जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त व गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. जळगाव शहरातील शिक्षक, पालक व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशनने मागील वर्षी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता मूल्याची रुजुवात व्हावी तसेच समाजात स्वच्छता विषयाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी शाळांनी वर्षभर कोणते उपक्रम राबवावे याबाबत एक मार्गदर्शिका देण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाचा सहभाग तसेच राबविलेल्या उपक्रमांची परिणामकारकता, सातत्य यावर मूल्यांकन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील ८० तालुक्यातील १६३ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. नोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यातील स्वयंमूल्यांकनावर आधारित अहमदनगर, अकोला, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, पुणे, रत्नागिरी, संभाजीनगर, सातारा, सिंधुदुर्ग, यवतमाळ या १९ जिल्ह्यातील २९ तालुक्यातील ४१ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. या सर्व शाळांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या टीमने प्रत्यक्ष भेट दिली.
जैन हिल्सवरील गांधी तीर्थाच्या कस्तुरबा सभागृहात दुपारी ३ वाजता हा सोहळा होणार आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेस रु. एक लाखाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शाळेस रु. एकावन्न हजार, एकतीस हजार व एकवीस हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच अंतिम मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या शाळांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.