जळगाव, दि.२ (प्रतिनिधी) – ‘कर्म की भाषा को समझो, क्या पता हम सब की तकदीर बना दे…’ असा संदेश देणारी आदिनाथ भगवान यांची कथा आणि भक्तामर स्तोत्र पठण केल्याने प्राप्त होणारे लाभ अत्यंत प्रभावीपणे सादर करून जळगावकरांचे मन जिंकले. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हिलिंग सेंटरच्या कलाकारांनी २ ऑक्टोबरच्या सायंकाळी वेगळी अनुभूती दिली.
भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मनाली मुनोत लिखित ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर झाली. रंगभूमीवर १०० कलावंत ‘भक्तामर स्तोत्रातील’ देवत्व आणि चमत्कारी शक्ती यांची प्रभावीपणे सादरीकरण केली. दैनंदिन जीवनातील प्रसंग, चिंता, समस्या व भक्तामर स्तोत्रातील कोणती गाथा पठण करावी हे संगीत आणि नाट्याभिनयाच्या सहाय्याने जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले होते.
भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली.
यावेळी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या कार्यपरिचयाची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. विश्वस्त अशोक जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या स्नेहल चोरडिया, सीमा सेठीया आणि सुजाता शिंगवी तसेच नाटिकेच्या लेखिका मनाली मुनोत तसेच पद्माजी चंगेरिया यांचा सन्मान करण्यात आला. जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी केले.
सेवादास दलुभाऊ जैन, जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन,सचिव सुलेखा लुंकड तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन,ज्योति जैन, निशा जैन, शोभना जैन आणि डॉ. भावना जैन यांच्यासह राजकुमार सेठीया, प्रदीप मुथा, दिलीप गांधी,स्वरुप लुंकड, कस्तुरचंद बाफना, यांच्यासह छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह स्त्री – पुरुष पूर्ण भरला होता तर काही श्रोत्यांनी बाहेरच्या मंडपात मोठ्या स्क्रिनवर या नाटिकेचा आनंद घेतला.