पेटीएमवरील विश्लेषकांचा विश्वास परत येत आहे. पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सना खरेदीचा सल्ला देणाऱ्या विश्लेषकांची संख्या वाढत आहे.पेटीएम हे देशातील पहिले डिजिटल पेमेंट स्टार्टअप आहे. पेटीएमचे शेअर्स गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाले होते. त्यानंतर शेअरमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे.
या आठवड्यात, पेटीएम शेअर्सवर खरेदी सल्ला देणाऱ्या विश्लेषकांची संख्या चार झाली. या वर्षाच्या सुरुवातीला ही संख्या फक्त 2 होती. कंपनीचे शेअर्स विकण्याची शिफारस करणाऱ्या विश्लेषकांची संख्या अजूनही 3 आहे. याचा अर्थ असा की पहिल्यांदाच, पेटीएम शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणाऱ्या विश्लेषकांची संख्या विक्रीचा सल्ला देणाऱ्या विश्लेषकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे.पेटीएमच्या डिसेंबर तिमाहीच्या निकालांनी बाजाराला आश्चर्यचकित केले. यानंतर गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक मनीष अडुकिया यांनी त्यांचे रेटिंग न्यूट्रलवरून बदलून ‘बाय’ केले. कंपनीच्या शेअर्ससाठी 1,460 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. याचा अर्थ या समभागात सुमारे 50 टक्क्यांची वाढ होऊ शकते.
मात्र, यामुळे पेटीएमच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फारसा दिलासा मिळणार नाही. पेटीएमच्या आयपीओमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सूचीबद्ध झाल्यापासून समभागाचे मूल्य निम्म्याहून अधिक घसरले आहे. खराब कामगिरी करणाऱ्या नवीन समभागांमध्ये पेटीएमचे स्थान झोमॅटोच्या खालोखाल आहे.
पेटीएमचे शेअर्स 19 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. कंपनीने गुंतवणूकदारांना 2,150 रुपये दराने शेअर्सचे वाटप केले होते. त्या तुलनेत, शेअर्स 9 टक्क्यांच्या सवलतीसह 1,955 रुपयांवर सूचीबद्ध झाले. 20 टक्क्यांनी घसरल्यानंतर कंपनीचा शेअर लोअर सर्किटला लागला होता. तेव्हापासून समभागाने कमजोर कल कायम ठेवला आहे. मंगळवारी पेटीएमचा शेअर 2.05 टक्क्यांनी घसरून 937.90 रुपयांवर बंद झाला.