जुन्नर – जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम साऱ्या जगाला भेडसावत आहेत. हि समस्या वेळीच रोखण्यासाठी वृक्षांचे आच्छादन पृथ्वीवर तयार झाले पाहिजे. यासाठी स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी केवळ कायदे करून उपयोग नाहीत, तर जनजागृती आणि पर्यावरण आणि गड किल्ले संवर्धनासाठी संवेदनशिल पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. या उद्देशाने सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या पाठपुराव्यातून आणि जैन ठिबक उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व भावनेतून दिलेल्या २५ लाख रुपयांच्या योगदानातून जुन्नर वनविभाग किल्ले शिवनेरीवर शिवाई देवराई विकसित केली आहे. अशी माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. यावेळी ९० प्रजातींची ३०० दुर्मिळ झाडे या देवराईत लावण्यात आली.
सातपुते यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२४) शिवाई देवराई चा शुभारंभ वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी जैन ठिबक उद्योग समूहाचे रवी गाडीवान, सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री, उपाध्यक्ष राहुल जोशी, कृष्णा देशमुख, सहाय्यक उपवनसंरक्षक अमित भिसे, संदेश पाटील, शिवाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे, विश्वस्त प्रकाश ताजणे, शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, शिवाजी ट्रेलचे विनायक खोत, स्वराज्य पर्यटन संस्थेचे विजय कोल्हे, पुरातत्त्व विभागाचे गोकूळ दाभाडे, प्रा.विनायक लोखंडे, प्रा.संदीप खिलारी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सातपुते म्हणाले,‘‘ जुन्नर वनविभागात ९९ देवराया आहेत. शिवनेरीवरील हि देवराई शंभरावी (शताब्दी) शिवाई देवराई म्हणून यापुढे ओळखली जाईल. वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी केवळ कायदे नियम करून ती जगवता येत नाहीत. तर झाडांना देवाच्या श्रद्धेच्या रुपात पाहिल्याने ,तसेच त्यांचा संदर्भ देव धर्माशी जोडल्याने,जोपासना करण्याची वृत्ती माणसात खऱ्या अर्थाने निर्माण होते. यातून पर्यावरणाबाबत संवेदनशिल पिढी निर्माण होते. या संवेदनशिलेतेतुन ‘शिवाई’ देवराईतील वृक्षे जोपासली जातील.‘‘
दरम्यान यावेळी आपला सलूनचा व्यवसाय सांभाळत ३००० झाडांचे संगोपन करणारे वनश्री पुरस्कार विजेते जालिंदर कोरडे, बेल्हे येथे घनवन विकसित करणारे गणपत औटी,तसेच जुन्नर तालुक्यातील वनसंपदेवर संशोधन करणारे वनस्पतीशास्र्ताचे संशोधक दांपत्य डॉ.सविता रहांगडाळे आणि संजय रहांगडाळे यांचा वनसंपदेच्या विश्वात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
यावेळी वनविभागाच्या बगीचांमध्ये शिवछत्रपती महाविद्यालयाच्या एनएसएस विभाग तसेच वनस्पतिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांनी मानले. सह्याद्रीचे अध्यक्ष संजय खत्री यांनी देवराई उभारणी मागणी संकल्पना सांगितली.
म्हणून शिवाई देवराई नामकरण – प्रत्येक गड किल्ल्यावरील जैवविविधता संवर्धनासाठी त्या किल्ल्याच्या नावाने देवराई उभारण्यात यावी या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या संकल्पनेतुन देवराई साकारत आहे. मात्र बहुतांश देवराई या मातृसत्ताक नावाने असल्याने शिवनेरी देवराई हि शिवाई देवराईने ओळखली जावी अशी संकल्पना वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.सविता रहांगडले यांनी मांडली. त्यांच्या संकल्पनेनुसार जुन्नरमधील १०० वी देवराई शिवाई देवराई नावाने संबोधण्यात येईल अशी घोषणा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी यवेळी केली.