जळगाव, विक्रांत संतोष मिश्रा (११ वर्षे) याचा कारची धडक मारून जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा बाप तथा कारमालक याला अटक करावी या मागणीसाठी उद्या (दि. २)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डायमंड्स व्हाट्स ॲप गृपतर्फे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येईल. या आंदोलनात शहरातील इतर संघटना सहभागी होऊ शकतात.
या धरणे आंदोलनाबाबत डायमंड्स गृपची भूमिका अशी –
डायमंड व्हाट्स ॲप गृपचे सदस्य व जळगावचे नागरीकांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने एक दिवसाचे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाच्या निमित्ताने खालील मागण्या करण्यात येत आहेत.
१) जळगाव येथे मेहरूण तलाव भागातील पायी फिरण्याच्या ट्रेकवर रविवार, दि. २८अॉगस्टला दुपारी साडेतीनला MH19 BU 6606 या कारने स्व. विक्रांत संतोष मिश्री याला धडक दिली. या घडकेमुळे विक्रांत याचा हकनाहक जीव गेला. ज्या कारने विक्रांतला उडविले त्याचा चालक हा अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी मुलांच्या अभिक्षण गृहात झाली. मात्र कारचा मालक खरा संशयित आरोपी व अल्पवयीन मुलाचा बाप मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा (रा. जळगाव) हा घटनेपासून फरार असून त्याने अद्याप पोलीसांना तपासात कोणतीही मदत केलेली नाही.
संशयित आरोपी कार मालकाने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दि. ५ अॉगस्टला सुनावणी होईल. त्यापूर्वी पोलीस विभागाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासाठी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक व मा. जिल्हा सरकारी वकील यांनी कटाक्षाने बाजू मांडावी. संशयित आरोपी कार मालकास अटक होऊन पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
२) जळगाव शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुचाकी व चारचाकी वाहने अल्पवयीन मुले-मुली पळवतात. त्यांच्याकडे वाहन चालक परवाने नाहीत. अशा मुला-मुलींकडे बेजबाबदार पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होऊन स्व. विक्रांत मिश्रासारखे बळी जातात. आमची नागरिक म्हणून मागणी आहे की, पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींना भर चौकात पकडावे. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी. असे केल्याने बेजबादार पालक वठणीवर येतील.