकसमान आणि अधिकचे उत्पन्न देणारी, असे विविध वैशिष्ट्ये असलेली कॉफीची टिश्यूकल्चर रोपे भारतीय कॉफी उत्पादकांना समृद्धी देईल.” – अजित जैन,  सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

“जगात प्रथमच जैन इरिगेशनच्या माध्यमातून भारतात कॉफीसाठी टिश्यूकल्चर तंत्रज्ञान प्रमाणित केले आहे. या टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेल्या कॉफी रोपांचे शेतात मूल्यांकन केले गेले आहे. हे नवनिर्मित तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये निश्चितच नियमित वाणांपेक्षा खूप चांगले परिणाम दाखवत आहे. कॉफी बोर्ड, कॉफी उत्पादकांची असोसिएशन आणि व्यक्तीगत कॉफी इस्टेट मालकांच्यावतीने या कराराचे मी मन:पुर्वक स्वागत करतो. ’’ – के. जी. जगदीशा, सचिव व सीईओ, कॉफी बोर्ड, भारत सरकार

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट तर्फे आज चौधरी वाड्यात कार्यक्रम

जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) –  बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता  १४४ वी जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी खामगाव जि. बुलडाणा येथील साहित्यिक प्रा. देवबा शिवाजी पाटील, चाळीसगावच्या सौ. कामिनी अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, समस्त चौधरी परिवार, साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील  विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास येण्याचे करावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

कान्हदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात सन्मानाचे स्थान आहे. बहिणाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या, काव्यातील साधेपणा, सोपी अन् हृदयाला भिडणारी भाषा, भावनांमध्ये प्रांजळपणा, शब्दाआड रुजलेला माणूसकीचा ओलावा, निसर्ग, पशु-पक्षी, शेती माती आणि कष्टांवर अतुट प्रेमामुळे त्यांच्या कविता अगदी सहजरीत्या बालपणापासूनच घराघरात पाठ्यपुस्तकांद्वारे, गाण्याच्या माध्यमातून पोहोचली.

प्रमुख पाहुणे प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगाव, जि. बुलढाणा, सुप्रसिद्ध साहित्यिक, आजपर्यंत एकूण ५९ पुस्तके प्रकाशित, विषय – धार्मिक स्तोत्रे, संत साहित्य, काव्यसंग्रह, देशभक्ती, विज्ञान, निसर्ग, कथासंग्रह, शैक्षणिक, युवांसाठी लेखसंग्रह, सामाजिक वैचारिक लेखसंग्रह, शालोपयोगी साहित्य, बालकुमार कादंबरी, कथासंग्रह इ. असून अनेक मानाचे (६)  साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात विशेष सन्मान म्हणजे साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या ग्रंथावर समीक्षा ग्रंथ ही प्रकाशित झाली आहेत तसेच त्यांच्या काव्यसंग्रहांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते साहित्य कुंज या नियतकालिकाचे संपादक आहेत. साहित्य कुंज या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी अनेक काव्य-लेख-कथा स्पर्धांचे व विद्यार्थी साहित्य मेळाव्यांचे आयोजन केले आहे. ते खामगाव येथे उन्मेष नावाचे वाचनालय ही चालवितात. प्रमुख पाहुण्यांसोबत चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका, निवेदक सौ. कामिनी सुनिल अमृतकर या देखील उपस्थित असतील. या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन “माह्यी माय सरसोती!” याचे ही आयोजन केले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी आवाहन केले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

जळगाव दि. २० प्रतिनिधी –  गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरे याच्या संयुक्त विद्यमाने कै.रामदास त्र्यंबक दिघे-पाटील  यांच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात विविध प्रजातीचे ८५ रोपाची लागवड करण्यात आली.  याप्रसंगी  जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे राजेंद्र राणे, शाळेचे माजी विद्यार्थी अनिल पाटील, दापोरेचे सरपंच महादवराव गवंदे , गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ, शाळेचे शिक्षकांसह  गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार, वन विभाग व सामाजिक वनीकरणाचे क्षेत्रीय अधिकारी देविदास जाधव, अनिल साळुंखे, संदीप पाटील, भरत पवार आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांमध्ये राजेंद्र राणे यांनी वृक्ष संवर्धना बाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिली. अनिल पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला असून  शाळेच्या परिसरात जे वृक्ष लागवड केली आहे त्याची जबाबदारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसह सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगितले. दापोरे गावात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून जनहिताचे विविध उपक्रम राबविले जात आहे. सूत्रसंचालन श्री.समाधान पाटील यांनी केले. श्री. राहुल मोरे यांनी आभार मानले.

