बाजार नियामक सेबीने सोमवारी टायटन कंपनी लिमिटेडच्या तीन कर्मचार्यांना इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला. सेबीला टायटनकडून प्रिव्हेन्शन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग (पीआयटी) च्या उल्लंघनाबाबत टायटनकडून पत्र प्राप्त झाले होते. या पत्रात तीन व्यक्ती/कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग नियम आणि कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पत्र मिळाल्यानंतर, सेबीने या प्रकरणाची चौकशी केली आणि असे आढळले की कर्मचारी आणि नामनिर्देशित व्यक्तींनी एप्रिल, 2018 ते मार्च 2019 या कालावधीत पीआयटी नियमांचे उल्लंघन केले आहे. सेबीच्या तीन स्वतंत्र आदेशांनुसार, या कर्मचाऱ्यांमध्ये ए रथिनप्पन, मुरुगन एम आणि के नागभूषण यांचा समावेश होता.
सेबीने या तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. टायटनमध्ये काम करत असताना तिघांनीही टायटनच्या शेअर्सचे व्यवहार केले होते, परंतु त्यांनी या व्यवहारांबाबत पीआयटीच्या नियमांनुसार आवश्यक माहिती कंपनीला दिली नाही.
यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी सेबीने माइंडट्रीच्या शेअर्सच्या इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात दोन व्यक्तींना दंड ठोठावला होता. या दोघांनी इनसाइडर ट्रेडिंगचे उल्लंघन केल्याचे सेबीला आढळले. सेबीने दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये उदय किरण लिंगमनेनी आणि विराट कुमार येरमल्ला यांना प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावला आहे. इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन करताना हे दोघेही माइंडट्रीचे कर्मचारी होते.
सेबीने सांगितले की उदय किरण लिंगमनेनी हे कंपनीचे कर्मचारी होते आणि त्यांनी तपास कालावधीसह अनेक प्रसंगी शेअर्सचे व्यवहार केले होते. सेबीने सांगितले की, नोटीस प्राप्तकर्त्यांनी त्याच तपास कालावधीत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार केल्याचेही आढळून आले आहे.