भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खान आशिया चषक 2022 मधून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. दीपक चहर टीम इंडियासोबत आशिया कप 2022 साठी यूएईला गेला होता आणि त्याला स्टँड-बॉय खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु आता तो मुख्य संघात आला आहे, म्हणजेच आता तो भारतासाठी सामने खेळू शकणार आहे.
आशिया चषक स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये आवेश खानची कामगिरी फारशी चांगली नव्हती आणि पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यात तो खेळला नव्हता. आवेश खानला ताप होता आणि त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. या सामन्यात भारतीय संघाचा ५ गडी राखून पराभव झाला. त्याचवेळी दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतून दुखापतीतून दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन केले आणि चांगली कामगिरी केली. त्यानंतर आशिया कप 2022 साठी तीन स्टँड-बॉय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. दीपक चहर, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर हे तीन स्टँड-बॉय खेळाडू होते. यातील रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर अक्षर पटेलचाही मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.