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ सुभाष चौधरी अनंतात विलीन

 जळगाव – ता ( 19 )  येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी ( वय 79 )  यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले.  यावेळो माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आमदार शिरोष चौधरी, केसीई चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन , प्राचार्य अनिल राव , ऍड प्रकाश पाटील, माजी महापौर नितीन लद्धा, भोरगाव लेवा पंचायत चे सदस्य ऍड संजय राणे  आर्किटेक्ट दिलीप कोल्हे, जैन परिवारातील सर्व सदस्य, कंपनी चे सहकारी ,  शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, वकील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार डॉ उल्हास पाटील, जैन इरिगेशन चे उपाध्यक्ष अनिल जैन, चौधरी परिवाराच्या वतीने राजीव चौधरी यांनी भावना व्यक्त केल्यात . डॉ चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन  रुग्ण सेवा केली.
डॉ चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते यासह  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठा चे मॅनेजमेंट कौन्सिल चे सदस्य तसेच  सिनेट सदस्य , महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

जळगाव दि.१४ प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहकार्य लाभले आहे.

याप्रसंगी एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधिक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) महेश ढाके, साठवणूक विभागाच्या सहाय्यक अधिक्षक अर्चना मेढे, एल. एम. पवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जैव विविधत जपता यावी यासाठी वृक्षारोपणासह संवर्धनाची मोहिम हाती घेतली आहे. या सृजनशील उपक्रमात जळगाव हरित करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. राज्य वखार महामंडळ येथे झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी प्रास्ताविकात मदन लाठी यांनी उपक्रमाविषयी सांगितले.

सुधीर पाटील यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. अर्चना मेढे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशतर्फे मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे जोपासली असून ती सावली देत आहे. आज लावलेली झाडांची निगा सर्वांच्या सहकार्यातून राखणार असल्याची हमीसुद्धा त्यांनी दिली. एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया यांनी झाड हे ऑक्सीजन देऊन मनुष्याला जगविण्याचे कार्य करते, त्यामुळे आज वृक्ष जगवले तरच आपण जगू शकू असे सांगत, वृक्षारोपण करुन ते जगविण्याचे आवाहन केले तसेच  गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम खूपच कौतूकास्पद आहे यात सहभागी होता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे उमेश सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, वखार महामंडळाच्या शोभा सोनवणे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित

जळगाव दि.18 प्रतिनिधी– भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या प्रायोजनाने युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 15 वर्षांपासून जळगाव शहरात तरुणींचा दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते. यावर्षीसुद्धा मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे सायंकाळी 6.30 ते रात्री 9.00 वाजे दरम्यान तरुणींचा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो. दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजक प्रयत्नशील असतात.
तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, पियुष हसवाल, राजेश नाईक आदी उपस्थित होते. यामध्ये तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरविण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रितम शिंदे, उपाध्यक्ष-संदीप सूर्यवंशी, सचिवपदी प्रशांत वाणी, सहसचिव-पवन चव्हाण, खजिनदार-पियुष हसवाल, सहखजिनदार सागर सोनवणे, भटू अग्रवाल, सोशल मिडीया समन्वयक शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख पियुष तिवारी, सदस्य- आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, समिर कावडीया, सैफ मनसुरी, विपीन कावडीया, अजय खैरनार, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, यश श्रीश्रीमाळ, गणेश भोई,  श्रेयस मुथा, मनजीत जांगीड, विनोद सैनी, इत्यादी.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साह

जळगाव दि.16 – विकास आणि विकासात्मक वाटचाली कडे मार्गक्रमण होण्यासाठी ड्रीप, स्प्रिंकलर्स, पाईपसह आधुनिक तंत्रज्ञान कंपनीतर्फे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. कंपनी आता अधिक संशोधनावर भर देणार असून शेतकऱ्यांना परिवर्तनशील होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा व जैन सौलर कृषी पम्प बाजारात पुर्नप्रस्थापीत केले जाईल. टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातही सकारात्मक बदल केले जात आहेत. सध्या व्यवसायांमध्ये मशिन लर्निंग व एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे. शेतीत मशीन लर्निंग (एमएल) आणि आर्टिफिशीयल इंटिजलेन्स (एआय) कसे वापरावे याचा विचार करुन संशोधन केले जाणार आहे. भविष्याचा वेध घेवून शेतीत परिवर्तनाच्या माध्यमातून उन्नती साध्य होणार आहे. सकारात्मक बदल होऊन अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे. त्यादृष्टीने जैन इरिगेशन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. असे मनोगत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले.

 

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्लास्टिक पार्कच्या पटांगणात झाली. याप्रसंगी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, शिषीर दलाल, घन:श्याम दास, नॅन्सी बॅरी, डॉ. एच. पी. सिंग, चीफ फायनान्शिअल ऑफिसर बिपीन वलामे, कंपनीचे सेक्रेटरी ए. व्ही. घोडगावकर व संचालक मंडळ तसेच जैन फार्मफ्रेश फूडचे संचालक अथांग जैन व जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. सभेला भागभांडवलदार, सहकारी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेची सुरुवात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘नमन करो ये भारत है’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. रायसोनी मॅनेजमेंट आणि अनुभूती निवासी स्कूलचे विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण सभेत कामकाज अनुभवले. अन्मय जैन यांच्यासह विद्यार्थ्यांनी तयार केलेले ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर केले. सभेच्या कामकाजाच्या सुरवातीला वर्षभरात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील वर्षाचे लेखाजोखा पत्रक, नविन संचालकांची नियुक्त आणि निवृत्ती यासह आठ ठराव सर्वानुमूते पारित करण्यात आले.

