जळगाव दि.२४ (प्रतिनिधी)- भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमांतर्गत पहिला टप्पा २२ व २३ एप्रिलला यशस्वी झाला. आता २५ व २६ एप्रिल २०२४ दरम्यान दुसरा टप्पा जैन हिल्स येथे संपन्न होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांचा व त्यांच्या समवेत ५० फालीच्या शिक्षकांचा सहभाग राहणार असल्याचे कळविले आहे.
फाली संम्मेलनाचे हे दहावे वर्ष असून जैन इरिगेशनसह, गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचा सहयोग लाभलेला आहे. या वर्षापासून मध्यप्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच सहभाग झाला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य काही कंपन्यांकडून फालीला सौजन्य प्राप्त होणार आहे. असोसिएशन फॉर फालीचे बोर्ड मेंबर्स (सदस्य) त्यासाठी पाठपुरावा करत आहेत असे फालीचे चेअरपर्सन, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी २५ एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत क्षेत्र भेटी होतील. यात टिश्यू कल्चर लॅब, यूएचडीपी (अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्टेशन) फ्रूट डेमो प्लॉटला, फळ प्रक्रिया आणि कांदा निर्जलीकरण प्लांट, टिश्यू कल्चर पार्क आणि फ्युचर फार्मिंगला भेट देऊन आल्यावर सुप्रसिद्ध “खोज गांधीजी की” या एकमेव अद्वितीय दृक-श्राव्य संग्रहालयास विद्यार्थ्यांची भेट होईल. त्यातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचे जीवन आणि कार्य अनुभवता येऊ शकेल. जैन हिल्स येथील ठिबक सिंचन प्रात्यक्षिक व परिश्रम येथे विद्यार्थ्यांची भेट ठरलेली आहे. दुपार सत्रात सहभागी कंपन्यांचे अधिकारी व प्रयोगशील शेतकरी या दरम्यान गट चर्चा होईल. सायंकाळी ७.०० नंतर फालीचे विद्यार्थी प्रयोगशील विकसीत शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी विद्यार्थ्यांचे बिझनेस प्लॅन सादरीकरण होईल. दुपारी आकाश मैदानावर विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले जाणार असून त्यातून परीक्षक विजेत्यांची निवड करतील. या दोन्ही प्रकारात विजेत्या ठरलेल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येऊन समापन होईल.