CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे.पण आता हे जून 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. CBDT ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, त्यांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2023 ते 30 जून 2024 पर्यंत कराराच्या आधारावर वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नितीन गुप्ता हे 1986 च्या बॅचचे IRS म्हणजेच भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. जून 2022 मध्ये ते CBDT मध्ये रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात सरकारच्या कर संकलनात प्रचंड वाढ झाली आहे. FY23 मध्ये, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 16.61 लाख कोटी रुपयांचा विक्रमी प्रत्यक्ष कर गोळा केला.
FY22 च्या तुलनेत FY23 मध्ये प्रत्यक्ष कर संकलनात 17.63 टक्के वाढ नोंदवली गेली. FY22 मध्ये प्रत्यक्ष करातून 14.12 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले. CBDT ही करविषयक बाबींची सर्वोच्च संस्था आहे. तसेच, अध्यक्ष हे त्याचे प्रमुख आहेत. विशेष सचिव दर्जाचे अधिकारी असलेले 6 सदस्यही आहेत.