नविन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाचे विद्यार्थीही अभ्यासणार महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान
जळगाव दि. 27 – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात आज महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कराराद्वारे शैक्षणिक, संशोधन आदान-प्रदान, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आदींचा समावेश आहे. याअंतर्गत विद्यापिठातील विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमांमधे सहभागी होता येणार आहे.
महात्मा गांधीजींची विचारधारा यांचा प्रचार-प्रसारासाठी पीजी डिप्लोमा, संपोषित ग्रामीण पुर्ननिर्माणासाठी स्नातकोत्तर डिप्लोमा, संघर्ष परिवर्तनवर कार्यशाळा, युवा पिढीचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प, आंतरराष्ट्रीयस्तरावर शांती व अहिंसेच्या संदर्भात विंटर स्कूल, संशोधनासाठी वेगवेगळे इंटर्शनशिप, फेलोशिप, महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन यांच्यासह गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रामविकास असे विविध उपक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन राबवित असते. या सर्व उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील विद्यार्थ्यांनाही यात संधी निर्माण होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने यापूर्वी अमेरिकेतील एरिझोना स्टेट विद्यापीठ, मेक्सिकोमधील सायंटिस विद्यापीठ, महात्मा गांधीद्वारा स्थापित गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, इटली येथील पीस फाऊंडेशन आदींमधे यापूर्वी सामंजस्य करार केलेले आहेत. या श्रृखंलेत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे.
या करारावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. डॉ. गिता धर्मपाल यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या, यावेळी विद्यापिठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व संचालक डॉ. राजेश जावळेकर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने वरिष्ठ सल्लागार व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, समन्वयक उदय महाजन, असोसियट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. विद्यापीठातर्फे प्रा. ए. एम. महाजन, प्रा. सतीष कोल्हे, प्रा. डी. एच. मोरे, प्रा. पी. पी. माहुलीकर, डॉ. विकास गिते, प्रा. प्रविण पुराणीक, प्रा. उमेश गोगडीया, प्रा.दीपक सोनवणे, सीए. रवींद्र पाटील, पीआरओ डॉ.सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. के. बी. पाटील यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन व विद्यापीठाच्या कराराद्वारा भविष्यात युवकांसाठी रचनात्मक शिक्षण प्रणालीत नव-नवीन संकल्पना साकार होतील. डिग्रीपेक्षा प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव घेता येईल, असे प्रतिपादन यावेळी केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी हा करार ऐतिहासीक असल्याचे सांगितले. डॉ. राजेश जावळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.