 

या सभेत स्वतंत्र संचालक घन:श्याम दास व डॉ. एच. पी. सिंग, राधिका दुधाट यांची निवृत्ती जाहिर करण्यात आली. तर त्यांच्या जागी शिषीर दलाल व अशोक दलवाई यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. तर जॉनेस्ट बास्टीयन, नॅन्सी बॅरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूकीची घोषणा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते निवृत्त संचालक डॉ. एच. पी. सिंग, घन:श्याम दास यांचा स्मृतीचिन्ह व आठवणीतला अल्बम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली.

 

यावेळी मनोगतात डॉ. एच. पी. सिंग यांनी सांगितले की, ‘भावना प्रेम आणि शक्ती जिथे असेल तिथे ईश्वराची प्राप्ती होते. भवरलालजी जैन यांना त्यांच्या कार्यातूनही प्राप्त झाली. त्यामुळेच ते शेतकऱ्यांसाठी ईश्वर ठरले. जो पर्यंत भूक लागेल तोपर्यंत शेतीतून उत्पादन घेतले जाईल सोबतच मूल्यवर्धित सेवा घडत राहिल. त्यामुळे शेतकरी सुखी तर आपण सुखी ही मोठ्याभाऊंची भावना पुढील पिढीवर संस्कारीत झाली आणि हा विचार प्रेरणादायी ठरला. यातूनच जैन इरिगेशनशी भावनिकरित्या ऋणाबंध जोपासल्याचे’ डॉ. एच. पी. सिंग म्हणाले.

 

‘शिस्त, गुणवत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावहारिक पारदर्शकतेमुळे जैन इरिगेशनशी जुळलो. कृषी क्षेत्रात खूप आव्हाने आहेत मात्र शाश्वत लक्ष्य ठेवले तर त्यातही मोलाचे योगदान देता येऊ शकते. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देता येऊ शकते.’ असे मनोगत घन:श्याम दास यांनी व्यक्त केले.

 

मान्यवरांच्या उपस्थित जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञान व उत्पादनांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी Jains Connect हे कंपनीशी सर्वांना जोडणारं अॅप लॉच करण्यात आले. जैन इरिगेशनच्या संकल्प गीत चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. आभार अतुल जैन यांनी मानले.राष्ट्रगिताने समारोप झाला.

 

 

सौर कृषि पंप विभाग नव्याने कार्यान्वित

 

अनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अधिक जवळ जाण्यासाठी, त्यांच्याशी जुळन राहण्यासाठी सौर कृषी पंप विभागाची नव्याने सुरवात करण्यात येणार आहे. ठिबक, तुषार, पाईप हे व्यवसाय तर आहेत. त्याच्या जोडीला सौर कृषी पंपाची जोड महत्त्वाची ठरणार आहे. कृषी पंप व अपारंपारिक ऊर्जा यांचा सुरेख संगम घडवून त्यामाध्यमातून कंपनीचा महसूल वाढविण्याचा विचार ही व्यक्त केला. जगात २.५ मिटर इतक्या मोठ्या व्यासाचा पाईप जैन इरिगेशनद्वारे निर्माण केला होतो. डिस्लॅनिशेन प्रकल्पांमध्ये शंभर वर्ष टिकणारा हा पाईप भविष्यातील व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

78 वा स्वातंत्र्यदिन 2024: PM मोदींच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्य

देशाने आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केले. यंदाच्या भाषणात त्यांनी देशाचा विकास आणि तरुणांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला.

महत्त्वाचे मुद्दे:

* वैद्यकीय शिक्षणात मोठा बदल: PM मोदींनी घोषणा केली की देशात 75,000 नवीन वैद्यकीय जागा सुरू केल्या जातील. हा निर्णय देशातील डॉक्टरांची संख्या वाढवण्याच्या आणि आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

* एक देश, एक कायदा: पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याची वकिली केली. ते म्हणाले की UCC सर्व भारतीयांसाठी समानता आणेल.

* तरुणांवर भर : पंतप्रधान मोदींनी तरुणांना देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी प्रेरित केले. तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, असे ते म्हणाले.

* आत्मनिर्भर भारत: पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, भारताला जागतिक नेता बनवायचे असेल तर आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल.

* शेतकऱ्यांचा आदर: पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना देशाचे अन्नदाता म्हणून वर्णन केले आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

एकूणच, पंतप्रधान मोदींचे भाषण देशाच्या विकासावर आणि तरुणांच्या सक्षमीकरणावर केंद्रित होते. त्यांनी देशवासियांना एकजुटीने काम करण्याची आणि भारताला एक मजबूत राष्ट्र बनवण्याची प्रेरणा दिली.

इतर महत्त्वाचे मुद्दे:

* 11व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण : PM मोदींनी सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला.

*ज्ञान (गरीब, युवक, अन्नदाता आणि महिला): यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

* कोविड -19 साथीचा रोग: पंतप्रधान मोदींनी कोविड -19 साथीच्या रोगाविरूद्ध भारताच्या लढ्याचा उल्लेख केला आणि देशवासियांच्या धैर्याबद्दल त्यांचे आभार मानले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version