ट्रेडिंग बझ –अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा FPO लवकरच येत आहे. या एफपीओबाबत बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीने 20,000 कोटी रुपयांच्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) साठी स्टॉक एक्स्चेंजकडे ऑफर लेटर दाखल केले आहे. देशातील दिग्गज अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाची ही प्रमुख कंपनी आहे.
कंपनीचा FPO 27 जानेवारीला उघडेल :-
ऑफर लेटरनुसार, अदानीचा एफपीओ 27 जानेवारीला उघडेल आणि 31 जानेवारीला बंद होईल. FPO अंतर्गत, कंपनीने 3112 रुपये ते 3276 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. बुधवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 3,595.35 रुपयांवर बंद झाले होते.
कंपनी येणारा पैसे कुठे वापरणार ?
FPO मधून उभारलेल्या 20,000 कोटींपैकी 10,869 कोटी रुपये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, विद्यमान विमानतळांचा विकास आणि नवीन एक्सप्रेसवे बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय 4,165 कोटी रुपये विमानतळ, रस्ते आणि सौर प्रकल्पांच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील.
व्यापारी म्हणून सुरुवात केली :-
अदानी गृपची सुरुवात व्यापारी म्हणून झाली आणि आज त्यांचा व्यवसाय बंदरे, कोळसा खाण, विमानतळ, डेटा सेंटर्स आणि सिमेंट तसेच हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. AEL हे भारतातील सर्वात मोठे सूचीबद्ध बिझनेस इनक्यूबेटर आहे आणि ते ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि लॉजिस्टिक, ग्राहक आणि प्राथमिक उद्योग या चार प्रमुख उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतलेले आहे.
नवीन व्यवसायाचा विस्तार करणारी कंपनी :-
कंपनीने म्हटले आहे की, आम्ही गेल्या काही वर्षांत अदानी समूहासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यात मदत केली आहे. त्यांना एक मोठा आणि स्वावलंबी व्यवसाय विभाग म्हणून विकसित केले आणि नंतर त्यांना स्वतंत्र सूचीबद्ध व्यासपीठ म्हणून वेगळे केले. कंपनीच्या सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम, डेटा सेंटर्स, विमानतळ, रस्ते, अन्न FMCG, डिजिटल, खाणकाम, संरक्षण आणि औद्योगिक उत्पादन यांचा समावेश आहे.
कंपनीवर किती कर्ज आहे ? :-
कंपनी ग्रीन हायड्रोजन, विमान वाहतूक क्षेत्र आणि डेटा केंद्रांसह नवीन संधींचा लाभ घेत आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीचे कर्ज 40,023.50 कोटी रुपये होते.