जळगाव दि.२५ : – कंपनी सेक्रेटरीच्या प्रोफेशनल आणि एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅमच्या डिसेंबर २०२२ ला घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कंपनी सेक्रेटरीच्या औरंगाबाद विभागाचे भारतीय कंपनी सेक्रेटरीच्या विभागातील सात विद्यार्थी ही प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना कंपनी सेक्रेटरी म्हणून मान्यता मिळाली आहे. रितू मंडोरे, शुभांगी महाले, आदित्य शर्मा, जागृती देशमुख, युगल पांढरीया, मानसी केसवानी आणि प्रतिक छाजेड यांचा यात समावेश आहे. यापैकी रितू मंडोरे जळगावातील जैन इरिगेशनचे ज्येष्ठ सहकारी प्रविण मंडोरे यांची कन्या आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या यशाबद्दल तीचे अभिनंदन केले आहे.
संपूर्ण भारतातून राष्ट्रीयस्तरावर प्रोफेशनल परीक्षेत १४.२२ टक्के विद्यार्थी मॉड्युल एक पास झाले, १४ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले आणि १३.८५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल ३ पास झाले आहेत. कोलकत्ताच्या चिराग अगरवालने पहिली रँक मिळवली आहे. म्हणजेच तो प्रोफेशनल परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम आला आहे. एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅम परीक्षेत ९.०५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल १ पास झाले आणि १२.३२ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले. कोलकत्ताच्याच किंजल अजमेराने भारतीयस्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे.